Saturday, March 28, 2020

कृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय

विशाल सरवदे
महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 2020 सामा‍ईक प्रवेश परिक्षेत कृषी शाखेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे हा राज्‍यात प्रथम आला असुन केशव सुर्यवंशी हा व्दितीय क्रमांकाने उत्‍तीर्ण झाला आहेतसेच महाविद्यालयाचा शिवसंदिप रणखांब आठवा क्रमांकाने तर ऋ‍तुजा पाटील तेराव्‍या, दिनेश कांबळे पंधरा तर मदन जमदाडे सोळाव्‍या क्रमांकाने उर्त्‍तीण झाले आहेत. परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी राज्‍यात प्रथम येण्‍याचे हे तिसरे वर्ष आहे. सदरिल परिक्षेसाठी महाविद्यालयातील शिक्षण विभाग व प्राध्‍यापकवृंदाच्‍या वतीने विद्यार्थ्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्‍यात येऊन सराव परिक्षा घेण्‍यात येते. यशाबाबत कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी अभिनंदन केले सदरिल परिक्षा राज्‍यातील चारही कृ‍षि विद्यापीठातील साडेसात हजार पेक्षा जास्‍त विद्यार्थ्‍यांनी दिली.    
केशव सुर्यवंशी

Friday, March 27, 2020

Thursday, March 19, 2020

मौजे वर्णा येथे शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावरील गव्हावरील रोगाची कृषि तज्ञांकडून पाहणी

परभणी परिसरात पहिल्‍यांदाच गव्‍हाच्‍या ओंबीवरील बुरशीजन्‍य करपा रोगाची शक्‍यता, तज्ञाचे मत
परभणी जिल्‍हयातील जिंतूर तालुक्‍यातील मौजे वर्णा येथे शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावरील गहु पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्‍याचे शेतक-यांनी रोगग्रस्‍त पिकांचे अवशेष वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कृषि शास्‍त्रज्ञांना दाखविले. कृषि तज्ञांचे पथकानी दिनांक 19 मार्च रोजी सदरिल पिकांची पाहणी केली. या पथकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. डि. बी. देवसरकर, वनस्पती रोगशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. के. टी. आपेट, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, वनस्‍पती रोग शास्‍त्रज्ञ डॉ. एम. एस. दडके आदीसह देशपातळीवरील कर्नाल (हरियाणा) येथील गहू संशोधन संचालनालयाचे डॉ. विकास गुप्ता, गहू पैदासकार डॉ. रविंद्र कुमार, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र, गहू पैदासकार डॉ. एस. एस. दोडके, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. भानुदास गमे, जिंतूर तालुका कृषी अधिकारी श्री. एस पी.काळे आदीचा समावेश होता.
या तज्ञ चमुने संयुक्तपणे गहू प्रक्षेत्राला भेट देऊन पाहणी केली असता गहु पिकांच्‍या जीडब्ल्यू-४९६, एमएसीएस-६२६५एमएसीएस-२४९६ व जीके-७७७७ या वाणांची पेरणी केलेली होती. या सर्वच क्षेत्रांवर तपकिरी तांबेरा, मावा, खोडकीड आणि ओंबी वरील बुरशीजन्य करपा आढळून आला. यातील ओंबीवरील बुरशीजन्य करपा हा परभणी परिसरात पहिल्यांदाच आढळून आल्याचे तज्ञांचे मत असुन डॉ. देवसरकर व डॉ. रविंद्र कुमार यांनी असे सांगितले की सकृतदर्शनी जरी ओंबी वरील करपा रोग दिसत असला तरी नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्याचे निदान निश्चित होईल. डॉ.आपेट, डॉ.दडके व डॉ.गमे यांच्या मतानुसार तांबेरा, मावा, खोडकिडा व ओंबीवरील करपा यांचा संयुक्त परीणाम म्हणून ओंब्या वरून खाली वाळत गेलेल्या आहेत. तसेच पानातील हरीतद्रव्य कमी झाल्यामुळे असा परिणाम झाल्याचे दिसून येते. सर्व तज्ञांचे यावर एकमत झाले.
यावेळी डॉ. यु.एन. आळसे व श्री. एस.पी.काळे यांनी खबरदारीच्या उपाय योजना म्हणून गव्हाची काढणी झाल्यानंतर गव्हाचे काड जमा करून खड्यात टाकावे किंवा या वर्षासाठी जाळून बुरशीचे अवशेष नष्ट करावेत व जमिनीची खोल नांगरट करावी. पुढील हंगामात घरचे बियाणे वापरू नये तसेच पिकांची फेरपालट करावी असा सल्ला शेतकऱ्यांना दिला.
यावेळी कृषी मित्र दिलीप अंभोरे, प्रदिप अंभोरे तसेच शेतकरी माणिक, विलास, शंकर, विजय दिगंबर, माधवराव, दत्ता, बालाजी (सर्व अंभोरे), राजेश्वर खोकले, ज्ञानेश्वर ढवळे आदींनी संपूर्ण गव्हाचे क्षेत्र फिरुन तज्ञांना माहिती दिली व सहकार्य केले.

