Tuesday, February 26, 2013

केंद्रीय कृषिमंत्री मा ना श्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते मराठवाडा कृषी विद्यापीठातील 'बीज प्रक्रिया केंद्राचे उदघाटन

केंद्रीय कृषिमंत्री मा ना श्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते मराठवाडा कृषी विद्यापीठातील 'बीज प्रक्रिया केंद्राचे उदघाटन  


Friday, February 22, 2013

मराठवाडा कृषिविद्यापीठाचा 19 वा दिक्षांत समारंभ संपन्‍न

केंद्रीय कृषी मंत्री मा ना श्री  शरदचंद्रजी पवार यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' या मानद उपाधीने गौरविण्यात आले 
मा डॉ  कीर्ती सिंग यांना  'कृषी रत्न'  या मानद उपाधीने गौरविण्यात आले 
कृषि संशोधन क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य केल्‍याबददल विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ डॉ. उदय खोडके यांना राधाकिशन शांती मल्‍होत्रा पुरस्‍काराने मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले. 

कृषि संशोधन क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य केल्‍याबददल विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ डॉ.व्‍ही.एम. पवार यांना राधाकिशन शांती मल्‍होत्रा पुरस्‍काराने मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले. 

पहिल्या ‘एमकेव्‍ही फेलो’ पुरस्‍काराचे मानकरी ठरले उस्मानाबाद येथील उद्योजक व प्रगतशील शेतकरी श्री भैरवनाथ भगवानराव ठोंबरे

मार्गदर्शन करतांना देशाचे कृषी मंत्री मा ना  श्री  शरदचंद्रजी पवार 

मार्गदर्शन करतांना देशाचे कृषी मंत्री मा ना  श्री  शरदचंद्रजी पवार 

मार्गदर्शन करतांना मा डॉ कीर्ती सिंग 





डॉ बी. एम. ठोंबरे यांना उत्‍कृष्‍ट शिक्षक या पुरस्‍काराने सन्‍मानीत करतांना 


 डॉ. स्मिता खोडके यांना उत्‍कृष्‍ट शिक्षक या पुरस्‍काराने सन्‍मानीत करताना 
 डॉ. आशा आर्या यांना उत्‍कृष्‍ट शिक्षक या पुरस्‍काराने सन्‍मानीत करताना 

