Wednesday, August 31, 2016

कृषीच्‍या विद्यार्थ्‍यांना शिक्षणाच्‍या आधारे नवनिर्मिती करण्‍याची संधी.....हिंगोलीचे जिल्‍हा पोलीस अधिक्षक मा. श्री. अशोक मोराळे

परभणी कृषी महाविद्यालयातील नुतन प्रवेशीत विद्यार्थ्‍यांच्‍या उद्बोधन कार्यक्रमात मार्गदर्शन
कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना हिंगोली जिल्‍हा पोलीस अधिक्षक मा. श्री. अशोक मोराळे, व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ प्रल्‍हाद शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, प्राचार्य डॉ उदय खोडके आदी
भारत कृषी प्रधान देश असुन कृषी तंत्रज्ञानाच्‍या जोरावर आपण हरित क्रांती केली, परंतु आज शेतकरी आत्‍महत्‍याचा गंभीर प्रश्‍न आपल्‍या समोर असुन कृषी पदवीधरांनी कृषी संशोधनाच्‍या आधारे उपाय शोधावेत. आज तरूणापुढे करिअरच्‍या दृष्‍टीने अनेक क्षेत्रे खुली आहेत, परंतु कृषी शिक्षणाच्‍या आधारे नवनिर्मीती करण्‍याची संधी कृषी पदवीधरांना आहे, अशा प्रकारची संधी क्वचितच इतर क्षेत्रात उपलब्‍ध असल्‍याचे प्रतिपादन हिंगोलीचे जिल्‍हा पोलीस अधिक्षक तथा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मा. श्री. अशोक मोराळे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्‍यांसाठी दिनांक ३० ऑगस्‍ट रोजी आयोजीत उद्बोधन व मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. व्‍यासपीठावर प्रमुख पाहुणे म्‍हणुन विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य तथा माजी शिक्षण संचालक मा. डॉ. प्रल्‍हाद शिवपुजे, अध्‍यक्ष म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण उपस्थित होते तर प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍नस्‍तर शिक्षण) डॉ डि बी देवसरकर, प्राचार्य डॉ. उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. श्री. अशोक मोराळे पुढे म्‍हणाले की, परभणी कृषी महाविद्यालयास गौरवशील परंपरा असुन या महाविद्यालयात मिळालेल्‍या शैक्षणिक संधीचा फायदा घ्‍या. विद्यार्थ्‍यांना महाविद्यालयीन जीवनात व्‍यक्‍तीमत्‍व विकासास मोठया वाव असतो, याच काळात आपली शैक्षणिक बाजु मजबुत करावी, विद्यार्थ्‍यांनी मेहनत करण्‍याची जिद्द ठेवली तरच जीवनात यशस्‍वी व्‍हाल. आज अनेक तरूण नैरश्‍याने ग्रासलेले आहेत, नैरश्‍यापासुन दुर राहण्‍यासाठी विद्यार्थ्यामध्‍ये खेडाळुवृत्‍ती विकासित झाली पाहिजे, यासाठी विद्यार्थ्‍यांनी विविध स्‍पर्धेत व खेळात सहभाग घ्‍यावा. कोणत्‍याही क्षेत्रात कार्य करतांना समाजाच्‍या हितासाठी व समाधानासाठी कार्य करावे. तरूणांनी माहिती तंत्रज्ञानाचा व समाज माध्‍यमाचा सकारात्‍मक वापर करण्‍याचा असा सल्‍लाही त्‍यांनी यावेळी दिला.
विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. प्रल्‍हाद शिवपुजे मार्गदर्शनात म्‍हणाले की, परभणी कृषी महाविद्यालयास मोठी सांस्‍कृतिक वारसा असुन महाविद्यालयाने देशास व राज्‍यास अनेक कर्तबगार व्‍यक्‍ती दिले असल्‍याचे सांगुन आज विद्यार्थ्‍यामधील जिज्ञासुवृत्‍ती दुर्लभ होत असल्‍याची खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली. अध्‍यक्षीय समारोपात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कृषी पदवीधरास प्रशासन, संशोधन, व्‍यवस्‍थापन, राजकारण, स्‍वयं: रोजगार, शेती आदी क्षेत्रात मोठा वाव आहे. नुकतेच कृषी शाखेस तांत्रिक दर्जा मिळाल्‍यामुळे कृषी शिक्षणाचे महत्‍व वाढणार आहे. विद्य‍ार्थीदशेतच स्‍वत:च्‍या व्‍यक्‍तीमत्‍वात चांगल्‍या गोष्‍टी बिंबवण्‍याचा प्रयत्‍न करावा व स्‍वत:तील दुगुर्णाचा त्‍याग करावा.
कार्यक्रमाचे प्रास्‍‍ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या शैक्षणिक यशाची माहिती दिली. कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते महाविद्यालयाच्‍या गुणवंत विद्यार्थ्‍यीचा सत्‍कार करण्‍यात आला तर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्‍यी मनिषा गवळी व अभिजीत देशमाने यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ आनंद कार्ले यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापकवृंद, कर्मचारीवृंद, नुतन प्रवेशीत विद्यार्थ्‍यीचे पालक व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
वनामकृविच्‍या परभणी कृषी महाविद्यालयात मान्‍यवरांसोबत नुतन प्रवेशित विद्यार्थ्यीीनी-विद्यार्थी

