Monday, February 22, 2016

शिवकालीन धोरणांचा तरूणांनी अभ्यास करावा ....... प्राचार्य डॉ. उदय खोडके

कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्‍साहात साजरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महविद्यालयात दिनांक 19 फेब्रवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्‍साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ उदय खोडके हे होते तर डॉ विठ्ठलराव घुले हे प्रमुख वक्‍ते होते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ उदय खोडके म्‍हणाले की, पाणी अडवा पाणी जिरवा व आदर्श शेतसारा पध्‍दत यासारख्या शेतक-यांना उपयुक्‍त योजना शिवाजी महाराजांनी अमलात आणल्या. सामान्य जनता, महिला, शेतकरी व दुर्बल घटक कडे महाराजांनी विशेष लक्ष्य दिले. शिवाजी महाराजाच्‍या काळातील विविध धोरणांचा अभ्‍यास तरुणांनी करावा, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विठ्ठलराव घुले मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, छत्रपती उच्‍चतम प्रशासक व सयंमी व्‍यक्‍तीमत्‍व होते. समाजातील प्रत्‍येक घटकांचा विचार ते करीत. कोणावरही अन्‍याय व अत्‍याचार होणार नाही यासाठी महाराज विशेष लक्ष देत असत, सध्‍या राष्‍ट्रीय अखंडतेसाठी देशात सामाजिक एकोप्‍याचे प्रयत्‍न मोठया प्रमाणात होत असुन छत्रपतीचे स्‍वराज्‍य हे आपल्‍या समोरील एक आदर्श आहेत, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थीनी जान्हवी जोशी, मनीषा बुलांगे, अश्विनी कदम आणि कविता लाड यांनी स्वागतगीत गायिले. विद्यार्थ्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशीही एकांकिका सादर केली. याप्रसंगी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रफित सुद्धा दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विध्यार्थी श्री प्रशांत अटकळ व पाटीलबा खाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.विवेकानंद भोसले, डॉ. स्मिता खोडके, प्रा. भास्कर भुईभार प्रा. हरीश आवारी, प्रा. सुमंत जाधव, प्रा.संदीप पायाळ, डॉ.गोपाल शिंदे, प्रा.संजय पवार, प्रा.प्रमोदिनी मोरे, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे, श्री.फाजगे आदींसह सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 


Friday, February 19, 2016

मौजे झरी येथील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामास कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांची भेट

