वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृहात रथसप्तमीचे औचित्य साधून दिनांक २८ जानेवारी रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. वसतिगृहातील विद्यार्थिनी विजया पवार हिने पुढाकार घेऊन सूर्यनमस्कार संचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थींनी दुर्गा, अनुराधा, शितल, मयुरी, दक्षता सिध्दी, समृद्धी यांनी प्रयत्न केले. सदर कार्यक्रम कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सय्यद इस्माईल, वसतिगृह मुख्य अधीक्षक डॉ राजेश कदम, वसतिगृह सहायक अधिक्षक डॉ गोदावरी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Saturday, January 28, 2023
Friday, January 27, 2023
मौजे पिंगळी येथील ज्वारीच्या आद्यरेषिय पीक प्रात्यक्षिकांची पाहणी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्राच्या वतीने दिनांक २६ जानेवारी रोजी मौजे
पिंगळी येथील शेतकरी श्री रामकिशन पवार यांच्या रब्बी ज्वारीच्या आद्यरेषिय
पीक प्रात्यक्षिकांतर्गत विद्यापीठ विकसित परभणी सुपरमोती या नवीन वाणाच्या
प्रक्षेत्रास संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर व प्रभारी अधिकारी डॉ एल एन
जावळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, सन २०२३ हे वर्ष संपुर्ण जगात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य
वर्ष म्हणुन
साजरे करण्यात येत आहे. भारतीय खाद्य संस्कृतीत भरड धान्यास महत्व आहे परंतु
काळाच्या ओघात आपण पाश्चिमात्य खाद्याचा आभारात समावेश करत आहोत. ज्वारी
पिकामुळे मानवास खाण्यास
पौष्टिक ज्वारी मिळते तर जनावरांना
कडबा मिळतो.
हीच जनावरे आपणास शेणखत देतात, याचा उपयोग आपणास जमिन सुपिकतेसाठी होतो. डॉ. एल. एन. जावळे यांनी रब्बी
ज्वारीचे सुधारित वाण व पारंपारिक दगडी वाणामधील फरक सांगितला व इतर शेतक-यांनी
पुढील हंगामामध्ये दगडी वाण घेण्याऐवजी सुधारित वाणांची पेरणी करावी असे आवाहन
केले. भेटी दरम्यान
गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
टाकळगव्हाण (ता.पाथरी) येथे आयआरएम प्रकल्पांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कापूस संशोधन योजना आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या वतीने कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (आयआरएम) तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि आणि संचालक संशोधन डॉ.दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्प परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील टाकळगव्हाण, बाभळगाव, बोरगव्हाण आणि परभणी तालुक्यातील परळगव्हाण व ताडलिमला या गावातील प्रत्येकी १० याप्रमाणे एकूण ५० शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येत आहे. प्रकल्पातंर्गत एक दिवसीय दिनांक २५ जानेवारी रोजी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे टाकळगव्हाण तालुका पाथरी येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री. वैजनाथ महिपाल तर प्रमुख अतिथी म्हणून कापूस संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. अशोक जाधव हे होते. प्रमुख मार्गदर्शक दिर्घकालीन खत प्रयोगाचे प्रभारी अधिकारी डॉ. रामप्रसाद खंदारे, प्रकल्प समन्वयक किटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, वरीष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रशांत जाधव आदींची उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ. अशोक जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांनी नेहमीच्या पद्धतीने कापूस लागवड न करता कमी कालावधीच्या वाणांची घन पध्दतीने लागवड करावी त्यामुळे हेक्टरी झाडांची संख्या वाढून सरासरी उत्पन्नात वाढ होईल त्यासोबतच शेतकऱ्यांनी ६० दिवसांनी झाडाची शेंडे खुडावीत किंवा शिफारशीनुसार वाढ रोधक रसायनांचा योग्य वापर करून झाडांची होणारी कायीक वाढ थांबविल्यास अधिक उत्पन्न मिळेल.
