Tuesday, April 24, 2018

कोणत्‍याही शैक्षणिक संस्‍थेची प्रगती विद्यार्थ्‍यीच्‍या यशावर अवलंबुन असते.....कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु

परभणी कृषि महाविद्यालयातील कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सामा‍ईक प्रवेश परिक्षेतील यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचा पालकांसह सत्‍कार
कोणत्‍याही शैक्षणिक संस्‍थेची प्रगती ही त्‍या संस्‍थेत कार्यरत असलेले प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी यांच्‍या कार्यावर अवलंबुन असते. येणा-या काळात प्राध्‍या़पकाच्‍या अध्‍यापन कार्याचे मुल्‍यांकण हे विद्यार्थ्‍यीच्‍या यशावर ठरणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 2018 सामा‍ईक प्रवेश परिक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या यशस्‍वी विद्यार्थ्‍यीचा दिनांक 24 एप्रिल रोजी आयोजित सत्‍कार कार्यक्रमात ते बोलत होते. व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्‍माईल, डॉ बाबासाहेब ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, परभणी कृषि महाविद्यालयातील यश प्राप्‍त केलेले विद्यार्थ्‍यी हे मुख्‍यत: मराठवाडयातील ग्रामीण भागातील असुन त्‍यांनी मिळविलेले यश कौतुकास्‍पद असुन यासाठी महाविद्यालयातील प्राध्‍यापकांचे मार्गदर्शन निश्चितच मोलाचे ठरले आहे.  
प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. सुत्रसंचालन प्रा रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार प्रा एस एल बडगुजर यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, विद्यार्थ्‍यी व विद्यार्थ्‍यांचे पालक मोठया संख्‍येने उपस्थित होते.  
यावेळी कृषि शाखेत राज्‍यात प्रथम आलेला रूपेश बोबडे, चौथ्‍या क्रमांकाने उत्‍तीर्ण झालेला परसराम लांडगे यांच्यासह बळीराम सातपुते, पंकज घोडके, विश्‍वास तेलांग्र, सोनाली उबाळे, सारीका वरपे, सविता लिंबुळे, स्वाती चव्हाण, सुप्रीया कलबरकर, अवधूत पवार, शेख अमन अली आदी राज्‍यात पहिल्‍या शंभर मध्‍ये आलेल्या विद्यार्थ्‍यांचा त्‍यांच्‍या पालकासह कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते सत्कार करण्‍यात आला. तसेच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थ्‍यी डाॅ मेहराज शेख यांचा केद्रींय कृषी मंञालयात सहाय्यक आयुक्त म्हणुन नियुक्तीबाबत माननीय कुलगुरू यांच्‍या हस्‍ते सत्कार करण्‍यात आला.
कृषि शाखेत राज्‍यात प्रथम आलेला रूपेश बोबडे

Friday, April 20, 2018

कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाच्‍या सामा‍ईक प्रवेश परिक्षेत वनामकृविच्‍या विद्यार्थ्‍यांची आघाडी

