Thursday, May 16, 2024

खरीप हंगामासाठी वनामकृवि विकसीत बियाणे विक्रीस १८ मे पासून प्रारंभ

सोयाबीन, तुर, ज्वार, मुग पिकांचे बियाणे उपलब्ध
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनीचे आयोजन शनिवार दिनांक १८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता कृषि महाविद्यालय परभणी येथील सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ विकसित आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या सत्यतादर्शक बियाणे विक्रीने होणार आहे. सदरील बियाणांची विक्री १८ मे पासून विद्यापीठातील बीज प्रक्रिया केंद्रावरून करण्यात येणार असुन विद्यापीठातील इतर विक्री केंद्रावर दिनांक २५ मे पासून विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्‍या बीज प्रक्रिया केंद्राव्‍दारे देण्‍यात आली आहे. यावर्षी प्रथमच ११७८ क्विंटल खरीप पिकांचे सत्‍यतादर्शक बियाणे (७९५७ बॅग) उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. विद्यापीठाची परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्राची जमीन पेरणी योग्य केल्यामुळे बीजोत्‍पादनात वाढ झाली.
विक्रीसाठी उपलब्ध बियाणे व दर पुढील प्रमाणे
तुरीचे वाण - बीडीएन-७१६ (लाल), बीडीएन-७११ (पांढरी), ६ किलोच्या बॅगमध्ये तर बीडीएन-१३-४१ गोदावरी (पांढरी) हे वाण ६ आणि २ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून प्रती किलो दर रु २५०/- आहे या बियाणाच्या उपलब्धता बीडीएन-७१६ – (८०० बॅग), बीडीएन-७११ – (३६६ बॅग), बीडीएन-१३-४१ गोदावरी ६ किलोच्या ७०० बॅग व २ किलोच्या ३०० बॅग अशी आहे.
सोयाबीनचे वाण - एमएयुएस-१६२, एमएयुएस-१५८, एमएयुएस-७१, एमएयुएस-६१२ हे वाण २६ किलोच्या बॅगमध्ये तर एमएयुएस- ७२५ हा वाण ५ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असुन सर्व वाणाचा प्रती किलो दर हा रु १००/- असुन याची उपलब्धता एमएयुएस-१६२ (१००० बॅग), एमएयुएस-१५८(१५०० बॅग), एमएयुएस-७१ (१७५ बॅग), एमएयुएस-६१२ (१००० बॅग) आणि एमएयुएस- ७२५ (१६०० बॅग) अशी आहे.
ज्वारीचा वाण - परभणी शक्ती हा वाण ४ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून या वाणाचा प्रती किलो दर रु १२५/- आहे व या वाणाच्या ३०० बॅगची उपलब्धता आहे.
मुगाचा वाण - बीएम -२००३-२ हा वाण ६ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून या वाणाचा प्रती किलो दर रु २२०/- आहे व या वाणाच्या २१६ बॅगची उपलब्धता आहे.
वरील बियाणामधील सोयाबीन वाण एमएयुएस- ७२५ हा नुकताच प्रसारीत झालेला वाण आहे. या वाणाचे उपलब्ध बियाणाची जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करण्याच्या उद्देशाने ५ किलोच्या बॅगची पॅकिंग करण्यात आली आहे. आणि तुर वाण बीडीएन-१३-४१ (गोदावरी) या वाणाची शेतकऱ्यांद्वारे अंतर पीक पद्धतीने लागवडीसाठी बियाणे मागणी असल्यामुळे २ किलोच्या बॅगची पॅकिंग करण्यात आली आहे. उर्वरित बॅगची पॅकिंग या एक एकर प्रक्षेत्रासाठी आहे. बियाणे खरेदीसाठी रोख रक्कम स्विकारण्यात येईल तसेच एका व्यक्तीस एक बियाणे बॅग याप्रमाणे विक्री करण्यात येईल.

