वनामकृवित आयोजित सेंद्रीय
शेती यावर पंधरा दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनार मालिकेच्या उदघाटन
प्रसंगी प्रतिपादन
प्रशिक्षणास उत्स्फुर्त प्रतिसाद, पाच हजार पेक्षा जास्त शेतकरी व कृषि विस्तारकांनी नोंदविला
सहभाग
सेंद्रीय शेतमालाबाबत ग्राहकांची
विश्वासहर्ता ही प्रमाणीकरणावर अवलंबुन असुन सेंद्रीय शेतमालाचे प्रमाणीकरण सुलभ होण्याच्या
दुष्टीने प्रयत्न केला जाईल. राज्याचे मुख्यमंत्री महोदय मा ना श्री उध्दव ठाकरे
यांच्या संकल्पनेतुन विकेल ते पिकेल अभियान राबविण्यात येऊन शेतकरी बांधवाकडुन शेतमाल
थेट ग्राहकांपर्यत उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. बाजारपेठेचा कल ओळखुन मुल्यसाखळी
निर्माणकरून शेतमालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळण्याकरिता विकेल ते पिकेल अभियान
राबविण्यात येणार आहे. यात सेंद्रीय शेतमालास प्राध्यान्य देण्यात येईल. अनेक कृषि
पदवीधर इतर क्षेत्रात कार्य करतात, परंतु
शेती व शेतकरी बांधवाकरिता त्यांनी कार्य केले पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात शेतकरी
बांधवानी अन्नधान्य, भाजीपाला, फळ कमी
पडु दिले नाहीत, याचे फार मोठे उपकार समाजावर आहेत. शेतकरी बांधवाच्या
पाठिशी समाज, कृषि विभाग व कृषि विद्यापीठ यांनी खंबीरपणे उभे
राहीले पाहिजे. शेतकरी चिंतामुक्त झाला पाहिजे, याकरिता सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे
कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्प आणि मुंबई येथील फार्म
दु फोर्क सोल्युशन्य यांचे संयुक्त विद्यमाने सेंद्रीय शेती यावर पंधरा दिवसीय राज्यस्तरीय
प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनार मालिकेच्या माध्यमातुन आयोजन दिनांक २१ सप्टेबर ते
९ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले असुन दिनांक २१ सप्टेबर रोजी प्रशिक्षणाच्या उदघाटनप्रसंगी
ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण होते तर विशेष
अतिथी म्हणुन गुजरात येथील आनंद कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ आर व्ही व्यास
हे उपस्थित होते. संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद
वासकर, नागपुर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्राचे
क्षेत्रीय संचालक डॉ ध्रुवेंद्र कुमार, भारत सरकारच्या कृषि
व शेतकरी कल्याण मंत्रालयातील सल्लागार डॉ ए के यादव, कृषि
आयुक्तालयातील कृषि संचालक श्री दिलीप झेंडे, प्रगतशील
शेतकरी श्री सोपानराव अवचार, आयोजक डॉ आनंद गोरे, डॉ स्मिता सोळंकी, डॉ उमेश कांबळे आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
कृषिमंत्री मा ना श्री
दादाजी भुसे पुढे म्हणाले की, हरितक्रांतीमुळे देश अन्नधान्यात
स्वयंपुर्ण झाला, वाढत्या लोकसंख्येला अन्नाची गरज लक्षात
घेऊन जास्त उत्पादनाकरिता आपण शेतीत संकरित वाण, रासायनिक किटकनाशके, खते आदींचा वापर केला. परंतु रासायनिक खतांचा व किटकनाशकांच्या अति वापरामुळे
मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम पाहता सेंद्रीय शेतीचे महत्व वाढतांना दिसत आहे, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावात सेंद्रीय शेतीचे महत्व अधिकच अधोरेखित
