Tuesday, March 29, 2016

कृषि पदवीधरांनी कृषि विकासासाठी योगदान द्यावे........ कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

वनामकृवित हवामान बदल विषयावर दोन दिवसीय राष्‍ट्रीय परिसंवाद संपन्‍न
राष्ट्रीय परिसंवाद सहभागी शास्त्रज्ञ व मान्यवर
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु 
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्वनाथ

कृषिचे अनेक विद्यार्थ्‍यी उच्‍च पदवी प्राप्‍त करून इतर क्षेत्रात करिअर करतात, कृषि विकासात कृषि पदव्‍युत्‍तर व युवा संशोधकांच्‍या योगदानाची गरज आहे. कृषि पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी देशात आयोजित करण्‍यात येत असलेल्‍या विविध राष्‍ट्रीय परिसंवाद व परिषदेत सहभाग नोंदवावा, यामुळे आंतरराष्‍ट्रीय व देशपातळीवरील शेतीमधील विविध घडामोंडींचे शास्‍त्रीय ज्ञान प्राप्‍त होते, अशा परिसंवादाचा लाभ विद्यार्थी संशोधकांनी घेवुन संशोधनाची दिशा निश्‍चीत करावी, असे प्रतिपादन कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांनी केले.  
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयातील कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभाग व नवी दिल्‍ली येथील अखिल भारतीय अनुवंश व पैदासशास्‍त्र संस्था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २८ व २९ मार्च दरम्‍यान हवामान बदलामुळे जैविक व अजैविक ताणाच्‍या दृष्‍टीने शेती पिकांचे पैदासयाविषयावर राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले होते, या परिसंवादाच्‍या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. वाय. एस. नेरकर, कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथ यांची उपस्थिती होती तर व्‍यासपीठावर माजी संशोधन संचालक डॉ. एस. टि. बोरीकर, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्रभारी प्राचार्य डॉ. जी.एम. वाघमारे, परिसंवादाचे आयोजक तथा विभाग प्रमुख डॉ. डी. बी. देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषि संशोधनात सार्वजनीक व खाजगी संस्‍थेत समन्‍वयाची गरज असल्‍याचे मत माजी कुलगुरू मा. डॉ. वाय. एस. नेरकर यांनी यावेळी व्‍यक्‍त केले तर कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथ यांनी विविध राष्‍ट्रीय परिसंवादाचा लाभ युवा शास्‍त्रज्ञांनी घेवुन प्राप्‍त ज्ञानाचा उपयोग संशोधनासाठी घेण्‍याचा सल्‍ला दिला. शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात परिसंवादातील मुख्‍य शिफारसीचे वाचन करण्‍यात येऊन उत्‍कृष्‍ट सादरिकरणाबाबत विविध शास्‍त्रज्ञांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ. डि. बी. देवसरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ गोदावरी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. आर. सी. महाजन यांनी केले. सदरिल दोन दिवसीय परिसंवादात देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडु, तेलंगाणा, गुजरात, हरियाणा, महाराष्‍ट्र आदी राज्‍यातुन तीनशे पेक्षा जास्‍त कृषि शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी संशोधक सहभागी झाले होते. साधारणत: १०० पेक्षा जास्‍त शास्‍त्रज्ञांनी संशोधन लेख सादर केले.
मार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा. डॉ. वाय. एस.  नेरकर

Monday, March 28, 2016

हवामान बदलामुळे निर्माण झालेले जैविक व अजैविक ताणास प्रतिकारक वाण निर्मीतीचे मोठे आव्हान.......माजी कुलगुरू मा. डॉ. वाय. एस. नेरकर

वनामकृवित हवामान बदल विषयावर दोन दिवसीय राष्‍ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन


मार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा. डॉ. वाय एस  नेरकर
आजपर्यंत अनुवंश व वनस्‍पती पैदासशास्‍त्राच्‍या आधारे विविध पिकांचे अनेक वाणांची निर्मीती केली, त्‍यात कीड प्रतिकारक, रोग प्रतिकारक, कमी कालावधीत येणारी वाणे, अधिक उत्‍पादन देणारी वाणाचा समावेश होतो. हवामान बदलाचा मोठा परिणाम शेतीवर होत असुन आज एकाच दिवशी उन्‍हाळा, पावसाळा व हिवाळा तीनही रूतुचा अनुभव आपण घेत आहोत. हवामान बदलामुळे निर्माण होत असलेले जैविक व अजैविक ताण प्रतिकारक वाण निर्मीती करण्‍याचे मोठे आव्‍हान अनुवंश व वनस्‍पती पैदास शास्‍त्रज्ञांपुढे असुन सुधारित पैदास पध्‍दतीसोबतच पारंपारिक पैदास पध्‍दतीचा संशोधनात अवलंब करावा लागेल, असे प्रतिपादन राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. वाय. एस. नेरकर यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयातील कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभाग व नवी दिल्‍ली येथील अखिल भारतीय अनुवंश व पैदासशास्‍त्र संस्था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २८ व २९ मार्च दरम्‍यान हवामान बदलामुळे जैविक व अजैविक ताणाच्‍या दुष्‍टीने शेती पिकांचे पैदासयाविषयावर राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले असुन असुन परिसंवादाच्‍या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर महात्‍मा फुले कृ‍षी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथ यांची प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थिती होती. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, परिसंवादाचे आयोजक विभाग प्रमुख डॉ डि बी देवसरकर, सचिव डॉ संजय सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी कुलगुरू मा. डॉ. वाय. एस. नेरकर पुढे म्‍हणाले की, आज नवीन वाण संशोधीत करतांना अधिक उत्‍पादनासह किड व रोग प्रतिकारक, कोणत्‍याही तापमानात तग धरणारे, कमी किंवा जास्‍त पाण्‍यास सहनशील अश्‍या सर्वगुण संपन्‍न असणा-या सुपर वाणाची निर्मीती करावी लागेल.
अध्‍यक्षीय भाषणास कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, हवामान बदलामुळे विविध राज्‍यातील शेती प्रभावीत झाली असुन संशोधनाच्‍या आधारे त्‍यावर मात करावी लागेल. विविध देशात यावर मोठया प्रमाणावर संशोधन सुरू असुन देशातही सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात यावर संशोधन सुरू आहे, यासाठी मोठया प्रमाणात गुंतवणुक व मनुष्‍यबळाची गरज आहे. कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथ आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, हवामान बदलाचा मोठा परिणाम राज्‍यातील शेतीवर होत असुन शेतक-यांत उमेद व आत्‍मविश्‍वास निर्माण करण्‍यासाठी कृषी शास्‍त्रज्ञांना योगदान द्यावे लागेल. 
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व डॉ संजय सिंह यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ. डि. बी. देवसरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे व डॉ गोदावरी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. एच. व्‍ही. काळेपांडे यांनी केले. सदरिल दोन दिवसीय परिसंवादात देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडु, तेलंगाणा, गुजरात, हरियाणा, महाराष्‍ट्र आदी राज्‍यातुन तीनशे पेक्षा जास्‍त कृषि शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी संशोधक सहभागी झाले आहेत. अन्‍न सुरक्षाकरिता हवामान बदलाचा शेतीवरील परिणाम कमी करण्‍यासाठी भविष्‍यात कृषी संशोधनातील प्राधन्‍यक्रम ठरविणे व कृती आराखडा निश्चित करण्‍यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले आहे. पिकांतील ताण प्रतिकारकाचे अनुवंश, जैविक व अजैविक ताणावर मात करण्‍यासाठी पारंपारिक पैदासशास्‍त्र, मॉलेकुलार पैदास पध्‍दती, कृषीविद्या पध्‍दती, हवामान बदलाच्‍या संबंधाने वनस्पती अनुवंश संसाधन व्‍यवस्‍थापन व किड-रोग प्रतिकारकता आदी विषयावर देशभरातील शास्त्रज्ञ संशोधनपर लेख सादर करून विचारमंधन करणार आहेत.
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्वनाथ 

