Friday, August 23, 2019

कापुस व सोयाबीनवरील किडींचे करा योग्‍य पध्‍दतीने व्‍यवस्‍थापन

वनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचे आवाहन
कपाशीवरील मावा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटकशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांनी ऑगस्‍ट महिन्यात क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत मराठवाडयातील विविध ठिकाणी कापूस व सोयाबीन पिकाच्या प्रक्षेत्रांस भेट दिली असता विविध किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कपाशीवर प्रामुख्याने माव्याचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आढळून आला असुन काही ठिकाणी तुडतुडे व गुलाबी बोंडअळीच्या डोमकळया आढळून आल्या. सध्या हवामान ढगाळ असल्याने व कपाशीचे पीक पाते, फुले लागण्याच्या अवस्थेत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहेत. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे. सोयाबीन पिकावर प्रामुख्याने चक्रीभुंगा, कोंडीका तसेच पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. त्या अनुषंगाने विद्यापीठातील किटकशास्‍त्रज्ञांनी पुढील प्रमाणे कापूस व सोयाबीन पिकांवरील किडींचे व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन शेतक-यांना केले आहे.
कापूस या पिकांत सदयस्थितीत पुढील प्रमाणे व्यवस्थापन करावे : कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट करावे. गुलाबी बोंडअळीसाठीचे हेक्‍टरी पाच कामगंध सापळे लावावेत. प्रती सापळा सरासरी 8 ते 10 पतंग सतत 2 ते 3 दिवस आढळुन आल्‍यास ही आर्थिक नुकसानीची पातळी समजावी, व योग्‍य किटकनाशकाची फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीचे पतंग मोठया प्रमाणात गोळा करुन नष्ट करण्यासाठी हेक्टरी 20 कामगंध सापळे लावावेत. उपलब्धते प्रमाणे कपाशीत एकरी 3 ट्रायकोकार्ड पानाच्या खालच्या बाजूस लावावेत. तसेच इंग्रजी T आकाराचे पक्षीथांबे हेक्टरी 40 या प्रमाणात लावावेत. कापूस पिकामध्ये फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी निळे चिकट सापळे तर पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापळे लावावेत.

कापुस व सोयाबीनवरील कीड व्‍यवस्‍थापनाकरिता फवारणीसाठी कीटकनाशके

प्रादुर्भाव
कीटकनाशके
प्रती दहा लिटर पाण्‍यात किटकनाशकाचे वापराचे प्रमाण
कापूस
गुलाबी बोंडअळी
प्रोफेनोफॉस 50 ईसी किंवा
20 मिली
थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी किंवा
20 ग्रॅम
थायामिथिक्झाम 12.6 टक्के + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी
04 मिली
मावा – तुडतुडे व इतर रस शोषक किडी
ॲसीफेट 50 टक्के + इमिडाक्लोप्रीड 1.8 एस.पी. 
20 मिली
फ्लोनीकॅमीड 50 डब्ल्यु जी 
04 ग्रॅम
सोयाबीन
चक्रीभुंगा, कोंडीका अळी, पाने खाणारी अळी
क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 एस सी.
04 मिली
फ्लुबेंडामाईड 39.35 एस. सी.
04 मिली
थायामिथिक्झाम 12.6 टक्के + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी
04 मिली

वरील किटकनाशकाचे प्रमाण हे साध्या पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे. कापूस व सोयाबीन पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन वरील प्रमाणे उपाययोजना कराव्यात असे आवाहन किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, किटकशास्‍त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. अनंत बडगुजर, डॉ. कृष्णा अंभुरे आदींनी केले आहे.
कापसावरील सध्या आढळून येत असलेली सुरुवातीच्या अवस्थेतील गुलाबी बोंडअळी 

सोयाबीन वरील चक्रीभुंगा

सोयाबीन वरील चक्रीभुंगा

सोयाबीनवरील कोंन्डीका
सोयाबीनवरील पाने खाणारी अळी

शेतक-यांच्‍या शेतातील पिक पे-याची अचुक नोंदणी आवश्‍यक ....... महाराष्‍ट्र राज्‍य कृषी मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशाभाई पटेल

