Pages

Sunday, June 27, 2021

अन्‍न प्रक्रियातील संशोधन व विकास कार्यासाठी वनामकृवितील अन्नतंत्र महाविद्यालय आणि बारामती कृषी विज्ञान केंद्र यांच्यात सामंजस्य करार

राज्‍यातील अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विकासासाठी परभणी कृषि विद्यापीठाचे तांत्रिक सहकार्य 

भारत सरकारच्या अन्न प्रकिया उद्योग मंत्रालयाने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्‍मखाद्य उद्योग उन्नयन योजना (पीएम-एफएमइ) राबविण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयास तांत्रिक सहकार्य करण्याबाबत शासनस्तरावरून सूचित करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर बारामती (जिल्हा पुणे) येथील कृषि विज्ञान केंद्र व अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी या दोन संस्थेमध्ये अन्‍न प्रक्रियेतील संशोधन, विस्तार कार्य आणि राज्यात प्रधानमंत्री सुक्ष्‍मखाद्य उद्योग उन्नयन योजना प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने दिनांक २५ जुन रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, कृषी विज्ञान केंद्राच्‍या संस्‍थेचे समन्‍वयक डॉ. मिलिंद जोशी आदीची उपस्थिती होती. सदरिल सामजंस्‍य करारावर अन्नतंत्र महाविद्यालयातर्फे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके यांनी तर कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचे तर्फे संस्थेचे समन्वयक डॉ. मिलिंद जोशी यांनी स्वाक्षरी केली.

याप्रसंगी बोलतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, प्रधानमंत्री सुक्ष्‍मखाद्य उद्योग उन्नयन योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी बारामती येथील कृषि विज्ञान केंद्र व विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालय दोन संस्थेकडे अनेक बलस्थाने असुन या दोन्‍ही संस्‍थेतील चांगल्‍या सोयीसुविधा, कुशल मनुष्यबळ आणि विकसित केलेलं अन्‍न प्रक्रिया तंत्रज्ञान यांचे आदानप्रदानामुळे राज्‍यातील अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विकासासाठी चांगला हातभार लागेल.

भारत सरकारच्या अन्न प्रकिया उद्योग मंत्रालयाने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्‍मखाद्य उद्योग उन्नयन योजना सन २०२१-२०२५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्याचे नियोजित केले आहे. ही योजना राबविण्यामागे असंघटीत क्षेत्रातील उद्योगाचे बळकटीकरण करणे, कौशल्य व मनुष्यबळ विकास करणे, अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये नवीन तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री यांचा अंतर्भाव करणे, अन्नसुरक्षा नियंत्रण व्यवस्था निर्माण करणे इत्यादी उद्धेश आहेत. त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून योजनेच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. सदर योजनेंतर्गत सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या व नव्याने समाविष्ट होणाऱ्या योजना, अन्नप्रकिया उद्योजक यांचे प्रशिक्षण, मनुष्यबळ विकास करणे, तसेच प्रक्रिया उद्योग प्रकल्प उभारणी करीता आवश्यक असणारे परवाने, परवानगी, मंजुरी इत्यादी देण्यासाठी महाराष्ट्र शासनस्तरावर कृषी आयुक्तालय येथे नोडल विभाग कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बारामती (जिल्हा पुणे) येथील कृषी विज्ञान केंद्र यांची “राज्यस्तरीय तांत्रिक संस्था” म्हणून नामनिर्देशन करण्यात आलेले आहे. तसेच विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालय हे अन्नतंत्र व प्रक्रिया क्षेत्रातील अग्रगण्य संस्‍था असुन सोयीसुविधांनी युक्त असलेली व जुनी संस्था म्हणून सन १९७५ पासून कार्यरत आहे. या महाविद्यालयात देशास व राज्यास अनेक अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उद्योजक घडले, व अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी तांत्रिक मदत करण्यात या महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे. महाविद्यालयातील पदवीधर देशभरातील अनेक प्रक्रिया उद्योगात उच्‍च पदावर कार्यरत असून या उद्योगात भरीव योगदान देत आहे. अन्नतंत्र महाविद्यालयाने संशोधन कार्यातून अनेक अन्न प्रक्रिया व तंत्रज्ञान विकसित केलेले असून त्यांच्या शिफारसी केलेल्या आहेत व उद्योगामध्ये त्यांचा वापर होत आहे. याप्रसंगी महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. राजेश क्षीरसागर, प्रा. दिलीप मोरे, प्रा. हेमंत देशपांडे, डॉ. कैलाश गाढे, डॉ. विजया पवार, डॉ. आगरकर आदीसह इतर प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.