लोकसहभागातुन चालु असलेल्‍या कामाचे कुलगुरूनी केले कौतुक
परभणी तालुक्‍यातील मौजे झरी लोकसहभागातुन महाराष्‍ट् शासनाच्‍या चालु असलेल्‍या जलयुक्‍त शिवार कार्यक्रमाचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी दिनांक १८ फेब्रुवारी रोजी भेट दिली व चालु असलेल्‍या कामाचे कौतुक केले. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्रगतशिल शेतकरी श्री. कांतराव देशमुख, मृद व जलसंधारण तज्ञ शास्‍त्रज्ञ डॉ. एस. डी. पायाळ, प्रा. डी. डी. पटाईत हे उपस्थित होते. झरी येथील प्रगतीशिल शेतकरी कृषिभुषण श्री. कांतराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सदरील काम प्रगतीपथावर आहे. मा. कुलगुरु यांनी झरी येथे झालेल्‍या जलयुक्‍त शिवार अंतर्गत नाम नदीवर झालेल्‍या नाला खोलीकरण, सिमेंट बंधारा, पुनर्भरण कामास भेट देऊन पाहणी केली.
   सदरील प्रकल्‍पाची माहिती देतांना श्री. कांतराव देशमुख यांनी म्‍हणाले की, या कामामुळे दुष्‍काळात देखील पाणी अडविल्‍याने गावक-यांना फायदा झाला. शेतीकरीता बियाणे, औषधी, खते, उपलब्‍ध करुन देता येतील पंरतु पाणी उपलब्‍धतेसाठी मात्र लोकसहभागातुन याप्रकारची कामे राबविली गेली पाहिजेत, ज्‍यामुळे पाण्‍याचा प्रश्‍न कायमचा मिटविता येईल. झरी गावचा आदर्श घेऊन इतर गावांनी देखील अशी कामे निर्माण करुन दुष्‍काळात देखील पाणी टंचाईवर मात करता येईल. 
श्री. देशमुख पुढे म्‍हणाले की, झरी येथे जलयुक्‍त अभियांनातर्गत नाला खोलीकरणाचे काम हाती घेण्‍यात आले आहे. गावचे एकुण 12500 एकर क्षेत्र असुन त्‍यात एकुण 9 नाल्‍यांचा समावेश आहे. त्‍यापैकी नाम (लेंडी) नदीच्‍या खोलीकरणाचे काम सध्‍या 6 कि.मी पर्यंत पुर्ण झाले आहे. या खोलीकरनात सरासरी 15 मीटर रुंद व 6 मीटर खोल अशा प्रकारे काम होत असुन सध्‍या या कामामुळे 0.019 टि.एम.सी पाणी साठा निर्माण होणार आहे व भविष्‍यात 9 नाल्‍याचे एकुण 29 कि.मी खेालीकरणाचे काम पुर्ण करण्‍याचा मानस श्री. कांतराव देशमुख यांनी विषद केला. हे काम पुर्ण झाल्‍यास 0.092 टि.एम.सी ऐवढा मोठा पाणी साठा भुगर्भात निर्माण होणार आहे व त्‍याअंतर्गत याचा फायदा कोरडवाहु शेतीतील जवळपास 12500 एकर क्षेत्रातील पिकास संरक्षीत सिंचनासाठी होऊन त्‍यामुळे शेतक-यांच्‍या उत्‍पादनात भरीव वाढ होणार असुन कोरडवाहु शेतीत शाश्‍वता येण्‍यास मदत होणार आहे व याकामी विदयापीठातील शास्‍त्रज्ञांचा तांत्रिक सल्‍ला मोलाचा ठरणार आहे. फाऊनडेशन तर्फे चालु असलेल्‍या उपक्रमाची देखील माहिती करुन घेतली. या अंतर्गत शेवगा लागवड केलेल्‍या प्रक्षेत्रास भेट देऊन विदयापीठाद्वारे नाम फाऊन्‍डेशनला सर्वतोपरी सहकार्य करण्‍यात येईल असे आवर्जुन सांगितले व त्‍यांच्‍या कामाचे कौतुक करुन त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. याप्रसंगी श्री. कांतराव देशमुख यांनी कोरडवाहु शेतीत व  जलयुक्‍त शिवार या कार्यासाठी तांत्रिक मार्गदर्शनाकरीता नाम फाऊनडेशन सोबत विदयापीठाचा सांमजस्‍य करार करण्‍याची ईच्‍छा व्‍यक्‍त केली. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी यावेळी नाम फाऊनडेशनच्‍या विस्‍तार कार्यात विदयापीठाचा सहभाग नोंदवीण्‍यात येईल व लवकरच सांमजस्‍य करार करण्‍यात येईल असे सांगितले. सदरील कामाचा दर्जा अंत्‍यंत चांगला असुन या कामामुळे भावी काळात निश्चितच दिर्घकालीन फायदा होणार असुन गाव टॅकरमुक्‍त होण्‍यासही मदत होणार आहे.

वनामकृवित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. याप्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्‍यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य प्रा पी एन सत्‍वधर, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेची ढोलताशाच्‍या गजरात विद्यापीठाच्‍या वतीने शहरात मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विद्यापीठातील विविध महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.

स्त्री- भ्रुण हत्या थांबविण्यासाठी तरूणांनी पुढाकार घ्यावा ...... शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी

वनामकृवित शिवजयंती उत्‍सव निमित्‍त आयोजित व्‍याख्‍यानमालेचे गुंफले तिसरे पुष्‍प

शत्रुही ज्‍यांचे गौरवाने नाव घेतात असे राजे शिवाजी, सर्वांना सोबत घेऊन जाणारा राजा होता. आज शिवाजी घडवायचा असेल तर जिजाऊ घडली पाहिजे, यासाठी स्‍त्रीयांचा आदर समाजाने केला पाहिजे, स्‍त्री-भ्रुण हत्‍या थांबल्‍या पाहिजेत, यासाठी तरूणांनी पुढाकार घ्‍यावा, असे प्रतिपादन पुणे येथील शिवव्‍याख्‍याते प्रा. यशवंत गोसावी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने शिवजयंती उत्‍सव साजरा करण्‍यात येत असुन यानिमित्‍त आयोजित व्‍याख्‍यानमालेचे तिसरे पुष्‍प गुंफतांना दिनांक १९ फेब्रवारी रोजी ते बोलत होतेकार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण हे होतेव्‍यासपीठावर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉडीएनगोखलेअन्‍नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा पी एन सत्‍वधर, गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्या प्रा विशाला पटणमविद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉमहेश देशमुखविद्यार्थी प्रतिनिधी प्रतिक पठाडेकृष्‍णा होगे यांची उपस्थिती होती.
शिवव्‍याख्‍याते प्रा. यशंवत गोसावी पुढे म्‍हणाले की, जगात महापुरूष कसे घडले, आजच्‍या तरूणांनी इतिहास वाचावा, अभ्‍यास करावा. शेतक-यांसाठी, समाजासाठी, दुर्बलासाठी तरूणांनी कार्य करावे. संस्‍कार विकत मिळत नसतात, यासाठी विचारपीठे उभे करावी लागतात, याच प्रकारचे विचारपीठ महाविद्यालय व विद्यापीठ उपलब्‍ध करू देतात, याचा विद्यार्थ्‍यांनी लाभ घ्‍यावा, असे ते म्‍हणाले.
अध्‍यक्षीय समारोपात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी तरूणांनी विचारवंताचे विचार ग्रहण करावीत. विचारवंताची विचारच माणसाच्‍या जीवनाची दिशा बदलुन टाकतात असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थ्‍यी विजय घाटुळ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा विजय जाधव यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Thursday, February 18, 2016

गृहविज्ञान महाविद्यालयातील एलपीपी स्कूलचा टॅलेन्ट शो थाटात संपन्न

सिनेदिग्दर्शक मा. के. गुरूदेवप्रसाद यांची प्रमुख उपस्थिती


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील गृह विज्ञान महाविद्यालयात असलेल्या लॅब प्रि-प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्‍यांचा टॅलेन्ट शो नुकताच (दि. ९ व १० फेब्रुवारी) संपन्न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षास्‍थानी गृह विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. विशाला पटनम या होत्‍या तर तेलगु चित्रपटांचे दिग्‍दर्शक तथा निर्माता मा. के. गुरूदेवप्रसाद व त्यांच्या पत्नी श्रीमती मा. के. सुगुनादेवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
  पालकांनी विद्यार्थ्‍यांच्या आवडीनुसार शिक्षण व आहार देऊन त्यांच्या छंदानांही तेवढेच प्राधान्य देण्‍याचा सल्‍ला मार्गदर्शनांत मा. के. गुरूदेवप्रसाद यांनी दिला. प्राचार्या प्रा. विशाला पटनम आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाल्‍या की, बालवयातच बालकाच्‍या विकासाचा उत्‍कृष्‍ट पाया रोवला गेला तर निश्चितच ही बालके भविष्‍यात यशस्वी होऊन एक जबाबदार नागरीक होतात, यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत. पालकत्वाची भूमिका निभावत असतांना ती अतिशय निष्‍ठेने निभावत तीन डीज (3 D’s) म्हणजेच डेव्हलपमेंट, डिसिप्लिन व डिव्होशनला महत्व द्यावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. या टॅलेन्ट शोमध्‍ये २५९ विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेऊन विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. यात विद्यार्थ्‍यांनी देशभक्तीपर गीते, शैक्षणिक नाटिका व भाषणे, विविध भाषेतील बालगीते, कोळीनृत्य, लेझीम, फॅशन शो आदींचे अप्रतिम सादरीकरण करून उपस्थितांची मने जिकंली. कार्यक्रमाच्‍या शेवटी सहभागी विद्यार्थ्‍यांना, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांसह शाळेच्या शिक्षण समन्वयिका डॉ जया बंगाळे व विभागातील प्रा. डॉ. रमना देसेटी यांना प्रमुख अतिथीच्‍या हस्‍ते प्रशस्तीपत्रे प्रदान करून त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विभागातील प्राध्यापिका, शिक्षिका, स्‍पेशलायझेशचे विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील पदवीपूर्व विद्यार्थी, पालक आदींचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला

टिप - सदरिल बातमी सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या, गृहविज्ञान महाविद्यालय, परभणी यांच्‍या कडुन प्राप्‍त