वनामकृवित आयोजित बैठकीत प्रतिपादन
देशाचे कृषिमाल आयात - निर्यात धोरण ठरवितांना देशांतर्गत शेतमालाच्‍या उत्‍पादनाचा अचुक अंदाज असणे आवश्‍यक असतो, याकरिता शेतक-यांच्‍या शेतजमिनीवरील पिक पे-यांची अचुक नोंदणी झाली पाहिजे. बराच वेळा शेतजमिनीचे गाव नमुना, नमुना बारावर पीक पे-याबाबत महसुल विभाग व कृषि विभाग यांची माहितीमध्‍ये तफावत आढळते, ही तफावत दूर होणे नितांत गरजेचे आहे. शेत जमिनीवर पिकाचे प्रकार, आंतरपिकांची योग्‍य नोंदणी व्‍हावी या करिता तलाठयांनी कृषि विभागाच्‍या क्षेत्रीय कर्मचा-यांची मदत मिळणे आवश्‍यक आहे. जिल्‍हाधिका-यांनी व जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रत्‍येक गावात पीक पेराची अचूक नोंद घेण्‍याकरिता तलाठी, कृषी सहाय्यक यांची टीम तयार करावेत तसेच ज्‍या ठिकाणी कर्मचा-यांची कमतरता आहे, त्‍या ठिकाणी कृषि विद्यापीठातील कृषि पदवी अभ्‍यासक्रमातील सातव्‍या सत्रातील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे विद्यार्थ्‍यांची मदत घेण्‍यात यावी, असे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍य कृषी मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशाभाई पटेल यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्‍त्र विभागांतर्गत असलेल्‍या पीक लागवड खर्च काढण्‍याची योजनेची बैठक दिनांक 23 ऑगस्‍ट रोजी कुलगूरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाली, त्‍या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्‍हाधिकारी मा श्री पी शिवशंकर, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ हेमांगिणी सरंबेकर, प्राचार्य ए आर सावते, डाॅ तुकाराम तांबे, डॉ डि एस पेरके, विभागीय कृषि अधिकारी श्री सागर खटकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा श्री पाशाभाई पटेल पुढे म्‍हणाले की, आज कृषिमालाचे दर निश्चितीत वायदे बाजारातील दराचा प्रभाव आहे, त्‍यामुळे वायदे बाजारातील विविध संस्‍था, कृषि विद्यापीठ व कृषि मुल्‍य आयोग यांनी राष्‍ट्रीय पातळीवर परिषदेचे आयोजन करावे. या माध्‍यमातुन कृषी मालाच्‍या दराचा योग्‍य मोबदला शेतक-यांना मिळण्‍याच्‍या दुष्‍टीने मार्ग काढण्‍याचा प्रयत्‍न व्‍हावा, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याच्‍या दृष्‍टीने शासनाने अनेक पावले उचलेली आहेत, यात शेतमालाचे किमान आधारभुत किंमत वाढविण्‍यात आली. शेतमालाची आधारभुत किंमती ठरविण्‍याबाबत मतमतांतर आहेत, श्री पाशाभाई पटेल अनेक पातळीवर शेतमालाच्‍या किंमतीबाबत आवाज उठवितात. पिक उत्‍पादन वाढीसोबतच लागवड खर्च कमी करणे आवश्‍यक आहे, यासाठी कमी खर्चिक तंत्रज्ञानाचा प्रसारावर कृषि विद्यापीठाचा नेहमीच भर असतो. निविष्‍ठांचा कार्यक्षम वापर, शेतमालाचे मुल्‍यवर्धन, पॅकींग, हाताळणी तंत्रज्ञान महत्‍वाचे आहे. कमी खर्चिक कृषी तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन कृषी विद्यापीठाचे शेतक-यांना तंत्रज्ञानात्‍मक पाठबळ तसेच शासनाचे धोरणात्‍मक निर्णय यांच्‍या माध्‍यमातुन उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे ध्‍येय आपण गाठु शकतो.
यावेळी जिल्‍हयाधिकारी मा श्री पी शिवशंकर यांनी प्रायोगीक तत्‍वावर महसुल विभाग, कृषी विभाग व कृषि विद्यापीठातील रावेचे विद्यार्थ्‍यी सर्वांनी मिळुन परभणीतील अकरा गावांतील पिकपे-यांची अचुक नोंद घेण्‍यात येऊन पुढे याची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात येईल, असे सांगितले. बैठकीचे सुत्रसंचालन डॉ सचिन मोरे यांनी केले. बैठकीस विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Saturday, August 17, 2019