Tuesday, March 17, 2020

वनामकृवित आयोजित डिजिटल शेती आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळेस विद्यार्थ्‍यांचा उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील प्रगत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत आयोजित तीन दिवसीय आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 13 ते 15 मार्च दरम्‍यान करण्‍यात आले होते, कार्यशाळेचा समारोप दिनांक 15 मार्च रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या अध्‍यक्षस्‍थानी पार पडला. व्‍यासपीठावर सिंगापुर येथील जागतिक विद्यापीठाचे प्रा डॉ दिपक वाईकर, सुरत येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ अजय देशमुख, पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागाचे प्रा डॉ सुरेश ओहोळ, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ उद्य खोडके, प्रकल्‍प प्रमुख डॉ गोपाल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी कार्यशाळेत विद्यार्थ्‍याकडुन मिळालेल्‍या प्रतिसादाचे कौतुक करून विद्यार्थ्‍यांनी, संशोधकांनी तसेच प्राध्‍यापकांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा मराठवाडयातील शेतक-यांना अधिकाधिक लाभ होण्‍याकरिता संशोधन करण्‍याचे आवाहन केले.

प्रास्‍ताविकात प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ गोपाळ शिंदे यांनी कार्यशाळेत यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्रासह डिजिटल तंत्रज्ञान, स्‍मार्टफोन, कृत्रिम बुध्‍दीमत्‍ता, कॅडकॅम तंत्रज्ञान आदी विषयावर प्रात्‍याक्षिकासह विविध क्षेत्रातील तज्ञांनी माहिती दिल्‍याचे सांगितले.  यावेळी कार्यशाळात सहभागी विद्यार्थ्‍यी प्रतिनिधी निल्‍सा, आशुतोष पाटील, भक्‍ती देशमुख, आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त करून या सारखे प्रशिक्षण वर्गाचे वारंवार आयोजन करण्‍यात यावे अशी विनंती केली.

कार्यशाळेत इचलकरंजी येथील न्‍युजेनीक्‍स इन्फोटीक्‍सचे आदित्‍य मराठे, पुणे येथील नेल इन्‍फोटेकचे शितल जाधव, पुणे येथील अॅसअॅप अॅग्रीटेकचे अजित खरजुले यांनी प्रशिक्षणार्थ्‍यींना रोबोटीक्‍स, मानवाशी संवाद साधणा-या चॅटबॉटचे व पिकावर फवारणी करणा-या ड्रोनचे प्रात्‍यक्षिक दाखवले तसेच डिजिटल यंत्र निर्मिती करणारे संभाजी शिराळे, सलीम पठाण, कुशल ग्रामीण उद्योजकांनी सोलार फवारणी यंत्र, झाडावरील फळे तोडणारा रोबोट व पवनचक्‍की व्‍दारे उर्जा निर्मितीचे प्रात्‍यक्षिक दाखविण्‍यात आले.

कार्यशाळा यशस्‍वीतेकरिता डॉ भगवान आसेवार, डॉ राजेश कदम, डॉ गोदावरी पवार, प्रा संजय पवार, डॉ प्रविण वैद्य, प्रा दत्‍तात्रय पाटील, प्रा भारत आगरकर, डॉ शाम गरूड, डॉ विनोद शिंदे आदीसह प्रकल्‍पातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ वीणा भालेराव तर आभार डॉ कैलास डाखोरे यांनी मानले. कार्यशाळेत विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीचे  विद्यार्थ्‍यांनी व प्राध्‍यापकांनी सहभाग नोंदविला. 




Sunday, March 15, 2020

वनामकृवित देशी देवणी गोवंश संवर्धन कार्यशाळेचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील संकरीत गो पैदास प्रकल्पाच्‍या वतीने देशी गोवंशाचे संवर्धन कार्यशाळेचे आयोजन मंगळवार दि. १७ मार्च रोजी  सकाळी १०.०० वाजता करण्यात आलेले असुन कार्यशाळेस कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, देवणी जतन व पैदासकार संस्‍थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर बोरगावकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरील कार्यशाळेत देवणी गोवंश संवर्धनाबाबत विविध विषयावर चर्चा करण्यात येणार असुन संबधीत विषयातील विषयतज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तरी कार्यशाळेचा पशुपालकांनी लाभ घेण्‍याचे आवाहन संकरीत गो पैदास प्रकल्पाचे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनेशसिंह चौहान यांनी केले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील संकरीत गो पैदास प्रकल्पाच्‍या वतीने संकरीत होलदेव आणि देशी देवणी गोवंशाचे संगोपण, संवर्धन आणि संशोधन केल्या जाते. पशुपालकामध्ये मराठवाडयातील देशी गोवंशाचे संवर्धनाबाबत जागरुकता निर्माण व्हावी या उददेशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते.  मराठवाडयातील देवणी गोवंश हा व्दिउददेशीय असुन या जातीचे संगोपन दुग्धोत्पादन तसेच शेतीकामासाठी गो-हे तयार करण्यासाठी केल्या जाते.  मराठवाडयातील उत्तम दुग्धोत्पादनक्षमता असलेली, वातावरणाशी समरस झालेली ही देशी गोवंशाची जात असुन अनिर्बंध पैदास तसेच उत्तम वळुची अनुउपलब्धतता यामुळे भविष्यात ही जात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मराठवाडयातील शेतीची एकंदरीत परिस्थिती पाहता ओढकामासाठी पशुधनाचा वापर केल्या जातो, तसेच देशी गोवंशाचे सेंद्रीय शेतीतील महत्व अनन्यसाधारण आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पावर ११८ देवणी गोवंशाचे पशुधन असुन देवणी गोंवशाचा होणारा -हास थांबवण्याचे दृष्टीने या प्रकल्पात जातीवंत देवणी गोवंशाचे संवर्धन व उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने मागील वीस वर्षापासुन प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग या कार्यशाळेचे आयोजन प्रकल्‍पाच्‍या प्रक्षेत्रावर करण्यात आलेले आहे.

