Pages

Wednesday, April 29, 2020

वनामकृवि गृहविज्ञान शास्त्रज्ञांनी ऑडीओ कॉन्फरन्सव्दारे साधला महिलांशी संवाद

महिला आणि बालकांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प - गृहविज्ञान आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयामाने महिला आणि बालकांच्या आरोग्याबाबत दिनांक २७ एप्रिल रोजी ऑडीओ कॉन्फरन्‍सव्‍दारे विदयापीठ शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. या संवादात १९ गावीतील ५९ महिलांना सहभाग घेतला. सध्याच्या कोरोना विषाणू रोग प्रतिबंधात्मक म्हणून लॉकडॉऊन असुन कूटुंबातील सर्वजण घरामध्येच आहे, यामूळे महिलांना कामाचा तसेच मानसिक ताणाचा आरोग्यावर काही परीणाम होवू नये, बालकाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहार कसा असावा याबाबत डॉ. तसनिम नाहिद खान यांनी मार्गदर्शन केले, तर कोरोना पासून बचाव करण्यासाठी घरातील सुती कपडयांपासुन मास्क बनवणे व त्‍याचा वापर, उन्हाळयात शरीराची निगा यावर डॉ. सुनिता काळे यांनी महिलांशी संवाद साधला. शेतामध्ये कामाकरिता महिलासाठी उपयुक्‍त गृहविज्ञान तंत्रज्ञान कमी खर्चाचे कोरोनापासून बचावसाठी चेह-यावर लावण्याचे शिल्डबाबत डॉ. जयश्री रोडगे यांनी मार्गदर्शन केले तर शेती काम करतांना कोरोनापासून बचाव करण्याबाबतच्‍या उपाययोजनेची  माहिती डॉ. एस. जी. पुरी यांनी दिली. कार्यक्रमा सहभागी महिलांनी, आपल्या घरी बसुन फोनव्दारे मुलांच्या आहार, कपडयांचा योग्य वापर, आहाराव्दारे सोयाबीनचा वापर, नवजात बालकाची मातेची काळजी, वैयक्‍ती स्वच्‍छता, शेताकाम करतानाच्या उपाययोजना, महिला उद्योग आदींबाबत शास्त्रज्ञांना प्रश्न विचारले. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाऊन्डेशनचे परभणी जिल्हा व्यवस्थापण श्री विलास सवाणे आणि कार्यक्रम सहायक श्री रामजी राऊत यांनी केले. ‍

Friday, April 24, 2020

ऑडिओ कॉन्‍फरन्‍सच्‍या माध्‍यमातुन ३४ गावातील शेतक-यांशी वनामकृवि शास्‍त्रज्ञांनी साधला संवाद

वनामकृवि आणि रिलायन्स फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम, विस्तार शिक्षण संचालकांनी केले मार्गदर्शन
सध्या कोरोना विषाणु रोग प्रतिबंधात्‍मक उपाय देशात व राज्‍यात लॉकडाऊन आहे, अशा परिस्थितीत कृषि शास्‍त्रज्ञ व शेतकरी बांधव यांच्‍यात संवादाकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व रिलायन्स फाऊंडेशन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २४ एप्रिल रोजी ऑडिओ कॉन्‍फरन्‍सचे आयोजन करण्‍यात आले होते. या ऑडिओ कॉन्‍फरन्‍स मध्‍ये परभणी जिल्‍हयातील एकुण ३४ गावातील एकुण ४४ शेतक-यांनी सहभाग नोंदविला. या संवाद कार्यक्रमात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये या करिता शेत काम करतांना कोणती काळजी घ्‍यावी व सद्यास्थितीत करावयाची कामे या विषयावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी बी. देवसरकर, कृषिविद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे, उद्यानविद्या तज्ञ  डॉ. बी. एम. कलालबंडी, कीटकशास्त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत आणि रोगशास्त्रज्ञ डॉ. ए. टी. दौंडे यांनी सहभागी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांनी आपल्या घरातच बसून फोनद्वारे फळबाग व्यवस्थापन, खरीप पूर्व नियोजन, जमीन मशागत, गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन यावर प्रश्न विचारले.  मार्गदर्शन करतांना डॉ. डी. बी. देवसरकर यांनी करोंना विषाणू परिस्थितीत  शेतकऱ्यांनी शेतीची कामे करत असतांना सामाजिक अंतर जोपासणे गरजेचे असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फोन्डेशनचे परभणी जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे व कार्यक्रम सहाय्यक रामजी राऊत यांनी केले.

