Thursday, August 31, 2023

मेरी माटी मेरा देश कार्यक्रमांतर्गत वनामकृवित वृक्ष लागवड

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने दिनांक ३१ ऑगस्‍ट रोजी "मेरी माटी मेरा देश" कार्यक्रमांतर्गत पीक लागवड खर्च काढण्याची योजना कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटक म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले हे उपस्थित होते तर विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.सचिन मोरे, प्राचार्य डॉ. आर.बी.क्षीरसागर, वृक्ष लागवड अधिकारी डॉ.एच.व्ही.काळपांडे, कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एम.कलालबंडी, प्रा.पी.यु.घाटगे, डॉ.आर.व्ही.शिंदे, डॉ.एस.एन.पवार, डॉ.भाग्यरेषा गजभिये, डॉ.व्ही.एस.मनवर आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ धर्मराज गोखले यांनी प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांनी वृक्ष लागवड करून वृक्ष संगोपन करण्‍याचा सल्‍ला दिला. तर विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.सचिन मोरे यांनी मेरी माटी मेरा देश कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्‍यात येत असुन दिनांक १ सप्टेंबर पासुन ३० ऑक्टोबर दरम्‍यान अमृत कलश यात्रा निघणार आहे. यामध्ये विद्यापीठाचा अमृत कलश स्वंयसेवकासह मुंबई येथे पाठविण्यात येणार असल्‍याचे सांगितले.

युवा कल्याण व क्रिडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार "मेरी माटी मेरा देश" हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विद्यापीठ मुख्यालयातील कृषि महाविद्यालय, परभणी, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अन्नतंत्र महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, आणि सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वंयसेवक उपस्थित होते. यावेळी ७५ रोपाचे वृक्षारोपण करण्यात येऊन विद्यापीठ परिसरात अमृत बाग तयार करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.मुंढे, श्री.जिवणे, श्री.अन्वर मियॉ श्री.दिपक टाक अदिनी परिश्रम घेतले.



वनामकृवि विकसित तीन बीटी सरळ वाणांची केंद्रीय वाण निवड समितीव्‍दारे लागवडीसाठी शिफारस

कापुस पिकातील बीटी सरळ वाण विकसित करणारे राज्‍यातील ठरले पहिलेच कृषि विद्यापीठ 

शेतकरी बांधवाचा बियाण्‍यावरील खर्चात होणार बचत 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेले तीन अमेरिकन बीटी सरळ वाण व देशी कपाशीच्या एका सरळ वाणाची केंद्रीय वाण निवड समितीद्वारे लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. विद्यापीठांतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विनियंत्रीत बीटी (क्राय १ एसी जनुक) तंत्रज्ञानयुक्त वाणांची पैदास करण्याचे कार्य सुरू असुन याद्वारे निर्मीत एनएच १९०१ बीटी (NH 1901), एनएच १९०२ (NH 1902) बीटी व एनएच १९०४ (NH 1904) बीटी ही तीन अमेरीकन सरळ वाण अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्पाच्या केंद्रीय वाण निवड समितीद्वारे नवी दिल्ली येथे नुकत्‍याच झालेल्या बैठकीत मध्य भारत (महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश) विभागाकरिता प्रसारीत करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठांतर्गत परभणी स्थित कापूस संशोधन केंद्र, महेबूब बाग या केंद्राद्वारे निर्मीत देशी कापूस सरळ वाण पीए ८३३ (PA 833) हा वाण देखिल समितीद्वारे दक्षिण भारत विभागाकरिता (आंध्र प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडू) प्रसारणासाठी शिफारस करण्यात आला आहे.

कुलगुरू मा. प्रा. डॉ. इन्‍द्र मणि आणि संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी कापूस विशेषज्ञ डॉ. के.एस. बेग व वाण विकसित करण्‍याकरीता योगदान देणा-या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ विकसित कापुसाच्‍या सरळ वाणात बीटीचा अंतर्भाव केल्‍यामुळे शेतकरी बांधवाचा बियाणांवर होणारा खर्च कमी होण्‍यास मदत होणार असुन कोरडवाहू लागवडीमध्ये उत्‍पादनात सातत्‍य देणारे वाण आहेत. महाराष्‍ट्राबाहेरही गुजरात व मध्‍यप्रदेश या राज्‍यात या वाणाची लागवडीकरिता मान्‍यता दिली आहे, सरळ वाण बीटी मध्‍ये परावर्तीत करणारे परभणी कृषि विद्यापीठ राज्‍यातील पहिले कृषि विद्यापीठ ठरले आहे, ही विद्यापीठाकरिता अभिमानाची बाब आहे.