Wednesday, May 15, 2024

पेरणीपूर्वी सोयाबीनची उगवण शक्ती तपासणे गरजेचे - डॉ.गजानन गडदे


खरीपूर्व नियोजनाच्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र ,परभणी रिलायन्स फाउंडेशन आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मणगाव ता. जि. परभणी येथे महिला शेतकऱ्यांकरिता सोयाबीन बियाणांची उगवण शक्ती तपासण्याच्या प्रात्यक्षिकाचे दिनांक १४ मे रोजी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माहिती केंद्राचे विस्तार कृषि विद्यावेता डॉ.गजानन गडदे, यांनी सोयाबीन उगवण शक्तीचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष करून दाखविले आणि सोयाबीन बियाणाची उगवशक्ती 70 टक्के पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे असल्याचे नमूद करून सोयाबीन लागवड तंत्रज्ञानाविषयी त्यांनी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तद्नंतर माविमचे जिल्हा समन्वयक श्री बाळासाहेब झिंगार्डे यांनी महिला शेतकऱ्यांना बचत गट सक्षम करणे तसेच कृषिशी निगडीत जोडधंदे उभारण्यामध्ये महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री काळदाते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  माविमच्या सौ. भालेराव मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन रिलायन्स फाउंडेशन चे श्री रामा राऊत यांनी मानले. कार्यक्रमास गावातील ५५ महिला शेतकऱ्यांनी सहभागी होवून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या श्री शेळके यांनी प्रयत्न केले.


Tuesday, May 14, 2024

ॲग्रीपीव्ही तंत्रज्ञान संशोधन प्रशिक्षणाचे वनामकृवित आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्पांतर्गत विद्यापीठातील संशोधक आणि आचार्य पदवी विद्यार्थ्यांना ॲग्री-फोटोव्होल्टेईक या विषयीवर नवीन उपकरणाच्या उपयुक्तता आणि हाताळणी बाबत दिनांक १३ ते १६ मे दरम्यान चार दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक १३ मे रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रकल्पाचे समन्वयक आणि शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. आर. बी. क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले सौर ऊर्जा निर्मितीस भारतात मोठया प्रमाणात वाव असुन संशोधनाच्‍या माध्‍यमातुन कोणते पीक अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानात किफायतीशीर राहील हे पाहणे आवश्यक आहे. यासाठी संशोधक आणि आचार्य पदवी विद्यार्थ्यांना ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान उपकरणाची प्रभावी उपयुक्तता आणि हाताळणी करता येणे आवश्यक असून या उपकरणाचा आपल्या संशोधनामध्ये उपयोग करून संशोधन प्रभावी करावे आणि यासंशोधनाद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन लेख प्रकाशीत करावेते असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकल्पाचे अन्वेषक डॉ.गोदावरी पवार यांनी केले. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक म्हणून सन सीड कंपनीचे इं. निमेश आणि इं. रवी हे उपस्थित होते तसेच यावेळी विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक यांचीही उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विशाल इंगळे यांनी केले तर आभार डॉ. विक्रम घोळवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. रामटेके, डॉ कलालबंडी, डॉ शिराळे, डॉ सुनिता पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.