विद्यार्थ्‍यीदशेतच खेळाडूवृत्‍तीचा विकास होऊन जीवनात पराभव पचविण्‍याचे सामर्थ्‍य प्राप्‍त होते....... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित क्रीडा व कला क्षेत्रात यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचा गुणगौरव
क्रीडा व कला याला विद्यार्थ्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍व विकासात अनन्‍यसाधारण महत्‍व आहे, विद्यार्थ्‍यांमधील क्रीडा व कला गुणांचे सवर्धन झालेच पाहिजे. विद्यार्थ्‍यीदशेत सर्वांनी कला व क्रीडा प्रकार सहभाग घेतलाचा पाहिजे, यामुळे आपल्‍यातील उपजत गुणांना वाव मिळतो, व्‍यक्‍तीमधील खेळाडुवृत्‍तीचा विकास होतो, ही खेळाडुवृत्‍तीमुळेच पुढे जीवनात पराभव पचविण्‍याचे सामर्थ्‍य प्राप्‍त होते, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या विविध महाविद्यालयातील क्रीडा व कला क्षेत्रात यशस्‍वी विद्यार्थ्‍यीच्‍या गुणगौरव सोहळाचे आयोजन दिनांक 16 ऑगस्‍ट रोजी करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, तोडके मनुष्‍यबळ असतांनाही विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्‍यांनी राष्‍ट्रीय पातळीवर कला व सांस्‍कृतिक क्षेत्रात घवघवीत यश मिळविले आहे, विद्यापीठास लौकिक मिळवुन दिला, ही अभिमानाची बाब आहे. आज इतर राज्‍यातील अनेक विद्यार्थ्‍यी विद्यापीठात प्रवेश घेत आहेत, त्‍यांना विविध सांस्कृतिक पार्श्‍वभुमी लाभलेली असते, त्‍यांच्‍या सोबत या सांस्‍कृतीक वारसाचे देवाणघेवाण झाल्‍यास मराठवाडा व राज्‍यातील विद्यार्थ्‍यीच्‍या व्‍यक्‍तीमत्‍व विकासास हातभार लागेल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
आपल्‍या भाषणात शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांनी यशस्‍वी खेळाडुचे गुणगौरवामुळे इतर विद्यार्थ्‍यांना प्रेरणा मिळते, असे मत व्‍यक्‍त केले. तर कार्यक्रमात मयुरी निळख, रोहित वेताळ, हर्षल गाडे, शुभम गोंद्रे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते 2018 – 19 या वर्षात आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय पातळीवर विविध युवक महोत्‍सव, क्रीडा स्‍पर्धेत घवघवीत यश संपादन केलेल्‍या संघाचे व विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ महेश देशमुख यांनी विद्यापीठाच्‍या कला व सांस्‍कृतिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आशा देशमुख व श्री अशोक खिल्‍लारे यांनी केले तर आभार प्रा डी एफ राठोड यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठांतर्गत असलेल्‍या घटक व संलग्‍न महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्‍यापक, कर्मचारी व खेळाडु विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

गुणगौरव सोहळात सत्‍कार करण्‍यात आलेल्‍या सन 2018 – 19 मधील आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय पातळीवर विविध युवक महोत्‍सव, क्रीडा स्‍पर्धेत घवघवीत यश संपादन केलेले संघ व खेळाडु

