Saturday, January 29, 2022

मौजे पाळोदी येथे रेशीम उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना व परभणी आत्मा (कृषि विभाग) यांच्या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २८ जानेवारी रोजी मौजे पाळोदी (ता.मानवत) येथे तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी सरपंचा सौ. रंजनाताई सुरज काकडे या होत्‍या तर प्रमुख पाहुणे म्हणून मानवत मंडळ कृषि अधिकारी श्री.रघुवीर नाईक, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे माजी व्यवस्थापक श्री. डि.डि. भिसे, अनुसंधान विस्तार केंद्र, केंद्रीय रेशीम बोर्ड परभणीचे शास्त्रज्ञ श्री. अशोक जाधव, कृषि पर्यवेक्षक सौ.जी.डब्ल्यु. रनेर, कृषि सहाय्यक सौ. एस. एल. मस्के, आत्माचे बीटीएम श्री. योगेश पवार, मुख्‍य मार्गदर्शक रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. धनंजय मोहोड आदींची प्रमुख उपस्थिती होते.

मार्गदर्शनात डॉ चंद्रकांत लटपटे म्‍हणाले की, अधिक रेशीम कोष उत्पादनाकरिता तुती पानाचा वाटा ३८ टक्के असून संगोपनगृहातील तापमान २२ ते २८ डि.सें.ग्रे. व आद्रता ८० ते ८५ टक्के दरम्यान असावे, हिवाळयात संगोपनगृहात कोळश्याची शेगडी रात्री ठेवावी व उन्हाळयात डेझर्ट कुलरचा वापर करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

कार्यक्रमास पेडगावचे रेशीम उद्योजक शेतकरी श्री. सातव व श्री. राजेभाऊ काकडे उपस्थितत होते. कार्यक्रमास परिसरातील गावातील शेतकरी मोठया संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. केशव काकडे यांनी केले तर आभार श्री. रामभाऊ काकडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरता रेशीम संशोधन योजनेचे श्री. धनंजय मोहोड, जिल्हा रेशीम कार्यालयाचे श्री.सय्यद व पाळोदी येथील शेतकरी बांधव यांनी परिश्रम घेतले.



Thursday, January 27, 2022

मौजे खेर्डा (ता.पाथरी) येथे तुती रेशीम उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

आत्मा (कृषि विभाग) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना यांच्या संयुकत विद्यमाने दिनांक २७ जानेवारी रोजी मौजे खेर्डा (ता.पाथरी) येथे तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी सरपंचा सौ. नंदाताई रामचंद्र आमले हया होत्‍या तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपसरपंच श्री विष्णुप्रसाद सिताफळे उपस्थित होते, पाथरी तालूका कृषि अधिकारी श्री. व्हि.टि.शिंदे, मंडळ कृषि अधिकारी श्री.व्हि.एस.नांदे, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ.चंद्रकांत लटपटे, जिल्हा रेशीम कार्यालयाचे तांत्रिक अधिकारी श्री.जोगदंड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ चंद्रकांत लटपटे म्‍हणाले की, रेशीम शेतीत योग्‍य नियोजन केल्‍यास वार्षिक एकरी तीन ते चार लाखाचे उत्‍पन्‍न मिळविणे शक्‍य असुन इतर कोणत्‍याही पिकातुन एवढे उत्‍पन्‍न शक्‍य नाही. यासाठी मुख्‍यत: हेक्‍टरी वीस टन कुजलेले शेणखत, ५ टन गांडुळ खत, ठिंबक सिंचन व्‍यवस्‍था, तसेच ८२ बाय २३ बाय १५ फुट आकाराचे कच्‍चे शेडनेट आदींची आवश्‍यकता लागेल. शेतकरी बांधवानी रेशीम उद्योगाकडे वळावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. तर श्री. व्हि. एस. शिंदे शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातुन मनरेगा योजना व नानासाहेब कृषि संजिवनी योजना (पोक्रा) अंतर्गत तुती लागवडीकरिता असलेल्‍या अनुदानाचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्‍याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. व्हि.एस. नांदे यांनी केले. सुत्रसंचालन श्री.व्हि.व्हि. दलाल यांनी केले तर आभार वरिष्ट संशोधन सहाय्यक श्री.धनंजय मोहोड यांनी मानले. कार्यक्रमास पन्‍नास पेक्षा जास्‍त शेतकरी बांधव उपस्थित होते.

