Thursday, September 29, 2022

वनामकृवितील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रास २०२२ चा जैविक इंडीया पुरस्कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रास सेंद्रीय शेती संशोधनातील पुढाकार व सेंद्रीय शेतीसाठी दिलेले प्रोत्साहन व योगदान याकरिता शासकीय संस्था या वर्गातुन दिला जाणारा जैविक इंडीया पुरस्कार -२०२२ प्राप्त झाला आहे. सदरील पुरस्कार हा बेंगलुरु येथील सेंद्रीय शेती आंतरराष्ट्रीय क्षमता केंद्र, केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार) आणि कृषि विभाग (कर्नाटक राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने आग्रा (उत्तर प्रदेश) येथे आयोजित भारतीय सेंद्रीय अन्न सभे दिनांक २३ सप्टेंबर रोजी कर्नाटक राज्‍याचे कृषि मंत्री मा. श्री. बी. सी. पाटील यांच्या हस्ते केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव श्री. प्रियरंजन, सल्लागार डॉ. अशोककुमार यादव, कर्नाटक राज्याचे अप्पर मुख्य सचिव (कृषि) श्री. शिवयोगी कलसाद, मणिपुरचे अतिरिक्‍त मुख्‍य सचिव मा. श्री पी वायफेई, ईकोआचे  कार्यकारी संचालक श्री. मनोज कुमार मेनन आदी  उपस्थित होते. पुरस्‍काराबद्दल कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी तसेच विद्यापीठ परिवाराने अभिनंदन केले.

सन २०१८ पासुन वनामकृवि, परभणी येथे राज्य शासनातर्फे मंजुर व कार्यरत असलेल्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रा तर्फे सेंद्रीय शेतीमध्ये संशोधन व प्रशिक्षणाचे कार्य सुरु आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, मृदाविज्ञान, कृषिविद्या, उद्यानविद्या, कृषि कीटकशास्त्र, वनस्पती रोगशास्त्र, कृषि प्रक्रीया अभियांत्रिकी, पशुसंर्वधन व दुग्धशास्त्र आदी विविध विषयात कार्य सुरू आहे. केंद्रातर्फे शेतक­यांना सेंद्रीय शेती विषयात जमीन व पाणी व्यवस्थापन, वाणांची निवड व सेंद्रीय पध्दतीने लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रीय शेती उत्पादनासाठी बाजारपेठ व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग, सेंद्रीय प्रमाणीकरण अशा विविध विषयावर नियमितपणे प्रशिक्षण देण्यात येते. सेंद्रीय शेती प्रकल्पातर्फे अभिनव प्रशिक्षण उपक्रमांतर्गत कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर सन २०२० व २०२१ मध्ये राज्यस्तरीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमास राज्यातील व राज्याबाहेरील शेतक­यांनी मोठया प्रमाणावर लाभ घेतला. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी राज्यातील व देशातील नामांकीत कृषि विद्यापीठे व संस्थेतील तज्ञांनी सेंद्रीय शेतीमध्ये विविध विषयात शेतक­यांना मार्गदर्शन केले. केंद्रात डॉ. आनंद गोरे हे प्रमुख अन्वेषक तर डॉ. स्मिता खोडके, डॉ. कैलास गाडे, डॉ. रणजित चव्हाण, डॉ. दत्ता बैनवाड, डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. श्रध्दा धुरगुडे, डॉ. अमोल भोसले, डॉ. प्रितम भुतडा, डॉ. आर. सी. सावंत आदी सदस्य शास्त्रज्ञ असुन श्रीमती सारीका नारळे, श्री. दिपक शिंदे, डॉ. सुनिल जावळे, श्री. अभिजित कदम, श्री. सतिश कटारे, श्री. सचिन रणेर, श्री. भागवत वाघ, श्री. दशरथ गरुड आदी  कार्यरत आहेत.

Wednesday, September 28, 2022

रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न

जिल्हा रेशीम कार्यालय व कृषि विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ सप्‍टेंबर रोजी रेशीम संशोधन योजना येथे कृषि विभागातील अधिकारी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणुन संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. अरुण ज-हाड हे होते तर होते. व्‍यासपीठावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. विजय लोखंडे, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. रवि हरणे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. गोविंद कदम, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ चंद्रकांत लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, बदलत्या हवामानात लहान व मध्यम भुधारक शेतक-यांनी शेतीपुरक व्यवसाय सुरु करावा. एकच एक पिक पध्दती धोक्याची असुन पिकां बरोबर एक ते दिड एकर क्षेत्रावर रेशीम उद्योग केल्यास आर्थिक स्‍थैर्य  मिळु शकते, असे प्रतिपादन केले.  