मनोगतात सरपंच श्री. वैजनाथ महिपाल यांनी विद्यापीठातर्फे हा कार्यक्रम त्यांच्या गावामध्ये आयोजित केल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले आणि विद्यापीठातर्फे वेळोवेळी अशा कार्यक्रमाचे आयोजन करून कापसासोबतच ऊस, टरबूज व इतर फळबाग याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असे मत व्यक्त केले.
मृदाशास्त्रज्ञ डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी पीक उत्पादन वाढीसाठी जमिनीचे आरोग्य बाबत माहिती देतांना म्हणाले की, जमिनीचा सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असुन शेणखत, हिरवळीचे खत, जैविक संवर्धने यांचा वापर करून अधिक उत्पन्न घ्यावे, असा सल्ला दिला.
डॉ.दिगंबर पटाईत यांनी कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्पा विषयी दिली माहिती शेतकऱ्यांनी कापूस शेती मध्ये गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करून प्रकल्पातील शेतकऱ्यांना वाटप केलेल्या निविष्ठ वापराबाबत माहिती देऊन फरदड न ठेवण्याचे आवाहन केले. कपाशी मधील एकात्मिक कीड व्यवस्थापन व कीटकनाशकाचा सुरक्षित वापर याविषयी मार्गदर्शन केले. तर डॉ. प्रशांत जाधव यांनी कापूस उत्पादन वाढीचे बारकावे सांगितले.
प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी श्री
ज्ञानेश्वर इंगळे यांनी प्रकल्पांतर्गत प्रकाशित दिनदर्शिका २०२३ मध्ये दिलेल्या
विविध तंत्रज्ञानाविषयी व विद्यापीठाच्या माहिती वाहिनीबद्दल माहिती दिली. मान्यवरांच्या
हस्ते प्रकल्पांतर्गत प्रकाशित दिनदर्शिका २०२३ चे विमोचन करून प्रशिक्षणार्थींना
वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी कृषिभुषण पुरस्कार प्राप्त
शेतकरी श्री. बाबासाहेब रणेर, ग्रामविकास अधिकारी श्री. राहुल मानोलीकर, रिलायन्स
फाउंडेशनच्या श्रीमती विजया ठेंगे, श्री. गणेश गिरी आदीसह
गावातील व परिसरातील २०० शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन आत्माचे
सहायक तंत्र अधिकारी श्री.नितीन जाधवर यांनी केले तर आभार श्री.दिपक महिपाल यांनी मानले. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी श्री.नारायण ढगे, दिपक महिपाल, अनिल महिपाल, अनिल तायनाक, रामप्रसाद तायनाक, दत्ता महिपाल, महादेव फुन्ने आदीसह समस्त गावकऱ्यांनी प्रयत्न केले.
Thursday, January 26, 2023
वनामकृवित प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
देशाची सुरक्षा जवानांच्या हातात आहे आणि अन्न सुरक्षा शेतकऱ्यांच्या हातात आहे. शेतकरी बांधवाच्या कल्याणाकरिता आपण सर्वांनी मिळून काम करू असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कुशाळकर, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ जी एम वाघमारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी प्रजासत्ताक दिनांच्या सर्वांना शुभेच्छा देऊन पुढे म्हणाले की, संपुर्ण देशात राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाली आणि भारत हा लोकशाही देश बनला. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, जे दोन वर्षे, अकरा महिने आणि अठरा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर तयार करण्यात आले आहे. हा प्रजासत्ताक दिन भारतीय लोकांसाठी विशेष आहे, कारण यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा करत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयांच्या मनात देशभक्ती आणि मातृभूमीबद्दल अपार आपुलकी आणि आदर जागृत करतो. याप्रसंगी छात्रसेना अधिकारी डॉ. जयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली छात्रसैनिकांनी कुलगुरू यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री उदय वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विविध विभागाचे विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Wednesday, January 25, 2023
वनामकृविचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांची पत्रकार परिषद संपन्न
