Friday, June 28, 2013

मराठवाडा विभागासाठी एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये या आठवडयात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलका पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २९.० ते ३४.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान १८.० ते २४.० अंश सेल्‍सीअस राहील. वारे ताशी १३.० ते १९.० कि.मी. प्रति तास वेगाने नैऋत्‍य दिशेने वाहतील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७०.० ते ७९.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८.० ते ५६.० टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात  आकाश ढगाळ राहून हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. तसेच उगवुन आलेल्‍या खरीप पिकांवर रसशोषक व पाने खाणा-या किडीचा प्रादूर्भाव वाढण्‍याची शक्‍यता आहे.

कृषि सल्‍ला

सोयाबीनची पेरणी या आठवडयातच पूर्ण करावी. पेरणीसाठी एमएयुएस-७१, जेएस-३३५, एमएयुएस-१५८ या पैकी एका वाणाची निवड करावी. बियाण्‍यास रायझोबीयम व पीएसबी जैविक खताची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी.

डाळिंबाची लागवड करावयाची असल्‍यास उत्‍तम निचरा होणा-या हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरूपाच्‍या जमीनीची निवड करावी. डाळिंबाची लागवड ६० x ६० x ६० सें.मी. आकाराच्‍या खडयात ५ x ५ मिटर अंतरावर करावी. लागवडी सोबत २१ किलो शेणखत व १ किलो सुपर फॉस्‍फॅटचा वापर करावा. लागवडी सोबत प्रति खडा ५० ग्रॅम लींडेन पावडरचा अथवा इतर बुरशीनाशकाचा वापर करावा.       

चिकु फळपिकाच्‍या नविन कलमांची लागवड १०x१० मी. अंतरावर करावी. यासाठी कालीपत्‍ती, पीलीपत्‍ती, किक्रेटबॉल, छत्री इत्‍यादी पैकीएका वाणाची निवड करावी. लागवडीसोबत १ किलो सिंगल सुपर फॉस्‍फेट प्रति झाड वापर करावा. तसेच फुटलेल्‍या कलमावरील कोवळया पाणावरील रषशोषक किडींचा बंदोबस्‍त करावा.

जनावरांच्‍या अंगावरील व गोठयातील नियंत्रणासाठी करंज तेल, नीमतेलाचा वापर करावा. जनावरांच्‍या शरीरावर हिवाळा किंवा इतर कुठल्‍याही ऋतूमध्‍ये घाग-या गोचिडांची लागण प्रमाणाबाहेर होत असते. अशा वेळेस वनस्‍पतिजन्‍य गोचिडनाशकांचा वापर करावा. जनावरांचा गोठा मेटारायीझम द्रावणानी फवारून घ्‍यावा.

सौजन्य
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला सेवा योजना
कृषि हवामानशास्‍त्र विभाग, म.कृ.वि., परभ्‍णी
पञक क्रमांकः २३                                      
दिनांकः २८.०६.२०१३

Wednesday, June 26, 2013

कृषि हवामान विभागनिहाय अभ्‍यासगटाची मराठवाड्यातील जिल्‍ह्यात कार्यशाळा मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्न



हिंगोली

हिंगोली
औरंगाबाद  
राज्‍यातील 83 टक्‍के क्षेत्र कोरडवाहू असून राज्‍यात पर्जन्‍यमान, जमीन व हवामानानुसार नऊ कृषि हवामान विभाग आहेत. कृषि उत्‍पादनात स्थिरता येण्‍यासाठी कृषि हवामान विभागनिहाय संशोधन करुन त्‍या-त्‍या विभागासाठी अनुकूल पिक पध्‍दती, पिकांच्‍या जाती, मृद व जल संधारणाचे उपचार, कृषि प्रक्रिया व विपणन यासाठी स्‍वतंत्र धोरण निश्चित करण्‍यासाठी राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठांच्‍या कुलगुरूंच्‍या अध्‍यक्षतेखाली कृषि व पणन मंत्री मा. ना. श्री राधाकृ‍ष्‍ण विखे-पाटील यांचे सूचनेनुसार अभ्‍यासगट स्‍थापन करण्‍यात आले आहेत. मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अंतर्गत असलेल्‍या आठ जिल्‍ह्यासाठी मा. कुलगुरु डॉ. के. पी. गोरे यांचे अध्‍यक्षतेखाली नुकतीच हिंगोली, परभणी जालना व औरंगाबाद येथे अभ्‍यासगटाची कार्यशाळा संपन्‍न झाली.
सदरील बैठकीत मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के. पी. गोरे म्‍हणाले कि, कृषि हवामान विभागनिहाय अभ्‍यासगटातील कार्यशाळेतील चर्चा अत्‍यंत महत्‍वाची असून या चर्चातील महत्‍वाच्‍या बाबीं राज्‍याचे कृषि धोरण ठरविण्‍यास मार्गदर्शक ठरणार आहे. हवामान बदलामुळे शेतक-यांना बदलाव लागेल, पिक पध्‍दतीत बदल करावे लागतील. प्रत्येक शेतक-यांनी शेती जोडधंदे करावेत असा सल्‍ला ही त्‍यांनी दिला.
या अभ्‍यासगटाच्‍या कार्यशाळेत एकुण 14 विषयावर सखोल चर्चा करण्‍यात आली. त्‍यात प्रामुख्‍याने पिक पध्‍दती, पिकाच्‍या जाती, लागवड पध्‍दती, पिक उत्‍पादन वाढीसाठी तंत्रज्ञान या विषयावर चर्चा करण्‍यात आली. तसेच कृषि विकासासाठी सध्‍या कार्यरत असलेल्‍या योजनांची कार्यपध्‍दती, आवश्‍यक नवीन कार्यपध्‍दती, मृद व जलसंधारण उपचार व त्‍याचे मापदंड, तांत्रिक निकष, शेतीची उपलब्‍ध आवश्‍यक माहिती, मत्‍स्‍य व्‍यवसाय, शेळी-मेंढी व्‍यवसाय, कुक्‍कुटपालन, वराहपालन, ससेपालन इत्‍यादी कृषि जोडधंद्याचा या विभागातील वाव व वाढीचा अभ्‍यास, दुग्‍ध व्‍यवसायाची सध्‍याची स्थिती व भविष्‍यातील वाव, कृषि माल साठवणुक व त्‍याची जोपासना करणे, कृषि यांत्रीकीकरण, पिक विमा, शासनाच्‍या विविध कृषि योजनांची प्रभावी अमलबजावणी, जमिनीचे आरोग्‍य, फळे-भाजीपाला उत्‍पादन अशा विविध विषयावर सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली. तसेच उपस्थित शेतक-यांकडून विविध कृषि विषयावरील प्रतिक्रिया व सुचना नोंदविण्‍यात आल्‍या.
      शेतमालाच्‍या मुल्‍यवर्धीत प्रक्रियेबाबत शेतक-यांना काळानुरुप प्रशिक्षणाची आवश्‍यकता असून ठिबक सिंचनास जास्‍तीचे अनुदान, सेंद्रीय शेत मालासाठी बाजारपेठेची उपलब्‍धता तसेच प्रत्‍येक गावात स्‍वयंचलित हवामान केंद्राची आवश्‍यकता असल्‍याची मत उपस्थित कृषि विभागातील अधिकारी व शेतक-यांनी व्‍यक्‍त केली.
     सदरील कार्यशाळेतील महत्‍वाच्‍या बाबी व सुचना राज्‍यशासनास सादर करण्‍यात येणार असून याचा उपयोग पुढील कृषि धोरण ठरविण्‍यास मदत होणार आहे.
           या बैठकीस संबंधीत जिल्‍ह्याच्‍या जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्‍ह्यातील सर्व तालुका स्‍थरावरील कृषि अधिकारी व आत्‍माचे अधिकारी, विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ आणि कृषि विज्ञान केंद्राचे अधिकारी, शेतक-यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Tuesday, June 25, 2013