Wednesday, February 17, 2016

महा‍पुरूषांचे विचार आपल्या वर्तणुकीत उतरली पाहिजेत........इतिहास संशोधक श्री. गंगाधर बनबरे

वनामकृवित शिवजयंती उत्‍सव निमित्‍त आयोजित व्‍याख्‍यानमालेचे गुंफले दुसरे पुष्‍प

  महा‍पुरूषांचे विचार व आदर्श आपल्‍या वर्तणुकीत उतरली पाहिजेत, हा उद्देश महापुरुषांच्‍या जयंत्‍या व पुण्‍यतिथ्‍या साजरे करण्‍याचा असला पाहिजे. समाजात परिवर्तन घडवायचे असेल तर मोठी स्‍वप्‍ने पाहावी लागतात, यासाठी मॉ जिजाऊ, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, बुध्‍द, महात्‍मा फुले, सावित्रीबाई फुले, अहील्‍याबाई आपले आदर्श झाली पाहिजेत. या महापुरुषांना जातीच्‍या चौकटीत बंदिस्‍त करु नका, असे प्रतिपादन पुणे येथील इतिहास संशोधक श्री गंगाधर बनबरे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने शिवजयंती उत्‍सव साजरा करण्‍यात येत असुन यानिमित्‍त आयोजित व्‍याख्‍यानमालेचे दुसरे पुष्‍प गुंफतांना दिनांक १७ फेब्रवारी रोजी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण उपस्थित होते. व्‍यासपीठावर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, माजी प्राचार्य श्री तनपुरे, प्रा. दिलीप मोरे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, विद्यार्थी प्रतिनिधी प्रतिक पठाडे, कृष्‍णा होगे यांची उपस्थिती होती.
  इतिहास संशोधक श्री गंगाधर बनबरे पुढे म्‍हणाले की, स्‍वत: शिवाजी महाराजांना आठ भाषेचे ज्ञान अवगत होते, शिवाजी महाराजांचे हेरखाते अत्‍यंत मजबुत होते, त्‍या जोरावर ते युध्‍दनिती ठरवित असत. शिवाजी महाराज स्‍वराज्‍य स्‍थापनेत यशस्‍वी होण्‍याचे मुख्‍य कारण म्‍हणजे त्‍यांनी अनेक माणसे घडविली. त्‍यांच्‍या राज्‍यात मनुष्‍य हा केंद्रस्‍थानी होता. आज आपणास शिवाजी महाराजांप्रमाणे तलवारीच्‍या बळावर युध्‍द लढायचे नसुन त्‍यांच्‍या विचाराच्‍या व आदर्शाच्‍या बळावर समाजात परिवर्तन करावयाचे आहे. शिक्षणाद्वारे समाज व्‍यवस्‍थेत परिवर्तन घडु शकते. महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थींनींनी महापुरुषापासुन प्रेरणा घेवुन मोठे स्‍वप्‍न पहावित, ती साकार करण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
  अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू म्‍हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजची प्रशासकीय धोरणे आजही उपयुक्‍त असुन संपुर्ण देश त्‍यांचा आदर्श घेतो. शिवचरित्रापासुन तरुणांनी आदर्श घेण्‍याचा सल्‍ला शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी आपल्‍या मनोगतात दिला.
  कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांनी केले. सूत्रसंचलन कुमार पानझडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिक पठाडे यांनी केले. कार्यक्रमास कृषि विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होतेकार्यक्रम यशस्‍वीतेसाठी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.

Tuesday, February 16, 2016

दुष्काळ परिस्थितीत छत्रपतींचे धोरण आजही मार्गदर्शक.......प्रसिध्द विधिज्ञ अॅड वैशालीताई डोळस