शेती व शेतकरी विकासासाठी सर्वांनी एकत्रित कार्य करण्याची गरज असुन विद्यापीठाने देश विदेशातील विविध अग्रगण्य संस्थेसोबत सामंजस्य करार केले असुन लवकरच अमेरिकेतील अग्रगण्य विद्यापीठाशी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. याचे दृश्य परिणाम विद्यापीठाच्या संशोधनात व शिक्षणात दिसुन येणार आहे. विद्यापीठास एका बाजुस शेतकरी तर दुस-या बाजुस आंतरराष्ट्रीय कृषि शास्त्रज्ञांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ड्रोन तंत्रज्ञानात परभणी विद्यापीठ देशात आघाडीवर राहील, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक २५ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माननीय कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी २५ जुलै २०२२ रोजी कुलगुरू पदाचा कार्यकाळ स्वीकारून सहा महिने पुर्ण केले. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कुशाळकर, डॉ प्रशांत देशमुख, डॉ गोपाल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी विद्यापीठ राबवित असलेल्या विविध उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. यावेळी पत्रकार बांधवानी नाहेप प्रकल्प, पशुशक्तीचा योग्य वापर योजना, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय येथील विविध उपक्रमास भेट देऊन माहिती घेतली. कार्यक्रमास परभणी शहरातील पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
मागील सहा महिन्यात माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेले उपक्रम
मराठवाडयातील कृषि विकासाकरिता शासन, कृषि विद्यापीठ, कृषी विभाग, शासकीय संस्था, अशासकीय संस्था, कृषि क्षेत्रातील खासगी कंपन्या आणि शेतकरी बांधव यांनी सर्वांना एकत्रित कार्य करण्याची गरज आहे. कृषि संशोधन आणि कुशल मनुष्य निर्मिती करिता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकीत संस्था व कंपन्या यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आले असुन येणा-या काळात अमेरिकेतील कान्सस विद्यापीठ, फ्लोरिडा विद्यापीठ आणि वॉशिग्टन स्टेट विद्यापीठाशी सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. बियाणे, किटकनाशके, खत कंपन्यासोबत सामजंस्य करारावर सध्या काम चालु आहे. पुढील अग्रगण्य संस्थेशी विद्यापीठाचे सामजंस्य करार झाले आहेत.
विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थसोबत सामंजस्य करार
राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग यांच्याशी संशोधनाकरिता सामंजस्य करार - राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या माध्यमातुन नाविण्यपुर्ण संशोधनाकरिता परभणी कृषि विद्यापीठास ५० लाख रूपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठातील तरूण संशोधकांना मोठी संधी असुन तरूणांकडे नवनवीन संशोधन संकल्पना असतात, त्यास व्यासपीठ देण्याचा यामागे हेतु आहे.
नोएडा येथील सीएनएच इंडस्ट्रियल (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी सामंजस्य करार - देशातील कृषि यांत्रिकीकरणात अग्रगण्य असलेली नोएडा येथील सीएनएच इंडस्ट्रियल (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला असुन या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणात शेतकरी आणि ग्रामीण युवक कौशल्य विकास प्रकल्पास ५० लाख रूपये मंजुर झाले आहेत. प्रकल्पांतर्गत कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात कृषि यांत्रिकीकरण प्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र राहणार असुन खामगाव; औरंगाबाद; तुळजापूर आणि जालना येथील कृषी विज्ञान केंद्राचे उपकेंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. प्रमुख पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी संपुर्ण यांत्रिकीकरणाकरिता प्रयत्न केला जाणार आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत १५०० शेतकरी, तंत्रज्ञ आणि ग्रामीण युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आणि प्रशिक्षणार्थींना ‘आत्मा निर्भार भारत मिशन’ अंतर्गत त्यांचे स्वत:चे उद्योग/सेवा केंद्र सुरू करण्यास प्रोत्साहित करण्यात येणार.