Wednesday, January 26, 2022

वनामकृवित डिजिटल शेती तंत्रज्ञानावर इंटर्नशीप प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) अंतर्गत पदवीपूर्व कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकरिता डिजिटल शेती तंत्रज्ञानावरील वीस आठवडीय इंटर्नशीप प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २१ जानेवारी ते २१ मे दरम्यान करण्‍यात आले असुन सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक २५ जानेवारी रोजी झाले, उदघाटन प्रसंगी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी नाहेप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे हे होते. डॉ. पी. ए. मुंडे, डॉ. बी. एस.आगरकर, डॉ. कैलास डाखोरे, इंजी. डि. व्हि. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी नाहेप प्रकल्पा विषयी मार्गदर्शन करून नाहेप प्रकल्पात असलेले अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान, कॉम्पुटर एडेड डिझाइन सॉफटवेअर, जीआयएस, ड्रोन, रोबोट, स्वयंचलीत यंत्रे, थ्रीडि प्रिंटर आदींचा सखोल अभ्यास करण्‍याचे आवाहन केले तर अध्यक्षीय भाषणात डॉ. गोपाळ शिंदे  प्रशिक्षणात अवगत केलेल्‍या ज्ञानाचा उपयोग करुन कृषि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी प्रकल्प अहवाल तयार करण्‍याचे आवाहन केले.

सदरिल प्रशिक्षणात नाहेप प्रकल्पातील शास्त्रज्ञ डिजिटल शेती यावर मार्गदर्शन करणार असुन प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. बी. एस.आगरकर आणि इंजी. डि. व्हि. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात इंजी. डि. व्हि. पाटील यांनी प्रशिक्षणाचा उद्देश व आराखडा थोडक्यात विशद केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अनिकेत वाईकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंजी. रवीकुमार कल्लोजी, इंजी खेमचंद कापगते, डॉ. अविनाश काकडे, डॉ. हेमंत रोकडे, इंजी. शिवानंद शिवपुजे, डॉ. शिवराज शिंदे, इंजी. विश्वप्रताप जाधव, इंजी. गोपाळ रणेर, श्री. रामदास शिंपले, मुक्ता शिंदे, मारोती रणेर, गंगाधर जाधव, जगदीश माने आदींनी सहकार्य केले.

नैतिक मुल्‍याच्‍या कठोर पालनातुनच विद्यापीठ सारख्‍या संस्‍कारक्षम संस्‍था उभ्‍या राहतात ..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित प्रजासत्‍ताक दिन साजरा

विद्यापीठ उभारणी असो की चालविणे असे ही सात्‍यत्‍याने घडणारी प्रक्रिया आहे. सर्वांनी काही मुल्‍यांची जाणवीपुर्वक जोपासना करणे गरजेचे आहे, विद्यापीठ केवळ बौध्‍दीक क्षमतेवर मोठे होत नाही, बौध्‍दीकक्षमता उच्‍चप्रतीची तर असलीच पाहिजे, त्‍याचबरोबर समर्पित भावनेने काम करण्‍याची प्रवृत्‍ती असली पाहिजे, नैतिक मुल्‍याचे कठोर पालनातुनच विद्यापीठासारख्‍या संस्‍था उभ्‍या राहतात. संपुर्ण समाज संस्‍कार करणारी संस्‍था म्‍हणुन कुटुंब संस्‍थेनंतर शैक्षणिक संस्‍थेकडे अतिशय आशेने पाहत आहे, ही आपली सर्वांची सामुदायिक जबाबदारी व कर्तव्‍य आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रांगणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करून प्रजासत्‍ताक दिन साजरा करण्‍यात आला, त्‍यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरज‍कुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ जी एम वाघमारे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी प्रजासत्‍ताक दिनांच्‍या सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या तसेच भारताच्‍या संविधानामधील उद्देशिकेचे सामुहिकरित्‍या वाचन करण्‍यात आले.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, यावर्षी आपण देशाच्‍या स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष आणि विद्यापीठ स्‍थापनेचे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष साजरा करत आहोत. गेल्‍या दोन वर्षापासुन कोरोनाच्‍या संकटास तोंड देत आहोत, याकाळात तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठाचे कृषि संशोधन, शिक्षण व विस्‍तार कार्य चालुच आहे. तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन सातत्‍याने विद्यार्थी व शेतकरी बांधवाच्‍या संपर्कात आहोत. प्राध्‍यापकांचे अध्‍यापनाचे कार्य चालुच असुन संशोधन कार्य कोठेही थांबलेले नाही, बीजोत्‍पादनची चांगली कामगिरी यावर्षी आपण करू शकला. चारही कृषि विद्यापीठाची संयुक्‍त संशोधन बैठक व विद्यापीठाचा पदवीदान समारंभ उत्‍कृष्‍टपणे पार पडला, हे सर्व सामुदायिक प्रयत्‍नाचा व तंत्रज्ञानावरील विश्‍वासाचे प्रतिक आहे. मर्यादित मनुष्‍यबळात देखिल आपण कर्तव्‍यात कोठेही कमी पडत नाहीत. भविष्‍यातही चांगली कामगिरी करण्‍यासाठी सक्षमपणे सर्वांना उभे राहवायाचे आहे, असे ते म्‍हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले.  कार्यक्रमास विविध विभागाचे विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारीकर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Tuesday, January 25, 2022

