Friday, July 30, 2021

दैठणा येथे महिला उद्योजकता विकास कार्यशाळा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (गृहविज्ञान) च्‍या वीतने मौजे दैठणा (जि.परभणी) येथे ग्रामीण महिलांसाठीशेतकरी कुटुंबाच्या सक्षमीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळेचेआयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे प्रमुख अतिथी म्हणून दैठणा येथील जनरल फिजीशीयन डॉ. वंदना कुलकर्णी या उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती उज्वला कच्छवे हे होत्‍या. प्रकल्‍पातील वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. नीता गायकवाड, डॉ शंकर पुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्‍टया सक्षम करण्‍याच्‍या द्ष्‍टीने विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेवरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. नीता गायकवाड यांनी महिलांच्या उद्योजकता विकासासाठी व्याक्तिमत्व विकासाचे महत्वयाविषयी तर डॉ. शंकर पुरी यांनीमहिलांचे उद्योजकता कौशल्यया बद्दल मार्गदर्शन केले. प्लास्टीक पिशव्यांना पर्याय कापडी पिशवी यावर संगिता नाईक यांनी तर शीतल कच्छवे कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रात्याक्षिक दाखविले. आरोग्यासाठी अतिशय पौष्टीक असेसोया पोहा लाडूबनवावयाचे प्रात्याक्षिक ज्योत्स्ना नेर्लेकर यांनी दाखवूनपौष्टीक आहाराचे जीवनातील महत्वया विषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत विभागामार्फत विकसीत प्रजनन संस्था, कुटुंब नियोजन, विकसीत तंत्रज्ञान तसेच पौषण बागेव्दारे आरोग्य समृध्दी या घडीपत्रीका पुस्तिका तसेच परसबागेसाठी आवश्यक असणारी रोपे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रशिक्षणार्थी शीतल कच्छवे, विद्या धोंडारकर यशस्वी उद्योजीका वैशाली गायकवाड यांनी प्रशिक्षनाबाबत मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेची सुरूवात जना कच्छवे सपना कच्छवे या शालेय विद्यार्थीनींच्या स्वागत गीताने करण्यात आली. प्रास्तावि ज्योत्स्ना नेर्लेकर यांनी केले. सुत्रसंचालन तांत्रीक सहाय्यक शीतल मोरे  यांनी केले तर आभार धनश्री चव्हाण यांनी मानले. कार्यशाळेस महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Saturday, July 24, 2021

ज्वार संशोधन केंद्र निर्मित जैविक उत्पादने ट्रायकोबुस्ट व मेटारायझीयमला शेतक-यांमध्‍ये वाढती मागणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि वि़द्यापीठातील ज्वार संशोधन केंद्र, परभणी अंतर्गत यावर्षी जैविक उत्पादन विभागाच्‍या वतीने ट्रायकोबुस्ट व मेटारायझीयम या जैविक बुरशी व किडनाशक निर्मिती करण्‍यात येत असुन सदरिल उत्‍पादनास शेतक-यांमध्‍ये मागणी वाढत आहे. या जैविक बुरशी व कीडनाशकाचा सोयाबीन, तुर, हळद, कापुस, अद्रक आदी विविध पिकातील मर रोग, मुळकुज, कंदकुज, हुमणी  व्यवस्थापनासाठी मोठया उपयोग होत आहे.  दिनांक 23 जुलै जिंतुर, वसमत, कळमनुरी, मानवत, परभणी या तालुक्यातील विविध गावातील शेतकरी बंधु खरेदी साठी आले होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. के. आर. कांबळे, ज्वार रोगशास्ञज्ञ डॉ. विक्रम घोळवे, , ज्वार किटकशास्ञज्ञ डॉ. मोहम्मद ईलियास, डॉ. एल. एन. जावळे, प्रा. प्रितम भुतडा, प्रा. अंबिका मोरे आदींची उपस्थिती होती. यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी शेतकरी बांधवाशी संवाद साधुन सदरिल जैविक उत्‍पादने वापरामुळे उत्‍पादन खर्चात बचत होऊन किड व रोग व्‍यवस्‍थापन करण्‍यास चांगली मदत होते, असे सांगितले.  