मराठवाडा विभागासाठी कृषी हवामान सल्‍ला

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश अंशतः ढगाळ राहून तुरळ ठिकाणी पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २४.० ते ३१.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २०.० ते २३.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी १२.० ते २२.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८.० ते ९३.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४९.० ते ८६.० टक्‍के राहील.
विशेष सुचना : या आठवडयात  आकाश अंशतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे.

  • तीळाची पेरणी ४५ x १५ सें.मी. अंतरावर करावी. तीळाचे पिकास ५०:२०:० खताच्‍या मात्रा पैकी अर्धे नत्र व संपूर्ण स्‍फुरद पेरणी सोबत द्यावे व उर्वरीत अर्धे नत्र ३० दिवसानी द्यावे. या आठवडयात पेरणी आटोपून घ्‍यावी. 
  • खोडवा पिकाची बांधणी करून खताची शेवटची मात्रा १०० कि. ग्रॅम नत्र, ५५ कि. ग्रॅम. स्‍फुरद व ५५ कि.ग्रॅम पालाश प्रति हेक्‍टर द्यावे. सद्यस्थितीत खत देण्‍यास हवामान स्थिती चांगली आहे.  
  • तुरीची पेरणी ९० x २० सें.मी. अंतरावर करावी. याकरीता बीएसएमआर-७३६, बीएसएमआर-८५३ व कमी पावसाचे ठिकाणी बिडीएन-७११ या वाणाची निवड करावी. 
  • रसशोषण करणा-या तसेच अळीवर्गीय किडीचा प्रादुर्भाव पुढील आठवडयात वाढु शकतो. याकरीता उपयोजना करण्‍यासाठी पुर्व तयारी करावी. नवीन फळबाग लागवड केलेल्‍या अथवा एक-दोन वर्षाच्‍या फळझाडांना काठीचा भक्‍कम आधार दयावा. नवीन फळबाग लागवड करण्‍यासाठी उन्‍हाळयात उपलब्‍ध होउ शकणा-या पाण्‍याचा अंदाज घेवूनच लागवड करावी.  
  • पेरूच्‍या बागेस प्रती झाड ५० किलो शेणखत व ८०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्‍फुरद व पालाश देउन मातीत चांगले मिसळुन घ्‍यावे. खताची मात्रा या आठवडयातच दयावी. नवीन फळबाग लागवड करण्‍यासाठी उन्‍हाळयात उपलब्‍ध होउ शकणा-या पाण्‍याचा अंदाज घेवूनच लागवड करावी.
  • अंजीरची नविन लागवड ५x५ मीटर अंतरावर करावी. लागवडीसाठी बैंगलोर, दिनकर, पुणे अंजीर या पैकी एका वाणाची निवड करावी. लागवडी सोबत २० किलो शेणखत व १ ते १.५ किलो सुपर फॉस्‍फेट प्रति झाड वापरावे. नवीन फळबाग लागवड केलेल्‍या अथवा एक-दोन वर्षाच्‍या फळझाडांना काठीचा भक्‍कम आधार दयावा. नवीन फळबाग लागवड करण्‍यासाठी उन्‍हाळयात उपलब्‍ध होउ शकणा-या पाण्‍याचा अंदाज घेवूनच लागवड करावी.
  • सिताफळाचे बागेस १५ किलो शेणखत २५० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्‍फुरद व १२५ ग्रॅम पालाश खताची मात्रा प्रती झाड  दयावी. या पैकी संपूर्ण स्‍फुरद, पालाश व अर्धे नत्र फलधारणा होताच द्यावे. नवीन फळबाग लागवड केलेल्‍या अथवा एक-दोन वर्षाच्‍या फळझाडांना काठीचा भक्‍कम आधार दयावा. नवीन फळबाग लागवड करण्‍यासाठी उन्‍हाळयात उपलब्‍ध होउ शकणा-या पाण्‍याचा अंदाज घेवूनच लागवड करावी.
  • झेंडू, जिलार्डीया, निशिगंध, काकडा मोगरा, गुलाब इत्‍यादी फुल पिकाची लागवड करण्‍यास हा आठवडा अतिशय अनुकूल आहे.
  • पाळीव जनावरांना घटसर्प, फ-या, अंत्रविशार व शेळी मेंढी मध्‍ये बुळकांडी (पीपीआर) रोगाचे लसीकरण नजीकच्‍या पशुचिकित्‍सालयातुन करून घ्‍यावे. लसिकरणापुर्वी जंतनाशकाचे औषध पाजावे. जनावरांना स्‍वच्‍छ पाणी पाजावे.
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषी हवामान सल्‍ला सेवा योजना
पञक क्रमांकः २२                                                        
दिनांकः २५.०६.२०१३