वनामकृवित खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनीचे आयोजन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनीचे आयोजन शनिवार दिनांक १८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता कृषि महाविद्यालय परभणी येथील सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे राहणार असुन प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे सचिव माननीय श्री सुनील चव्हाण (भाप्रसे) हे उपस्थित राहणार आहेत तर अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठचे माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक माननीय श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे), परभणीचे जिल्हाधिकारी मा. श्री. रघुनाथ गावडे (भाप्रसे) आणि मुंबई येथील साविदा कृषि कं. प्रा. लि.चे अध्यक्ष मा. श्री. विवेक दामले हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि वनामकृविचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, बिजोत्पादन संचालक डॉ. देवराव देवसरकर, पुणे येथील कृषि आयुक्तालयातील आत्माचे संचालक श्री. दशरथ तांभाळे, विभागीय कृषि सहसंचालक श्री. साहेबराव दिवेकर, डॉ. तुकाराम मोटे, कृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर आणि फरीदाबाद (हरियाणा) येथील वॉव गो.ग्रीन.एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शंकर गोयंका आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
परिसंवादात विद्यापीठ शास्त्रज्ञ विविध खरीप पीक लागवड तंत्रज्ञान, सोयाबीन, कापुस, ज्वार, बाजरी, कडधान्य लागवड, भरड धान्याचे महत्व, किड – रोग व्यवस्थारपन आदी विषयावर मार्गदर्शन करणार असुन शेतकरी बांधवाच्या व कृषि विषयक विविध शंकाचे निरासरण करणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ शास्त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका, पुस्तिका, शेतीभाती मासिकांचे विमोचन करण्या‍त येणार आहे. यासह विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान तसेच कंपन्याच्या आणि बचतगटाचे साहित्याचे कृषि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीने होणार आहे. विक्रीसाठी उपलब्ध बियाणे व त्याचे दर पुढील प्रमाणे आहेत.
तुरीचे बीडीएन-७१६ (लाल), बीडीएन-७११ (पांढरी), ६ किलोच्या बॅगमध्ये तर बीडीएन-१३-४१ गोदावरी (पांढरी) हे वाण ६ आणि २ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून प्रती किलो दर रु २५०/- आहे या बियाणाच्या उपलब्धता बीडीएन-७१६ – (८०० बॅग), बीडीएन-७११ – (३६६ बॅग), बीडीएन-१३-४१ गोदावरी ६ किलोच्या ७०० बॅग व २ किलोच्या ३०० बॅग अशी आहे.
सोयाबीनचे एमएयुएस-१६२, एमएयुएस-१५८, एमएयुएस-७१, एमएयुएस-६१२ हे वाण २६ किलोच्या बॅगमध्ये तर एमएयुएस- ७२५ हा वाण ५ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असुन सर्व वाणाचा प्रती किलो दर हा रु १००/- असुन याची उपलब्धता एमएयुएस-१६२ (१००० बॅग), एमएयुएस-१५८(१५०० बॅग), एमएयुएस-७१ (१७५ बॅग), एमएयुएस-६१२ (१००० बॅग) आणि एमएयुएस- ७२५ (१६०० बॅग) अशी आहे.
ज्वारीचा परभणी शक्ती हा वाण ४ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून या वाणाचा प्रती किलो दर रु १२५/- आहे व या वाणाच्या ३०० बॅगची उपलब्धता आहे. तसेच मुगाचा बीएम -२००३-२ हा वाण ६ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून या वाणाचा प्रती किलो दर रु २२०/- आहे व या वाणाच्या २१६ बॅगची उपलब्धता आहे. बियाणे खरेदीसाठी रोख रक्कम स्विकारण्यात येईल तसेच एका व्यक्तीस एक बियाणे बॅग याप्रमाणे विक्री करण्यात येईल.
सदर परिसंवादाचे थेट प्रक्षेपण https://www.youtube.com/@VNMKV विद्यापीठ युटयुब चॅनेलवर करण्यात येणार आहे. तरी परिसंवादाचा लाभ जास्तीत जास्ते शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री अनिल गवळी यांनी केले आहे.

Saturday, May 11, 2024

बालकांसाठी आयोजित उन्हाळी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

 वनामकृवितील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेचा उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यायातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागात असणाऱ्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेतर्फे  नुकतेच उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण कार्यांचा अनुभव देत असतांना व्यायाम, योगा, मनोरंजक खेळ, जीवन कौशल्ये विकसन, विज्ञान अनुभव, सृजनात्मक कार्ये, सामान्य ज्ञान, नैतिक कथा, गाणे, नृत्य, पाककृती इत्यादी कृती घेण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांनी या विविध कृतींमध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

या शिबिरादरम्यान संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके आणि  छत्रपती संभाजीनगर येथील एम.जी.एम. विद्यापीठाचे माननीय कुलगुरु  डॉ. विलास सपकाळ तथा इतर अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांनी या शिबिराचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती भेटवस्तू म्हणून दिल्यानंतर त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. 

या शिबिराअंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांच्यासोबत शिबीरातील विद्यार्थ्यांनी सकाळच्या रम्य वातावरणात निसर्ग सहलीचा आनंद घेतला. तसेच त्यांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शिबिरार्थींना पर्यावरण संवर्धनाचे धडे दिले. आपली पृथ्वी प्लॅस्टिकमुक्त, कचरामुक्त करण्यासाठी प्रत्येकाने वस्तूंचा किमान वापर, पुनर्वापर व पुनर्निर्मिती यांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. प्रत्येकाने प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करुन पर्यावरणाचे रक्षण करावे असेही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच बालकांना कागदी पिशव्या बनवण्याची कला अवगत करुन दिली. राष्ट्रीय पुस्तक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी डॉ. वीणा भालेराव यांनी विद्यार्थ्यांची विभागातील बालवाचनालयास भेट आयोजित करुन त्यांना विविध प्रकारची पुस्तके दाखवून मार्गदर्शन  केले व आपली प्रगती साधण्यासाठी वाचनाचे महत्व पटवून दिले.

