Pages

Wednesday, May 31, 2017

कृषि विद्यापीठाने सेंद्रिय शेती व यौगिक शेतीवर संशोधन कार्य हाती घ्या्वे .....महाराष्ट्र व कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. डॉ. राम खर्चे

संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समिती बैठकीत विविध पिकांचे 30 नवीन वाण, 13 कृषि अवजारे व यंत्र आदीसह साधारणत: 244 शिफारशींना मान्‍यता 


आज अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळाली असुन पर्यावरणास अनुकूल, कमी खर्चिक, रासायनिक निविष्‍ठाचा वापर न करता या शेतक-यांना सेंद्रिय शेतीपासुन चांगले अनुभव आले असुन कृषि विद्यापीठांनी सेंद्रिय शेती व यौगिक शेतीवर संशोधन करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. डॉ. राम खर्चे यांनी केले. महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची ४५ वी बैठक परभणी येथे महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २९ ते ३१ मे दरम्‍यान आयोजित करण्‍यात आली होती, त्‍या बैठकीच्‍या समारोपात अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्‍यासपीठावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. तपस भट्टाचार्य, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथा, संशोधन संचालक (परभणी) डॉ दत्‍तप्रसाद वासकर, संशोधन संचालक (अकोला) डॉ डि एम मानकर, संशोधन संचालक (राहुरी) डॉ आर एस पाटिल, संशोधन संचालक (दापोली) डॉ यु व्‍ही महाडकर, संशोधन संचालक (कृषि परिषद) डॉ हरिहर कौसडीकर आदी प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ. राम खर्चे पुढे म्‍हणाले की, कृषि विद्यापीठाचे संशोधन प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेतावर पोहचविण्‍याचे कार्य कृषि विभागाचे असुन कृषि विभागातील कृषि सहाय्यकापासुन ते वरिष्‍ठ अधिका-यांपर्यंत सदरिल संशोधन शिफारसीबाबत नियमित प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्‍यात यावीत. विद्यापीठाने संशोधीत केलेल्‍या पिकांचे नवीन वाण, कृषि अवजारे व यंत्रे, कृषि तंत्रज्ञान शिफारशीचा शेतक-यांच्‍या शेतीवरील  परिणामाचे संशोधनात्मक विश्‍लेषण झाले पाहिजे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ नैराश्‍यग्रस्‍त शेतक-यांसाठी राबवित असलेला उमेद उपक्रम निश्चितच चांगला उपक्रम आहे. गटशेती, शेतकरी बियाणे उत्‍पादक गट, बचत गट व शेतीस शेतीपुरक व्‍यवसायाची जोड देऊन शेतीत शाश्‍वतता आणावी लागेल. शेतक-यांचे मनोबल उंचावण्‍यासाठी कार्य करावे लागेल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, राज्‍याचे दरडोई उत्‍पन्‍न इतर राज्‍यापेक्षा चांगले आहे, परंतु आपल्‍या राज्‍यात शेतकरी आत्‍महत्‍या होत आहेत, यासाठी सर्वांनी एकत्रित कृती आराखडा तयार करावा लागेल. कृषि विद्यापीठाच्‍या संशोधनाचे दस्‍तऐवजीकरण चांगल्‍यारितीने होणे गरजेचे असल्‍याचे मत दापोली येथील कुलगुरु मा. डॉ. तपस भट्टाचार्य आपल्‍या भाषणात व्‍यक्‍त केले तर कुलगुरु मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथा म्‍हणाले की, विद्यापीठाचे संशोधन शेतक-यांच्‍या शेतावर पोहचविण्‍यासाठी मोठया प्रमाणात प्रात्‍यक्षिके घ्‍यावी लागतील तसेच बीजोत्‍पादन यंत्रणा मजबुत करावी लागेल.
कार्यक्रमात संशोधन संचालक (कृषि परिषद) डॉ हरिहर कौसडीकर यांनीही मत व्‍यक्‍त केले. सुत्रसंचालक डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले. कार्यक्रमात विविध तांत्रिक सत्रातील 12 गटांचा कार्यवृत्‍ताचे वाचन करण्‍यात येऊन त्‍यातील विविध पिकांचे 30 नवीन वाण, 13 कृषि अवजारे व यंत्र आदीसह एकुण साधारणत: 244 संशोधन शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली. 
शेतपिकामध्‍ये एकुण 18 वाणानां मान्‍यता देण्‍यात आली, यात भात पिकाचे चार, भुईमुगाचे तीन, संकरित बाजरीचे दोन वाणासह ऊस, हरभरा, ज्‍वारी, बर्टी, राजमा, जवस, ओट, अंजन व मारवेल गवताच्‍या प्रत्‍येकी एक वाणाची शिफारस करण्‍यात आली. उद्यानविद्या पिकात एकुण 12 वाणाना मान्‍यता देण्‍यात आली, यात टोमॅटोच्‍या तीन वाणासह भेंडी, मिरची, वांगी, सिताफळ, संत्रा, कागदी लिंबु, घोसाळी, गेलार्डिया, शेवंती यांच्‍या प्रत्‍येकी एक वाणास मान्‍यता देण्‍यात आली.