Saturday, June 22, 2013

मराठवाडा कृषि विद्यापीठात तयार झालेला स्ट्रॉबेरी जॅमाची परदेशात झेप

प्रक्रिया केंद्रात स्‍ट्रॉबेरी जॅम तयार करण्‍यात येउन तो दुबाई पाठविण्‍यात येणा-या वाहनास मा. कुलगुरू डॉ. के. पी. गोरे यांच्‍या हस्‍ते हिरवा झेंडा दाखविताना, यावेळी डॉ. पी. एन. सत्‍वधर, मोहम्‍मद गौस, प्रा. दिलीप मोरे, प्रा. एच. एम. सययद, श्रीकांत जपे, शेख इम्रान आदी 


प्रक्रिया केंद्रात जॅम तयार करण्‍यात येतानाची माहिती घेतांना मा. कुलगुरू डॉ. के. पी. गोरे  यावेळी प्रा. दिलीप मोरे, मोहम्‍मद गौस, हैद्राबाद बँकेचे शाखा व्यवस्थापक श्रीकांत जपे  


     मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील अन्‍नतंत्र महाविद्यालयांत चार वर्षाचा बी. टेक. (अन्‍नतंत्र) पदवी अभ्‍यासक्रम आहे. या अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात चार महिने विद्यार्थ्‍याना प्रक्रिया ते मार्केटिंगपर्यतंचे कौशल्‍य शिकविले जाते. विद्यार्थी उद्योजक बनावा, हा या मागील हेतू आहे. अन्‍नप्रक्रिया उद्योगात नवनवीन संधी निर्माण होत आहेत. परभणी येथील अन्‍नतंत्र महाविद्यालय राज्‍यातील पहिले शासकीय महाविद्यालय 1976 मध्‍ये सुरू करण्‍यात आले. यातीलच एका माजी विद्यार्थ्‍याबरोबर सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रकल्‍प (पब्लिक प्रायव्‍हेट पार्टनरशिप – पीपीपी) प्रायोगिक तत्‍वावर यशस्‍वीपणे राबवून क्रांतिकारक पाउल उचलले आहे.  बी. टेक. (अन्‍नतंत्र) पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात (एकसपिरीएन्‍शल लर्निग प्रोग्रॅम) हा अभ्‍यासक्रम आहे. यात विद्यार्थ्‍यांना प्रक्रिया पदार्थ तयार करण्‍यासाठी कच्‍चा मालाच्‍या खरेदीपासून प्रतवारी, प्रक्रिया, पॅकिंग करून बनविलेल्‍या उत्‍पादनाच्‍या मार्केटिंगपर्यंतचे व्‍यवस्‍थापन करावे लागते. यासाठी नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेने विद्यापीठाला फळे व भाजीपाला प्रक्रिया युनिट मजुंर केले. यासाठी सुमारे एक कोटी वीस लाख रूपये खर्च झाला. युनिटमध्‍ये अनेक अद्ययावत यंत्रसामग्री आहे. सन 2010 मध्‍ये हे युनिट विद्यार्थ्‍यासाठी खुले करण्‍यात आले. या प्रक्रिया युनिटचा वापर अन्‍नतंत्र महाविद्यालयातील विद्यार्थी चार महिने करतात इतर कालावधीत मात्र बंद ठेवावे लागत असे. यातील मशिनरी मोठया असुन त्‍या चालविण्‍यासाठी त्‍या प्रमाणात कच्‍चा माल मिळणे अवघड आहे. परिणामी सर्व मशिनरी वापरात येत नसुन छोटयाच मशिनरी वापरल्‍या जात. विद्यापीठाला हे युनिट संपुर्ण वर्षभर पुर्ण क्षमतेने चालविणे शक्‍य नव्‍हते. विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के. पी. गोरे यांनी युनिट कायमस्‍वरूपी सुरू राहावे म्‍हणुन सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्‍प राबविण्‍याचे ठरविले. यासर्व बाबींचा विचार करून याच विद्यापीठाच्‍या अन्‍नतंत्र महाविद्यालयातुन बी. टेक. (अन्‍नतंत्र) ची पदवीधर असलेले उद्योजक मोहम्‍मद गौस यांच्‍या झैन नॅचरल अग्रो इंडिया प्रा. लि. सोबत हा प्रकल्‍प प्रायोगिक तत्‍वावर सुरू करण्‍यात आला. या प्रकल्‍पाचे उद्घाटन राज्‍याचे मुख्‍यमंत्री मा. ना. श्री. पृथ्‍वीराज चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते दि. 30 जुन रोजी झाले. या 22 दिवसात युनिट मध्‍ये 20 टन स्‍ट्रॉबेरी जॅम तयार करण्‍यात येउन तो दुबाई पाठविण्‍यात येणा-या मालवाहु वाहनास दि. 22 जुलै रोजी मा. कुलगुरू डॉ. के. पी. गोरे यांच्‍या हस्‍ते हिरवा झेंडा दाखविण्‍यात आला. यावेळी डॉ. पी. एन. सत्‍वधर, मोहम्‍मद गौस, प्रा. दिलीप मोरे, प्रा. एच. एम. सययद, श्रीकांत जपे, शेख इमरान आदी उपस्‍थीत होते.         या प्रसंगी कुलगुरू म्‍हणाले की, या प्रकल्‍पामुळे विद्यार्थ्‍यांना आंतरराष्ट्रिय दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच भविष्‍यात या भागात उद्योजकता विकासासाठी हातभार लाभणार आहे. त्‍यासाठी कच्‍चा माला निर्मीतीची संधी शेतक-यांना प्राप्‍त होईल. विद्यापीठाचे हे एक इतिहासीक पाउल ठरेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. या प्रकारचा सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्‍प राबविणारे राज्‍यातील पहिलेच कृषि विद्यापीठ आहे.
प्रकल्‍पाचे फायदे
  • सातव्‍या सत्रातील विद्यार्थ्‍याना कार्यानुभवातुन शिक्षण परिणामकारकपणे पुर्ण करू शकतील. विद्यार्थ्‍याचे उद्योजकीय कौशल्‍य वृ‍ध्‍दींगत होण्‍यास मदत होईल.
  • अन्‍नतंत्र विद्याशाखेतील पदवीधरांना आपला लघुउद्योग सुरू करण्‍यासाठी आत्‍मविश्‍वास प्राप्‍त होईल, हेच विद्यार्थी इतरांना देखील रोजगार पुरवु शकतील.
  • प्रक्रिया लघुउद्योगासाठी लागणारा कच्‍चा माला निर्मीतीची संधी या विभागातील शेतक-यांना प्राप्‍त होईल.
  • भविष्यात याच धरतीवर व्‍यावसायिक व प्रायोगिक तत्‍वावर खाजगी व बहुराष्‍ट्रीय उद्योगांचे संशोधन प्रकल्‍प हाती घेण्‍यास मदत होईल.
  • कमवा व‍ शिका उपक्रम अत्‍यंत प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्‍यांना आर्थिक मदत मिळेल.
  • या प्रकल्‍पातुन तयार केलेले विविध प्रक्रियायुक्‍त अन्‍नपदार्थाच्‍या बाजारपेठ व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन लाभेल.
  • मराठवाडयातील अन्नप्रक्रिया लघुउद्योजकांना तांत्रिक सल्‍ला या प्रात्‍यक्षिकातुन देण्‍यासाठी याचा उपयोग होईल.
  • करार पध्‍दतीने फळे व भाजीपाला पिकवुन त्‍यापासुन मुल्‍यवर्धीत अन्‍नपदार्थ निर्मितीसाठी हा प्रकल्‍प या भागातील उद्योजकांसमोर व शेतक-यांसमोर मॉडेल ठरेल.
           हा प्रकल्‍प राबविण्‍यासाठी विद्यापीठाचे शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे मार्गदर्शनाखाली डॉ. व्‍ही. एन. पवार, डॉ. पी. एन. सत्‍वधर, प्रा. दिलीप मोरे, प्रा. एच. एम. सय्यद, प्रा. आर. बी. क्षीरसागर, प्रा. के. एस. गाडे, डॉ हेमंत देशपांडे, इम्रान हाश्मी यांचे सहकार्य लाभले.