मराठवाडा कृषि विद्यापीठाचा 19 वा दिक्षांत समारंभ संपन्‍न

           मराठवाडा कृषि विद्यापीठाचा 19 वा दिक्षांत समारंभ दि. 22 फेब्रुवारी 2013 रोजी संपन्‍न झाला.  या दिक्षांत समारंभात देशातील शेतीस नवीन दिशा देवुन आंतरराष्‍ट्रीयस्‍तरावर एक प्रतिष्‍ठा प्राप्‍त करुन दिली, या अभूतपूर्व कार्याबद्दल केंद्रीय कृषि मंत्री मा.ना.श्री शरदच्रद्रजी पवार यांना डॉक्‍टर ऑफ सायन्‍स या मानद उपाधीने गौरविण्‍यात आले. तर कृषिक्षेत्रातील ज्ञान म‍हर्षिस त्‍यांच्‍या कृषि शिक्षण व संशोधनातील अतूलनिय योगदानाबद्दल मा. डॉ. किर्ती सिंग, माजी कुलगुरू, नरेंद्र देवा कृषि विद्यापीठ, हिमाचल प्रदेश कृषि विश्‍वविद्यालय व माजी अध्‍यक्ष कृषि वैज्ञानिक निवड मंडळ, नवी दिल्‍ली यांना कृषि रत्‍न या मानद उपाधीने गौ‍रविण्‍यात आले.
  या समारंभाचे अध्‍यक्षस्‍थान मराठवाडा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि मंत्री मा. ना. श्री राधाकृष्‍णजी विखे पाटील यांनी भुषविले. या समारंभास प्रमुख पाहुणे म्‍हणुन मा. डॉ. किर्ती सिंग व महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि राज्‍यमंत्री मा.ना.श्री गुलाबरावजी देवकर हे होते. सदरील समारंभास महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे उपाध्‍यक्ष मा. ना. श्री विजयरावजी कोलते तसेच विद्यापीठाच्‍या कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा.आ.श्री जयप्रकाशजी दांडेगांवकर, मा.आ.श्री सतीशजी चव्‍हाण व मा.आ.श्री सुरेश जेथलीया यांची‍ विशेष उपस्थिती होती.
  याप्रसंगी मा.ना.श्री शरदच्रद्रजी पवार आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, मला मराठवाडा कृषि विद्यापीठांनी या मानद उपाधीने गौरविण्‍यात आल्‍या बद्दल अत्‍यंत आनंद होत आहे. हा पुरस्‍कार मी 121 कोटी लोकसंख्‍यांना अन्‍नपुरवण्‍याची जबाबदारी असणा-या या देशातील शेतकरी बांधवांना समर्पित करतो. गेल्‍या चार दशकापासून मराठवाडा कृषि विद्यापीठाने या भागातील संतुलीत आर्थीक विकासासोबतच कृषि शिक्षण आणि संशोधनाची संधी प्राप्‍त करुन दिली आहे. या विद्यापीठाने विकसीत केलेल्‍या नवनवीन व सुधारीत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्‍यासाठी विविध अभिनव विस्‍तार उपक्रम राबवित आहे. 1972 च्‍या महाराष्‍ट्रातील दुष्‍काळाच्‍या प्रसंगीच या विद्यापीठाची स्‍थापना झाली आणि परत एकदा त्‍याच प्रकारच्‍या दुष्‍काळास आपण सामोरे जात आहोत. 1972 च्‍या तुलनेत यावर्षी आपण चारा व अन्‍न आणु शकतो, परंतु पाणी आणु शकत नाही. या परिस्‍थीतीत फळबाग व पशुधन कसे वाचवावे हा प्रश्‍नचिन्‍ह आहे. 1972 च्‍या दुष्‍काळापासुन शिकवण घेऊन संशोधनाच्‍या आधारे विद्यापीठाने कोरडवाहू परिस्‍थीतीत चारा पिके व अन्‍न पिकांतील वाणांचा विकास करुन भरीव कार्य केले आहे. 1972 च्‍या वेळी रोजगार हमी योजनेवर 45 लाख मजुरांची नोंद होती ती आज दोन लाखावर आलेली आहे, परंतु यामध्‍ये सधनशील शेतक-यांचाही समावेश आहे ही स्थिती भयावह आहे. यासाठी शेतक-यांनी पर्यायी उत्‍पन्‍नासाठी पुरक व्‍यवसायाकडे वळावे. या दुष्‍काळामुळे उत्‍पादनात घट तर होणारच आहे परंतु याचा परिणाम अनेक पिढ्यावर होवू शकतो विशेषत: बिकट आर्थिक परिस्थितीमध्‍ये मुलांच्‍या शिक्षणाकडे दुर्लक्ष होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यासाठी शासनाचे प्रतिनिधी, शास्‍त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी समर्पित भावनाने कार्य करावे.
     हवामानातील व तापमानातील बदल हे एक शेतीक्षेत्रातील मोठा प्रश्‍न आहे. या हवामानातील बदलात तग धरणा-या तंत्रज्ञानाचा विकास करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. आज पदवी घेतलेल्‍या पदवीधारक विद्यार्थ्‍यांना माझे आवाहन आहे की या क्षेत्रामध्‍ये भविष्‍यात संशोधन करावे. जागतिक व देश पातळीवर आर्थिक, सामाजिक व तंत्रज्ञान विकासाचा दर अतिवेगाने वाढत आहे आणि याच्‍याशी अनुकूल असा कृषि शिक्षण यंत्रणेत आमूलाग्र बदल करण्‍याची गरज आहे असे प्रतिपादन मा. ना. श्री शरदचंद्रजी पवार यांनी केले आहे. पुढे विद्यार्थ्‍यांना सल्ला देतांना म्‍हणाले की, कृषि पदवीधारकांनी सरकारी नौकरीच्‍या मागे न लागता उद्योजक बनावे आणि विद्यापीठाने सुध्‍दा कृषि उद्योजक निर्माण करण्‍यासाठी अभ्‍यासक्रमात योग्‍य तो बदल करावा. शेतक-यांचे अविरत परिश्रम व शासनाच्‍या अनुकूल धोरणामुळे देश आज जगामध्‍ये प्रमुख कृषि उत्‍पादक देश आहे. आज आपण जगात दुध उत्‍पादनात पहिल्‍या क्रमांकावर तर फळ भाजीपाला व मत्‍स्‍य उत्‍पादनात  दुस-यां क्रमांकावर आहोत ही अभिमानाची गोष्‍ट आहे आणि यासाठी या देशातील प्रत्‍येक शेतक-यांचे आपण आभार मानले पाहिजे. मला दिलेली डॉक्‍टर ऑफ सायन्‍स ही मानद उपाधी मी शेतक-यांना स‍मर्पित करतो असे उदगार मा. ना. श्री शरदचंद्रजी पवार यांनी काढले.
     याप्रसंगी विद्यापीठातील कार्यबाबत प्रभावीत होउन विद्यापीठासाठी वातानुकूलीत सभागृह, मुलींसाठी नवीन वसतीगृह, हवामान बदलास अनुकूल अशा ज्‍वारी व तुर पिकांचे वाण विकसीत करण्‍यासाठी संशोधन केंद्रास तसेच अद्यावत कृषि संग्रहालयाच्‍या उभारणीसाठी केंद्र सरकारकडुन 100 टक्‍के निधी देण्‍याचे आश्‍वासन मा. कृषि मंत्री श्री शरदचंद्रजी पवार यांनी दिले.
    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. किर्तीसींग यांना कृषिरत्‍न या मानद उपाधीने गौरविण्‍यात आल्‍यानिमित्‍य आपल्‍या स्विकृत भाषणात म्‍हणाले की, कृषि पदवीधरांचे अभिनंदन करतो ज्‍यांनी कृषि क्षेत्रात शिक्षण घेण्‍याचा निर्णय घेऊन कृषि क्षेत्रात सेवा करण्‍याची सुवर्ण संधी प्राप्‍त करून घेतली आहे. राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी म्‍हणाले होते की, जबाबदार नागरीकांनी गरीबांची व शेतक-यांची काळजी घेणे आवश्‍यक आहे. या गोष्‍टीचा समाजाला विसर पडला नाही पाहिजे. मला या गोष्‍टीचा फार अभिमान आहे की, मराठवाडा कृषि विद्यापीठ हे राष्‍ट्रीय कृषि संशोधन यंत्रणेचा मुख्‍य घटक आहे आणि तो मोठ्या वेगाने प्रगती करीत आहे. या ठिकाणी निर्माण केलेले मनुष्‍यबळ हे देशाला व राज्‍याला अग्रस्‍थानी नेण्‍यास निश्‍चीतच मदत करील अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली्  ते पुढे म्‍हणाले कि, विद्यापीठाने 125 पेक्षा जास्‍त वाण, 700 पेक्षा तंत्रज्ञान शिफारशी व 20 कृषि औजारांची निर्मिती करुन शेतक-यापर्यंत नेल्‍या आहेत आणि यामुळे या भागातील व राज्‍यातील कृषि व संलग्‍न क्षेत्रातील उत्‍पादकता वेगाने वाढत आहे. विद्यापीठ अत्‍याधुनिक दृकश्राव्‍य उपकरणे, टचस्‍क्रीन, एसएमएस सेवा, कृषि माहिती वाहिणी आदि या विस्‍तार शिक्षण क्षेत्रात नवनवीन मुलभूत सुविधांचा वापर करीत आहे हि कौतुकास्‍पद आहे. सध्‍या नैसर्गीक संसाधनावरील जैविक व अजैविक ताण वाढत आहे तर पाणी आणि जमीनीची उपलब्‍धता कमी होत आहे. 2005-06 मध्‍ये दरडोई लागवडी खालील क्षेत्र 1.23 हेक्‍टर होते ते कमी होऊन 2010-11 मध्‍ये 1.16 हेक्‍टर पर्यंत आले आहे. या सर्वांचा विचार करुन जमीनीचा योग्‍य वापरासाठी धोरण ठरवणे आवश्‍यक आहे. योग्‍य तंत्रज्ञानाची निर्मिती करणे व कृषि बाजार यंत्रणेची मजबुतीकरण करण्‍यासाठी देशात शितगृहांचे जाळे निर्माण करणे आवश्‍यक आहे तसेच ठि‍कठिकाणी अन्‍नप्रक्रिया केंद्र उभारणे आवश्‍यक आहे. अन्‍नधान्याची नासाडी कमी करण्‍यासाठी काढणी पश्‍चात व्‍यवस्‍थापन व शेतमाल प्रक्रिया या क्षेत्रास प्राधान्‍य द्यावे लागेल. सध्‍या पाण्‍याचे व्‍यवस्‍थापन करणे अत्‍यंत आवश्‍यक असुन सर्वांच्‍या सहभागाने जमीनीतील पाण्‍याची पातळी वाढण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत. तसेच सुक्ष्‍म सिंचन योजनेला प्राधान्‍य दिल्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतीला देऊ शकू. शिक्षण हे सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचा महत्‍वाचे साधन आहे आणि याचा वापर आपण ग्रामीण आणि दुर्लक्षीत भागांच्‍या विकासासाठी करणे आवश्‍यक आहे असे प्रतिपादन मा. डॉ. किर्ती सींग यांनी केले.
      मराठवाडा कृषि विद्यापीठाने बिजोशितल या संस्‍थेशी सामजंस्‍याचा करार करुन एक‍ नवीन संशोधनाचे व शैक्षणीक दालण विद्यार्थ्‍यासाठी उपलब्‍ध करुन दिले आहे. ‘विद्यापीठ आपल्‍या दारी तंत्रज्ञान शेतावरी’ हा अभिनव विस्‍तार शिक्षण उपक्रम राबवून मराठवाड्यातील शेतक-यामध्‍ये नवचैतन्‍य निर्माण केले आहे ही नक्‍कीच अभिमानाची बाब आहे असे उदगार त्‍यांनी काढले आहे.
    कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे यांनी विद्यापीठाच्या कार्याचा आढावा मान्‍यवरांच्‍या समोर मांडला.
     यावर्षी प्रथमच मराठवाडा विभागातील प्रयोगशील शेतकरी बांधवांना ‘एमकेव्‍ही फेलो’ हा पुरस्‍काराचा प्रारंभ करण्‍यात आला त्‍याचे पहिले मानकरी ठरले श्री भैरवनाथ भगवानराव ठोंबरे, त्‍यांना या प्रसंगी सन्‍मानीत करण्‍यात आले. तसेच विद्यापीठातील डॉ. बी. एम. ठोंबरे, डॉ. स्मिता खोडके, डॉ. आशा आर्या, डॉ. अशोक रोडगे, डॉ. एस एस शटगार यांना उत्‍कृष्‍ट शिक्षक या पुरस्‍काराने सन्‍मानीत करण्‍यात आले. कृषि संशोधन क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य केल्‍याबददल विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ डॉ. उदय खोडके व डॉ. व्‍ही. एम. पवार यांना राधाकिशन शांती मल्‍होत्रा पुरस्‍काराने मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले.
     या दिक्षांत समारंभात कृषि विद्यापीठांतर्गत विविध विद्याशाखेतील एकुण 1620 स्‍नातकांना विविध पदवी (१३०६), पदव्‍युत्‍तर (२९९) व आचार्य (१५) पदवीने मानणीय प्रतिकुलपती यांच्‍या शुभहस्‍ते अनुग्रहीत करण्‍यात आले. कु. तेजश्री झगडे, कु. गीता झरकर, कुमार योगेश इंगळे, कुमार देवेंद्र यादव, कुमारी प्रियांका कौल, कु. कुरेशी कौसर या विद्यार्थ्‍यांना सुवर्ण पदकाने गौरविण्‍यात आले. तसेच कु.गीता झरकर, कु जयकिशोर भारती, कु राजदिप राजोरीया, कु गौरी सैनी या विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या पदवी अभ्‍यासक्रमात उच्‍च श्रेणीने उतीर्ण झाल्‍याबद्दल रोख पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले.
      व्‍यासपीठावर या प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव श्री का. वी. पागीरे, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे, विस्‍तार शिक्षण डॉ. अशोक ढवण, कार्यकारी परिषदेचे सदस्‍य यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आरोग्‍य राज्‍यमंत्री मा. ना. श्रीमती फोजियाखान, पालकमंत्री मा ना श्री  प्रकाशदादा सोळंके, मराठवाड्यातील मा. खासदार, आमदार व प्रतिष्ठित नागरीक, विद्यापीठातील प्राध्‍यापक व कर्मचारीवर्ग, विदयार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ आशा आर्या व डॉ दयानंद मोरे यांनी केले.
     या प्रसंगी मा. कृषि मंत्री मा. ना. श्री शरदचंद्रजी पवार यांच्‍या हस्‍ते भारतीय अनुसंधान परिषदेच्‍या आर्थिक पाटिंबाने उभारण्‍यात आलेल्‍या अनुभवावर आधारीत प्रशिक्षणांतर्गत कडधान्‍य व तेलबिया प्रक्रिया केंद्र, गृह विज्ञान महाविद्यालयातील प्रावरणे उत्‍पादन केंद्र व बिज प्रक्रिया केंद्र आदिंचे उदघाटन करण्‍यात आले.  तसेच मा. ना. श्री शरदचंद्रजी पवार यांनी माती व जल संवर्धन व पाण्‍याचा योग्‍य वापर असलेल्‍या पिंगळगड नाला विकास प्रकल्‍पास भेट देउन या प्रकल्‍पाची प्रसंशा केली. कृषि प्रर्दशनीस भेटी प्रसंगी त्‍यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्‍या विविध पिकांच्‍या सुधारीत वाणाची व तंत्रज्ञानाची आस्‍थाने विचारपुस केली.

