Wednesday, December 4, 2024

वनामकृवित कृषी शिक्षण दिन उत्साहात साजरा

कृषी शिक्षणातून स्वयंरोजगारासह विपुल प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध... कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि

भारतीय कृषी संशोधन परिषदेने पहिले भारतीय केंद्रीय कृषी मंत्री आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती, भारतरत्न, डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा वाढदिवस (३ डिसेंबर) भारतात कृषी शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचे सूचित केले आहे. यानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात शिक्षण संचालनालयाच्या वतीने दिनांक ३ डिसेंबर रोजी कृषी शिक्षण दिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलुगुरू मा डॉ. इन्द्र मणि हे ऑनलाइन होते. तर व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. राजेश कदम, डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. आर जी भाग्यवंत, उप कुलसचिव डॉ. गजानन भालेराव, कार्यालय प्रमुख डॉ. एम जी जाधव आदी उपस्थित होते.      

यावेळी कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, कृषी शिक्षणातूनच हरित क्रांती झाली आणि लोकसंख्येची वाढ होऊन देखील भारत देश शेती उत्पादनामध्ये सक्षम झाला तसेच निर्यात देखील करू लागला. कृषी शिक्षणातून संशोधक आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची निर्मिती होत आहे. कृषी शिक्षणास मजबूती करण्यासाठी शासकीय पातळीवर विविध योजना राबविल्या जात आहेत तसेच कृषी आणि संलग्न शाखेतील महाविद्यालय सुरू केली जात आहेत. कृषी शिक्षणातून युवकांना स्वयंरोजगारासह शासकीय आणि खाजगी क्षेत्रात विपुल प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, यासाठी कठोर मेहनतीची जोड असणे आवश्यक आहे असे नमूद केले. याबरोबरच त्यांनी भारत देश कृषिप्रधान असल्यामुळे युवकांनी कृषी शिक्षणाकडे अधिकाधिक वळावे असे आवाहन केले.

कुलसचिव संतोष वेणीकर म्हणाले की, कृषी शिक्षणातील युवकांनी सकारात्मक दृष्टीने पुढे जाऊन शेतकरी कल्याणसाठी सतत कार्यरत राहावे. तसेच संधीच्या शोधात राहून त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले

कृषी शिक्षण दिनानिमित्त भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कृषी शिक्षण विभागाने उपमहासंचालक (शिक्षण) मा. डॉ. आर. सी. अग्रवाल यांचे ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित केले होते. यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मुख्यालयातील तसेच कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयाने सहभाग नोंदवला. यामध्ये महाविद्यालयाचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच संबंधित महाविद्यालयाच्या परिसरातील माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.


कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात कृषी शिक्षण दिनाचे आयोजन

 

नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात भारताचे पहिले राष्ट्रपती आणि पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ३ डिसेंबर रोजी कृषी शिक्षण दिन साजरा करण्यात आला. यावेळी  भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शिक्षण विभागाद्वारे उपमहासंचालक (शिक्षण) मा. डॉ. आर.सी. अग्रवाल आयोजित केलेल्या ऑनलाइन मीटिंगमध्ये महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.

          उपमहासंचालक (शिक्षण) मा. डॉ.आर.सी.अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना कृषी उच्च शिक्षणाद्वारे विकसित भारतासाठी युवकांची तयारी करण्यावर भर दिला. ते म्हणाले की, कृषी पदवीधरांनी विविध शासकीय योजनांबद्दल माहिती घेऊन देशातील त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांचे उन्नतीसाठी मदत होईल.  त्यांनी उच्च शिक्षण आणि नोकरीच्या विविध संधींबद्दल अतिशय उपयुक्त माहिती दिली. तसेच, भारतीय तरुणांनी उद्योजक होवून नोकरी देणारे बनले पाहिजे. देशातील तरुण उद्योजक भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी देखील मदत करतात. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची उपयोगिता स्पष्ट केली. हे ऑनलाइन सत्र अतिशय माहितीपूर्ण असे होते.

तसेच कृषी अभियांत्रिकी महाविद्यालययाचे सहयोगी अधिष्ठाता  डॉ राहुल रामटेके यांच्या मार्गदर्शनाने प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूल व ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल येथेही कृषी शिक्षण दिन साजरा करण्यात  आला. या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शेती आणि संबंधित उच्च शिक्षणाविषयी अतिशय माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. रवींद्र शिंदे यांनी केले तर आभार प्रा.विवेकानंद भोसले यांनी केले. कार्यक्रमात महाविद्यालयातील डॉ. स्मिता सोलंकी, डॉ.सुभाष विखे, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. मधुकर मोरे, डॉ.प्रमोदिनी मोरे, डॉ. विशाल इंगळे, मंगेश राऊत, डॉ. गजानन वासू, डॉ. शैलजा देशवेना, डॉ. आश्विनी गावंडे यांच्यासह ५० शिक्षक आणि ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.