Friday, June 21, 2013

मराठवाडयाकरिता कृषी हवामान सल्‍ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये या आठवडयात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलका पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २९.० ते ३४.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २३.० ते २५.० अंश सेल्‍सीअस राहील. वारे ताशी १३.० ते २०.० कि.मी. प्रति तास वेगाने पश्चिम दिशेने वाहतील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५.० ते ७९.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३७.० ते ५३.० टक्‍के राहील.

विशेष सुचना - या आठवडयात  आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्‍या स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. तसेच उगवुन आलेल्‍या खरीप पिकांवर पाने खाना-या किडीचा प्रादूर्भाव वाढण्‍याची शक्‍यता आहे.                

कृषी सल्‍ला 

पेरणी योग्‍य पाउस झालेल्‍या ठिकाणी सोयाबीनची पेरणी या आठवडयात पूर्ण करावी. पेरणीसाठी एमएयुएस-७१, जेएस-३३५, एमएयुएस-१५८ या पैकी एका वाणाची निवड करावी. बियाण्‍यास रायझोबीयम व पीएसबी जैविक खताची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी.

बाजरीची पेरणी या आठवडयात पुर्ण करावी. हेक्‍टरी ३‍ किलो बियाण्‍याचा वापर करावा. पेरणी करताना बियाण्‍यात दानेदार खत मिसळुन पेरल्‍यास बीयाने योग्‍य अंतरावर पडून रोपांची संख्‍या प्रति हेक्‍टरी अधिक होणार नाही. पेरणीसाठी जीएचबी-५५८, सध्‍दा, सबुरी व एएचबी-१६६६ या पैकी एका वाणाची निवड करावी.

मुग/उडीदाची पेरणी या आठवडयात पूर्ण करावी. पेरणीसाठी मुगाचे बीएम-२००२-१, बीएम-२००३-२, एकेएम-४ व ग्रीनगोल्‍ड तर उडीदाचे बीडीयु-१ व टीएयु-१ या पैकी एका वाणाची निवड करावी. बियाण्‍यास रायझोबीयम व पीएसबी जैवीक खताची प्रक्रिया करावी. 

हळद व आले पिकाची लागवड या आठवडयात पूर्ण करावी. हळद लागवडीसाठी सेलम, कृष्‍णा व लोखंडी तर आलेच्‍या माहिम, जानेडोरीओदो, सुरूची किंवा सुप्रभा या पैकी एका वाणाची निवड करावी. लागवडीपूर्वी बेणे बावीष्‍टीनच्‍या द्रावणात बुडवूण घ्‍यावे. हळद व आल्‍याची लागवड ६० x ३० सेंमी अंतरावर करावी. लागवडी सोबत १५०:५०: ५० (नत्र: स्‍फुरद: पालाश) रासायनिक खताची मात्रा दयावी.    

डाळिंबाची लागवड करावयाची असल्‍यास उत्‍तम निचरा होणा-या हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरूपाच्‍या जमीनीची निवड करावी. डाळिंबाची लागवड ६० x ६० x ६० सें.मी. आकाराच्‍या खडयात ५ x ५ मिटर अंतरावर करावी. लागवडी सोबत २० किलो शेणखत व १ किलो सुपर फॉस्‍फॅटचा वापर करावा. लागवडी सोबत प्रति खडा ५० ग्रॅम लींडेन पावडरचा वापर करावा.
      
चिकुचे नविन कलमांची लागवड १०x१० मी. अंतरावर करावी. यासाठी कालीपत्‍ती, पीलीपत्‍ती, किक्रेटबॉल, छत्री इत्‍यादी पैकीएका वाणाची निवड करावी. लागवडीसोबत १ किलो सिंगल सुपर फॉस्‍फेट प्रति झाड वापर करावा.

या आठवडयात बोरीची कलमीकरण करून घ्‍यावे. कलमीकरणासाठी उमराण, गोला, कडाका, सनुर-६, छुवारा, इलायची, मुक्‍ता या पैकी वाणाची निवड करावी. 

मे महिन्‍यात तयार करण्‍यात आलेल्‍या मीरचीच्‍या रोपांची या आठवडयात पूनरलागवड करावी. मीरचीची रोपे लागवडी पूर्वी किटकनाशक व बुर्शीनाशकाचे द्रावणात बुडवुनच लागवड करावी.

गोचीडांचा प्रादूर्भाव वाढुनये म्‍हणून जनावरांची गोटे मेटारायीझमचे द्रावणानी फवारून घ्‍यावीत.