झाले आहे. सेंद्रीय शेती यशस्वीपणे करणारे अनेक शेतकरी बांधव आहेत,त्यांचा अनुभव इतर शेतकरी बांधवासाठी महत्वाचा असुन सेंद्रीय शेतीतील अडचणी
लक्षात घेऊन शासनस्तरावर योग्य ते धोरण आखण्यात येईल.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू
मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, सेंद्रीय शेतमालाची देशांतर्गत
व विदेशीतील बाजारपेठ वाढत आहे. मनुष्याच्या आरोग्य विषयक संकल्पना बदलत आहे, ग्राहक विषमुक्त अन्नाकडे वळत आहेत. त्यामुळे सेंद्रीय शेतमालास वाढती
मागणी पाहाता, सेंद्रीय शेतमाल उत्पादनाची व्याप्ती वाढत
आहे. शासन, कृषि विभाग व कृषि विद्यापीठ सेंद्रीय शेतीस चालना
देत आहे. छोटे व मध्यम शेतकरी बांधव एकत्रित येऊन गटाच्या माध्यमातुन सेंद्रीय शेती
केल्यास निश्चितच त्यांना लाभ होणार आहे. सेंद्रीय शेतीस लागणा-या निविष्ठांची निर्मिती
शेतकरी बांधवानी स्वत: केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन आर्थिक लाभ जास्त होईल. विद्यापीठ
उत्पादीत द्रवरूप जैविक खते व बॉयोमिक्सला शेतकरी बांधवाची मोठी मागणी होत असल्याचेही
ते म्हणाले.
मार्गदर्शनात आनंद
कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ आर व्ही व्यास यांनी गुजरात राज्यातील शेतीत व
सेंद्रीय शेतीत द्रवरूप जैविक खतांचा मोठया प्रमाणात केला जात असल्याचे सांगुन त्यांनी
द्रवरूप जैविक खतांचा महत्व व वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संशोधन संचालक
डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी परभणी कृषि विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन कार्याबाबत
माहिती दिली. यावेळी भारत सरकारच्या
कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयातील सल्लागार डॉ ए के यादव, कृषि आयुक्तालयातील कृषि संचालक श्री दिलीप झेंडे, प्रगतशील शेतकरी श्री सोपानराव अवचार आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात आयोजक डॉ
आनंद गोरे यांनी प्रशिक्षणाबाबतची पार्श्वभुमी सांगितली. सुत्रसंचालन डॉ प्रविण कापसे व डॉ पपिता गौरखेडे यांनी केले
तर आभार डॉ स्मिता सोळंकी मानले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ रणजित चव्हाण, डॉ अनुराधा लाड, श्री अभिजीत कदम असुन कार्यक्रम यशस्वीतेसाठी
विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सदरील पंधरा दिवसीय प्रशिक्षणात
सेंद्रीय पीक लागवड तंत्रज्ञान, सेंद्रीय शेतीमध्ये अन्नद्रव्य
व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन,
अवजारांचा कार्यक्षम वापर, सौर ऊर्जा व इतर अपारंपारिक
साधनांचा वापर, निविष्ठांची निर्मिती व वापर, विक्री व बाजारपेठ तंत्रज्ञान, सेंद्रीय प्रमाणीकरण
आदी विविध विषयांवर राज्यातील व देशातील नामांकित कृषि विद्यापीठे, संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्थेतील तज्ञ
मार्गदर्शन करणार आहेत. सदरिल प्रशिक्षणाकरिता ५००० पेक्षा जास्त शेतकरी बंधु
भगिनी, कृषि विज्ञान केद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थाचे सदस्य, विद्यार्थी आदींनी सहभागाकरिता नोंदणी केली असुन प्रशिक्षण यशस्वीरित्या
पुर्ण करणा-यांना डिजिटल प्रमाणपत्राचे वितरित करण्यात येईल. संपुर्ण कार्यक्रमाचे
थेट प्रक्षेपण विद्यापीठाचे युटयुब चॅनेल youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे.