Saturday, March 29, 2025

उत्तर प्रदेश कृषि विभागाच्या निवृत्त सहसंचालकांची वनामकृवि परभणी येथील बायोमिक्स संशोधन केंद्राला भेट

 बायोमिक्सचा प्रसार उत्तर प्रदेशातही व्हावा: डॉ. नीरज कुमार श्रीवास्तव

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि उत्तर प्रदेश कृषि विभागाचे निवृत्त सहसंचालक (अभियांत्रिकी) डॉ. नीरज कुमार श्रीवास्तव यांनी दिनांक २९ मार्च रोजी विद्यापीठातील बायोमिक्स संशोधन व निर्मिती केंद्राला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बायोमिक्सच्या प्रभावीतेबाबत समाधान व्यक्त केले व या जैविक उत्पादनाचा प्रचार व प्रसार उत्तर प्रदेशातही व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.

बायोमिक्स हे जैविक उत्पादन शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले असून, त्याची निर्मिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागामार्फत केली जाते. शेतातील उत्पादनवाढीवर होणारे सकारात्मक परिणाम पाहता, बायोमिक्सच्या वापराची व्याप्ती वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे मत डॉ. श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. यावेळी वनस्पती रोगशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रफुल घंटे, बायोमिक्स संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर, तसेच संशोधन सहाय्यक कपिल निर्वळ, सोमनाथ फाळके व इतर कर्मचारी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान बायोमिक्सच्या संशोधन प्रक्रियेची पाहणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना अधिकाधिक जैविक उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. या उपक्रमामुळे बायोमिक्सच्या प्रचार व प्रसाराला चालना मिळणार असून शेतकऱ्यांना नैसर्गिक व परिणामकारक पर्याय उपलब्ध होण्यास मदत होईल.


डॉ. स्मिता खोडके महाराष्ट्रातील प्रथम महिला कृषि अभियंता यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ संपन्न

प्राध्यापकांनी शेवटपर्यंत आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा  विद्यार्थ्यांना करून द्यावा... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख तसेच महाराष्ट्रातील प्रथम महिला कृषि अभियंता डॉ. स्मिता खोडके या नियत वयोमानानुसार ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या कार्यपूर्ती सोहळा आणि निरोप समारंभाचे आयोजन दिनांक २८ मार्च रोजी कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात  करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे उपस्थित होते. तर  विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. विलास पाटील, डॉ. उदय खोडके तसेच माननीय श्रीमती जयश्री मिश्रा मॅडम, डॉ. स्मिता खोडके,  सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके,  अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर.बी. क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी कृषि अभियांत्रिकी परिवाराच्या वतीने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते तसेच विद्यापीठातील विविध विभागांच्या वतीने डॉ. स्मिता खोडके मॅडम यांचा सेवानिवृत्ती निमित्त शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ  आणि भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, डॉ. स्मिता खोडके यांनी केलेल्या शिक्षण व संशोधन कार्याबद्दल व विद्यापीठास दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे प्राध्यापक कधीही निवृत्त होत नसतात. तसेच   प्राध्यापकांनी संपूर्ण आणि आदर्श व्यक्तिमत्व बनून शेवटपर्यंत आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा  समाज आणि विद्यार्थ्यांना करून द्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

याप्रसंगी डॉ. उदय खोडके, डॉ. विलास पाटील, डॉ. राहुल रामटेके, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे,  प्रा. मधुकर मोरे, प्रा. हरीष आवारी, प्रा. सुमंत जाधव, प्रा. सुभाष विखे, प्रा. संदीप पायाळ, डॉ. दयानंद टेकाळे, डॉ. रघुनाथ जायभाये यांनी आपल्या भावना व्यक्त करून डॉ. स्मिता खोडके यांच्या स्वभावाचे विविध पैलू;

नीटनीटकेपणा, विद्यार्थी प्रिय, कष्ट घेण्याची सवय, धाडसी स्वभाव, मनमिळाऊपणा, अगत्यशीलता, वात्सल्यसिंधू, मृदुभाषी या बाबींचा आवर्जून उल्लेख केला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. स्मिता खोडके यांनी त्यांच्या विद्यापीठातील सदतीस वर्षांच्या सेवेचा आढावा घेऊन विविध स्तरावर काम करून विद्यार्थी घडविण्याची आणि शेतकरी व लघु उद्योजक यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच त्यांनी विद्यापीठ व विद्यापीठ प्रशासनाचे ऋणही व्यक्त केले.