Saturday, March 14, 2020

सन २०२२ मध्‍ये वनामकृविचे नविन कापूस संकरित वाण बी टी स्वरुपात उपलब्ध होणार

वनामकृवि व महाबीज मध्‍ये सामंजस्‍य करार 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ने प्रसारित केलेले कपाशीचे एनएचएच २५० व एनएचएच ७१५ हे दोन संकरित वाण बीजी २ स्वरुपात संस्करीत होणार आहेत. या बाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (वनामकृवि) व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला (महाबीज) यांचे दरम्यान सामंजस्य करार दि. ११ मार्च रोजी अकोला येथे पार पडला. या करारावर वनामकृवि चे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर व महाबीजचे महाव्यवस्थापक गुणनियंत्रण डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी स्वाक्षरी केली. यावेळी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण, महाबीजचे व्यवस्थापकीये संचालक श्री अनिल भंडारी, अकोला कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खर्चे, कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, महाबीजचे महाव्यवस्थापक उत्पादन श्री पांडुरंग फुंडकर, श्री खिस्ते, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. दिनेश पाटील, डॉ. शिवाजी तेलंग, प्रा. अरुण गायकवाड आदींची उपस्थिती होती.
मागील हंगामामध्ये वनामकृवि व महाबीज यांच्या सामंजस्य करारातून तयार झालेला एनएचएच ४४ हा बीटी वाण शेतकऱ्यांना महाबीजद्वारे मराठवाड्यामध्ये वितरीत करण्यात आला. या वाणास शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून या वाणाने शेतकऱ्यांना चांगले उत्पादन दिले आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या अन्य भागातून एनएचएच ४४ बीटी या वाणाची उपलब्धता करण्यासाठी महाबीजकडे मागणी वाढत आहे. तसेच विद्यापीठ विकसित अधिक उत्‍पादन देणा-या नविन बीटी वाणांची मागणी होत आहे. या पाश्वभूमीवर विद्यापीठाचे अधिक उत्‍पादन क्षमता असणारे नविन वाणांचे जनुकीय तंत्रज्ञान युक्त (बोलगार्ड २) स्वरुपात संस्करण महाबीजद्वारे करण्यात येणार आहे.
वरील दोन्ही वाण रसशोषण करणाऱ्या किडींना सहनशील आहेत. एनएचएच २५० हा वाण मध्य भारतातील महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व ओरिसा या राज्यांमध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला असून एनएचएच ७१५ हा वाण मध्य भारत व दक्षिण भारतातील (कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना व तमिळनाडू) राज्यांमध्ये लागवडीसाठी सन २०१८ मध्ये प्रसारीत करण्यात आला आहे. हे दोन्ही वाण उत्पादन व धाग्याची गुणधर्म या दोन्ही बाबतीत राष्ट्रीय स्तरावरील संशोधनात सरस आढळून आले आहेत. या वाणांचे बोलगार्ड २ स्वरूपातील बियाणे २०२२ हंगामातील शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकेल असे यावेळी सांगण्यात आले.

Friday, March 13, 2020

जागतिक शेतीची वाटचाल काटेकोर शेती कडुन डिजिटल शेतीकडे .....मलेशिया येथील शास्‍त्रज्ञ डॉ सिवा बालसुंदरम

वनामकृवित डिजिटल शेतीवर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन
सद्या जागतिकस्तरावर काटेकोर शेती प्रचलित होत असुन हीच शेती आता डिजिटल शेतीकडे वाटचाल करित आहे. भारतातील बहुसंख्य शेतकरी अल्पभुधारक असुन हे डिजिटल तंत्रज्ञान त्‍यांना आर्थिकदृष्टया किफायतीशीर असले पाहिजे, असे प्रतिपादन मलेशिया येथील पुत्रा विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ सिवा बालसुंदरम यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील प्रगत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांच्‍या वतीने दिनांक 13 ते 15 मार्च दरम्‍यान तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले असुन या कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी (दिनांक 13 मार्च रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन अमेरिकेच्या राष्ट्रीय आंतरीक्ष संस्थेचे अंतरीक्ष राजदूत श्री अविनाश शिरोडे होते, व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, खरगपुर येथील आयआयटीचे प्रा आर माचावरम, प्रा ए के देब, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ सिवा बालसुंदरम पुढे म्‍हणाले की, एका बाजुस वाढती लोकसंख्‍या असुन दुस-या बाजुस जागतिक हवामान बदलाचा शेतीवर परिणाम होत आहे. पंरतु संगणकीय क्षमता प्रचंड वाढत असुन प्रत्‍येकाच्‍या हातात मोबाईलच्‍या माध्‍यमातुन एक शक्‍तीशाली यंत्र आले आहे. डिजिटल शेतीत या स्‍मार्टफोनचा मोठा उपयोग होणार आहे. सद्यस्थितीत विदेशात शेतीत डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्‍दीमत्‍ता, रोबोट, ड्रोन, स्‍वयंचलित यंत्र याचा वापर होत आहे. आज तरूण शेतीपासुन दुर जात आहेत, परंतु डिजिटल शेतीमध्ये तरूणांना आकर्षीत करण्‍याची ताकत आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