डॉ. अरुण ज-हाड व विजय लोखंडे यांनी कृषि विभागातील अधिकारी यांना नानासाहेब कृषि संजीवनी कार्यक्रम (पोक्रा) व मनरेगा अंतर्गत ५०० एकर तुती लागवड उदिष्टये या वर्षात पुर्ण करण्याविषयी मार्गदर्शक सुचना दिल्या. डॉ. सय्यद ईस्माईल यांनी महाविद्यालयाचे कृषिदुत  विद्यार्थी  रेशीम उद्योग मंगरुळ व कोल्हावाडी ता. मानवत येथे राबवत असल्याचे सांगितले. तर डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मधुमक्षिका पालन व जैविक कीड नियंत्रण विषयची माहिती दिली. श्री. गोविंद कदम यांनी यांना तुती रोपवाटीका विषयी दिली. तांत्रिक सत्रात डॉ.चंद्रकांत लटपटे यांनी तुती लागवड व रेशीम कीटक संगोपन या विषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. धनंजय मोहोड यांनी केले तर आभार डॉ.संजोग बोकन यांनी मानले. कार्यक्रमास परभणी जिल्हयातील सर्व तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि ‍‍पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक उपस्थित होते.


वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाची कु. प्राची गट्टाणी राष्ट्रीय पात्रता परीक्षेत देशात प्रथम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय येथून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेली विद्यार्थीनी कु. प्राची गट्टाणी हीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘राष्ट्रीय परीक्षा एजन्सी’ (एनटीए) द्वारे आयोजित केंद्रिय विद्यापीठातून पदव्युत्तर (गृहविज्ञान) अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेमध्ये २४८ गुण प्राप्‍त करून देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवला. 

महाविद्यालयांच्‍या प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मंचचा तिला उपयोग झाला. कु. प्राची गट्टाणी हिने पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षापासूनच राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेची तयारी सुरू केली. तिला महाविद्यालयातील प्राध्यापकांनी प्रोत्साहन देत राहिले. तिच्या यशासाठी डॉ. वीणा भालेराव आणि प्रा. प्रियंका स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. सुनील जावळे डॉ. गोदावरी पवार, डॉ. मिर्झा यांचे मार्गदर्शन तिला लाभले. यशाबद्दल डॉ. जया बंगाळे, डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. नाहीद खान, डॉ. सुनीता काळे, डॉ. जयश्री रोडगे, डॉ. इरफान सिद्दिकी, डॉ. शंकर पुरी, डॉ. विद्यानंद मनवर, डॉ. कल्पना लहाडे, डॉ. अश्विनी बिडवे आदी कर्मचा-यांनी तिचे अभिनंदन केले.

Saturday, September 24, 2022

तेलबिया पिकांखालील लागवड क्षेत्र वाढीकरिता प्रयत्‍न करण्‍याची गरज ....... राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार

वनामकृवितील आयोजित कृषि प्रदर्शनीची राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांनी केली पाहणी

ड्रोन बाबत माहिती देतांना

रेशीम पासुन तयार करण्‍यात आलेला हाराने सत्‍कार 


आज देश खाद्यतेल आयात करत आहे, राज्‍यात करडई, सुर्यफुल, भुईमुग आदी तेलबिया पिकांखालील लागवड क्षेत्र कमी झाले असुन यामागील कारणांचा शोध घेऊन तेलबिया पिक लागवडीखालील क्षेत्र वाढीकरिता कृषी विद्यापीठ आणि कृषि विभागाने प्रयत्‍न करावेत, असा सल्‍ला राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांनी दिला. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रात दिनांक २४ सप्‍टेंबर रोजी आयोजित कृषि प्रदर्शनाची पाहणी राज्‍याचे माननीय कृषि मंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांनी केली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणिमाजी खासदार मा अॅड. सुरेश जाधव, दापोली कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्‍य श्री प्रविण देशमुख, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदमविभागीय कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री विजय लोखंडे, प्राचार्य डॉ उदय खोडके, डॉ गजानन गडदे आदीसह विविध पदाधिकारी, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, शेतकरी उपस्थित होते.

