Monday, November 29, 2021

शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले आयएसए फेलो पुरस्काराने सन्मानित

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ धर्मराज गोखले यांना  राज्य व राष्ट्रीय पातळीवर केलेल्या कृषि संशोधन, विस्‍तार व शिक्षण क्षेत्रातील कार्याबाबत राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित असा भारतीय कृषि विद्या संस्थेचे आयएसए फेलो पुरस्‍काराने नुकतेच हैद्राबाद येथे गौरविण्‍यात आले. प्रोफेसर जयशंकर तेलंगना राज्य कृषि विद्यापीठ, राजेंद्रनगर हैदराबाद येथे दिनांक 23 ते 27 दरम्‍यान पार पडलेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय कृषिविद्या परिषदेमध्ये कुलगुरू मा. डॉ. व्ही. प्रवीण राव, राणी लक्ष्मीबाई केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ पंजाब सिंग, अमेरिकास्थित पिक विज्ञान संस्थेचे अध्‍यक्ष मा. डॉ पी. व्ही. वराप्रसाद, वनामकृविचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. व्ही एम भाले, अमेरीकास्थित आंतरराष्ट्रीय तण विद्यान संस्थेचे अध्‍यक्ष  मा. डॉ समुंदर सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ. धर्मराज गोखले यांनी मागील 30 वर्षामध्ये केलेल्‍या कृषि संशोधन, विस्‍तार कार्य व कृषि शिक्षण कार्यातील योगदाना बद्दल हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.

डॉ. भगवान आसेवार आयएसए फेलो पुरस्काराने सन्मानित

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कृषी विद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. भगवान आसेवार यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर केलेल्या कृषि संशोधन, विस्‍तार व शिक्षण क्षेत्रातील कार्याबाबत राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित असा भारतीय कृषि विद्या संस्थेचे आयएसए फेलो पुरस्‍काराने नुकतेच हैद्राबाद येथे गौरविण्‍यात आले. प्रोफेसर जयशंकर तेलंगना राज्य कृषि विद्यापीठ, राजेंद्रनगर हैदराबाद येथे दिनांक 23 ते 27 दरम्‍यान पार पडलेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय कृषिविद्या परिषदेमध्ये कुलगुरू मा. डॉ. व्ही. प्रवीण राव, राणी लक्ष्मीबाई केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ पंजाब सिंग, अमेरिकास्थित पिक विज्ञान संस्थेचे अध्‍यक्ष मा. डॉ पी. व्ही. वराप्रसाद, वनामकृविचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. व्ही एम भाले, अमेरीकास्थित आंतरराष्ट्रीय तण विद्यान संस्थेचे अध्‍यक्ष  मा. डॉ समुंदर सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ. भगवान आसेवार यांनी मागील २४ वर्षामध्ये केलेल्‍या कृषि संशोधन, विस्‍तार कार्य व कृषि शिक्षण कार्यातील योगदाना बद्दल हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. या पुरस्काराबद्दल कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचलाक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर आदींनी अभिनंदन केले.

Sunday, November 28, 2021

वनामकृविच्‍या वतीने ऑनलाईन उन्‍हाळी सोयाबीन बीजोत्‍पादन कार्यशाळेचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील संशोधन संचालनालय आणि सोयाबीन संशोधन योजना यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता ऑनलाईन उन्‍हाळी सोयाबीन बीजोत्‍पादन कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले असुन कार्यशाळेस उदघाटक म्‍हणुन इंदौर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्‍थेचे संचालक मा डॉ निता खांडेकर हे उपस्थित राहणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार आहे. कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व इंदौर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्‍थेचे माजी संचालक डॉ विरेंद्रसिंह भाटीया यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सदरिल ऑनलाईन कार्यशाळा झुम मिटिंग माध्‍यमातुन होणार असुन झुम मिटिंग आयडी ८६८५६८४३६५० हा असुन पासवर्ड १२३४५ आहे, तसेच कार्यशाळेचे थेट प्रसारण विद्यापीठ युटयुब चॅनल youtube.com/user/vnmkv वरही करण्‍यात येणार आहे. कार्यशाळेत उन्‍हाळी सोयाबीन बीजोत्‍पादनाची आवश्‍यकता यावर डॉ सतिष निचळ, उन्‍हाळी सोयाबीन बीजोत्‍पादनासाठी वाणाची निवड यावर डॉ मिलिंद देशमुख, उन्‍हाळी सोयाबीन लागवड तंत्रज्ञानावर डॉ शिवाजी म्‍हेत्रे, उन्‍हाळी सोयाबीन पीकावरील किडींचे व्‍यवस्‍थापनावर डॉ राजेंद्र जाधव, उन्‍हाळी सोयाबीन रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ विक्रम घोळवे, उन्‍हाळी सोयाबीन काढणी, हाताळणी व साठवणुक यावर डॉ खिजर बेग आदी मार्गदर्शन करणार असुन शेतकरी बांधवाच्‍या उन्‍हाळी सोयाबीन बीजोत्‍पादनाविषयीचे प्रश्‍न व शंका यावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ उत्‍तरे देणार आहेत.  