Saturday, March 26, 2016

जलदिनानिमित्त मौजे मुरूंबा येथे रासेयोच्या विशेष शिबिरात जलदिडींव्दारे ग्रामस्थाचे प्रबोधन

कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांची प्रमुख उपस्थिती
जल प्रतिज्ञा घेतांना
जलदिंडीस हिरवा झेंडा दाखवितांना कुलगुरू मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिराचे आयोजन मौजे मुरूंबा येथे दिनांक २१ ते २७ मार्च दरम्‍यान करण्‍यात आले होते. दिनांक २२ मार्च रोजी जलदिनानिमित्‍त कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या प्रमुख उ‍पस्थितीत जलदिंडी काढुन ग्रामस्‍थाचे प्रबोधन करण्‍यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ उदय खोडके, रासेयोचे विद्यापीठ समन्‍वयक डॉ महेश देशमुख, डॉ बी एम ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी जलसंवर्धनावर मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, उपलब्‍ध पाण्‍याचा ग्रामस्‍थांनी काटेकोर वापर करावा, जलशायाचे सवंर्धन करावे, जल पुनर्भरण करणे गरजेचे असुन जलसंवर्धनच मानवाचे भविष्‍य आहे. रासेयोचे ध्‍वजारोहण करून प्राचार्य डॉ यु एम खोडके यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा दिली. शिबिराचे उद्घाटन राष्‍ट्रीय पुरस्‍कार प्राप्‍त मराठी चित्रपट ख्‍वाडा चे गीतकार व हास्‍यकवि प्रा. विनायक पवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. सदरिल शिबिरात ग्रामस्‍वच्‍छता अभियान, रक्‍तदान शिबिर, जलयुक्‍त शिवार कामे, अंधश्रध्‍दा निमुर्लन आदी कार्यक्रमाचे स्‍वयंसेवकांनी नियोजन करून सहभाग नोंदविला. शिबिरात वन दिन, हवामान दिन व जलदिन साजरा करण्‍यात येऊन रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते, यात एकुण पंचावण स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविकांना रक्‍तदान केले. यासाठी रक्‍तपेढी प्रमुख रमेश कनकदंडे व उध्‍दव देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिनांक २३ मार्च रोजी पुर्णाचे गट शिक्षणाधिकारी श्री विठ्ठलराव भुसारे यांनी स्‍वयंसेवकांना आजचे शिक्षण व प्रशासन यावर मार्गदर्शन करून निस्‍वार्थ व प्रामाणिकपणे काम करणारे प्रशासक बना, योग्‍य प्रशासनाव्‍दारे समाजात सकारात्‍मक बदल घडवु शकतो, असे सांगितले. 
  मौजे मुरूंबा येथील जिल्‍हा परिषदेच्‍या प्राथमिक शाळेचे ई लर्निंग वर्ग करिता रासेयोचे स्‍वयंसेवक व कार्यक्रमाधिकारी यांनी देणगीच्‍या स्‍वरूपात योगदान दिले. शिबिर यशस्‍वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा विजयकुमार जाधव व प्रा संजय पवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी कल्‍पना भोसले, देवीका बलखंडे, शुभम जोशी, ज्ञानेश्‍वर मोरे, सुयोग खोसे, मुडके, आरोटे तसेच कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी जीवन धोत्रे, मोहन अडकिणे, नितीन ढोकर, मयुर सुर्यवंशी, किशोर गायकवाड, विशाल राठोड, संध्‍या थोरात, अनुराधा बुचाले, सय्यद रिझवाना, स्‍वाती कांगने, आनंद शेटे, मारूती चाटुरे, आकाश आदीसह १५० स्‍वयंसेविकांनी परिश्रम घेतले. सदरिल शिबिरासाठी प्रा रविंद्र शिंदे, डॉ ए टि शिंदे, प्रा अनिल कांबळे, सरपंच गोपीनाथ झाडे, उपसरंपच संदिप झाडे, बिभिषन चोपडे, हभप दगडु महाराज, हभप पंडित महाराज व मुरूबां येथील गामस्‍थ व शाळेतील शिक्षकांचे सहकार्य लाभले.

