Saturday, October 17, 2026

वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न

परिसर स्वच्छतेसोबतच मनाची स्वच्छताही महत्त्वाची – अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ (दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६) अंतर्गत दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने परिसर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेद्वारे महिनाभर राबविण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करताना महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य म्हणाले की, परिसराच्या स्वच्छतेसोबतच मनाची स्वच्छताही तितकीच आवश्यक आहे. स्वच्छता ही केवळ परिसरापुरती मर्यादित न राहता प्रत्येकाने आपल्या विचारांत, वर्तनात आणि दैनंदिन आचरणातही स्वच्छतेची भावना जोपासली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असून, विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे संस्कार आपल्या जीवनात रुजवून समाजातही त्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

या स्वच्छता मोहिमेत प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे, श्रमप्रतिष्ठेची भावना वाढविणे, सामाजिक बांधिलकी जोपासणे आणि सार्वजनिक परिसराप्रती जबाबदारीची जाणीव दृढ करणे हा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास पदवी शिक्षण प्रभारी डॉ. दिलीप झटे, तसेच विविध विभागांचे प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. प्रफुल्ल घंटे, वनस्पती शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या प्रभारी डॉ. गोदावरी पवार, डॉ. सुरेश वाईकर आणि डॉ. सुदाम शिराळे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व प्रथम सत्राचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कृषि वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख आणि सर्व प्राध्यापकांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला.

दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून स्वच्छता, सामाजिक जाणीव आणि सामूहिक सहभाग या मूल्यांना प्रोत्साहन देण्यात आले. अभियानाच्या सांगतेनिमित्त आयोजित ही स्वच्छता मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पाथ्रीकर व डॉ. फरिया खान, तसेच डॉ. संतोष ठोंबरे, डॉ. तेजश्री कच्छवे, डॉ. गजानन नाईक, श्री. भारत शिंदे आणि श्री. विजय गारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी सर्व आयोजक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम न राहता ती प्रत्येकाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हावी, तसेच स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी परिसराच्या निर्मितीसाठी सर्वांनी सातत्याने योगदान द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.













Friday, October 16, 2026

वनामकृविच्या पीक विविधता पथदर्शक प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना करडई, जवस व हुरडा ज्वारीच्या बियाण्यांचे वाटप

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या एकात्मिक शेती पद्धती अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पीक विविधता पथदर्शक प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेल्या करडई, जवस आणि हुरडा ज्वारीच्या वाणांच्या बियाण्यांचे दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील शेतकऱ्यांनी वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दीपक गवळी यांनी पीक विविधीकरणाचे महत्त्व विशद केले.

गवळी म्हणाले की, खाद्यतेलाच्या गरजांसाठी परदेशांवरील अवलंबित्व कमी करायचे असेल, तर करडईसारख्या तेलबिया पिकांच्या लागवडीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. स्थानिक हवामान आणि उपलब्ध पाण्याच्या स्रोतांचा विचार करून योग्य पिकांची निवड केल्यास शाश्वत उत्पादन साध्य करता येईल. यावेळी राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक तथा कृषिशास्त्रज्ञ डॉ. सुर्यकांत पवार यांनी हवामान बदल आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रब्बी हंगामात करडई, जवस आणि ज्वारीसारख्या पिकांचा समावेश करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात परभणी येथील एकात्मिक शेती पद्धती प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. के. टी. जाधव यांनी पीक विविधता पथदर्शक प्रकल्पाची माहिती दिली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर या चार जिल्ह्यांत टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. चालू वर्षात छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत प्रकल्पाच्या माध्यमातून पीक विविधीकरणाला चालना देण्यात येत आहे.

स्थानिक हवामानास अनुकूल पिकांची निवड, जमिनीची सुपीकता टिकविणे आणि शेतकऱ्यांच्या कडधान्य व खाद्यतेलाच्या गरजा पूर्ण करणे, या उद्देशाने प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. खरीप हंगामात तूर, मूग आणि बाजरी या पिकांची प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांनी ‘गोदावरी तूर’ या वाणाची पीकस्थिती उत्कृष्ट असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रामेश्वर ठोंबरे आणि मंगेश यांनी विशेष परिश्रम घेतले.