Thursday, June 24, 2021

वनामकृवित वटपौर्णिमा निमित्‍त वडाच्‍या वृक्षांची लागवड

विद्यापीठ परिसरात पक्षी वैभव वाढीसाठी प्रयत्‍न ....... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने गेल्‍या तीन वर्षापासुन हरित विद्यापीठ, सुंदर विद्यापीठ उपक्रम राबविण्‍यात येत असुन दिनांक 24 जुन रोजी वटपौर्णिमेचे औजित्‍य साधुन मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्या वतीने कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठातील महिला कर्मचा-यांच्‍या हस्‍ते वडाच्‍या वृक्षांची लागवड करण्‍यात आली. यावेळी संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्राचार्य डॉ. अंगद सुर्यवंशी, प्राचार्या डॉ. जयश्री झेंड, डॉ. प्रविण वैद्य, डॉ. हिराकांत काळबांडे, डॉ. महेश देशमुख आदीसह विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, गेल्‍या तीन वर्षापासुन संपुर्ण विद्यापीठ परिसरात नियोजनबध्‍द पध्‍दतीने वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन मोहिम रा‍बविण्‍यात येत आहे, याचे दृष्‍य परिणाम दिसुन येत आहेत. आजपर्यंत विद्यापीठ परिसरात पन्‍नास हजार पेक्षा जास्‍त वृक्ष लागवड करण्‍यात आली, यात जाणिवपुर्वक परिसरातील मधु‍मक्षिका व पक्षी वैभव वाढण्‍याच्‍या दृष्‍टीने विशिष्‍ट वृक्षांची लागवड केली जात आहे, यात वड, पिंपळ, उंबर, देशी जांभुळ आदींचा समावेश असुन फुलझाडे व फळझाडे यांचीही लागवड करण्‍यात येत आहे. आजपर्यंत विद्यापीठ परिसरात हजारपेक्षा जास्‍त वडांची लागवड करण्‍यात आली आहे.

कार्यक्रमात मान्‍यवर व सामुदाईक विज्ञान महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकांच्‍या हस्‍ते वड, बकुळ, महागुणी, कांचन, कॅशीओ आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. डॉ. जयश्री झेंड व महिला प्राध्यापिका यांच्या हस्ते वटवृक्षाचे पुजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी  प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील डॉ. प्रविण वैद्य, डॉ. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. स्नेहल शिलेवंत, डॉ. जावळे, प्रा. तोडमल, श्री अक्षय इंगोले, निखील पाटील, राकेश बगमारे, अजय चरकपल्ली आदीसह कर्मचारी व पदव्युत्तर विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी प्रयत्न केले.

 


Monday, June 21, 2021

वनामकृवित जागतिक योग दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने दिनांक २१ जुन रोजी जागतिक योग दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी  कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखलेविस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरज कदम, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ जयश्री झेंड, प्राचार्य डॉ उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मागदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, योग ही भारतीय प्राचीन संस्‍कृतीचा हिस्‍सा असुन व्‍यक्‍तीचे आरोग्‍य व मन सुध्‍दढ राहण्‍यासाठी प्रत्‍येकांनी योग व प्राणायाम करणे गरजेचे आहे.

याप्रसंगी योगशिक्षक प्रा. दिवाकर जोशी व श्री सामाले यांच्‍यासह आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षकांच्‍या मार्गदर्शना नुसार विविध आसन, प्राणायाम आदीचे सामुदायिकरित्‍या प्रात्‍यक्षिके करण्‍यात आली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले तर सुत्रसंचालन श्री अशोक खिल्‍लारे यांनी केले. कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला.  