वनामकृवित शिवजयंती उत्‍सव निमित्‍त गुंफले पहिले पुष्‍प

छत्रपती महाराजांचे धोरण सर्वसामान्‍य जनता, कामगार, शेतकरी, महिला यांच्‍यासाठी कल्‍याणकारी धोरण होते. दुष्‍काळ परिस्थिती व शेतकरी आत्‍महत्‍येच्‍या पार्श्‍वभुमीवर छत्रपतींचे धोरण आजही मार्गदर्शक आहे. माझ्या शेतक-यांच्‍या भाजीच्‍या देठालाही हात न लावण्‍याचा आदेश देणारे ते राजे होते. त्‍यांच्‍या राज्‍यात शेतक-यांच्‍या उभ्‍या पिकातुन घोडे हाकण्‍यास सक्‍त मनाई करण्‍यात आली होती, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील प्रसिध्‍द विधिज्ञ अॅड. वैशालीताई डोळस यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने शिवजयंती उत्‍सव साजरा करण्‍यात येत असुन व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले आहे, दिनांक १६ फेब्रवारी रोजी या व्‍याख्‍यानमालेचे पहिले पुष्‍प गुंफतांना त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू होते तर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, गृह विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्या प्रा. विशाला पट्टनम, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील व विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, विद्यार्थी प्रतिनिधी प्रतिक पठाडे, कृष्‍णा होगे यांची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मा. अॅड. वैशालीताई डोळस पुढे म्‍हणाल्‍या की, आरमार बांधण्‍यासाठी लागणारी लाकडे शेतक-यांच्‍या परवानगीने जुनी झाडे तोडावीत असे सक्‍त आदेश छत्रपतींनी दिले होते.  सैनिकांनी रात्रे दिवे बंद करुन झोपण्‍याचे आदेश होते, कारण दिव्‍याची वात शेतात उंदराने नेवुन शेतमाल भस्‍मसात होवु शकतो, असे शेतक-यांच्‍या हितासाठी बारकाव्‍यांनी विचार करणारे राजे होते. स्‍थानिक शेतक-यांच्‍या मालास भाव मिळवा म्‍हणुन परकीय व्‍यापा-यांच्‍या मालावर त्‍यावेळी जकात लावली जायची. त्‍यांच्‍या काळात दुष्‍काळ परिस्थितीत पीक पाहुनच कर निश्‍चीत केला जात असे, यावरुन छत्रपती दुर्लक्षीत अशा शेतकरी घटकांना किती महत्‍व देत होते हे निश्‍चीत होते. सामान्‍य जनतेचे शोषण थां‍बविण्‍याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते, त्‍यामुळेच आजही लोकांचे या लोकराजावर प्रचंड प्रेम आहे. परस्‍त्री माते समान असुन स्‍त्रीवर अत्‍याचार केल्‍यास छत्रपतींच्‍या राज्‍यात शिक्षा दिल्‍या जात होत्‍या. आजही स्‍त्रीकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदलला नाही. पुरुषप्रधान व्‍यवस्‍था समाजाने सोडुन दिली पाहिजे यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांनी पुढाकार घ्‍यावा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

कार्यक्रमाचा अध्‍यक्षीय समारोह मा. कुलगुरु डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांनी केले तर विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. सूत्रसंचलन प्रा. एस. एल. बडगुजर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमास कृषि विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सचिन कदम, मुंजा रेंगे आदिसह महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. शिवजयंती उत्‍सव निमित्‍त आयोजित व्‍याख्‍यानमालेत दिनांक १७ व १९ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे पुणे येथील इतिहास संशोधक श्री गंगाधर बनबरे व प्रा. यशवंत गोसावी यांचे व्‍याख्‍याने कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात सकाळी १०.०० वाजता आयोजीत करण्‍यात आली आहेत. 

वनामकृवितील बेचाळीस पदवीधर महाराष्ट्र वन सेवा मुख्य परिक्षेत उत्तीर्ण

माननीय राज्‍यपालांनी अभिनंदन करून दिल्‍या शुभेच्‍छा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील बेचाळीस पदवीधर महाराष्‍ट्र राज्‍य लोकसेवा आयोग मार्फत घेण्‍यात आलेल्‍या सहाय्यक वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल पदाकरिता महाराष्‍ट्र वन सेवा मुख्‍य परिक्षेत उत्तीर्ण झाले. याबाबत माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. चे. विद्यासागर राव यांनी दिनांक ११ फेब्रुवारी रोजी कृषि महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात अभिनंदन करून यशस्‍वी विद्यार्थ्‍यांना प्रशासनात चांगले कार्य करण्‍याचा सल्‍ला दिला. याप्रसंगी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, विभागीय आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट, जिल्‍हाधिकारी मा श्री राहुल रंजन महिवाल, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे समस्‍य मा. श्री अनंतराव चोंदे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ बाबासाहेब ठोंबरे, श्रीकृष्‍णा वरकड आदी उपस्थित होते. यावेळी कृषि महाविद्यालयातील उत्तीर्ण झालेल्‍या विद्यार्थीपैकी संदिप चव्‍हाण, जनमेंजय जाधव, हनुमंत जाधव, गंगाधर ढगे, सचिन खुणे, चेतन अहिरे, मयुर सुरवसे, विश्‍वनाथ टाक, सतिश उटके, अश्विनी आपेट, तुकाराम कदम, अविनाश तैनाक, श्रीकांत जाधव, प्रज्ञा वडमारे आदी उपस्थित होते.