सार्वजनिक क्षेत्रामध्ये बीटी कापूस सरळ वाण प्रसारीत करणारे परभणी कृषि विद्यापीठ हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले असुन बीटी कापूस लागवडीस सुरुवात झाल्यापासून खासगी कंपनीव्‍दारे कापुसाच्‍या संकरीत वाण निर्मितीवरच भर होतो. कोणत्याही खासगी कंपनीद्वारे कापूस पीकाचे बीटी सरळ वाणाचे बियाणे लागवडीसाठी उपलब्ध करण्यात आले नाही. सरळ वाणांचे बियाणे उपलब्ध झाल्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या शेतामध्ये मागील वर्षाच्या लागवडीतून उत्पादीत कपाशीपासून सरकी वेगळी करून तीच सरकी पुढील तीन वर्षांपर्यंत बियाणे म्हणून वापरता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दरवर्षी नवीन बियाणे बाजारातून खरेदी करण्याची आवश्‍यकता पडणार नाही आणि पर्यायाने बियाण्यावरील खर्च कमी होईल. प्रस्तुत वाण हे सरळ वाण असल्यामुळे त्यांना रासायनिक खतांची गरज संकरित वाण पेक्षा कमी लागते. विद्यापीठ विकसित ही वाण रसशोषण करणार्‍या किडींना सहनशील असल्यामुळे कीड संरक्षणासाठी होणार्‍या खर्चामध्ये कपात करता येणार आहे. ही बीटी सरळ वाण कापूस उत्पादनासाठी तुल्यबळ वाणांपेक्षा सरस ठरले असून कोरडवाहू लागवडीमध्ये मध्य भारतामधील विविध केंद्रांवर या वाणांच्या उत्पादनामध्ये सातत्य आढळून आले आहे. हे वाण रसशोषक किडी, तसेच जीवाणूजन्य करपा व पानावरील ठिपके या रोगांकरिता सहनशील आढळून आले. या बीटी सरळ वाणाचा रुईचा उतारा ३५ ते ३७ टक्के असून यांचे धाग्याची लांबी मध्यम, मजबूती व तलमपणा सरस आहे. या वाणांची मध्य भारतातील महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांत लागवडीकरिता शिफारस करण्यात आली आहेत. यापैकी एनएच १९०१ बीटी या वाणाचा रुईचा उतारा ३७ टक्के असून सघन कापूस लागवडीस अनुरूप आहे.

विद्यापीठ विकसित देशी कापूस सरळ वाण पीए ८३३ (PA 833) हा अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्पाच्या केंद्रीय वाण निवड समितीद्वारे दक्षिण भारत विभागाकरिता (आंध्र प्रदेश, कर्नाटक व तमिळनाडू) प्रसारणासाठी शिफारस करण्यात आला असुन या वाणाच्या धाग्याची लांबी अधिक व मजबूती सरस आहे.

नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राचे संशोधन कार्य

यावर्षी राहुरी येथे पार पडलेल्‍या संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती २०२३ द्वारे कापूस संशोधन केंद्राद्वारे विकसीत अमेरिकन बिगर बीटी सरळ वाण एनएच ६७७ (NH-677) हा महाराष्ट्र राज्यामध्ये लागवडीसाठी प्रसारीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा वाण रसशोषण करणार्‍या कीडीस सहनशील असून याच्या रुईचा उतारा ३६-३७ टक्के आहे. हा वाण सेंद्रीय लागवडीस उपयुक्त आहे.

नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विकसीत एनएचएच २५० व एनएचएच ७१५ या अमेरिकन संकरीत वाणांचे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला (महाबीज) यांच्या सहकार्याने बोलगार्ड २ स्वरूपात रूपांतरीत करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन कपाशीचे विनियंत्रीत बीटी (क्राय १ एसी व क्राय २ एबी जनुक) तंत्रज्ञानयुक्त स्वरूपातील सरळ आणि संकरीत वाणांची पैदास करण्याचे कार्य चालू असून मोठ्या आकाराची बोंडे, सघन लागवडीस उपयुक्त आणि कमी कालावधीचे वाण कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे विकसीत करण्यात येत आहेत.


एनएच १९०२ बीटी


एन एच १९०४ बीटी


एन एच १९०१ बीटी


पी ए ८३३ 


  एन एच ६७७

Wednesday, August 30, 2023

वनामकृवित राष्‍ट्रीय क्रीडा दिनानिमित्‍त आंतर महाविद्यालयी बास्‍केटबॉल स्‍पर्धा संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दिनांक २९ ऑगस्ट रोजी आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल मुलांच्या स्पर्धेचे आयोजन क्रीडा संकुल मैदानावर करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. डी. एन. गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शनात डॉ डी एन गोखले म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यांनी एकतरी मैदानी खेळ जोपासला पाहिजे, नियमितपणे खेळातील सहभागामुळे आरोग्‍य सुदृध्‍ढ राहण्‍यास मदत होते.

कार्यक्रमात खेळाडु, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी यांना फीट इंडिया ची शपथ देण्यात आली. बास्‍केटबॉल स्पर्धेत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विविध शासकीय व निमशासकीय महाविद्यलयांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येक महाविद्यालयातील खेळाडुंनी उत्तम खेळ दाखवला. बास्केटबॉल मुले स्पर्धेत परभणी कृषि महाविद्यालयाचा संघ विजेता तर कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी चा संघ उपविजेता राहीले. विजेता संघास विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे यांच्या हस्ते विजयी चषकाचे प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे सुत्रसंचलन प्रा. एस.यु. चव्हाण यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पंच, निवड समिती सदस्य व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.



Tuesday, August 29, 2023

मौजे मटक-हाळा येथे शिवार भेटीतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वनामकृवि व रिलायन्स फाउंडेशन चा संयुक्‍त उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि रिलायंस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी तालुक्यातील मौजे मटक­हाळा येथे दिनांक २३ ऑगस्ट रोजी खरीप हंगामातील किड व रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन पिकांवरील कीड व रोगांचे निरीक्षण करून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी सोयाबीन पिकावर लोहाच्या कमतरतेमुळे पिवळे होणारे पाने आणि मोझॅकमुळे पिवळे होणारे पाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्याच्या व्‍यवस्‍थापनाविषयी माहिती दिली. डॉ. मांडगे यांनी सोयाबीन पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मटक­हाळा येथील ३७ शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रिलायंस फाऊंडेशनचे मनोज काळे व रामा राऊत यांनी परीश्रम घेतले.

Monday, August 28, 2023

शेतकरी बांधवांनी यांत्रिकीकरणाकडे वळावे …. कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि

तुळजापुर कृषि विज्ञान केंद्रात कृषि यांत्रिकीकरणावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

आजच्या काळात कमी-कमी होत चाललेले शेतीचे क्षेत्रफळ, मजुरांची कमतरता आणि वाढता मजुरीचा खर्च पाहता शेतक-यांनी आधुनिक यांत्रिकीकरणाकडे वळावे. शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातुन एकत्रित येऊन अवजार बॅकांची स्‍थापना करावी, असा सल्‍ला कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रात दिनांक २८ ऑगस्‍ट ते ३० ऑगस्‍ट दरम्‍यान वनामकृवि आणि सीएनएच इंडस्ट्रियल इंडिया, नवी दिल्‍ली यांच्‍या व्‍यावसायिक सामाजिक जबाबदारीच्‍या माध्‍यमातुन कौशल्‍य विकास – कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, या प्रशिक्षणाचे उदघाटनाप्रसंगी ऑनलाईन माध्‍यमातुन अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्‍हणुन विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर यांची उपस्थिती होती तर व्‍यासपीठावर  उस्‍मानाबाद कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. कमलाकर कांबळे, कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक इंजि. सचिन सूर्यवंशी, सीएनएच इंडीया कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक धनराज जाधव, लातुन कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सचिन शिंदे, तुळजापुर कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक प्रा. वर्षा मरवाळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होते.

कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि पुढे म्हणाले की, शेतकरी बांधवांनी स्‍वत: कडे असलेलया ट्रॅक्टर व तत्सम कृषि औजारांची वेळोवेळी निगा राखणे अत्यंत महत्वाचे असून त्‍यांचा कार्यक्षम वापर करावा. येणा-या काळाची शेती ही आधिुनिक औजारांमुळेच शेती असुन ड्रोन व रोबोट्स तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे.

संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवसरकर म्हणाले की, सद्या मराठवाडयात सोयाबीनचा पेरा वाढलेला असून यामध्ये बीबीएफचा वापर केल्यास सोयाबीन उत्पादनामध्ये १५ ते २० टक्के वाढ शक्य आहे. परंतू शेतक-यांना पेरणीच्या दरम्यान बीबीएफ उपलब्ध होत नाहीत. त्याकरीता गावपातळीवर शेतक-यांनी औजार बॅंकेची संकल्पना राबवावी. भारतात पहिली क्रांती संकरीत वाणांची, दुसरी कांती कमी उंचीच्या विविध पिकांची झालेली आहे तर तिसरी क्रांती आता यांत्रिकीकरणामुळे होणार आहे. पिकांची फेरपालट, वाणाच्या काल मर्यादेनुसार जमिनीची निवड, एकात्मिक कीड नियंत्रण आणि यांत्रिकीकरण अशी उत्तम शेतीची चर्तुसुत्री त्‍यांनी सांगितली.

मार्गदर्शनात प्रा. सचिन सूर्यवंशी म्हणाले की, शेतीच्या विभागणीमुळे आजचा शेतकरी हा अल्पभुधारक, अत्यल्पभूधारक होत चालला असून त्याला आधुनिक महागडी शेती औजारे परवडणे शक्य नाही, त्यामुळे गावकुशीतील जास्तीत जास्त शेतक-यांनी एकत्र येऊन गावपातळीवर औजारे बॅंक सुरू करणे अत्यंत महत्वाचे आहे. ज्यामुळे ना नफा ना तोटा या तत्वावर शेतक-यांनी शेती औजारे वापरायला मिळतील. तर  सहयोगी अधिष्ठाता डॉ. कमलाकर कांबळे म्हणाले की, उस्मानाबाद लातूर ही जिल्हे सद्य यांत्रिक शेतीमध्ये सर्वात पुढे असून जिल्हयातील ऊसतोड व इतर मशागतीची कामे विविध कृषि औजारांमुळे वेळेवर होत आहेत. तसेच येत्या काही दिवसात शेतीमध्ये रोबोटचा वापर शक्य आहे.

प्रशिक्षणाच्या सत्रात लातूर कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सचिन शिंदे यांनी ड्रोनची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. सीएनएच इंडीया चे श्री. धनराज जाधव यांनी कंपनीच्या विविध शेती व तत्सम औजारांचे प्रात्यक्षिक व माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वर्षा मरवाळीकर यांनी केले. सुत्रसंचालन श्रीमती अपेक्षा कसबे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. भगवान आरबाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. विजय जाधव, डॉ. दर्शना भुजबळ, डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, डॉ. नकुल हरवाडीकर, श्री. सखाराम मस्के, श्री. शिवराज रूपनर, श्री. मोरेश्वर राठोड व श्री. पंकज क्षिरसागर आदिनी परिश्रम घेतले. 

वनामकृवि, परभणी आणि सी.एन.एच.  इंडस्ट्रीयल इंडिया (न्यू हॉलंड), नवी दिल्ली यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने संपुर्ण मराठवाडयात “उन्नत कौशल्य – कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण” कार्यक्रम राबविण्‍यात येत असुन कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी, कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद, खामगाव, बदनापूर, तुळजापूर यांच्यामार्फत एक वर्षामध्ये प्रत्येकी  तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहेत.