वनामकृवितील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाअंतर्गत कार्यरत प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत दिनांक ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सामूदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता तथा मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाच्या प्रमुख डॉ. जया बंगाळे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिव्यांग बालकांमध्ये असणाऱ्या विविध कलागुणांची ओळख करून दिली. तसेच कुटुंबात व समाजात आढळून येणाऱ्या अशा व्यक्तींना आपल्यामध्ये सामावून घेत प्रत्येकाने त्यांना वेळोवेळी मदत करण्याविषयी आवाहन केले. याप्रसंगी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी  विभागातील प्राध्यापक डॉ. वीणा भालेराव, प्रा. प्रियंका स्वामी तसेच विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षिका श्रुती औढेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी शाळेतील सर्व शिक्षिका तसेच मदतनीस यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Tuesday, December 3, 2024

उद्यानविद्या महाविद्यालयात कृषी शिक्षण दिन उत्साहात साजरा

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयांमध्ये कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली व कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या निर्देशानुसार दिनांक 3 डिसेंबर रोजी  कृषी शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संचालक शिक्षण डॉ. बी. व्ही.आसेवार तर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. एम.वाघमारे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी श्री रामदास धुमाळ व परभणी येथील कोतवाली पोलीस  स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री दिपक दंतुलवार यांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. बी. व्ही. आसेवार यांनी विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. आपला भारत देश हा कृषिप्रधान असल्यामुळे इतर पदवीमध्ये शिक्षण घेण्यापेक्षा कृषी शिक्षणामधील पदवीद्वारे नोकरीच्या संधी अधिक उपलब्ध होत आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी कृषी शिक्षणामध्ये आपले ध्येय ओळखून यश मिळवावे व उज्वल भविष्य घडवावे असे प्रतिपादन केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. एम. वाघमारे म्हणाले की, भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचे महत्त्व अधिक आहे. सर्वच बाबीमध्ये कृषीचा वाटा आहे. यामध्ये कृषी शिक्षण महत्वाची भूमिका बजावते असे नमूद केले.

श्री रामदास धुमाळ यांनी कृषीचे शिक्षण घेऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेद्वारे महाराष्ट्र व भारत सरकारच्या कृषी खात्यातील पदांवर कसा पोहोचू शकतो, आणि पदवीच्या चार वर्षांमध्ये घेतलेल्या ज्ञानाचा साठा एक विद्यार्थी मिळालेल्या पदावर कसा विकसित करु शकतो याबाबत मार्गदर्शन केले. श्री दीपक दंतुलवार म्हणाले की, कृषी विभागाचे शिक्षण घेऊन भविष्यात कोणत्याही पदावर गेलो तरीही आपण घेतलेल्या शिक्षणा सोबतची नाळ जुळवून ठेवावी. कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. व्ही. एस. खंदारे यांनी मांडली.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक डॉ. बी.एम. कलालबंडी, डॉ.भोसले, डॉ.व्ही.व्ही.भगत, डॉ.ए.एस.लोहकरे, डॉ. एस. आर. वानखेडे डॉ. एस.बी.पावने, डॉ. एस. जी. खंडागळे, ज्योती कळंबे डॉ. पालेपाड तसेच कर्मचारी एस. सी. पठाण, सतीश पुंड, श्री मुकाडे, श्री देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पुंड तर आभार प्रदर्शन कृष्णा भोईते यांनी केले.


Monday, December 2, 2024

सद्यस्थितीतील तूरीवरील किडींचे व्यवस्थापनाबाबत वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा संदेश


शेंगा पोखरणारी अळी

सध्याच्या ढगाळ वातावरणामध्ये तूरीवर शेंगा पोखरणा-या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तसेच शेंगमाशीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास तुरीमध्ये अडकण होऊ शकते त्याकरिता खालील प्रमाणे किडीचे व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे व श्री.एम.बी.मांडगे यांनी केले आहे.

शेंगा पोखरणारी अळी (हेलिकोवर्पा) करीता - पुर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात. हेलिकोवर्पा अळीची आर्थिक नुकसानीची पातळी कळण्याकरिता प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत. शेतामध्ये इंग्रजी " T " आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावावेत जेणेकरून पक्षाद्वारे अळ्या वेचून खाल्याने प्रादुर्भाव कमी होईल. तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे आणि पोत्यावर पडलेल्या अळ्या वेळोवेळी जमा करून नष्ट कराव्यात.

किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट ५ % - ४.४ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ८८ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५ टक्के- ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली किंवा इंडाक्झाकार्ब १४.५ टक्के- ८ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १६० मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % - ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली किंवा फ्लुबेंडामाईड २० % - ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १०० ग्रॅम किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल ९.३ % +लॅम्बडा साहॅलोथ्रीन ४.६ % (संयुक्त कीटकनाशक) - ४ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ८० मिली फवारावे.

शेंगमाशी करीता - लॅम्बडा साहॅलोथ्रीन ५% - ८ मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर १६० मिली किंवा ल्युफेन्युरॉन ५.४ %- १२ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर २४० मिली फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचा दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा व्हाटस्अप हेल्पलाईन क्रमांक ८३२९४३२०९७ यावर संपर्क करावा.


शेंगा पोखरणारी अळी

 

शेंगा पोखरणारी अळी

संदेश क्रमांक: ०८/२०२४ ( ०२ डिसेंबर २०२४)