मिशन मौसमअंतर्गत वनामकृवित उभारणार अत्याधुनिक एकात्मिक हवामान निरीक्षण प्रणाली

वनामकृवि - भारत मौसम विज्ञान विभाग (IMD) यांच्यात सामंजस्य करार; मराठवाड्यातील हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला सेवांना मिळणार बळ


मराठवाड्यातील हवामान निरीक्षण, अचूक हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी कृषि हवामान सल्ला सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भारत मौसम विज्ञान विभाग (IMD), मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्यात केंद्र शासनाच्या ‘मिशन मौसम’ उपक्रमांतर्गत एकात्मिक हवामान निरीक्षण प्रणाली (Integrated Meteorological Observation System–IMOS) उभारण्यासाठी दि. १६ ऑक्टोबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला.

ही अत्याधुनिक प्रणाली विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कृषि हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प (AICRP on Agrometeorology) येथे उभारण्यात येणार आहे. या प्रणालीअंतर्गत सी-बँड पोलॅरिमेट्रिक डॉप्लर हवामान रडार (C-Band Polarimetric Doppler Weather Radar), मानक हवामान उपकरणांनी सुसज्ज पृष्ठभागीय हवामान वेधशाळा (Surface Meteorological Observatory) आणि रेडिओसॉन्ड वेधशाळा (Radiosonde Observatory) या तीन महत्त्वपूर्ण सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. रेडिओसॉन्ड प्रणालीद्वारे हवामान फुग्याच्या साहाय्याने वातावरणाच्या उच्च स्तरांवरील तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा यांसारख्या हवामानविषयक घटकांची निरीक्षणे घेता येतील.

या सामंजस्य करारप्रसंगी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईचे प्रमुख तथा वैज्ञानिक श्री. बिक्रम सिंह उपस्थित होते. विद्यापीठाच्या वतीने विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर व हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे, तर भारत मौसम विज्ञान विभागाच्या वतीने श्री. शंभू रवींद्रन, श्री. महेश बुरटे, श्री. पठाण यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

हवामान आधारित शेतीला मिळणार नवी दिशा

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मराठवाड्यात अत्याधुनिक हवामान निरीक्षण सुविधांची उभारणी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रणालीमुळे हवामानविषयक निरीक्षणांची वैज्ञानिक क्षमता वाढेल. तसेच हवामानातील बदलांचे अधिक प्रभावी विश्लेषण करून शेतीसह विविध क्षेत्रांसाठी उपयुक्त हवामान आधारित सेवा विकसित करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

श्री. बिक्रम सिंह यांनी वनामकृवि येथे उभारण्यात येणारी एकात्मिक हवामान निरीक्षण प्रणाली ही वैशिष्ट्यपूर्ण सुविधा ठरेल, असे सांगितले. या केंद्रामार्फत हवामान निरीक्षण, माहिती संकलन व विश्लेषण आणि हवामान अंदाज निर्मिती यांना चालना मिळण्यासोबतच भविष्यात देशातील अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी हे केंद्र संदर्भ व मार्गदर्शन केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हवामान माहिती संकलनापासून अंदाज निर्मितीपर्यंत मार्गदर्शन

सामंजस्य कराराच्या निमित्ताने वनामकृविचे प्राध्यापक व कर्मचारी आणि भारत मौसम विज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये संवादात्मक सत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये हवामान निरीक्षण, हवामानविषयक माहितीचे संकलन, तिचे विश्लेषण, हवामान अंदाज तयार करण्याची प्रक्रिया आणि विविध हवामानविषयक उत्पादनांची निर्मिती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