Friday, June 18, 2021

शेती व ग्रामीण क्षेत्राच्‍या शाश्‍वत विकासाकरिता समर्पित भावनेने कार्य करणा-यां लोकांची फळी उभारावी लागेल ..... मा डॉ अविनाश पौळ

वनामकृविच्‍या हरित विद्यापीठ उपक्रमाची सिने अभिनेते मा श्री आमिर खान संस्‍थापित पाणी फाउंडेनशकडुन दखल


शाश्‍वत पाण्‍याशिवाय ग्रामीण व कृषि विकास शक्‍य नाही. विविध योजनेवर केवळ पैसा खर्च करून फायदा होणार नाही, गाव पातळीवर पाणलोट क्षेत्र विकास, जलसंवर्धन व जलसंधारण, पाण्‍याचा काटेकोर वापर, वृक्षलागवड आदींकरिता ज्ञान देणारी चळवळ उभारावी लागेल. शेती क्षेत्राच्‍या विकासाकरिता समर्पित भावनेने कार्य करणा-यां लोकांची फळी उभारावी लागेल तरच शेतीत शाश्‍वत प्रगती शक्‍य होईल, असे प्रतिपादन पाणी फाऊंडेशनचे मुख्‍य मार्गदर्शन मा डॉ अविनाश पौळ यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली गेल्‍या तीन वर्षापासुन राबविण्‍यात येत असलेल्‍या हरित विद्यापीठ, सुंदर विद्यापीठउपक्रम पाहणीकरिता दिनांक १८ जुन रोजी मा डॉ अविनाश पौळ यांनी विद्यापीठास सदिच्छा भेटी दिली त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण होते तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, कुलसचिव डॉ धीरज कदम, वृक्षलागवड अधिकारी डॉ हिराकांत काळपांडे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, विभाग प्रमुख डॉ जे ई जहागिरदार, डॉ भगवान आसेवार, डॉ संचिव बंडेवाड, डॉ दिगांबर पेरके, डॉ व्‍ही बी कांबळे, डॉ एम जी जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा डॉ अविनाश पौळ पुढे म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ राबवित असलेला हरित विद्यापीठ उपक्रम निश्चितच कौतुकास्‍पद असुन पाणी फाऊंडेशनचे संस्‍थापक सिनेअभिनेते मा श्री आमिर खान यांची हरित विद्यापीठ उपक्रमास भेटी करिता आपण प्रयत्‍न करू. परभणी कृषि विद्यापीठासोबत सामजंस्‍य करार करून शेती व ग्रामीण विकास करिता पाणी फाऊंडेशन संस्‍थेची काम करण्‍याची इच्‍छा त्‍यांनी व्यक्‍त केली. यावेळी त्‍यांनी पाणी फाऊंडेशन संस्‍थेची चडणघडण कशी झाली यांची माहिती दिली.

याप्रसंगी विविध संशोधन केंद्रे व महाविद्यालयास डॉ अविनाश पौळ यांनी भेटी देऊन माहिती घेतली. हरित विद्यापीठ उपक्रमाची डॉ हिराकांत काळपांडे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ मीना वानखेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ पी एस नेहारकर, डॉ पी आर झंवर, डॉ जयकुमार देशमुख, डॉ एस व्‍ही कल्‍याणकर, डॉ मिलिंद सोनकांबळे, डॉ अनंत लाड, आदींनी सहकार्य केले.

पाणी फाऊंडेशन ही राज्यातील पाणी टंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना करून राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सिनेअभिनेत मा श्री आमिर खान यांनी २०१६ साली स्थापन केलेली नानफा तत्त्वावर काम करणारी संस्था असुन शेती विकासाकरिता राज्‍यात कार्य करित आहे. कृषि तंत्रज्ञान शेतकरी बांधवा पर्यंत पोहचविण्‍याकरिता व विविध तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षीत करण्‍याकरिता लवकरच पाणी फाऊंडेशन व विद्यापीठ यांच्‍या सामजंस्‍य करार करण्‍यात येणार आहे. हरित विद्यापीठ, सुंदर विद्यापीठउपक्रमाच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठ परिसर पन्‍नास हजार पेक्षा जास्‍त वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करण्‍यात आले असुन मराठवाडयातील विद्यापीठ अंतर्गत विविध संशोधन केंद्रे, महाविद्यालये आदी परिसरातही मोठया प्रमाणात ही मोहिम राबविण्‍यात येत आहे, त्‍याचे दृष्‍यपरिणाम दिसत आहेत. विद्यापीठ परिसर मोठया प्रमाणात हरित झाला असुन विद्यापीठ पशुपक्षी यांचे वास्‍तव्‍यात वाढ झाली आहे, यामुळे पर्यावरण रक्षण व जैवविविधता राखण्‍यास मदत होत आहे. 