यावेळी  अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिन मोरे, प्रा. रणजित चव्हाण, मृद व रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रविण वैद्य, प्रा. हरिहर कौसडीकर, डॉ. आशा पाटील, डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. विजया पवार, डॉ. गोदावरी पवार, डॉ.पपिता गौरखेडे, डॉ.प मिनाक्षी पाटील, गायत्री खोडके, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. मदन पेंडके, डॉ. हरीष आवारी, प्रा. विवेकानंद भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.









हळद काढणी पश्चात व्यवस्थापन व मूल्यवर्धन या विषयावर कार्यशाळा संपन्न

 प्रक्रिया उद्योग व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्नवाढ करावी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभाग आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने "हळद काढणी पश्चात व्यवस्थापन व मूल्यवर्धन" या विषयावर कार्यशाळा दिनांक २८ मार्च रोजी आडगाव (रंजे), ता वसमत येथे संपन्न झाली. या कार्यशाळेस विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेश शासनाच्या कृषि विभागाचे निवृत्त सह संचालक (कृषि अभियांत्रिकी) व समन्वयक अधिकारी (पीक अवशेष व्यवस्थापन) डॉ. नीरज कुमार श्रीवास्तव हे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी जैविक हळद, केळी व इतर भाजीपाला पिकांच्या लागवडीसंबंधी मार्गदर्शन केले. तसेच, विद्यापीठाच्या "शेतकरी देवो भव:" या भावनेचा उल्लेख करून, शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्नवाढ करावी, असे प्रतिपादन केले. विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त १८ मे रोजी शेतकऱ्यांसाठी कृषि मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून, त्यात विविध प्रक्रिया उद्योगांचे प्रात्यक्षिक हाती घेण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेस आडगाव (रंजे) गावचे सरपंच श्री. दिलीपराव चव्हाण, प्रगतशील शेतकरी श्री. अंकुश रामराव चव्हाण, सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. बी. क्षीरसागर, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे आणि कृषि अधिकारी श्री. गजानन वरुडकर यांची विशेष उपस्थिती होती.

प्रमुख पाहुणे डॉ. नीरज कुमार श्रीवास्तव यांनी आडगाव (रंजेबुवा) येथील हळदीचे उत्तर प्रदेशात निर्यातसंधी उपलब्ध होऊ शकतात, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. आर. बी. क्षीरसागर यांनी हळद काढणी पश्चात प्रक्रिया व मूल्यवर्धन उद्योगाबद्दल सखोल माहिती देत, शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगात सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. खंदारे यांनी केले. तसेच, डॉ. गजानन गडदे यांनी हळद लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करत निंबोळी अर्क व विषमुक्त भाजीपाला उत्पादनाच्या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. गावचे सरपंच श्री. दिलीपराव चव्हाण आणि प्रगतशील शेतकरी श्री. रंगनाथ चव्हाण यांनी विद्यापीठातील तंत्रज्ञान आणि विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. ए. टी. दवंडे, डॉ. एस. बी. पव्हणे, डॉ. पी. एस. देशमुख, डॉ. एस. जे. खंडागळे, डॉ. कैलास पालेपाड, डॉ. राजू गावडे तसेच आडगाव (रंजेबुवा) येथील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशा सातपुते यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रियंका कारंडे यांनी केले.

कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्यांना हळद प्रक्रियेसाठी उपयुक्त तंत्रज्ञान व नवीन संधींची माहिती मिळाली.







उत्तर प्रदेश कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यंत्रिकीकरण योजना) योजनेस माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि उत्तर प्रदेश शासनाच्या कृषि विभागाचे निवृत्त सह संचालक (कृषि अभियांत्रिकी) व समन्वयक अधिकारी (पीक अवशेष व्यवस्थापन) डॉ. नीरज कुमार श्रीवास्तव यांनी दिनांक २९ मार्च रोजी भेट दिली. या भेटीत उद्यान विद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, अन्न तंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर आणि प्राध्यापक हेमंत देशपांडे यांची उपस्थिती होती.