Monday, May 29, 2017

शेतक-यांच्‍या व शेतीच्‍या विकासासाठी शासन, कृषि विभाग, शास्‍त्रज्ञ यांना एकत्रित कार्य करावे लागेल .....राज्‍याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर

वनामकृवित आयोजित संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची ४५ व्‍या बैठकीचे उद्घाटन
तीन दिवशीय बैठकीत तीनशे कृषि शास्‍त्रज्ञांचा सहभाग, ३० नवीन वाणासह साधारणत: २८० तंत्रज्ञान शिफारसी मांडल्या जाणार


मार्गदर्शन करतांना राज्‍याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर

राज्‍य शासनाने सुरू केलेल्‍या उन्‍नत शेती – समृध्‍द शेतकरी अभियानाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांच्‍या शेतावर विविध पिकांच्‍या वाणाचे अनुवंशिक उत्‍पादन प्राप्‍त करण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येणार असुन शेतक-यांनी घेतलेल्‍या कर्जापेक्षा व शेतीतील खर्चापेक्षा शेती व्‍यवसायातुन अधिक उत्‍पन्‍न झाले पाहिजे. यासाठी शेतकरी, कृषि विभाग, राज्‍य शासन, विद्यापीठ व शास्‍त्रज्ञ सर्वाना प्रयत्‍न करावे लागतील, असे प्रतिपादन राज्‍याचे कृषि व फलोत्पादन मंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर यांनी केले.
महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची ४५ वी बैठक दिनांक २९ ते ३१ मे दरम्‍यान परभणी येथे महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने होत असुन सदरिल बैठकीच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. डॉ. राम खर्चे, कृषि व फलोत्पादनाचे अप्‍पर मुख्य सचिव मा. श्री. विजय कुमार (भाप्रसे), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. आर. जी. दाणी, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. तपस भट्टाचार्य, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथा, कृषि परिषदेचे महासंचालक तथा सदस्य सचिव मा. डॉ. के. एम. नागरगोजे (भाप्रसे), कृषि आयुक्‍त मा. श्री. सुनिल केंद्रेकर, परभणीचे आमदार मा. डॉ राहुल पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, जिल्‍हाधिकारी मा. श्री पी शिवा शंकर, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री केदार सोळुंके, मा. श्री अनंतराव चौंदे, मा. रविंद्र देशमुख, मा डॉ पी आर शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आदीसह विविध कृषि विद्यापीठाचे संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती. 
उपस्थित शास्‍त्रज्ञांना मार्गदर्शन करतांना मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर पुढे म्‍हणाले की, शेतकरी आत्‍महत्‍याबाबत सर्वांना आत्‍मचिंतन करावे लागेल. स‍दरिल बैठकीत सर्व शास्‍त्रज्ञ व कृषि शासनातील अधिकारी यांनी विचारमंथन करावे. कृषि तंत्रज्ञानाच्‍या आधारे कृषि उत्‍पादनात मोठी वृध्‍दी झाली, यावर्षी तुरीचे विक्रमी उत्‍पादन घेऊन शेतक-यांनी दाखवुन दिले. परंतु बाजारभावाचा प्रश्‍न निर्माण झाला. शासनाने नाफेडच्‍या मार्फत सुमारे दहा लाख क्विंटल तुरीची खरेदी केली. राष्‍ट्रीय पातळीवरील देशाचे शेतामाल विषयक आयात-निर्यात धोरण ठरवितांना राज्‍याचा सहभाग पाहिजे. कृषि विद्यापीठातील कृषि शिक्षण जरी महत्‍वाचे असले तरी राज्‍यातील शेती विकासासाठी कृषि संशोधनावर आपणास भर द्यावा लागेल. चारही कृषि विद्यापीठाने अनेक चांगले संशोधन केले असुन चारही विद्यापीठाच्‍या संशोधनात समन्‍वय झाले पाहिजे. शेतीचे यांत्रिकीकरण करणे गरजेचे असुन यावर्षी सुरू केलेल्‍या योजनेत एक लाख शेतक-यांनी विविध शेती अवजारे व यंत्राची मागणी केली आहे. राज्‍यातील पशुधन कमी होत आहे, याकडेही लक्ष द्यावे लागेल. महाराष्‍ट्र शासनाच्‍या महत्‍वाकांशी जलयुक्‍त शिवार योजनेमुळे पाणीसाठा वाढण्‍यास निश्चितच मदत होत असुन त्‍यामुळे कृषि उत्‍पादन वाढ होऊन शेतक-यांच्‍या आर्थिक स्‍थैर्य प्राप्‍त होईल. कृषि विद्यापीठांनी हवामान बदलाचा पार्श्‍वभुमीवर पिकांमध्‍ये असलेल्‍या अनुवंशिक विविधतेचा उपयोग अवर्षण सहनशील व उष्‍णता सहनशील वाणांची निर्मिती करावी लागेल, असे सल्‍ला त्‍यांनी शास्‍त्रज्ञांना दिला.
महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. डॉ. राम खर्चे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषि विद्यापीठाच्‍या संशोधनाचा परिणाम देशात व राज्‍याच्‍या शेती उत्‍पादन वाढीवरून दिसुन येत आहे. कृषि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी अनेक पिकाच्‍या बाबतीत विक्रमी उत्‍पादन घेत आहेत. देशाची व राज्‍याची अर्थव्‍यवस्‍था पुर्णपणे शेतीशी निगडीत आहे. कृषि अर्थव्‍यवस्‍था सक्षम करण्‍यासाठी कृषि विद्यापीठाचे महत्‍व अधोरेखित होते, यासाठी राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठाना पाठबळाची आवश्‍यकता. सदरिल बैठकी कृषि संशोधक व कृषिशी निगडीत विविध विभाग सहभागी आहेत परंतु शेतकरी, बियाणे कंपन्‍या व शेती यंत्र उत्‍पादक यांचाही सहभाग घेणे आवश्‍यक आहे. गेल्‍या एक वर्षापासुन कृषि विद्यापीठांतील नौकर भरती व प्राध्‍यापकांच्‍या पदोन्‍नोतीचा प्रश्‍न मार्गी लावण्‍याचा प्रयत्‍न कृषि परिषद करीत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  
कृषि व फलोत्पादनाचे अप्‍पर मुख्य सचिव मा. श्री. विजय कुमार आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषि विद्यापीठातील संशोधन जलदगतीने गावपातळीवरील कृषि सहाय्यक शेतक-यापर्यंत पोहचविले पाहिजे, यासाठी प्रसार माध्‍यमे, माहिती तंत्रज्ञान यांची मदत घ्‍यावी लागेल. कृषि विभागाच्‍या वतीने घेणारे प्रात्‍यक्षिकातही कृषि शास्‍त्रज्ञांचे तांत्रिक पाठबळ पाहिजे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले तर कोरडवाहु शेती तंत्रज्ञान, जलसंवर्धन व जलपुर्नभरण, अॅग्रोटेक वनामकृवि आदी मोबाईल अॅप्‍सचे लोकापर्ण करण्‍यात आले. यावेळी विद्यापीठ तंत्रज्ञान व उपक्रमावर आधारित प्रदर्शनीचेही आयोजित करण्‍यात आले होते. प्रास्‍ताविकात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी चारही कृषि विद्यापीठाचा प्रगती अहवाल मांडला. सुत्रसंचालन क्रांती दैठणकर यांनी केले तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास चारही कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, शहरातील प्रतिष्‍ठीत नागरिक, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
सदरिल बैठकीत विविध पिकांचे अधिक उत्पादन देणारे ३० नवीन वाणासह साधारणत: २८० तंत्रज्ञान शिफारसी मांडल्या जाऊन शेतक­यांसाठी प्रसारीत केल्या जाणार आहेत. सदरील बैठकीचा समारोप ३१ मे रोजी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून कृषि परीषदेचे उपाध्यक्ष मा. ना. डॉ. राम खर्चे यांची उपस्थिती लाभणार आहे. बैठकीसाठी राज्याचे माननीय राज्‍यपाल मा. श्री. चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस आदींसह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.