Tuesday, August 30, 2016

वनामकृवित राष्‍ट्रीय पातळीवरील करडई व जवस पीकासंबंधी शास्‍त्रज्ञांची वार्षिक गट बैठकीचे आयोजन

देशपातळीवरील करडई व जवस पीकाच्‍या संशोधनाची ठरणार दिशा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे राष्ट्रीय पातळीवरील करडई व जवस पीकांसंबंधी शास्‍त्रज्ञांची वार्षिक गट बैठकीचे आयोजन दिनांक २ ते ४ सप्टेंबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन बैठकीच्‍या उद्घाटनास नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक मा. डॉ. जे. एस. संधु उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्षस्थान कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे भुषविणार आहेत. अशा प्रकारची शास्‍त्रज्ञांची तेलबिया विषयक वार्षिक गट बैठक विद्यापीठात प्रथमच संपन्‍न होत असुन बैठकीस महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा, आसाम, मेघालय आदी राज्यामधुन करडई व जवस पीकासंबंधी १२० शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहे.
तीन दिवस चालणा-या सदरिल बैठकीत करडई व जवस पिकांच्‍या संशोधनाबाबत चर्चा होणार असुन बैठकीत नवीन वाण प्रसारणाबाबत शिफारस करण्यात येणार आहे. देशापातळीवरील संशोधनाची दिशा ठरविण्‍यात येणार असुन या महत्वाच्या तेलबिया पिकांची उत्पादकता व क्षेत्र वाढीसाठी मदत होणार आहे. करडई पिकांच्‍या वाणाबाबत वनामकृविचे मोठे योगदान असुन अखिल भारतीय समन्‍वयीत करडई संशोधन प्रकल्पाच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठ विकसित परभणी कुसुम (परभणी-१२), बिनकाटेरी वाण परभणी-४०, परभणी ८६ (पुर्णा) आदी करडईच्या वाणांची लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहेत. विद्यापीठ विकसित करडईचे परभणी-१२ या वाणाची देशात मोठया क्षेत्रावर लागवड केली जाते. परिषदेच्या आयोजनासाठी संशोधक संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध समित्या गठीत करण्यात आल्या असुन विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व कर्मचारी परीश्रम घेत आहेत.