Tuesday, July 20, 2021

ऑडियो कॉन्फरन्सद्वारे मौजे साटला येथील शेतक-यांना मार्गदर्शन

वनामकृवि व रिलायंस फाउंडेशन यांचा संयुक्‍त उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० जुलै रोजी ऑडिओ कॉन्फरन्स व्‍दारे परभणी जिल्ह्यातील मौजे साटला येथील शेतकरी बांधवाशी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी संवाद साधला. यात विस्तार कृषी विद्यावेता तथा कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. जी. डी. गडदे व किटकशास्‍त्रज्ञ  डॉ. डी. डी. पटाईत यांनी मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनात डॉ. जी. डी. गडदे म्‍हणाले की, सोयाबीन मधील पिवळेपणा कमी करण्यासाठी बाजारात मिळणारे ग्रेड-२ चे सूक्ष्म मूलद्रव्यची फवारणी करावी तसेच पिकांमध्ये साचलेल्या जास्तीच्या पाण्याचा निचरा करावा. कपाशीमध्ये अन्नद्रव्याची पूर्तता वेळेवर करावी, सोयाबीनमध्ये उगवतीपश्चात योग्य पध्दतीचा किंवा तणनाशकाचा वापर करून पीक तणविरहीत ठेवण्‍याचा सल्‍ला दिला.

डॉ. डी. डी. पटाईत यांनी कपाशी व सोयाबीन वरील मावा, चक्रीभुंगा, खोडमाशी, पैसा (वाणी) आदी कींडीचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. 

सध्या खरीप हंगामातील पीक हे वाढीच्या अवस्थेत असुन सोयाबीन कापूस पिकांमध्ये पिवळेपणा तसेच विविध कीड व रोग यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ऑडिओ कॉन्‍फरन्‍स व्‍दारे सोयाबीन व कापूस पिकांमधील अन्नद्रव्य व्‍यवस्‍थापन तसेच किडी व रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक दिपक केकान व कार्यक्रम सहाय्यक रामाजी राऊत यांनी केले होते. रिलायन्स फाउंडेशनकडून शेतीसंबंधीत विविध गावातील शेतकरी बांधवाच्‍या समस्या ओळखुन वेळोवेळी ऑडिओ कॉन्‍फरन्‍स व्‍दारे चर्चासत्राचे आयोजित केले जाते. कार्यक्रमास मौजे साटला गावातील शेतकरी उपस्थित होते.

सोयाबीन पिवळे पडत असल्‍यास करा उपाय योजना

वनामकृविचा सल्‍ला

परभणी जिल्‍हयात काही भागात सोयाबीन पिवळे पडत असुन यावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राने पुढील उपाय योजना सुचविले आहेत.  लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोरोसिसलक्षणे निर्माण होऊन सोयाबीन पिवळे पडते, ही एक पिकातील शारीरिक विकृती आहे.        

क्लोरोसिसची लक्षणे 

लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरां फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे.  लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात. पाने पिवळी पडल्यामुळे हरितद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्र्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.

क्लोरोसिसची कारणे

लोह ची कमतरता विशेषत: कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये हिरव्या रंगद्रव्य क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते. बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य असते. तथापि, बर्‍याचदा जा जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते.

उपाय योजना 

शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी. ०.५ ते १.० टक्के फेरस सल्फेट ची पानांवर फवारणी करावी किंवा ईडीटीए चेलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ दहा लिटर पाण्‍यात २० ग्रॅम प्रमाणात मिसळून फवारणी करावी.