IMD च्या निथा, सुष्मा अय्यर आणि जिस्मी यांनी हवामान निरीक्षणापासून माहिती प्रक्रिया व विश्लेषणापर्यंतच्या विविध टप्प्यांची माहिती दिली. तसेच विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या हवामान अंदाजांचा शेतस्तरावरील कृषि नियोजनासाठी प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकऱ्यांना वेळेवर व अधिक उपयुक्त सल्ला मिळण्यास मदत

हवामानातील अनिश्चितता, पावसाचे बदलते स्वरूप आणि अवकाळी पाऊस यांसारख्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ही प्रणाली मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हवामानविषयक अधिक व्यापक निरीक्षणे आणि त्यांचे शास्त्रीय विश्लेषण यांमुळे पेरणी, सिंचन, खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच काढणी यांसारख्या कृषि कामांचे नियोजन करण्यासाठी अधिक उपयुक्त हवामान आधारित सल्ला सेवा विकसित करण्यास मदत होईल. परिणामी, हवामानातील बदलांशी जुळवून घेणारी आणि जोखीम कमी करणारी शेती पद्धती विकसित करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल.

भारत मौसम विज्ञान विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्यातील हा सामंजस्य करार हवामान विज्ञान आणि कृषि संशोधन यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणारा असून, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवामान आधारित निर्णय घेण्यासाठी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.










जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी जैविक निविष्ठांचा वापर वाढवा : डॉ. हरिहर कौसडीकर

 वनामकृविच्या मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागास पाणी फाउंडेशनअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची भेट


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागास परभणी जिल्ह्यातील पाणी फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत कार्यरत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या दहा प्रतिनिधींनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी भेट दिली. या भेटीदरम्यान प्रतिनिधींनी मृदा आरोग्य संवर्धन, मृदा परीक्षण, जैविक व सेंद्रिय खतांचा वापर तसेच रासायनिक खतांच्या संतुलित वापराबाबत शास्त्रीय माहिती जाणून घेतली.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती या वेळी देण्यात आली. शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. तसेच अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी तळ्यातील गाळाचा शेतीसाठी प्रभावी उपयोग करण्याबाबत सविस्तर माहिती दिली.

प्रारंभी विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी विभागातील विविध संशोधन व तांत्रिक उपक्रमांची माहिती दिली. मृदा परीक्षणाच्या आधारे खत व्यवस्थापनाचे नियोजन, जैविक व सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर आणि रासायनिक खतांचा संतुलित व मर्यादित वापर यांचे महत्त्व त्यांनी विशद केले. जमिनीची सुपीकता व आरोग्य टिकवून ठेवण्यासोबतच उत्पादन खर्च कमी करणे आणि पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून खतांचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मृदा परीक्षण केल्यानंतरच रासायनिक खतांचा वापर करावा, असे आवाहनही डॉ. कौसडीकर यांनी केले.

या भेटीदरम्यान प्रतिनिधींनी विभागातील केंद्रीय मृदा परीक्षण प्रयोगशाळा, खतांच्या ब्रिकेट निर्मिती प्रकल्प, गांडूळखत व त्याच्या उपपदार्थ निर्मिती प्रकल्प तसेच जैविक खत निर्मिती प्रकल्पांना भेट दिली. माती व पाणी परीक्षणाचे महत्त्व, गांडूळखत निर्मिती, जैविक खतांचा वापर आणि शेतीमध्ये सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढविण्याच्या विविध पद्धतींबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.

यावेळी प्राध्यापक डॉ. सुरेश वाईकर, जैविक खत प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. भाग्यरेषा गजभिये आणि डॉ. स्नेहल शिलेवंत उपस्थित होते. भेटीस आलेल्या प्रतिनिधींनी विभागातील तांत्रिक माहिती जाणून घेत विविध उपक्रमांविषयी चर्चा केली.