Friday, August 26, 2016

सद्यपरिस्थितीत घ्यावयाची भाजीपाला व इतर पिकांची काळजी

वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला
सध्या सर्वत्र पावसाचा ताण पडल्यामुळे पीक सुकत आहेत तसेच सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. अशा वातावरणाचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो तसेच भाजीपाला व इतर पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसुन येतो, अशा परिस्थितीत शेतक-यांनी मुख्‍य खरीप पिकांची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, विस्तार कृषि विद्यावेत्ता, डॉ. यू. एन. आळसे व सहाय्यक किटकशास्त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले आहे.
1.     मिरची पिकावर फुलकिडयाचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास फिप्रोनिल 5 टक्के 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळुन साध्या पंपाने फवारावे. सोबत उच्च प्रतीचे स्टिकर वापरावे.
2.     काकडी वर्गीय भाजीपाला पिकांवर रसशोषण करणा-या किडींच्या व्यवस्थापनाकरिता इमिडाक्लोप्रिड 70 टक्के 1 मिली. 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. सोबत उच्चप्रतीचे स्टिकर वापरावे.
3.     वांग्यामध्ये शेंडा पोखरणा-या अळीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रादुर्भावग्रस्त शेंडे काढुन टाकावीत. व त्यानंतर क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 टक्के 3 मिली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच शेंडा व फळे पोखरणा-या अळीचे कामगंध सापळे शेतामध्ये लावावेत
4.     हळदीचे कंद झाकुन घ्यावेत. हळदी मध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसुन येताच निंबोळी तेल 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. प्रादुर्भावग्रस्त झाडे काढुन नष्ट करावीत.
5.     हळदीमध्ये कंदमाशी व कंदकुजीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. त्यासाठी कॉपर ऑक्झीक्लोराईड 50 टक्के 25 ग्रॅम + क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 20 मि.ली. 10 लिटर पाण्यात टाकुन आळवणी करावी.
6.     उसामध्ये रसशोषण करणा-या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे, त्याकरिता शेताच्या कडेने असलेली प्रादुर्भावग्रस्त पाने काढुन नष्ट करावीत व मोनोक्रोटोफॉस 36 टक्‍के 10 मि.ली 10 लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
7.     काही भागात गोगलगाईचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे, अशा ठिकाणी त्यांच्या व्यवस्थापनाकरिता संध्याकाळी बाहेर निघालेल्या व दिवसा शेतात व बांधावरील गोगलगायी हाताने वेचून, त्या साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खोल खड्डा करुन जमिनीमध्ये गाडून टाकाव्यात. तसेच गोणपाट किंवा गवताचे ढीगगुळाच्या पाण्यामध्ये बुडवून संध्याकाळी शेतामध्ये जागोजागी ठेवावेत. दुस-या दिवशी सकाळी यावर आकर्षित झालेल्या गोगलगायी गोळा करुन नष्ट कराव्यात. शेतातील मुख्य पिकावर गोगलगाईचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कडेने चुन्याची भुकटी किंवा तंबाखुची भुकटी टाकावी. परंतु पाऊस पडल्यास याचा उपयोग होत नाही. तसेच मेटाल्डीहाईड 2.5 टक्के या गोगलगायनाशकाचा वापर करावा.
     अशा प्रकारे वरील प्रमाणे सध्याच्या वातावरणात आपल्या पिकाचे व्‍यवस्‍थापन व संरक्षण करावे. असे अवाहन संचालक विस्तार शिक्षण, डॉ. बी. बी. भोसले, विस्तार कृषि विद्यावेत्ता, डॉ. यू. एन. आळसे व सहाय्यक किटकशास्त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले आहे.

