Tuesday, November 29, 2022

वनामकृविस राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्‍या पथकाची भेट व शास्‍त्रज्ञांना मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २९ नोव्‍हेबर रोजी वैज्ञानिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे सचिव प्रा.नरेंद्र शाह, माजी सचिव डॉ ए व्‍हि सप्रे, शास्‍त्रज्ञ अधिकारी डॉ नविद पटेल, समन्‍वय अधिकारी प्राचार्य डॉ उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

मार्गदर्शनात डॉ नरेंद्र शाह म्‍हणाले की, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्‍या माध्‍यमातुन नाविण्‍यपुर्ण संशोधनाकरिता परभणी कृषि विद्यापीठास ५० लाख रूपयाचा निधी मंजुर करण्‍यात आला आहे. संशोधन एकाच संस्थेत केंद्रीत न होता, विकेंद्रीत स्‍वरूपात व्‍हावा हा दृष्‍टीकोन आयोगाचा आहे. यात तरूण संशोधकांना मोठी संधी असुन तरूणांकडे नवनवीन संशोधन संकल्‍पना असतात, त्‍यास व्‍यासपीठ देण्‍याचा आयोगाचा हेतु आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्‍या वापरातुन समाजातील विविध समस्‍या व विकासात्‍मक कामांसाठी सदर आयोगाची स्‍थापना करण्‍यात आली असुन विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकांपर्यंत नेण्‍यासाठी आयोग प्रयत्‍नशील आहे.

डॉ ए व्हि सप्रे म्‍हणाले की, आयोग सामाजिक आर्थिक विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्‍या अभिनव संशोधन प्रस्‍तावास निधी उपलब्‍ध करून देते, याचा लाभ विद्यापीठातील आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांना घेता येईल.

प्रास्‍ताविकाता प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडे संशोधन प्रकल्‍प सादर करण्‍याबाबतचे प्रारूप व प्रस्‍ताव तयार करण्‍यासाठीची मा‍हिती देऊन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनानुसार या उपक्रमास गती प्राप्‍त झाली असल्‍याचे ते म्‍हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल यांनी मानले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्‍यात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या पुढाकाराने दिनांक ३१ ऑक्‍टोबर २०२२ रोजी सामंजस्‍य करार झाला, या करार प्रस्‍तावांची देवाणघेवाण कार्यक्रमात करण्‍यात आली. कार्यक्रमास विविध महावि़द्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते, यात प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे, प्राचार्य डॉ राकेश अहिरे, प्राचार्य डॉ जगदिश जहागिरदार, प्राचार्य डॉ राजेश्‍वर क्षीरसागर, प्राचार्या डॉ माधुरी कुलकर्णी, प्राचार्य डॉ गिरिधर वाघमारे, प्राचार्य प्रा हेमंत पाटील आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्‍यापक उपस्थित होते. याप्रसंगी मान्‍यवरांनी विद्यापीठातील मृदा विज्ञान व रसायनशास्‍त्र विभाग, अ‍न्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय, किटकशास्‍त्र विभाग, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, नाहेप प्रकल्‍पातील विविध संशोधनात्‍मक उपक्रमास भेटी दिल्‍या.






हैद्राबाद येथील इक्रिसॅट आंतरराष्‍ट्रीय संस्‍थेच्‍या वतीने आयोजित तीन दिवशीय प्रशिक्षणात वनामकृवितील पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्यांचा सहभाग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या कृषिविद्या विभाग, मृदा विज्ञान व रसायनशास्त्र विषयातील पदव्‍युत्‍तर आणि आचार्य पदवीच्‍या २५ विद्यार्थ्यांनी हैदराबाद येथील आंतरराष्‍ट्रीय संस्‍था इक्रिसॅट (आं‍त‍रराष्‍ट्रीय अर्ध-शुष्क उष्ण कटिबंध पीक संशोधन संस्‍था) यांच्‍या वतीने मातीतील कार्बन व्‍यवस्‍थापन यावर दिनांक २३ ते २५ नोव्‍हेंबर दरम्‍यान आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षणात सहभाग घेतला. प्रशिक्षणाअंतर्गत इक्रिसॅट संशोधकांनी विद्यार्थ्यांना जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे सुयोग्य नियोजन, मृदा अॅपचा वापर तसेच विविध पिकासाठी सिम्युलेशन मॉडेल तयार आदींचे प्रात्‍यक्षिकांव्‍दारे मार्गदर्शन केले. इक्रिसॅटच्‍या विविध विभागांना भेटी देण्यात आल्या व भविष्यात संलग्न स्वरुपात अनेक विभागातील संशोधन हे विद्यार्थ्याद्वारे नियोजित केल्या जाणार आहे. अशा प्रशिक्षणामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्‍यांना आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील ज्ञान अवगत करण्‍यास मदत होते, तसेच संशोधनास नवी दिशा प्राप्‍त होऊ शकते अशा प्रकारचे व्‍यासपीठ विद्यार्थ्‍यांना जास्‍तीत जास्‍त उपलब्‍ध करून देण्‍याकरिता कुलगुरू मा डॉ. इंद्र मणि हे सतत प्रयत्नशील असुन सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍याकरिता शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले व सहयोगी अधिष्‍ठाात डॉ. सय्यद ईस्माईल यांनी प्रयत्न केले. प्रशिक्षण यशस्वीतेकरिता डॉ. गोदावरी पवार, डॉ. एस. एल. वाईकर व डॉ. मेघा जगताप यांनीही प्रशिक्षणात सहभाग नोंदवीला.