कृषि शाखा, कृषि अभियांत्रिकी शाखा व सामाजिक विज्ञान शाखेत वनामकृविचे विद्यार्थ्‍यी राज्‍यात प्रथम
महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 2018 सामा‍ईक प्रवेश परिक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विविध घटक महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी आघाडी घेतली असुन परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी रूपेश बोबडे हा कृषि शाखेत राज्‍यात प्रथम आला असुन परसराम लांडगे हा चौथ्‍या क्रमांकाने उत्‍तीर्ण झाला आहे. कृषि अभियांत्रिकी शाखेत परभणी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अजय सातपुते प्रथम तर सुयोग खोसे व्दितीय क्रमांकाने उर्त्‍तीर्ण झाला आहेत. सामाजिक विज्ञान शाखेत परभणी सामाजिक विज्ञान महाविद्यालयाची दिक्षा मोरे प्रथम आली असुन मृणाली तोंडारे व्दितीय आली आहे. अन्‍नतंत्रज्ञान शाखेत परभणी कृषि अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचा अमोल यादव पाचवा, सुचित्रा बोचरे सातव्‍या, तयाबाह तबस्‍सुम नववी तर रेश्‍मा शेख दहाव्‍या क्रमांकाने उर्त्‍तीर्ण झाली आहे. उद्यानविद्या महाविद्यालयातील शरयु रामटेके नवव्‍या व पी अनुश्‍मा ही पंधरव्‍या क्रमांकाने उत्‍तीर्ण झाली आहे.  
याशिवाय परभणी कृषि महाविद्यालयातील बळीराम सातपुते, पंकज घोडके, विश्‍वास तेलांग्र, सोनाली उबाळे, सारीका वरपे, सविता लिंबुळे, स्वाती चव्हाण, सुप्रीया कलबरकर, अवधूत पवार, शेख अमन अली आदी पहिल्‍या शंभर मध्‍ये विद्यार्थ्‍यांचा समावेश असुन अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे नवीन थॉमस, प्रसाद गायकवाड, भक्‍ती देशमुख, शुभम भागजे, मोल्‍काथाला रेडडी, कीर्ती झाडे, नम्रता राठी, अबीन मॅथुस, दिपाली केंगार, स्‍वेता भोसले यांचा पहिल्‍या पन्‍नास मध्‍ये समावेश आहे. कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कोमल गोडेकर (बारावी), ज्ञानेश्‍वर मोरे (चोवीसावी), शुभम जोशी (पच्‍चवीसावी), दत्‍ता गिराम (एकुण्‍णतीसावी) आदींचा समावेश आहे. तसेच बदनापुर कृषि महाविद्यालयाचा सौदागर यादव व किरण वावरे यांचा पहिला शंभर मध्‍ये समावेश आहे तर लातुर व अंबाजोगाई ये‍थील घटक कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यीही सदरिल परिक्षेत चांगल्‍या क्रमांकांनी उर्त्‍तीण झाले आहेत. यशाबाबत कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्यां डॉ डि एन गोखले, डॉ ए एस कडाळे, डॉ हेमांगिणी सरंबेकर, डॉ ए आर सावते, डॉ टि बी तांबे आदींनी अभिनंदन केले.

Thursday, April 19, 2018

वनामकृवित नाईस माहिती तंत्रज्ञानाचा कृषि विस्‍तारात वापर यावरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्र व हैद्राबाद येथील राष्ट्रीय कृषि विस्तार व्‍यवस्‍थापन संस्‍था (मॅनेज) यांच्‍या वतीने माहिती तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन हवामान बदला आधारित कृषि सल्‍ला (नाईस प्‍लॅटफार्म) बाबत दोन दिवसीय कार्यशाळा दिनांक 17 व 18 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. सदरिल कार्यशाळेचा समारोप विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, शास्त्रज्ञ श्री. जी. भास्कर, श्री. हेमांशु वर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात डॉ पी जी इंगोले यांनी नाईस प्‍लॅटफार्म माहिती तंत्रज्ञान यंत्रणेच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांच्‍या विविध कृषि विषयक समस्‍यांवर त्‍वरित उपाय मोबाईल संदेशाव्‍दारे सुचविणे शक्‍य होणार असल्‍याचे सांगितले.
कार्यशाळेत मराठवाडयातील कृषि शास्त्रज्ञ, क्षेत्र सल्लागार आदींनी सहभाग घेतला. माहिती तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठीच्या नाईस या सुविधाचा वापर करून विद्यापीठ शास्त्रज्ञ अचुक संदेश योग्‍य वेळी क्षेत्र सल्लागाराच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांपर्यंत पोहोचवु शकणार आहेत, या संपुर्ण प्रक्रियेबाबत कार्यशाळेत राष्ट्रीय कृषि विस्तार व्‍यवस्‍थापन संस्‍थातील शास्त्रज्ञ श्री. जी. भास्कर, श्री. हेमांशु वर्मा आणि डॉ. पुनम प्रजापती यांनी प्रात्याक्षिकाव्‍दारे माहीती दिली.
नाईस प्‍लॅटफार्मच्‍या माध्‍यमातुन मोबाईल अॅप व्‍दारे शेतक-यांच्‍या कृषि तंत्रज्ञान विषयक समस्‍या त्‍वरीत संदेशाव्‍दारे सोडविण्‍यात येऊ शकणार आहे. सदरिल यंत्रणा मराठवाडयात सद्यस्थितीत काही निवडक गावात प्रायोगिकतत्‍वावर राबविण्‍यात येणार असुन पुढे या यंत्रणेची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात येणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. पी.आर. देशमुख यांनी मानले.