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने राष्ट्रीय मतदार दिन साजरा

देशाच्‍या स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्सव व विद्यापीठ स्‍थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने  दिनांक २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औजित्‍य साधुन सक्षम लोकशाहीसाठी निवडणुकांमध्ये मतदारांच्या  नैतिक सहभागाचे महत्व या विषयावर ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन आला होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्या डॉ जया बंगाळे या होत्‍या तर वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ शंकर पुरी व रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ विद्याधर मनवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ जया बंगाळे म्‍हणाल्‍या की, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी जागरुक राहणे आवश्यक असून प्रत्‍येकांने मतदानाचा हक्‍क बजावला पाहिजे. कार्यक्रम अधिकारी डॉ. विद्यानंद मनवर यांनी मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश कोणताही पात्र व्‍यक्‍ती मतदानापासुन वंचीत राहु नये हा असल्‍याचा ते म्‍हणाले.  कार्यक्रमासाठी वरिष्ठ शास्त्रज्ञ  डॉ. शंकर पुरी यांचे तांत्रिक सहकार्य लाभले.

याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या निवडणूक साक्षरता मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष गणेश पाटेकर, उपाध्यक्ष सेजल वट्टमवार, सचिव तेजस चव्हाण, परिक्षेत्र प्रतिनिधी कृषांग देशमुख, विद्यार्थी प्रतिनिधी कु. दिव्या भगत, ऋतुजा तापडिया, वैष्णवी पंडित, मयूर मांगुळकर, विद्यार्थी प्रमुख अभिषेक मस्के यांनी निवडणुकांतील मतदान वाढीकरिता प्रयत्‍न करण्‍याचे आश्वासन दिले. कार्यक्रमास विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बदनापुर कृषी विज्ञान केंद्र आणि अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (गृह विज्ञान) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कन्या दिवस साजरा

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त विद्यापीठांतर्गत असलेल्‍या बदनापुर (जि जालना) येथील कृषी विज्ञान केंद्र आणि परभणी येथील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (गृह विज्ञान) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कन्या दिवसाचे औजित्‍य साधुन किशोरवयीन मुलींचे आरोग्‍य याविषयावर दिनांक २५ जानेवारी रोजी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमात औरंगाबाद येथील विभागीय आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण प्रशिक्षण केंद्राच्‍या प्राचार्या डॉ रेखा गायकवाड व वरिष्‍ठ संशोधिका (गृह विज्ञान) डॉ निता गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. 

किशोरवयीन मुलींचे आरोग्य व आहार यावर मार्गदर्शन करतांना प्राचार्या डॉ. रेखा गायकवाड किशोरवयीन मुलींच्‍या शरीराची योग्य वाढा‍करिता आहारात सर्व अन्न घटकांचा समावेश आवश्यक असून याच वयात आहार विषयक चुकीच्या सवयी लागू शकतात. शक्ती मिळवण्यासाठी योग्य आहाराबरोबरच चांगल्‍या मानसिक वाढीसाठी खेळ, वाचन असे छंद जोपासण्याची गरज असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. तर वरिष्‍ठ संशोधिका (गृह विज्ञान) डॉ. नीता गायकवाड यांनी मुलींची सद्यस्थिती व किशोरवयीन मुलींमधील शारीरिक व मानसिक बदल या विषयावर मार्गदर्शन करतांना म्‍हणाल्‍या की मुलींचा सामाजिक, बौद्धिक, मानसिक व नैतिक दर्जा वाढविण्यासाठी पालकांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असुन मुलींची भ्रूण हत्या थांबवणे आवश्‍यक आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय विषेशज्ञ (गृह विज्ञान) डॉ. साधना उमरीकर यांनी केले. ऑनलाईन कार्यक्रमात ९० पेक्षा जास्‍त मुली व पालकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र, बदनापूरच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Sunday, January 23, 2022

