‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ उपक्रमाचे कृषि मंत्री माननीय ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्याकडून कौतुक
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्ट्र
शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त
सोमवार दिनांक १८ मे २०२६ रोजी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृह येथे
“खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शन” उत्सहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे
उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री माननीय ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या
हस्ते दृकश्राव्य माध्यमाद्वारे (ऑनलाईन) करण्यात आले. विशेष अतिथी सार्वजनिक
आरोग्य व कुटुंब कल्याण,
पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक
उपक्रम) तथा पालकमंत्री परभणी जिल्हा माननीय ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी
शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि हे होते.
कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून भारतीय कृषि अनुसंधान
परिषदेचे माजी महासंचालक तथा वाराणसी येथील बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे माजी
कुलगुरू माननीय डॉ. पंजाब सिंग हे उपस्थित होते. महाराष्ट्र
शासनाचे कृषि सचिव माननीय
डॉ. परिमल सिंग (भाप्रसे) यांनीही शुभेच्छा पाठविल्या. व्यासपीठावर परभणी शहराचे प्रथम नागरिक
माननीय महापौर श्री सय्यद इकबाल सय्यद खाजा, माजी खासदार
श्री सुरेश जाधव, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. अनंत कदम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. दौलत चव्हाण,
मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, विद्यापीठाच्या
विस्तार परिषदेचे सदस्य श्री जनार्दन आवरगंड, श्री. भीमराव डोणगापुरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात दृकश्राव्य
माध्यमाद्वारे बोलताना महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय
भरणे म्हणाले की,
शेतकरी विकास व कल्याणासाठी दूरदृष्टी असलेले माजी मुख्यमंत्री
स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी राज्यात विभागनिहाय चार कृषी विद्यापीठांची स्थापना
केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या शेतीमध्ये कृषी क्रांती घडून आली. सध्या हवामान
बदलामुळे शेतीसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या असून, त्यावर
कृषी विद्यापीठे प्रभावी संशोधन करीत आहेत. या क्षेत्रात वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठाचे कार्य उल्लेखनीय आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने
विद्यापीठाला ‘अ’ दर्जा प्रदान केला असून, संशोधन व शिक्षण
क्षेत्रात विद्यापीठाने आयआयटी मुंबईसारख्या प्रतिष्ठित संस्थांशी सामंजस्य करार
करून महत्त्वपूर्ण कार्य साध्य केले आहे. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या
‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच
ग्रामविकासासाठीही विद्यापीठाने मोठे योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन हे मा.
मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना प्रभावीपणे
राबवत असून,
शेतकऱ्यांना मदत व प्रोत्साहन देत आहे. नैसर्गिक आपत्ती व
बाजारभावातील चढ-उतारांमुळे शेतकरी अडचणीत असल्याने शासनाने कर्जमाफीची घोषणाही
केली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ‘अल निनो’ संकटाच्या पार्श्वभूमीवर
शेतीसमोरील आव्हाने लक्षात घेऊन कृषी विद्यापीठांनी यासंदर्भात उपयुक्त व प्रभावी
संशोधन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, मराठवाड्यात
१९१८ मध्ये संशोधन केंद्राची स्थापना झाली, तर विद्यापीठाची
स्थापना १९७२ मध्ये झाली. शंभर वर्षांहून अधिक काळ या विद्यापीठाने शेतकऱ्यांची
सेवा केली असून, विद्यापीठाचा इतिहास आणि कार्यपरंपरेची आठवण
करून देणारा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवर
कार्य करणारे अनेक अधिकारी घडविले असून, त्यांच्या कार्याचे
त्यांनी कौतुक करून अभिनंदन केले. तसेच विद्यापीठाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या
सर्वांचे आभार मानले. विद्यापीठ ‘शेतकरी देवो भवः’ ही भावना केवळ जपून न ठेवता
प्रत्यक्ष कृतीतूनही अवलंबत आहे. याच भावनेतून कुलगुरूपासून ते सर्व
शास्त्रज्ञांपर्यंत प्रत्येक जण दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘माझा एक दिवस
माझ्या बळीराजासोबत’ या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करीत
आहे. विद्यापीठ शेतकऱ्यांशी अधिकाधिक जोडले जावे यासाठी सातत्याने कार्यरत असून,
नियमित कार्यक्रमांसह ऑनलाइन ‘शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद’ देखील
आयोजित करण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात
विद्यापीठाला यश मिळाले आहे. विद्यापीठामार्फत उच्च दर्जाचे बीजोत्पादन आणि
फळरोपांची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी-केंद्रित विस्तार कार्य
आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन राबविले जात आहे.
महाराष्ट्र राज्य देशाला शेती क्षेत्रात दिशादर्शक कार्य
करीत असून,
‘महाविस्तार’ ॲप, ड्रोन तंत्रज्ञानाविषयी
धोरणांची अंमलबजावणी, तसेच ‘एक खिडकी योजना’ यांसारख्या
महत्त्वपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.
याशिवाय महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री सहायता निधीतून विद्यापीठाला २५ कोटी
रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, त्यामुळे संशोधन कार्याला
मोठी चालना मिळाली आहे. याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. या सर्व
प्रयत्नांच्या बळावर विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवरील दहा अखिल भारतीय समन्वित
संशोधन प्रकल्पांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच चार नवीन
महाविद्यालये आणि दोन नवीन संशोधन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
विद्यापीठात मनुष्यबळाची कमतरता असली, तरी उपलब्ध