 



वनामकृविच्‍या वतीने इंटरनेट ऑफ थिंगस प्रणालीचा कृषि क्षेत्रात वापर यावरील ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेला राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) व मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ यांच्यासाठी आयओटी प्रणालीचा कृषि क्षेत्रात वापर या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळेचे दिनांक १७ जुन ते ७ ऑगस्ट दरम्यान करण्‍यात आले असुन या कार्यशाळेचे उदघाटन दिनांक १७ जुन रोजी झाले, उदघाटन कार्यक्रमास मुंबई आयआयटीचे संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रा डॉ कवी आर्य यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाहेप प्रकल्पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे हे होते तर मुंबई आयआयटीचे प्रा. अमित अरोरा यांची विशेष उपस्थिती होती.

डॉ. कवी आर्य यांनी आयओटी व एमबेडेड सिस्टीम्स यांचा कृषि क्षेत्रात वापर यावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान जसे की, इंटरनेट ऑफ थिंगस यांचा वापर करुन काटेकोर कृषि तंत्रज्ञानाची निर्मिती शक्‍य आहे. या तंत्रज्ञानाच्‍या आधारे किटकनाशके, खते, पाणी आदीचा काटेकोर व कार्यक्षम वापर करू शकतो. काटेकोर पाणी व्यवस्थापन, कृषि उपकरणे अधिक स्वयंचलित यंत्रे विकसीत करता येतात. कृषिच्‍या विद्यार्थी व प्राध्यापकांनी कार्यशाळेतील घेतलेल्‍या ज्ञानाचा उपयोग संशोधन कार्यासाठी करावा असे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाबाबत मार्गदर्शन करतांना म्हणाले की, कार्यशाळेचा उपयोग करुन विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्रकल्प अहवाल तयार करावेत तर प्राध्यापक अमित अरोरा यांनी मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविकात प्रशिक्षण कार्यक्रम सचिव डॉ. नरेंद्र खत्री यांनी कार्यशाळेचा उद्देश व आराखडा याची माहिती दिली.

आठ आठवडीय कार्यशाळे दरम्यान विद्यार्थी व प्राध्यापक यांना राष्ट्रीय पातळीवरील नामवंत तज्ञ मार्गदर्शन करणार आहे. सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व शिक्षण संचालक डॉ. डी.एन. गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. राजेश कदम, प्रा. संजय पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. शिवराज शिंदे, श्री. रामदास शिंपले, मुक्ता शिंदे, मारोती रणेर आदींनी सहकार्य केले.

Wednesday, June 16, 2021

मौजे उमरी (ता. जि परभणी) येथे आद्यरेषीय पिक प्रात्‍यक्षिक कार्यक्रम अंतर्गत विद्यापीठ विकसित ज्‍वारीचा परभणी शक्ति या वाण चे बियाणे वाटप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्र व अखिल भारतीय समन्‍वयीत ज्‍वार सुधार प्रकल्‍प, हैद्राबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मौजे उमरी (ता. जि. परभणीयेथे दिनांक १५ जून रोजी आद्यरेषीय पिक प्रात्‍यक्षिक कार्यक्रम अंतर्गत विद्यापीठ विकसित ज्‍वारीचा परभणी शक्ति या वाण चे बियाणे, बीजप्रक्रियेसाठी गौचू, बुरशीजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा पावडर चे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गावातील तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री सुदामराव गोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. के. आर. कांबळे हे होते. यावेळी सरपंच श्री प्रकाशराव गोरे, श्री रघुनाथराव माने, डॉ एल एन जावळे,  डॉ व्ही एम घोळवे, प्रितम भुतडा, आदीची उ‍पस्थिती होती. 