रक्तदान शिबिरात सहभागी स्वयंसेवक
मौजे मुरूंबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इ लर्निग क्लास रूम साठी रासेयोचे कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवकांनी जमा केलेल्या देणगीची रक्कम शाळेच्या मुख्याध्यापिकेस सपुर्त करतांना 

Thursday, March 24, 2016

शेतीत शाश्वततेसाठी पाणलोटक्षेत्र विकास गरजेचे.......माजी कुलगुरू मा. डॉ. व्ही. एम. मायंदे

दोन दिवसीय वार्षिक आराखडा कार्यशाळेत केले कृषि विज्ञान केंद्राच्‍या तज्ञांना मार्गदर्शन
मराठवाडा विभागात जलसंवर्धनासाठी शास्‍त्रीयदृष्‍टया पाणलोटक्षेत्र विकास करणे गरजे असुन माथा ते पायथा पाणलोटक्षेत्राची आखणी केली पाहिजे, यातुन या भागातील शेतीत शाश्‍वतता येईल, असे प्रतिपादन अकोला येथील पंजाबराव देशमुख कृ‍षी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. व्‍ही. एम. मायंदे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय व हैद्राबाद येथील कृषी तंत्रज्ञान उपयोजना संशोधन संस्‍था यांच्‍यातर्फे दिनांक २१ व २२ मार्च दरम्‍यान दोन दिवसीय वार्षिक कृती आराखडा कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी हैद्राबाद येथील मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ के दत्‍तात्री, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विशाला पटणम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  माजी कुलगुरू मा. डॉ. व्‍ही एम मायंदे पुढे म्‍हणाले, की मागेल त्‍याला शेततळे योजनेत कृषि विज्ञान केंद्राच्‍या तज्ञांनी शास्‍त्रीय आधाराचे कार्य करावे. शास्‍त्रीय आधारावर तयार केलेले शेततळेच पुढे टिकतील. मराठवाडा विभागातील पिक पध्‍दती बदलत असुन प्रत्‍येक जिल्‍हयातील कृषि विज्ञान केंद्रांनी आपआपल्‍या कार्यक्षेत्रातील या बदल प्रक्रियेचे निरिक्षण करून भविष्‍यातील शेतीचा वेध घ्‍यावा. परिस्थितीनुसार शेतकरी स्‍वत: आपल्‍या शेतीत नवनवीन प्रयोग घेतात, शेतक-यांनी अनुभवाने निर्मीत केलेले यशस्‍वी तंत्रज्ञानाचा विस्‍तार करावा. शेतकरी स्‍वावलंबी होईल यासाठी कृषि विस्‍तारकांनी कार्य करावे. आज शेती ही सुशिक्षीतांची शेती झाली असुन शेतक-यांच्‍या परिस्थिती व गरजेनुसार कौशल्‍य प्रशिक्षण दयावे लागेल. यावर्षी राज्‍य शासनने कृषी महोत्‍सव साजरा करण्‍याचे ठरविले असुन त्‍यात प्रत्‍येक जिल्‍हातील कृषी विज्ञान केंद्रांनी योगदान द्यावे. कृषी विस्‍तार कार्यात लोकप्रतिनिधीचा सहभाग आवश्‍यक असल्‍याचेही यावेळी त्‍यांनी सांगितले.
  सदरिल कार्यशाळेत मराठवाडा विभागातील अकरा कृषि विज्ञान केंद्राच्‍या विशेष विषय तज्ञांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी तर सुत्रसंचालन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी केले.  

