वनामकृविच्या लातूर येथील कृषि महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील कृषि महाविद्यालय आणि
विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या नवप्रवेशित
विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ९
ऑक्टोबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक
डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणि यांनी सांगितले की, वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ हे सदैव शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या हिताला
केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारे विद्यापीठ आहे. शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून,
सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीत आणि वारंवार होणाऱ्या नैसर्गिक
आपत्तींच्या पार्श्वभूमीवर त्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी
कृषि क्षेत्रातील विद्यार्थी तसेच सर्व समाजघटकांनी शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून,
त्यांच्या समस्या समजून घेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे
हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे
म्हणाले की, विद्यार्थी जीवन ही आयुष्यातील घडणारी सर्वात
महत्त्वाची पायरी आहे. या काळात जर कठोर परिश्रम, शिस्त,
वेळेचे व्यवस्थापन आणि सकारात्मक विचार यांचा अंगीकार केला, तर यश अटळ आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, फक्त वैयक्तिक प्रगतीकडे न पाहता सामाजिक बांधिलकी जपत, ग्रामीण व शेती समुदायाच्या उन्नतीसाठी कार्य करावे. माननीय कुलगुरूंनी हेही
स्पष्ट केले की, नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना
स्वावलंबी, कौशल्यसंपन्न आणि संशोधनाभिमुख बनविण्यासाठी
मार्गदर्शक आहे. या संधींचा योग्य उपयोग करून विद्यार्थी केवळ करिअर घडवतील असे नाही,
तर देशाला सक्षम, आत्मनिर्भर आणि प्रगत बनविण्यातही
मोलाची भूमिका बजावतील. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत सांगितले की,
ज्ञान आणि कर्म यांचा संगम साधला, तरच आपण
खऱ्या अर्थाने भारताचा सक्षम नागरिक ठरू.
प्रमुख अतिथी डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणानुसार
विद्यार्थ्यांनी अभ्यासपद्धतीतील बदल समजून घेणे आवश्यक आहे. विद्यापीठाने शिक्षण,
संशोधन आणि विस्तार या तीनही क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले असून,
त्याच्या आधारे आयसीएआरच्या मूल्यांकनात विद्यापीठास ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधांचा योग्य
वापर करून प्रात्यक्षिक ज्ञान वाढविण्याचे आणि बदलत्या हवामानामुळे कृषि क्षेत्रात
उद्भवणाऱ्या नव्या समस्यांवर उपाय शोधून शेतकरीहित जोपासण्याचे आवाहन केले. तसेच रॅगिंगसारख्या
अपप्रवृत्तींपासून दूर राहण्याचेही आवाहन केले.
प्रास्ताविकात कृषि महाविद्यालय, लातूरचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे
यांनी सांगितले की, महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण
विकासासाठी कटिबद्ध आहे. पालकांनी वेळोवेळी आपल्या मुलांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी
महाविद्यालयाशी संपर्कात राहावे. व्याख्यानगृह, प्रयोगशाळा,
ग्रंथालय, व्यायामशाळा, खेळाची
मैदाने, वसतिगृहे आणि संपूर्ण परिसरातील सौहार्दपूर्ण वातावरण
जपण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, , असेही त्यांनी
आवाहन केले.
कार्यक्रमास श्रीमती जयश्री मिश्रा, डॉ. अच्युत भरोसे, डॉ. संतोष कांबळे, डॉ. मोहन धुप्पे, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. ज्योती देशमुख, डॉ. महेंद्र दुधारे, तसेच देशी गोवंशपालक शेतकरी श्री.
बच्चेसाहेब देशमुख आणि सेंद्रीय शेतीचे अग्रणी श्री. शरद जरे उपस्थित होते. यावेळी
नवप्रवेशित विद्यार्थी, पालक व शेतकऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त
केली.
या प्रसंगी कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी
संस्थेमार्फत शेतकऱ्यांना विद्यापीठनिर्मित ‘परभणी सुपरमोती’ या ज्वारीच्या बियाण्यांचे
मोफत वितरण करण्यात आले. तसेच अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची महाराष्ट्र कृषि
तंत्रज्ञ संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कुलगुरू व संचालक शिक्षण यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला.
महाविद्यालय व एडीएम अॅग्रो इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरात
वृक्षारोपण उपक्रम तसेच महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी दोन नवीन प्रकल्पांची सुरुवात
करण्यात आली. या प्रकल्पांचे प्रमुख डॉ. विजय भामरे आणि डॉ. ज्योती देशमुख यांचा मान्यवरांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर दुपारच्या सत्रात महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख — शिक्षण, जिमखाना, परीक्षा व शिष्यवृत्ती, वसतिगृह, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण आणि समुपदेशन
विभाग — यांनी विद्यार्थ्यांना संबंधित विभागांद्वारे राबविण्यात
येणाऱ्या कार्याची आणि उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
सूत्रसंचालन डॉ. दयानंद मोरे आणि डॉ. रमेश ढवळे यांनी केले, तर आभार डॉ. अच्युत
भरोसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषि महाविद्यालय आणि विलासराव देशमुख
कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी
व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.