या शिबिराच्या आयोजक प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी या शिबिराच्या समन्वयक डॉ. वीणा भालेराव व   डॉ. नीता गायकवाड यांच्यासह विभागातील प्रा. प्रियांका स्वामी तसेच शाळेतील शिक्षिका उपस्थित होत्या. सदरील शिबिराच्या आयोजनात या शाळेतील शिक्षिका श्रुति औंढेकर, वैशाली जोशी, मिनाक्षी सालगोडे, संध्या देशपांडे, रेवती हिस्वनकर, दिपाली करभाजने, मनिषा गाडगे व मदतनीस यांचे सहकार्य लाभले.

वनामकृविचा अभिनव उपक्रम माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत पेडगाव येथे संपन्न

 माती परीक्षण काळाची गरज....डॉ. उदय खोडके

माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत, हा अभिनव उपक्रम मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालनालयद्वारा पेडगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. विजय जंगले यांच्या शेतात दिनांक ९ मे रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, हे होते तर सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ.राजेश कदम, डॉ.प्रवीण वैद्य, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, डॉ. जी. एम. कोटे, डॉ.पी.एच. गोरखेडे, आत्माच्या सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वाती घोडके यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, खरीप हंगामाचे नियोजन करताना जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड करावी, पीकांची फेरपालट, आंतरपीक पद्धती, जल संधारण आणि आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर यावर भर द्यावा असे नमूद करून शाश्वत पीक उत्पादनामध्ये माती परीक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तद्नंतर उपक्रमामध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यामध्ये फळबाग, जमिनीची सुपीकता, जमीन निवड व योग्य वापर, गोगल गाय व पैसा अळी यांचे निर्मूलन याबाबत चर्चा झाली, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न व अडचणी जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नाचे निरसन तसेच शेतीविषयक अडचणीवर शास्त्रज्ञानी योग्य मार्गदर्शन केले.
उपक्रमामध्ये शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि भविष्यात एकात्मिक किड व्यवस्थापन व भाजीपाला लागवड या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांनी विनंती केली. यावेळी विशेष क्षेत्रात उत्तम काम केल्याबद्दल प्रतिनिधीक स्वरूपामध्ये काही शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच प्रकल्प संचालक आत्मा श्री. दौलत चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. अनिल गवळी आणि तालुका कृषी अधिकारी श्री. नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वाती घोडके यांनी सोयाबीन उगवण क्षमता प्रात्यक्षिक, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक, निंबोळी अर्क याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ.आनंद गोरे यांनी केले, सूत्रसंचालन स्वाती घोडके यांनी केले तर आभार श्री. विजय जंगले यांनी मानले.



Friday, May 10, 2024

वनामकृविचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या उपक्रमांतर्गत केहाळ येथील शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्फे विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून मागील वर्षापासून दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत' हा उपक्रम नियमित राबविण्यात येतो. यामध्ये विविध संशोधन केंद्र, महाविद्यालये व विस्तार केंद्र यांच्या शास्त्रज्ञांचे समूह त्यांच्या परिक्षेत्रातील गावामध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या सोबत एक दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या अंतर्गत प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रे, मेळावे, मार्गदर्शन कार्यक्रम असे उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुसार दि. ९ मे रोजी विस्तार शिक्षण संचालनालय, वनामकृवि, परभणी तर्फे या उपक्रमाअंतर्गत विद्यापीठाच्या विविध विषयातील शास्त्रज्ञांच्या १९ चमूने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये विविध गावांना जावून मार्गदर्शन केले. या मध्ये मौजे केहाळ ता.जिंतूर जि.परभणी येथील कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री.मधुकरराव घुगे यांच्या शेतात मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम संपन्न झाला. उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेतील परडू विद्यापीठातील कृषि शास्त्रज्ञ डॉ.धर्मेंद्र सारस्वत हे लाभले होते. याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ.धर्मराज गोखले, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.प्रशांत देशमुख, माजी विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.उध्दव आळसे, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.गजानन गडदे, सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रवीण कापसे, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ.दिगंबर पटाईत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री.मधुकर मांडगे, मंडळ कृषि अधिकारी श्री. किशोर शेळके यांची उपस्थित होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री मधुकर घुगे व त्यांचे बंधू श्री पद्माकर घुगे यांच्या शेतातील उन्हाळी भुईमूगाच्या विविध वाणांच्या बीजोत्पादन प्रक्षेत्रास भेट देऊन मा. कुलगुरू व इतर शास्त्रज्ञांनी पाहणी करून माहिती घेतली व पिकाच्या नियोजनाबाबत घुगे बंधूंचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या उपक्रमामुळे विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातील नाते अधिक घट्ट होत आहे असे नमूद करून शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणानुसार विविध पिकांचे नियोजन करावे आणि कृषि आधारित जोडधंद्यामध्ये दुग्ध व्यवसाय व रेशीम शेती वर अधिक भर देण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमाबद्दलही माहिती दिली आणि विद्यापीठातर्फे शेतकरी प्रथम हे ध्येय पुढे ठेवून, यापुढील काळात कमी वेळात जास्तीत जास्त संशोधन व इतर कार्यक्रम शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येतील असे सांगितले. तसेच येणाऱ्या १८ मे रोजी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त आयोजित खरीप शेतकरी मेळाव्यास शेतकऱ्यांना आवर्जून येण्याची विनंती केली.