अहमदाबाद येथील इस्रोचे अंतरिक्ष उपयोग केंद्रासोबत सामंजस्य करार - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अहमदाबाद येथील अंतराळ उपयोग केंद्र आणि विद्यापीठ सामंजस्य करार झाला असुन अचुक हवामान अंदाज व त्या आधारे ठोस कृषी सल्ला तालुकानिहाय शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्याकरिता मदत होणार आहे. कृषि क्षेत्रात अंतराळ विज्ञानाच्या मोठा वापर होणार असुन अहमदाबाद अंतराळ उपयोग केंद्राच्या माध्यमातुन परभणी कृषि विद्यापीठात संशोधनात्मक केंद्र स्थापनाचा प्रयत्न केला जात आहे. करारामुळे अंतरिक्ष उपयोग केंद्र व परभणी कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त संशोधन कार्यास चालना मिळणार असुन विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक आणि शेतकरी बांधव यांना लाभ होईल,
लुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था यांच्याशी सामंजस्य करार - काढणी पश्चात तंत्रज्ञानात कराराच्या माध्यमातुन दोन्ही संस्थेतील पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण व संशोधन, अभ्यास दौरे आदी सहकार्यात्मक कार्य करण्यात येणार आहे. पिकांचे कापणीनंतरचे नुकसान कमी करणारे तंत्रज्ञान विकासावर भर देण्यात येणार आहे. कृषी शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण उद्देशांसाठी दोन्ही संस्थेतील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
लखनौ येथील भारतीय ऊस संशोधन संस्था यांच्याशी सामंजस्य करार - विद्यापीठातील ऊस पिकातील प्रशिक्षण आणि दर्जेदार पदव्युत्तर संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करारावर करण्यात आला. यामुळे दीर्घकालीन ऊस संशोधनाला चालना मिळणार आहे.
कृषि ड्रोन तंत्रज्ञान विकासाकरिता विद्यापीठाचे विशेष प्रयत्न
गुरूग्राम (हरियाणा) येथील आईओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेड यांच्याशी सामंजस्य करार
कृषी क्षेत्रात काटेकोर आणि अचूक पद्धतीने विविध कामे करण्याकरिता ड्रोनचा वापर वाढणार असुन विविध पिकात किड-रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, शेतातील माहिती संकलन यासाठी ड्रोनचा वापर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ड्रोनचा वापर करण्यासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने ड्रोन वापराबाबत नियम आखुन दिलेले आहेत. त्यानुसार ड्रोन चालवण्यासाठी ड्रोन पायलट परवाना आवश्यक आहे. हा परवाना नागरी विमान वाहतूक संचालनालयाने अधिकृत केलेल्या ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेकडून घ्यावा लागतो. अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था विद्यापीठात स्थापन करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ आणि आईओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेड यांच्यात करार करण्यात आला. करारामुळे पिकनिहाय ड्रोन वापराच्या संशोधनास चालना मिळणार असुन ड्रोन आधारित शास्त्रशुध्द पध्दतीने फवारणी करणे, विविध प्रकाराचे फवारणी नोझल तयार करणे, कृत्रिम बुध्दीमत्ता व मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य गतीने आणि काटेकोरपणे फवारणी करणे याबाबत प्रशिक्षण व संशोधन कार्यास चालना मिळणार आहे. केवळ फवारणी पुरते ड्रोनचा वापर मर्यादित न राहता, भविष्यात रोग व कीडींचे सर्वेक्षण, खत व अन्नद्रव्य व्यवस्थापन आदीकरिता ही उपयोगात येणार आहे. याकरित अद्ययावत केंद्र विद्यापीठात राहणार आहे.