वनामकृविच्‍या संशोधन बियाणांची पाहणी करतांना राज्‍याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर

Sunday, May 28, 2017

वनामकृवीतील संकरीत गो पैदास प्रकल्‍पावर चारापिके प्रक्षेत्र विकसीत

फुले जयवंत व धारवाड-६ चारापिकांची ठोंबे उपलब्‍ध
प्रक्षेत्राचे संग्रहित छायाचित्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील संकरीत गो पैदास प्रकल्‍पावर चारापिके प्रक्षेत्र विकसीत केले आहे. फुले जयवंत, फुले गुणवंत व धारवाड-६ या बहुवार्षिक चारापिकाची ठोंबे उपलब्‍ध असुन स्‍टायलो व रूचिरा चारापिकाचे बियाणे नाममात्र शुल्‍कामध्‍ये संकरीत गो पैदास प्रकल्‍प, परभणी येथे उपलब्‍ध असुन शेतकरी बांधव व पशुपालकांनी याचा लाभ घ्‍यावा असे आवाहन संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संकरीत गो पैदास प्रकल्‍पाचे जेष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. दिनेशसिंह चौहान (९४२३१७१७१५) व पशुवैदयकीय अधिकारी डॉ. संदेश देशमुख (९८५०१७७२३१) यांच्‍याशी संपर्क साधावा. फुले जयवंत व धारवाड-६ या बहुवार्षिक चारापिकाची विशेष वैशिष्टये म्‍हणजे या चारापिकाची वाढ २४ ते ४० अंश सेल्सिअस या तापमानास उत्‍तम होते. ही चारापिके दुष्‍काळात कमी पाण्‍यात तग धरून राहतात व सिंचनाची सोय असल्‍यास या गवताची लागवड ३ वर्षापर्यंत टिकते. या वाणात प्रथिनांचे प्रमाण १०.५६ टक्‍के व पिष्‍टमय पदार्थाचे प्रमाण ४१ टक्‍के इतके असुन प्रती वर्षी एकुण ८ ते ९ कापण्‍यामध्‍ये २००० ते २५०० क्विंटल हिरवा चारा प्रती वर्षी प्रती हेक्‍टरी उत्‍पादन मिळते.
वातावरणात होणा-या बदलाचा विचार करता मागील चार वर्षापासून मराठवडयात पावसाचे प्रमाण असमान असुन हिरव्‍या चा-याची उपलब्‍धता फारच कमी होत असल्‍याकारणाने शेतक-यांना जनावरे चारा छावणीमध्‍ये पाठविण्‍याची वेळ येत आहे. मराठवाडयातील शेतक-यांना चारापिकाची ठोंबे व बियाण्‍याची उपलब्‍धता होत नसल्‍या कारणाने संकरीत गो पैदास प्रकल्‍पावर चारापिक प्रक्षेत्र उभारण्‍याचा निर्णय कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या मार्गदर्शानुसार व संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांचे सुचनेनुसार सन २०१५ मध्‍ये घेण्‍यात आला. प्रकल्‍पावरील पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्‍ध व्‍हावा तसेच शेतकरी व पशुपालकांना चारा पिकांची ठोंबे व बियाणे उपलब्‍ध व्‍हावे या दृष्‍टीने विचार करून अधिक उत्‍पादन देणा-या संकरीत नेपीयर गवताच्‍या विविध जातीचे वाण भारतीय कृषी संशोधन संस्‍थेअंतर्गत (आयसीएआर) भारतातील विविध विदयापीठे, संशोधन केंद्रावरून तसेच चारापिक अनुसंसाधान केंद्र, झांसी व धारवाड येथुन आणुन संकरीत गो पैदास प्रकल्‍पाच्‍या प्रक्षेत्रावर लागवड करण्‍यात आली. भारतीय चारापिक संशोधन संस्‍था, धारवाड येथुन धारवाड-६, आयजीएफआर-७, साओबीएन-५ या बहुवार्षिक नेपीयर गवताची ठोंबे आणुन २०१६ मध्‍ये चारा प्रक्षेत्रावर लागवड करण्‍यात आली. या व्‍यतिरीक्‍त भारतातील विविध संस्‍था जसे की, अविका नगर, झांसी, राष्‍ट्रीय कृषी संशोधन संस्‍था (एनएआरआय) फलटण व इतर संस्‍थेकडून बहुवार्षिक ज्‍वारी, अंजन गवत, धामण गवत, बाजरी, न्‍युट्रीफिड, शुगरगेज, ल्‍युर्सन, ओट, स्‍टायलो, मारवेल तसेच पॅराग्रास या पिकाची बियाणे व ठोंबे आणुन लागवड करण्‍यात आली आहे. आतापर्यंत या चारा प्रक्षेत्रावरून ४१८ शेतक-यांना एकुण २,१६,८५० फुले जयवंत व धारवाड नेपीयर गवतांच्‍या ठोंबाची विक्री करण्‍यात आली, तसेच मारवेल, पॅराग्रास, फुले रुचिरा, स्‍टायलो व ओट या चारापिकाची ठोंबे व बियाणे विकण्‍यात आली. यापुढेही मराठवाडयातील शेतक-यांना विविध चारा पिके जसे की ओट, स्‍टायलो, बरसीम, ज्‍वार, मका, दशरथ याची बियाणे तयार करून विकण्‍याचे प्रस्‍तावित आहे. सन २०१५ पासुन या चारापिक प्रक्षेत्रास भारतीय अनुसंधान परिषद तसेच भारतातील नामवंत संस्‍थेच्‍या संशोधकांची भेट दिली आहे.
प्रक्षेत्राचे संग्रहित छायाचित्र