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी उत्पादन क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण....... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

२८ व्या भारतीय अन्नशास्त्रज्ञ व तंत्रज्ञ परिषदेच्‍या समारोपीय कार्यक्रमात प्रतिपादन

जालना : सन १९४८ पूर्वी भारताची लोकसंख्या कमी असून सुद्धा आपल्याला अन्‍नधान्‍य व इतर अन्न पदार्थाची आयात करावी लागत होती. आज लोकसंख्या एकशे तीस कोटी पेक्षा जास्‍त असून सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जागतिक स्तरावर कृषी उत्पादन क्षेत्रात देश स्वयंपूर्ण बनला, एवढेच नव्‍हे तर विविध देशांना आपण अन्नाची निर्यात करीत आहोत, यात अन्न प्रक्रिया उद्योगाचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग असल्‍याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांनी केले.  

अखिल भारतीय अन्न शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ संघटनेच्‍या (एएफएसटीआय) वतीने ७५ व्या आजादी का अमृत महोत्सव न‍िमित्‍त दिनांक २० ते २२ जानेवारी दरम्‍यान इट-सेफ या विषयावर २८ व्या भारतीय अन्नशास्त्रज्ञ व तंत्रज्ञ राष्ट्रीय परिषदेचे ऑनलाईन आयोजन करण्‍यात आले होते, परिषदेच्‍या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जालना येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. डॉ. उदय अन्नापुरे, एएफएसटीआयचे अध्यक्ष डॉ. अलोक श्रीवास्तव, मानद सचिव डॉ. विकाससिंग चव्हाण, एएफएसटीआय, मुंबई चाप्टरच्‍या अध्यक्षा डॉ. सुभाप्रदा निस्ताला, मैसुर येथील विद्यार्थी समितीचे अध्‍यक्ष डॉ. आर पी सिंग, सीएफटीआरआयचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजेंद्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, भारताचे विद्यमान पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून स्टार्टअप व स्टॅन्ड अप इंडियाची सुरुवात झालेली असून यात सर्व भागीदारांना, जसे शेतकरी, उद्योजक यांना प्रोत्साहित केले आहे. साधारणता वीस ते तीस टक्के काढणीपश्‍चात तंत्रज्ञानात द्वारे होणारे नुकसान आपल्याला कमी करता येऊ शकते. सदरिल परिषदे प्रमाणाने फोरम वेळोवेळी आयोजित करण्याबाबत त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

भाषणात संचालक प्रा. डॉ. उदय अन्नापुरे यांनी सदरिल परिषदेतील मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना, कारखानदारांना, विद्यार्थ्यांना आदीसह नवीन अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी निश्चितच लाभ होईल अशी आशा व्‍यक्‍त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रितिका जोशी यांनी केले तर आभार औरंगाबाद चाप्टरचे अध्यक्ष व परिषदेचे आयोजन सचिव प्रा. डॉ. भगवान साखळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता डॉ. भगवान कापसे, प्रवीण फिरके, निमंत्रक उदय नाईक, संजय कुलकर्णी, प्रा. डॉ. पराग नेमाडे, डॉ योगेश गात, प्रा डॉ सुरेश कागणे, श्री गिरीश वाहिले, श्री नागेश आलसटवार, गणेश बार्बीले आदींनी कार्य केले. सदरील तीन दिवसीय परिषदेत देशातील ७० पेक्षा अधिक तज्ञांनी अन्नतंत्रज्ञान अन्नप्रक्रिया, अन्न सुरक्षितता व गुणवत्ता, अन्न अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कृषी मालावरील प्रक्रिया, दूध प्रक्रिया, न्युट्रासीटीकल्स, अन्नसुरक्षा इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रात होत असलेल्या संशोधनपर शोध निबंधांचे विविध तज्ञाकडून सादरीकरण करण्यात आले. परिषदेत ३३ तांत्रिक सत्रात २०० पोस्टर आणि २०० ओरल प्रेझेंटेशनाच्‍या माध्‍यमातुन विविध तत्रांनी सादरीकरण केले. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या उत्पादनाचे प्रदर्शन आभासी पद्धतीने भरविण्यात आले होते. परिषदेत विविध विषयांच्या अनुषंगाने संशोधक विद्यार्थ्यांचे सादरीकरणाच्या स्पर्धा आयोजित करून, उत्कृष्ट शोधनिबंधाचे सादरीकरण करणाऱ्या संशोधकाला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. परिषदेच्या आयोजनाकरिता रिसेला, अरोमॅक्स क्रिएशन, चितळे डेअरी, प्रवीण मसाले, तायोकागागु (जपान) इत्यादी उद्योजकांनी प्रायोजकत्व स्वीकारले होते. परिषदेमध्ये एक हजार पेक्षा अधिक अन्न शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, उद्योजक, विद्यार्थी आदींनी सहभाग नोंदविला.