गुजरातमधील दंतेवाडा येथील सरदार कृषिनगर विद्यापीठात पार पाडलेल्‍या अखिल भारतीय आंतर कृषी विद्यापीठीय युवक महोत्‍सवात विद्यापीठाला उपविजेतेपद मिळाले. या युवक महोत्‍सवात एकांकिका व प्रहसन स्‍पर्धेत सुवर्ण पदक संपादन केलेल्‍या ऋतुजा भालेराव, मयुरी निळख, समीक्षा वानखेडे, शिवानी येंगडे, हर्षल गाडे, संदीप गव्‍हाणे, ऋषीकेश नवरकर, अमन पवार, रोहित वेताळ, खुशी सातोनकर आदींचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. तसेच लोकनृत्‍यात रौप्‍य पदक मिळवील्‍याबाबत  अनामिका अंभोरे, मयुरी निळख, आरती पांडे, समीक्षा वानखेडे, शिवानी येंगडे, स्‍वप्‍नाली माळशे, समीक्षा मोरे, वैष्‍णवी रणबावळे, प्रीती लावुदिया, शिवानी शिंदे, शुक्‍ला वैद्येही आदींचा गौरव करण्‍यात आला. रांगोळी कला प्रकारात सुवर्ण चषक प्राप्‍त केलेला कृष्‍णा अनारसे, कोलाज मध्‍ये रौप्‍य चषक प्राप्‍त केलेला ऋषीकेश नवरकर तर वादवि‍वाद स्‍पर्धेत यश प्राप्‍त केलेल्‍या खुशी सातोनकर यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठात पार पडलेल्‍या अखिल भारतीय आंतर कृषी विद्यापीठीय क्रीडा स्‍पर्धेत वनामकृविच्‍या संघाने मुलेंच्‍या कबड्डी व मुलींच्‍या व्‍हॉलीबॉल स्‍पर्धेत सुवर्ण चषक प्राप्‍त केले. कबडडी संघातील प्रतीक घाडगे, प्रतीक थोरात, मोहन गंडरे, स्‍वप्‍नील सातारकर, वैभव डुकरे, शुभम पिंगळे, हरिकृष्‍णा माधुरी, अक्षय नापते, दादासाहेब ठोंबरे, सुशांत औताडे आदींचा मान्‍सवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला तर व्‍हॉलीबॉल संघातील प्राजक्‍ता चौगुले, जयश्री भालेराव, दिक्षा नारळे, आश्विनी वरपे, रजनी टकले, प्रतीक्षा पवार, शितल पतंगे, महानंदा माने, विशाखा चोपडे, पल्‍लवी वाळवी आदींचा सत्‍कार करण्‍यात आला. तसेच 1500 मीटर धावण्‍याच्‍या स्‍पर्धेत यश प्राप्‍त केलेला राम अरविंद याचाही गौरव करण्‍यात आला.
पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्‍या पश्चिम विभागीय युवक महोत्‍सव व चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात पार पडलेल्‍या अखिल भारतीय राष्‍ट्रीय युवक महोत्‍सवात रांगोळी स्‍पर्धेत स्‍वप्‍नजा कोठारे हिने अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक प्राप्‍त केला, त्‍याबद्दल सत्‍कार करण्‍यात आला.
नाशिक ये‍थील यशवंतराव चव्‍हाण मुक्‍त विद्यापीठात पार पडलेल्‍या इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सवात कोलाज कला प्रकारात यश प्राप्‍त केलेल्‍या ऋषीकेश नवरकर व प्रश्‍नमंजुषा स्‍पर्धेत रौप्‍य पदक प्राप्‍त केलेले शुभम गोंद्रे, अमोल राठोड, अमन पवार यांचा सत्‍कार करण्‍यात आला.    
नेपाळ येथे एशियन ड्रॉप रोबॉल स्‍पर्धेत सुवर्ण पदक प्राप्‍त केलेल्‍या तुषार शेळके यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.
बेंगळुरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठात राष्‍ट्रीय सेवा योजनेचे एकात्‍मता शिबीरातील युवक महोत्‍सवात प्रथम पारितोषिक पटकावलेल्‍या संघातील कोमल कदम, अश्विनी गायकवाड, कोमल धुर्वे, प्रज्‍योती काळे, किरण घुगे, भारत वाडेकर, शंतनु पाटील, प्रविण कांबळे, कल्‍पेश गायकवाड, अभिषेक मरकंदे यांना गौरविण्‍यात आले.
कार्यक्रमात क्रीडा प्राध्‍यापक व मार्गदर्शक डॉ रवि काळे, डॉ आशा देशमुख, प्रा डी एफ राठोड, डॉ पी एच गौरखेडे, प्रा भालचंद्र पवार, श्री विजय सावंत, प्रा ए क्‍यु खाजा, रंगोली पडघन यांचाही सत्‍कार करण्‍यात आला तसेच अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पार पडलेल्‍या कर्मचारी क्रीडा स्‍पर्धेत यश प्राप्‍त केलेल्‍या खेळाडुंचा सत्‍कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.
नेपाळ येथील एशियन ड्रॉप रोबॉल स्‍पर्धेत सुवर्ण पदक प्राप्‍त केलेल्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा तुषार शेळके यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला 