मनुष्यबळाच्या जोरावर विद्यापीठ सातत्याने प्रगती करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आणि विद्यापीठाच्या
वर्धापन दिनानिमित्त तसेच आगामी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी सर्वांना शुभेच्छा
दिल्या.
माननीय महापौर
श्री. सय्यद इकबाल म्हणाले की, ‘अल निनो’चा परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे शहर आणि शेती या
दोन्हींसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पाऊस अनियमित राहण्याची शक्यता असल्याने
पाणी निचरा, अडवणूक, जिरवणूक व साठवणूक
यांसारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच विजेपासून होणारी हानी
टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘दामिनी ॲप’चा वापर करावा, असे
आवाहनही त्यांनी केले.
प्रमुख अतिथी
माननीय डॉ. पंजाब सिंग म्हणाले की,
या मेळाव्यातून निश्चितच उपयुक्त ज्ञान मिळेल. देशाच्या शेती
विकासात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण योगदान असून, त्यामध्ये
शेतकरी आणि शास्त्रज्ञांचा मोठा सहभाग आहे. माननीय कुलगुरू यांच्या
मार्गदर्शनाखाली विद्यापीठ मोठे कार्य करत असून, बायोमिक्स
उत्पादन, बीजोत्पादन, उद्योजकतेला
चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र मेकॅनायझेशन केंद्र’ यांसारखे उपक्रम राबविण्यात येत
आहेत. मराठवाड्यातील शेतकरी व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील
ज्ञान मिळावे यासाठी नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक आणि प्रगतशील
शेतकऱ्यांना विद्यापीठात आमंत्रित करून सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत.
तसेच ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ या नाविन्यपूर्ण विस्तार उपक्रमाबद्दल
त्यांनी माननीय कुलगुरूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले की, विद्यापीठातील सुविधा वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे कल्याण होण्यासह
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकासालाही चालना मिळेल. तंत्रज्ञानाचा उपयोग करून
अनेक शेतकरी प्रगत झाले असले, तरी शेतकऱ्यांचा मोठा वर्ग
अद्यापही प्रगतीपासून दूर आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, शासन, शास्त्रज्ञ आणि उद्योजक यांनी एकत्रितपणे,
एकाच ध्येयाने कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
माजी खासदार माननीय श्री. सुरेश जाधव म्हणाले की, कृषी विद्यापीठ हे मराठवाड्याचा आत्मा असून, त्याद्वारे
शेतीचा विकास साधला जातो. या विद्यापीठाच्या माध्यमातून शेती कशी करावी आणि अधिक
उत्पादन कसे घ्यावे याचे मार्गदर्शन शास्त्रज्ञांकडून दिले जाते. त्यामुळे अशा
कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे, अशी अपेक्षा त्यांनी
व्यक्त केली. विद्यापीठाच्या खरीप शेतकरी मेळाव्याला ऐतिहासिक परंपरा असून,
या कार्यक्रमातून खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी महत्त्वपूर्ण
मार्गदर्शन मिळते तसेच विद्यापीठाच्या बियाणे विक्रीचाही शुभारंभ केला जातो,
असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, बदलत्या
हवामानानुसार आवश्यक अशा सुधारित जाती व संशोधन विद्यापीठाने विकसित केल्यास
शेतकरी राष्ट्राला समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही. विद्यापीठाचे कार्य अत्यंत
उल्लेखनीय असून, विद्यापीठाला विविध दर्जा व पुरस्कार
प्राप्त झाले आहेत. तसेच विद्यापीठाचा ‘तुरीचा गोदावरी’ हा वाण शेतकऱ्यांसाठी
क्रांतिकारी आणि अत्यंत लोकप्रिय ठरला आहे. याबद्दल त्यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि तसेच शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
प्रास्ताविकात
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे म्हणाले की,
विद्यापीठ शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही
प्रमुख कार्ये प्रभावीपणे पार पाडत आहे. विद्यापीठाचे तंत्रज्ञान व संशोधन विस्तार
शिक्षण संचालनालयाच्या वतीने तसेच कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचविले जात आहे. माननीय कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ ‘शेतकरी
देवो भवः’ या भावनेतून कार्य करत आहे. ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ तसेच
ऑनलाइन ‘शेतकरी-शास्त्रज्ञ कृषी संवाद’ या उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या
समस्या जाणून घेतल्या जात आहेत. तसेच ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना
‘प्लॅन ए, बी आणि सी’ देण्यात येणार असल्याचे त्यांनी
सांगितले.
या
परिसंवादामध्ये खरीप हंगामातील विविध पिकांचे नियोजन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती
तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञान
याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच कृषि प्रदर्शनामध्ये विविध कृषि
तंत्रज्ञान, सुधारित वाण, यंत्रसामग्री
तसेच कृषि पूरक उद्योगांचे प्रदर्शन मांडण्यात आले. कार्यक्रमात मान्यवरांच्या
हस्ते विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या विविध घडीपत्रिका, पुस्तिकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ,
परभणी अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्रामार्फत खरीप हंगाम २०२६ साठी
विविध पिकांचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या बियाणे
विक्रीने करण्यात आली.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले,
तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.
कार्यक्रमास शेतकरी, कृषि अधिकारी, विद्यार्थी
व नागरिक अशा एकूण २५०० जणांची उपस्थिती होती.
खरीप हंगाम २०२६ साठी विविध पिकांचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले
कार्यक्रमास
शेतकरी, कृषि अधिकारी, विद्यार्थी
व नागरिक यांची उत्स्फूर्त उपस्थिती .jpeg)
.jpeg)



.jpeg)

.jpeg)




.jpeg)





.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)


.jpeg)

.jpeg)


.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)