Sunday, August 27, 2023

विद्यापीठाच्‍या दालनास माननीय मुख्‍यमंत्री आणि माननीय उपमुख्‍यमंत्री यांची भेट

वनामकृविच्‍या कृषि दालनास शेतकरी बांधवाचा मोठा प्रतिसाद

महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्‍यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्‍यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार, यांच्‍या प्रमुख उपस्थित शासन आपल्‍या दारी हा जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने दिनांक २७ ऑगस्‍ट रोजी विशेष कार्यक्रम राबविण्‍यात आला. कार्यक्रमास परभणी जिल्‍हयातील विविध शासकीय योजनेचे लाभार्थी शेतकरी, युवक, विद्यार्थी, ग्रामीण महिला हजारोच्‍या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आणि विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ तंत्रज्ञानावर आ‍धारीत विशेष दालन लावण्‍यात आले होते. विद्यापीठातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या बैलचलित कृ‍षी अवजारांची माननीय मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पाहणी केली, यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी विद्यापीठ तंत्रज्ञानाबाबत माहिती देऊन ड्रोन व आधुनिक तंत्रज्ञान विकास व प्रसारावर विद्यापीठाचा भर असल्‍याचे सांगितले. कृषि अभियंत्‍या डॉ स्मिता सोळंकी यांनी बैलचलित कृ‍षी अवजारांची माहिती दिली.

कृषि दालनात विद्यापीठ विकसित विविध पिकांचे वाणाचे पिक नमुने, ड्रोन्‍स, स्‍वयंचलित अवजारे, बैलचलित व ट्रक्‍टर चलित अवजारे, रेशीम उद्योग, आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा समावेश होता. कार्यक्रमानिमित्‍त आलेल्‍या शेतकरी बांधव आणि महिला शेतकरी यांनी विद्यापीठाच्‍या दालनास भेटी देऊन माहिती घेतली, यावेळी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.  कार्यक्रमात विविध लाभार्थींचा सत्‍कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला तसेच माननीय कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्‍या ही हस्‍ते उल्‍लेखनिय कार्य केलेल्‍या सरपंच आणि पोलिस अधिकारी यांचा सत्‍कार करण्‍यात आला. 





Tuesday, August 22, 2023

मौजे आडगांव येथे पशुधन व्‍यवस्‍थापन शिबिर संपन्‍न, ४०० जनावरांचे करण्‍यात आले लसीकरण

लम्पीग्रस्त जनावरांचे लसीकरण व विलगीकरण महत्वाचे  …….. पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश सावणे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने  कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती (RIFS)” या योजनेअंतर्गत दिनांक १८ ऑगस्‍ट रोजी मौजे आडगाव (ता. पालम जि. परभणी) येथे "पशुधन व्यवस्थापन : लम्पी जागृती व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री बालासाहेब ढोले, हे होते तर तांत्रिक मार्गदर्शक म्हणून पशुधन विकास अधिकारी (वि.) डॉ. प्रकाश सावणे, अ.भा.स. कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. आनंद गोरे, डॉ. शिवाली पाटील, डॉ. अनिल डांगे, उपसरपंच श्री. रमाकांत पौडशेट्टे, श्री. उमाकांतराव ब्याळे, पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी व गावातील शेतकरी उपस्थित होते.

मार्गदर्शनात डॉ. प्रकाश सावणे म्‍हणाले की, सद्यस्थितीत लम्पी रोगाचा वाढता प्रभाव पाहता पशुपालकांनी त्यांच्याकडील जनावरांचे लम्पी लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पी रोगाकरीता जनावरांना मोफत व प्रगतीपथावर लसीकरण करण्यात येत आहे. लम्पीग्रस्त जनावरांचे विलगीकरणही तेवढेच महत्वाचे आहे कारण लम्पी हा रोग संसर्गजन्य असुन हा रोग वेगाने पसरण्याची शक्यता अधिक वाढते. लस पुर्णपणे शरीरात भिनन्याकरीता २१ दिवसाचा काळ लागतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी वेळेत लसिकरण करणे आवश्यक आहे.

डॉ. आनंद गोरे यांनी पावसाच्या खंडकाळामध्ये पिकांसाठी घ्यावयाची काळजी यावर माहीती देतांना पोटॅशियम नायट्रेट १०० ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्‍याचा सल्‍ला दिला तसेच उपलब्धतेनुसार आच्छादनाचा वापर करावा व कापूस व तुरीमध्ये ते ओळीनंतर आणि सोयाबीनमध्ये प्रत्येकी ओळीनंतर आंतरमशागतेची कामे झाल्यानंतर बळीराम नांगराच्या सहाय्याने जलसंधारण सरी पाडून घ्याव्यात असे सांगितले.