Tuesday, August 23, 2016

सद्यपरिस्थितीत मुख्‍य खरीप पिकांची घ्यावयाची काळजी

वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला
सध्या सर्वत्र पावसाचा ताण पडल्यामुळे पीक सुकत आहेत, सर्वत्र ढगाळ वातावरण असुन पिकाच्या वाढीवर परिणाम होतो तसेच पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसुन येतो, अशा परिस्थितीत शेतक-यांनी मुख्‍य खरीप पिकांची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, विस्तार कृषि विद्यावेत्ता, डॉ. यू. एन. आळसे व सहाय्यक किटकशास्त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले आहे.
1.  सोयबीन व कापुस सध्या फुलोरा अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी सोयबीन, मुग, उडीद ही पिके शेंगा लागण्याच्या / भरण्याच्या अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत पावसाचा ताण नुकसान करतो यासाठी शक्यअसल्यास तुषार किंवा ठिबक मधुन संरक्षित पाणी दयावे.
2.  तुर व कापुस पिकाला एक तास आड करुन स-या काढाव्‍यात व त्‍यामधुन पाणी दयावे. तसेच पोटॅशियम नायट्रेट किंवा 13:00:45 खताची फवारणी (150 ग्रॅम /10 लिटर पाणी) आठ दिवसाच्‍या अंतराने करावी.
3.  पावसाचा जास्त ताण पडत असल्यास 6 क्के केओलीनची पीकावर फवारणी करावी.
4.  कपाशीला शिफारस केल्या प्रमाणेच नत्राचा तिसरा हप्ता लागवडीनंतर 60 दिवसाने द्यावा. त्यानंतर नत्रयुक्त खतांचा वापर करु नका.
5.  कपाशीमध्‍ये काही भागात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळुन आला आहे, त्‍यासाठी अॅसिफेट 75 टक्‍के 16 ग्रॅम किंवा फेनव्‍हलरेट 20 टक्‍के 7 मि.ली. किंवा प्राफेनोफॉस 50 टक्‍क्‍े 30 मि.ली किंवा थायडीकार्ब 75 टक्‍के 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्‍यात मिसळुन फवारावे.
6. पावसाच्या खंडाच्या परिस्थितीत कपाशीवर रसशोषण करणा-या फुलकिडींचा प्रादुर्भाव आढळुन येत आहे. अशा वेळी फिप्रोनिल 05 टक्के 20 मि. ली किंवा थायामिथॉक्झाम 3 ग्रॅम किंवा फ्लोनीकॅमीड 50 टक्के 2 ग्रॅम किंवा बुप्रोफेझीन 25 टक्के 20 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे.
7.  सोयबीनवर पाने व शेंगा खाणा-या अळीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास इंडॉक्झाकार्ब 15.8 क्के 7 मि.ली 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
8. खरीप ज्वारी व मक्या मध्ये खोडकिडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पिकाचे मेलेले पोंगे उपसून अळीसकट नाश करुन कार्बारील 50 टक्के 40 मिली. 10 लिटर पाण्यात मिसळुन पिकावर फवारावे किंवा कार्बोफयुरॉन 3 टक्के दाणेदार 1 ते 1.5 ग्रॅम पोंग्यात टाकावे.
9. तृणधान्यामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसुन आला आहे. पावसाचा खंड पडल्यास पुढेही येण्याची शक्यता असल्यामुळे प्रादुर्भाव दिसताच क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी किंवा कार्बेफयुरॉन 3 टक्के दाणेदार या किटकनाशकाची 1 ते 1.5 ग्रॅम पोंग्यात टाकावे.
10. मुग उडीद या पिकावर भुरीरोगाच्या नियंत्रणासाठी 300 मेश गंधकाची भुकटी प्रती हेक्टरी 20 किलो या प्रमाणात धुराळावी किंवा पाण्यात मिसळणारे 80 टक्के गंधक 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे.
11. प्टेंबर महिन्यात जास्तपावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी उपाय म्हणुन कापुस, तुर, व शक्य असल्यास सोयबीनमध्येदोन ओळीत ठरावीक अंतरावर सरी काढून पावसाचे पाणी निच-याची व्यवस्था करावी.
12. हुमणी किडीच्या अळया जमिनीमध्ये दिसत असल्यास मेटारायझीयम अनेसोपोली ही जैविकबुरशी एकरी 4 किलो किंवा 10 टक्के फोरेट हे दाणेदार किटकनाशक एकरी 10 किलो या प्रमाणात जमिनीतुन ओल असतांना द्यावी.
   
    अशा प्रकारे वरील प्रमाणे सध्याच्या वातावरणात पिकांचे व्‍यवस्‍थापन व संरक्षण करावे, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे व सहाय्यक किटकशास्त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले आहे.

Monday, August 22, 2016

आजही समाजास बुरसटलेल्‍या विचारातुन स्‍वातंत्र्य पाहीजे......प्रभारी कुलगुरू तथा शिक्षण संचालक मा. डॉ. अशोक ढवण