Saturday, May 27, 2017

वनामकृविच्‍या बियाणे विक्रीस शेतक-यांचा मोठा प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विद्यापीठ वर्धापन दिनी दिनांक १८ मे रोजी आयोजित शेतकरी मेळाव्‍याप्रसंगी विद्यापीठ संशोधीत खरीप पिकांचे सत्‍यतादर्शक बियाणे शेतक-यांसाठी विक्रीस उपलब्‍ध केले होते. बियाणे विक्रीस शेतक-यांनी मोठा प्रतिसाद दिला. यावर्षी सोयाबीन, मुग व तुर पिकाचे एकुण २५२ क्विंटल सत्‍यतादर्शक बियाणे उपलब्‍ध झाले होते, यात सोयाबीनच्‍या एमएयुएस-७१ व एमएयुएस-१५८ वाणाचे १८२ क्विंटल सत्‍यतादर्शक बियाणे संपलेले असुन या वाणाचे ८२५.७६ क्विंटल पैदासकार बियाणे महाबीजला बीजोत्‍पादनासाठी देण्‍यात आले, त्‍याचा अप्रत्‍यक्ष शेतक-यांच लाभ होणार आहे. म्‍हणजेच सोयाबीनचे साधारणत: एक हजार क्विंटल सत्‍यतादर्शक व पैदासकार बियाण्‍याची वि‍क्री झाली आहे. तसेच तुर बीडीएन-७११ या वाणाचे ६० क्विंटल व मुग बीएम-२००३-२ वाणाचे १० क्विंटल सत्‍यतादर्शक बियाणे उपलब्‍ध होते तर सदरिल वाणाचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्‍ध असल्‍याचे विद्यापीठाच्‍या बियाणे विभागाने कळविले आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या निर्देशीत केल्‍यानुसार कॅशलेस व्‍यवहार संकल्‍पनेच्‍या अनुषंगाने विद्यापीठाने कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनानुसार व विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड व स्‍टेट बॅक ऑफ इंडिया यांच्‍या सहकार्याने स्‍वाईप मशीनाची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली होती. सदरिल बियाणे खरेदी करतांना शेतक-यांनी एटीएम कार्डव्‍दारे स्‍वाईप मशीनाच्‍या माध्‍यमातुन कॅशलेस सुविधेचा मोठा प्रमाणात उपयोग केला.

Friday, May 26, 2017

वनामकृवित संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची ४५ व्‍या बैठकीचे आयोजन