कृषि प्रदर्शनीतील विद्यापीठ विकसित विविध पिकांच्‍या वाण तसेच कृषि तंत्रज्ञानाची माहिती घेतांना मा. ना. श्री. अब्‍दुल सत्‍तार म्‍हणाले की, विद्यापीठाने अनेक कमी खर्चीक तंत्रज्ञान विकसित केले आहेत, पिकांची अनेक चांगली वाण विकसित केले आहे, हे सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहचले पाहिजे. मराठवाडयातील काही जिल्‍हयात शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झाला, त्‍यामुळे शेतकरी बांधवाचे मोठे नुकसान झाले. शासनाने ९८ कोटी रूपये नुकसान भरपाई दिली. या शंखी गोगलगाई चा प्रादुर्भाव वाढत गेला तर भविष्‍यात शेती करणे मुश्‍कील होईल. कृषि विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी यावर त्‍वरित उपाययोजना शोधुन काढण्‍याच्‍या सुचना केल्‍या. आज शेतकरी बांधवापुढे मजुरांचा मोठा प्रश्‍न असुन ड्रोन तंत्रज्ञानाचा फवारणी करिता वापर केल्‍यास कमी वेळात फवारणी करणे शक्‍य होणार आहे, विद्यापीठाने ड्रोन फवारणीचे प्रशिक्षण आयोजित करावेत. ड्रोन खरेदीस मोठा खर्च येतो, याकरिता शेतकरी बांधवांना गटाच्‍या माध्‍यमातुन एकत्रित येऊन ड्रोन खरेदी करावे. विद्यापीठाने इथेनॉल किंवा जैवइंधनावर जालणारे ड्रोनची निर्मिती करावी. शेतकरी आत्‍महत्‍या मुक्‍त महाराष्‍ट्र करण्‍याकरिता सर्वांनी एकत्रित करण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

यावेळी माननीय कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, शेतकरी बांधवा पर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहचविण्‍याकरिता विद्यापीठ कटिबध्‍द असुन शेतकरी बांधवाच्‍या मागणीनुसार कृषी तंत्रज्ञान व मार्गदर्शन करण्‍यात येईल. विद्यापीठाच्‍या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराज्‍यासाठीउपक्रम मराठवाडयात मोठया प्रमाणात राबविण्‍यात येत असल्‍याचे ते म्‍हणाले. माननीय कृषिमंत्री यांच्‍या प्रदर्शनी पाहणी दरम्‍यान कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, आदीसह विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी विविध तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली.






Saturday, September 17, 2022

हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर तंत्रज्ञानाधिष्‍ठीत शेती करण्‍याचा काळ ....... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित आयोजित रबी शेतकरी मेळाव्‍यास शेतकरी बांधवाचा मोठा प्रतिसाद

हवामान बदलामुळे कधी अति पाऊस तर कधी पाऊसाचा खंड अशा टोकाच्‍या परिस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे, यावर मात करण्‍याकरिता तंत्रज्ञानाची गरज असुन तंत्रज्ञानधिष्‍ठीत शेती करण्‍याचा काळ आहे. भविष्‍यात डिजिटल शेती, ड्रोन तंत्रज्ञान, रोबोट अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा वापर होणार आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंद्या आहे. शेतकरी बांधवाची प्रगती म्‍हणजेच देशाची प्रगती आहे. कृषिच्‍या प्रगतीमुळेच जागतिक पातळीवर देश पुढे जात आहे. परंतु दुस-या बाजुस शेतकरी आत्‍महत्‍या होत आहेत, महाराष्‍ट्र शेतकरी आत्‍महत्‍या मुक्‍त करण्‍याकरिता केंद्र व राज्‍य शासन, लोकप्रतिनिधी, कृषी उद्योजक, आणि कृषी विद्यापीठ यांनी एकत्रित कार्य करण्‍याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले. 

मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाचे औजित्‍य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांचे संयुक्‍त विद्यमाने आयोजित रबी शेतकरी मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास विशेष अतिथी म्‍हणुन माजी कुलगुरू मा डॉ वेदप्रकाश पाटील, कृषि उद्योजक तथा महिकोचे विश्‍वस्‍त मा श्री. राजेंद्र बारवाले, जिंतुर विधानसभा सदस्‍य मा. आ. श्रीमती मेघनाताई बोर्डीकर, प्रयोगशील शेतकरी मा श्री दादा लाड आदी उपस्थित होते. व्‍यासपीठावर माजी खासदार अॅड सुरेश जाधव, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री विजय लोखंडे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री आर एस पाटील, सुरेश घुंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, आज कापुस लागवडीत नवीन तंत्रज्ञान विकसित केलेल्‍या श्री दादा लाड यांना गौरविण्‍यात आले तसेच युवा प्रयोगशील शेतकरी श्री दत्‍तात्रय कदम यांनी गौरविण्‍यात आले. भविष्‍यातही अशा मार्गदर्शक शेतकरी बांधवाना कृषी विद्यापीठ वेळोवेळी सन्‍मानित करणार आहे, होतकरू व नवनवीन प्रयोग करणा-यां शेतकरी बांधवाना प्रोत्‍साहित करण्‍यात येणार असुन यामुळे इतर शेतकरी बांधवाना प्रेरणा मिळेल.