यावेळी मार्गदर्शनात डॉ. के. आर. कांबळे म्हणाले कि, ज्वारीला दुहेरी महत्व असुन मनुष्‍यासाठी धान्‍याचे व जनावरांसाठी कडब्‍याचे उत्‍पादन मिळते. विद्यापीठ विकसित ज्‍वारी वाण परभणी शक्‍ती मध्‍ये जस्‍त व लोहचे प्रमाण जास्‍त असल्‍यामुळे रक्‍ताची कमतरता असणा-या व्‍यक्‍तीकरिता या वाणाची भाकरी उपयुक्‍त आहे.

डॉ एल एन जावळे यांनी आहारातील ज्‍वारीच्‍या भाकरीचे पोषणाच्‍या दृष्‍टीने महत्‍व सांगुन परभणी शक्ती या वाणचे महत्व व वैशिष्ट्य सांगितले तर डॉ व्ही एम घोळवे यांनी ज्वारीवरील रोग व्‍यवस्‍थापन आणि ज्वारी काळी पाडण्यावर नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा पावडर वापर तसेच बीजप्रक्रिया याची माहिती दिली.

प्रास्‍ताविकात प्रितम भुतडा यांनी ज्‍वारी लागवड तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली तर सरपंच श्री प्रकाशराव गोरे यांनी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांचे आभार मानले.

सदरिल कार्यक्रम संचालक संशोधन डॉ दत्तप्रसाद वासकर  यांच्‍या मार्गदर्शना खाली घेण्यात आलाकार्यक्रमात निवडक २५ शेकतकर्यांना परभणी शक्ती ज्वारीचा वाण ची बॅग, बीजप्रक्रियेसाठी गौचू आणि बुरशीजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा पावडर आदींची मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले, कार्यक्रमास मधुकर गोरे,  माणिक कावरे, शेख मस्तान शेख, गंगाधर माने, सचिन कांबळे आदीसह गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Friday, June 11, 2021

वनामकृवित “कृषीक्षेत्रात रैपिड प्रोटोटाइपिंग व रिवर्स इंजीनियरिंग पध्दतीचा वापर” यावरील ऑनलाईन प्रशिक्षणास सुरूवात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेपयांच्‍या वतीने “कृषीक्षेत्रात रैपिड प्रोटोटाइपिंग व रिवर्स इंजीनियरिंगचा वापर” या विषयावर दिनांक 7 जुन ते 18 जुन दरम्‍यान पदवी व पदव्युत्तर ‍विद्यार्थी, विद्यापीठ शास्त्रज्ञ व प्राध्यापक यांच्याकरिता ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले असुन दिनांक 7 जुन रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन झाले. उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन बंगलोर येथील अलटेम टेकनॉलॉजीचे संचालक श्री. प्रसाद रोदगी उपस्थित होते.

प्रमुख पाहूणे श्री. प्रसाद रोदगी (संचालक, अलटेम टेकनॉलॉजी, बंगलोर (कर्नाटक) यांनी “कृषीक्षेत्रात रैपिड प्रोटोटाइपिंग व रिवर्स इंजीनियरिंग पध्दतीसाठी 3 डी स्कॅनर आणि 3 डी प्रिंटर्स चा वापर” कृषी तंत्रज्ञानामध्ये कसे करता येईल यावर मार्गदर्शन केले. वेगवेगळया विभागात 3 डी स्कॅनर आणि 3 डी प्रिंटर्स वापर करुन नवनवीन नमुने कसे विकसीत केल्या जातील यांची त्यांनी माहिती दिली. रिवर्स इंजीनियरिंगचा वापर वेगवेगळया कृषी विभागात कशा प्रकारे करता येईल व त्‍याचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भविष्यात कसा उपयोग होऊ शकतो यावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष्‍ा डॉ. गोपाळ ‍शिंदे, प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आवाहन केले.