सौजन्य 
केंद्र प्रमुख
कृषी हवामानशास्त्र विभाग
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी 
पञक क्रमांकः २१         
दिनांकः २१.०६.२०१३ 



Friday, June 14, 2013

मराठवाडा विभागासाठी कृषी हवामान सल्‍ला

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये या आठवडयात आकाश पुर्णतः ढगाळ राहून मध्‍यम ते जोरदार स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २७.० ते ३३.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २०.० ते २४.० अंश सेल्‍सीअस राहील. वारे ताशी १२.० ते २३.० कि.मी. प्रति तास वेगाने नैऋत्‍य दिशेने वाहतील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६९.० ते ८७.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३.० ते ७७.० टक्‍के राहील.

विशेष सुचना या आठवडयात  आकाश पुर्णतः ढगाळ राहून जोरदार स्‍वरूपाचा नैऋत्‍य मौसमी पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.              

कृषी सल्‍ला 
पेरणी योग्‍य पाउस झाला असल्‍यास या आठवडयात सोयाबीनची पेरणी करावी. पेरणीसाठी एम.ए.यु.एस-७१, जे.एस.-३३५, एम.ए.यु.एस-१५८ या पैकी एका वाणाची निवड करावी. पेरणीपुर्वी बियाण्‍यास रायझोबीयम व पी एस बी जैविक खताची प्रक्रिया करावी.

पेरणी योग्‍य पाउस झाला असल्‍यास या आठवडयात बाजरीची पेरणी पुर्ण करावी. पेरणी ४५ x १५ सें.मी.अंतरावर करावी. पेरणी सोबत ४०:२०: २० (नत्र: स्‍फुरद: पालाश) रासायनिक खताची संपूर्ण मात्रा द्यावी. पेरणीसाठी जीएचबी-५५८, सध्‍दा, सबुरी व एएचबी-१६६६ या पैकी एका वाणाची निवड करावी.

मुगाचे लागवडीसाठी मध्‍यम ते भारी जमीनीची निवड करावी. पेरणी योग्‍य पाउस होताच मुगाची पेरणी ३० x १० सें.मी. अंतरावर करावी. पेरणीसाठी बीएम-२००२-१, बीएम-२००३-२ तसेच एकेएम-४ व ग्रीनगोल्‍ड या पैकी एका वाणाची निवड करावी. पेरणी पुर्वी बियाण्‍यास रायझोबीयम व पीएसबी जैवीक खताची प्रक्रिया करावी. 

हळद व आले पिकाची लागवड या आठवडयात पूर्ण करावी. हळद लागवडीसाठी सेलम, कृष्‍णा व लोखंडी तर आलेच्‍या माहिम, जानेडोरीओदो, सुरूची किंवा सुप्रभा या पैकी एका वाणाची निवड करावी. लागवडीपूर्वी बेणे बावीष्‍टीनच्‍या द्रावणात बुडवूण घ्‍यावे. हळद व आल्‍याची लागवड ६० x ३० सेंमी अंतरावर करावी. लागवडी सोबत १५०:५०: ५० (नत्र: स्‍फुरद: पालाश) रासायनिक खताची मात्रा दयावी.    

केळीची मृगबाग लागवड मध्‍यम ते भारी जमीनीत सद्या करायला हरकत नाही. या करिता ग्रॅडनाईन, अर्धापुरी, बसराई व श्रीमंती या पैकी एका वाणाची निवड करावी. लागवडीपूर्वी बेणे बाविष्‍टीनच्‍या चे द्रावणात बुडवून घ्‍यावे. केळीचे पिकास प्रति झाड १६० ग्रॅम स्‍फुरद व २०० ग्रॅम पालाश लागवडीच्‍या वेळी दयावे. तसेच २०० ग्रॅम नत्र लागवडीनंतर तीन समान भाग करून २,३ व ४ महिन्‍याने द्यावे. 

डाळिंबाची लागवड करावयाची असल्‍यास उत्‍तम निचरा होणा-या हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरूपाच्‍या जमीनीची निवड करावी. डाळिंबाची लागवड ६० x ६० x ६० सें.मी. आकाराच्‍या खडयात ५ x ५ मिटर अंतरावर करावी. लागवडी सोबत २० किलो शेणखत व १ किलो सुपर फॉस्‍फॅटचा वापर करावा. लागवडी सोबत प्रति खडा ५० ग्रॅम लींडेन पावडरचा वापर करावा.       

निशिगंध व झेंडूची लावगवड करावी. निशिंगधाच्‍या सिंगल व डबल जातीची निवड करावी. तर झेंडूच्‍या बेंगलोर लोकल, परभणी लोकल, ऑरेंज क्रॅश या जातीची निवड करावी. निशिंगाधाची लागवड २० x २० सें.मी. तर झेंडूची लागवड ४५ x ३० अंतरावर करावी.

पशुधनाच्‍या अरोग्‍यासाठी या आठवडयातच घटसर्प, फ-या, अंत्रविशार व शेळी मेंढी मध्‍ये बुळकांडी (पीपीआर) रोगाचे लसीकरण नजीकच्‍या पशुचिकित्‍सालयातुन करून घ्‍यावे. लसिकरणापुर्वी जंतनाशकाचे औषध पाजावे.

केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषी हवामान सल्‍ला सेवा योजना
पञक क्रमांकः १९                                               
दिनांकः १४.०६.२०१३