 

अधिक माहितीसाठी संपर्क करा -  कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी

दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९०००

वनामकृवि संदेश क्रमांक- ०१/२०२१ ( ०३ जूलै २०२१)

Monday, July 19, 2021

वनामकृवितील गृहविज्ञान योजने कडुन फळ पिकांचे बिया उद्यानविद्या फळबाग संशोधन योजनेस भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष निमित्‍त अखिल भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍प - गृहविज्ञान योजनेच्या वतीने वृक्षलागवड   वृक्षसंवर्धन उपक्रम अंतर्गत ३०० आंबा याची रोपे, ५०० आंब्याच्या कोयी, फणस बिया आदी विद्यापीठातील उद्यानविद्या संशोधन योजना विभागाला देण्यात आली. सदरिल रोपांवर उद्यानविद्या फळबाग संशोधन योजना विभागा योग्य ती प्रक्रीया करुन त्यांची विद्यापीठाच्या परिसरात लागवड करण्यात येणार आहे. कार्यक्रमास वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. निता गायकवाड, उद्यानविद्या फळबाग संशोधन योजना येथील प्रभारी अधिकारी डॉ. व्ही. एस.खंदारे, डॉ. शंकर पुरी  आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

यावेळी बोलतांना प्रा. निता गायकवाड म्‍हणाल्‍या की, लावलेले एक वृक्ष पुढील कित्येक पिढयांसाठी वरदान ठरु शकते, त्यामुळे सर्वांनी केवळ वृक्षलागवडीसाठीच नाही तर वृक्ष जोपासण्यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजे दैनंदिन जीवनात जेव्हा विविध प्रकारची फळे खातो त्या सर्वांच्या बिया-कोयी यांचे संकलन करुन ते रोपवाटीकेकडे सुपुर्द कराव्यात.  तर डॉ. व्ही. एस.खंदारे यांनी अखिल भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍प - गृहविज्ञान योजनेच्‍या उपक्रमाबाबत आभार म्‍हणाले. कार्यक्रमास संगीता नाईक, रूपाली पतंगे, धनश्री चव्हाण, मनिषा -हाळे, शितल मोरे, तोडकर आदींची उपस्थिती होती.  कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी श्री माटे, मुरली शिंदे यांनी सहाय्य  केले.

Saturday, July 17, 2021

कसे कराल शेतातील शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन

वनामकृविचा सल्‍ला

काही शेतात शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळतो, यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. या शंखी गोगलगायीचे व्‍यवस्‍थापन करण्‍याकरिता पुढील प्रमाणे उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने करण्‍यात देण्‍यात आला आहे. 

शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात. शेतामध्ये किंवा बागेमध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिक ठिकाणी ठेवावेत. गोगलगायी दिवसा त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्यास्तापूर्वी त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून नष्ट करावी.

लहान शंखीसाठी मिठाची फवारणी किंवा कॅल्शीयम क्लोराईडचासुद्धा नियंत्रणासाठी बर्‍याच ठिकाणी वापर केला जातो. शंखी प्रामुख्याने पपईची रोपे व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. म्हणून मेटाल्डिहाईडच्या गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवतात. त्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात मरतात.  शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा अथवा चुन्याचा ५ सें.मी. रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नियंत्रणासाठी टाकावा.

झाडाचे खोडास १०% बोर्डोंपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाही. गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड दाणेदार या कीडनाशकाचा वापर करावा. पूर्ण बागेमध्ये झाडाखाली मेटाल्डिहाईडचे दाणे प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे. जर हे आमिष उपलब्ध न झाल्यास, पुढील प्रकारे आमिष तयार करून बागेमध्ये टाकून घ्यावे. दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक 25 ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण 50 किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. 10 ते 12 तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये थायामेथोक्‍झाम 50 ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे. सदरील आमिषा पासून पाळीव प्राणी लहान मुलांना दूर ठेवावे.







अधिक माहितीसाठी संपर्क करा

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

दुरध्‍वनी ०२४५२-२२९०००

वनामकृवि संदेश क्रमांक- ०३/२०२१ ( १६ जूलै २०२१)