तरि सदरिल ऑनलाईन कार्यशाळेचा लाभ महाबीज, महाराष्‍ट्र राज्‍य बीज प्रमाणीकरण यंत्रणा, कृषि विज्ञान केंद्रे, कृषि विभाग, शेतकरी बीजोत्‍पादन कंपनी, शेतकरी गट, शेतकरी बांधवांनी घ्‍यावा असे आवाहन सोयाबीन संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ शिवाजी म्‍हेत्रे व सहाय्यक किटकशास्‍त्रज्ञ डॉ राजेंद्र जाधव यांनी केले आहे.

Saturday, November 27, 2021

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने संविधान दिन साजरा

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात संविधान दिनाच्या निमित्ताने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अन्तर्गत भारतीय संविधान दिन दिनांक २६ नोव्‍हेबर रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ‘भारतीय संविधान आजच्या संदर्भात’ याविषयावर श्री शिवाजी विधि महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विजय माकणीकर यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सहयोगी अधिष्‍ठात डॉ जया बंगाळे या होत्‍या. 

व्‍याख्‍यानात डॉ. विजय माकणीकर यांनी संविधानाचे मूलभूत तत्वे, मूलभूत हक्कसंविधानाने दिलेले स्वातंत्र्य तसेच आजच्या संदर्भात विविध न्यायालयीन निवाडे यांचा संदर्भ देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ जया बंगाळे यांनी विद्यार्थ्‍यांनी भारतीय संविधान समजुन घेऊन भारतीय संविधानातील मुलतत्वाप्रमाणे जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्याचा प्रयत्‍न करावा असा सल्‍ला दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विद्यानंद मनवर यांनी केले तर आभार डॉ. शंकर पुरी यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. नाहीद खान, डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. सुनिता काळे, डॉ. शंकर पुरी आदीसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रॉपसॅप अंतर्गत मध्यहंगामी विभागीय ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभाग व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प - क्रॉपसॅप २०२१-२२ अंतर्गत मध्यहंगामी पिकांतील किड व रोग व्‍यवस्‍थापनावर ऑनलाईन प्रशिक्षणाचे दि २६ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्‍या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर हे होते तर विभागीय कृषि सहसंचालक (औरंगाबाद) डॉ.दिनकर जाधव, विभागीय कृषि सहसंचालक (लातुर) श्री. साहेबराव दिवेकर, क्रॉपसॅप प्रकल्पाचे राज्यस्तरीय सकाणू समिती सदस्य तथा कृषि किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, समन्वय अधिकारी डॉ. अनंत लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. देवराव देवसरकर यांनी अचूक किड रोग सर्वेक्षण योग्य वेळी करणे आणि त्यानुसार विद्यापीठाकडुन व कृषि विभागाकडुन व्यवस्थापनाबाबत वेळोवेळी किड रोग नियोजनाचा योग्य सल्ला देण्यात यावा असे सांगितले. मार्गदर्शनात डॉ. दिनकर जाधव यांनी रब्बी हंगामात सर्वांनी जबाबदारीने काम करून कृषि अधिकारी व क्षेत्रीय कर्मचा-यांनी किड व रोग हॉटस्पॉट ओळखून व प्रत्‍यक्ष बांधावर जाउन शेतक-यांना वेळीच सल्ला देण्‍याचे आवाहन केले तर श्री. साहेबराव दिवेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात कृषि अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांना किड सर्वेक्षण हंगामाच्या सुरुवातीपासुन १०० टक्के अचुक किड-रोग सर्वेक्षण करुन वेळोवेळी शेतकरी बांधवांना सल्ला देण्यात यावा जेणे करुन उत्पादनात वाढ होईल, असे सांगितले. 