Thursday, August 15, 2019

विद्यापीठ विकसित कोरडवाहु शेती तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचवा....कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित 73 वा स्‍वांतत्र्य दिन साजरा
वनामकृवितील कोरडवाहु संशोधन प्रकल्‍पास यावर्षी राष्‍ट्रीय पातळीवरील भारतीय कृषी संशोधन परिषदेचा वसंतराव नाईक पुरस्‍कार प्राप्‍त झाला. ज्‍या हरित क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांचे नावे हे विद्यापीठ आहे, त्‍यांच्‍याच नावे असलेला हा पुरस्‍कार प्राप्‍त झाला, ही अतिशय गौरवाची बाब आहे. मराठवाडयातील बहुतांशी शेती ही कोरडवाहु आहे, त्‍यामुळे कोरडवाहु शेतीस सक्षम करण्‍याचे तंत्रज्ञान जे विद्यापीठाने विकसित केले, या तंत्रज्ञानाला पारितोषिकाच्‍या माध्‍यमातुन जगमान्‍यता मिळाली आहे. मराठवाडा सातत्‍याने दुष्‍काळाच्‍या छायेत वावरत आहे, यावर्षींचीही परिस्थिती समाधानकारक नाही, अशाच परिस्थितीत विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाचा ख-या अर्थाने कस लागत असतो. त्‍यामुळे विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी कोरडवाहु शेती तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार शेतक-यांमध्‍ये करून कोरडवाहु शेतीला बळकट करण्‍याकरिता हातभार लावावा. पारितोषिकापेक्षाही शेतक-यांच्‍या जीवनात आर्थिकस्‍थैर्य आल्‍यास दुसरा मोठा आनंद नाही, यासाठी झोकुन प्रयत्‍न करा, असा सल्‍ला कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात देशाच्‍या 73 व्‍या स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले, यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्या डॉ हेमां‍गिणी सरंबेकर, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ तुकाराम तांबे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, यावर्षी कापसावरील बोंडअळी व मकावरील लष्‍करी अळीचे संकट उभे ठोकले असुन या किडींचे व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञान प्रसारासाठी विस्‍तार यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवावी लागेल. सांगली व कोल्‍हापुर जिल्‍हयात महापुराग्रस्‍त नागरिकांसाठी विद्यापीठ कर्मचा-यांनी एक दिवसाचा पगार मुख्‍यमंत्री सहाय्यता निधी देण्‍याचे सकारात्‍मक प्रतिसाद दिला असुन या माध्‍यमातुन त्‍यांच्‍या पाठिशी उभे राहु. विद्यापीठास राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत जागतिक बॅकेच्‍या अर्थ सहाय्याने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्‍या माध्‍यमातुन डिजिटल शेतीवर आधारित राष्‍ट्रीय प्रकल्‍प सेंटर ऑफ एक्सेलन्‍स मंजुर झाला आहे, ही गौरवाची बाब आहे. आज भारतीय शेती डिजिटल क्रांतीच्‍या उबंरठावर उभी आहे, डिजिटल माध्‍यमातुन शेतीस अधिक बळकट करण्‍याकरिता प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन जे तंत्रज्ञान विकसित होणार आहे, तसेच परदेशातील शास्‍त्रज्ञांशी आपल्‍या शास्‍त्रज्ञांशी विचारांचे देवाणघेवाण होणार आहे, यातुन विद्यापीठाची प्रतिमा उजळुन निघणार आहे. हा प्रकल्‍प केवळ संधी नसुन फार मोठे आव्‍हान आहे, हे आव्‍हान सर्वांच्‍या सहकार्याने निश्चितच पेलु शकतो. स्‍वच्‍छ, सुंदर व हरित विद्यापीठाचे स्‍वप्‍न पाहात आहोत, वृक्षरोपणाचा कार्यक्रम केवळ परभणी मुख्‍यालय नव्‍हे तर संपुर्ण मराठवाडयातील विद्यापीठाच्‍या प्रक्षेत्रावर राबवित आहोत, परभणीकरही हे स्‍वप्‍न साकारण्‍यासाठी पुढे सरसावले आहेत. यावर्षी विद्यापीठात विविध राज्‍यातील सुमारे 200 विद्यार्थ्‍यी प्रवेश घेत आहेत, विविध राज्‍याचा सांस्‍कृतिक वारसा घेऊन हे विद्यार्थ्‍यी येतात यांच्‍या माध्‍यमातुन मराठी भाषिक विद्यार्थ्‍यांना व्यक्‍तीमत्‍व विकासासाठी संधीचे मोठे दालन उघडणार आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त करून राष्‍ट्रीय पातळीवर विद्यापीठाच्‍या मानाकंनात सुधारण्‍यासाठी सर्वानी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन केले व स्‍वातंत्र्य दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. 
यावेळी राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या छात्रसैनिकांनी छात्रसेना अधिकारी डॉ जयकुमार देशमुख यांच्‍या नेतृत्‍वाखाली माननीय कुलगुरू यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

वनामकृविच्‍या हरित विद्यापीठ उपक्रमास परभणीकर व विद्यापीठ कर्मचारांचा वाढता पाठिंबा