Wednesday, March 23, 2016

वनामकृवित ‘हवामान बदलामुळे जैविक व अजैविक ताणाच्या दुष्टीने शेती पिकांचे पैदास’ याविषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

दोन दिवसीय परिसंवादात देशातील तीनशेपेक्षा जास्‍त शास्‍त्रज्ञ व विद्यार्थ्‍यी संशोधक करणार विचारमंथन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयातील कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभाग व नवी दिल्‍ली येथील अखिल भारतीय अनुवंश व पैदासशास्‍त्र संस्था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २८ व २९ मार्च दरम्‍यान हवामान बदलामुळे जैविक व अजैविक ताणाच्‍या दुष्‍टीने शेती पिकांचे पैदासयाविषयावर राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले असुन परिसंवादाचे उद्घाटन दिनांक २८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. वाय. एस. नेरकर यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे राहणार असुन महात्‍मा फुले कृ‍षी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथ व नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. के. आर. क्रांती यांची प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थिती लाभणार आहे. शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले व प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदरिल दोन दिवसीय परिसंवादात देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडु, तेलंगाणा, गुजरात, हरियाणा, महाराष्‍ट्र आदी राज्‍यातुन तीनशे पेक्षा जास्‍त कृषि शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी संशोधक सहभागी होणार आहेत. देशातील व राज्‍यातील हवामान बदल व दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभुमीवर सदरिल परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले असुन अन्‍न सुरक्षाकरिता हवामान बदलाचा शेतीवरील परिणाम कमी करण्‍यासाठी भविष्‍यात कृषी संशोधनातील प्राधन्‍यक्रम ठरविणे व कृती आराखडा निश्चित करण्‍यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले आहे. पिकांतील ताण प्रतिकारकाचे अनुवंश, जैविक व अजैविक ताणावर मात करण्‍यासाठी पारंपारिक पैदासशास्‍त्र, मॉलेकुलार पैदास पध्‍दती, कृषीविद्या पध्‍दती, हवामान बदलाच्‍या संबंधाने वनस्पती अनुवंश संसाधन व्‍यवस्‍थापन व किड-रोग प्रतिकारकता आदी विषयावर देशभरातील शास्त्रज्ञ संशोधनपर लेख सादर करून विचारमंधन करणार आहेत. परिसंवादाचे आयोजन विभाग प्रमुख डॉ डि बी देवसरकर व संस्‍थेचे सचिव डॉ संजय सिंह यांच्‍या नेतृत्‍वाखाली करण्‍यात आले असुन यशस्‍वीतेसाठी विविध समित्‍याचे गठण करण्‍यात आले आहे.

Monday, March 21, 2016

शेतीक्षेत्रासाठी येणारे वर्ष आव्हानात्मक असुन योग्य नियोजनाची गरज....कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राच्‍या दोन दिवसीय वार्षिक कृति आराखडा कार्यशाळेचे आयोजन