तांत्रिक सत्रामध्ये डॉ. अनंत लाड यांनी हरभरा पिकावरील किडींचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मका व ज्वारी लष्करी अळीचे व्यवस्थापन, डॉ. डॉ. प्रशांत सोनटक्के यांनी हरभरा पिकावरील रोग व्यवस्थापन, डॉ. संजोग बोकन यांनी हरभरा व ज्वारी वरील किडींचे सर्वेक्षण याबाबत मार्गदर्शन केले. तसेच क्रॉपसॅप प्रपत्र नोंदणी व प्रात्याक्षिक याबाबत डॉ. राजरतन खंदारे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. संजीव बंटेवाड यांनी कीड सर्वेक्षणाचे महत्व विषद करून कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी कीड व रोग सर्वेक्षणाचे काम जबाबदारीने करण्‍याचे आवाहन केले. सुत्रसंचालन डॉ अनंत लाड यांनी केले तर आभार डॉ. संजोग बोकन यांनी मानले. सदरिल प्रशिक्षण मराठवाडयातील लातुर व औरंगाबाद विभागातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी व कृषि पर्यवेक्षक यांच्याकरिता आयोजित करण्‍यात आले होते.  प्रशिक्षणास लातुर व औरंगाबाद विभागातील ३०० हुन अधिक कृषि विभागातील अधिका-यांची ऑनलाईन उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजरतन खंदारे, श्री. दिपक लाड यांनी परिश्रम घेतले.

Friday, November 26, 2021

डॉ. हनुमान गरुड यांना इंडियन सोसायटी ऑफ अग्रोनोमी चा उत्‍कृष्‍ट आचार्य प्रबंध पारितोषिक

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी विद्या शाखेत आचार्य पदवी संपादन केलेले विद्यार्थी डॉ. हनुमान गरुड यांना नवी दिल्ली येथील इंडियन सोसायटी ऑफ अग्रोनोमी - आयएआरआय यांच्या तर्फे देण्यात येणारा  आयएसए - बेस्ट पिएचडी थेसिस अवार्ड (वेस्ट झोन) प्रदान करण्यात आला. हैदराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय अग्रोनोमी कॉंग्रेस २०२१ मध्ये क्रॉप सायन्स सोसायटी ऑफ अमेरिकाचे अध्‍यक्ष मा डॉ. पी. व्ही. वाराप्रसाद आणि राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. पंजाब सिंग यांच्या प्रदान करण्‍यात आला, यावेळी इंडिअन सोसायटी ऑफ अग्रोनोमी चे अध्‍यक्ष तथा हैदराबाद येथील तेलंगना कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. प्रवीण राव, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. व्ही. एम. भाले आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते डॉ. हनुमान गरुड यांना रोख दहा हजार रुपये तसेच प्रशस्तीपत्र देऊन प्रदान करण्यात आला.

डॉ हनुमान गरूड यांच्‍या आचार्य पदवी चा शोधप्रबंध “परफॉर्मन्स ऑफ डिफरंट लेंड कॉन्फिग्युरेशन अंडर पिजनपी बेसड इंटरक्रॉपिंग सिस्टीम्स” या विषयावर होता. त्यांचे आचार्य पदवी चे मार्गदर्शक कृषी विद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. भगवान आसेवार हे होते तर सल्लागार समिती मध्ये कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, डॉ. मिर्झा आयएबी आणि डॉ. आर. व्ही. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या पुरास्कारासाठी डॉ. हनुमान गरुड यांची वेस्ट झोन (महाराष्ट्र गुजरात, गोवा आणि राजस्थान) मधून निवड झाली.

Sunday, November 21, 2021

विज्ञान संकुल विकासाकरिता वनामकृवि व परभणी खगोलशास्‍त्र संस्‍था यांच्‍यात सामंजस्‍य करार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भव्‍य विज्ञान संकुल उभारण्‍यात येणार असुन याकरिता विद्यापीठ व परभणी खगोलशास्‍त्र संस्‍था यांच्‍यात दिनांक २१ नोव्‍हेंबर रोजी सामंजस्‍य करार करण्‍यात आलासदरिल विज्ञान संकुल उभारणी करिता आमदार माननीय डॉ राहुल पाटील यांनी पुढाकार घेतला. सदरिल संकुलच्‍या न‍िर्मितीसाठी तीन कोटीचा निधी उपलब्‍ध होणार असुन लवकरच नियोजित विज्ञान संकुल निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्‍यात येणार आहे. सामंजस्‍य करार कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन माननीय आमदार डॉ राहुल पाटील हे होते होते. यावेळी विख्‍यात वैद्यकिय चिकित्‍सक डॉ रामेश्‍वर नाईकशिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखलेसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरकुलसचिव डॉ धीरजकुमार कदमप्राचार्य डॉ उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होतीयावेळी करारावर विद्यापीठाच्‍या वतीने शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखलेसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरकुलसचिव डॉ धीरजकुमार कदम आदींनी सहया केल्‍या तर परभणी खगोलशास्‍त्र संस्‍थेच्‍या वतीने डॉ रामेश्‍वर नाईकओमप्रकाश तलरेजासुधीर सोनुनकर आदींनी सहया केल्‍या.