शेतकरी उत्पादक गटांनी विद्यापीठाच्या संपर्कात राहून कृषि तंत्रज्ञान व निविष्ठांच्या उत्पादनासंदर्भात प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन डॉ. कौसडीकर यांनी केले. शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून तालुकानिहाय जैविक व सेंद्रिय निविष्ठांच्या उत्पादनाचे छोटे-छोटे उपक्रम सुरू केल्यास स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होण्यासोबतच शाश्वत शेतीला चालना मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले. कृषि निविष्ठा व विभागातील विविध उपक्रमांशी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात आले.

या भेटीमुळे विद्यापीठातील कृषि संशोधन व तंत्रज्ञान शेतकरी उत्पादक गटांपर्यंत पोहोचण्यास, मृदा आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास आणि जैविक व सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढवून शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. भेट देणाऱ्या शेतकरी उत्पादक गटांच्या प्रतिनिधींमध्ये प्रगतशील शेतकरी रमेश विठ्ठलराव दुधाटे गोळेगावकर, गजानन जी. सायखेडकर, कृष्णा गव्हाणे, रामेश्वर साबळे आणि गजानन आंबोरे यांचा समावेश होता.





वनामकृविद्वारा शेंद्रा येथे राष्ट्रीय महिला शेतकरी दिवस उत्साहात साजरा

श्रम कमी करणाऱ्या आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन; ७६ महिला शेतकऱ्यांसह ९४ शेतकऱ्यांचा सहभाग


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला यांच्या वतीने राष्ट्रीय महिला शेतकरी दिवस शेंद्रा, ता. जि. परभणी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी आयोजित या कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना शेतीतील शारीरिक श्रम कमी करणारे आधुनिक कृषि तंत्रज्ञान, भरडधान्यांचे महत्त्व, मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती, महिला शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसेच विविध शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील ७६ महिला शेतकरी आणि १८ पुरुष शेतकरी अशा एकूण ९४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला यांच्या केंद्र समन्वयिका तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच त्यांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमध्ये महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, खुरपणी, आंतरमशागत, कापणी, मळणी आणि शेतीमाल हाताळणी यांसारख्या कामांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणावर शारीरिक श्रम करावे लागतात. हे श्रम कमी करणे, वेळेची बचत करणे आणि कामाची कार्यक्षमता वाढविणे या उद्देशाने कार्यक्रमात विशेष मार्गदर्शन केले.

श्रम कमी करणाऱ्या कृषि उपकरणांचे प्रात्यक्षिक

कार्यक्रमात प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या विविध श्रम कमी करणाऱ्या कृषि साधनाचे आणि अवजारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या उपकरणांची कार्यपद्धती, उपयोग आणि शेतीतील दैनंदिन कामे सुलभ करण्यासाठी त्यांची उपयुक्तता याविषयी महिला शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. आधुनिक उपकरणांचा योग्य वापर केल्यास शारीरिक श्रम कमी होण्याबरोबरच वेळेची बचत होऊन शेतीची कामे अधिक कार्यक्षमतेने करता येतात, हे प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले. यासोबतच प्रकल्पांतर्गत विकसित विविध मूल्यवर्धित पदार्थ आणि श्रीअन्न पदार्थ तयार करण्याची प्रात्यक्षिकेही दाखविण्यात आली.

भरडधान्ये आणि मूल्यवर्धनातून उत्पन्नवाढीच्या संधी

भरडधान्यांचे (मिलेट्स) पोषणमूल्य, दैनंदिन आहारातील त्यांचे महत्त्व तसेच त्यांचे उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीमधील संधी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. महिला शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीज्ञानासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरडधान्यांपासून विविध पदार्थ तयार करणे आणि त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे यांसारख्या संधींचा लाभ घ्यावा, असे या मार्गदर्शनातून अधोरेखित करण्यात आले.