Saturday, January 8, 2022

तोंडापूर (जि. हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्रात हवामान आधारित कृषि सल्ला जनजागृती प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या ग्रामीण कृषि मौसम सेवा प्रकल्‍पाच्‍या वतीने हिंगोली जिल्‍हयातील तोंडापुर येथील कृषि विज्ञान केंद्रात दिनांक ६ जानेवारी रोजी “शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषि सल्ला” या विषयावर शेतकरी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास ग्रामीण कृषि मौसम सेवेचे प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, संशोधन सहयोगी श्री. प्रमोद शिंदे, हवामान निरीक्षक श्री. ए. आर. शेख, श्री. डी. आर. बोबडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. कैलास डाखोरे म्‍हणाले की, परभणी विद्यापीठाच्‍या वतीने दर मंगळवारी व शुक्रवारी प्रसध्‍द होणारी कृषि हवामान सल्ला पत्रिका ही एक हवामान अंदाजाबद्दल नियमितपणे माहिती मिळविण्याचे खात्रीशीर स्त्रोत आहे. कृषि हवामान सल्ला पत्रिकेव्‍दारे कमी कालावधीच्या, मध्यम कालावधीच्या व दीर्घ कालावधीच्या हवामान अंदाजाबद्दल वर्तविण्‍यात येऊन पिकांच्‍या व्‍यवस्‍थापनाबाबत माहिती दिली जाते. यावेळी त्‍यांनी शेतकरी बांधवांनी कृषि हवामान सल्ला मिळविण्याकरिता मेघदूत ॲप व विजांच्या माहितीसाठी दामिनी ॲपचा वापर करावा असे आवाहन केले.

डॉ. पी. पी. शेळके यांनी शेतकऱ्यांना ते स्वत: कित्येक वर्षापासून हवामान आधारित कृषि सल्ल्याचा वापर करतात व तो शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचवत आल्याचे सांगितले. तसेच मनोगतात शेतकरी श्री. गोरखनाथ हाडोळे यांनी हवामान आधारित कृषि सल्ला हा शेतकऱ्यांसाठी उपयूक्त असून व्यवहार्यता वाढत असल्याचे सांगितले. भविष्यात शेतकऱ्यांना मंडळ निहाय तसेच तालूका निहाय सल्ला प्राप्त झाल्यास तो अधिक उपयोगाचा ठरू शकेल असे सांगितले.

यावेळी श्री प्रमोद शिंदे यांनी “हवामान आधारित शेती व्यवस्थापन” या पुस्तकाचे वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. अनिल ओळंबे तर आभार प्रा. अजयकुमार सुगावे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री. ए. आर. शेख, श्री. प्रमोद शिंदे, श्री. दत्ता बोबडे, कृषि विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. अनिल ओळंबे तर आभार प्रा. अजयकुमार सुगावे यांनी केले. सदरिल कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्यासाठी श्री. ए. आर. शेख, श्री. प्रमोद शिंदे, श्री. दत्ता बोबडे व कृषि विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. प्रशिक्षणात पन्‍नास पेक्षा जास्‍त शेतकरी बांधव सहभागी झाले होते.