Friday, July 16, 2021

बी.टी. कपाशीवरील मावा व तुडतुडे किडींचे करा एकात्मिक व्यवस्थापन

वनामकृवितील किटकशास्‍त्र विभागाचे आवाहन

छायाचित्र – मावा


सद्यपरिस्थितीत कपाशी पिक रोप अवस्थेत असुन सुरुवातीच्या काळात कपाशी पिकावर प्रामुख्याने मावा आणि तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसुन येतो. कोरडवाहू कापुस पिकावर मावा या किडीचा प्रादुर्भाव जुलैच्या दुस-या आठवडयापासुन आढळुन येतो. तर तुडतुडयांचा प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवडयापासुन आढळून येतो. मावा हि किड रंगाने पिवळसर किंवा फिकट हिरवी असुन आकाराने अंडाकृती असते. मावा व त्यांची पिल्ले पानाच्या खालच्या बाजुने आणि कोवळया शेंडयावर समुहाने राहून त्यातील रसशोषण करतात. अशी पाने निस्तेज होउन आकसतात व खालच्या बाजुस मुरगळलेली दिसतात, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. मावा आपल्या शरिरातुन गोड चिकटद्रव बाहेर टाकतो, त्यामुळे पानावरील भाग चिकट बनतो कालांतराने त्यावर काळी बुरशी वाढून पानावर काळा थर जमा झालेला दिसतो. त्यामूळे पानाच्या अन्न निर्माण प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यामुळे झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.


तुडतुडयांची प्रौढ व पिल्ले फिकट हिरव्या रंगाचे असुन पाचरीच्या आकाराचे असतात. त्यांच्या समोरच्या पंखावर एक काळा ठिपका असतो. तुडतुडयांच्या पिल्लांना पंख नसतात. तुडतुडयांचे एक वैशिष्ट म्हणजे ते नेहमी तिरके चालतात व चटकन उडी मारतात. प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजुने राहून त्यातील रसशोषण करतात. अशी पाने प्रथम कडेने पिवळसर होउन नंतर तपकिरी रंगाची होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपुर्ण पाने लाल तांबडी होउन त्यांच्या कडा मुरगळतात. परिणामी झाडांची वाढ खुंटते. अशा झाडांना पाते, फुले आणि बोंडे फारच कमी प्रमाणात लागतात. 10 मावा प्रति पान किंवा 2 ते 3 तुडतुडे प्रति पान आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकाचा वापर करावा.

या किडींच्‍या व्‍यवस्‍थापनाकरिता पुढील प्रमाणे उपाय योजना करावी

वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांदया, पाने व इतर पालापाचोळा जमा करुन किडींसह नष्ट करावा. खुरपणी, कोळपणी करुन पिक तणविरहीत ठेवावे. बांधावरील पर्याइ खाद्य तणे जसे कोळशी, अंबाडी, रानभेंडी नष्ट करावीत. मृदा परिक्षणानुसार नत्र खतांचा योग्य वापर करावा. जेणेकरुन कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही. अशा पिकावर किडही कमी प्रमाणात राहील. कपाशीमध्ये चवळी, मुग, उडीद यांचे आंतर पिक घेतल्यास मित्र किटकांचे संवर्धन होईल. निसर्गत: रसशोषण करणा-या किडीवर उपजिवीका करणारे मित्र किटक उदा. ढालकिडा, सिरफिड माशी, क्रायसोपा, ॲनसियस हि परोपजीवी किटक आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकाचा वापर टाळावा. पिक वाढीच्या सुरुवातीपासून 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.


वरील सर्व उपाय करुनहि किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास डायफेन्थीरॉन 50 टक्के 12 ग्रॅम किंवा बुप्रोफेजीन 25 टक्के प्रवाही 20 मिली किंवा फिप्रोनील 5 टक्के प्रवाही 30 मिली किंवा फलोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका रासायनिक किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यातुन फवारणी करावी. किटकनाशकाचे हे प्रमाण साध्‍या पंपाकरिता असुन पॉवर स्‍प्रे करिता किटकनाशकाचे प्रमाण तीन पट वापरावे. फवारणी करताना दोन किटकनाशकांचे मिश्रण न करता केवळ एकाच किटकनाशकाची शिफारशीनुसार योग्य मात्रा वापरुन फवारणी करावी.


अशा प्रकारे एकात्मिक किड व्यवस्थापनाचा अवलंब करण्‍यातचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्र विभागाच्‍या वतीने करण्यात आले आहे.


छायाचित्र - तुडतुडे