एक लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण
ओंकार ग्राफिक्‍सच्‍या वतीने शंभर बहावाची वृक्ष व ट्रि गार्ड भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांच्‍या संकल्‍पनेतुन स्‍वच्‍छ विद्यापीठ, सुंदर विद्यापीठ, सुरक्षीत विद्यापीठ व हरित विद्यापीठ उपक्रम राबविण्‍यात येत असुन हरित विद्यापीठ उपक्रमात संपुर्ण मराठवाडयातील विद्यापीठांतर्गत असलेल्‍या विविध महावि़द्यालय, विद्यालय, संशोधन केंद्रे व कृषि विज्ञान केंद्राच्‍या प्रक्षेत्रावर यावर्षी एक लक्ष वृक्षलागवड व संगोपनाचा कार्यक्रम हाती घेण्‍यात आला. आजपर्यंत विद्यापीठ परिसरात एक लक्षापेक्षा जास्‍त झाडांची लागवड करण्‍यात आली असुन हरित विद्यापीठ संकल्‍पनेस विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी, अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी आदीसह परभणीकरांनी मोठी साथ दिली आहे. या उपक्रमात विद्यापीठ परिसरात येणारे मार्निंग वॉक ग्रुपचे तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी आपआपल्‍या परीने देणगी स्‍वरूपात योगदान देत आहेत, स्‍वातंत्र्य दिनाचे औजित्‍य साधुन दिनांक 15 ऑगस्‍ट रोजी ओंकार ग्राफिक्‍सचे श्री संजय ठाकरे व श्री उज्ज्‍वल पंडित यांच्‍या वतीने 100 बहावाची रोपे व त्‍यासाठी लागणारे ट्रि गार्ड देऊन हरित विद्यापीठ उपक्रमास योगदान दिले. सदरिल रोपांची लागवडीचा शुभारंभ कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्या डॉ हेमां‍गिणी सरंबेकर, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ तुकाराम तांबे, डॉ हिराकांत काळपांडे, श्री संजय ठाकरे, श्री उज्ज्‍वल पंडित आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, हरित विद्यापीठ संकल्‍पनेस समाजातील सर्व स्‍तरातुन लोकांचा हातभार लाभत असुन विद्यापीठ प्रक्षेत्रावर एक लाख पेक्षा जास्‍त वृक्षांची लागवड करण्‍यात आली. परंतु मराठवाडयातील कमी पर्जन्‍यमानाच्‍या परिस्थिती ही झाडे जोपासनेचे मोठे आव्‍हान असुन विद्यापीठ ही जबाबदारी निश्चितच सर्वांच्‍या सहकार्य व सहभागातुन पुर्ण करील, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला. याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्‍यापक डॉ राजेश कदम व डॉ गोदावरी पवार या दापत्‍यांनीही आपल्‍या मुलाच्‍या वाढदिवसानिमित्‍त हरित विद्यापीठ उपक्रमास देणगी स्‍वरूपात रक्‍कम कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांना सुपूर्द केली.