याप्रसंगी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले कीवनामकृवि व परभणी खगोलशास्‍त्र संस्‍थाचा यांच्‍यातील सांमजस्‍य करार हा एक ऐतिहासिक क्षण ठरेल. नियोजित विज्ञान संकुल हे विज्ञानातील विविध विद्याशाखेंचा समावेश असलेले आगळेवेगळे दालन तयार करण्‍यात येणार असुन यास भविष्‍यात ज्ञान गंगेचे स्‍वरूप प्राप्‍त होईलनवीन शैक्षणिक धोरणात मुलभुत विज्ञानउपयोजित विज्ञान व इतर शाखा एकत्रित येऊन बहुविद्याशाखीय शिक्षणाचा समावेश आहे, हे विज्ञान संकुल नवीन शैक्षणिक धोरणाची नांदी असेलनुकतेच कृषि शिक्षण हे शालेय शिक्षणात समाविष्‍ठ केले आहेकृषि विज्ञान सोबतच मुलभुत विज्ञान व उपयोजित विज्ञानातील नवनवीन संकल्‍पना एकाच ठिकाणी विद्यार्थ्‍यांना पाहण्‍यास मिळणार आहेतयात अंतराळ विज्ञानरसायनशास्‍त्रभौतिकशास्‍त्रअभियांत्रिकी पर्यावरणशास्‍त्रखगोलशास्‍त्र आदींची समावेश असणार आहेपरभणी कृषि विद्यापीठाने डिजिटल शेती तंत्रज्ञानात आघाडी घेतली असुन विज्ञान संकुलाच्‍या माध्‍यमातुन ही चळवळ अधिक व्‍यापक होणार आहेसंकुलामुळे युवकांमध्‍ये वैज्ञानिक प्रबोधन होणार असुन मुलभुत व उपयोजित विज्ञानामुळे शेती विज्ञान ही अधिक प्रगल्‍भ होणार आहे. याचा लाभ विद्यार्थी व संशोधनकांना होणार असुन या माध्‍यमातुनच उदयाचे आतंरराष्‍ट्रीय दर्जाचे शास्‍त्रज्ञ घडतीलया प्रकल्‍पात परभणी कृषि विद्यापीठ नॉलेज पार्टनर राहणार आहे.

मार्गदर्शनात माननीय आमदार डॉ राहुल पाटील म्‍हणालेपरभणी हे शिक्षणाचे व संशोधनाचे माहेरघर निर्माण व्‍हावेशालेय जीवनातच विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टीकोन निर्माण व्‍हावातसेच आपल्‍या भागातील विद्यार्थ्‍यांतुन आंतरराष्‍ट्रीय र्कीतीचे शास्‍त्रज्ञ घडावेत हा दृष्‍टीकोन ठेऊन विज्ञान संकुलाचे कार्य हाती घेण्‍यात आले आहेविद्यापीठात आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे विज्ञान संकुल विकासत होणार असुन याकरिता तीन कोटीचा निधी उपलब्‍ध करून देण्‍यात आला आहेयामुळे शैक्षणिक पर्यटनास चालना मिळणार आहेहे विज्ञान संकुल उभारणीचे कार्य एक क्रांतीकारक पाऊल ठरेलअशी अपेक्षा त्यांनी व्‍यक्‍त केली.