 सुत्रसंचालन इंजी. खेमचंद कापगते यांनी केले तर आभार डॉ. हेमंत रोकडे यांनी मानले.सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन नवी दिल्‍ली येथील नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख संचालक मा डॉ आर सी अग्रवाल, कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत असुन प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षणांत कृषीक्षेत्रात रैपिड प्रोटोटाइपिंग व रिवर्स इंजीनियरिंग पध्दतीसाठी 3 डी स्कॅनर आणि 3 डी प्रिंटर्स चा वापर यावर इंजी. सक्षम रस्तोगी व इंजी. लक्ष्मीकांत शर्मा हे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.  प्रशिक्षणासाठी देशभरातून पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थ्‍यी व कृषि विद्यापीठ शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजन सचिव इंजी. खेमचंद कापगते, आयोजन उपसचिव डॉ. हेमंत रोकडे, रहीम खान, इंजी. तंझीम खान, श्री. रामदास शिंपले, श्री. गंगाधर जाधव व श्री. प्रदीप मोकाशे यांनी परिश्रम घेतले. तांत्रिक सहाय्य डॉ. नरेंद्र खत्री, इंजी. रवीकुमार कल्लोजी, डॉ. अविनाश काकडे, डॉ. अनिकेत वाईकर, श्री. मारोती रनेर, मुक्ता शिंदे, रेखा ढगे, श्री. जगदीश माने यांनी केले.

Wednesday, June 9, 2021

अंबेजोगाई येथील सिताफळ संशोधन केंद्रात दर्जेदार सिताफळाच्‍या विविध सुधारित वाणांची कलमे विक्री करिता उपलब्‍ध

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अंबेजोगाई (जिल्हा बीड) येथील असलेल्या सीताफळ संशोधन केंद्रात कुलगुरु मा डॉ अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिताफळाच्या विविध वाणाचे दर्जेदार कलम व रोपे तयार करण्‍यात आली असुन शेतक-यांकरिता विक्री करिता उपलब्ध आहेत.  सिताफळाच्‍या सुधारीत वाण धारुर-६, बालानगरी, टिपी-७ व रामफळ, हनुमान फळ आदींची कलमे विक्रीकरिता उपलब्‍ध असुन कलमांचा दर प्रती कलम रु. ४० प्रमाणे आहे, अशी माहिती संशोधन केंद्र प्रमुख डॉ. गोविंद मुंडे यांनी दिली.

सिताफळ हे फळ म्हणून शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे, त्यास आधुनिक कल्पवृक्ष संबोधण्यास वावगे ठरणार नाही. सिताफळ वाण निवडताना तो वाण कीड व रोगास बळी पडणाऱ्या वाणांची निवड करावी, सिताफळ हे एक शाश्वत फळपीक म्हणून पुढे येत असुन सिताफळ लागवड शास्त्रीयदृष्ट्या होणे गरजे आहे. सदरिल संशोधन केंद्राने निर्मीत केलेल्या विविध वाणांची लागवड खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागात मोठया प्रमाणात झाली असुन तामिळनाडु व मध्यप्रदेशातील शेतक-यांमध्‍येही मोठया प्रमाणात रोपांची मागणी होते. सिताफळातील विविध वाणातील धारुर-६ या वाणास मोठी मागणी असुन याचे वैशिष्टय म्हणजे फळाचा आकार मोठा असुन वजन ४०० ग्राम पेक्षा जास्त आहे तर साखरेचे प्रमाणे १८ टक्के व घनदृव्याचे प्रमाण २४ टक्के असल्यामूळे प्रक्रीया उद्योगामध्ये याची मागणी मोठी आहे. फळप्रक्रिया उद्योगासाठी धारूर-६  या वाणाचा गर अत्यंत उपयुक्त आहे व तो उणे २० डिग्री सेंटीग्रेड तापमानात सहा महिने जशाचा तसा टिकून राहतो. प्रक्रिया उद्योगात बालानगर या फळांचीही मागणी असते. सिताफळाच्या गराचा मिल्कशेक, रबडी, आईक्रीममध्ये मोठया प्रमाणात वापर होत असुन गराची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ  गोविंद मुंडे यांनी दिली असुन रोपांसाठी डॉ गोविंद मुंडे यांच्‍याशी संपर्क करावा, मोबाईल क्रमांक ८२७५०७२७९२.