Saturday, August 10, 2019

कसा आहे वनामकृवितील सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत परभणी येथे सामुदायिक विज्ञान हा नाविन्यपूर्ण व्यावसायिभिमूख अभ्यासक्रम राबवला जातो. सन २०१७ पासून पूर्वीच्या गृहविज्ञान अभ्यासक्रमात बदल करुन तो आता सामुदायिक विज्ञान या नांवाने संबोधल्या जात आहे. महाराष्ट्रातील चार कृषि विद्यापीठांपैकी केवळ वनामकृवि अंतर्गत परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात (कॉलेज ऑफ कॉम्युनिटी सायन्स) हा अभ्यासक्रम राबवला जातो. अभियांत्रिकी तथा वैद्यकीय अभ्यासक्रमासारखा सामुदायिक विज्ञानहा देखील व्यावसायिक अभ्यासक्रम असल्याने तो पूर्ण करण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लागतो. हा पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्‍यांना बी. एसस्सी. (ऑनर्स) कम्युनिटी सायन्स ही पदवी प्रदान करण्यात येते. कोणत्याही सामान्य पदवीपेक्षा ऑनर्स पदवीला विशेष महत्त्व असते, कारण ऑनर्स पदवी अभ्यासक्रम हा अधिक तांत्रिक पध्दतीचा असून विषयांशी निगडीत प्रत्यक्ष अनुभवावर अधिक भर असतो. त्यामुळे विद्यार्थी स्वत:च्या नोकरी-व्यवसायात अधिक यशस्वी होतात. सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील पाच विभाग असुन यात मानव विकास व कौटुंबिक अभ्यास (हयुमन डेव्हलपमेंट अॅन्ड फॅमिली स्टडीज), अन्न विज्ञान आणि पोषण (फुड सायन्स अॅन्ड न्युट्रीशन), साधन संपत्ती व्यवस्थापन आणि ग्राहक विज्ञान (रिसोर्स मॅनेजमेंट अॅन्ड कन्झ्युमर सायन्स), वस्त्र व परिधान अभिकल्पना (टेक्सटाईल अॅन्ड अॅपरल डिझाईनिंग), सामुदायिक विस्तार व संदेशवहन (कम्युनिटी एक्सटेंशन अॅन्ड कम्युनिकेशन मॅनेजमेंट) यांच्याद्वारे पदवीपूर्व अभ्यासक्रमातील एकूण ५२ विषय हे ८ सत्रांमध्ये पूर्ण केले जातात. विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेतल्यानंतर सुरुवातीच्या तीन वर्षांत त्यांना या अभ्यासक्रमातील प्रत्येक विभागांच्या प्रमुख विषयांचे अध्ययन करावे लागते. तद्नंतर पदवी शिक्षणातील चतुर्थ वर्षात त्यांना त्यांच्या विषयासंबंधीच्या प्रक्षेत्रावरील प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी नामांकीत संस्थामध्ये इम्लांट टे्रनिंग, ग्रामीण विभागातील कार्यानुभवासाठी रावे (आरएडब्ल्युई - रुरल एरीया वर्क एक्सपिरियन्स) तथा स्टुडन्टस रेडी प्रोग्राम (इएलपी- एक्सपिरियंशियल लर्निंग प्रोग्राम) असे अद्ययावत उपक्रम राबवले जातात. अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्‍यांसाठी राज्‍यात व देशातील विविध संस्थाना भेटी देण्यासाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते.
सध्याच्या आधुनिक युगातील विविध आव्हाने पेलण्याकरिता विद्यार्थ्‍यांना सक्षम करण्यासाठी त्यांची संवाद कौशल्ये तथा व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जातो. याबरोबरच शारीरिक शिक्षण, योगाभ्यास, सांस्कृतीक कार्यक्रम, राष्ट्रीय सेवा योजना यासारख्या विधायक कार्यातही विद्यार्थ्‍यांना सहभागी करुन घेतले जाते. भारतातील विविध राज्यांमध्ये कृषि विद्यापीठांशी संलग्नित असणा­या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाप्रमाणेच हा अभ्यासक्रम असून यामुळे विद्यार्थ्‍यांना अनेक नोकरी-व्यवसायाच्या वाटा खुल्या झालेल्या आहेत. सामुदायिक विज्ञान या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी इयत्‍ता बारावी विज्ञान, किंवा तत्सम परीक्षा तथा सक्षम प्राधिका­याकडून आयोजित करण्यात आलेली एमएचटी-सीईटी, जेईई / नीट, एचआयइइए - युजी सामायिक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्‍यक असून प्रवेशा संबंधीची सविस्तर माहिती महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या संकेतस्‍थळावर (www.mcaer.org) उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून सन २०१९-२० मध्ये ज्या विद्यार्थ्‍यांनी विहित वेळेत कृषि विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी केलेली आहे, असे विद्यार्थीच प्रवेशासाठी पात्र असतील. विद्यार्थ्‍यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी या महाविद्यालयात अद्ययावत प्रयोगशाळा व वर्ग, उच्चविद्या विभुषित व अनुभवी प्राध्यापकवृंद, कॉन्सलींग व प्लेसमेंट सेल, संगणक प्रयोगशाळा, इंटरनेट, अद्ययावत वसतिगृह, खेळाचे मैदान अशा सर्व सुविधांसह अतिशय रम्य परिसरात हे महाविद्यालय वसलेले आहे. सामुदायिक विज्ञान या विषयातील पदवीपूर्व तथा पदव्यूत्तर शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्याथर्यांना नोकरी - व्यवसायाचे अनेक मार्ग खुले असून विशेषत: आहारतज्ज्ञ, बालविकास अधिकारी, कॉन्सलर, प्राध्यापक, शिक्षक, पर्यवेक्षक, इंटेरीयर डिझायनर, हॅन्डीक्राफ्ट मेकर्स, इव्हेन्ट मॅनेजर, फॅशन डिझायनर, बुटीक मॅनेजर, विस्तार अधिकारी, मल्टी मेडिया डेव्हलपर्स, प्रेस रिपोर्टर, आकाशवाणी व दूरदर्शन कार्यक्रम संचलनकर्ता, महिला व बालविकास योजनेच्या विविध पदांवर तथा खाजगी, निम शासकीय, शासकीय स्तरावरील विविध योजना व संस्थामध्ये कार्य करण्याच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. याबरोबरच या विद्यार्थ्‍यांना स्वत:च्या दर्जेदार पूर्व प्राथमिक शाळा, पाळणाघरे सुरु करणे, आहार सल्ला केंद्र, कौटूंबिक मार्गदर्शन केंद्र व समुपदेशन केंद्र, कॅन्टीन स्थापित करण्यासाठीही सक्षम केले जाते. तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातून पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी इतर स्पर्धा परीक्षांसाठी देखील पात्र असल्याने त्याद्वारेही ते यश प्राप्त करु शकतात. विद्यार्थ्‍यांना सामुदायिक विज्ञान या अभ्यासक्रमाचा लाभ त्यांच्या नोकरी - व्यवसायाकरिता तर होतोच या व्यतिरिक्त त्यांचे वैयक्तिक जीवनही आनंदी व यशस्वीपणे व्यतीत करण्यासाठी या अभ्यासक्रमास अनन्यसाधारण महत्त्व आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क - सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी दुरध्‍वनी क्रमांक (02452) 233260