Tuesday, April 17, 2018

वनामकृविच्‍या मध्‍यवर्ती ग्रंथालयात कोहा ग्रंथालय संगणक आज्ञावली प्रशिक्षण संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यापीठ मध्‍यवर्ती ग्रंथालयाच्‍या वतीने दिनांक 16 व 17 एप्रिल रोजी कोहा ग्रंथालय संगणक आज्ञावलीवर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते, सदरिल प्रशिक्षणाचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. व्ही. डी.पाटील, प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, विद्यापीठ नियंत्रक श्री. विनोद गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी विद्यार्थ्‍यी घडविण्‍यात ग्रंथालयाचा मोठा वाटा असुन ग्रंथालयात ग्रंथसंपदेसोबतच आधुनिक सुविधांचा विकासावर भर देण्‍याची गरज असल्‍याचे सांगुन विद्यापीठ व घटक महविद्यालयातील ग्रंथालयांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्‍वासन दिले.  
शिक्षण संचालक डॉ. व्ही. डी. पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठ ग्रंथालयाने विकसित केलेल्या वेब ओपॅक सुविधेमुळे विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांना एका क्लिकवर ग्रंथालयात उपलब्ध पुस्तकांची माहिती मिळू शकते. विद्यापीठ ग्रंथालयाने सुमारे ३६०० प्रबंधांचे डीजिटायझेशन केल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रास्‍ताविकात ग्रंथपाल डॉ. संतोष कदम यांनी प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन श्री.बी.जी.कांबळे यांनी केले तर आभार डॉ. वंदना जाधव यांनी मानले. कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

वनामकृविच्या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रात सात दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण संपन्न‍


Saturday, April 14, 2018

वनामकृवित भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्‍साहात साजरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती दिनांक 14 एप्रिल रोजी उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. यावेळी भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्‍या हस्‍ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात करून त्‍यांनी जंयती निमित्‍त सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या. विद्यापीठाच्‍या वतीने ढोलताश्‍याच्‍या गजरात डॉ आंबेडकरांच्‍या प्रतिमेची मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ ए आर सावते, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदीसह प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आशाताई देशमुख यांनी केले, आभार प्रा अनिस कांबळे यांनी मानले.

Friday, April 13, 2018

परभणी कृषि महाविद्यालयाचा रूपेश बोबडे कृषी पदव्‍युत्‍तर सामा‍ईक प्रवेश परिक्षेत राज्‍यात प्रथम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी रूपेश बोबडे हा महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 2018 सामा‍ईक प्रवेश परिक्षेत कृषि शाखेत राज्‍यात प्रथम आला असुन परसराम लांडगे हा चौथ्‍या क्रमांकाने उत्‍तीर्ण झाला आहे. तसेच बळीराम सातपुते, पंकज घोडके, विश्‍वास तेलांग्र, सोनाली उबाळे, सारीका वरपे, सविता लिंबुळे, स्वाती चव्हाण, सुप्रीया कलबरकर, अवधूत पवार, शेख अमन आदीसह पहिल्‍या शंभर मध्‍ये महाविद्यालयाच्‍या 13 विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे. या यशाबाबत शिक्षण संचालक डॉ विलास पाटील व  प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी अभिनंदन केले. सदरिल परिक्षेबाबत महाविद्यालयातील रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने विद्यार्थ्‍यांसाठी विशेष सराव घेण्‍यात आला होता, यात विविध विषयाचे विभाग प्रमुख व प्राध्‍यापक  प्रा. आर व्‍ही चव्‍हाण, प्रा. व्‍ही बी जाधव, डॉ मिर्झा बेग, प्रा एस व्ही कल्याणकर, प्रा पी के वाघमारे, डाॅ सी एच आंबडकर आदींनी वि‍शेष परिश्रम घेतले.