भेटीदरम्यान डॉ. श्रीवास्तव यांनी योजनेद्वारे विकसित करण्यात आलेली विविध बैलचलित अवजारे प्रत्यक्ष पाहिली. त्यांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी या अवजारांची उपयुक्तता लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाशी करार करून ही अवजारे उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली. उत्तर प्रदेश शासनाच्या कृषि विभागाच्या सहकार्याने ही अवजारे लवकरच तेथील शेतकऱ्यांच्या सेवेत आणली जाणार आहेत.

यामध्ये दोन बैलचालित क्रीडा टोकन यंत्र, तीन पासे खत कोळपे, धसकटे गोळा करण्याचे अवजार, सौर ऊर्जाचलित फवारणी यंत्र, कापूस खत व बी टोकन यंत्र, आजारी पशु उचलणे यंत्र, जनावरांसाठी ब्रूमिंग व वॉशिंग युनिट, बैलचलित कृषि प्रक्रिया उद्योग, हळद व आले काढणी अवजार यांचा समावेश आहे. डॉ. श्रीवास्तव यांनी या सर्व अवजारांची बारकाईने पाहणी केली आणि समाधान व्यक्त करत योजनेच्या कार्याची प्रशंसा केली.

या भेटीदरम्यान संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, पशुशास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख, अभियंता अजय वाघमारे व दीपक यंदे यांनी विविध अवजारांची सविस्तर माहिती दिली तसेच प्रात्यक्षिके सादर केली. तसेच योजनेतील रुपेश काकडे, मंगेश खाडे, श्रीमती पवार आणि स्वप्निल खराटे यांनी या कार्यात सहकार्य केले.

या महत्त्वपूर्ण भेटीमुळे मराठवाड्यातील कृषि संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसाराला नवी दिशा मिळेल तसेच उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषि यंत्रसामग्रीचा लाभ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.










वनामकृविच्या पीक विविधता पथदर्शक प्रकल्पांतर्गत एकात्मिक शेती पद्धतीवर चार दिवसीय प्रशिक्षण

 वातावरणातील प्रदूषण नियंत्रणासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे आवश्यक--डॉ. सुदाम शिराळे

मौजे कचनेर, ता. छत्रपती संभाजी नगर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती योजनेच्या पीक विविधता पथदर्शक प्रकल्पांतर्गत दिनांक २५ मार्च ते २८ मार्च दरम्यान मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर व छत्रपती संभाजी नगर येथे एकात्मिक शेती पद्धतीवर चार दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि संचालक संशोधन डॉ. खिजर बेग,शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री संतोष वेणीकर तसेच एकात्मिक शेती पद्धतीचे कृषि विद्यावेता डॉ. आनंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन एकात्मिक शेती पद्धतीचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. सुदाम शिराळे, कृषि विद्यावेता प्रा. शरद चन्नलवाड व श्री. पांडुरंग दुतकर यांनी केले. दिनांक २५ मार्च रोजी मौजे नित्रुड, ता. माजलगाव, जि. बीड येथे पहिल्या दिवशीच्या प्रशिक्षणासाठी तालुका कृषि अधिकारी श्री. संगेकर, कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. हनुमान गरुड, डॉ. गायकवाड तसेच २५-३० कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि १०० ते १५० शेतकरी उपस्थित होते. डॉ. सुदाम शिराळे यांनी एकात्मिक शेती पद्धती, जमिनीचे आरोग्य, सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उपाययोजना, कार्बन क्रेडिट आणि पीक विविधता याविषयी मार्गदर्शन केले.

दिनांक २६ मार्च रोजी मौजे अटकळी, लातूर येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या वेळी बायोटेक्नॉलॉजी कॉलेजचे डॉ. दुधारे, डॉ. भगत, डॉ. सुदाम शिराळे, प्रा. शरद चन्नलवाड यांनी शेतकरी व कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महिला बचत गटांच्या महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. तालुका कृषि अधिकारी श्री. राऊत यांनी सहकार्य केले.