श्री अविनाश शिरोडे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, आजच्‍या जागतिक हवामान बदल व कमी होत जाणारी साधनसंपत्‍ती पाहाता, भविष्‍यात मानव अंतरीक्षात वस्‍तीकरण्‍यासाठी स्‍थंलातरित होईल, याकरिता लवकरच नासा चंद्रावर वस्‍तीकरण्‍यासाठी अभियान राबविणार असुन अंतरिक्षात शेती ही संकल्‍पनाही राबविणार आहे. अंतरिक्ष शेतीबाबत ही कृषि विद्यापीठास संशोधनास वाव आहे.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, शेतीतील मनुष्‍यांचे कष्‍ट कमी करण्‍यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होणार आहे. डिजिटल शेती संकल्‍पनेस चालना देण्‍याकरिता जागतिक बॅक व भारतीय कृषि संशोधन परिषदेने परभणी कृषि विद्यापीठास सेंटर ऑफ एक्सेलन्स प्रशिक्षण प्रकल्पास मान्‍यता दिली, यात विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, विद्यार्थ्‍यी यांना देश व विदेशातील डि‍जिटल तंत्रज्ञान समजुन घेण्‍यास मोठी मदत होऊन डिजिटल शेती संशोधनास मोठी चालना मिळेल. आजही मोठी लोकसंख्‍या अन्‍नावाचुन भुकेली आहे तर दुस-या बाजुस मोठया प्रमाणात शेतमालाची नासाडी होत आहे. या शेतमालाचे मुल्‍यवर्धन करणे, शेतमाल प्रक्रिया यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यास मोठा वाव आहे. डिजिटल तंत्रज्ञानामाध्‍यमातुन शेतीनिविष्‍ठाचा कार्यक्षम वापर व उत्‍पादन खर्च कमी करणे शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य शास्त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ वीणा भालेराव यांनी केले  तर आभार प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी मानले. सदरिल तीन दिवसीय कार्यशाळेत शेतीतील उपयुक्त ठरू शकणारे कृत्रिम बुध्दीमत्त, डिजिटल साधनेयंत्रमानवड्रोनव्दारे फवारणी आदीं विषयावर विविध मान्यवर मार्गदर्शन करणार असुन यामुळे डिजिटल शेती संशोधनास चालना मिळणार आहे. कार्यशाळेचे उदघाटन डिजिटल पध्दतीने दिप प्रज्वलन करण्यात आले तर मान्यवरांच्या हस्ते प्रकल्पाच्या पोर्टलचे विमोचन करण्यात आले. कार्यशाळेत विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, पदव्युत्तर विद्यार्थ्यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. मो

नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेने मान्यता प्राप्‍त व जागतिक बॅक अर्थसहाय्यीत 'कृषि उत्पादकता वाढीकरिता यंत्रमानवड्रोन व स्वयंचलित यंत्राव्दारे डिजिटल शेती' यावरील सेंटर ऑफ एक्सेलन्स प्रशिक्षण प्रकल्प परभणी कृषि विद्यापीठास सन 2022 पर्यंत मंजुर झाला असुन पुढील दोन वर्षात यंत्रमानवड्रोन व स्वयंचलीत यंत्र सारखी डिजीटल साधनांचा समावेश असणा-या विविध संशोधन प्रयोगशाळा निर्माण करून विद्यार्थ्यी व संशोधक प्राध्यापकांना प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात येणार आहेया केंद्राव्दारे कौशल्य प्राप्त प्रशिक्षणार्थी डिजिटल शेतीचे तंत्र शेतक-यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहेतयात डिजिटल शेतीच्या तंत्रज्ञानात्मक देवाणघेवाण करिता जगातील अग्रगण्य विद्यापीठाशी सामंजस्य करार केला असुन यात अमेरिकेतील वॉशिग्टन स्टेट युनिव्हर्सिटी तसेच स्पेनयुक्रेन व बेलारूस येथील विद्यापीठांचा समावेश आहेतसेच पवई व खरगपुर येथील आयआयटी संस्थेचे नॉलेज सेंटर म्हणुन सहकार्य लाभणार आहेप्रकल्पास अठरा कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहेयात पन्नास टक्के वाटा जागतिक बॅक व पन्नास टक्के वाटा भारत सरकार कडुन भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या माध्यमातुन प्राप्त होणार आहे. प्रकल्पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे असुन या प्रकल्‍पाचे चार उप घटक आहेत, याचे डॉ उदय खोडके, डॉ राजेश कदम, डॉ संजय पवार, डॉ भगवान आसेवार हे प्रमुख आहेत. तसेच विद्यापीठ शास्त्रज्ञांची २१ सदस्यीय कोर टीम तयार करण्यात आली असुन इतर ४० संशोधक प्राध्यापकांचाही सहभाग राहणार आहे. 
शास्त्रज्ञ मा डॉ सिवा बालसुंदरम

मा श्री अविनाश शिरोडे 
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण


Thursday, March 12, 2020

मौजे देशमुख पिंप्री येथे जागतिक महिला दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या वतीने मौजे देशमुख पिंप्री येथे जागतिक महिला दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंचा सौ कौसल्‍याबाई अवकाळे या होत्‍या तर उपसंरपंच श्री विश्‍वनाथ माने, अन्‍न आणि पोषण विभागाच्‍या डॉ आशा आर्या, महाराष्‍ट्र राज्‍य आर्थिक विकास महामंडळच्‍या कार्यक्रम समन्‍वयक सौ निता अंबुरे, डॉ जयश्री ऐकाळे, डॉ अनुराधा लाड आदींची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी डॉ आशा आर्या यांनी संतुलित आहार यावर मार्गदर्शन करतांना हिरव्‍या पालेभाज्‍या, दाळी, कडधान्‍ये, दुध व दुधाचे पदार्थ याचा आहारात जास्‍तीस जास्‍त वापर करण्‍याचा सल्‍ला दिला तर सौ निता अंबुरे यांनी महिला सक्षमीकरण होण्‍यासाठी जास्‍तीत जास्‍त बचत गट निर्मिती करण्‍याचे आव्‍हान केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ जयश्री ऐकाळे यांनी केले. सुत्रसंचालन अपुर्वा मोरे व रमा नायर यांनी केले तर आभार डॉ अनुराधा लाड यांनी मानले. विभागातील पदव्‍युत्तर विद्यार्थ्‍यांनी रमा नायर, सविता डोके, अमर गाढवे, अजित खर्गे, गोपाल बोरसे, श्रुतिका भोयर, भक्‍ती भोसले, रोहिणी कोकाटे आदींनी बेटी बचाओ पथनाटय सादर केले तर महिला संवाद या भित्‍तीपत्रकांचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख डॉ राजेश कदम यांच्‍या मार्गदर्शनानुसार करण्‍यात आले होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी चंद्रशेखर नखाते व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावातील महिला व पुरूष मोठया संख्‍येने उपस्थित होते.

