वनामकृवि व सि.एन.एच. उन्नत कौशल प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने सुधारित कृषी अवजारांच्या योग्य वापर, निगा व देखभाल या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षणास प्रारंभ
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व सि.एन.एच. इंडस्ट्रीयल इंडिया (न्यू. हॉलंड), नवी दिल्ली यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यामातून शेतकरी व ग्रामीण युवक यांचे करिता सुधारित कृषी अवजारांचा योग्य वापर, निगा व देखभाल या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षणाचे दिनांक २२ नोंव्हेंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून संचालक शिक्षण डॉ.उदय खोडके व विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले हे उपस्थित होते. व्यासपीठावर कृषी यंत्र व शक्ती विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. स्मिता सोळंकी, न्यू हॉलंड कंपनीचे व्यवस्थापक श्री. सचिन पाटील व विद्यत इ ईतर उर्जा विभागाचे विभागप्रमुख डॉ.राहुल रामटेके हे व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोप कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, शेतकरी कल्याणाकरिता
कार्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांनी सामाजिक दायित्व निधी उपलब्ध करून दिला असुन शेतक-यांपर्यंत
ज्ञान व कौशल्य पोहोचविण्याचे कार्य विद्यापीठ करित आहे. यांत्रिकीकरण शेतीचा
अविभाज्य अंग असून निविष्टांचा योग्य वापर करून हवामानाच्या बदलात देखिल शाश्वत उत्पादन
घेता येते. यांत्रिकीकरणामुळे मजुरी वरचे खर्च, काबाडकष्ट कमी होऊन आर्थिक उन्नती
साधता येते. शेतातील उपकरणे व अवजारे यांची योग्य निगा व देखभाल करण्याची गरज असुन
त्यामुळे उपकरणांचे आयुष्यमान वाढते.
प्रकल्पाचे नोडल ऑफिसर संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके म्हणाले की, खाजगी कंपनीच्या माध्यमातुन असा प्रकल्प राबविणारे वनामकृवि हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ असुन शेतीत लागणारे भांडवल कमी करण्यावर प्रशिक्षणात भर देण्यात येत आहे. तर संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याची माहिती देऊन कृषि यांत्रिकीकरणाच्या प्रसाराकरिता विद्यापीठ प्रयत्न करित असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कृषी यंत्र व शक्ती विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. स्मिता सोळंकी यांनी यांत्रिकीकरणाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मधुकर मोरे यांनी केले तर आभार डॉ.एस.डी.विखे यांनी मानले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन डॉ. स्मिता सोळंकी व डॉ.पंडित मुंडे व त्यांचे सर्व सहकारी यांनी केले.
कार्यक्रमांतर्गत उपस्थितीत शेतकरी बांधवांनी विद्यापीठाबद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षण कार्यक्रमास ८० शेतकरी, महिला शेतकरी, व ग्रामीण युवक यांनी उपस्थिती नोंदवली. सदर प्रशिक्षण विद्यापीठ व सि.एन.एच. इंडस्ट्रीयल इंडिया (न्यू. हॉलंड), नवी दिल्ली यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यामातून राबविण्यात येत असुन या प्रशिक्षण कार्यक्रमातून निर्माण झालेले प्रशिक्षक हे कृषी यांत्रीकीकरणाचे राजदूत (Brand Ambasaador) पुढे काम करणार आहेत. येत्या दोन वर्षात ६० प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठामार्फत पूर्ण करण्यात येणार असुन मराठवाडयातील १५०० पेक्षा जास्त प्रशिक्षीत यांत्रिकीकरण राजदूत निर्माण होणार आहेत. कार्यक्रमासाठी शेतकरी, महिला शेतकरी, ग्रामीण युवक, वृत्तपत्र प्रतिनिधी, विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.