मागील दोन ते तीन वर्षाच्‍या पार्श्‍वभुमीवर येणारे वर्ष शेतीक्षेत्रासाठी आव्‍हानात्‍मक असुन योग्‍य नियोजनाची गरज आहे. येणा-या हंगामात चांगल्‍या पाऊसमानाचे भाकित आहे, परंतु कोणत्‍याही परिस्थितीस तोंड देण्‍यासाठी शेतक-यांना मार्गदर्शनासाठी कृषि तंत्रज्ञानाबाबतच्‍या विविध पर्यायसह कृषि विस्‍तारकांनी व कृषि तज्ञांनी तयार रहावे. पाऊसमान चांगला राहील्‍यास पडणा-या पाऊसाच्‍या पाण्‍याचे योग्‍य उपयोग करण्‍यासाठी योग्‍य नियोजनाची जोड द्यावी लागेल, यासाठी विहीर व कुपनलिका पुनर्भरणावर भरा दयावा, कृषि विस्‍तारासाठी मराठवाडयातील सर्व कृषि विज्ञान केंद्रांनी मागील वर्षीच्‍या अनुभवाच्‍या आधारे पुढील वर्षीचा वार्षिक कृति आराखडा निश्‍चित करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वनामकृविचे विस्‍तार शिक्षण संचालनालय व हैद्राबाद येथील कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे झोन-५ यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने दिनांक २१ व २२ मार्च रोजी दोन दिवसीय वार्षिक कृति आराखडा कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले असुन कार्यशाळेच्‍या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्‍हणुन हैद्राबाद येथील कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे मुख्‍य शास्त्रज्ञ डॉ के दत्‍तात्री हे उपस्थित होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, गतवर्षी सोयाबीन पिकात रूंद वरंबा व सरी पध्‍दती अवलंब करतांना बीबीएफ यंत्राचे जुळवणुकीत शेतक-यांना अनेक तांत्रिक अडचणी आल्‍या, यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात यावे. कापुस पिकांत गुलाबी बोंडअळीचे आव्‍हान असुन अति घन पध्‍दतीने देशी किंवा सरळ वाणाची लागवड तंत्रज्ञानाच्‍या प्रसार करावा लागेल, यावर्षी सोयाबीनमध्‍ये विद्यापीठ विकसित एमएयुएस-१६२ व एमएयुएस-१५८ व तुर पिकांतील बीडीएन-७११ हे कमी पाण्‍यावर चांगले उत्‍पादन देणारा वाण ठरला असुन सुधारित बियाणे बदल गुणोत्‍तर वाढविण्‍याची गरज आहे. तेलबियामध्‍ये भुईमुग व तीळ पिक लागवडीस प्रोत्‍साहन द्यावे लागेल. मराठवाडा विभागात फळपिकांमध्‍ये केळी, मोसंबी व आंबा हे मुख्‍य पिक असुन मोसंबी सारखे पिक हलक्‍या व मध्‍यम जमिनीत किफायतीशीर नाही, याबाबत शेतक-यांना मार्गदर्शनाची गरज आहे. पिकनिहाय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्रांनी करण्‍याचा सल्‍लाही यावेळी त्‍यांनी दिला.
मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ के दत्‍तात्री आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, सन २०१६ हे वर्ष दाळवर्गीय पिकांचे आंतरराष्‍ट्रीय वर्ष साजरा करण्‍यात येत असुन दाळवर्गीय पिकांच्‍या अधिक उत्‍पादन देणा-या वाणाचा प्रसारावर भरा द्यावा, दुष्‍काळस्थितीत उपयुक्‍त कमी खर्चाच्‍या तंत्रज्ञान प्रात्‍यक्षिके घ्‍यावीत. शेतीपुरक जोड व्‍यवसाय जसे दुग्‍ध व्‍यवसाय, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग आदींच्‍या कृषि विज्ञान केंद्रानी प्रसारासाठी पुढाकार घ्‍यावा. केंद्र शासन व राज्‍य शासनाच्‍या विविध कृषि विषयक योजनाची माहिती शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.लक्‍या  ये ुईमुग व तीळ पिकांवर  संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, विद्यापीठाने विकसित केलेले कुपनलिका व विहिर पुनर्भरण तंत्रज्ञान अत्‍यंत उपयुक्‍त असुन त्‍याचा प्रसार मराठवाडा विभागात होण्‍यासाठी कृषि विज्ञान केंद्रानी प्रयत्‍न करावा तसेच सौरऊर्जा वरील फवारणी यंत्राचाही प्रसार करावा.
प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी विद्यापीठाने राबविलेल्‍या गतवर्षी विविध विस्‍तार कार्यक्रमाची माहिती देऊन बदलत्‍या हवामानात उपयुक्‍त तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी कृषि विज्ञान केंद्रांनी नियोजन करण्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यशाळेत मराठवाडा विभागातील अकरा कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्‍वयकासह विशेष विषयतज्ञ मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यशाळेत विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी उपस्थितांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. 
मार्गदर्शन करतांना मुख्य शास्त्रज्ञ डॉ के दत्तात्री 