कोव्हीड–१९ रोगाच्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापकीय कार्यप्रणाली

आज कोविड-१९ रोगाच्या साथीने अनपेक्षित अशी जागतिक आणीबाणी उद्भवली आहे. करोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी देशामध्‍ये टाळेबंदी लागु करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास दिड महिन्यापासुन आपण घरामध्‍ये बंदिस्त आहोत. सतत करोनाविषयी ऐकुन, वाचुन आणि दुरदर्शनवरील करोना संदर्भिय बातम्या पाहुन मन विषण्ण होत आहे. पण असे हताश  होऊन चालणार नाही. आपण सारे देशाची तरुण मंडळी, आपल्यासमोर हे नैसर्गिक आणि आकस्मिक आव्हान सशक्तपणे पेलण्याची फार मोठी जबाबदारी आहे. यासाठी काय असावी विद्यार्थ्‍यांकरिता व्यवस्थापकीय कार्यप्रणाली - काही मार्गदर्शक तत्त्वे पुढे नमुद केली आहेत.
स्वत:च स्वतःची मदत करा :
ü खंबीर राहुन या गंभीर परिस्थितीचा सामना करा.
ü स्वत: ताण घेऊन इतरांचे मनोबल कमी करु नका कारण मनोबल खचले तर रोगाविरुध्द लढण्याची प्रतिकारशक्ती कमी होते.
ü बदलत्या बंदिस्त जीवनशैलीचा मनापासुन स्विकार करा, कारण मनापासुन स्विकारलेली गोष्ट आपल्याला आनंदी ठेवते.
ü बदलत्या जीवनशैलीबरोबर, दैनंदिन दिनचर्या आणि सवयींचे समायोजन करा
ü कोविड-१९ शी संबंधित बातम्या सतत पाहणे टाळा, त्यामुळे विनाकारण मानसिक ताण वाढतो.
ü जीवनाबद्दलचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवा, जेणेकरुन आपले मन आनंदी राहुन आपल्या शरीराची कोरोना विरुध्द लढण्याची प्रतिकारशक्ती वाढेल.
ü सकारात्मक परिवर्तनाची ही चांगली सुरुवात स्वतःपासून सुरू करा, नंतर इतरांमध्‍ये ही रुजवा.
ü स्वत: आनंदी रहा, इतरांना आनंदी ठेवा आणि कुटुंबियांना निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहा.
वेळेचा अपव्यय टाळुन गुणात्मकता वाढवा :
आजपर्यंत आपण आपल्या शैक्षणिक वेळापत्रकात व्यस्त होता, आज टाळेबंदीच्या कालावधीत आपल्याजवळ खुप वेळ आहे. या वेळेचे काय करावे? हा मोठा प्रश्न असेल.
ü चला जरा आठवुन पहा, आत्तापर्यंत आपल्याला जास्तीत जास्त आनंद देणा-या परंतु आपल्या व्यस्त शैक्षणिक वेळापत्रकांमुळे वेळेअभावी करु शकला नाहीत अशा काही गोष्टी आजच्या वेळापत्रकात समाविष्ट करा.
ü टाळेबंदीमुळे आपले परिक्षेचे वेळापत्रक लांबणीवर पडले आहे. तर मग आपली अभ्यासाची सामग्री उघडा आणि शैक्षणिक उपलब्धीसाठी वेळेचा विनीयोग करा.
ü शारीरिक व्यायाम आणि योगसाधनेस वेळ द्या त्यातुन तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
ü काम, फावला वेळ आणि विश्रांती दरम्यान आपला वेळ संतुलित करा.
ü कामाच्या वेळेचे वितरण गृह कार्यात कुटुंबास मदत करण्यासाठी केले जाऊ शकते, ज्यामुळे घरात आपुलकीचे आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होइल आणि परिणामी स्वतःला समाधान मिळेल.