नियोजित विज्ञान संकुलाबाबत बोलतांना मा डॉ रामेश्‍वर नाईक म्‍हणाले कीमराठवाडयातील ग्रामीण विद्यार्थ्‍यांमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय कीर्तीचे शास्‍त्रज्ञ बनन्‍याची क्षमता आहेत्‍या क्षमतेस वाव देण्‍याची गरज आहेपरभणी खगोलशास्‍त्र संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टीकोन विकस‍ित करण्‍याची चळवळीस नियोजित विज्ञान संकुलामुळे गती प्राप्‍त होणार आहेपरभणीतीलच नव्‍हे तर राज्‍यातील विज्ञान प्रेमी करिता नियोजित विज्ञान संकुल दिशादर्शक ठरेलविद्यार्थ्‍यांना करिअर मार्गदर्शक म्‍हणुन हे संकुल कार्य करेलनवीन शैक्षणिक धोरणानुसार कोणतेही विद्याशाखे एक स्‍वतंत्रपणे कार्य न करतासर्व विद्याशाखा एकत्रित कार्य करणार आहेतहे विज्ञान संकुल राज्‍यातीलच नव्‍हे देशातील एक अनोखे संकुल राहणार आहेया करिता आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय संस्‍थेची मदत होणार आहेऔंढ नागनाथ परिसरात गुरूत्‍व लहरीचा अभ्‍यास करणारी जागतिक किर्तीची नासानंतरचे तिस-या क्रमांकाची लिगो नावाची प्रयोगशाळेेेची उभारणी होत आहे. सदरिल प्रयोगशाळेत आपल्‍याही विद्यार्थ्‍याना संधी प्राप्‍त होऊ शकेल. लवकर विज्ञान संकुल संकल्‍पने मुर्त स्‍वरूप देण्‍याकरिता पुढील महिन्‍या दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आल्‍याची माहिती त्‍यांनी दिली. 

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रकल्‍पाचे मुख्‍य डॉ कैलास डाखोरे यांनी केलेकार्यक्रमास डॉ संजीव बंडेवाडडॉ गोपाल शिंदेडॉ एम जी जाधवडॉ ए एस जाधवडॉ के एस बेगडॉ एस पी मेहत्रेडॉ संतोष कदमडॉ अनंत लाडओमप्रकाश तलरेजासुधीर सोनुनकरविजयकिरण नरवाडेबालाजी कोंढरेवेदप्रकाश आर्याडॉ रंजीत लाडपदमाकर पवारदिपक शिंदेप्रसन्‍ना भावसार आदी उपस्थित होते.

 



Wednesday, November 17, 2021

शेतीत शाश्वतता निर्माण करण्याकरीता पीक संरक्षण तंत्रज्ञानावर भर द्यावा लागेल ..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

लातूर कृषि महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय परिसंवादात प्रतिपादन

आज शेती क्षेत्रापुढे अनेक समस्या आहेत तसेच अनेक संधी देखील आहेत, देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन अतिरिक्त धान्य निर्मिती करित आहे. दर्जेदार व किफायतशीर अन्नधान्य निर्मितीचे आपले ध्येय असले पाहिजे. सुरक्षित अन्न पोषणाचे ध्येय साध्य करण्यासाठी शेतीत रासायनिक किडनाशक व रोगनाशकांचा अतिरेकी वापर टाळणे अत्यावश्यक आहे. शाश्वत शेतीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापना बरोबरच जैवतंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान इत्यादींचा कृषि विकासासाठी अवलंब करणे गरजेचे आहे, असे मत कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष, नवी दिल्ली येथील भारतीय वनस्पती रोगशास्त्र संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दिनांक 17  18 नोव्हेंबर रोजी शाश्वत पीक उत्पादनाकरिता अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पीक संरक्षण यावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचेए लातूर येथील कृषि महाविद्यालयात आज उद्घाटन झाले या परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून नॅचरल शुगर व संलग्न उद्योग समुहाचे अध्यक्ष कृषिभुषण मा बी बी ठोंबरे हे होते व्यासपीठावर संचालक शिक्षण डॉ धर्मराज गोखले, नवी दिल्ली येथील भारतीय पीक रोगशास्त्र संस्थेच्या अध्यक्षा डॉ प्रतिभा शर्मा, सचिव डॉ रॉबिन गोगाई, अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ आर एम गाडे, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, परिसंवादाचे आयोजक कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ अंगद सुर्यवंशी, विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा हेमंत पाटील, विभाग प्रमुख डॉ कल्याण आपेट, माजी विभाग प्रमुख डॉ व्‍ही व्‍ही दातार, सचिव डॉ चंद्रशेखर अंबाडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्हणाले कि, किटकशास्त्रज्ञ, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, कृषि विद्या, मृदा शास्त्रज्ञ आणि अनुषंगीक कृषि शाखांनी वाढत्या लोकसंख्येला पोषक व सुरक्षित अन्नपुरवठा करण्यासाठी एकत्रित संशोधन करणे आवश्यक आहे. सदरील परिसंवादातून शाश्वत शेती उत्पन्नाचे धोरण निश्चित करण्यासाठी पीक शास्त्रज्ञांनी वाढत्या लोकसंख्येला पोषक व सुरक्षित अन्न पुरवठा करण्यासाठी एकत्रित संशोधन करणे आवश्यक आहे.