वनामकृवित स्‍व. यशवंतराव चव्‍हाण जयंती साजरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात माजी मुख्‍यमंत्री स्‍व. यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या जयंतीनिमित्‍त त्‍यांच्‍या प्रतिमेस संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी पुष्‍पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, प्राचार्य डॉ उदय खोडके, सहाय्यक कुलसचिव श्री पी के काळे, श्री खालेद आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Monday, March 9, 2020

कै डॉ एस एस कदम हे कर्मयोगी कुलगुरू होते..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

माजी कुलगुरू कै. डॉ एस एस कदम यांना विद्यापीठाच्‍या वतीने भावपुर्ण श्रध्‍दाजंली
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू कै डॉ एस एस कदम यांचे दिनांक 8 मार्च रोजी दुखद निधन झाले. त्‍यानिमित्‍त दिनांक 9 मार्च रोजी विद्यापीठाच्‍या वतीने त्‍यांना भावपुर्ण श्रध्‍दाजंली वाहण्‍यात आली. यावेळी कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, राहुरी येथील हवामानशास्त्र तज्ञ डॉ रामचंद्र साबळे, डॉ सुरेश थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कै डॉ एस एस कदम यांना श्रध्‍दाजंली वाहतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कै डॉ एस एस कदम यांच्‍या कुलगुरू पदाच्‍या कार्यकाळात विद्यापीठाच्‍या संशोधन, शिक्षण व विस्‍तार शिक्षण कार्यास मोठी दिशा देऊन विद्यापीठास खंबीर नेतृत्‍व दिले. ते शांत स्‍वभावी, मृदभाषी पण तितकेच कठोर होते, पारदर्शक प्रशासक, कामातील वक्‍तशीरपणा असलेले एक आदर्श व्‍यक्‍तीमत्‍व म्‍हणजेच कै डॉ एस एस कदम. संस्‍थेच्‍या हिताला त्‍यांनी सर्वाच्‍च प्राधान्‍य दिले. ते कर्मयोगी कुलगुरू होते, त्‍यांनी दाखवुन दिलेल्‍या मार्गावर चालण्‍याचा आपण प्रयत्‍न करू, हीच त्‍यांना खरी श्रध्‍दाजंली ठरेल, असे ते म्‍हणाले.

डॉ रामचंद्र साबळे आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, कै डॉ एस एस कदम हे सातारा जिल्‍हयातील दुष्‍काळग्रस्‍त भागातील माण येथील होते, जीवनात मोठया संघर्षातुन ते पुढे आले. त्‍यांचे अध्‍यापन अत्‍यंत उच्‍च दर्जाचे होते, प्रशासनावर त्‍यांची मोठी पकड होती, एक अष्‍टपैलु व्‍यक्‍तीमत्‍व होते, असे ते म्‍हणाले. यावेळी श्री थोरात यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री खालेद यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

डॉ एस एस कदम यांचा अल्‍प परिचय
डॉ संतराम संभाजी कदम यांचा जन्‍म 1947 मध्‍ये झाला, त्‍यांचे मुळगांव वावरहिरे (दानवलेवाडी), ता. माण, जि. सातारा हे होते. त्‍यांनी पुण्‍याच्‍या कृषि महाविद्यालयातुन कृषि पदवीपुर्ण केली तर नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान संस्‍थेतुन पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवी प्राप्‍त केली. पोस्‍ट डॉक्‍टरल फेलो म्‍हणुन जर्मनीत संशोधन केले तसेच इंग्‍लंड येथे नि‍मंत्रित प्राध्‍यापक म्‍हणुन एक वर्षाचा अनुभव त्‍यांच्‍या पाठिशी होता. मेक्सिको व अमेरिका या देशातील संशोधन संस्‍थांना भेटी दिल्‍या होत्‍या. परभणी कृषि विद्यापीठात सहाय्यक प्राध्‍यापक व सहयोगी प्राध्‍यापक म्‍हणनु कार्य केले. राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठात सहयोगी प्राध्‍यापक म्‍हणुन 1981 कार्यरत, नंतर प्राध्‍यापक, विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्‍ठाता, संशोधन संचालक आदी विविध पदावर काम करून सन 2005 मध्‍ये अधिष्‍ठाता पदावर निवृत्‍त झाले. नंतर सन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात 2005 ते 2010 पर्यंत पाच वर्षे कुलगुरू म्‍हणुन नेतृत्‍व केले.
अॅझोटोबॅक्‍टर जीवाणु, क्‍लोरेला वनस्‍पती, भात पिकातील नायट्रेट असिमिलेशन प्रक्रिया यावर मुलभुत संशोधन त्‍यांनी केले. काळी पडलेल्‍या ज्‍वारीवर प्रक्रिया करून उपयुक्‍त पदार्थ निर्मिती, भुईमुगावर प्रक्रिया, बोरापासुन कॅन्‍डी, पावडर, शीतपेय, वाईन निर्मिती, डाळिंबापासुन वाईन निर्मिती तसेच पेरू, केळी, दुधी भोपळा प्रक्रियायुक्‍त पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान त्‍यांनी विकसित केले. भुईमुगावरील संशोधनबाबात अमेरिकन सरकारचे प्रशस्‍तीपत्रक त्‍यांना देण्‍यात आले तर फळे व भाजीपाला प्रक्रिया संशोधनाबाबत हॉर्टीकल्‍चरल सोसायडी ऑफ इंडिया तर्फे डॉ जे सी आनंद सुवर्णपदकांनी त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले. अनेक राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय नियतकालिकेत शंभर पेक्षा जास्‍त संशोधन लेख प्रसिध्‍द झाली तर अन्‍नविज्ञान व तंत्रज्ञान विषयावर 16 पुस्‍तकांचे लेखन त्‍यांनी केले. नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅग्रीकल्‍चर सायन्सेसचे फेलो होते.