प्रमुख पाहुणे डॉ.धर्मेंद्र सारस्वत यांनी त्यांचे अमेरिकेतील भुईमूग पिकांबाबतचे अनुभव, अमेरिका व भारतातील शेती, वातावरण, पिके यातील फरक व तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन केले. भारतीय वातावरणात वर्षभर विविध पिकांची लागवड करता येते, परंतु अमेरिकेमध्ये वर्षभरात फक्त एकच हंगाम पिकांच्या लागवडीकरिता मिळतो त्यामुळे तिथे पिकांची विविधता आढळून येत नाही, यामुळे भारतीय शेतकरी भाग्यवान असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रम प्रसंगी संचालक विस्तार शिक्षण डॉ.धर्मराज गोखले यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा उपक्रमाविषयी माहिती देऊन या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्यांची सोडवणूक विद्यापीठातील शास्त्रज्ञांमार्फत केल्या जाईल असे सांगितले आणि त्यांनी भुईमूग पिकाबद्दल तसेच विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीन, हरभरा, तूर व ज्वारी पिकाच्या नवीन विविध वाणांची तसेच विद्यापीठाच्या नवीन तंत्रज्ञानाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिगंबर पटाईत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.गजानन गडदे यांनी मानले. यावेळी शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या शेतीविषयक समस्या मांडल्या. यामध्ये सोयाबीन पिकातील चक्रीभुंगा व खोडमाशी, चारकोल रॉट रोग व्यवस्थापन, हुमणी कीड व्यवस्थापन, तुर पिकातील मर रोग व्यवस्थापन, हळद पिकातील रोग व्यवस्थापन, ऊस पिकातील आंतरपीक पद्धती याविषयी, खरीप पिकातील बीज प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यानुसार शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व शंकांचे निरसन केले. कार्यक्रमात ४८ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आणि मार्गदर्शनासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे आभार मानले. 







Thursday, May 9, 2024

वनामकृविच्या सुरक्षा समितीची बैठक संपन्न

 विद्यापीठ प्रक्षेत्राच्या सुरक्षेची जबाबदारी सर्वांची....मा.कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत विविध महाविद्यालये, विभाग आणि संशोधन केद्रांच्या अंतर्गत व्यापक क्षेत्र आणि कार्यालये आहेत. यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विद्यापीठ सुरक्षा समितीची बैठक दिनांक 8 मे रोजी मा.कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, सुरक्षा अधिकारी श्री पुरुषोत्तम सुडके, डॉ. गजानन गडदे, डॉ. संदीप पायाळ, प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी यांची उपस्थिती होती.
विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर विद्यापीठ सातत्याने संशोधनाचे आणि बीजोत्पादनाचे प्रकल्प राबवित आहे. संशोधन आणि बीजेत्पादनासाठी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी अविरत कार्य करत आहेत. यातून राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले उत्कृष्ट वाण आणि लागवड पद्धती विकसित केल्या जात आहेत. तसेच बीजोत्पादन कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्राला पैदासकार आणि पायाभूत बियाणे पुरवण्याची विद्यापीठाचा  निर्धार आहे. परंतु या कार्यात काही प्रक्षेत्रावर प्रयोगाचे साहित्य चोरी करून काही समाजकंटक गैवर्तन करत आहेत. चोरी करणाऱ्यासाठी ती एक किरकोळ १००० ते २००० रुपयाची वस्तू असते, परंतु विद्यापीठासाठी ती लाख मोलाची असून, विद्यापीठाने त्या वस्तूचा उपयोग संशोधनासाठी केलेला असतो. त्या वस्तूची चोरीने विद्यापीठाची संपूर्ण मेहनत व्यर्थ जाऊन, लाखो रुपयांचे विद्यापीठाचे, पर्यायाने समाजाचे नुकसान होते. प्रक्षेत्रावर चोरीसारखे किंवा इतर संशोधनास बाधा पोहोचविणारे प्रकार न होऊ देण्याची जबाबदारी विद्यापीठ शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आणि समाजाची आहे असे मत या बैठकीत मा.कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केले. तसेच भविष्यात चोरी आणि विद्यापीठ प्रक्षेत्रास बाधा पोहोचू नये म्हणून संशोधन प्रक्षेत्र प्रतिबंधित करण्याचे ठरविण्यात आले. या प्रक्षेत्रावर जनतेने विनापरवानगी प्रवेश करू नये असे आदेशीत केले आहे. तसेच प्रक्षेत्रावर चोरी किंवा कोणतीही हानी पोहोचविणाऱ्या व्यक्तीवर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश विद्यापीठाच्या सुरक्षा समितीस दिले आहेत. यासाठी विद्यापीठाच्या सुरक्षा समिती मध्ये मनुष्यबळ आणि वाहनांची संख्या वाढवून बळकटीकरण करण्यात आलेले आहे. बैठकीसाठी प्रक्षेत्रावरील सर्व पहारेकऱ्यांना बोलावून मा.कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यांना चोरी रोखण्यासाठी तसेच सुरक्षा संबंधी सक्त सूचना देण्यात आल्या.