Sunday, November 27, 2022

नवसारी कृषि विद्यापीठात आयोजित भारतीय कृषि विद्यापीठ संघाच्‍या नववी प्रादेशिक बैठकीत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांचे मार्गदर्शन

भारतीय कृषी विद्यापीठ संघाच्या (IAUA) कुलगुरूंची नववी प्रादेशिक बैठक नवसारी कृषी विद्यापीठात दिनांक २५ नोव्‍हेबर ते २७ नोव्‍हेबर दरम्‍यान संपन्‍न झाली नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: कृषी विद्यापीठांमध्ये अल्प मुदतीच्या आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे महत्त्व आणि व्यवहार्यता' या विषयावर भर देण्‍यात आला. उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन देशाचे माननीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री कैलास चौधरी हे आभासी माध्‍यमातुन उपस्थिती होते तर नवसारी कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ झेड पी पटेल हे अध्‍यक्षस्‍थानी होते. बैठकीस देशातील ३० कृषि विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी बैठकीस उपस्थित राहुन कृषि विद्यापीठामध्‍ये अल्‍प मुदतीच्‍या व प्रमाणपत्र अभ्‍यासक्रमांचे महत्‍व यावर मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनात मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, ग्रामीण युवकांच्या कौशल्य विकासाकरिता कृषी विद्यापीठाने अल्‍प मुदतीच्‍या व प्रमाणपत्र अभ्‍यासक्रमांवर भर देण्‍याची गरज असुन ड्रोन पायलट, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, अंळबी शेती, सेंद्रीय शेती, दुग्ध व्‍यवसाय, कुक्‍कटपालन, कृषि प्रक्रिया उद्योग आदी अनेक कृषि संलग्‍न व्‍यवसायावर आधारित कौशल्‍य विकास अभ्‍यासक्रम अत्‍यंत उपयुक्‍त ठर‍तील असे ते म्‍हणाले. कृषि राज्‍यमंत्री मा श्री. कैलास चौधरी म्‍हणाले की, जागतिक स्तरावर कृषी शिक्षणासाठी नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये भारताचा वाटा फक्त १ टक्के आहे आणि २७ टक्के विद्यार्थ्यांनी भारतातील सर्व शाखांमध्ये उच्च शिक्षणासाठी नोंदणी केली आहे. २०३३ पर्यंत ही टक्केवारी अनुक्रमे ९ टक्के आणि ५० टक्के पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ झेड पी पटेल म्‍हणाले की, कृषि विद्यापीठाचे ज्ञान शक्ती केंद्रात रूपांतर करण्याच्‍या गरज असुन कृषी शिक्षण जास्‍तीत जास्‍त लोकांपर्यंत पोहविण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे ते म्‍हणाले.





वनामकृवित प्रभावी शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीवर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक आणि नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) आणि परभणी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने “कृषी शिक्षणाकरिता प्रभावी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती या विषयावर दिनांक २१ व २२ नोव्‍हेबर रोजी दोन दिवसीय कार्यशाळा संपन्‍न झाली.

कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन देहरादून येथील डून विद्यापीठाचे माजी कुलगुरु तथा नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक (अभि.) प्रा. डॉ. गजेंद्र सिंह हे होते तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेतील संगणक अनुप्रयोग विभागाचे प्रमुख डॉ सुदिप मारवाह, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ गिरीधर वाघमारे, प्रभारी प्राचार्या डॉ माधुरी कुलकर्णी, आयोजक विभाग प्रमुख डॉ राजेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, आज प्रत्‍येक शिक्षकांना स्‍वत: च्‍या विषयांचे प्रभावी शैक्षणिक व्‍हिडिओ निर्मिती करता आली पाहिजे. प्रत्‍यक्ष वर्गातील अध्‍यापन हे प्रभावी असतेच परंतु शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केल्‍यास विद्यार्थ्‍यांना कोणत्‍याही वेळेस व्हिडिओच्‍या माध्‍यमातुन विषय समजुन घेता येऊ शकेल. नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, विद्यापीठ अधिस्‍वीकृती च्‍या दृष्‍टीने दर्जेदार शैक्षणिक साहित्‍य निर्मिती करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

मार्गदर्शनात डॉ गजेंद्र सिंह म्‍हणाले की, आज माहिती तंत्रज्ञानाच्‍या काळात शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करणे शक्‍य असुन प्रत्‍येक प्राध्‍यापकांनी ही कला अवगत करावी तर डॉ सुदिप मारवाह म्‍हणाले की, प्रभावी व्हिडिओ निर्मितीबाबत परभणी कृषि विद्यापीठाने विशेष कार्यशाळेचे आयोजन केल्‍यामुळे आयसीएआरच्‍या माध्‍यमातुन अग्री दिक्षा पोर्टलवर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ उपलब्‍ध होऊ शकतील.

प्रास्‍ताविकाता डॉ धर्मराज गोखले यांनी करोना आणि लॉकडाऊन परिस्थितीत परभणी कृषि विद्यापीठातील प्राध्‍यापकांनी विद्यार्थ्‍यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान न होऊ देता अध्‍यापनाकरिता ऑनलाईन माध्‍यमाचा चांगल्‍या उपयोग केला, असे मत त्‍यांनी व्यक्‍त केले.   

कार्यशाळेत अहमदनगर येथील नॉलेज ब्रिज संस्‍‍थेचे प्रशिक्षक श्री भुषण कुलकर्णी आणि श्री एकनाथ कोरे यांनी प्रभावी शैक्षणिक व्‍हिडिओ निर्मितीवर प्रात्‍यक्षिकासह मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्‍या समारोपीय कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांच्‍या हस्‍ते सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ रणजित चव्‍हाण यांनी मानले.

कार्यशाळा यशस्‍वीतेकरिता आयोजक डॉ राजेश कदम, डॉ रणजित चव्‍हाण, डॉ प्रविण कापसे, डॉ विणा भालेराव, डॉ संतोष फुलारी यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ अनिकेत वाईकर, डॉ एच एन रोकडे, इंनि एस एच शिवपुजे, डॉ एस बी सोलंके, डॉ एस ई शिंदे, इंनि संजिवनी कानवते, श्री नितीन शहाणे आदीसह नाहेप प्रकल्‍पातील अधिकारी व कर्मचारी यांची परिश्रम घेतले.





Saturday, November 26, 2022

मोसंबी व संत्रा या पिकावर कोळी किडिंचा प्रादुर्भाव

मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र अधिक असून, मोसंबीवर कोळी किडिंचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. परभणी जिल्ह्यात संत्रा बागांचे मोठे क्षेत्र असून, येथे संत्र्यांवर कोळी कीड दिसून येत आहे. अन्य जिल्ह्यातही लिंबूवर्गीय बागेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून योग्य त्या उपाययोजना कराव्यात

मोसंबी व संत्रा या लिंबूवर्गीय फळपिकांवर कोळी किडीच्या प्रादुर्भावात वाढ दिसून येत आहे. कोळी किडीचा प्रादुर्भाव वर्षे भर असला तरी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान जास्त असतो. या किडीमुळे फळांचे नुकसान होऊन विकृत फळे तयार होतात.

ओळख : कोळी ही कीड अष्टपाद वर्गातील असून, आकाराने सूक्ष्म असते. साध्या डोळ्याने दिसणे कठीण जाते. पानांच्या शिराजवळ किंवा बरेचदा फळांच्या सालीवर बारीक खळग्यात ती अंडी घालते. प्रौढ लांबट, पिवळे असून, पिल्ले फिक्कट पिवळसर असतात. पिल्ले व प्रौढ कोळी आकाराचा फरक सोडल्यास सारखेच दिसतात.