राज्‍याचे माननीय कृषिमंत्री महोद्यांच्‍या हस्‍ते उद्घाटन
तीन दिवशीय बैठकीत तीनशे कृषि शास्‍त्रज्ञांचा सहभाग, ३० नवीन वाणासह साधारणतः २८० तंत्रज्ञान शिफारसी मांडल्या जाणार
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीच्‍या ४५ व्‍या बैठकीनिमित्‍त दिनांक २६ मे रोजी माननीय कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पत्रकार परिषद संपन्‍न झाली. सदरिल पत्रकार परिषदेत संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती. विविध प्रसार माध्‍यमांचे प्रतिनिधी मोठया संख्‍येने उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन संशोधन उपसंचालक डॉ अशोक जाधव यांनी केले तर आभार जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी मानले.
प्रेस नोट
महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची ४५ वी बैठक दिनांक २९ ते ३१ मे दरम्‍यान परभणी येथे महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने होत आहे. सदरिल बैठकीचे उद्घाटन राज्‍याचे कृषि व फलोत्पादन मंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दिनांक २९ मे रोजी सकाळी १०.३० वाजता कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात होणार आहे. बैठकीस महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. डॉ. राम खर्चे, कृषि व फलोत्पादनाचे अप्‍पर मुख्य सचिव मा. श्री. विजय कुमार (भाप्रसे), अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. आर. जी. दाणी, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. तपस भट्टाचार्य, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथा, कृषि परिषदेचे महासंचालक तथा सदस्य सचिव मा. डॉ. के. एम. नागरगोजे (भाप्रसे) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे बैठकीचे स्वागताध्यक्ष आहेत. यावेळी विद्यापीठ तंत्रज्ञान व उपक्रमावर आधारित प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे.
राज्यातील कृषि विद्यापीठांनी केलेल्या संशोधनामुळे नजीकच्या काळात विविध पिकांचे उत्पादन व उत्पादकता यात लक्षणीय वाढ दिसुन येत आहे, तरी हवामान बदल, दुष्काळग्रस्त परिस्थिती, लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेल्या अन्न सुरक्षतेचा प्रश्‍न, जमिनीच्‍या सुपीकताचा ­हास व विविध कारणांमुळे होणारे कृषि उत्पादनाचे नुकसान यामुळे कृषि उत्‍पादन वाढीवर मर्यादा येत आहेत. या अनुषगांने राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेल्या संशोधनातुन शेतक­यांना शाश्‍वत उत्पादन देणारे विविध पिकांचे सुधारीत व संकरीत वाण, पशुधनाच्या सुधारीत प्रजाती, पीक लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, मृद व जलसंधारण आदीसह अनेक महत्वाच्या शिफारसीबाबत बैठकीच्या माध्यमातून विचारमंथन होऊन शेतक­यांसाठी प्रसारीत केल्या जातात. शेतक-यांच्‍या दृष्टीने सर्वात महत्वाची बाब म्हणजे सदरिल बैठकीत विविध पिकांचे अधिक उत्पादन देणारे ३० नवीन वाणासह साधारणतः २८० तंत्रज्ञान शिफारसी मांडल्या जाणार आहेत.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ४९ शिफारशींचे सादरीकरण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांमार्फत संशोधनावर आधारीत एकुण ४९ शिफारशी बैठकीत सादर करण्यात येणार असुन यात तीन प्रसारीत वाण, दोन पुर्व प्रसारीत वाण, चार कृषि औजारे आदीसह तेरा (१३) कृषिविद्या, पाच () पाणी व्यवस्थापन, पाच () गृहविज्ञान, चार () पिक संरक्षण, चार () कृषि अंभियांत्रिकी, तीन () अन्नतंत्रज्ञान, दोन () कृषि अर्थशास्त्र, प्रत्‍येकी एक एकात्मिक पीक पद्धती (), उद्यानविद्या (), मृदविज्ञान (), रेशीम () शिफारशी या बैठकीत मांडण्यात येणार आहेत. वनामकृविच्या जवस, संकरीत बाजरी, टोमॅटो या पिकांच्या प्रत्येकी एक वाणाची शिफारस प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहे.
राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्‍या ८९ शिफारशींचे सादरीकरण
महात्मा फुले कृषि विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारित एकुण ८९ शिफारशी सादर करण्यात येणार असून यात ११ प्रसारित वाण, ७ पूर्वप्रसारीत वाण, २ कृषि अवजारांसह इतर ६९ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देश्‍मुख कृषि विद्यापीठाच्‍या ८१ शिफारशींचे सादरीकरण
डॉ. पंजाबराव देश्‍मुख कृषि विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारित एकुण ८१ शिफारशी सादर करण्यात येणार असून यात ११ प्रसारित वाण, ६ पूर्वप्रसारीत वाण, ५ कृषि अवजारांसह इतर ५९ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्‍या ६२ शिफारशींचे सादरीकरण
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारित एकुण ६२ शिफारशी सादर करण्यात येणार असून यात ५ प्रसारित वाण, ३ कृषि अवजारांसह ५४ सुधारीत तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत.
तांत्रिक चर्चासत्रात साधारणत: ३०० शास्‍त्रज्ञांचा सहभाग
तीन दिवस चालणा­या या बैठकीच्या तां‍त्रिक चर्चासत्रात चारही कृषि विद्यापीठातील साधारणत: ३०० कृषि शास्त्रज्ञ सहभाग नोंदविणार असुन वरील सर्व शिफारशींवर विचारमंथन होऊन शेतक­यांसाठी प्रसारीत करण्यासाठी त्यास अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. प्रथम सत्रामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत असलेल्या महाराष्ट्रातील नऊ संशोधन संस्थांचे संचालक तसेच शास्त्रज्ञ, राज्यशासनाच्या विविध विभागाचे अठरा आयुक्त पदाचे अधिकारी, कृषि विषयक खात्‍याचे प्रमुखांचे व राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील संशोधन संचालक अहवालाचे सादरीकरण करणार आहेत.
राष्‍ट्रीय पातळीवरील शास्‍त्रज्ञांचे विशेष सादरीकरण
नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन केंद्राचे संचालक तथा राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम. एस. लदानीया तर मुंबई येथील केंद्रीय कापुस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. पी. जी. पाटील यांचे सादरीकरण होणार आहे. मुंबई येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. गोपाल क्रिष्णा तसेच बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. एन. पी. सिंग, सोलापुर येथील राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. रामकृष्ण पाल, पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत, नागपुर येथील राष्ट्रीय मृद सर्वेक्षण व जमीन वापर योजना केंद्राचे संचालक डॉ. सुरेंद्रकुमार सिंग, पुणे येथील कांदा व लसुण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. विजय महाजन आणि फुलशेती संशोधन संचालनालय, कृषि महाविद्यालय पुणे येथील संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांचे त्यांच्या क्षेत्रातील विविध विषयावर संशोधनात्मक सादरीकरण राहणार आहे. याप्रकारच्या वैविध्यपुर्ण संशोधनात्मक सादरीकरण प्रथमच या बैठकीतून करण्याचे मा. कुलगुरू डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांच्या कल्पनेतुन आयोजीत केले असुन सदरिल सादरीकरणे राज्यातील कृषि संशोधनकांना मार्गदर्शक ठरणार आहेत.
तांत्रिक सत्राच्या एकुण १२ गटांमार्फत विविध शिफारशीवर विचारमंथन होणार आहे. तांत्रिक सत्राच्या पहिल्या गटात शेत पीके (पीक सुधारणा व तंत्रज्ञान सुधारात्मक व्युहरचना) यावर शिफारशी प्रसारीत होणार आहेत. नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन, उद्यानविद्या आणि पशु व मत्स्य विज्ञान या वरील शिफारशी अनुक्रमे गट क्र. २, ३ व ४ मध्ये मांडण्यात येणार आहेत. गट क्र. ५ मध्ये मुलभुत शास्त्रे, अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयावरील शिफारशी मांडण्यात येणार आहेत तर गट क्रमांक ६, ७ व ८ मध्ये पीक संरक्षण, कृषि अभियांत्रिकी व सामाजीक शास्त्र या विषयावरील शिफारशी मांडण्यात येणार आहेत. शेती पीके आणि उद्यानविद्या वाण प्रसारण तसेच कृषि यंत्रे व अवजारे प्रसारणावर चर्चा गट क्र. ९, १० व ११ मध्ये होणार आहे. जैविक ताण सहन करणारे स्त्रोत नोंदणी प्रस्ताव गट क्र. १२ मध्ये मांडण्यात येणार आहे.
शेतक-यांना हंगामापुर्वी कोणत्‍या पिकांस किती मागणी राहील व किती भाव राहील हा अंदाज बाधण्‍यासाठी राज्‍यापातळीवर सर्वांच्‍या सहभागातुन एक यंत्रणा निर्माण करण्‍याच्‍या दृष्‍टीने सदरिल बैठकित विचार मंथन करण्‍यात येणार असल्‍याची माहिती कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी दिली.
सदरील बैठकीचा समारोप ३१ मे रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून कृषि परीषदेचे उपाध्यक्ष मा. ना. डॉ. राम खर्चे यांची उपस्थिती लाभणार आहे. या बैठकीसाठी राज्याचे माननीय राज्‍यपाल मा. श्री. चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस आदींसह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आल्याची माहिती संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी दिली.