तिरंगा मार्चला वनामकृविच्‍या विद्यार्थ्‍याचा मोठया प्रतिसाद
तिरंगा मार्चला हिरवा झेंडा दाखवितांना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, प्राचार्य डि एन गोखले, प्राचार्य डॉ व्हि डि पाटील आदी. 
तिरंगा मार्च रॅलीस संबोधित करतांना स्‍वातंत्र सेनानी मा. श्री. वसंतराव अभुंरे, व्‍यासपीठावर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, प्राचार्य डि एन गोखले, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर, प्राचार्य प्रा. विशाला पटणम, प्राचार्य डॉ कदम, प्राचार्य डॉ उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदी. 
तिरंगा मार्च रॅलीस संबोधित करतांना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व्‍यासपीठावर स्‍वातंत्र सेनानी मा. श्री. वसंतराव अभुंंरे, प्राचार्य डि एन गोखले, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर, प्राचार्य प्रा. विशाला पटणम, प्राचार्य डॉ ए एस कदम, प्राचार्य डॉ उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदी.
देशास स्‍वातंत्र्य प्राप्‍त होऊन ७० वर्ष पुर्ण झाले, देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली. आजही स्‍त्री–भ्रुण हत्‍या, अंधश्रध्‍दा, कुपोषण, देश विघातक शक्‍ती आदी समस्‍यांनी ग्रासला आहे. समाज अनेक बुरसटलेल्‍या विचारांनी जखडला असुन समाजास या बुरसटलेल्‍या विचारापासुन स्‍वातंत्र्य पाहिजे, यासाठी तरूणांनी समाजात जागृत राहुन लढा दिला पाहिजे, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू तथा शिक्षण संचालक मा. डॉ. अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले. विद्यापीठाच्‍या कल्‍याण अधिकारी कार्यलयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या माध्‍यमातुन दिनांक २२ ऑगस्‍ट रोजी तिरंगा मार्चचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी रॅलीस संबोधित करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास स्‍वातंत्र्य सेनानी मा. श्री. वसंतराव अंभुरे हे प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थित होते तर प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, प्राचार्य डॉ. उद्य खोडके, प्राचार्य डॉ. विलास पाटील, प्राचार्य प्रा. विशाला पटणम, प्राचार्य डॉ. पी. एन. सत्‍वधर, प्राचार्य डॉ. ए. एस. कदम, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रभारी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, अनेक क्षेत्रात महिला देशाचे नाव उज्‍वल करीत आहेत. महिला सक्षम करण्‍यासाठी आरक्षण देण्‍यात आले, परंतु महिलांना खरी गरज आहे ती स्‍त्री सरंक्षणासाठी स्‍त्री-भ्रुण आरक्षणाची. आज देशात अनेक देश विघातक शक्‍ती कार्य करित असुन त्‍यापासुन देशास वाचविण्‍यासाठी तरूणांना पुढाकार घ्‍यावा लागेल, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. स्‍वातंत्र्य सेनानी मा. श्री. वसंतराव अंभुरे यांनी आपल्‍या भाषणात विद्यापीठाचे कार्याची प्रसंशा करून तिरंगा मार्चाच्‍या यशस्‍वी आयोजनाबाबत अभिनंदन केले.
प्राचार्य प्रा. विशाला पटणम यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमात स्‍वातंत्र्य सेनानी मा. श्री. वसंतराव अंभुरे यांचा विद्यापीठाच्‍या वतीने प्रभारी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. निता गायकवाड यांनी केले. रॅली दरम्‍यान विद्यार्थ्यांनी तिरंगा फडकवित देशभक्‍तीपर घोषणा दिल्‍या. तिरंगा मार्च रॅली विद्यापीठातील कृषी महाविद्यालय, अन्‍न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय आदींच्‍या विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया उत्‍साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी क्रीडा अधिकारी डॉ आशा शेळके, प्रा. शाहु चव्‍हाण, प्रा. डि एफ राठोड, डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा आर टि रामटेके, प्रा विजय जाधव, डॉ. जे डी देशमुख, प्रा संजय पवार, प्रा एस पी सोंळुके, प्रा प्रविण घाटगे, प्रा. रविंद्र शिंदे, श्री. किशोर शिंदे आदींचे सहकार्य लाभले. 

विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी अंतर्गत विशेष पिक संरक्षण मोहीमेचे आयोजन

संपुर्ण मराठवाडयात राबविण्‍यात येणार मोहिम
मराठवाडा विभागात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसा झाला परंतू मागील २० ते २२ दिवसाच्या पावसाच्या खंडामुळे किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे, अशा परिस्थितीत पिक संरक्षण व येणा-या रबी हंगामाचे नियोजन याकरिता शेतक­यांच्या शेतावर भेट देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यावर्षीही कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु व विस्तार शिक्षण संचालक मा. डॉ. बी. बी. भोसले यांचे मार्गदर्शनाखाली विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषि विभाग यांच्या सहकार्याने संपुर्ण मराठवाडयातील आठही जिल्ह्रात विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रांच्या व कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून, सर्व घटक महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन योजनांच्या सहकार्याने विशेष विस्तार उपक्रम विद्यापीठ आपल्या दारी :  तंत्रज्ञान शेतावरी अंतर्गत विशेष पिक संरक्षण मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत परभणी येथील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने कृषी तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतक­यापर्यंत पोहचविण्यासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्राकरिता जिल्हा / तालुकास्तरीय तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रमाचा कृति आराखडा करण्यात आला असुन सदरिल कार्यक्रम दि. २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. या कृषि तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रम कृति आराखडयामध्ये कृषि विभागाच्या समन्वयाने प्रत्येक तालुक्यातील चार ते सहा गावाचा समावेश करण्यात आला असून प्रत्येक दिवशी दोन ते तीन गांवाचा दौरा करण्याचे नियोजित आहे. या दोन जिल्हयाकरिता शास्त्रज्ञांचे एकूण चार चमु करण्यात आले असुन यात कृषिविद्या, किटकशास्त्र, वनस्पती विकृतीशास्त्र, उद्यानविद्या आदी विषयतज्ञांचा समावेश राहणार आहे. छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन प्रक्षेत्र भेट अशा स्वरुपाचे कार्यक्रम घेतले जाणार असून हंगामी खरीप पिके, ऊस, फळे, भाजीपाला, पीक संरक्षण व मुलस्थानी जलसंधारण इत्‍यादी विषयावर तसेच रबी हंगामाचे नियोजन यावर शेतक-यांना शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेष करुन आजच्या परिस्थितीमध्ये पिक व्यवस्थापन, पिक संरक्षण व शेतक-यांचे प्रश्‍न यावर शेतक­यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मागणी अधारित काटेकोर विस्तार शिक्षण असे या कार्यक्रमाचे स्वरुप राहणार आहे.