भाडेतत्वावर आधारीत ड्रोन केंद्र (कस्टम हायरिंग सेंटर) स्थापन करण्यात येणार - कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील समितीने नुकतेच नऊ पिकांतील ड्रोन वापराच्या सुरक्षित व कार्यक्षम वापराबाबतचे मार्गदर्शक तत्वे देशाच्या कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषि, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागास सादर केले. त्यानंतर मृदा आणि पिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शक तत्वे तयार करण्याकरिता मा डॉ इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समितीचे गठण करण्यात आली होती त्याचा अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्पात आहे. नाहेप प्रकल्पाच्या अंतर्गत डिजिटल शेती तंत्रज्ञानावरील एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम निश्चित झाला असुन लवकरच सदर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठासोबत सामजंस्य कराराच्या माध्यमातुन ड्रोन निर्मितीच्या मुलभूत सुविधा विकासाकरिता प्रयत्न केले जात असुन परभणी कृषी विद्यापीठ देशात कृषी ड्रोन तंत्रज्ञानाकरिता ओळखले जाईल. कौशल्य विकासाकरिता देश-विदेशातील अग्रगण्य संस्थेकडुन विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधक यांना प्रशिक्षण व अभ्यास दौ-याचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठातील दोन प्राध्यापक नुकतेच अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठात डिजिटल तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण पुर्ण करून आले असुन लवकरच विद्यापीठातील १३ विद्यार्थ्यांना थायलंड येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रशिक्षणा करिता नाहेप प्रकल्पांर्गत पाठविण्यात येणार आहे. नाहेप अंतर्गत विद्यापीठातील ६० विद्यार्थी आयआयटी खरगपुर आणि मुंबई येथे प्रशिक्षण पुर्ण केले आहे.
जपान येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदे माननीय कुलगुरू यांचा सहभाग व व्याख्यान
अमेरिकेतील फ्लोरिडो विद्यापीठात मुख्यालय असलेल्या कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी या अग्रगण्य वैज्ञानिक संस्थेचे फेलो म्हणुन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांची निवड करण्यात आली असुन जपान मधील क्योटो येथे दिनांक ५ ते ९ डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित विसावी सीआयजीआरजागतिक परिषदेत त्यांना फेलो म्हणुन अकादमीच्या वतीने सन्माननित करण्यात आले. परिषदेत देशातील कृषीविद्यापीठामधुन एकमेव मुख्य वक्ता म्हणुन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांना विशेष आमंत्रित करण्या आले होते, परिषदेत त्यांनी ‘शाश्वत अन्न-पाणी-ऊर्जा संबंध- भारतीय संदर्भ’ या विषयावर व्याख्यान दिले. परिषदेतील निष्कर्ष मराठवाडा विभाग आणि राज्यात शाश्वत कृषी उत्पादनासाठी उपयुक्त ठरतील. परिषदेत उपस्थित विविध आंतरराष्ट्रीय संस्थेतील संशोधक व प्राध्यापकांशी मा डॉ इन्द्र मणि यांनी संशोधनात्मक भागीदारी बाबत चर्चा केली.
ऑनलाईन ऑनलाईन शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली विद्यापीठात कार्यान्वीत - विद्यापीठात ऑनलाईन शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वीय करण्यात आली असुन सदर प्रणाली मुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यात सुसूत्रता येणार असुन विविध शैक्षणिक प्रक्रिया स्वयंचलित होणार आहेत. यामुळे विद्यापीठाच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता येणार असुन वेळेची आणि श्रमाची बचत होणार आहे.
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम - सन २०२२ मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” उपक्रमातंर्गत मराठवाडा विभागातील ३०० पेक्षा जास्त गावात विद्यापीठ शास्त्रज्ञाच्या पथकांनी भेटी देऊन त्या त्या गावातील शेतकरी बांधवांच्या शेती विषयक समस्या समजुन घेतल्या व पीक लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले, हा उपक्रम भविष्यातही राबवण्यात येणार असून प्रत्येक महिन्यात एक दिवस विद्यापीठातील शास्त्रज्ञ व प्राध्यापक सहभागी होणार आहेत. यामुळे शेतकरी बांधवाशी विद्यापीठाची नाळ अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
सिल्लोड येथे आयोजित १ जानेवारी ते ५ जानेवारी २०२३ दरम्यान राज्यस्तरीय कृषि महोत्सवात राज्यातील लाखो शेतकरी बांधवांनी परभणी कृषी विद्यापीठाच्या दालना प्रचंड प्रतिसाद दिला. राज्याचे माननीय मुख्यमंत्री, केंद्रातील आणि राज्यातील अनेक मंत्री महोदयांनी परभणी विद्यापीठाचे संशोधन व तंत्रज्ञानाची माहिती घेऊन प्रसंशा केली. यात विद्यापीठ विकसित विविध पिकांचे वाण व तंत्रज्ञानावर आधारीत ३० दालनाचा समावेश होता.