प्रादुर्भावाची लक्षणे : कोळी कीड पाने व फळांचा पृष्ठभाग खरवडतात, त्यातून येणाऱ्या रस शोषतात. परिणामी, पानावर पांढूरके चट्टे पडतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास चट्ट्याचा भाग वाळतो. फळावरील नुकसान तीव्र स्वरुपाचे असते. खरचटलेल्या जागी पेशींची वाढ खुंटते. तपकिरी लालसर किंवा जांभळट रंगाचे चट्टे पडतात. याला शेतकरी 'लाल्या' म्हणून ओळखतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास अनियमित आकाराची फळे तयार होतात. आतील फोडींची वाढ बरोबर होत नाही. फळांची प्रत खालावते. 

व्यवस्थापन : कोळी किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मोसंबी, संत्रा या लिंबूवर्गीय पिकांच्या फळावर होतो. प्रादुर्भाव लवकर लक्षात न आल्यास प्रादुर्भावग्रस्त फळांचा रंग बदलतो. वेळोवेळी बागेची निरिक्षणे करून वेळीच उपाय करावेत. पाण्याचा ताण पडू देऊ नये. निंबोळी अर्क (५%) किंवा ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी डायकोफॉल (१८.५ ईसी) २.७ मि.लि. किंवा डायफेनथीयूरोन (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी असे आवाहन कृषी किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ ए.जी लाड, डॉ योगेश मात्रे व डॉ राजरतन खंदारे यांनी केले.

Thursday, November 24, 2022

ऊस संशोधनाकरिता वनामकृवि, परभणी आणि लखनौ येथील भारतीय ऊस संशोधन संस्‍था यांच्‍यात सामंजस्‍य करार

ऊस संशोधनास मिळणार चालना 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि लखनौ येथील भारतीय ऊस संशोधन संस्‍था यांच्यात दिनांक २३ नोव्‍हेंबर रोजी सामंजस्य करार झाला. सामंजस्‍य करारावर कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आणि भारतीय ऊस संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ ए डी पाठक यांनी स्‍वाक्षरी केली. यावेळी डॉ ए के सिंग, डॉ गंगावार आदींची उपस्थिती होती. सदर करारावर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान म‍हाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ उदय खोडके यांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.

सदर करारामुळे उस पिकांतील अत्‍याधुनिक दीर्घकालीन संशोधन कार्यक्रम राबविण्‍यात येणार असुन यामुळे ऊस संशोधनात विशेषत: नॅनो तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रजनन, जैवतंत्रज्ञान, पीक उत्पादन आणि संरक्षण तंत्रज्ञान, सिंचन, पीक शरीरविज्ञान आणि जैवरसायन, विस्तार आणि अर्थशास्त्र, शेतीचे यांत्रिकीकरण आणि मूल्यवर्धन, साखर, प्रक्रिया पेय आणि गूळ आधारित उत्पादने यावर भर देण्‍यात येणार आहे. तसेच विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर आणि आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या संशोधन करिता मदत होणार असुन सदर संस्‍थेत वनस्‍पती रोगशास्‍त्र, वनस्‍पती सुक्ष्‍मजीवशास्‍त्र, वनस्‍पती जैवतंत्रज्ञान, कृषिविद्या शास्‍त्र, मृदा विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र, कृषि अभियांत्रिकी, मृद जलसंधारण, सिंचन आणि निचरा, काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, कृषी अर्थशास्त्र, विस्तार शिक्षण, संगणक अनुप्रयोग आणि सांख्यिकी आदी शाखेत कार्य केले जाते. या संशोधनाचा लाभ मराठवाडा आणि राज्‍यातील ऊस उत्‍पादकांना होणार असुन ऊस उत्‍पादक, संशोधक आणि विद्यार्थ्‍यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. सदर सामंजस्‍य करारचा आराखडा मा कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांचे मार्गदर्शनाखाली सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. उदय खोडके यांनी तयार केला.




