Thursday, May 25, 2017

शेतीमध्ये काटेकोर पाणी व्यवस्थापनाकरीता माहिती तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक......कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू

‘सिंचन संगणक प्रारूपे’ या विषयावरील एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्‍न
राज्यातील कृषी विद्यापीठांतील सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाने विविध संगणकीय प्रारूपे विकसित केली आहेत. शेतीत पिकास पाणी किती द्यावे, कधी द्यावे व कसे द्यावे या विषयीचे काटेकोर पाणी व्‍यवस्‍थापनात तांत्रिक ज्ञान गरजेचे असून त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दि. २३ मे रोजी ‘सिंचन संगणक प्रारूपे’ या विषयावरील एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्‍या  उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. सुधीर वडतकर, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. अशोक कडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनीही प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. सुनील गोरंटीवार आणि त्यांच्या सहकार्यांनी फुले जल, फुले इरिगेशन शे डूलर, फुले शेततळे ताळेबंद संगणक प्रणाली, जलसिंचन व्यवस्थापन निर्णय प्रणाली या सिंचन संगणक प्रारूपांची माहिती दिली. कार्यशाळेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, परभणी येथील शास्‍त्रज्ञ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अशोक कडाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे व प्रा. सुमंत जाधव यांनी केले तर प्रा. हरीश आवारी व डॉ. विशाल इंगळे यांनी आभार मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा. हरीश आवारी, प्रा. सुमंत जाधव, डॉ. विशाल इंगळे, प्रा. संजय पवार आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Tuesday, May 23, 2017

उन्‍नत शेती – समृध्‍द शेतकरी अभियानाच्‍या प्रशिक्षण कार्यक्रमात कृषि राज्‍यमंत्री मा. ना. श्री सदाभाऊ खोत यांचे मार्गदर्शन

राज्‍यात राबविण्‍यात येणारे उन्‍नत शेती - समृध्‍द शेतकरी अभियान केवळ पंधरावाड्यापुरते मर्यादित न राहता वर्षभर कार्य करावे लागेल. शेतकरी व शास्‍त्रज्ञ यांच्‍यात सतत संवाद झाला पाहिजे, या अभियानात कृषि विद्यापीठांतर्गत असलेले विविध महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन केंद्रातील शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक तसेच विद्यार्थी यांचा सहभाग महत्‍वाचा असुन विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांच्‍या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, असा सल्‍ला राज्‍याचे कृषि, फलोत्‍पादन व पणन राज्‍यमंत्री मा. ना. श्री. सदाभाऊ खोत यांनी दिला. महाराष्‍ट्र राज्‍यात कृषि विभागाच्‍या वतीने दिनांक 25 मे ते 8 जुन दरम्‍यानउन्‍नत शेती- समृध्‍द शेतकरी अभियान राबविण्‍यात येणार असुन यास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांचे तांत्रिक पाठबळ राहणार आहे. सदरिल अभियानात सहभागी होणा-या शास्‍त्रज्ञांना प्रशिक्षीत करण्‍यासाठी दिनांक 23 मे रोजी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते, या प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. व्‍यासपीठावर कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ विलास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. ना. श्री. सदाभाऊ खोत पुढे म्‍हणाले की, हवामान बदलामुळे शेतीपुढे आज अनेक समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत, शेतक-यांचा रासायनिक खते व किडनाशकांवर भरमसाठ खर्च होतो, हवामान बदलात तग धरणारे व कीड-रोगास कमी बळी पडणारे पिकांचे वाण निर्माण करावे लागतील, या वर्षी तुरीचे भरभरून उत्‍पादन आले, परंतु साठवणुकीसाठी सुविधा नसल्‍याने शेतकरी अडचणीत आला आहे. गावागावात शेतमाल गोदामाचे जाळे निर्माण करावे लागेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. कार्यक्रमात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित खरीपातील मुख्‍य पिकांचे एकात्मिक व्‍यवस्‍थापन या पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले. प्रशिक्षणात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी विविध विविध खरिप पिक लागवडीवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ बी बी भोसले यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ एन के भुते यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Sunday, May 21, 2017

वनामकृविच्‍या घटक महाविद्यालयात आगामी शैक्षणिक सत्रापासुन विद्यार्थ्‍यांना फिस भरण्‍यासाठी ऑनलाईन सुविधा