Wednesday, February 20, 2013

वाटचाल : मराठवाडा कृषी विद्यापीठाची

      मराठवाडा विभागातील कृषि क्षेत्राच्‍या विशेष गरजा व लोकभावना लक्षात घेवून 18 मे 1972 रोजी मराठवाडा कृषि विद्यापीठाची स्‍थापना करण्‍यात आली. या विद्यापीठामुळे मराठवाड्यातील कृषि विकासात अमूलाग्र बदल झाल्‍याचे आज आपणास दिसून येते. विद्यापीठातील नवनवीन तंत्रज्ञानामुळे विविध पिकांच्‍या उत्‍पादकतेत भरीव वाढ झाली. परंतु एवढ्यावरच समाधान न मानता भविष्‍यातील लोकसंख्‍या वाढ, वातावरणातील वारंवार होणारे बदल, नैसर्गीक आपत्‍ती, दिवसेंदिवस जमीनीचा कमी होत असलेला पोत, योग्‍य विक्री व्‍यवस्‍थापनाचे अज्ञान, शेतीत प्रत्‍यक्ष काम करणारे मनुष्‍यबळ, कमी होत जाणारे जमीनधारणा क्षेत्र यासाठी आपणा सर्वांना सतत कार्यरत राहून त्‍या अनुषंगाने भावी शिक्षण संशोधन व विस्‍तार शिक्षणाची वाढचाल करण्‍याची गरज आहे. त्‍या अनुषंगाने मा. कुलगुरुंच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाची 2030 पर्यंतचा सुस्‍पष्‍ट, परिपुर्ण व दिशादर्शक असा अहवाल तयार करण्‍यात आला. ज्‍याचा विद्यापीठाच्‍या भावी विकासात व विभागाच्‍या कृषि विकासाठी निश्चितच उपयोग होईल. कृषि विद्यापीठांकडून विद्यार्थी, शेतकरी बांधव व समाजाच्‍या अनेक अपेक्षा आहेत. त्‍या अपेक्षा पूर्तीसाठी विद्यापीठाने सर्वांना शिक्षण, संशोधन व विस्‍तार कार्यामार्फत सखोल कालानुरूप ज्ञान देण्‍याची आज नितांत गरज आहे. त्‍यासाठी विद्यापीठाकडून मागील दोन वर्षात विविध नावीन्‍यपूर्ण उपक्रम यशस्‍वीरित्‍या राबविण्‍यात येत आहेत.
      मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत 12 घटक व 32 संलग्‍न महाविद्यालये आहेत. तसेच 9 घटक व 53 संलग्‍न कृषि तंत्र विद्यालये आहेत. याद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना कृषि विषयक शिक्षण देण्‍यात येते. विद्यापीठामध्‍ये कृषि, उद्यानविद्या, कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन, कृषि अभियांत्रीकी, गृह विज्ञान, अन्‍न तंत्रज्ञान यात दोन वर्षाचा पदव्‍युत्‍तर तर आचार्य पदवी कार्यक्रम कृषि शाखेच्‍या नऊ विषयात व गृह विज्ञान शाखेत एका विषयात राबविण्‍यात येत आहे. विद्यापीठात उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या शिक्षण विषयक विविध सुविधेमुळे पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीसाठी परराष्‍ट्रातील विद्यार्थी या विद्यापीठाकडे शिक्षणासाठी धाव घेत आहेत.
      मा. कुलगुरू यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्‍यांची कार्यकुशलता वाढावी व कार्यकुशल मनुष्‍यबळ निर्माण व्‍हावे म्‍हणुन राष्‍ट्रीय वनस्‍पती आरोग्‍य व्‍यवस्‍थापन संस्‍था (NIPHM) हैद्राबाद या संस्‍थेशी विद्यापीठाने द्विपदवी कार्यक्रमासंबंधी सामंजस्‍य करार केला आहे. हा करार राज्‍यात सर्व प्रथम या विद्यापीठाने केला आहे. यामुळे विद्यार्थ्‍यांना एक नवीन शैक्षणीक दालण उपलब्‍ध झाले आहे. द्विपदवी सामंजस्‍य करार करणारे मराठवाडा कृषि विद्यापीठ हे राज्‍यातील पहिलेच विद्यापीठ आहे त्‍याचा लाभ आज विद्यार्थी घेत आहेत.
      जागतीकीकरणाच्‍या युगात ज्ञानाच्‍या रुंदावलेल्‍या कक्षा लक्षात घेऊन विद्यापीठातील प्राध्‍यापकांचे कौशल्‍य वाढावे व कृषि शिक्षणात उच्‍च तंत्रज्ञानाचा अवलंब होण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍यांना उच्‍च शिक्षणासाठी देशातील नामांकीत विद्यापीठात आचार्य पदवीच्‍या अभ्‍यासक्रमासाठी पाठविण्‍याचा एक महत्‍वाकांक्षी कार्यक्रम गतवर्षी पासुन राबविण्‍यात आलेला आहे. त्‍याचा लाभ विविध विद्याशाखेतील प्राध्‍यापकांना होत आहे. मागील दोन वर्षात सतरा प्राध्‍यापकांना उच्‍च‍ शिक्षणासाठी राहुरी, दापुली, अकोला, पंतनगर, नवसारी, हैद्राबाद, जबलपुर इत्‍यादी ठिकाणी पाठविण्‍यात आले आहे. यामुळे कृषि शिक्षणात निश्‍चीतच मोठ्या प्रमाणावर गुणात्मक सुधारणा होईल यात शंका नाही. शिक्षण विषयक निर्माण करण्‍यात आलेल्‍या आधुनिक सुविधेमुळे विविध संस्‍था आपल्‍या विद्यापीठात परिसर मुलाखतीसाठी येत आहेत. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्‍या डॉ. एस. एल. मेहता यांच्‍या अध्‍यक्षतेखाली उच्‍चस्‍तरीय समितीने या विद्यापीठास व विविध महाविद्यालयास भेटी देवून तेथील कार्याचा आढावा घेतला व विविध प्रकारच्‍या निर्माण केलेल्‍या सुविधे बाबत समाधान व्‍यक्‍त केले.
      विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्र बिंदु आहे, त्‍याच्‍या सुखसोयीकडे मा. कुलगुरू महोदयांनी पुर्ण लक्ष‍ दिले. माहिती तंत्रज्ञानाच्‍या युगात विद्यार्थ्‍यांना शिक्षण विषयक कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करता यावा म्‍हणुन पदव्‍युत्‍तर व आंतरराष्‍ट्रीय वस्‍तीगृहात अद्यावत सुवि‍धेसह इंटरनेट सुविधाही पुरविण्‍यात आली आहे. त्‍याचा लाभ विद्यार्थ्‍यांना होत आहे. कार्यानुभवावर आधारीत नवीन शिक्षण कार्यक्रम विद्यापीठांतर्गत सर्व महाविद्यालयात यशस्‍वीरीत्‍या सुरू करण्‍यात आला आहे. विद्यार्थ्‍यांची स्‍पर्धा परीक्षा तसेच जेआरएफ, एसआरएफ, परीक्षेत यशाचे प्रमाण वाढत आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्‍यांनी विविध स्‍पर्धा परीक्षा तसेच जेआरएफ / गेट परीक्षेत अतुलनीय यश मिळविले आहे. बदनापुर कृषि महाविद्यालयातील 03 विद्यार्थ्‍यांनी या परीक्षेत राष्‍ट्रीयस्‍तरावर प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्‍त केला आहे. तर लातुर येथील कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी अपंग व इतर मागासप्रवर्गातून राष्‍ट्रीयस्‍तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. समुपदेशन व सेवा सल्‍लाकक्ष व परिसर मुलाखतीद्वारे विद्यार्थ्‍यांना नवनवीन नौकरीच्‍या संधी प्राप्‍त झाल्‍या आहेत. समुपदेशन व रोजगार कक्षाचे बळकटीकरण करण्‍यात आले असून विविध संस्‍थांच्‍या परीसर मुलाखती विद्यापीठ परिसरात झाल्‍या आहेत व विविध बॅक, संस्‍था इत्‍यादीमध्‍ये रोजगार मिळविण्‍यासाठी याचा लाभ विद्यार्थ्‍यांना झाला आहे. तथापि एवढ्यावर समाधान मानुन चालणार नाही. विद्यापीठाचा तसेच कृषि क्षेत्राचा सर्वांगीण विकासासोबत ग्रामीण जीवनात नवचैतन्‍य निर्माण होवून युवकांमध्‍ये शेतीची आवड निर्माण करावी लागेल.
      तसेच सन 2011-12 मध्‍ये झालेल्‍या राष्‍ट्रीय छात्रसेना (एनसीसी) बि व सी प्रमाणपत्र परीक्षेत 100 टक्‍के यशप्राप्‍त केले आहे. परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थी निरंजन खाकरे यांची यावर्षी भारतीय सैन्‍य दलात अधिकारी म्‍हणुन निवड झाली आहे.
      राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर विद्यापीठाची प्रतिमा वाढत आहे. तसेच मागील दोन वर्षात विद्यापीठाचे विविध संशोधन प्रकल्‍प व संशोधकांना विविध पुरस्‍कारांनी गौरविण्‍यात आले आहे. त्‍यात पाणी व्‍यवस्‍थापन योजनेचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. उदय खोडके यांना आयएसएईचा पुरस्‍कार मृद व जलसंधारणाच्‍या संशोधनपर कामासाठी मिळाला आहे. पंजाब कृषि विश्‍वविद्यालयाने 18 ते 20 एप्रिल 2011 दरम्‍यान घेतलेल्‍या राष्‍ट्रीय किटक छायाचित्र स्‍पर्धेत किटकशास्‍त्र विभागाचे प्राध्‍यापक बि. व्‍ही. भेदे, बी. बी. भोसले, डी. डी. पटाईत व ए.जी. बडगुजर यांनी तिसरे पारितो‍षक पटकावले आहे. विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ राष्‍ट्रीय, आंतरराष्‍ट्रीय, विद्यापीठ, राज्‍यस्‍तरावर पारितोषिके, मिळवित आहेत. नुकताच डॉ. व्‍ही. एस. खंदरे, सहयोगी प्राध्‍यापक, उद्यानविद्या यांना आचार्य प्रबंधावरील संशोधनाकरीता जवाहरलाल नेहरू पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. केंद्रीय कृषि मंत्री मा.ना.श्री शरदचंद्रजी पवार यांच्‍या हस्‍ते 2010 च्‍या उत्‍कृष्‍ठ प्रबंध संशोधनासाठी हा राष्‍ट्रीय पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला आहे. कृषि क्षेत्रातील सर्वश्रेष्‍ठ दाल उत्‍पादनासाठी राज्‍याला कृषि कर्मन पुरस्‍काराने सन्‍मानीत करण्‍यात आले आहे. या उत्‍पादन वाढीमध्‍ये राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे. कृषि रत्‍न डॉ. अण्‍णासाहेब शिंदे उत्‍कृष्‍ठ संशोधन पुरस्‍कार 2011 महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विभाग प्रमुख, उद्यानविद्या, मकृवि. परभणी यांना प्रदान केला आहे. भारतीय कृषि अभियंता संघाद्वारे दिला जाणारा आयएसईए फैलो हा बहुमानाच्‍या पुरस्‍कारासाठी मा.डॉ.के.पी.गोरे यांची निवड झाली आहे. त्‍याच प्रमाणे मराठवाडा विभागात शिक्षण क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य केल्‍या बद्दल त्‍यांना मराठवाडा मित्रमंडळ, पुणे मार्फत मराठवाडा भूषण पुरस्‍काराने सन्‍मानीत करण्‍यात आले आहे.
      प्राध्‍यापकांचे अध्‍ययन अधिक दर्जेदार होण्‍याच्‍या दृष्‍टीने विद्यापीठाने सन 2011-12 या शैक्षणीक वर्षा पासुन प्रत्‍येक विद्या शाखेतील एका गुणवंत प्राध्‍यापकाची निवड करुन 18 व्‍या दिक्षांत समारंभापासून आदर्श शिक्षक म्‍हणुन पुरस्‍काराने सन्‍मानीत करण्‍यात आले. यावर्षीही 19 व्‍या दिक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्‍हणुन मा. डॉ. किर्तीसींग, माजी अध्‍यक्ष, कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळ, नवी दिल्‍ली व माजी कुलगुरू, नरेंद्रदेव कृषि व तंत्र विद्यापीठ, फैजाबाद ऊत्‍तरप्रदेश, हिमाचल प्रदेश कृषि विद्यापीठ, पालमपुर, इंदिरा गांधी विद्यापीठ, रायपूर छत्‍तीसगढ हे प्रमुख पाहुणे म्‍हणून लाभणार आहेत. या दिक्षांत समारंभात विविध विद्या शाखेतील 1620 स्‍नातकांना पदवी प्रदान करण्‍यात येणार आहे.
      विद्यापीठाने आठराव्‍या दिक्षांत समारंभापर्यंत 16363, 4968 व 561 विविध विद्या शाखेतील स्‍नातकांना अनुक्रमे पदवी, पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवी दिली आहे. तसेच निम्‍नस्‍तर कृषि शिक्षणामध्‍ये कृषि तंत्र पदवी / माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र 36341 विद्यार्थ्‍यांना प्रदान केले आहे.
      विद्यापीठातील प्राध्‍यापक व संशोधकांना नवीन तंत्रज्ञान आत्‍मसात व्‍हावे व त्‍याचा लाभ शिक्षण, संशोधन व विस्‍तार कार्यात व्‍हावा म्‍हणुन विविध परिषदा व कार्यशाळेत देशात व विदेशातही  जसे फिलीपाईन्‍स, थायलंड, इथोपिया, चिन व अमेरीका येथे पाठविण्‍यात आले. राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीयस्‍तरावर होणा-या कृषि संशोधनाचा आढावा घेण्‍यासाठी‍ विद्यापीठात महत्‍वाच्‍या विषयावर विविध कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्रे इत्‍यादी आयोजीत करण्‍यात आले. यावर्षी विद्यापीठात अन्‍नसाखळीकरीता अन्‍नसुरक्षा व्‍यवस्‍थापन प्रणाली, शाश्‍वत शेती, सिताफळ उत्‍पादक प्रशिक्षण कार्यक्रम, विस्‍तारकासाठी संवाद व व्‍यवस्‍थापन कौशल्‍य, या विविध महत्‍वपुर्ण विषयावर कार्यशाळा, प्रशिक्षण व चर्चा सत्राचे आयोजन देखील करण्‍यात आले होते.
      ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना उच्‍च शिक्षणाची संधी उपलब्‍ध व्‍हावी म्‍हणुन विद्यापीठांतर्गत गोळेगांव ता. औढा नागनाथ जि. हिंगोली येथे कृषि महाविद्यालय स्‍थापन करण्‍यात आले असून या शैक्षणीक वर्षापासून पदवी अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्‍यात आली आहे व 60 विद्यार्थ्‍यांनी प्रवेशही घेतला आहे. आपल्‍या राज्‍याचे कृषि मंत्री मा.ना.श्री राधाकृष्‍णजी विखे पाटील यांचे शुभहस्‍ते या महाविद्यालयाचा कौनशिला समारंभही संपन्‍न झाला आहे. या समारंभास राज्‍याचे कृषि राज्‍यमंत्री मा. ना. श्री गुलाबराव देवकर, राज्‍याच्‍या महिला व बाल विकास मंत्री व पालक मंत्री हिंगोली मा.प्रा.श्रीमती वर्षाताई गायकवाड, राज्‍यमहिला आयोगाच्‍या माजी अध्‍यक्षा श्रीमती रजनीताई सातव, कळमनुरीचे आमदार व अध्‍यक्ष राष्‍ट्रीय युवक कॉग्रेस मा. श्री राजीवजी सातव, मा. आ. जयप्रकाशजी दांडेगांवकर व इतर मान्‍यवरांची उपस्थिती लाभली होती. त्‍याच प्रमाणे नांदेड जिल्‍ह्यात नांदेड येथे व किनवट तालुक्‍यातील इस्‍लापूर येथे कृषि महाविद्यालय स्‍थापने बाबतचे प्रस्‍ताव शासनाकडे सादर करण्‍यात आलेले असून यांच्‍या मंजुरीचे शासन निर्णय काढण्‍याबाबतचे प्रयत्‍न चालू आहेत. या महाविद्यालयाचा लाभ ग्रामीण भागातील मुलांना कृषि विषयक शिक्षण घेण्‍यासाठी निश्‍चीतच होणार आहे.
      विद्यापीठातील संशोधन व शिक्षण कार्य अधिकाधिक गुणात्‍मक व दर्जेदार व्‍हावे म्‍हणुन विविध संशोधन केंद्र व महाविद्यालयातील प्रयोगशाळेचे अत्‍याधुनिकीकरण करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे शास्‍त्रज्ञांना व विद्यार्थ्‍यांना संशोधन व प्रात्‍यक्षीक करण्‍यासाठी अधिक सुविधा उपलब्‍ध झाल्‍या आहेत. त्‍याच प्रमाणे गतवर्षी प्रमाणे याही वर्षी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेकडून ग्रंथालय बळकटीकरणासाठी भरीव निधी प्राप्‍त झाला आहे. त्‍यामुळे विद्यापीठातील ग्रंथालयाचे अत्‍याधुनिकरण करण्‍यास मदत मिळणार आहे. भविष्‍यात ग्रंथालयाद्वारे सर्व संलग्‍न महाविद्यालयात व्हिडीओ कॉन्‍फरसींगची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. तसेच कृषि महाविद्यालय, परभणी येथील व्‍याख्‍यान गृहाचे आधुनिकीकरण अरण्‍यात आल्‍यामुळे प्राध्‍यापकांना शिक्षण उपक्रमात उपयोग होत आहे.