सौजन्‍य : डॉ. जया बंगाळे, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी

Sunday, August 4, 2019

कसे कराल मका पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन

 मराठवाडा विभागात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे, त्यामुळे वेळीच उपाय योजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या अनुशंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठती कृषि किटकशास्त्र विभाग तर्फे लष्करी अळीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.
व्यवस्थापन
- मका पिकाभोवती नेपियर गवताच्या ते ओळी लावावे. हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ५% निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली / १० लि. पाण्यात मिसळून फवारणी रावी.
- वेळेवर कोळपणी व खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.
- अंडीपुंज, समुहातील लहान अळया आणि मोठ्या अळ्या हाताने वेचून राॅकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
- मक्यावरील लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी 05 कामगंध सापळ्याचा वापर आणि प्रत्यक्ष शेताचे निरिक्षण  करावे.
- सामुहिकरित्या मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करून मारावेत. यासाठी १५ कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत तसेच प्रकाश सापळे लावावेत.
- किडींचे नैसर्गिक शत्रू जसे परभक्षी (ढालकिडा, मोठ्या डोळ्याचा ढेकूण इत्यादी) व परोपजीवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलोनेमस, कॅम्पोलेटीस इत्यादी) यांचे संवर्धन करावे. यासाठी आंतरपिके शोभिवंत फुलांची झाडे लावावी.
- ट्रायकोग्रामा किंवा टीलेनोमस रेमस यांनी परोपजीवीग्रस्त ५०,००० अंडी प्रति एकर एक आठवड्याच्या अंतराने ३ वेळा किंवा कामगंध सापळ्यामध्ये पतंग / सापळा आढळून आल्यास शेतात सोडावे.
- रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था या कालावधीत ५% प्रादुर्भावग्रस्त झाडे आणि शेवटी १०% प्रादुर्भावग्रस्त कणसे आढळून आल्यास उपयुक्त  बुरशी व जिवाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी.

अ.क्र.
जैविक कीटकनाशक
मात्रा / १० लि. पाणी
मेटाहायजियम अॅनिसोप्ली (१ x १० सीएफ़यु/ग्रॅम)
५० ग्रॅम
नोमुरिया रिलाई (१ x १० सीएफ़यु/ग्रॅम)
५० ग्रॅम
बॅसिलस थुरिन्जिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती
२० ग्रॅम

  जैविक कीटकनाशके पीक १५ ते २५ दिवसाचे झाल्यास पोंग्यामध्ये द्रावण जाईल अशाप्रकारे फ़वारणी करावी. त्यानंतर १० दिवसाच्या अंतराने ते फवारणी करावी. सध्याचे ढगाळ वातावरणात जैविक कीटकनाशकांच्या वापरासाठी पोषक आहे.
फ़वारणीसाठी कीटकनाशके
प्रादुर्भाची पातळी
कीटकनाशक
मात्रा / १० लि पाणी
५% प्रादुर्भावग्रस्त झाडे
निंबोळी अर्क किंवा
५ %
अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम
५० मिली
१०-२०% प्रादुर्भावग्रस्त झाडे
स्पायनोटोरम ११. % एस सी किंवा
मिली
थायामिथॉक्झाम १२.६ % + लॅमडा साहॅलोथ्रिन ९.५ % झेडसी किंवा
५ मिली
क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ % एससी
४ मिली
विशेष सूचना
रासायनिक किटकनाशकाची फ़वारणी चारा पिकावर करु नये.
- एकाच रासायनिक किटकनाशकाची फ़वारणी हंगामात दोन पेक्षा जास्त वेळा करु नये.
- तु–याची अवस्था व त्यानंतर फ़वारणी टाळावी.
- फ़वारणी करताना मजुराने सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी.
-  एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे.

लष्करी अळीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन वरील प्रमाणे उपाययोजना कराव्यात असे वाहन किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. बस्वराज भेदे आणि  डॉ. कृष्णा अंभुरे यांनी केले आहे.