कार्यक्रमात साधारणत: १५ दिवसांचा कालावधीत परभणी व हिंगोली जिल्हयातील एकूण ५६ ते ७० गांवे कृषि विभागाच्या समन्वयाने प्रस्तावित केली असून एकूण प्रवास अंदाजे अंतर ४१०० कि.मी. होणार आहे. यामध्ये सबंधित शास्त्रज्ञाचा चमु, कृषि विभाग प्रतिनिधी व शेतकरी बांधव यांच्या समन्वयातुन कार्यक्रमामध्ये बदल करता येऊ शकतो. या कार्यक्रमाचा जास्‍तती जास्‍त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे अवाहन असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. यु. एन. आळसे व प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले आहे.

Tuesday, August 16, 2016

विद्यार्थ्‍यांनी वाचनाव्‍दारे आपले विचार प्रगल्‍भ करावेत.....भारतीय सैन्‍यदलाचे कॅप्‍टन श्री बालाजी सुर्यवंशी

वनामकृविच्‍या कृषि महाविद्यालयात स्‍पर्धापरिक्षेबाबत माजी विद्यार्थ्‍यांचे मार्गदर्शन
मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, प्राचार्य डॉ डि एन गोखले, कॅप्‍टन श्री बालाजी सुर्यवंशी, पोलिस उपनिरिक्षक श्री अरूण डोंबे, डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ एच व्‍ही काळपांडे, प्रा आशिष बागडे आदी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय छात्रसेनेच्‍या वतीने स्‍वातंत्र्यदिनाचे औजित्‍यसाधुन दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी स्‍पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ डि एन गोखले, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा भारतीय सैन्‍यदलातील कॅप्‍टन श्री. बालाजी सुर्यवंशी तसेच पोलिस उपनिरिक्षक श्री अरूण डोंबे, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, प्रभारी अधिकारी डॉ एच व्‍ही काळपांडे, छात्र सेना अधिकारी प्रा आशिष बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा भारतीय सैन्‍यदलातील कॅप्‍टन श्री. बालाजी सुर्यवंशी व पोलिस उपनिरिक्षक श्री अरूण डोंबे यांनी स्‍पर्धापरिक्षेत यश संपादन करण्‍यासाठी मार्गदर्शन केले. कॅ. बालाजी सुर्यवंशी आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, कोणतीही भाषा ही ज्ञान वाढविण्‍याचे माध्‍यम असुन कृषिच्‍या विद्यार्थ्‍यानी इंग्‍लीश भाषेचा न्‍युनगंड न बाळगता स्‍पर्धेापरिक्षेची तयारी करावी. स्‍पर्धापरिक्षेत यश संपादन करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी वाचनाची सवय ठेवावी, वाचनास प्रत्‍यक्ष अनुभवाची जोड द्यावी, त्‍यातुन विचार करण्‍याची क्षमता विकसित होऊन विचार प्रगल्‍भ होतात. पोलिस उपनिरिक्षक श्री. अरूण डोंबे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यानी आपले ध्‍येय महाविद्यालयीन जीवनात निश्चित करून प्रामाणिक प्रयत्‍न केल्‍यास निश्चितच यश प्राप्‍त होते. अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, कृषि पदवीधरांना विविध क्षेत्रात मोठया संधी उपलब्‍ध आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विद्यार्थ्‍यी देशापातळी व राज्‍यात विविध क्षेत्रात मोठया प्रमाणाात कार्यरत असुन त्‍याचा रास्‍त अभिमान विद्यापीठास आहे
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप खरबळ यांनी केले तर आभार अनिकेत भद्रे यांनी मानले. कार्यक्रमात देशभक्तिपर गीताचे तेजस्विनी बेद्रे हिने सादरिकरण केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्‍यापकवृंद व विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यीनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना कॅप्‍टन श्री बालाजी सुर्यवंशी
मार्गदर्शन करतांना पोलिस उपनिरिक्षक श्री अरूण डोंबे