विद्यापीठ विकसित वाण व तंत्रज्ञान केवळ मराठवाडा किंवा राज्यापुरते उपयुक्त नसुन देशातील अनेक राज्यातील शेतकरी बांधवाकरीता उपयुक्त आहे. नुकतेच उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथील कृषि प्रदर्शनीत विद्यापीठ विकसित बैलचलित कृषि अवजारे शेतकरी बांधवाकरिता आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरली. उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री यांनीही याची दखल घेतली.
विद्यापीठाच्या तीन वाण राष्ट्रीय मान्यता - नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय वाण प्रसारण उपसमितिची बैठकीत विद्यापीठाच्या तीन पिकांच्या वाणास मान्यता देण्यात आली. यात विद्यापीठ विकसित तुरीचा वाण बीडीएन-२०१३-२ (रेणुका) हा राष्ट्रीय पातळीवर मध्य भारताकरिता तर सोयाबीनचे एमएयुएस-७२५ आणि करडई पिकाचे पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णा) या वाणास राज्याकरिता लागवडीस मान्यता प्राप्त झाली.
दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्त कृषि संशोधन आणि विकास बैठकीत विद्यापीठ विकसित सोयाबीन वाण एमएयुएस-७३१ सह ४२ विविध तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता प्राप्त झाली.
राणी सावरगांव येथे भाडेतत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्राची स्थापना - विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प पशुशक्तीचा योग्य वापर योजना आणि राणी सावरगांव येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा यांचे संयुक्त विद्यामाने राणीसावरगांव (ता. गंगाखेड जि. परभणी) येथे विद्यापीठ विकसित बैलचलित अवजारांचा समावेश असलेले भाडेतत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्राचे (कस्टम हायरिंग सेंटर) स्थापना करण्यात आली.
परभणी जिल्हयातील ग्रामीण युवकांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन - परभणी जिल्हयातील ग्रामीण युवकांकरीता महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत किमान कौशल्य विकास कार्यक्रम च्या वतीने रेशीमउद्योग, मधमाशीपालन, ज्युस प्रक्रिया तंत्रज्ञ, मसाले प्रक्रिया तंत्रज्ञ आणि फ्रुट पल्प प्रक्रिया तंत्रज्ञ प्रमाणपत्र अभ्यासक्रम (कोर्से सुरूवात करण्यात आली असुन सदर कार्यक्रमाच्या अंतर्गत परभणी जिल्हयातील ग्रामीण युवकांना प्रशिक्षीत करण्यात येणार आहे.
अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयात नवी दिल्ली येथील केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत सामाईक उष्मायन केंद्र (कॉमन इन्क्युबेशन सेंटर) उभारण्यास मान्यता मिळालेली असुन या केंद्राच्या इमारत बांधकामास सुरूवात करण्यात आली.
प्रगतशील शेतकरी, नन्मोषक कृषी उद्योजक, विद्यापीठ शास्त्रज्ञ यांचा सन्मान - विद्यापीठाच्या वतीने आयोजित विविध पातळीवर शेतकरी, कृषि उद्योजक, कृषि शास्त्रज्ञ यांना सन्माननीत करण्यात येऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष - वर्ष २०२३ हे संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणुन घोषित केले असुन विद्यापीठाने बाजरी व ज्वारी पिकांच्या अनेक चांगले वाण विकसित केले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने मानवी आहारात भरड धान्याचा वापर वाढीकरिता विद्यापीठ २०२३ मध्ये वर्षभर जनजागृती करिता विविध उपक्रम राबविणार असुन भरड धान्य मुल्यवर्धनावर विद्यापीठ कार्य करीत आहे. यात ज्वारी व बाजरी पिकांच्या अनेक वाणाचा प्रसार व प्रचारावर भर देण्यात येणार आहे.