शिबीरा दरम्यान पशुसंवर्धन विभागाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहीती उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमाअंतर्गत ४०० जनावरांचे लसिकरण करण्यात आले व १४ लम्पीग्रस्त जनावरांवर प्रतिजैविके व रोगप्रतिकारात्मक शक्ती वाढविणाऱ्या लसी देवून उपचार करण्यात आले. याप्रसंगी लसीकरण कार्यक्रमास व तांत्रिक चर्चासत्रास मोठ्या संख्येने शेतकरी व पशुपालक उपस्थित होते. शिबिराचे आयोजन संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर व अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. आनंद गोरे, श्री. मोहन गवळी, श्री. सुमित सुर्यवंशी व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


Friday, August 18, 2023

मौजे मंगरूळ येथे वृक्षारोपण कार्यक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत मानवत तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी स्‍वांतत्र्य दिनांचे औजित्‍य साधुन वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्‍यात आला. कृषिकन्‍या वैष्‍णवी मेसे व राणी खुळे यांनी जिल्‍हा परिषद शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांना वृक्षारोपण आणि कृषि शिक्षण यावर मार्गदर्शन केले. तसेच वृक्ष संवर्धन व संगोपन यावर मार्गदर्शन करण्‍यात आले. सरपंच जमीर पठाण, ग्रामसेवक, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मंडळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्‍यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, रावे समन्वयक डॉ राजेश कदम, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, कार्यक्रम अधिकारी डॉ. जयकुमार देशमुख यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले.

Thursday, August 17, 2023

कपाशीमध्ये दिसताच डोमकळी : कामगंध सापळे लावून करा नियंत्रीत गुलाबी बोंडअळी.....!

वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला 

मराठवाडा विभागातील काही शेतकऱ्यांच्या वेळेवर लागवड झालेल्या कपाशीला फुले, बोंडे लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले, बोंडे यावर अंडी घालतात, तसेच यावर्षी कपाशी पिकाची लागवड एकाच वेळी न होता टप्याटप्याने झालेली आहे, त्यामुळे किडीला सतत खाद्य उपलब्ध होत असल्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणून कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे जेणेकरून होणारा प्रादुर्भाव आतापासूनच निरीक्षणाद्वारे कमी करता येईल आणि पुढे होणारे नुकसान कमी करता येईल.

उपाय योजना

कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या आतील अळीसह तोडून जमा करून जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्‍टरी ५ या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या एक ते दीड फूट उंच लावावीत़. मोठ्या प्रमाणात पतंग जमा करून नष्ट करण्यासाठी एका एकर क्षेत्रामध्ये गुलाबी बोंडअळीचे ८ ते १० कामगंध सापळे लावावेत. ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशी ने परोपजीवीग्रस्त झालेले ट्रायकोकार्ड प्रति एकरी २- ( ६०,००० अंडी) या प्रमाणात पीक ६० दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावावे. ट्रायकोकार्ड शेतामध्ये लावल्यानंतर कमीत कमी १० दिवसापर्यंत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी  टाळावी. 

कपाशीचे शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान २५ पक्षी थांबे लावावेत, म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळया खाऊन नष्ट करतील. ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम ५०० मिली किंवा बिव्हेरिया बॅसियाना या  बुरशीयुक्त जैविक कीटकनाशकाची जमिनीत ओल व हवेत आर्द्रता असताना ८०० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणात फवारणी करावी.

कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा १ अळी प्रति १० फुले किंवा १० बोंडे किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या किंवा बोंडे दिसून आल्यास पुढील पैकी एका रासायनिक कीटकनाशकांची ची फवारणी करावी.

प्रोफेनोफॉस ५० टक्के ४०० मिली प्रती एकर किंवा इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के ८८ ग्रॅम प्रती एकर किंवा प्रोफेनोफोस ४० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ४ टक्के (पूर्व मिश्रित कीटकनाशक) ४०० मिली प्रती एकर आलटून पालटून फवारावे. या कीटकनाशकासोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते, सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये. लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये, असा सल्‍ला डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे यांनी दिला. अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या कृषी वाहिनी दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२ २२९००० वर संपर्क साधवा.



संदर्भ : वनामकृवि संदेश क्रमांक- ०४/२०२३ (१७ ऑगस्ट २०२३)