ü कामाचा काही वेळ आपल्या अभ्यासासाठी द्या. टाळेबंदीचा हा कालावधी परिक्षेच्या पूर्व-तयारीसाठी देण्यात आलेला कालावधी म्हणून उपयोगात आणा.
ü फावला वेळ हा आपल्या हक्काचा स्वतंत्र मोकळा वेळ होय. या वेळेत तुम्हाला अतीव आनंद देणारे क्रियाकल्प शोधा. हे कोणत्याही प्रकारचे इनडोअर गेम असू शकतात, दूरदर्शनचे कार्यक्रम, चित्रपट पाहणे किंवा वर्तमानपत्रातील शब्द कोडी सोडवणे असू शकते. यामुळे मिळणारा आनंद आपल्या शरिरात अंतरऊर्जेची निर्मिती करेल आणि आपण उत्साही राहाल.
ü आपल्या वेळापत्रकात विश्रांतीसाठी काही वेळ द्या. आपल्या शरीरास कामा दरम्यान विश्रांतीची आवश्यकता असल्याने एकच काम दिर्घकाळ करू नका.
ü रात्री चांगली झोप घ्या जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील.
कुटुंबाची अर्थव्यवस्था कोलमडणार नाही यासाठी दक्ष रहा
ü टाळेबंदी कालावधीत भविष्यातील तुटवड्याच्या अनाठायी भितीपोटी अनावश्यक वस्तू जास्त प्रमाणात खरेदी करु नका. जीवनावश्यक वस्तूंच्या नियमित पुरवठ्यासाठी सरकार काळजी घेत आहे.
ü या कालावधीत "खरेदी पुढे ढकलली तर त्या वस्तुची आवश्यकता भासत नाही" या सत्याचा अनुभव घ्या.
ü मर्यादित संसाधनात जगण्याचा प्रयत्न करा आणि संपत्तीचे जतन करा.
मानवी उर्जेचे उत्तम नियोजन करा
ü घरातील कामांमधे सर्व सदस्य सहभागी करुन घ्या, त्यामुळे उर्जा वापराची विभागणी होईल व सर्वांचा उत्साह टिकवता येईल.
ü सदस्यांच्या आवडीनुसार कार्याचे वितरण करा, जेणेकरून कार्यपूर्तीसाठी कमी मानवी उर्जेचा वापर होईल तसेच उत्साहाने कार्यपूर्ती होऊन सर्व सदस्य आनंदी राहतील.
ü घरातील कामाचा क्रम ठरवताना हलक्या कामानंतर जड कामे ठेवल्यास कुटुंबातील सदस्यांचा थकवा कमी होईल.
ü सदस्यांना त्यांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी कामाच्या वेळापत्रकात विश्रांती घेण्याची परवानगी द्या.
आपल्या कुटुंबाचा आदर करा
ü कुटुंबातील वडीलधारी मंडळी आणि छोट्या मंडळी समवेत वेळ घालवा.
ü कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्याबद्दल जागरूक रहा.
ü वडीलधा-यांकडे लक्ष द्या आणि त्यांच्या सूचनांचा आदर करा.
ü या काळात कोणत्याही कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन करू नका.
ü नातेवाईकांनी आयोजीत केलेल्या सोहळ्यात सहभागी होऊ नका
मित्र मंडळी आणि शिक्षकांच्या संपर्कात रहा
ü आपले मित्र आणि शिक्षक यांच्या संपर्कात राहा. यासाठी संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करा जेणेकरून आपल्याला एकटेपणा जणवणार नाही आणि आपण आपल्या अभ्यासात अग्रेसर राहाल.
एक जबाबदार नागरिक व्हा आणि राष्ट्राचा आदर करा
ü वेळोवेळी शासन जारी करत असलेल्या सूचनांचे अनुसरण करा
ü आपल्या स्थानिक आरोग्य प्राधिकरणाच्या निर्देशांचे अनुसरण करा 