Thursday, April 12, 2018

वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त अठरा तास अभ्या‍स उपक्रम

वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या संयुक्‍त जयंती निमित्‍त अठरा तास अभ्‍यास उपक्रमाचे आयोजन दिनांक ११ एप्रिल रोजी करण्‍यात आले होते. या अभ्‍यासमालिकेचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटीलसहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखलेविभाग प्रमुख डॉ डि एन धुतराज, डॉ जी एम वाघमारे, डॉ राकेश आहिरे, डॉ. बाबासाहेब ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अठरा तास अभ्‍यासवर्गाच्‍या उपक्रमात कृषि महाविद्यालयाचे दोनशे साठ  विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला. यावेळी सुत्रसंचालन डॉ आर जी भाग्‍यवंत यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषि महाविद्यालयातील प्राध्‍यापक व कर्मचा-यांसह विद्यार्थ्‍यी प्रतिनिधी सुमित माने, पवन आळणे, राहुल शिंदे, शुभम तुरूकमाने आदींनी परिश्रम घेतले. 

Thursday, April 5, 2018

कृषि पदवीधरांनी कृषि उद्योजकतेकडे वळावे,.....जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी (जालना) श्री दशरथ तांबाळे

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात आयोजित अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या निरोप समारंभात प्रतिपादन
कृषि अभ्‍यासक्रमातील वैविध्‍यपुर्ण विषयामुळे कृ‍षीच्‍या विद्यार्थ्‍यांना स्‍पर्धापरिक्षेत यश मिळविण्‍यासाठी मदत होते, अनेक कृषि पदवीधर राज्‍यातील विविध क्षेत्रात प्रशासकीय पदावर कार्यरत आहेत. परंतु कृषि पदवीधरांनी केवळ नौकरदार होण्‍यापेक्षा रोजगार देणाऱ्या कृषि उद्योजकतेकडे वळावे, असे प्रतिपादन जालना येथील जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री दशरथ तांबाळे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांचा तृतीय सत्राच्‍या विद्यार्थ्‍याच्‍या वतीने निरोप समारंभ दिनांक 5 एप्रिल रोजी आयोजित करण्‍यात आला होता, त्‍या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील हे होते तर व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री दशरथ तांबाळे पुढे म्‍हणाले की, परभणी कृषि महाविद्यालयातील सुविधा व विद्यापीठ ग्रंथालयाचा उपयोग घेऊन अनेक विद्यार्थ्‍यी स्‍पर्धा परिक्षेत यशस्‍वी झाले, आज ते विविध क्षेत्रात प्रशासकीय पदावर कार्य करित आहेत. प्रशासकीय पदावर कार्य करतांना स्‍वत:तील कौशल्‍याचा व ज्ञानाचा वापर करण्‍यास मर्यादीत वाव आहे. परंतु कृषी उद्योजकतेसह कृषि संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात मोठा वाव आहे.
मार्गदर्शनात डॉ पी आर शिवपुजे यांनी विद्यार्थ्‍यींनी जीवनात यशस्‍वीतेसाठी कठोर परिश्रम व प्रामाणिकपणा अंगीकरण्‍याचा सल्‍ला दिला तर अध्‍यक्षीय समारोप शिक्षण संचालक डॉ विलास पाटील कृषि पदवीधरांनी शिस्‍तीचे जीवनात पालन करून वाईट सवयीपासुन दुर राहण्‍याचा सल्‍ला दिला.
कार्यक्रमाच्या प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी सन 2017-18 मध्‍ये महाविद्यालयातील राज्‍यसेवा व बॅकिंग परिक्षेत उत्तीर्ण होऊन 35 विद्यार्थ्‍यांची निवड झाल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभांगी आवटे व पंकज मुखीरवाड यांनी केले तर आभार ऐश्‍वर्या काळे हिने मानले. यावेळी आयोजित सांस्‍कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या कलागुणांचे सादरिकरण केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Tuesday, April 3, 2018

