वनामकृविच्या किटकशास्त्रज्ञाचा सल्ला
देशात राजस्थानातील वाळवंटी जिल्हये व मध्यप्रदेशातील काही
जिल्हयांमध्ये टोळधाडीचा प्रादुर्भाव मे महीन्याच्या पहील्या पंधरवाडयापासून झाल्याचे
आढळुन आले, परंतू मागील काही दिवसापासून विदर्भातील काही जिल्हयात विशेषत: नागपूर
जिल्हयात काही प्रमाणात या वाळवंटी टोळ किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. या किडीचा
प्रादुर्भाव असाच वाढत राहीला तर मराठवाडयात सुध्दा या कीडीचा शिरकाव होण्याची
शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कीडीला वेळीच रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय
म्हणून या कीडीबाबत शेतकरी बांधवांना इत्यंभूत माहीती देऊन जनजागृती करणे गरजेचे
आहे.
टोळ ही कीड आंतरराष्ट्रीय व जागतिक महत्वाची कीड समजली जाते.
आपल्याकडे नाकतोडयाच्या गटातील टोळ आढळतात. या कीडींच्या प्रामुख्याने तीन
प्रकारच्या प्रजाती (Species) आहेत. त्यापैकी Dessert locust म्हणजेच वाळवंटी
टोळ ही तांबूस रंगाची असतात. ही अत्यंत खादाड व नुकसान करणारी कीड आहे. एका
टोळधाडीत असंख्य टोळ असतात. टोळामध्ये दोन प्रकारच्या स्थिती असतात. जेव्हा
टोळांची संख्या खूपच कमी व विरळ असते तेव्हा त्या स्थितीस एकाकी (Solitary
phase) म्हणतात.
टोळचा जीवनक्रम
टोळांच्या जीवनात तीन अवस्था असतात. अंडी, पिल्ले किंवा
बाल्यावस्था आणि पूर्ण वाढ झालेली प्रोढावस्था. अंडी अवस्था ही जमिनीत असते. या
कीडीची मादी साधारणत: 50 ते 100 अंडयांच्या पुंजक्याने ओलसर रेताड जमिनीत अंडी
घालते. अंडी अवस्था साधारणपणे हवामानानुसार दोन ते चार आठवडयांची असते पिले बाहेर
पडतात. जमिनीतील ओलावा व हवेतील उष्णतामान यावर अंडयाच्या अवस्थेचा काळ अवलंबून
असतो.
अंडयातून बाहेर पडलेल्या लहान टोळांना (पिल्लांना) पंख
फुटलेले नसतात. लहान टोळ वाढत असताना 3 ते 5 दिवसांचे अंतराने पाच वेळा कात
टाकतात. असे वाढत असतानाच त्यांना पंख फुटतात. कीडीची ही अवस्था (बाल्यावस्था) 4
ते 6 आठवडे राहते.
अंडयातुन बाहेर पडल्यानंतर वाढीच्या अवस्थेत कीड
खालीलप्रमाणे 4 ते 5 वेळा कात टाकते.
प्रथम अवस्था : अंडयातून नुकतीच बाहेर पडलेले
पिल्लू पांढरे असते व 1 ते 2 तासात काळया रंगाचे होते.
दुसरी अवस्था : डोके मोठे व चटकन लक्षात येणारा
फिकट गुलाबी रंग हे या अवस्थेचे वैशिष्ट आहे.
तिसरी अवस्था : छातीच्या दोन्ही बाजूस दोन
पंखांच्या जोडी बाहेर पडण्याची स्थिती.
चौथी अवस्था : विशिष्ट काळा व पिवळा रंग.
पाचवी अवस्था : विशिष्ट तेजस्वी पिवळा व काळया
रंगाचा पॅटर्न
नुकसानीचा प्रकार
टोळांची सर्व पिल्ले एकत्र येवून मोठया थव्याने वाटेतील
वनस्पतींचा फडशा पाडत पुढे सरकतात. अशाप्रकारे हे थवे पुढे सरकत असताना सायंकाळ
झाल्यावर झाडा - झुडपांमध्ये वस्तीस राहतात. पुर्ण वाढलेले थव्याचे स्थितीतील
प्रौढ टोळ तांबुस रंगाचे असतात. ते अतिशय चपळ व खादाड असतात. ही टोळधाड पिकांचे
जास्तीत जास्त नुकसान करते. शिवाय ही टोळधाड दुरवर उडून जात असल्याने अशा
टोळधाडीपासुन फार मोठा धोका असतो. हिरवी पाने, फुले, फळे, बिया फांदी व पालवी
आदिंचा टोळ फडशा पाडत असतात. एका दिवसात टोळ त्यांच्या वजनाएवढे अन्न खात असते. एक
चौरस किमी क्षेत्रात जर टोळधाड असेल तर त्यामध्ये जवळजवळ 3000 क्विंटल टोळ असतात.