      विद्यापीठाने राज्‍यस्‍तरीय आंतरविद्यापीठीय क्रिडा महोत्‍सव 2011 आयोजनाचे उदघाटन या‍ विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा राज्‍याचे कृषि मंत्री मा. ना. श्री राधाकृष्‍णजी विखे पाटील यांचे शुभ हस्‍ते झाले तर समारोप मा. श्री विजयराव कोलते, उपाध्‍यक्ष, महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचे हस्‍ते झाला या क्रिडा स्‍पर्धेत राज्‍यातील विविध विवि‍ध विद्यापीठाचे कुलगुरु ही उपस्थित होते. यास्‍पधेत महाराष्‍ट्रातील जवळपास 18 विद्यापीठातील 2000 विद्यार्थ्‍यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच विद्यापीठातील विद्यार्थ्‍यांना देशातील इतर विद्यापीठातही विविध स्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी पाठविण्‍यात आले. लातुर येथील अद्यावत अशा कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या इमारतीचे बांधकाम पुर्ण होऊन त्‍याचे उदघाटन मा.ना.श्री विलासरावजी देशमुख, केंद्रीय भू‍-विज्ञान व विज्ञान तंत्रज्ञान मंत्री, भारत सरकार, नवी दिल्‍ली यांचे हस्‍ते संपन्‍न झाले.
            विद्यापीठास राष्‍ट्रीय कृषि योजनेअंतर्गत उल्‍लेखनीय असे आदर्श पाणलोट विकास, औजारे निर्मिती चाचणी व प्रशिक्षण, बिजोत्‍पादन व तंत्रज्ञान प्रसार प्रकल्‍प, मंजूर झाले आहेत. तसेच आदर्श पाणलोट प्रकल्‍पामुळे अतिरीक्‍त जमीन सिंचनाखाली येणार आहे त्‍यामुळे बिजोत्‍पादनात वाढ होवुन त्‍याचा शेतकरी बांधवांना निश्‍चीतच फायदा होईल. विद्यापीठाच्‍या उत्‍कृष्‍ठ संशोधन कार्याचा विचार करुन भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने अखील भारतीय समन्‍वय संशोधन प्रकल्‍प, सुर्यफुल व करडई या दोन प्रकल्‍पांना राष्‍ट्रीय स्‍तरावर तृतीय प्रकल्‍प असे मानांकन दिले आहे.
            संशोधन कार्यातही विद्यापीठाने आपल्‍या सर्वांच्‍या सहकार्याने भरीव प्रगती केली आहे. विद्यापीठाने राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत औजारे निर्मिती चाचणी व प्रशिक्षण केंद्र, बिज प्रक्रिया केंद्र व कार्यानुभवावर आधारीत कडधान्‍य प्रक्रिया प्रकल्‍पाच्‍या इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले असून त्‍याचे उदघाटनही या दिक्षांत समारंभाच्‍या निमित्‍याने करण्‍यात येणार आहे. या कडधान्‍य प्रक्रिया प्रकल्‍पाद्वारे विद्या‍र्थ्‍यांसोबतच शेतकरीबांधवांना सोयाबीन पिकांवर प्रक्रिया करुन सोयादुध, सोयापनीर, सोयाबिस्‍कीट इत्‍यादी विविध मूल्‍यवर्धित पदार्थ तयार करुन त्‍याचे मुल्‍यवर्धन होण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. त्‍याच प्रमाणे बदनापुर, उस्‍मानाबाद व अंबेजोगाई येथील विद्यार्थ्‍यांसाठी वसतीगृहाचे बांधकाम देखील पुर्ण करण्‍यात आले आहे.
      मराठवाडा विभागात जवळपास 87 टक्‍के शेती ही कोरडवाहू असून निसर्गाच्‍या लहरीपणावर अवलंबुन आहे. त्‍यामुळे अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना नेहमीच कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो. यासर्व परिस्थितीचा साकल्‍याने विचार करुन मा. कुलगुरूंच्‍या मार्गदर्शनाखाली आदर्श अशी एकात्मिक पीक पध्‍दती विकसीत करण्‍याचे कार्य प्रगती पथावर आहे. त्‍याच प्रमाणे त्‍यांनी मराठवाडा विभागातील शेतक-यांचे आर्थिक जीवनमान सुधारण्‍यासाठी शेतीबरोबरच आळंबी उत्‍पादन, मधुमक्षीका पालन, कुक्‍कूटपालन, दुग्‍ध व्‍यवसाय, मत्‍स्‍य उत्‍पादन, रेशीम उत्‍पादन, शेळी मेंढी पालण इत्‍यादी विविध कृषि पुरक व्‍यवसाय करण्‍याबाबत शेतक-यांना नेहमीच प्रोत्‍साहीत केले आहे.
      तसेच आदर्श पाणलोट प्रकल्‍पासाठी रुपये 13 कोटीचा निधी मंजुर केला असून त्‍यामुळे अतिरीक्‍त जमीन सिंचनाखाली येवून बिजोत्‍पादनात वाढ होईल व त्‍याचा शेतकरी बांधवांना निश्‍चीतच फायदा होईल अशी मला आशा आहे. विद्यापीठाने आज पर्यंत विविध पिकांचे 125 वाण 20 यंत्रे विकसीत करुन 715 तंत्रज्ञान शिफारसी शेतक-यांसाठी प्रसारीत केल्‍या आहेत. भारत-इस्‍त्राईल मैत्रीच्‍या माध्‍यमातून भारतातील प्रामुख्‍याने हरीयाणा आणि महाराष्‍ट्र राज्‍यात वेगवेगळ्या पिकाची गुणवत्‍ता केंद्र मंजुर झाले आहे. यामुळे मराठवाडा विभागातीली केसर आंबा उत्‍पादकांना फायदा होणार आहे.
      विद्यापीठात कापुस, तुर, सोयाबीन व हरभरा पिकावरील किड व रोगाच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी सर्व्‍हेक्षण व सल्‍ला प्रकल्‍प राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेतुन राबविण्‍यात येतो. या प्रकल्‍पामुळे शेतक-यामध्‍ये किड व रोग व्‍यवस्‍थापनाबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. मा. कुलगुरू यांनी सदर प्रकल्‍पाची व्‍याप्‍ती इतर पिकांतही वाढवावी व क्षेत्रीय कर्मचा-यांसाठी मध्‍य हंगामी प्रशिक्षण आयोजीत करण्‍याची कल्‍पना मांडली ती कृषि विभागाने तत्‍वत: मान्‍य केली त्‍याच प्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रमही विद्यापीठाने आयोजीत केला.
      विद्यापीठातील संशोधनास अधिक बळकटी यावी त्‍याच प्रमाणे या क्षेत्रात अधिक चर्चा व देवाण घेवाण करण्‍यासाठी संशोधनास नवीन दिशा देण्‍यासाठी विद्यापीठाने बेजोशितल सिडस जालना, या सोबत सामजस्‍यं करार करण्‍यात आला आहे. यामुळे विद्यार्थी व संशोधकांना एक नवीन दालण उपलब्‍ध झाले आहे. त्‍याच प्रमाणे कपाशी पिकाच्‍या नवीन वाणाच्‍या संशोधना बाबत महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळासोबत चर्चा चालू असून लवकरच सामजस्‍यं करार करण्‍यात येणार आहे. यामुळे कपाशी पिकात एक नविन क्रांती घडून येणार आहे. उपसा जलसिंचन योजना बदनापुर, लातुर व नांदेड येथे कार्यान्वित झाली असून त्‍यामुळे 146 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.
      राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत अधिक बिजोत्‍पादनासाठी सिंचन स्‍त्रोत विकास प्रकल्‍पांतर्गत पिंगळगड नाल्‍याचे सरळीकरण, खोलीकरण व रूंदीकरण करण्‍यात येत आहे. त्‍यामुळे अतिरीक्‍त 550 हेक्‍टर क्षेत्र वहितीखाली येणार असून अपेक्षीत 1550 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन बिजोत्‍पादनात भरीव वाढ होणार आहे व त्‍याचा फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे.