मार्गदर्शनात माजी कुलगुरू मा डॉ वेद्रप्रकाश पाटील म्‍हणाले की, आज भारत युवकांचा देश आहे, या युवाशक्‍तीचा आपल्‍या योग्‍य पध्‍दतीने वापर करावा लागेल. कुशल व ज्ञानी मनुष्‍यबळाची देशाला गरज आहे. शेतीच देशाचा अर्थव्‍यवस्‍थेचा कणा आहे, असे सांगुन त्‍यांनी मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचा इतिहास सविस्‍तर सांगितला.

जिंतुर विधानसभा सदस्‍य मा. आमदार श्रीमती मेघनाताई बोर्डीकर यांनी शेतकरी आत्‍मनिर्भर झाला तर देश आत्‍मनिर्भर होईल. मराठवाडयात ए‍कात्मिक शेती पध्‍दतीचा प्रसार करण्‍याची गरज असुन कृषि विद्यापीठाने याकरिता विशेष प्रयत्‍न करण्‍याची अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

भाषणात मा श्री दादा लाड म्‍हणाले की, कापुस लागवडी खर्चातील वाढीमुळे शेतकरी अडचणीत आला. परंतु योग्‍य पध्‍दतीने व्‍यवस्‍थापन केल्‍यास उत्‍पादनात वाढ शक्‍य आहे, असे सांगुन त्‍यांनी स्‍वत: विकसित केलेले कापुस लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.  

माजी खासदार अॅड सुरेश जाधव म्‍हणाले की, मराठवाडयातील जमिन अत्‍यंत सुपिक असुन विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकरी बांधवांनी करावा. शेती हाच ग्रामीण अर्थव्‍यवस्‍थेचा कणा आहे. शेतक-यांना पत, पुरवठा आणि पाणी याकरिता केंद्र व राज्‍य शासन प्रयत्‍न करित आहे.

मेळाव्‍यात कापुस लागवड पध्‍दतीत स्‍वत:च्‍या अनुभवावर तंत्रज्ञान विकसित करणारे मालसोन्‍ना येथील प्रयोगशील शेतकरी मा श्री दादा लाड यांचा विद्यापीठाच्‍या वतीने शेतकरी मार्गदर्शक म्‍हणुन तर शेतीत यशस्‍वीपणे नवनवीन प्रयोग करणारे मालेगांव येथील युवा शेतकरी श्री दत्‍तात्रय कदम यांना नाविण्‍यपुर्ण शेतकरी म्‍हणुन माननीय कुलगुरू यांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले. तसेच नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्‍थेतुन पोस्‍ट-डॉक पदवी प्राप्‍त केलेल्‍या विद्यापीठाच्‍या पहिला महिला शास्‍त्रज्ञ डॉ गोदावरी पवार यांचाही सत्‍कार करण्‍यात आला.

तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी रबी पिकांबाबत मार्गदर्शन केले तर चर्चासत्रात शेतकरी बांधवाच्‍या कृषि विषयक विविध शंकाचे समाधान करण्‍यात आले. याप्रसंगी बायर कंपनी आणि महिको कंपनी च्या वतीने ड्रोन व्‍दारे फवारणीचे प्रात्‍यक्षिक दाखविण्‍यात आले. मेळाव्‍यात विद्यापीठ विकसित विविध रबी पिकांच्‍या बियाणे विक्रीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका, पुस्तिका, आणि विद्यापीठाचे मासिक शेती भाती यांचे विमोचन करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ देवराव देवसरकर यांनी विद्यापीठ विकसित विविध रबी पिकांच्‍या वाणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ प्रितम भुतडा, डॉ सुनिता पवार, डॉ अरूण गुट्टे यांनी केले तर आभार डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले.  याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनीसही शेतकरी बांधवानी मोठा प्रतिसाद दिला तर मेळाव्‍यास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.

मेळाव्‍याचे उदघाटन करतांना
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

मार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा डॉ वेदप्रकाश पाटील
मार्गदर्शन करतांना माननीय आमदार श्रीमती मेघनाताई बोर्डिकर

प्रयोगशील शेतकरी मा श्री दादा लाड यांना 'शेतकरी मार्गदर्शक' फार्मर फेलो पुरस्‍काराने सन्‍मानित करतांना

उपस्थित शेतकरी बांधव

युवा शेतकरी श्री दत्‍तात्रय कदम यांना नाविन्यपूर्ण शेतकरी पुरस्‍कारांने सन्‍मानित करतांना
पोस्‍ट-डॉक पदवी प्राप्‍त केलेल्‍या महिला शास्‍त्रज्ञ डॉ गोदावरी पवार यांचा सत्‍कार करतांना
विद्यापीठ प्रकाशनाचे विमोचन करतांना


विद्यापीठ बियाणे विक्रीचे उदघाटन करतांना

कृषि प्रदर्शनीचे पाहणी करतांना
ड्रोन प्रात्‍यक्षिकांचे उदघाटन करतांना

मार्गदर्शन करतांना माजी खासदार मा अॅड सुरेश जाधव