Saturday, March 19, 2016

भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने गठित केलेल्या विशेष कृती दलात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांची निवड

भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्‍या जैवतंत्रज्ञान विभागाने जैव तंत्रज्ञानावर आधारीत पिकांच्‍या चाचणीकरिता सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील अधिसूचित प्रक्षेत्र चाचणी स्‍थळाच्‍या उभारणीचे प्रस्‍ताव व प्रारूपांचे परिक्षण करण्‍यासाठी आणि अंतिम स्‍वरूप देण्‍यासाठी विशेष कृती दल गठित केला असुन या कृती दलात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांचा समावेश करण्‍यात आला आहे. देशातील विविध संस्‍थेतील तज्ञांचा समावेश असलेल्‍या तेरा सदस्‍यीकृती दल लु‍थीयाना येथील पंजाब कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बलदेव सिंह ढिल्‍लन या अध्‍यक्षतेखाली कार्य करणार आहे. गेल्‍या दोन वर्षात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या प्रक्षेत्रावर कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु मार्गदर्शनाखाली मका तण व किड प्रतीकारक जनुकीय परावर्तीत पीकांच्‍या वाणांच्‍या प्रक्षेत्र चाचण्‍या घेण्‍यात आल्‍या, या अनुभवाचा उपयोग भविष्‍यात देशास होण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍यांचा समावेश या कृती दलात करण्‍यात आला आहे. भविष्‍यात देशात कापुस, मका, हरभरा, भात, वांगी, मोहरी इत्‍यादी पिकांमध्‍ये जुनकीय परावर्तीत चाचणी घेण्‍यात येणार आहेत, सदरील अधिसुचित प्रक्षेत्र चाचणी स्‍थळाच्‍या प्रस्तावाची अमंलबजवणी करीता लागणारे अधिकृतता व आर्थिकबाबीं याबाबतची संरचना व मानके याबद्दल हा कृती दल सुचना करणार आहे.

Wednesday, March 16, 2016

वनामकृवित पीक व्यावस्थापन व हुमणी व्यवस्थापनावर प्रशिक्षण कार्यक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत शेतकरी व कृषि विभाग कर्मचारी यांचे करीता एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र येथे दि.१७ मार्च रोजी करण्‍यात आले आहे. सदरील प्रशिक्षण कार्यक्रमात कोरडवाहू शेती व्‍यवस्‍थापन, बीटी कापुस लागवड, कमी खर्चाचे लागवड तंत्रज्ञान, सद्य परिस्थितीतील शेतक-यांसमोरील प्रमुख समस्‍या व हुमणी व्‍यवस्‍थापन या विषयावर सविस्‍तर मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. सदय टंचाई परिस्थितीत कमी पाण्‍यात येणा-या हंगामातील पीक व्‍यवस्‍थापन व शेतीचे नियोजन याविषयी शेतक-यांना निश्‍चतच फायदा होणार असुन सदरील प्रशिक्षणाचा शेतक-यांनी फायदा घ्‍यावा, असे आवाहन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्‍तार कृषि विदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे यांनी केले आहे. प्रशिक्षणात शेतक-यांना 'शाश्‍वत पीक व्‍यवस्‍थापन तंत्र' या मार्गदर्शक पुस्‍तीकेचे वाटप करण्‍यात येणार आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्‍यासाठी शेतक-यांनी डॉ.यु.एन.आळसे (७५८८०८२१३७) व प्रा.डी.डी.पटाईत (७५८८०८२०४०) यांचेशी संपर्क साधावा.