 फळझाड लागवडीचा महत्‍वाकांक्षी असा कार्यक्रम विद्यापीठ प्रक्षेत्रावरील 100 एकर क्षेत्रावर रा‍बविला आहे. या अंतरगत आंबा, पेरू, चिंच, मोसंबी, संत्रा इत्‍यादी विविध फळझाडांची लागवड करण्‍यात आली आहे. याचा फायदा विद्यार्थ्‍यांना व प्राध्‍यापकांना संशोधनासाठी तसेच विद्यापीठ महसुल वाढीसाठी होणार आहे.
विद्यापीठाच्‍या प्रक्षेत्रावर सिंचन सुविधा अधिक बळकट करण्‍याच्‍या दृष्‍टीने जायकवाडी प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन पाणी घेऊन सिंचन सुविधा वाढविण्‍यात आली आहे. त्‍यामुळे बिजोत्‍पादनात वाढ होणार आहे. त्‍याचा लाभ शेतक-यांना नकीच होणार आहे. विद्यापीठाने सन 2011-12 मध्‍ये गहू, हरभरा, करडई, सोयाबीन, ज्‍वारी इत्‍यादी 7297.58 क्विंटल बियाणांचे उत्‍पादन केले आहे. सन 2012-13 मध्‍ये 14,000 क्विंटल बिजोत्‍पादनाचा मानस होता. परंतु अपु-या पावसामुळे घट होण्‍याची शक्‍यता आहे.
विद्यापीठास अनेक देशातील तसेच भारतातील शास्‍त्रज्ञांनी भेटी देवून संशोधन कार्याची माहिती घेतली. कृषि शास्‍त्रज्ञ निवडमंडळाचे अध्‍यक्ष मा. श्री गुरूबच्‍चन सिंग, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक मा. डॉ. एस. अयप्‍पन तसेच राज्‍याचे कृषि मंत्री मा. ना.श्री राधाकृष्‍णजी विखे पाटील, परभणी जिल्‍ह्याचे पालक मंत्री मा. ना. श्री प्रकाशदादा सोळंके, शालेय शिक्षण व आरोग्‍य राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजियाखॉन यांनीही विद्यापीठास भेट देवुन शास्‍त्रज्ञांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामुळे विद्यापीठाच्‍या शिक्षण, संशोधन व विस्‍तार कार्यास एक नवी दिशा मिळण्‍यास मदत होणार आहे. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकयांपर्यंत अधिक जलद गतीने व परिणामकारकरीत्‍या पोहोचण्‍याचे कार्य विस्‍तार शिक्षण गट (01) , कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र(01), विभागीय कृषि विस्‍तार केंद्र (04) तसेच 03 घटक व 08 अशासकीय कृषि विज्ञान केंद्राद्वारे केल्‍या जाते.
विद्यापीठाद्वारे दरवर्षी खरीप पीक मेळावा (विद्यापीठ वर्धापनदिन, 18 मे), रबी पिक मेळावा (मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिन, 17 सप्‍टेंबर)  घेण्‍यात येवून शेतक-यांना खरीप व रबी हंगामाबाबत मार्गदर्शन करण्‍यात येते व विद्यापीठाने तयार केलेल्‍या बियाणाचे वाटप केले जाते. तसेच क्रांती ज्‍योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त 3 जानेवारी रोजी महिला शेतकरी मेळावा दरवर्षी आयोजीत केला जातो. याचा लाभ राज्‍यातील लाखो शेतकरी बांधव घेतात विद्यापीठाद्वारे दरवर्षी कृषि दैनंदिनी, कृषि दिनदर्शिका, विविध विषयावरील पुस्‍तीका, घडी पत्रीका, शेती भाती मासीक याचे प्रकाशन करण्‍यात येते.
कृषि पर्यटन याचे एक नवीन दालण विभागातील लोकांना उपलब्‍ध व्‍हावे म्‍हणुन मा. कुलगुरूंच्‍या अभिनव कल्‍पनेतून व मार्गदर्शनाने विद्यापीठाने पिंगळगडनाला विकास प्रकल्‍पांतर्गत कृषि पर्यटन केंद्राचा प्रस्‍ताव नुकताच शासनास सादर केला आहे.
विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांच्‍या शेतापर्यंत जलदगतीने व प्रभावीपणे पोहोचण्‍यासाठी तसेच शेतक-यांमध्‍ये नव चैतन्‍य निर्माण करण्‍यासाठी विद्यापीठ आपल्‍या दारी तंत्रज्ञान शेतावरी हा नाविन्‍यपुर्ण असा विस्‍तार शिक्षण उपक्रमाची प्रशंसा महाराष्‍ट्र राज्‍याचे महामहिम राज्‍यपाल तथा कुलपती यांनी 18 ऑक्‍टोंबर 2012 रोजी राज्‍यातील सर्व कृषि विद्यापीठांच्‍या कुलगुरुंच्‍या आयोजीत केलेल्‍या राजभवनातील बैठकीत प्रशंसा केली. या प्रकारचा उपक्रम मराठवाड्यातील सर्व आठही जिल्‍ह्यात राबवण्‍याचा मानस मा. कुलगुरुंचा आहे. 
सध्‍याच्‍या दुष्‍काळग्रस्‍त परिस्‍थीतीत औरंगाबाद आणि जालना जिल्‍ह्यातील मोसंबी बागा वाचविण्‍यासाठी राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियांनांतर्गत मराठवाडा विभागातील लिंबुवर्गीय फळपिकांवर तंत्रज्ञान अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात रोपांची निर्मिती करुन येईल त्‍या हंगामात शेतक-यांना पुरवण्‍याचा मानस आहे.
राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत एकात्मिक पीक व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञान प्रकल्‍प मराठवाड्यातील आठही जिल्‍ह्यामध्‍ये राबविण्‍यात येत आहे. विद्यापीठाने विकसीत केलेले वाण व इतर निविष्‍ठांच्‍या प्रात्‍यक्षीकांमधुन व अवलंबनातुन विभागातील शेतक-यांच्‍या उत्‍पादन व उत्‍पादकता वाढल्‍याचे दिसून येत आहे. विद्यापीठांतर्गत कापूस संशोधन केंद्र,  नांदेड व कृषि व्‍यवस्‍थापन पदव्‍युत्‍तर संस्‍था, चाकुर येथील ब-याच वर्षापासून असलेले अतिक्रमण हटविण्‍यात महसूल, पोलीस व जिल्‍हा प्रशासनाच्‍या मदतीने मा. कुलगुरूंच्‍या सातत्‍याच्‍या प्रयत्‍नामुळे यश प्राप्‍त झाले आहे. विद्यापीठातील मनुष्‍यबळ दिवसेंदिवस सेवा निवृत्‍तीमुळे कमी होत आहे, विद्यापीठाच्‍या कामात सुसूत्रता येण्‍यासाठी काही पदांच्‍या नवीन नियुक्‍त्‍या व पदोन्‍नत्‍या केलेल्‍या आहेत. तसेच कृषि विज्ञान केंद्र व प्रकल्‍पग्रस्‍त वर्गातील विविध पदे भरण्‍याची प्रक्रिया चालू आहे.
विद्यापीठ परिसर, विविध संशोधन केंद्रे व महाविद्यालयाचे सुशोभीकरण करण्‍याच्‍या द्ष्‍टीने व पर्यावरणाचा विचार करुन मोठ्या प्रमाणावर विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्‍यात आलेले आहे. यामुळे भावी काळात विद्यापीठ परिसर रमणीय व हिरवागार होणार आहे. संशोधकाने निर्माण केलेल्‍या संशोधनाचे संरक्षण व्‍हावे व संशोधन कार्य अधिक प्रगल्‍भ व्‍हावे यादृष्‍टीने विद्यापीठाने बौध्दित संपदा हक्‍क कक्ष सुरू केला आहे. या कक्षाद्वारे आतापर्यंत विद्यापीठातील चार पेटेंट अर्ज संबंधीत कार्यालयात नोंदविण्‍यात आलेले आहेत ही विद्यापीठाच्‍या दृष्‍टीने उल्लेखनीय बाब आहे. विद्यापीठाचे नांव जागतीकस्‍तरावर कसे उंचावेल या दृष्‍टीने भविष्‍यातील विविध उपक्रमाद्वारे व सर्वांच्‍या सहकार्याने गरजेनुसार शिक्षण संशोधन व विस्‍तार कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्‍याचा मानस विद्यापीठाचा आहे.