विद्यापीठ कॅशलेसच्‍या दृष्‍टीने महत्‍वाचे पाऊल
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत मराठवाडयातील अकरा घटक महाविद्यालयात साधारणत: सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत असुन विद्यार्थ्‍यांची शैक्षणिक सत्राची नोंदणी जुन महिन्‍यात सुरूवात होते. त्‍या अनुषंगाने प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांच्‍या नोंदणी शुल्‍काचा भरणा करण्‍यासाठी विद्यापीठाने स्‍टेट बॅक ऑफ इंडियाच्‍या सहकार्याने ऑनलाईन पध्‍दतीने एसबीआय कॅलेक्‍शन व्‍दारे सुविधा उपलब्‍ध करून दिलेली आहे. शासनाने सर्व व्‍यवहार कॅशलेस करण्‍यासंदर्भात निर्देश लक्षात घेता दिनांक 20 मे रोजी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या अध्‍यक्षतेखाली सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन या सुविधाबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. प्रशिक्षणास शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणात सहाय्यक नियंत्रक श्री जी बी ऊबाळे यांनी सदरिल सुविधेबाबत माहिती दिली. यामुळे या शैक्षणिक सत्रापासुन विद्यार्थ्‍यी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊ शकतील.
विद्यापीठ बियाणे विक्रीतही स्‍वाईप मशिन सुविधेस शेतक-यांचा मोठा प्रतिसाद
यापुर्वीच विद्यापीठ वर्धापन दिनी आयोजित खरिप शेतकरी मेळाव्‍या निमित्‍त विद्यापीठ विकसित बियाणे विक्री दरम्‍यान स्‍वाईप मशिन सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली होती. शेतक-यांनी स्‍वत:च्‍या एटिएम कार्ड व्‍दारे स्‍वाईप मिशन सुविधेच्‍या माध्‍यमातुन सदरिल बियाणे खरीदेसाठी प्रतिसाद दिला.

वनामकृवित ‘सिंचन संगणक प्रारूपे’ एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दि. २३ मे रोजी ‘सिंचन संगणक प्रारूपे’ या विषयावरील एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन सकाळी ११:०० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरुलू यांचे हस्ते होणार असुन  शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. बाळासाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
कार्यशाळेत राज्यातील चार हि कृषी विद्यापीठातील सिंचन अभियांत्रिकी विभागाने विकसित केलेल्या सिंचन संगणक प्रारूपांबाबत संबंधित विद्यापीठातील शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदरिल कार्यशाळेत शेतकरी बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. अशोक कडाळे यांनी केले आहे. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा. हरीश आवारी, प्रा. सुमंत जाधव, डॉ. विशाल इंगळे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Saturday, May 20, 2017

मौ. परळगव्हाण (ता. जि. परभणी) येथे गृहविज्ञान महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत मौ. परळगव्हाण (ता. जि. परभणी) येथे विशेष शिबीराचे आयोजन या विशेष शिबीरांतर्गत महिला, युवक आणि बालकांच्या विकास व कल्याण हा उद्देश ठेऊन विविध उपक्रम राबविले गेले. शिबिरात रासेयोच्‍य स्वयंसेवकांनी बालविवाह निर्मुलन, हुंडाबंदी यावर लघुनाटिका सादर केल्या, तसेच गृहविज्ञान तंत्रज्ञानाशी निगडीत पुस्तकाचे प्रदर्शन मांडण्‍यात आले. या निमित्ताने ग्रामीण बालके आणि युवकांच्या वाढांक आणि संपादन वृध्दिंगत करण्यासाठी कुटुंबियांची भुमिका, कौटुंबिक वस्त्रांची निवड आणि निगा, बालकांच्या आरोग्यासाठी दैनंदिन आहार, बालक व युवकांसाठी वेळ व कार्याचे व्यवस्थापन आदी विषयांवर तंज्ञांनी मार्गदर्शन केले. शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्या प्रा. विशाला पटनम, उपसरपंच श्रीमती रोहिणी शिंदे, जिजाऊ महिला बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती छाया शिंदे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. अनुराधा लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. विशाला पटनम, डॉ सुनिता काळे, डॉ. विजया नलावडे, डॉ. जयश्री रोडगे आदींनी विविध विषयांवर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. सदरिल शिबीरातील मार्गदर्शन अतिशय उपयुक्त असल्याचे मनोगत ग्रामस्थांनी व्यक्त केले. विशेष शिबीर यशस्वीतेसाठी रासेयोच्या स्‍वयंसेवकांनी परिश्रम घेतले. 

Thursday, May 18, 2017

गाव पातळीवर व पिकनिहाय शेतकरी गट निर्माण करावी लागतील.....माजी कुलगुरू मा. डॉ. किसनराव लवांडे