परभणी जिल्हयात बालकातील कुपोषण व वाढांक मुल्यमापनावर नऊ शास्त्रोक्त कार्यशाळा संपन्न

 परभणी जिल्‍हा मानव विकास समिती व वनामकृविच्‍या मानव विकास व अभ्‍यास विभागाचा संयुक्‍त उपक्रम

बालकातील कुपोण व संबंधी विकासात्मक दोषांच्या निर्मुलनासाठी परभणी जिल्हा मानव विकास समिती, महिला व बालविकास विभाग, परभणी जिल्हा परिद आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या मानव विकास व अभ्यास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे कर्मचारी व जिल्‍हा परिषद शाळेचे शिक्षकांसाठी बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्‍यासाठी वाढांक मुल्‍यमापनावर शास्त्रोक्त कार्यशाा मार्च महिण्‍यात जिल्‍हयात विविध ठिकाणी घेण्‍यात आल्‍या. परभणी, पुर्णा, पालम, सोनपेठ, गंगाखेड, मानवत, जिंतूर, पाथरी व सेलू या नऊ तालुक्यांच्या ठिकाणी कार्यशाळा घेण्‍यात आल्‍या. यात परभणी जिल्हयातील एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे 1260 कर्मचारी, जि.प. शाळा शिक्षक कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील 235 विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला.
मानव विकास विभागाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा गावागावात मोठया प्रमाणात प्रसार व्हावा, या उद्देशाने सदरिल कार्यशाळा आयोजनाची संकल्पना परभणी जिल्हाधिकारी मा. शिवाशंकरवनामकृविचे कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु मानव विकास शास्‍त्रज्ञा व विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम पुढाकारांनी आखण्‍यात येऊन कार्यशाळांसाठी महाराष्‍ट्र शासनाद्वारे उपलब्ध निधीतुन परभणी जिल्हा मानव विकास समितीच्या वतीने सदरिल कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळांच्या यस्वीततेसाठी परभणी जिल्हा परिचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. पृथ्वीराज बी. पी., उपमूख्य कार्यकारी अधिकारी (बा.क) श्री एस. ई. देसाई 9 तालुक्याचे सीडीपीओ यांनी विशेष प्रयत्न केले. बालकांच्‍या चांगल्‍या भविष्‍यासाठी या सारख्‍या नावीन्यपूर्ण कार्यशाळांच्‍या नियमित आयोजनाची गरजेचे असल्याचे मनोगत प्रशिक्षणार्थीनी व्यक्त केले.