१९ वा दीक्षांत समारंभ निमित्ते आयोजित पत्रकार परिषद संपन्न





Tuesday, February 19, 2013

१९ वा पदवीदान समारंभाचे आयोजन


१९ वा पदवीदान समारंभाचे आयोजन  




आदर्श पध्‍दतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी







      शिवाजी महाराज याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्‍यांनी त्‍यांच्‍या कार्यापासुन प्रेरणा घ्‍यावी. शिवाजी महाराजांनी स्‍वराज्‍यासाठी जे नियोजनबध्‍द प्रयत्‍न केले त्‍याच पध्‍दतीने आपल्‍या शैक्षणीक क्षेत्रामध्‍ये नियोजनबध्‍द परिश्रम करावेत व आपल्‍या संस्‍थेचे नांव देशपातळीवर न्‍यावेत असे सल्‍ला मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गारे यांनी आपल्‍या भाषणात दिला. मकृवि, परभणी येथे आयोजीत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि ) डॉ. विश्‍वासराव शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण व कुलसचिव श्री का. वि. पागीरे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, गृहविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य प्रा विशाला पटणम, अन्‍नतंत्र महाविद्यालयाचे डॉ. पी. एस. कदम, उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ. बी. एन. शिंदे, विद्यापीठ अभियंता श्री डी. डी. कोळेकर, विद्यापीठ कल्‍याण अधिकारी डॉ. के. टी. आपेट  यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मा. कुलगुरू डॉ. के. पी. गोरे यांच्‍या हस्‍ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेचे पुजन करण्‍यात आले. महाराष्‍ट्रातील दुष्‍काळ सदृष्‍य परिस्थितीचा विचार करुन अत्‍यंत साधेपणाने शिवजयंती साजरी करण्‍यात आली. या कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने होणारा खर्चामध्‍ये बचत करुन सदरील निधी दुष्‍काळ सद्दष्‍य कामासाठी वापरण्‍याचा मनोदय विद्यार्थ्‍यांनी करुन एक आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन मा. कुलगुरू यांनी केले.
यावेळी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्‍यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थीनी वर्ग मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्ञानेश्‍वर बांगर यांनी केले तर आभार प्रदर्शन विठ्ठल रोडगे यांनी केले. यशस्‍वीतेसाठी डॉ. एच.व्‍ही. काळपांडे,  प्रा. डी. एफ. राठोड, प्रा. डॉ. आशा देशमुख व विद्यार्थी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

मराठवाडयातील मोसंबी बागा वाचविण्यासाठी विद्यापीठाची विशेष तंत्रज्ञान अभियान