बाल्यावस्थेतील पिल्ले त्यांच्या वजनापेक्षा 6 ते 8 पटीने जास्त अन्न खातात. तांबूस टोळ पुर्णावस्थेत पोहोचल्यावर पिवळया रंगाचे होतात.
असे पिवळे टोळ अंडी घालण्यास अनुकूल अशी ओलसर रेताड जमिनीच्या शोधात फिरतात.
टोळाचे थवे ताशी 12 ते 16 किमी वेगाने उडतात.
आर्थिक नुकसानाची पातळी : प्रति हेक्टरी दहा हजार प्रौढ किंवा प्रती झुडुप पाच ते सहा
पिल्ले अशा कोणत्याही स्थितीत किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्यावर जाईल
त्यावेळी लगेचच व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात. टोळकिडीची संख्या कमी तसेच
प्रमाण विखुरलेले असल्यास नियंत्रणाच्या उपाययोजना करणे प्रभावी ठरत नाही, तसेच ते
पर्यावरणासाठी हानीकारक ठरु शकते.
नियंत्रणाचे उपाय :
Ø अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास
पिलांना अटकाव करुन नियंत्रण करता येते. अंडी शोधुन सामुहीकरित्या नष्ट करावीत.
Ø टोळांची सवय थव्या-थव्याने एका दिशेने जात असतात. त्यामूळे
पुढे येणा-या थव्यांच्या वाटेवर 60 सेमी रूंद व 75 सेमी खोल चर खणून त्यात या
पिलांना पकडता येते.
Ø संध्याकाळी / रात्रीच्या वेळी झाडा झुडपांवर टोळ जमा होतात
अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्याने
नियंत्रण होते.
Ø थव्यांच्या स्थितीत पिल्लांची संख्या जास्त असल्याने नीम
तेल हेक्टरी 2.5 लिटर या प्रमाणे फवारणी केल्यास प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.
Ø विष आमिशाचा वापर - गहू किंवा भाताचे तूस यामध्ये फिप्रोनील
5 एस.सी. व 292 ई.सी. व त्यामध्ये किडीस आकर्षित करण्यासाठी मळी मिसळून रात्री
किडीने आश्रय घेतलेल्या झाडाच्या आजूबाजूस किंवा प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये
प्रति हेक्टरी 20 – 30 किलो याप्रमाणे फेकून द्यावे. जेणेकरुन, सदर आमिष खाल्यावर
किडीचा मृत्यू होईल.
Ø मेटा-हायझीयम ॲक्रीडीयम व मायक्रोस्पोरीयम, पॅरानोसेमा
लोकस्टी (पुर्वीचे नाव नोसेमा लोकस्टी) या जैविक किटकनाशकांचा वापर अनेक देशांत
केला जातो.
Ø मिथील पॅराथीआन 2 टक्के भुकटी 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी
धुरळणी करावी.
Ø क्लोरोपायरीफॉस 20 ई. सी. 2.4 मिली, क्लोरोपायरीफॉस 50 ई.सी.
1 मिली., डेल्टामेथ्रीन 2.8 ई.सी.1 मिली, डायफ्लूबेंझुरॉन 25 ई.सी. 25 डब्लु.पी., लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 5
ई.सी. 1 मिली, लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 10 डब्ल्यू.पी., फिप्रोनिल 5 एस.सी. 0.25
मिली, मॅलाथिऑन 50 ई.सी. 3.7 मिली, मॅलाथिऑन 25 डब्लु.पी. 7.4 ग्रॅम प्रति लिटर
पाणी या प्रमाणात सदरील किटकनाशकांची टोळ नियंत्रणासाठी शिफारस अलिकडेच केंद्रिय
किटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने केलेली आहे.
तरी टोळधाडीचा मराठवाडयातील संभाव्य धोका लक्षात घेता, खबरदारीचा
उपाय म्हणून शेतक-यांनी या किडीबाबत जागरूक राहावे व प्रादुर्भाव दिसून येताच
सजगपणे किडींचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
कृषि किटकशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.