दिनांक २७ मार्च रोजी मौजे मंगरूळ, ता. तुळजापूर येथे झालेल्या प्रशिक्षण शिबिरात कृषि विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ डॉ. अरबाड, तालुका कृषि अधिकारी देवकते तसेच कृषि विभागातील अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

दिनांक २८ मार्च रोजी मौजे कचनेर, ता. छत्रपती संभाजी नगर येथे उपविभागीय कृषि अधिकारी श्रीमती पठारे, तालुका कृषि अधिकारी श्री. गुळवे तसेच कृषि विभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. डॉ. सुदाम शिराळे यांनी शेतकऱ्यांना एकात्मिक शेती पद्धती, पीक विविधता प्रकल्प, जमिनीचे आरोग्य आणि शासनाच्या विविध योजनांविषयी सखोल मार्गदर्शन केले.

हे चार दिवसीय प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी संशोधन केंद्राचे डॉ. आनंद गोरे, डॉ. सुदाम शिराळे, प्रा. शरद चन्नलवाड, श्री. पांडुरंग दुतकर आणि श्री. मिर्झा बेग यांनी परिश्रम घेतले.

मौजे कचनेर, ता. छत्रपती संभाजी नगर
मौजे मंगरूळ, ता. तुळजापूर 
मौजे अटकळी, लातूर (अधिकारी प्रशिक्षण) 
मौजे अटकळीलातूर  (महिला बचत गट प्रशिक्षण)
मौजे नित्रुड, ता. माजलगाव (शेतकरी प्रशिक्षण)
मौजे नित्रुडता. माजलगाव  (शेतकरी प्रशिक्षण)
मौजे नित्रुड, ता. माजलगाव (अधिकारी प्रशिक्षण)

विद्यार्थ्यानी शिक्षणसोबतच विनयशील असणे महत्वाचे : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात प्रायोगिक पूर्व-प्राथमिक शाळेचा १३ वा दीक्षांत समारंभ संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागांतर्गत कार्यरत प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेतील ब्रिज सेक्शनच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ दिनांक २८ मार्च रोजी आयोजित करण्यात आला. दीक्षांत समारंभाच्या पाश्चात्य पद्धतीस फाटा देऊन भारतीय संस्कृतीची जपणूक करत गतवर्षापासून या शाळेतर्फे या समारंभाचे आयोजन केले जाते.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्व प्राथमिक शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व असून ते दर्जेदारपणे प्राप्त झाल्यास बालकांचे भविष्य उज्वल होते. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही याबाबत दक्षता घेऊन त्यांना आनंददायी  शिक्षण द्यावे असे मत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उपस्थिताना  मार्गदर्शन करताना व्यक्त केले. सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभाग अंतर्गत असलेल्या पूर्व प्रायोगिक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या  तेराव्या दीक्षांत समारंभात अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी आपले विचार मांडले. या शाळेची प्रतिमा टिकून ठेवत ती अधिक उंचावण्यासाठी कार्यरत असणारे प्राध्यापक तसेच सर्व शिक्षक आटोकाट प्रयत्न करत असल्याने त्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यानी शिक्षणासोबतच विनयशील असणे महत्वाचे असल्याचे नमूद केले. यावेळी माननीय कुलागुरुनी विद्यार्थ्यांना घरातील आई - वडिलांचामोठ्या व्यक्तींचा आदरशिक्षकांचा सन्मान तसेच पर्यावरणाचे रक्षणआपल्या राष्ट्राचा सन्मान करावा अशी यावेळी विदयार्थ्यांना प्रतिज्ञा दिली.