मार्गदर्शनात कृषिभुषण मा श्री बी बी ठोंबरे म्हणाले कि, आज देश अन्नधान्य व चारा पीकात स्वयंपूर्ण झाला आहे, परंतू जगभर इंधन तुटवाडयाची गंभीर समस्या जाणवत आहे. भारत देश लौकिक अर्थाने आत्मनिर्भर करण्यासाठी कृषि शास्त्रज्ञांनी शेतीतील टाकावू पदार्थापासून व इतर वनस्पतीपासून जैवइंधन निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची निकड आहे.

परिसंवादात भारत सरकारचे माजी कृषि आयुक्त तथा माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्त मायी यांनी आभासी माध्यमाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात ते म्‍हणाले की, प्राप्त परिस्थितीत विविध पीकांवर नवीन रोगांचा प्रादुर्भाव होत असून त्यामुळे सुमारे 25 टक्के लोकसंख्येला पुरेल इतक्या अन्नधान्यांची नासाडी व नुकसान होत आहे, त्यामुळे पीकांवरील विविध रोग व किडींच्या व्यवस्थापनासाठी रसायनांचा अतिरेकी वापर टाळून जैविक किड व रोगनाशकांचा सरसकट वापर करणे अत्यावश्यक आहे.

याप्रसंगी डॉ प्रतिभा शर्मा यांनी भारतीय पीक रोगशास्त्र संस्थेच्या कारर्किदीचा लेखाजोखा मांडला तर डॉ रॉबिन गोगोई यांनी या संस्थेच्या विविध क्षेत्रातील विशेषत: रोगशास्त्रातील संशोधन कार्याचा आढावा दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे यांनी केले तर आभार डॉ चंद्रशेखर अंबाडकर यांनी मानले.  कार्यक्रमात विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सदरिल दोन दिवसीय परिसंवादात राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील तसेच गुजरात व गोवा राज्यातील कृषि शास्त्रज्ञ, अभ्यासक, प्राध्यापक, कृषि उद्योजक, विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी आदींनी सहभाग नोंदविला असुन परिसंवादात पीक संरक्षणावर मंथन करणार आहे. परिसंवादाचे आयोजन सचिव लातूर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंगद सुर्यवंशी, सहसचिव डॉ चंद्रशेखर अबाडकर, स्थानिक आयोजन समितीचे चेअरमन डॉ आनंद कारले हे असून परिसंवादाचे आयोजन लातूर कृषि महाविद्यालय कै विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषितंत्र विद्यालय, गळीत धान्य संशोधन केंद्र येथील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

Tuesday, November 16, 2021

तुरीवरील किडींचे फुलोरा अवस्थेपासूनच व्यवस्थापन करा

वनामकृविच्‍या किटकशास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

तुरीमध्ये फुलोरा व शेंगा भरणे या अतिशय संवेदनशील अवस्था असून यावर मारूका, शेंगा पोखरणारी अळी व शेंग माशी या किडींचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास ७० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. पिकाचे नुकसान शेवटी पीक काढणी झाल्यावर उत्पादनात घट दिसून येते. नॆसर्गिक वातावरणात क्रायसोपा, भक्षक कोळी, ढालकिडा या मित्र कीटकांची संख्या वाढत असते. त्यामुळे थेट रासायनिक किटकनाशकाची फवारणी न करता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा म्हणजे मशागतीय, यांत्रिकीय, जैविक पध्दतींचा अवलंब करावा. या पध्दती कमी खर्चिक व पर्यावरणपूरक असुन मित्रकीटकांना व मानवी आरोग्याला हानी होत नाही. पीक ५० टक्के फुलोऱ्यात आल्यापासून जैविक कीटकनाशकाचा व किडींच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. जर किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास तेव्हाच लेबलक्लेमनुसार रासायनिक किटकनाशकाची फवारणी केली पाहीजे. शेतकरी बांधवानी पिकाचे संरक्षण करण्यासाठी सुरवातीपासून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे गरजेचे आहे.किडींच्या वेळीच व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधवाना किडींची ओळख, जीवनक्रम माहीत असणे आवश्यक आहे.