Tuesday, May 7, 2024

वनामकृवि आणि वॉव गो ग्रीन कृषि विमान (ड्रोन) संस्था फरीदाबाद, हरीयाणा यांचे मध्ये सामजस्य करार

 युवा शेतकरी गटास ड्रोन फवारणीद्वारे स्वंयरोजगाराची संधी .... मा. कुलगुरू  डॉ. इन्द्र मणि


कृषि क्षेत्रात शेतकऱ्यांना फवारणी वरील खर्च व वेळ वाचवावा याकरीता ड्रोनचा वापर करून विविध पिकातील किडव्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन यासाठी भाडेतत्वावर ड्रोन उपलब्ध व्हावेत व त्याची निगरणी व दुरूस्त तसेच शेतकरी युवा पिढीस स्मार्ट व प्रगतशील तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील कामे व स्वयंरोजगार निर्मीती करता यावी या दृष्टीकोनातुन वनामकृविचे मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली वॉव गो ग्रीन कृषि विमान (ड्रोन) संस्थाचे संचालक श्री. शंकर गोयंका यांच्या सोबत दि. ०६ मे रोजी सामंजस्य करार करण्यात आला. सदर करारामुळे वनामकृवि परभणी व  वॉव गो ग्रीन कृषि विमान (ड्रोन) यांचे संयुक्त विदयमाने कृषी क्षेत्रात भाडेतत्वावर फवारणी करीता ड्रोनची  उपलब्धतता होणार आहे. या सामंजस्य करारा नुसार शेतकरी, विदयार्थी , शास्त्रज्ञ यांना अधिकृत ड्रोन प्रशिक्षण सुविधा देण्यात येणार आहे. या सामजस्य करारावर विदयापीठातर्फे संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, संचालक शिक्षण डॉ उदय खोडके, संशोधन अभियंता डॉ.स्मिता  सोलंकी व डॉ विशाल इंगळे तसेच वॉव गो ग्रीन कृषि विमान (ड्रोन) द्वारा संचालक श्री .शंकर गोयंका,  त्यांचे सहयोगी  राहुल मगदुम, श्री. गंगाधर कोल्हे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या प्रसंगी संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, डॉ. राहुल रामटेके, डॉ.प्रविण कापसे व प्रगतशील शेतकरी मंगेश देशमुख, पेडगावकर, सचिन शेळके, पारवा,  सचिन देशमुख, पिंपरीकर यांची उपस्थिती होती.

या करारामुळे शेतकऱ्यांना भाडेतत्वावर ड्रोन आधारित  शास्त्रशुदध पदधतीने फवारणी करणे सुलभ होईल. आणि युवा शेतकरी गटास ड्रोन फवारणीद्वारे स्वंयरोजगाराची संधी उपलब्ध होईल असे मत मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केले. तसेच अल्पभुधारक शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे हेतुस या सामंजस्य करारद़ारे प्रयत्न करण्यात येवून शेतकऱ्यांना शेतीतील कामासाठी फवारणीमुळे भाडेतत्वावर ड्रोन उभारणी क्रेंद्राचा आर्थिकदृष्टया फायदा होईल अशी आशा व्यक्त केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा आम्ही प्रशिक्षण व शेतीसाठी नक्कीच उपयोग करून घेऊ याबाबत तत्परता दाखवली.