वनामकृविच्‍या खरीप शेतकरी मेळाव्‍यास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद
विद्यापीठ बियाणे विक्रीचे उद्घाटन करतांना
कृषि प्रदर्शनीचे उदघाटन करतांना
मेळाव्‍याचे उदघाटन करतांना
विदेशात शेतमालाचे भाव सरकार बांधुन देते, भारतात शेतकरी स्‍वत: शेतमालाचे भाव ठरवु शकत नाही. देशात शेतमालावर शेतक-यांपेक्षा व्‍यापारीच जास्‍त नफा कमावतो, राज्‍यातील शेतक-यांची आर्थिक स्थिती सुधारवयाची असेल तर शेतक-यांचे गाव पातळीवर व पिक निहाय आपले गट निर्माण करावी लागतील, असे प्रतिपादन दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. किसनराव लवांडे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ४५ व्‍या वर्धापन दिना‍निमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचे कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित दिनांक १८ मे रोजी खरीप शेतकरी मेळावाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियानाचे संचालक तथा विस्‍तार व प्रशिक्षण (कृषिसंचालक मा. डॉ. एस. एल. जाधव, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. रविंद्र देशमुख, मा. श्री. गोविंदराव देशमुख, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुल‍सचिव डॉ विलास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
माजी कुलगुरू मा. डॉ. किसनराव लवांडे पुढे म्‍हणाले की, शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍यासाठी सिंचन क्षमतेत वाढ करावी लागेल, शेतक-यांना अखंडीत वीजपुरवठा दिला पाहिजे, शेतमालास बाजार भावाची हमी, उत्‍पादन खर्चावर आधारीत शेतमालास भाव, पारदर्शक विपणन व्‍यवस्‍था, पत व्‍यवस्‍था, शेतमाल साठवण व्‍यवस्‍था आदी बाबींवर भर द्यावा लागेल. आज देशात अन्‍नधान्‍याची गोदामे भरून आहेत तर दुसरीकडे खरेदी क्षमता नसल्‍यामुळे भुकबळींची संख्‍याही मोठी आहे. यासाठी ग्रामीण भागात शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारून रोजगार निर्मिती करावी लागेल. आज राज्‍यातील कृषि विद्यापीठांनी विविध पिकांची अनेक वाण व तंत्रज्ञान शिफारसी शेतक-यांना दिल्‍या आहेत, शेतक-यांच्‍या कष्‍टाच्‍या आधारे अन्‍नधान्‍यात उत्‍पादनात भरीव वाढ झाली आहे.
राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियानाचे संचालक मा. डॉ. एस. एल. जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, शेतकरी आज अनेक कारणामुळे मानसिक तणावाखाली यासाठी शासन, शास्‍त्रज्ञ व शेतक-यांना एकत्रिक कार्य करावे लागेल. शेतकरी समृध्‍द करण्‍यासाठी शेतीतील विविध निविष्‍ठांवरील खर्च कमी करून पिकांचे उच्‍चतम उत्‍पादन क्षमता गाठावी लागेल. यासाठी येणा-या हंगामात कृषि विभाग कृषि विद्यापीठाच्‍या सहकार्याने उन्‍नत शेती - समृध्‍द शेतकरी अभियान राबविणार आहे. पिकाच्‍या विविध वाणाची उत्‍पादनाची अनुवंशीक क्षमता अधिक आहे, परंतु शेतक-यांच्‍या शेतावरील प्रत्‍यक्ष उत्‍पादन कमी आहे, ही उत्‍पादन तफावत कमी करण्‍यासाठी २५ मे ते  जुन दरम्‍यान उन्‍नत शेती - समृध्‍द शेतकरी अभियान राबविण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु अध्‍यक्षीय भाषणात म्‍हणाले की, शेतक-यांच्‍या समृध्‍दीसाठी दीर्घकालीन उपाय करावी लागतील. यात विविध शेतमालाचे भावाचे अंदाज बांधुन पुढील हंगामात शेतक-यांना कोणते पिक फायदेशीर ठरेल, याबाबत मार्गदर्शन करणारी यंत्रणा राज्‍यपातळीवर उभी करावी लागेल. पुढील हंगामात विद्यापीठाचे नांदेड-४४ हे कपाशीचे वाण बीटी स्‍वरूपात उपलब्‍ध होईल असे त्‍यांनी सांगितले.  
कार्यक्रमात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ विकसित तण व्‍यवस्‍थापन मोबाईल अॅपचे लोकार्पण करण्‍यात आले तसेच मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ मासिक शेतीभातीच्‍या खरिप विषेशांकाचे, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका, पुस्तिका आदींची विमोचन करण्‍यात आले. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित विविध पीकांच्‍या वाणाच्‍या बियाणे विक्रीचे उद्घाटनही करण्‍यात आले.
प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ वीणा भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ पी आर देशमुख यांनी केले. मेळाव्‍यानिमित्‍त खरीप पीक परिसंवादात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ कापुस, सोयाबीन, तुर आदीसह खरीप पीक लागवड, शेतीपुरक जोडधंदे, सेंद्रिय बोंडअळीचे व्‍यवस्‍थापन विषयावर डॉ. बी. बी. भोसले, डॉ. यु. एन. आळसे, प्रा पगार, प्रा. ए जी पंडागळे, डॉ ए टी शिंदे आदींनी मार्गदर्शन केले तर शेतक-यांच्‍या शंकाचे निरसनही करण्‍यात आले. याप्रसंगी कृषि प्रशदर्शनाचेही आयोजन आले होते, यात कृषि तंत्रज्ञान व कृषि औजारे वर आधारीत विद्यापीठाचे दालने, शेतकरी बियाणे उत्‍पादक कंपन्‍या, खाजगी बी-बियाणे, कृषि निविष्‍ठाच्‍या कंपन्‍या व बचत गटाचे शंभर दालनाचा समावेश होता. मेळाव्‍यात महिला उद्योजिका रेखा बहदुरे, जया सबदे व कमल कुंभार यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. मेळाव्‍यास माजीमंत्री मा. श्री. सुरेशराव वरपुडकर, अॅड प्रतापराव बांगर आदीसह अनेक मान्‍यवर उपस्थित होते. मेळाव्‍यास व कृषि प्रदर्शनीस शेतकरी बांधवानी मोठा प्रतिसाद दिला. 

मार्गदर्शन करतांना राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियानाचे संचालक मा. डॉ. एस. एल. जाधव

मार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा. डॉ किशनराव लवांडे

अध्‍यक्षीय समारोप करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु
विद्यापीठ शेतीभाती मासिकाच्‍या खरिप विशेषांकचे विमोचन करतांना



मार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा. डॉ किशनराव लवांडे

विद्यापीठ शास्‍त्रज्ञ विकसित एकात्मिक तण व्‍यवस्‍थापन मोबाईल अॅपचे लोकार्पण करतांना