पाने व फुले जाळी करणारी अळी - या किडीला मारूका व ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी या नावाने सुध्दा ओळखले जाते. या किडीचा प्रौढ मादी पतंग पिवळसर रंगाची असते. ती उभट आकाराची अंडी पुंजक्यात शक्यतो झाडाच्या शेंडयावर घालते. अळी १४ मि.मि. लांबीची हिरवट पांढरी व दोन्ही बाजुस काळे ठिपके असलेली असते.अळी अवस्था १२ ते १४ दिवसांची असून पतंग अवस्था ६ ते ७ दिवसात पूर्ण होते. या किडीचा जीवनक्रम २६ ते ३१ दिवसात पूर्ण होतो. या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पिक फुलोऱ्यात येण्याच्या कालावधीत जास्त आद्रता व मध्यम तापमान वेळी आढळून येतो. ही अनुकूलता सप्टेंबर ते ऑक्टोम्बरमध्ये मिळाल्याने किडीचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो. ही अळी पाने फुले कळया व शेंगा यांचा एकत्र गुच्छ तयार करुन त्यात लपुन बसते आणि उदर्निवाह करते. वाढ होणारे कोवळे शेंडे, पाने एकमेकांना चिकटल्याने खोडाची वाढ खुंटते, तेथील फुले निस्तेज दिसतात व शेंगाची वाढ होत नाही अशाप्रकारे ५ ते २५ टक्केपर्यंत उत्पादनात घट होऊ शकते.

शेंगा पोखरणारी अळी - तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या कीडीमध्ये हिरवी अळी किंवा घाटे अळी ही भयंकर नुकसानकारक कीड आहे. ही किड बहुभक्षी असून जवळपास २०० पिकांवर (तुर, कापूस, सोयाबीन,भेंडी, टोमॅटो,हरभरा इ.) पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीचा जीवनक्रम चार अवस्थेत म्हणजेच अंडी, अळी, कोष व पतंग अशा प्रकारे पुर्ण होतो. अळी रंगाने हिरवट पिवळसर असुन अंगावर तुरळक समांतर रेषा असतात. पुर्ण वाढ झालेली अळी साधारणपणे ४ सें.मी. लांब  असते. या अळीच्या वर्षातुन ७ ते ९ पिढया तयार होतात. एक मादी सरासरी ८०० अंडी कोवळी पाने, देठे किंवा कळया, फुले तसेच शेंगावर सुध्दा घालते. ४ ते ७ दिवसांनी या अंडयातुन अळया बाहेर पडतात व १४ ते १६ दिवसांपर्यंत पुर्ण वाढ होवुन त्या झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत मातीच्या वेष्ठणात कोषावस्थेत जातात. कोषातुन पतंग बाहेर पडतात अशाप्रकारे अळीचा जिवनक्रम पुर्ण होतो. हया किडीचा जीवनक्रम - आठवडयात पुर्ण होतो. अंडयातून बाहेर निघालेल्या प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या अगोदर तुरीची कोवळी पाने खाते, पिक फुलोऱ्यात आल्यावर कळयावर उपजिवीका करते. नंतर शेंगा लागल्यावर शेंगांना छिद्र पाडून अर्धे शरीर बाहेर व अर्धे शरीर आत ठेवून आतील दाणे खाते. तसेच मोठया अळया शेंगाना छिद्रे करुन आतील दाणे पोखरुन खातात. अशा प्रकारे एक अळी ३० ते ४० शेंगाना नुकसान पोहचवुन अळी अवस्था पुर्ण करते. ढगाळ  वातावरणात  या  कीडींची संख्या वाढून जास्त प्रादुर्भाव असल्यास २५ ते ७० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते.

शेंगमाशी या कीडीची मादी शेंगाच्या सालीच्या आत अंडी घालते. अंडी पांढ­या रंगाची, लांब गोलाकार असतात. बारीकअळी, गुळगुळीत व पांढ­या रंगाची असुन तिला नसतात. तिचा तोंंडाकडील भाग निनमुळता असताते.ही अंडी 3 ते 7 दिवसात उबवुन अळी बाहेर पडते. ही अळी अवस्था १० ते १८ दिवसात पुर्ण होवून शेंगेतच कोषावस्थेत जात. कोषावरण तपकिरी रंगाचे असुन लांब गोलाकृती असतो. कोषावरणाच्या आत कोष असुन, सुरुवातीस हा कोष पिवळसर पांढरा असुन नंतर तपकिरी रंगाचा होतो. कोषावसथेच्या ते दिवसांत माशी शेंगेतुन बाहेर पडते. अशा प्रकारे शेंगमाशीचा जीवनक्रम ते आठवडयात पुर्ण होतो.  सुरुवातीस शेंगमाशीच्या प्रादुर्भावाचे कोणतेही लक्षण शेंगेवर दिसत नाही. परंतु जेव्हा वाढ झालेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते व त्या छिद्रातुन माशी बाहेर पडते तेव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो. अळी शेंगेत प्रवेश करुन अर्धवट दाणे खाते तसेच दाण्यावर नागमोडी खाचा तयार होतात. यामुळे बुरशीची वाढ होते व दाणे कुजतात.


