वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अन्नतंत्र महाविद्यालयात दीक्षारंभ व पालक मेळावा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी पदवी अभ्यासक्रमात प्रवेशित नवीन विद्यार्थ्यांच्या दीक्षारंभ कार्यक्रमांतर्गत परिचय तथा पालक मेळावा दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले, तर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षीय
भाषणात माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नव्याने प्रवेशित
विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की, विश्वास आणि
मेहनत हे एक चांगल्या नागरिकाचे अत्यावश्यक गुण आहेत. हे गुण
विद्यार्थ्यांनी आत्मसात करून देशाच्या प्रगतीसाठी आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक
आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना असे अस्तित्व निर्माण करण्याचे आवाहन केले की, “जिथे
तुमच्याशिवाय पर्याय नसेल.” तसेच सध्याच्या काळात शेतकऱ्यांसमोरील समस्यांवर
उपाय शोधणे ही विद्यार्थ्यांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे
सांगितले की, ज्ञानामुळे विनम्रता येते, विनम्रतेमुळे पात्रता मिळते, आणि पात्रतेमुळे धन, “धनसंचयाने
धर्म म्हणजे चांगले कर्म होते, आणि चांगले कर्म केल्यानेच खरे
सुख मिळते,” हीच भारताची
उज्ज्वल परंपरा आहे. पालकांना उद्देशून त्यांनी सांगितले की, आपल्या
पाल्यांना जबाबदार बनविल्यासच त्यांचे भविष्य सुरक्षित होईल. नोकरी
शोधण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, असा संदेशही त्यांनी
विद्यार्थ्यांना दिला.
अन्नतंत्र
पदवीधारकांसाठी भविष्यात अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये विस्तृत संधी उपलब्ध
असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांच्या प्रगतीची माहिती
वेळोवेळी घेऊन महाविद्यालयाशी सतत संपर्क ठेवावा, असे आवाहन
केले.
शिक्षण
संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, अलीकडेच
भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR), नवी दिल्ली तर्फे विद्यापीठाला ‘A ग्रेड’
मानांकन प्राप्त झाले
असून, विविध ऑनलाईन
शैक्षणिक प्लॅटफॉर्मवर विद्यापीठाने उल्लेखनीय कार्य आहे. त्यांनी अन्नतंत्र
विषयाचे वाढते शैक्षणिक आणि औद्योगिक महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना उपलब्ध
संधींचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील
आव्हानांना न घाबरता त्यांचा धैर्याने सामना करून प्रत्येक संधीचे सोने करण्याचा
सल्ला दिला.
प्रास्ताविकात
प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर यांनी
महाविद्यालयाचा गौरवशाली इतिहास, कार्यपरंपरा आणि अन्नतंत्र
शिक्षणाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमात प्रतिनिधिक स्वरूपात उपस्थित पालकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व विभाग प्रमुख, सहयोगी व सहाय्यक प्राध्यापक, तांत्रिक अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. अनुप्रिता जोशी यांनी केले, तर डॉ. बी. एस. आगरकर यांनी आभार मानले.