Friday, March 11, 2016

बचत गट समुहांनी कंपन्या स्थापन करून सक्षम बनावे...... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्‍त शेतकरी महिला मेळावा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभागाचा आत्‍मा प्रकल्‍प यांचे संयुक्‍त वतीने दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्‍त शेतकरी महिला मेळाव्‍याचे आयोजन औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्रात करण्‍यात आले होते. मेळावे उदघाटन कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते झाले, तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन विभागीय आयुक्‍त मा डॉ उमाकांत दांगट हे उपस्थित होते. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसलेडॉ प्रजा तल्‍हार, प्रा विजया नलावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, कर्नाटक, गुजराज, तेलंगण राज्‍यात गेली 25 वर्षापुर्वीच बचत गटांची स्‍थापन होऊन या बचत गटांचा समुह संगणकाशी जोडुन वाटचाल करत आहेत. बचत गट निर्मीत मालाची बाजारात मोठी मागणी आली तरी ती पुर्ण करण्‍याची क्षमता महाराष्‍ट्रातही बचत गटांनी निर्माण करायला हवी, त्‍यासाठी अनेक बचत गट समुहाची एक कंपनी कार्यान्वित व्‍हावी, ही काळाची गरज आहे. बचत गटांच्‍या माध्‍यमातुन ग्रामीण अर्थकारण सुधारण्‍याची ताकद महिलांमध्‍ये असुन यासाठी अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन विभागीय आयुक्‍त मा डॉ उमाकांत दांगट यांनी आपल्‍या भाषणात केले. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आपल्‍या भाषणात विद्यापीठाच्‍या उमेद अभियानाचे उदिष्‍ट सांगुन दुष्‍काळ परिस्थितीत देखील महिलांनी घरच्‍यांचा मनोबल वाढविण्‍याचे कार्य करण्‍याचा सल्‍ला दिला.

मेहनत म्‍हणजे नफा व दुर्लक्ष म्‍हणजे तोटा हा मुलमंत्र डॉ प्रजा तल्‍हार यांनी दिला तर घराचे घरपण टिकवुन गृहलक्ष्‍मी ही धनलक्ष्‍मी व्‍हावी, यासाठी प्रयत्‍न करा, असे आवाहन प्रा विजया नलावडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कार्यक्रम समन्‍वयक डॉ एस बी पवार यांनी केले. सुत्रसंचालन प्रा दिप्‍ती पाटगांवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा गीता यादव यांनी केले. कार्यक्रमास महिला शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या. यावेळी महिला बचत गटांच्‍या विविध पदार्थाच्‍या समावेश असलेल्‍या प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात आले होते.  


Thursday, March 10, 2016

तेलबिया उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

वनामकृवितील अखिल भारतीय समन्‍वय करडई संशोधन प्रकल्‍प व हैद्राबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तेलबिया विकास कार्यक्रमांतर्गत तेलबिया उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

Wednesday, March 9, 2016

गृहविज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा


टिप - सदरील बातमी प्राचार्या, गृहविज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी यांच्‍या कडुन प्राप्त

Friday, March 4, 2016

वनामकृवितील सहाय्यक नियंत्रक श्री दिवाकर काकडे सेवानिवृत्त

वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाचे सहाय्यक नियंत्रक श्री दिवाकर काकडे दिनांक २९ फेब्रुवारी रोजी प्रदिर्घ विद्यापीठ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांनी विद्यापीठात निम्नस्तर शिक्षण विद्याशाखा, कृषि महाविद्यालय, उस्मानाबाद व कृषि महाविद्यालय, परभणी येथे विविध पदावर कार्य केले. त्‍यांचा सेवानिवृत्तनिमीत्य परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने आयोजित सेवागौरव कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवन, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके, माजी प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, डॉ. महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यावरांनी श्री काकडे यांच्या ३६ वर्षातील सेवा कालावधीतील केलेल्या कार्याबद्दल गौरवोदगार काढले तर श्री काकडे यांनी सत्काराला उत्तर देतांना आपण विद्यापीठामुळेच मोठे झालो असुन आभार मानण्यापेक्षा सदैव विद्यापीठाचे ऋणात राहील असे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री पी. पी. कदम, कृष्णा जावळे, सुभाष जगताप, एकनाथ घ्यार, श्रीमती दिपाली सवंडकर आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.