Saturday, May 4, 2024

वनामकृवि, सिंजेंटा फाउंडेशन आणि सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार

अल्पभूधारक शेतकरी व कृषि पदविकाधारक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदलासाठी दिशादर्शक करार – मा. कुलगुरू डॉ. इन्द्र  मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, सिंजेंटा फाउंडेशन इंडिया पुणे आणि सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामार्फत संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, तर सिजेंटा फाउंडेशन इंडिया लिमिटेड पुणे यांच्यामार्फत संचालक श्री राजेंद्र जोग यांनी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली.
या सामंजस्य करारानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, सिंजेंटा फाउंडेशन पुणे व सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या तिन्ही संस्था सांघिकरित्या, सहकार्यातून सुसंवादांच्या मार्गाने ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व पदविका धारक विद्यार्थी यांचे जीवनमान उंचावण्याचा सर्वंकष प्रयत्न करतील, याकरिता शिक्षण, संशोधन यात परस्पर सहकार्य तसेच एकूणच मनुष्यबळाचे क्षमता विकास करणे हे प्राथमिक उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी आय राईज प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे.
याद्वारे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व कृषि पदविकाधारक विद्यार्थी यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडून येतील अशी आशा यावेळेस बोलत असताना मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केली, तसेच ते यापुढे बोलत असताना म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार मायबोलीतून शिक्षण अनिवार्य असल्याकारणाने सदर सामंजस्य करारा अन्वये राबवण्यात येणाऱ्या आय राईज प्रकल्पा मुळे पदविका विद्यार्थ्यांना एक नवी उमेद मिळेल. आय राईज प्रकल्पाद्वारे कृषि तंत्र पदविकेच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मायबोलीतून औद्योगिक क्षेत्रास आवश्यक असणाऱ्या अशा अनुरूप कृषि तंत्रज्ञानाचे शिक्षण हे एक महिन्याच्या प्रशिक्षणातून प्राप्त होणार आहे व प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून कार्यानुभवाची संधी मिळणार असून त्यानंतर इच्छुक उमेदवारांना औद्योगिक क्षेत्रात रोजगार प्राप्त करण्याकरिता तसेच स्वयंरोजगाराच्या संधीसाठी त्रिपक्षीय मदत मिळणार आहे. या सामंजस्य करारासाठी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे व सिंजेटा फाउंडेशन इंडियाचे श्री विक्रम बोराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक, डॉ. धर्मराज गोखले, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, एनबीएसएसएलयुपी, नवी दिल्लीचे विभाग प्रमुख डॉ. जे.पी. शर्मा, आयडीआयएआरआय, नवी दिल्लीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मान सिंग, महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, विभाग प्रमुख डॉ.डी.एस. पेरके व प्राचार्य डॉ. नरेशकुमार ई. जायेवार उपस्थिती होती.