वनामकृविचे माजी कुलगुरू डॉ एस एस कदम यांचा कालावश


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस एस कदम यांचे दिनांक 8 मार्च रोजी दुःखद निधन झाले, ते 72 वर्षाचे होते. ते सन 2005 ते 2010 दरम्‍यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्‍हणुन कार्यरत होते. त्यांच्या काळात त्‍यांनी शेतकरी, विद्यार्थी व विद्यापीठ हितार्थ अनेक चांगले निर्णय घेतले. परभणी कृषि विद्यापीठ जमिनी सुरक्षित राहण्याच्‍या दृष्‍टीने अनेक पावले त्‍यांनी उचलली, यात संपुर्ण विद्यापीठ परिसरात सुरक्षित भिंती उभारून सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी भूमिका पार पाडली. त्यांच्याच काळात राज्यस्तरीय विविध विस्‍तार कार्यक्रम राबविण्‍यात आले. विद्यापीठ बीजोत्पादन वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने मोठे प्रयत्‍न केले गेले. बदनापूरच्या मोसंबी संशोधन केंद्राच्या बळकटीकरण करण्यासाठी विशेष लक्ष दिले. कापूस, तूर, सोयाबीन ही महत्वाची पिके यावर येणाऱ्या किडीमुळें शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होत होते ते कमी करण्यासाठी प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्यात संपुर्ण मराठवाड्यात विशेष पीक संरक्षण मोहीम राबविण्‍यात आली, शेतकरी बांधवाच्‍या थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्‍यात आले. परभणी विद्यापीठ मुख्यालयी दोन कृषी तंत्रज्ञान सप्ताह यांचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल, या तंत्रज्ञान सप्ताहास शेतक-यांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. एकाच ठिकाणी सर्व पिकांच्‍या विद्यापीठ विकसित वाणांचे प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्र विकसित करण्‍यात आले. कोणत्‍याही संस्‍थेची प्रगती ही त्‍या संस्‍थेतील कार्यरत मनुष्‍यबळावर अवलंबुन असते यांची जाण त्‍यांना होती, शास्‍त्रज्ञ भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्‍याचा प्रयत्‍न त्‍यांनी केला. त्यांच्या नेतृत्वाखाली कृषि संशोधन, शिक्षण आणि विस्तार शिक्षण हे प्रभावीपणे होण्यासाठी विशेष प्रयत्न त्‍यांनी केले. शांत स्‍वभाव, मृदुभाषी पण तितकीच कठोर व पारदर्शक प्रशासन, निश्‍चयी नेतृत्‍व, वक्‍तशीर, चाणाक्ष व कामाचा प्रचंड आवाका असलेले व्‍यक्‍तीमत्‍त म्‍हणजेच माननीय कै डॉ एस एस कदम यांना विद्यापीठाच्‍या वतीने भावपुर्ण श्रध्‍दाजंली

डॉ एस एस कदम यांचा अल्‍प परिचय
डॉ संतराम संभाजी कदम यांचा जन्‍म 1947 मध्‍ये झाला, त्‍यांचे मुळगांव वावरहिरे (दानवलेवाडी), ता. माण, जि. सातारा हे होते. त्‍यांनी पुण्‍याच्‍या कृषि महाविद्यालयातुन कृषि पदवीपुर्ण केली तर नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान संस्‍थेतुन पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवी प्राप्‍त केली. पोस्‍ट डॉक्‍टरल फेलो म्‍हणुन जर्मनीत संशोधन केले तसेच इंग्‍लंड येथे नि‍मंत्रित प्राध्‍यापक म्‍हणुन एक वर्षाचा अनुभव त्‍यांच्‍या पाठिशी होता. मेक्सिको व अमेरिका या देशातील संशोधन संस्‍थांना भेटी दिल्‍या होत्‍या. परभणी कृषि विद्यापीठात सहाय्यक प्राध्‍यापक व सहयोगी प्राध्‍यापक म्‍हणनु कार्य केले. राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठात सहयोगी प्राध्‍यापक म्‍हणुन 1981 कार्यरत, नंतर प्राध्‍यापक, विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्‍ठाता, संशोधन संचालक आदी विविध पदावर काम करून सन 2005 मध्‍ये अधिष्‍ठाता पदावर निवृत्‍त झाले. नंतर सन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात 2005 ते 2010 पर्यंत पाच वर्षे कुलगुरू म्‍हणुन नेतृत्‍व केले.