सौजन्‍य

डॉ. माधुरी कुलकर्णी, प्राध्यापक
डॉ. जयश्री  झेंड, सहयोगी आधिष्ठाता आणि प्राचार्या
सामुदायिक विज्ञान महाविद्यालय
संतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी


घरी रहा, स्वस्थ रहा सुरक्षित रहा, राष्ट्र वाचवा

Wednesday, April 22, 2020

ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतकरी बांधवाना वनामकृविच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले असुन शेती क्षेत्राला त्याचा जबर फटका बसला आहे. सध्याच्या कोरोंना विषाणू परिस्थितिमध्ये भाजीपाला, फळबाग, उन्हाळी पीक व्यवस्थापन, किड व्यवस्थापन, बाजारपेठ, खरीप हंगाम पूर्व तयारी आदी विषयावर कृषि शास्‍त्रज्ञानी परभणी जिल्‍हयातील 22 गावामधील शेतकर्‍यांशी ऑडिओ कॉन्‍फरन्‍सव्‍दारे दिनांक 22 एप्रिल रोजी संवाद साधला. सदरिल कार्यक्रमवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्‍यात आला होता. ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतकरी बांधवानी विद्यापीठ तज्ञांना विचारलेल्‍या प्रश्नास विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी उत्‍तरे दिली.
या संवाद कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी बी. देवसरकर यांनी सहभाग घेतला तर कृषिविद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे, उद्यानविद्या सहयोगी प्राध्यापक डॉ. बी. एम. कलालबंडी, कीटकशास्त्रज्ञ प्रा. डी.डी.पटाईत आदी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांनी आपल्या घरातच बसून फोनद्वारे त्यांचे शेती व्यवस्थापन संदर्भात प्रश्न  विचारले. मार्गदर्शन करताना डॉ.आळसे यांनी कोरोंना विषाणू परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीची कामे करतांना सामाजिक अंतर जोपासणे गरजेचे असुन लॉकडाउन दरम्‍यान भाजीपाला बाजारपेठेत आणायचा असल्यास शेतकऱ्यांनी पास सेवा साठी कृषि विभागाशी संपर्क साधाण्‍याचे आवाहन केले. या कॉन्फरन्समध्ये 22 गावामधील 31 शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउन्डेशन परभणी जिल्‍हा व्यवस्थापक श्री विलास सवाणे, कार्यक्रम सहाय्यक रामाजी राऊत यांनी केले.

Tuesday, April 14, 2020

वनामकृविच्‍या ऑनलाईन संवादास शेतक-यांचा वाढता प्रतिसाद


सद्याच्‍या कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर देशात व राज्‍यात लॉकडाऊन असल्‍यामुळे शेतकरी बांधवाशी संवाद साधण्‍याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ ऑनलाईन साधनाचा उपयोग करित आहेत. त्‍याचाच एक भाग म्‍हणुन विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक 13 एप्रिल रोजी फळबाग व्‍यवस्‍थापन या विषयावर झुम क्‍लाऊड मिटिंग संपन्‍न झाली. संवाद मध्‍ये औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ एम बी पाटील यांनी मोंसबी, आंबा या पिकावर मार्गदर्शन करतांना रोपांची निवड ते विक्री व्‍यवस्‍थापनाबाबत माहिती दिली तर डॉ बी एम कलालबंडी यांनी फळबागेतील पाणी, खत व्‍यवस्‍थापन यावर माहिती दिली. फळपिकांतील किंडीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी प्रा डी डी पटाईत यांनी मार्गदर्शन केले तसेच कापुस संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ ए एस जाधव यांनीही येणा-या हंगामात कापुस पिकांच्‍या पेरणीबाबत मार्गदर्शन केले. विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्‍तरे दिली. मिटींगचे प्रास्‍ताविक यु एन आळसे यांनी केले. मिटिंग नियोजन मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ प्रशांत देशमुख व माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ यु एन आळसे यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ एस जी पुरी यांनी केले. संवादामध्‍ये विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ प्रा व्ही बी ढाकणे, डॉ कच्‍छवे, प्रा दीप्ती पाटगांवकर, उपविभागीय कृषि अधिकारी श्री बी एस कच्‍छवे, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी श्री माणिक रासवे, श्री पंकज क्षीरसागर यांच्‍यासह परभणी, हिंगोली, लातुर, उस्‍मानाबाद, यवतमाळ आदी जिल्‍हयातुन 40 हुन अधिक शेतकरी सहभागी झाले होते.

Monday, April 13, 2020

कोरोनाग्रस्‍ताच्‍या मदतीसाठी सरसावले वनामकृविचे माजी विद्यार्थ्‍यी

सामाजिक बांधिलकी जपण्‍याचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांचे आवाहन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अनेक माजी विद्यार्थ्‍यी एकत्रित येऊन कोरोनाग्रस्‍ताच्‍या मदतीकरिता मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीत आपआपल्‍यापरिने रक्‍कम जमा करून मदत करित आहेत. परभणी कृषि महाविद्यालयातील सन 2010 च्‍या बॅचच्‍या माजी विद्यार्थ्‍यांनी एकत्रित येऊन एकुण तीस हजार रूपयाची रक्‍कम मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीत ऑनलाईन जमा केली तर सन 2011 च्‍या बॅचच्‍या माजी विद्यार्थ्‍यांनी एकुण एकवीस हजार रूपयाची रक्‍कम जमा केली. तसेच सन 2012 बॅचच्‍या विद्यार्थ्‍यांनी साडेसहा हजार रूपयाची रक्कम ऑनलाईन जमा केली  तर सन 2013 बॅचच्‍या विद्यार्थ्‍यींनी पंधरा हजार रूपये,  2014 बॅचने सात हजार रूपये व 2015 बॅचच्‍या विद्यार्थ्‍यीनी साडेएकरा हजार रूपये जमा केली आहे. सन 2010 ते 2015 या सहा वर्षातील माजी विद्यार्थ्‍यांनी एकुण साधारणत: नव्‍वद हजारापेक्षा जास्‍त रक्‍कम जमा केली असुन अजुनही विद्यापीठाच्‍या माजी विद्यार्थ्‍यांचा मदतीचा ओघ सुरू आहे. 