कार्यशाळेत मार्गदर्शनात मानव विकास शास्‍त्रज्ञा प्रा. विशाला पटणम यांनी पुढील बाबीवर भर दिला
सदरिल प्रशिक्षणात विद्यापीठातील मानव विकास शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम यांनी प्रामुख्‍यांने नावीन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करुन प्रशिक्षण दिले. शास्त्रोक्त कार्यशाळेसाठी वातावरण निर्मिती करुन प्रशिक्षणार्थीनींना स्‍वत:ची कर्तव्‍य व कार्यावियी संवेदनशील करण्यात येऊन त्यांच्या बालकांच्‍या वाढांक मूल्यमापनाच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्‍यात आली. वाढांक मूल्यमापनावर प्रात्याक्षिक, पॉवर पईंट सादरीकरण, संबंधीत अभ्‍यास संदर्भ, मनोरंजक गोष्‍टी, उदाहरणे आदींचा अवलंब करण्यात आला तसेच संबंधीत विषयाच्‍या घडीपुस्तिका इतर साहित्याचे वाटपही करण्‍यात आले.
न स्वस्थ तर मन स्वस्थ या उक्तीनुसार मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक स्‍वस्‍थाचे महत्व पटवून देण्यात आले.
गर्भवती मातां स्वतःच्या आहार, आरोग्य, लसीकरण, मानसिक स्वास्थ्य, व्यायाम, प्रसुती दरम्यान योग्य काळजी घेतल्यास सुदृढ नवजात अर्भक जन्मास येऊ शकते. प्रौढपणी त्यांचे अपेक्षीत असलेली त्यांचे वजन (6%), उंची (30%), व डोक्याचा घेर (60%) याप्रमाणे विकसित होतो. नवजात अर्भकाचे वजन योग्‍य असेल तर जन्मानंतर सुरुवातीच्या काळात त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते यावियी कुटुंबानी जागरुक असावे, असे त्यांनी स्पष्‍ट केल.
वयाच्या 4 वर्षापर्यंत बालकाचा आहार, आरोग्य, लसीकरण आदीबाबत काळजी घेतल्यास त्यांच्या डोक्याचा घेर हा प्रौढ व्यक्तीच्या असावयाच्या डोक्याचा घेराच्या 90 टक्के होऊन पुढे 8 वर्षांपर्यंत त्यांच्या वयोपरत्वे अशीच काळजी घेतल्यास तो 98 टक्के इतका वाढतो व 8 ते 18र्ष वयापर्यंत त्याची उपरोक्त प्रमाणे काळजी घेतली गेल्यास त्यात केवळ 2 टक्के वाढ होते. यावरुन असे स्पष्‍ट होते की, गर्भावस्थेपासूनच बालकांची सर्वतोपरी काळजी घेतल्यास बालकातील कुपोण तथा त्यासंबंधीच्या विकासात्मक दोषांचे निराकरण होऊन त्यांचा उच्चतम सर्वागींण विकास घडल्यामुळे भविष्‍यात अशी बालके यस्वी व आनंदीपणे आपले जीवन व्यतीत करण्यासाठी सक्षम होतात,शी ग्वाही प्रा. विशाला पटनम यांनी दिली. बालसंगोपनाबाबत पालकांना जर स्मार्ट व्हावयाचे असेल तर उपरोक्त बाबतीत अधिक जागरुक असणे नितांत गरजेचे असल्याचे मत त्यांनी या कार्यशाळां व्यक्त केले.

Sunday, April 1, 2018

गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी शेतक-यांनी शेतातील कपाशीच्‍या प-हाटी तात्‍काळ काढाव्‍यात.....आमदार मा. डॉ राहुल पाटील

मौजे जलालपुर येथे आयोजित प्रात्‍याक्षिक कार्यक्रमात प्रतिपादन
वसंतराव नाईक  मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभाग आणि कृषि विभाग (राज्य शासन) यांच्या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 31 मार्च रोजी मौजे जलालपूर (ता. जि परभणी) येथे येत्‍या हंगामा कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी पऱ्हाटी नष्ट करण्यासाठी प्रात्यक्षिकार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन परभणीचे आमदार मा. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी. आर. शिंदे, सीड असोशियनचे डॉ. एस. डी. वानखेडे, तालूका कृषि अधिेकारी श्री. बनसवडे, जलालपूरचे सरपंच संतोबा पुंजारे, संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी, आदींची प्रमुख उपस्थिती होती. जलालपुर येथील शेतकरी अरु टेकाळे यांच्या शेतात कपाशीची श्रेडर यंत्राव्दारे पऱ्हाटीचा चुरा करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
मार्गदर्शन करतांना आमदार मा. डॉ राहुल पाटील यांनी शेतकरी बांधवानी शेतातील कपाशीच्‍या पऱ्हाटी तात्काळ काढूण टाकण्याचे आवाहन केले. तसेच नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन येत्‍या हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी आतापासूनच काळजी घेण्‍याचा सल्‍ला दिला. विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडीत करण्यासाठी कपाशी पऱ्हाटी नष्ट करण्‍याची गरजेचे असल्‍याचे नमुद केले. कृषि अधिकारी श्री. बनकर यांनी सुत्रसंचालन केले. प्रात्यक्षिक कार्यक्रमास परीसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.