Friday, May 3, 2024

वनामकृवितील नाहेप केंद्रात सुरू होतोय कृषि ड्रोन अभ्यासक्रम

 विद्यापीठ वर्धापन दिन १८ मे पासून अभ्यासक्रमास सुरुवात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील नाहेप केंद्राद्वारा सहा महिन्याचा कृषि ड्रोन तंत्रज्ञानावरील व्यावसायिक संशोध प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठ वर्धापन दिन 18 मे पासून सुरु होत असून या अभ्यासक्रमाकरिता सेरेब्रोस्पार्क इंनोवेशन्स पुणे व वनामकृवि परभणी यांच्या मध्ये करार झाला असून या अभ्यासक्रमाकरिता रिमोट पायलट लायसन्स धारक अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर उमेदवापात्र आहेत. या अभ्यासक्रमात ड्रोन तंत्रज्ञानावरील मूलभूत अभ्यासक्रम व कृषी उपयुक्तता ज्यामधे पिक निरिक्षण सेन्सर प्रणालीतून ड्रोन द्वारा विविध कार्य, पीक रोग तपासणी, फवारणी सारखी विविध कार्य करण्याकरिता संरचना व निर्मिती सारख्या शेतीविषयक नवीन ड्रोन तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे स्वतः या अभ्यासक्रमात एक विषय शिकविणार असून अभ्यासक्रमातील कृषी विषयक ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम तयार करताना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ यांची प्रमुख उपस्तिथी होती. या अभ्यासक्रमाची माहिती htttp://nahep.vnmkv.org.in या संकेतस्थळावर ऊपलब्ध असून सदरील अभ्यासक्रमाकरिता इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज गूगल फॉर्म द्वारे संकेत स्थळावर नोंदीत करावा. या अभ्यासक्रमानंतर विविध कृषी ड्रोन उत्पादक कंपनी, शासकीय कार्यालय, सुरक्षा मंत्रालय, ई. सारख्या क्षेत्रात नौकरी वा स्वत:चा व्यवसाय असा फायदा होऊ शकतो. मागील वर्षापासुन नाहेप केंद्राने कृषी ड्रोन क्षेत्रात भरपूर कार्य केलेले असून संशोधन विद्यार्थ्यांना तंतोतंत कृषी व्यवसायकता साधण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या आहेत व विविध १२ देशात ५५ संशोधन विद्यार्थ्यांना तसेच २५ प्राध्यापकांना एक ते तीन महिने प्रशिक्षणासाठी पाठविले व त्यावर संशोधन प्रकाशने झाली.

सेरेब्रोस्पार्क इंनोवेशन्स, पुणे ड्रोन संरचना, उत्पादन व कृषि संबंधित सेवा कार्य करीत असून पाच वर्षाचा करार कालावधी दरम्यान कृषी ड्रोन संशोधन, चालक, चाचणी व दुरुस्ती सारख्या कार्याकरिता वनामकृवि सोबत कार्य करणार असून या करारातून दोन्ही संस्थांना निश्चित कार्य प्रणाली करण्यास आश्वासित केले.

नाहेप चे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी प्रास्ताविक व संशोधन करण्यासंबंधी करारा बाबत माहिती दिली. याप्रसंगी उप अन्वेषण डॉ. डी. डी. टेकाळे, डॉ. गोदावरी पवार, डॉ. प्रवीण कापसे, डॉ. विशाल इंगळे, डी. व्ही. पाटील यांची उपस्थिती होती. या अभ्यासक्रम व करार कार्यात इंजी. श्रद्धा मुळे, संशोधन सहाय्यक व इंजी. विशाल काळबांडे यांनी सहभाग नोंदविला.

कानसूर येथे वनामकृविद्वारा किसान गोष्टीचे आयोजन

 मेहनती शेतकरी विद्यापीठाचे राजदूत ....मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि कानसूर येथील प्रगतशील शेतकरी ह.भ.प. श्री.अच्युत महाराज शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे कानसूर, तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथे “किसान गोष्टी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रगतशील शेतकरी श्री नागोरावजी आरबाड हे होते. कार्यक्रमास संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, प्राचार्य डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. पी.एच. वैद्य, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. कलालबंडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी, ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून तसेच योग्य आच्छादन आणि ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन अशा अचूक शेती व्यवस्थापनाद्वारे मिरचीचे विक्रमी उत्पादन घेणारे प्रगतशील शेतकरी ह.भ.प. श्री. अच्युत महाराज शिंदे यांच्या कार्याचा गुणगौरव केला. वयाच्या ७८ व्या वर्षी सुद्धा साधारणपणे एकरी अंदाजे रुपये पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळवणारे शेतकरी यांची चिकाटी, मेहनत आणि जिद्द याबद्दल माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी प्रशंसा केली आणि असे मेहनती शेतकरी हे विद्यापीठाचे राजदूत असल्याचे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्रगतशील शेतकरी श्री नागोरावजी आरबाड यांनी शाश्वत शेती व्यवसायासाठी आधुनिक शेती व्यवस्थापनाचे महत्व यावेळी नमूद केले. तद्नंतर संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके आणि संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच डॉ. लक्ष्मणराव खरवडे, प्राचार्य श्री के. पी. कनके, प्रगतशील शेतकरी श्री रामभाऊ शिंदे, श्री मदन महाराज शिंदे, श्री प्रल्हाद महाराज शिंदे यांनी आपल्या शेती विषयक समस्या उपस्थित केल्या, त्यावर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी समस्यांना समर्पक असे उत्तर देऊन शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील प्रगतशील शेतकरी शास्त्रज्ञ व कृषी सेवा केंद्रांचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.