वनामकृ‍वित संगणक प्रणालीचा कृषी क्षेत्रात उपयोग यावरील प्रशिक्षणास सुरूवात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) यांच्‍या वतीने संगणक प्रणालीचा कृषी क्षेत्रात उपयोग या विषयावर दिनांक 7 जुन ते 3 जुलै दरम्‍यान पदवी व पदव्युत्तर ‍विद्यार्थी, विद्यापीठ शास्त्रज्ञ व प्राध्यापक यांच्याकरिता ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले असुन दिनांक 7 जुन रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन झाले. उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन पुणे एनसीएसचे प्रबंधक इंजी. अमित कामिटकर उपस्थित होते.

मार्गदर्शनात इंजी. अमित कामिटकर म्‍हणाले की, संगणक प्रणालीचा कृषी क्षेत्रात वापर करण्‍यास मोठी संधी असुन संगणक प्रणालीचा वापर करून शेतकरी बांधवाच्‍या गरजेनुसार छोटी छोटी अवजारे तयार करू शकतो. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्‍यांनी संगणक प्रणालीवर आधारित अवजारे निर्मितीबाबत संशोधन प्रकल्प तयार करण्याचे आवाहन त्‍यांनी केले.

या प्रसंगी डॉ. गोपाळ ‍शिंदे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना नाहेपच्या ‍विविध योजना व प्रशिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले. संशोधन सहयोगी इंजी. रवीकुमार कल्लोजी यांनी प्रशिक्षणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंजी. अपुर्वा देशमुख यांनी केले तर आभार डॉ. अविनाश काकडे यांनी मानले.

सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन नवी दिल्‍ली येथील नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख संचालक मा डॉ आर सी अग्रवाल, कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत असुन प्रशिक्षण वर्गात एनसीस, हैद्राबाद येथील इंजी. एम. संगीता, इंजी. कैलास जगताप, इंजी. कार्तीकेश कुमार, आणि इंजी. विवेक अशोकन आदी प्रशिक्षणार्थीनी मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणासाठी देशभरातून पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थ्‍यी व कृषि विद्यापीठ शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंजी शिवानंद शिवपुजे, इंजी गोपाळ रनेर, इंजी अपुर्वा देशमुख, इंजी खेमचंद कापगते, डॉ नरेंद्र खत्री, डॉ अनिकेत वाईकर, डॉ हेमंत रोकडे, रामदास शिंपले, रेखा ढगे, जगदीश माने आदींनी तांत्रिक सहाय्यक केले.

Saturday, June 5, 2021

वनामकृवित बीबीएफ यंत्र जोडणी व वापर यावर एक दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुशक्तीचा योग्य वापर योजनेद्वारे दिनांक ५ जुन रोजी बीबीएफ जोडणी व वापर यावर एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. प्रशिक्षणाचे उदघाटन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ राहूल रामटेके, प्रगतशील शेतकरी श्री मंगेश देशमुख, संशोधन अभियंता डॉ स्मिता सोलंकी, डॉ शिवाजी म्‍हेत्रे, डॉ खर्गखराटे, डॉ नारखेडे, डॉ अशोक जाधव, डॉ अनिल गोरे, डॉ. मदन पेंडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

यावेळी मार्गदर्शनात डॉ. दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, कोरडवाहू शेतीकरिता बीबीएफ यंत्र हे एक वरदान असुन यंत्राचा उपयोगामुळे खत, बियाणे, तणनाशक, किडकनाशक आदी निविष्ठांची बचत होते. तसेच पाण्याचा योग्‍य निचरा, जलसंवर्धन आणि पिक उत्पादनात चांगली वाढ होते, असे त्‍यांनी सांगितले. प्रशिक्षणात संशोधन अभियंता डॉ स्मिता सोलंकी यांनी बीबीएफ यंत्राने फोर इन वन जोडणी व मांडणी, कमी रुंदीचा टायर वापरून बीबीएफ यंत्राच्या मदतीने पेरणी ते फवारणी, इतर कृषि यंत्राच्या जोडणी, मांडणी, निगा दुरुस्ती मांडणी व येणाऱ्या विविध अडचणी याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात शेतकरी, ट्रॅक्टर चालक, विद्यापीठातील विविध संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ तसेच आदींनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी अजय वाघमारे, संदेश देशमुख, भारत खटिंग, दीपक शिंदे, रुपेश काकडे, आदींनी यांनी परिश्रम घेतले.