Wednesday, November 23, 2022

विद्यार्थ्यांनी स्वत:च्या कमतरतेवर मात करून व्यक्तिमत्व विकास साधावा .... मा. प्रा. गजेंद्र सिंह

विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांशी तुलना न करता, स्वत:शीच स्वत:ची तुलना करावी, त्यामुळे स्वतःची ताकद आणि कमतरता ओळखता येईल. आपल्या कमतरतेवर मात करण्याचे उपाय शोधावे व आपला व्यक्तिमत्व विकास साधता येईल, असे प्रतिपादन देहरादून येथील डून विद्यापीठाचे माजी कुलगुरु तथा नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक (अभि.) प्रा. डॉ. गजेंद्र सिंह यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे आयोजित भारतीय कृषि अभियंता संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. भारतीय कृषी अभियंता संस्था, परभणी शाखा आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले होते. यावेळी व्यासपीठावर मा. कुलगुरु डॉ. इंद्र मणी, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. यु.एम.खोडके, विभाग प्रमुख अपारंपरिक उर्जा डॉ. आर.टी. रामटेके, विभाग प्रमुख डॉ.आर.जी. भाग्यवंत आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. डॉ. गजेंद्र सिंह पुढे म्‍हणाले की, शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांनी इतर व्यक्तीमत्व विकासाच्या बाबींमध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्यामुळे समूहात राहतांना आपल्याला त्याचा उपयोग होतो. भविष्यातील कृषी क्षेत्रातील आव्हानांना कृषी अभियांत्रिकी विद्या शाखा उपाय शोधू शकते. कृषी अभियंत्यांनी कुठल्याहि परिस्थितीत आपण कमी असल्याची भावना ठेवू नये आणि शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी ज्या क्षेत्रात कार्यरत असाल त्या क्षेत्राद्वारे आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.  

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा डॉ. इन्‍द्र मणि म्हणाले की, भविष्यातील शेती ही अभियांत्रीकीची शेती असणार आहे. त्यामुळे पुढील २० वर्षांच्या शेतींच्या गरजांचे नियोजन करुन त्यावर संशोधन करण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात भारतीय कृषि अभियंता संस्थेच्या परभणी शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. यु.एम. खोडके यांनी कृषि अभियांत्रीकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या प्रगतीचा आढावा घेतला व या संस्थेच्या परभणी शाखेमार्फत आगामी काळात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. आर. टी. रामटेके यांनी करुन दिली तर सुत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे यांनी केले. आभार डॉ. आर.जी. भाग्यवंत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. सुभाष विखे, प्रा. एल.व्ही. राऊतमारे, इंजि. दिपक राऊत आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास संस्थेचे सभासद, महाविद्यालयातील  विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी ई. मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. गजेंद्र सिंग हे भारतीय कृषी अभियंता संस्थेचे २००८ ते २०१० या काळात राष्ट्रीय अध्यक्ष होते तर विद्यमान कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि हे २०१८ ते २०२१ या काळात राष्ट्रीय अध्यक्ष होते. यावेळी त्यांचा परभणी शाखेतर्फे  सत्कार सुद्धा करण्यात आला.

प्रा. गजेंद्र सिंग यांनी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि अन्नतंत्र महाविद्यालय येथील विविध विभाग आणि प्रकल्प कडधान्य व तेलबिया प्रक्रिया केंद्र, औजारे तपासणी व प्रशिक्षण केंद्र, पशुशाक्तीचा योग्य वापर योजना आणि अन्नतंत्र महाविद्यालयातील फळे व भाजीपाला प्रक्रिया केंद्र आदी ठिकाणी भेटी दिल्‍या. यावेळी संबधित विभागात संशोधन व शिक्षण कार्य करीत असलेल्या पदव्‍युत्‍तर व आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थांशी संवाद साधला. विद्यार्थांचे संशोधन प्रकल्पामध्ये प्रा. गजेंद्र सिंग यांनी विशेष रस घेतला आणि विद्यार्थांचे संशोधन प्रकल्प मध्ये सुधारणे साठी सूचना सुद्धा केल्या.






Sunday, November 20, 2022

किटकनाशकांची फवारणी करतांना शेतकरी बांधवांनी सुरक्षतेच्‍या उपाय योजना करव्‍यात ....... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित किटकनाशकांचा सुरक्षित न्‍याय वापर कार्यशाळा संपन्‍न

देश स्‍वातंत्र झाला त्‍यावेळी ५० दशलक्ष टन अन्‍नधान्‍य उत्‍पादन होते, आज देशात ३०० दशलक्ष टनापेक्षा जास्‍त अन्‍नधान्‍य उत्‍पादन होते, हे सर्व शेतकरी बांधव यांची कठोर मेहनत, कृषि तंत्रज्ञान आणि शासनाचे धोरण यामुळे साध्‍य करू शकलो. आज रासायनिक किटकनाशकाचा अयोग्‍य व अति वापरामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्‍यावर विपरित परिणाम होत आहे. शेतीत रासायनिक निविष्‍ठाचा शिफारशीप्रमाणे काटेकारपणे वापर आवश्‍यक असुन रासायनिक किटकनाशकांची फवारणी करतांना सुरक्षितताच्‍या दृष्‍टीने अनेक वेळा दुर्लक्ष होते. राज्‍यातील काही भागात किटकनाशकांचा दुष्‍परिणामामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. शेतकरी बांधवांनी फवारणी करितांना सुरक्षतेच्‍या उपाय योजना करणे अत्‍यंत आवश्‍यक असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात गुरूग्राम (हरियाणा) येथील किटकनाशक निर्मिती तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या वतीने दिनांक १९ नोव्‍हेंबर रोजी पीक उत्‍पादनात किटकनाशकांचा सुरक्षित न्‍याय वापर आणि नवीन किटकनाशक घटकांचा उपयोग यावरील कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, कार्यशाळेच्‍या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणुन संस्‍थेचे संचालक डॉ. जितेंद्र कुमार आणि जिल्‍हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल या उपस्थित होत्‍या. व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ एन ए शकील, निर्माण तज्ञ डॉ अमरीश अग्रवाल, शास्‍त्रज्ञ श्री सुदिप मिश्रा, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ पी एस नेहरकर, डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, येणारे युग हे डिजिटल तंत्रज्ञानाचे आहे, ड्रोन व्‍दारे किटकनाशकांची योग्‍य पध्‍दतीने फवारणी केल्‍यास कमी किटकनाशक मात्रेत प्रभावी किड व्‍यवस्‍थापन शक्‍य होणार आहे. परभणी जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या माध्‍यमातुन लवकरच कृषी विद्यापीठाव्‍दारे सहाशे युवकांना विविध कृषि तंत्रज्ञानात कौशल्‍य विकासाकरिता विशेष प्रशिक्षणाची सुरूवात करण्‍यात येणार आहे, याकरिता जिल्‍हाधिकारी श्रीमती आंजल गोयल यांनी विशेष निधी उपलब्‍ध करून दिला आहे.   

जिल्‍हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल म्‍हणाल्‍या की, कृषि विद्यापीठाने संशोधनाच्‍या आधारे विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकरी बांधवानी आत्‍मसाद करावे. आज हवामान बदलाचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे, पिक पध्‍दतीत बदल होत आहे. रासायनिक खते व किटकनाशकांचा योग्‍य वापर करणे अत्‍यंत गरजेचे असुन अन्‍यथा पर्यावरणावर -हास होण्‍यास याच बाबी कारणीभुत ठरतील.

मार्गदर्शनात संचालक डॉ. जितेंद्र कुमार म्‍हणाले की, गुरूग्राम (हरियाणा) येथील किटकनाशक निर्मिती तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या ही कीटकनाशके तयार करण्यासाठी आणि विश्लेषणात्मक संशोधन आणि विकासासाठी एक नामांकित संस्था आहे. पर्यावरण आणि वापरकर्त्यांना अनुकूल कीटकनाशके आणि त्यांचे अवशेष विकसित करते. अनेक वनस्‍पतीजन्‍य किटकनाशके योग्‍य वेळी वापरल्‍यास रासायनिक किटकनाशकांचा वापर मर्यादीत करणे शक्‍य होते, असे ते म्‍हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ देवराव देवसरकर म्‍हणाले की, अनेक किटकनाशके ही बिषारी असतात, ते अत्‍यंक काळजीपुर्वक वापरावी लागतात, याचे ज्ञान शेतकरी बांधवा असणे आवश्‍यक आहे. सुत्रसंचालन डॉ सुनिता पवार यांनी केले तर आभार डॉ अमरीश अग्रवाल यांनी मानले.

तांत्रिक सत्रात नवीन किटकनाशक घटकांचा वापर यावर डॉ अमरीश अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले तर किटकनाशकांचा सुरक्षित न्‍यायिक वापर यावर श्री सुदिप मिश्रा, शेतीतील चांगल्‍या कृती यावर डॉ जी पी जगताप, किट व्‍यवस्‍थापनातील मुलभुत तत्‍वे यावर डॉ अनंत लाड, सेंद्रीय शेतीवर डॉ आनंद गोरे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित शेतकरी बांधवाना फवारणी सुरक्षा किटचे वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमास मराठवाडयातील ३०० पेक्षा जास्‍त शेतकरी बांधव उपस्थित होते.