Thursday, June 13, 2013

कृषि महाविद्यालयाचे कृषिदूत तंत्रज्ञान प्रसारणासाठी सज्‍ज


मार्गदर्शन करतांना सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार 
    मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असणा-या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या कृषि पदवीच्‍या सातव्‍या सत्रातील विद्यार्थ्‍याचा ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे उद् बोधन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 13-06-2013 रोजी कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहामध्‍ये करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार होते.
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमात कृषि महाविद्यालयांच्‍या सातव्‍या सत्रातील 170 विद्यार्थी असून ते परभणी तालुक्‍यातील निवडलेल्‍या 17 गावामध्‍ये पुढील 20 आठवडे जाउन त्‍यांनी पदवी अभ्‍यासक्रमात आत्‍मसात केलेले कृषीचे ज्ञान व कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले नवीन तंत्रज्ञान व विविध पिकांच्‍या जाती तसेच रोग व किड नियंत्रण या विविध विषयांबाबत पाल्‍य शेतक-यांसोबत विचारांची देवाणघेवाण करणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील शेतक-यांचे जीवनमान व त्‍यांचे कृषि क्षेत्रातील अनुभव याचा जवळून अभ्‍यास करण्‍यासाठी हा ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम पदवी अभ्‍यासक्रमात समाविष्‍ट करण्‍यात आलेला आहे. यामुळे विद्यार्थ्‍यांना कृषि विस्‍तार शिक्षणाचे कौशल्‍ये प्राप्‍त होणार आहे.
या प्रसंगी अध्‍यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार म्‍हणाले की, ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमामुळे कृषि पदवीधरांना शेतक-यांचे जीवनमान व त्‍यांच्‍या शेती करण्‍याच्‍या पध्‍दती जवळून पाहण्‍याची संधी प्राप्‍त होते. तसेच विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांमध्‍ये कशा पध्‍दतीने प्रसार करावा याबाबतचे विस्‍तार शिक्षणाच्‍या कौशल्‍याची माहीती होते. या सर्व कृषिदुतांनी निवडलेल्‍या 17 गावांमध्‍ये कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍याचा प्रयत्‍न करावा असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात कार्यक्रम समन्‍वयक तथा विभाग प्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे यांनी विद्यार्थ्‍यांना ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम राबविण्‍याबाबतचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.आर.पी. कदम यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. पी. आर. देशमुख यांनी केले.
      तांत्रीक सत्रामध्‍ये विविध विषयतज्ञ डॉ. ए. पी. सुर्यवंशी, डॉ. एस. जी. नरवाडे, प्रा. जी. डी. गडदे, प्रा. एस. डी. जेटुरे, प्रा. ए. डी. मोरे, प्रा. एस.एच.कांबळे, प्रा. मोहमद ईलीयास, डॉ. एल. एन. जावळे, प्रा. ए. एम. कांबळे व डॉ. पी. आर. देशमुख यांनी विद्यार्थ्‍यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

     कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. एन. जी. लाड, डॉ. जे. व्‍ही. एकाळे, डॉ. पी. एस. कापसे, श्री सी. एस. नखाते, श्री विठ्ठल खताळ, श्री जी. के. जोशी आदींनी परिश्रम घेतले. या प्रसंगी विविध संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. ए.एस. कारले, डॉ. बेग, डॉ. आळसे, डॉ. नारखेडे, डॉ. मोरे व कार्यक्रम अधिकारी प्रा.खोब्रागडे, प्रा. पवार, डॉ. प्रा. बडगुजर, डॉ. नागरगोजे, प्रा. एस.एस. शिंदे,  उपस्थित होते. 

Sunday, June 2, 2013

संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीच्‍या बैठकीत दहा नवीन वाणास मान्‍यता



महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यापर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा  मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची 41 वी बैठक नुकतीच परभणी येथे मराठवाडा कृषि विद्यापीठ संपन्‍न झाली. तीन दिवस झालेल्‍या शास्‍त्रज्ञांच्‍या या संशोधन समिती बैठकीत राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठांच्‍या एकुण 218 शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली. यामध्‍ये विविध दहा नवीन वाणास मान्‍यता देण्‍यात आली.
राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधीत केलेल्‍या सोयाबीनच्‍या फुले अग्रणी (केडीएस-344) हा अधिक उत्‍पादन  (25.24 क्विं प्रति हेक्‍टर)  देणारा  तसेच तांबेरा रोगास प्रतिकारक असणारा वाण राज्‍यात खरीप लागवडीसाठी प्रसारीत करण्‍यात आला तर भुईमुगाची फुले वारणा (केडीजी-128) हा अधिक उत्‍पादन (30.23 क्विं प्रति हेक्‍टर) देणारा निमपस-या वाण राज्‍यामध्‍ये खरीप हंगामात निमपस-या लागवड क्षेत्रासाठी प्रसारीत करण्‍यासाठी शिफारस करण्‍यात आली. तसेच  करडईचा फुले चंद्रभागा (एसएसएफ-748) या अधिक उत्‍पादन (बागायत 18.55 व जिरायत 11.84 क्विं प्रति हेक्‍टर) देणा-या वाणाची राज्‍यात लागवडीसाठी प्रसारीत करण्‍याची शिफारस करण्‍यात आली तर हिरव्‍या चा-यासाठी राज्‍यातील बागायती भागात उच्‍च दर्जाच्‍या हिरव्‍या चा-याच्‍या अधिक उत्‍पादनसाठी (585.05 क्विं प्रति हेक्‍टर) बहुवार्षिक मारवेल गवताच्‍या फुले गोवर्धन (मारवेल 2008-1) वाणाची प्रसारीत करण्‍यात आले. तसेच ज्‍वारी एसपीव्‍ही-2057 (आरएसएसव्‍ही-167) या अधिक उत्‍पादन देणारा (443.4 क्विं प्रति हेक्‍टर) हा वाण खरीप हंगामासाठी महाराष्‍ट्रासह राजस्‍थान, हरियाणा, पंजाब, उत्‍तराखंड, उत्‍तरप्रदेश, कर्नाटक व तामिळनाडु या प्रदेशासाठी एककापणीकरता प्रसारीत करण्‍यात आला.
परभणी येथील मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कापसाच्‍या दोन व काबुली हरभराचा एक वाणाची शिफारशींना मान्‍यात देण्‍यात आली. काबुली हरभरा बीडीएनजीके-798 राज्‍यात लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आला. हा वाण राज्‍यात तुल्‍यबळ वाण विराट, काक-2, पीकेव्‍हीके-4 आणि कृपापेक्षा बीडीएनजीके-798 या वाणने जास्‍त उत्‍पादन दिल्‍याचे आढळुन आले असुन मर रोगास प्रतिकारक्षम आढळुन आल्‍यामुळे या वाणाची राज्‍यात लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आली. तसेच कापुस या पिकाचा अमेरिकन संकरीत वाण एनएचएच-206 हा अधिक उत्‍पादन देणारा, धाग्‍याची उच्‍च गुणवत्‍ता असलेला व तुडतुडया करीता प्रतिकारक वाण राज्‍यातील कोरडवाहु लागवडीसाठीची शिफारस करण्‍यात आली तर देशी कापसाच्‍या पीए-528 हा वाण तुल्‍यवाणापेक्षा अधिक उत्‍पादन देणारा असुन सरस धागा, रसशोषक किडी, बोंडअळी, कडा करपा व दहिया रोगास सहनशील असुन हा वाण मराठवाडा विभागातील मध्‍यम जमिनीसाठी शिफारस करण्‍यात आली आहे.
फळपिकांमध्‍ये महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधीत केलेले डाळिंबाचे वाण फुले भगवा सुपर (सिलेक्‍शन-4) हा वाण जास्‍त उत्‍पादन क्षमता, गर्द केशरी रंग, फळांचा मध्‍यम आकार, चकाकरणारी जाड साल गर्द लाल रंगाचे टपोरे रसाळ दाणे अशा वैशिष्‍टपुर्ण गुणधर्म असणा-या निवड पध्‍दतीने विकसीत केलेल्‍या या वाणाची राज्‍यात लागवडीसाठी प्रसारीत करण्‍यात आली आहे.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषि विद्यापीठाने संशोधीत केलेल्‍या कोथींबीरींचा कोकण कस्‍तुरी (DPL-COR.1) हा वाण अधिक उत्‍पादन व सुगंधी वास असणारा वाण कोकण विभागात रब्‍बी व उन्‍हाळी हंगामामध्‍ये लागवडीसाठी प्रसारीत करण्‍यात आला आहे.
यात 12 विविध पिकांचे वाण, 9 शेती औजारे व यंत्रे तसेच 197 इतर तंत्रज्ञान शिफारशीचा समावेश आहे. मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या एकुण 44 शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली. यात 3 शेतपीके वाण, 5 शेती यंत्रे व औजारे व 36 इतर तंत्रज्ञान शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली.
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कापसाच्‍या दोन व काबुली हरभराचा एक वाणाची शिफारशींना मान्‍यात देण्‍यात आली. काबुली हरभरा बीडीएनजीके-798 राज्‍यात लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आला. हा वाण राज्‍यात तुल्‍यबळ वाण विराट, काक-2, पीकेव्‍हीके-4 आणि कृपापेक्षा बीडीएनजीके-798 या वाणने जास्‍त उत्‍पादन दिल्‍याचे आढळुन आले असुन मर रोगास प्रतिकारक्षम आढळुन आल्‍यामुळे या वाणाची राज्‍यात लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आली. तसेच कापुस या पिकाचा अमेरिकन संकरीत वाण एनएचएच-206 हा अधिक उत्‍पादन देणारा, धाग्‍याची उच्‍च गुणवत्‍ता असलेला व तुडतुडया करीता प्रतिकारक वाण राज्‍यातील कोरडवाहु लागवडीसाठीची शिफारस करण्‍यात आली तर देशी कापसाच्‍या पीए-528 हा वाण तुल्‍यवाणापेक्षा अधिक उत्‍पादन देणारा असुन सरस धागा, रसशोषक किडी, बोंडअळी, कडा करपा व दहिया रोगास सहनशील असुन हा वाण मराठवाडा विभागातील मध्‍यम जमिनीसाठी शिफारस करण्‍यात आली आहे.