महिला शेतकऱ्यांच्या यशोगाथांना व्यासपीठ

कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांच्या अनुभवांना आणि यशोगाथांना विशेष महत्त्व देण्यात आले. महिला शेतकरी तथा महिला बचतगटाच्या अध्यक्षा श्रीमती दीक्षा दुधाटे यांचा शेतीतील कष्ट, बचतगटाच्या माध्यमातून स्वतःचे व कुटुंबातील सदस्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल विद्यापीठाने विकसित केलेले नवीन ‘राजकेसर’ आंब्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.

महिला शेतकरी श्रीमती सीताबाई पवार यांनीही उपस्थितांसमोर आपली यशोगाथा मांडली. त्या सन २०२२ पासून अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला यांच्या स्टेकहोल्डर म्हणून प्रकल्पाच्या विविध उपक्रमांशी जोडलेल्या आहेत. त्यांनी शेतीतील आपले अनुभव, अडचणींवर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि मिळविलेले यश याविषयी माहिती दिली. या अनुभवांच्या देवाणघेवाणीतून उपस्थित महिला शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली.

शासकीय योजनांची माहिती आणि कृषि मार्गदर्शन

महिला शेतकऱ्यांना शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन तसेच अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला यांच्या माध्यमातून महिलांपर्यंत कृषिविषयक माहिती, उपयुक्त तंत्रज्ञान आणि कौशल्यविकासाच्या संधी पोहोचविण्याबाबत माहिती देण्यात आली.

कार्यक्रमास सरपंच सुधाकर ढगे, उपसरपंच लक्ष्मीबाई जोंधळे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख खलीद शेख अहेमद, माजी उपसरपंच सुभाष जोंधळे तसेच मिनाबाई जोंधळे, अंजनबाई जोंधळे, रेखा जोंधळे, प्रतीक्षा जोंधळे, रामकिशन पवार आदी प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास जोंधळे (यंग प्रोफेशनल-II) यांनी केले, तर चंद्रप्रकाश लहाडे (यंग प्रोफेशनल-I) यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन सादेक शेख (यंग प्रोफेशनल-II), विकास शिक्रे (यंग प्रोफेशनल-I) आणि सय्यद आमेर (मल्टी टास्किंग ऑपरेटर) यांनी केले.

महिला शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने असलेला सहभाग, आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, शासकीय योजनांची माहिती आणि यशोगाथांची देवाणघेवाण यांमुळे हा कार्यक्रम महिला शेतकऱ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि आत्मनिर्भरता वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरला.











वनामकृविच्या हरभरा वाण ‘बीडीएनजी २०२०-६१’ ( परभणी चणा १७) ची पूर्व मध्य विभागासाठी मान्यता

 हेक्टरी सरासरी १,९२५ किलो उत्पादन; इंदिरा चना-१ पेक्षा १५.२० टक्के अधिक उत्पादनक्षमता



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राने विकसित केलेल्या बीडीएनजी २०२०-६१ (परभणी चना-१७) या देशी हरभरा वाणाची भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील रब्बी कडधान्य पीक वाण ओळख समितीने पूर्व मध्य विभागासाठी मान्यता निश्चित केली आहे. दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या वाण ओळख समितीच्या बैठकीत या वाणाची शिफारस करण्यात आली असून, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने ७ ऑक्टोबर २०२६ रोजी बैठकीच्या सुधारित कार्यवृत्तास मान्यता दिली आहे.

या वाणाची पूर्व मध्य विभागातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांतर्गत (AICRP) तीन वर्षांच्या चाचण्यांमधील कामगिरी उल्लेखनीय ठरली. सन २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीतील चाचण्यांमध्ये या वाणाचे भारित सरासरी उत्पादन हेक्टरी १,९२५ किलो नोंदविण्यात आले. तुलनेत इंदिरा चना-१ या प्रचलित वाणाचे उत्पादन हेक्टरी १,६७१ किलो होते. त्यामुळे बीडीएनजी २०२०-६१ या वाणाने इंदिरा चना-१ पेक्षा १५.२० टक्के अधिक उत्पादनक्षमता दर्शविली. तसेच जाकी ९२१८ आणि आरजी २०१५-०८ या तुलनात्मक वाणांच्या तुलनेतही या वाणाने अधिक उत्पादन नोंदविले.