एकात्मिक कीड व्यवस्थापन : वातावरणाशी समन्वय साधुन एकमेकास पुरक अशा सर्व तंत्रज्ञानाचा वापर करुन कीडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवणे त्यामध्ये मशागतीय, यांत्रिक, जैविकव कमीत कमी रासायनिक कीटकनाशकांचा वापर तसेच फुलोरा अवस्थेपासूनच किडींचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

यांत्रिक पध्दती: पाने गुंडाळणाऱ्या अळीची प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करून अळीसहीत नष्ट करावीत. शेताच्या बांधावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीची पर्यायी खाद्यतणे कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत. तूर पीक कळी लागण्याच्या अवस्थेत आल्यापासून एकरी २ कामगंध सापळे व २ नरसाळे सापळे पिकाच्या वर एक फुटी उंचीवर लावावेत. जेणेकरूनशेंगा पोखरणाऱ्या अळी व मारूकाची आर्थिक नुकसानीची पातळी कळेल.शक्य असल्यास तुरीवरील मोठया अळया वेचुन नष्ट कराव्यात. तुरीच्या झाडाखाली पोते टाकून हलकेसे झाड हलवावे आणि पोत्यावर पडलेल्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या एक ते दोन फुट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी 50 ते 60 ठिकाणी उभारावे. यामुळे पक्ष्यांना आश्रय मिळून ते पिकातील अळयांचे भक्षण करतील.

जैविक पध्दती : पिकास फुलकळी येऊ लागताच प्रतिबंधात्मकउपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिन ३०० पीपीएम ५० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. दुसरी फवारणी शेंगा पोखरणारी हिरवी अळी प्रथम व द्वितीय अवस्थेत असताना एच..एन.पी.व्ही. विषाणूची ५ मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारणी सायंकाळी करावी म्हणजे त्याची तिव्रता कमी होणार नाही हे औषध अन्नाद्वारे पोटात जावुन अळीच्या शरीरात विषाणुची वाढ होते व त्यामुळे अळया - दिवसात मरतात.

रासायनिक पध्दत : ज्यावेळी इतर व्यवस्थापन पध्दतींचा वापर करुन कीडींची संख्या आर्थीक नुकसान पातळीच्या वर जात असल्यास तेव्हाच शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.

शेंगा पोखरणारी अळी - इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्यूबॅडामाईड ३९.३५ एससी २ मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ एससी ३ मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ई.सी. ८ मि.ली. प्रति १० लि. पाणी.

शेंगा पोखरणारी अळी (मारूका): नोवॅल्युरोन ५.२५ अधिक इंडोक्झाकार्ब ४.५०एससी १६ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ ईसी ६.६६ मि.ली. प्रति १० लि. पाणी.

शेंगमाशी: डेल्टामेथ्रीन २.८ इसी१०मिली, लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ई.सी. १० मि.ली.प्रति १० लि. पाणी.


आर्थिक नुकसानीची पातळी

शेंगा पोखरणारी अळी (घाटे अळी) :कामगंध सापळ्यात सलग २ ते ३ दिवस ८ ते १०पतंग प्रति सापळा किंवा फुलोऱ्याच्या वेळी अथवा फुलोऱ्यानंतर 2अळ्या प्रति झाड किंवा १० टक्के कीडग्रस्त शेंगा

ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी (मारूका) : -२अळ्या प्रति झाड

शेंगमाशी: ५ टक्के हिरव्या प्रादुर्भावग्रस्त शेंगा


महत्वाचे लक्षात ठेवावे: पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी.  प्रथम व द्वितीय अवस्थेतच शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करताना कीटकनाशकाची योग्य मात्रा वापरून दोन कीटकनाशकाचे मिश्रण न करता केवळ एकाच कीटकनाशकाची फवारणी करावी. दुसरी फवारणीकरायची झाल्यास सलग एकाच कीटकनाशकाची फवारणी न करता कीटकनाशक बदलून १५ दिवसाच्या अंतराने करावी. फवारणी करताना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा. कीटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी.

नुकसान टाळण्यासाठी योग्य वेळी व्यवस्थापन करावे असे अवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, कृषि कीटकशास्त्र विभागाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. अनंत लाड, डॉ. संजोग बोकन, डॉ.राजरतन खंदारे यांनी केले आहे.