संयुक्तं कृषि संशोधन व विकास समितीच्या बैठकीत मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या 44 शिफारशींना मान्यता

महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यापर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा  मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची 41 वी बैठक नुकतीच परभणी येथे मराठवाडा कृषि विद्यापीठ संपन्‍न झाली. तीन दिवस झालेल्‍या शास्‍त्रज्ञांच्‍या या संशोधन समिती बैठकीत राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठांच्‍या एकुण 218 शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली. यात 12 विविध पिकांचे वाण, 9 शेती औजारे व यंत्रे तसेच 197 इतर तंत्रज्ञान शिफारशीचा समावेश आहे. मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या एकुण 44 शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली. यात 3 शेतपीके वाण, 5 शेती यंत्रे व औजारे व 36 इतर तंत्रज्ञान शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली.
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कापसाच्‍या दोन व काबुली हरभराचा एक वाणाच्या शिफारशींना मान्‍यात देण्‍यात आली. काबुली हरभरा बीडीएनजीके-798 राज्‍यात लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आला. हा वाण राज्‍यात तुल्‍यबळ वाण विराट, काक-2, पीकेव्‍हीके-4 आणि कृपापेक्षा बीडीएनजीके-798 या वाणने जास्‍त उत्‍पादन दिल्‍याचे आढळुन आले असुन मर रोगास प्रतिकारक्षम आढळुन आल्‍यामुळे या वाणाची राज्‍यात लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आली. तसेच कापुस या पिकाचा अमेरिकन संकरीत वाण एनएचएच-206 हा अधिक उत्‍पादन देणारा, धाग्‍याची उच्‍च गुणवत्‍ता असलेला व तुडतुडया करीता प्रतिकारक वाण राज्‍यातील कोरडवाहु लागवडीसाठीची शिफारस करण्‍यात आली तर देशी कापसाच्‍या पीए-528 हा वाण तुल्‍यवाणापेक्षा अधिक उत्‍पादन देणारा असुन सरस धागा, रसशोषक किडी, बोंडअळी, कडा करपा व दहिया रोगास सहनशील असुन हा वाण मराठवाडा विभागातील मध्‍यम जमिनीसाठी शिफारस करण्‍यात आली आहे.
पाच शेती यंत्रे व औजारांमध्‍ये इंजिनचलित कोळपणी यंत्र, शेंगा तोडणी चौकट, बैल चलित रोटरी मोड यंत्रणा, बैलगाडी व पदचलीत मका सोलणी यंत्राच्‍या शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली.
याव्‍यतिरिक्‍त नैसर्गिक साधनसंपत्‍ती व्‍यवस्‍थापनाच्‍या नउ शिफारशी, मुलभुत शास्‍त्रे, अन्‍नशास्‍त्र आणि तंत्रज्ञानाच्‍या दहा, पीक संरक्षणात दोन, कृषि अभियांत्रिकीत दहा, सामाजिक शास्‍त्राच्‍या तीन, उद्यान विद्याची एक, पशु व मस्‍त्‍य विज्ञानात एक शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली. 