अॅझोटोबॅक्‍टर जीवाणु, क्‍लोरेला वनस्‍पती, भात पिकातील नायट्रेट असिमिलेशन प्रक्रिया यावर मुलभुत संशोधन त्‍यांनी केले. काळी पडलेल्‍या ज्‍वारीवर प्रक्रिया करून उपयुक्‍त पदार्थ निर्मिती, भुईमुगावर प्रक्रिया, बोरापासुन कॅन्‍डी, पावडर, शीतपेय, वाईन निर्मिती, डाळिंबापासुन वाईन निर्मिती तसेच पेरू, केळी, दुधी भोपळा प्रक्रियायुक्‍त पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान त्‍यांनी विकसित केले. भुईमुगावरील संशोधनबाबात अमेरिकन सरकारचे प्रशस्‍तीपत्रक त्‍यांना देण्‍यात आले तर फळे व भाजीपाला प्रक्रिया संशोधनाबाबत हॉर्टीकल्‍चरल सोसायडी ऑफ इंडिया तर्फे डॉ जे सी आनंद सुवर्णपदकांनी त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले. अनेक राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय नियतकालिकेत शंभर पेक्षा जास्‍त संशोधन लेख प्रसिध्‍द झाली तर अन्‍नविज्ञान व तंत्रज्ञान विषयावर 16 पुस्‍तकांचे लेखन त्‍यांनी केले. नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅग्रीकल्‍चर सायन्सेसचे फेलो होते.

Sunday, March 8, 2020

स्‍त्रीच समाजातील नवनिर्माणाची केंद्रबिंदु .......... प्रसिध्‍द सामाजिक कार्यकर्त्‍या तथा कवियत्री मा दिशा शेख

वनामकृवित जागतिक महिला दिन साजरा
शस्‍त्र , चित्रकला, शेती, अन्न शिजवणे आधीचा शोध स्‍त्रीयांनीच लावला. स्‍त्री ही सृजनशील आहे, समाजातील नवनिर्माणाची केंद्रबिंदु ही स्‍त्रीच आहेस्‍त्रीही एक भोगवस्‍तु नाही, आज स्‍त्रीयावर अनेक अत्‍याचार होत आहे, समाजाचा स्‍त्रीकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदलला पाहिजे. जीवनात स्‍त्रीयावर अनेक निर्णय ही लादलेली जातात, दुस-यांच्‍या अपेक्षानुसार स्‍वत: निर्णत घेतात. समाजामध्‍ये स्‍त्रीला स्‍वत:ची खरच ओळख आहे का, हा प्रश्‍न आहे. स्‍वत:ची स्‍वातंत्र विचारसरणी जपा, स्‍वत:चा सन्‍मान करा, अन्‍याय व अत्‍याचार विरूध्‍द लढा. स्‍वाभिमान बाळगा. निर्णयक्षम बना, स्‍वयंसिध्‍दा व्‍हा. स्‍वत:चे अस्तित्‍व सिध्‍द करा, असे प्रतिपादन प्रसिध्‍द सामाजिक कार्यकर्त्‍या तथा कवियत्री मा दिशा शेख यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्‍यात आला, त्‍यानिमित्‍त आयोजित 'मी सिध्‍दा, मी स्‍वयंसिध्‍दा' याविषयावर त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी माननीय कुलगुरू यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ उषाताई अशोक ढवण या होत्‍या, तर व्‍यासपीठावर राष्‍ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ संदिप बडगुजर, डॉ अनुराधा लाडसहाय्यक वसतीगृह अधिक्षीका डॉ मिनाक्षी पाटील, डॉ सुनिता पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले व मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ राजेश कदम यांच्या मार्गदर्शन नुसार करण्यात आले होते. 
मा दिशा शेख पुढे म्‍हणाल्‍या कीपुर्वी समाजात मातृप्रधान संस्‍कृती होतीपितृसत्‍ताक समाजात स्‍त्रीला दुय्यम स्‍थान दिले जातेकुंटुबव्‍यवस्‍थेते आज स्‍त्रीयांना अनेक बंधनात जखडेले आहेस्‍त्रीही क्षणाची पत्‍नी तर अनंत काळाची माता असतेस्‍त्रीयांनी स्‍वत:ची शक्‍ती ओळखली पाहिजे. आज मराठवाडा व विदर्भात शेतकरी आत्‍महत्‍या होत आहेत, परंतु शेतकरी महिला आत्‍महत्‍या आपण क्‍वचितच ऐकतो. कारण स्‍त्री मध्‍ये सहनशिलता आहे, अपमान सहन करण्‍याची शक्‍ती तीच्‍या आहे. मातृत्‍व, करूणा, आदर्श म्‍हणजे बाईपण, बाईपण हाच मोठा गुण स्‍त्रीयात असतो. महान पुरूषातही आईपणा असते, म्‍हणुनच आपण विठाई, माऊली, भिमाई असे म्‍हणतो, असे त्या म्‍हणाल्‍या.
अध्‍यक्षीय भाषणात सौ उषाताई अशोक ढवण म्‍हणाल्‍या की, आज स्‍त्रीया विविध क्षेत्रात मोठ योगदान देत आहे. तरिही स्‍त्री अत्‍याचार व भ्रुणहत्‍या होतच आहेत. महिला सक्षमीकरण व सबलीकरण झाले पाहिजे. स्‍त्रीयांनी जीवनात न्‍युंनगंड बाळगु नये, स्‍त्रीयांमध्‍ये आत्‍मविश्‍वास पाहिजे. वाचन करा, वाचनाने विचारात प्रगल्‍भता येते. संकटांनी खचुन न जाता, संकटांकडे संधी म्‍हणुन पाहा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ मिनाक्षी पाटील यांनी केले. सुत्रसंचालन विद्यार्थ्‍यीनी स्‍नेहल मिटकरी हिने केले तर आभार डॉ सुनीता पवार यांनी मानले. कार्यक्रमास कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यींनी मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या.