Monday, February 15, 2016

वनामकृविच्या कीड व्यवस्थापन मोबाईल ॲपचे माननीय राज्यपाल श्री­. चे. विद्यासागर राव यांचे हस्ते लोकार्पण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि कीटकशास्त्र विभाग यांनी मुख्य पिकांवरील कीड व्यवस्थापनाची परिपूर्ण माहिती असलेले आयपीएम व्‍हीएनएमकेव्‍ही (IPM VNMKV) या अँड्राईड मोबाईल ॲप्लीकेशनची निर्मिती केली आहे. या ॲप्लीकेशनचे लोकार्पण महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. चे. विद्यासागर राव व कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्वरलु यांचे हस्ते दिनांक ११ फेबुवारी रोजी कृषि महाविद्यालयाच्‍या  सभागृहात झाले. यावेळी जिल्‍हा परिषद अध्यक्ष मा श्री राजेश विटेकर, खासदार मा. श्री संजय जाधव, मदार मा डॉ. राहुल पाटील, महापौर सौ. संगीता वडकर, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दागंट तसेच जिल्‍हाधिकारी मा. श्री राहुल रंजन महिवाल, विद्यापीठ कार्यकारीणी परिषदेचे सन्‍माननीय सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, मा. श्री रविंद्र देशमुख, मा. श्री अनंतराव चोंदे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव श्री दिलीप कच्‍छवे आदिसह प्रगतशील शेतकरी, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्‍यापक, कर्मचारी व‍ विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
राज्‍यात मोठ्या प्रमाणात तरुण शेतकरी वर्ग असुन मोबाईल हे तरुण शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. हे ओळखुन मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करुन कीड व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्‍याकरिता कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्वरलु विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कीटकशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांच्या साहाय्याने या ॲपची निर्मीती केली. या मोबाईल ॲपमध्ये कापूस, सोयाबीन, ऊस, ज्वारी, तूर, हरभरा, मूग, उडीद, बाजरी, मका, गहू, तीळ आदी प्रमुख पिकांवर येणाऱ्या किडी, त्यांची ओळख तसेच किडींचे एकात्मिक व्यवस्थापन, किडींसाठी शिफारस केलेली नेमकी कीटकनाशके, त्यांचे प्रमाण इत्यांदीची माहिती विस्तृतपणे छायाचित्रांसह उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे ॲप्लीकेशन ज्या शेतक­याकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे, त्यांना गुगल प्लेस्टोअर वर IPM VNMKV Parbhani सर्च केल्यास मोफत डाऊनलोड करता येईल. यानंतर वेळोवेळी होणा­या सुधारणा व अधिक माहिती आपोआप अदयावत होईल.
सदरील अॅप्लिकेशन कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्वरलु व विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्या मार्गदशनाखाली लेखन, निर्मिती व संपादनासाठी प्रा. बी. व्ही. भेदे, डॉ. पी. आर. झंवर, डॉ. अनंत बडगुजर, डॉ. दयानंद मोरे या शास्त्रज्ञांनी तसेच तांत्रिक मदतनीस श्री.विकास खोबे, श्री.गणेश शिवलाड, श्री. विकास पावडे व श्री.पी.डी.बोकारे यांच्‍या सहकार्य केले. राज्‍यातील शेतकरी हा स्मार्ट शेतकरी होण्यासाठी विद्यापीठाचा हा एक प्रयत्न आहे. यापूर्वी कृषि कीटकशास्त्र विभागाने VNMKV Kapus ॲप विकसीत केले असून त्याचा फायदा मोठया प्रमाणात राज्‍यातील शेतकरी घेत आहेत.