Saturday, June 1, 2013

संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीच्‍या 41 व्‍या बैठकीचा समारोप

महिला व बालविकास राज्‍यमंत्री मा.ना.प्रा.फौजिया खान 

महाराष्‍ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा.ना.श्री.विजयरावजी कोलते


 राहूरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. टी. ए. मोरे

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. आर. जी. दाणी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. ई. लवांदे

मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. पी. गोरे 

आज देशामध्‍ये अन्‍नाचा तुटवडा नाही, अन्‍नधान्‍यामध्‍ये देश स्‍वयंपूर्ण होऊन निर्यातदार देश म्‍हणुन नांव प्राप्‍त झाले आहे हे सर्व कृषि संशोधनामुळेच होऊ शकले असे प्रतिपादन महिला व बालविकास राज्‍यमंत्री मा.ना.प्रा.फौजिया खान यांनी केले. महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यापर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची 41 वी बैठक 30 मे ते 1 जुन, 2013 या कालावधीत परभणी येथे महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजीत करण्‍यात आली होती, या बैठकीचा समारोप कार्यक्रमाप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. या कार्यक्रमास महिला व बालविकास राज्‍यमंत्री मा.ना.प्रा.फौजिया खान व महाराष्‍ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा.ना.श्री.विजयरावजी कोलते हे प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थित होते तर मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. पी. गोरे हे अध्‍यक्षस्‍थानी होते. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. आर. जी. दाणी, राहूरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. टी. ए. मोरे, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. ई. लवांदे, नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. के. आर. क्रांती, अमिती विद्यापीठाचे संचालक डॉ. पॉल खुराणा, कृषि परिषदेचे संशोधक संचालक डॉ. प्रकाश शिंगारे, मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. गोवर्धनजी खंडागळे आदींची उपस्थिती होती.
मा. ना. प्रा. फौजिया खान पुढे म्‍हणाल्‍या की, गेल्‍या दोन वर्षात राज्‍यात पावसाचे प्रमाण कमी असूनही अन्‍नधान्‍याची कमतरता नाही. आज राज्‍यासमोर लोकसंख्‍या वाढीमुळे नैसर्गीक साधनसंपत्‍तीची कमतरता भासत आहे. तसेच शहरीकरणामुळे व औद्योगीकरणामुळे पाणी व जमीनीवर विपरीत परिणाम होत आहे. जागतीक बेजबाबदारीमुळे ग्‍लोबल वॉर्मींगची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काही ठिकाणी दुष्‍काळ तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत आहे अशा परिस्थितीत कृषि क्षेत्रातही बदल होत आहेत. बदललेल्‍या परिस्थितीचा विचार करुन शास्‍त्रज्ञांनी संशोधन करावे. शेतीमध्‍ये कमी खर्च करुन व कमी पाण्‍याचा वापर करुन जास्‍त उत्‍पादनासाठी तंत्रज्ञान विकसीत करण्‍याचे संशोधन शास्‍त्रज्ञांनी करावे असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. औद्योगिकरणामुळे मनुष्‍याच्‍या आरोग्‍यावर तसेच पिकांवर परिणाम होत आहे तो परिणाम कमी करण्‍यासाठी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. विद्यापीठाचे संशोधन हे गुणवत्‍तापुर्ण असून त्‍यावर शेतक-यांचा जास्‍त विश्‍वास आहे. विद्यापीठाच्‍या संशोधनाचा शेतक-यांच्‍या जीवनमानावर किती परिणाम झाला याबाबतचे प्रभाव विश्‍लेषण करणे आवश्‍यक आहे व त्‍याचे सार्वजनकीकरण करावे असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
कृषि परिषदेचे उपाध्‍यक्ष डॉ. विजयरावजी कोलते म्‍हणाले की, कृषि विद्यापीठांच्‍या तंत्रज्ञानाचे पेटेंट घेण्‍यासाठी प्रस्‍तावांना गती देणे आवश्‍यक आहे. या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीच्‍या बैठकीत चारही कृषि विद्यापीठांनी यावर्षी 218 शिफारशी शेतक-यांसाठी प्रसारीत केल्‍या आहेत. त्‍यापैकी 12 विविध पिकांचे वाण, 09 शेती औजारे व यंत्रे तसेच 197 इतर शिफारशी या बैठकीत प्रसारीत करण्‍यात आल्‍या. या संशोधनात शेतक-यांचा, बालकांचा व महिलांच्‍या गरजांचा बारकाईने अभ्‍यास करून अनेक शिफारशी करण्‍यात आल्‍या त्‍यामुळे समाज जीवन उंचावण्‍यास निश्‍चीतच मदत होणार आहे.
अध्‍यक्षीय भाषणात मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. के. पी. गोरे म्‍हणाले की, या तीन दिवसाच्‍या बैठकीच्‍याअंती 218 शिफारसी निश्‍चीतच शेतक-यांना उपयुक्‍त ठरतील. भविष्‍यात काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, सौरउर्जा, काटेकोर शेती यावर संशोधनात भर द्यावा लागेल. जैवतंत्रज्ञानाच्‍या आधारे जैविक व अजैविक ताण सहन करणा-या पिकांच्‍या जाती विकसीत कराव्‍या लागतील.
या प्रसंगी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. आर. जी. दाणी, राहूरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. टी. ए. मोरे, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. ई. लवांदे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

या समारोपीय कार्यक्रमात विविध तांत्रीक सत्रातील 11 गटांचा कार्यवृत्‍ताचे वाचन करण्‍यात येवून त्‍यातील शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली. या बैठकीच्‍या निमित्‍ताने प्रथमच आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे संशोधक अमिती विद्यापीठाचे गुरगांव (हरियाना) येथील संचालक डॉ. पॉल खुराणा यांचे कृषि विकासासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर यावर विचार मांडले तर जेनेटीकली मॉडीफाईड (जीएम) पिकांचा परिणाम व धोरणे या विषयावर नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. के. आर. क्रांती यांनी सादरीकरण केले. तसेच राष्‍ट्रीय पातळीवरील विविध संस्‍थेचे संचालक व शास्‍त्रज्ञांची व्‍याख्‍याने कृषि संशोधकासाठी मेजवाणीच होती. याप्रकाराचे वैविध्‍यपुर्ण संशोधनात्‍मक सादरीकरण प्रथमच या बैठकीतुन करण्‍याची मा. कुलगुरू डॉ के. पी. गोरे यांच्‍या कल्‍पनेतुन आयोजीत करण्‍यात आली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिंगारे यांनी केले.