या वाणाच्या विकासामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण योगदान देण्यात आले. विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ तथा कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, डॉ विष्णू गिते आणि संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञानी या हरभरा वाणाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले.

वाणाची प्रमुख वैशिष्ट्ये

बीडीएनजी २०२०-६१ हा देशी हरभऱ्याचा वाण असून, वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी हंगामातील सिंचित परिस्थितीसाठी तो उपयुक्त आहे. या वाणाचा पक्वता कालावधी साधारणतः १०६ ते ११० दिवसांचा आहे. याच्या दाण्यांचा आकार मध्यम ते ठळक असून, १०० दाण्यांचे सरासरी वजन २४ ग्रॅम आहे. विविध ठिकाणी झालेल्या चाचण्यांमध्ये या वाणाचे उत्पादन हेक्टरी १,३०९ ते २,४६६ किलो नोंदविण्यात आले. संशोधन प्रस्तावानुसार, प्रचलित तुलनात्मक वाणांच्या तुलनेत प्रमुख रोग आणि कीड प्रादुर्भावाच्या बाबतीतही या वाणाने चाचण्यांमध्ये तुलनेने चांगली कामगिरी दर्शविली आहे.

पूर्व मध्य विभागातील शेतकऱ्यांना होणार लाभ

या वाणाची ओळख पूर्व मध्य विभागासाठी करण्यात आली असून, या विभागात पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाचा पश्चिम भाग यांचा समावेश होतो. अधिक उत्पादनक्षमता, तुलनेने कमी पक्वता कालावधी आणि चाचण्यांमधील समाधानकारक कामगिरी यामुळे या विभागातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा वाण उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून विकसित झालेल्या या वाणाची राष्ट्रीय स्तरावर मान्यता आणि ओळख निश्चित होणे ही विद्यापीठाच्या कृषि संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे. या संशोधनामुळे हरभरा उत्पादनवाढीसाठी नवीन पर्याय उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

For English

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या रावे-२०२६ विद्यार्थ्यांनी सनपुरी येथे रावे कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील रावे-२०२६ (RAWE – Rural Agricultural Work Experience ग्रामीण जागरूकता कार्यानुभव) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सनपुरी (ता. जिल्हा परभणी) येथे आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड आणि समन्वयक डॉ शंकर पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवून ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांच्या समस्या, कृषीविषयक वास्तव आणि ग्रामीण समुदायाच्या गरजा यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील जनजीवन समजून घेण्याची, शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधण्याची तसेच अभ्यासक्रमात आत्मसात केलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष परिस्थितीत उपयोग करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी दाखविलेली मेहनत, उत्साह, शिस्त आणि समर्पण कौतुकास्पद ठरले.

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जडणघडणीतील महत्त्वाचा टप्पा असून, यामुळे त्यांचे व्यावहारिक ज्ञान समृद्ध होण्यास, आत्मविश्वास वाढण्यास आणि ग्रामीण समाजाप्रती असलेली जबाबदारी अधिक दृढ होण्यास मदत होते.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सर्व रावे-२०२६ विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच भविष्यातील शैक्षणिक वाटचाल आणि नवीन जबाबदाऱ्या पार पाडताना विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग समाजहितासाठी करावा, शेतकऱ्यांप्रती बांधिलकी जपावी आणि प्रामाणिकपणा व समर्पणाच्या भावनेतून कार्य करावे, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना विषय विशेषज्ञ कल्पना लहाडे, ज्योती मुंडे आणि आदिनाथ बेले यांचेही मार्गदर्शन लाभले. या यशस्वी कार्यानुभव कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण वास्तवाची जाणीव होऊन भविष्यातील व्यावसायिक वाटचालीसाठी उपयुक्त अनुभव प्राप्त झाला आहे.