या समारंभासाठी उपस्थित असलेल्या विशेष अतिथी माननीय श्रीमती जयश्री मिश्रा  व अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.  तसेच  बालकांच्या आहाराबाबत काळजी घेताना त्यांना फास्टफुड पासून दूर ठेवत पौष्टिक आहार देण्यासाठी पालकांनी प्रयत्नशिल असावे असे डॉ. राजेश क्षीरसागर यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेतील ४ वर्षाचे शिक्षण पूर्ण करुन हे सर्व विद्यार्थी पुढील शिक्षण घेण्यासाठी सर्वोतोपरी तयार झालेले असून निश्चितच त्यांचे भविष्य उज्वल राहाणार आहे असे आपल्या प्रास्ताविकात सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांनी अधोरेखित केले. या समारोहात ब्रिज सेक्शनचे विद्यार्थी देवांश करभाजने आणि रेयांश वाघमारे यांनी शाळेविषयी असणाऱ्या त्यांच्या हृदयस्पर्शी भावना प्रातिनिधीक स्वरूपात व्यक्त केल्या. कार्यक्रमात प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेमधून पूर्व प्राथमिक शिक्षण  यशस्वीपणे पूर्ण केलेल्या एकूण ३२ विद्यार्थ्यांना मान्यवरांनी प्रशस्तीपत्रे प्रदान केली. 

याप्रसंगी महाविद्यालयाच्या  विविध विभागाचे प्रमुख डॉ. विजया पवारडॉ. शंकर पूरीसहा-प्राध्यापक डॉ. विद्यानंद मनवर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. नीता गायकवाडडॉ. वीणा भालेराव तसेच शाळेतील सर्व शिक्षिकामदतनीस ,महाविद्यालयीन कर्मचारीपदवीपूर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. डॉ.वीणा भालेराव यांनी  सूत्रसंचालन करून आभार मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थीपालक ,प्राध्यापक व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.





Friday, March 28, 2025

अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाद्वारे शेतकरी प्रशिक्षण व तुषार सिंचन संच वाटप कार्यक्रम संपन्न

 सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करून पाण्याचा पुरेपूर वापर करावा.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भुवनेश्वर येथील भारतीय जल व्यवस्थापन संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने “शेतकरी प्रशिक्षण व तुषार सिंचन संच वाटप कार्यक्रम दिनांक २८ मार्च रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. यावेळी विशेष उपस्थितीत संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, उप-विद्यापीठ अभियंता  डॉ. दयानंद टेकाळे आदी मान्यवर आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठामध्ये निर्माण होणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपला विकास साधावा. मा. कुलगुरू महोदय म्हणाले की मानवी जीवनात प्राणवायू एवढेच पाण्याचे महत्व आहे. "जलबिना जीवन नही" हे अंतिम सत्य आहेत्यामुळे शेती करताना पाण्याची बचत करणे, जल संरक्षण, संवर्धन करणे काळाची गरज आहे. त्याकरिता सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करून पाण्याचा पुरेपूर वापर करावा.  तसेच पाण्याचे स्रोत संवर्धित करून पुढच्या पिढीला मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकाने प्रतिज्ञा केली पाहिजे, असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग म्हणाले की, विद्यापीठाने विकसित केलेले विविध पिकांचे वाण, लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहचविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत असतो. शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबक सिंचन यांचा वापर करून उत्पन्नात भरघोस वाढ करावी.

यावेळी माजी संचालक शिक्षण डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ राहुल रामटेके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांनी केले. यावेळी संशोधन प्रकल्पाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आणि संशोधन कार्याची माहिती दिली.

या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) अंतर्गत लोहरा, जि. परभणी आणि अनुसूचित जमाती उपयोजना (TSP) अंतर्गत कोपरवाडी, तालुका. कळमनुरीजि. हिंगोली येथील ग्रामसभेकडून निवड केलेल्या शेतकऱ्यांना २२ तुषार सिंचन संच वाटप करण्यात आले. विद्यापीठाची कृषी दैनंदिनी, दिनदर्शिका यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाणी बचत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक लाभ होणार आहे.

संशोधन सहायक श्री ऋषिकेश औंढेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील अनेक शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सुमंत जाधव, डॉ विशाल इंगळे, युवराज भोगिल, कार्तिक गिराम, अनिकेत वाईकरश्री. धुर्वे, सुरेश शिंदे, रत्नाकर पाटील, देवेंद्र कुरा, बाळू रनेर, प्रकाश मोते, विलास जाधव व नागेश ढावणे यांनी परिश्रम घेतले.





वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सिंचन संशोधन प्रकल्पाला नवे रूप – नूतनीकरण इमारतीचे उद्घाटन!

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या कार्यालयीन इमारतीच्या नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा दिनांक २८ मार्च रोजी उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी विशेष उपस्थितीत संशोधन संचालक डॉ. खिजर बेग,  विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय डॉ. राहुल रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.

या नूतनीकरणाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या सिंचन आणि पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाला नवीन ऊर्जा मिळेल. याबरोबरच विद्यापीठाच्या प्रगत संशोधन आणि कृषी जलव्यवस्थापन क्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलांसाठी हे नूतनीकरण मोलाचे ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संयोजन पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, उप-विद्यापीठ अभियंता  डॉ. दयानंद टेकाळे आणि कंत्राटदार श्री प्रफुल्ल खंडागळे यांनी केले.


वनामकृवितील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचा यशस्वी समारोप

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे मौजे टाकळगव्हाण (ता. जि. परभणी) येथे आयोजित विशेष शिबिराचा समारोप २७ मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुभाष विखे यांनी केले.

समारोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूलभूत शास्त्र व संगणक विभागाचे प्रमुख प्रा. विवेकानंद भोसले होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रविंद्र शिंदे, सरपंच श्री. मंचकराव वाघ, चेअरमन श्री. श्रीरंग वाघ, तसेच ग्रामस्थ व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. भोसले यांनी कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तसेच, राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी समाजासाठी कसे कार्य करावे, याबाबत डॉ. शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी केले. त्यांनी शिबिरात पार पडलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी शिरसागर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. गंगासागर मठपती यांनी मानले.

शिबिरातील अनुभवांविषयी अभिषेक प्रजापत, कु. अंशिका राऊत, कु. अरपिता कच्छवे, वरद बिनोरकर, पलक इंदुरकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच, विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छतेचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.

या विशेष उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे डॉ. गजानन वसू, श्री. राजाभाऊ वाघ, सौ. सुधा सालगुडे, उषादेवी कोटाळे, सलोनी अतंबर, आयुषी, हिमांशू गौतम, मोहम्मद फुझेल, सुशांत प्रसाद, करण खोमणे, विनोद खोत, वैभव वाघ आणि २०२२ बॅचच्या इतर विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, त्यातून समाजसेवेची भावना अधिक दृढ झाली.

Thursday, March 27, 2025

उद्यानविद्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक विशेष शिबिर मोठ्या उत्साहात दिनांक २६ मार्च रोजी पिंपळगाव (कुटे) ता. वसमत येथे संपन्न झाले. या शिबिराच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्हि. एस. खंदारे उपस्थित होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. बी. क्षीरसागर आणि डॉ. आशा सातपुते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावाचे सरपंच श्री. राजकुमार कुटे, उपसरपंच श्री. चांदोबा कदम, पोलीस पाटील श्री. अनंत कुटे, कृषी अधिकारी श्री. गजानन वरुडकर, मुख्याध्यापक श्री. पी. के. कदम व अन्य मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी प्रारंभी शुभेच्छा देवून विद्यार्थ्यांना शिबिरास रवाना केले.

उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. व्हि. एस. खंदारे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले. विद्यापीठाचे कार्य "शेतकरी देवो भव:" या ब्रीदवाक्यानुसार चालते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिबिराची सुरुवात प्रभात फेरीने झाली, ज्यामध्ये उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती आणि आधुनिक शेतीविषयी जनजागृती केली. प्रास्ताविक श्री. प्रवीण घाडगे यांनी केले.

प्रमुख मार्गदर्शक डॉ. आर. बी. क्षीरसागर यांनी "समृद्ध शेतकरी एक चांगला उद्योजक कसा होऊ शकतो" यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. आशा सातपुते यांनी सोयाबीन वाणाच्या निवडीबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. जैविक खते आणि बायोमिक्सचा फळपिके व भाजीपाल्यावर होणारा परिणाम यावर डॉ. बी. एम. कलालबंडी यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली.

गावचे सरपंच श्री. राजकुमार कुटे यांनी जीएम तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी अशाच शेतीसंबंधी उपक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या यशस्वी उपक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षकवृंद, उद्यानविद्या महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. एस. बी. पव्हणे, डॉ. पी. एस. देशमुख, डॉ. आशा सातपुते आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वाती पुंड आणि कु. जया सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. कृष्णा भोईटे यांनी केले.