याप्रसंगी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कृषिचे विद्यार्थी नेहमीच सामाजिक कार्यात हिरारीने सहभाग घेतात, याबाबत विद्यापीठास सार्थ अभिमान असुन प्रत्‍येकानेच सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. विद्यापीठाच्‍या सर्व बॅचच्‍या माजी विद्यार्थ्‍यानी खारीचा वाटा उचलला तर निश्चितच आपण समाजासाठी मोठी मदत करू शकु, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.  

उपक्रमासाठी पुढाकार घेणारे माजी विद्यार्थ्‍यी
बॅच 2010 : पंकज मस्‍के, अक्षय काकडे, विजय आवटे आदी
बॅच 2011 : गौरव भामरे, अजित गावडे, अक्षय शिसोदे, नेमाजी राऊत, नितीन थोरात, अरविंद खिलारी, प्रियांका रेंगे, जयश्री कदम आदी
बॅच 2012 : प्रतिभा शिसरे, सचिन कदम, शंकर अभंगे, कृष्‍णा होगे, अनुराधा बुचाले, गजानन शिंदे, भगवान घाटे आदी
बॅच 2013 : प्रविण शिंदे, शुभम गायकवाड,  पुजा मकासारे, उषा घनवट आदी
बॅच 2014 : मेघराज नाटकर, विशाल राठोड आदी
बॅच 2015  : महेश दारूळे, आकाश थिटे,  प्र‍ियांका मोरे, प्राजक्ता कोल्‍हे, ओमकार पवार, ऋशिकेष साखरे आदी

Sunday, April 12, 2020

वनामकृविच्‍या गृहविज्ञान महाविद्यालयातील वस्‍त्र व परिधान अभिकल्‍पना विभागात मास्‍कची निर्मिती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील वस्‍त्र व परिधान अभिकल्‍पना विभागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्‍या‍करिता प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणुन लागणा-या चेह-यावरील मास्‍कची निर्मिती करण्‍यात येत आहे. सध्‍या राज्‍यातील व देशातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व प्रसार वाढत आहे, त्‍या अनुषंगाने विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांना त्‍याचा संसर्ग होऊ नये म्‍हणुन शासन आदेशान्‍वये विविध प्रतिबंधात्‍मक उपाय योजना राबविण्‍यात येत आहेत. त्‍याचाच एक भाग म्‍हणुन विद्यापीठांतर्गत सर्व कर्मचा-यांनी संपुर्ण कार्यालयीन कालावधीत चेह-यावर मास्‍क परीधान करणे तसेच सोशल डिस्‍टन्‍स बंधनकारक करण्‍यात आले आहे. सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील वस्‍त्र व परिधान अभिकल्‍पना विभागात ना नफा ना तोटा या तत्‍वावर मास्‍कची निर्मिती करण्‍यात येत असुन रूपये 40 प्रती नग या प्रमाणे उपलब्‍ध करण्‍यात आले आहेत. सदरिल मास्‍कची निर्मिती कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या सुचनेनुसार तर कुलसचिव श्री रणजित पाटील व प्राचार्य डॉ जयश्री झेंड यांच्‍या मार्गदर्शनानुसार करण्‍यात येत आहे. हे मास्‍क तीन स्‍तरीय असुन सुती कापडापासुन बनविण्‍यात आले आहे. मास्‍कची मागणी वाढल्‍यास पुर्ण क्षमतेने निर्मिती करण्‍याचा मानस असल्‍याचे विभाग प्रमुख प्रा मेधा उमरीकर यांनी सांगितले. मास्‍क निर्मितीकरिता विभाग प्रमुख प्रा मेधा उमरीकर, डाॅ सुनिता काळे, डॉ इरफाना सिद्दीकी व इतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.