Thursday, March 5, 2020

कृषि तंत्रज्ञानाबाबत शेतक-यांमधील विश्वासार्हता वाढीसाठी कृषि विज्ञान केंद्रानी प्रयत्‍न करावेत ...... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राच्‍या वार्षिक कृती आराखडा कार्यशाळेत प्रतिपादन
विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञानाचे मुल्‍यमापन करणे व हे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍याची महत्त्वाची भुमिका कृषि विज्ञान केंद्रावर असुन शेतक-यांमध्ये कृषि तंत्रज्ञानाबाबत विश्वासार्हता वाढीसाठी कृषि विज्ञान केंद्रानी प्रयत्‍न करावा, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील बारा कृषि विज्ञान केंद्राची वार्षिक कृती आढावा कार्यशाळेचे आयोजन विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने दिनांक ५ व ६ मार्च रोजी करण्‍यात आले असुन कार्यशाळेच्‍या उदघाटना प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, दर्जेदार फळपिकांच्या रोपांची व बियाण्‍याची शेतक-यांमध्‍ये मोठी मागणी असुन प्रत्‍येक कृषि विज्ञान केंद्रानी आपआपल्‍या प्रक्षेत्रावर फळपिकांची रोपवाटीका विकसित करावी. यात विशेषत: आबा, मोसंबी, डाळिंब आदी फळपिकांच्‍या रोप निर्मितीवर भर द्यावा. तसेच जैविक खते, जैविक कीडनाशके, गांडुळ खत आदी निविष्‍ठांची निर्मिती करून विक्री करावी. केंद्राच्‍या प्रक्षेत्रावर विद्यापीठ विकसित विविध पिकांचे वाण व तंत्रज्ञान प्रात्‍यक्षिके आदर्श पध्‍दतीने राबवुन शेतक-यांमधील कृषि तंत्रज्ञान अवलंब वाढीसाठी कार्य करावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ देवराव देवसरकर यांनी कृषि विज्ञान केंद्रानी बदलत्‍या हवामानास अनुकूल तंत्रज्ञान, आंतरपिक पध्‍दती, विद्यापीठ विकसित जैवसंपृध्‍द बाजरी व ज्‍वारीची वाण आदी प्रसारावर भर द्यावा असे सांगितले. सुत्रसंचालन डॉ प्रशांत देशमुख यांनी केले तर आभार डॉ किशोर झाडे यांनी मानले. दोन दिवसीय कार्यशाळेत विद्यापीठातील विभाग प्रमुख, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन कृषि विज्ञान केंद्राचा वार्षिक कृती आढावा घेऊन पुढील वर्षाचा कृती कार्यक्रम निश्चित करण्‍यात येणार आहे. कार्यशाळेत मराठवाडयातील बारा कृषि विज्ञान केंद्रातील कार्यक्रम समन्‍वयक व विषय विशेषतज्ञ, विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Tuesday, March 3, 2020

वनामकृवित ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण कार्यशाळा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत गृहविज्ञान संशोधन प्रकल्‍प अंतर्गत उपजीविका सुरक्षेकरिता ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण याविषयावर दिनांक 28 व 29 फेब्रुवारी रोजी मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राच्‍या विषयतज्ञांकरिता दोन दिवसीय कार्यशाळा संपन्‍न झाली. कार्यशाळेत सहभागी विषयतज्ञांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्राचार्या डॉ जयश्री झेंड, केंद्र समन्‍वयीका डॉ टी एन खान आदींची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी शेतकरी महिलाचे काबाडकष्‍ट कमी करण्‍याचे चांगले तंत्रज्ञान गृहविज्ञान महाविद्यालयाने विकसित केले असुन हे तंत्रज्ञान ग्रामीण महिला पर्यंत पोहचविण्‍यासाठी कृषि विज्ञान केंद्राच्‍या विषयतज्ञांनी कार्य करण्‍याचा सल्‍ला दिला.
कार्यशाळेत रक्‍तक्षय निवारणासाठी लोहसमृध्‍द पदार्थ निर्मिती, वस्‍त्रशास्‍त्र महिला उद्योजकता, हातमोजे निर्मिती, फुल तोडणीसाठी सानुकुल बॅगा, धान्‍य भरणी कार्यातील उत्‍पादकता वाढीसाठी सुधारीत साधने, पापड शेवई गृहउद्योग व हळद पिकातील लागवडीपासुन काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, महिलांचे काबाटकष्‍ट कमी करणारी साधने, विकसित शैक्षणिक साधनांचा उपयोग आदी विषयांवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी प्रात्‍याक्षिकांसह मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्‍या समारोपीय कार्यक्रमास माजी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, माजी प्राचार्या डॉ शामला हारोडे, डॉ स्‍नेहलता रेडडी, डॉ रोहीणीदेवी वडलामुडी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्ते सहभागी विषयतज्ञांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्‍यात आले. प्रास्‍ताविक कार्यशाळेचे आयोजक डॉ टी एन खान यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ सुनिता काळे यांनी केले तर आभार डॉ जयश्री रोडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी अखिल भारतीय समन्‍वयित संशोधन प्रकल्‍प - गृहविज्ञानचे संशोधन कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.