Friday, January 7, 2022

हरभरा पिकावरील घाटे अळीचे वेळीच करा व्यवस्थापन...... वनामकृवितील कृषि किटकशास्‍त्रांचा सल्‍ला

सध्या मराठवाडयात ढगाळ वातावरण असून बऱ्याचशा भागात हरभरा पीक घाटे अवस्थेत आहे, काही भागात घाटे अळीच्या प्रादुर्भावाचा प्रादुर्भाव दिसत आहे. घाटेअळीमुळे हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये सर्वात मोठी घट येऊ शकते, त्यामुळे योग्य वेळी व्यवस्थापन करण्‍याचा  सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्‍त्र विभागातील शास्‍त्रज्ञांनी दिला आहे.

घाटेअळी हि कीड बहुभक्षी असून विशेषतःपीक फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत प्रादुर्भाव नुकसानकारक ठरतो. लहान अळ्या सुरवातीला कोवळी पाने, कळ्या व फुले कुरतडून खातात. शेवटी घाटे लागल्यानंतर अळ्या घाटे कुरतडून त्यात छिद्र पाडून त्यात डोके खुपसून आतील दाणे खातात. साधारणतः एक अळी ३० ते ४० घाट्यांचे नुकसान करते. शेताच्या बांधावरील कोळशी, रानभेंडी,पेटारी ही पर्यायी खाद्यतणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत. ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडिरॅक्टिन ३०० पीपीम ५ मिली प्रति लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. घाटेअळी लहान अवस्थेत असताना एचएनपीव्ही ५०० एल.. १ मिली प्रति लिटर पाण्यात ५ ग्राम नीळ टाकून सायंकाळी फवारणी करावी. हि फवारणी पिकावर प्रथम-द्वितीय अवस्थेतील अळ्या असताना केल्यास अतिशय प्रभावी व्यवस्थापन होते. तसेच बिव्हेरिया बॅसियाना १ टक्के विद्राव्य ६ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.या अळीची आर्थिक नुकसान पातळी म्‍हणजेचे २ अळ्या प्रति मीटर ओळीत किंवा ८ ते १० पतंग प्रति कामगंध सापळ्यात सलग २ ते ३ दिवस आढळल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ०.४४ ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी. १ मि.ली. किंवा फ्ल्यूबॅडामाईड २० डब्ल्यूजी ०.५ ग्रॅम किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ एससी ०.२५ मिली प्रति लिटर पाणी फवारणी करावी.

Thursday, January 6, 2022

वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि औरंगाबाद येथील कृषि सारथी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नाबार्ड पुरस्कृत दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे दि.४ व ५ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर हे होते तर मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. व्हि. बी. कांबळे, कृषि सारथी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री नारायण जराड, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.जी.डी.गडदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात डॉ.डी.बी.देवसरकर म्हणाले कि, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतक-यांनी स्वत:चे बियाणे स्वत:च तयार करावेफक्त शेती न करता शेतीवर आधारीत इतर पुरक व्यवसाय करावेत जेणेकरून आर्थिक स्‍थैर्य मिळेल. मार्गदर्शनात डॉ.जी.डी.गडदे म्हणाले कि, विद्यापीठातर्फे नविन विकसीत वाण शेतक-यांनी आपल्या शेतीत पेरावेत जेणेकरून अधिक उत्पन्न मिळवता येईल. तसेच शेतक-यांनी प्रशिक्षणात माहिती घेतलेल्‍या कृषि तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पन्नात वाढ करावी. यावेळी श्री.जराड यांनी त्यांच्या संस्थेमार्फत घेण्यात येणा-या विविध उपक्रमाची माहिती शेतक-यांना दिली. 

प्रशिक्षणाकरिता जालना जिल्‍हयातील मौजे वरूड येथील २७ शेतकरी सहभागी झाले होते. प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना मागणीनुसार हरभरा व गहू उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, हरभरा पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन, रबी पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन, डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान, द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान, डाळींब व द्राक्ष पिकांचे कीड व्यवस्थापन, यांत्रिकीकरण व त्यांचे महत्त्व, मधमाशी पालन, शेळीपालन व व्यवस्थापन, मु-हा म्हैसपालन, दुग्धजन्य पदार्थ निर्मीती इत्यादी विविध विषयावर व्याख्यान व प्रात्याक्षिकाव्दारे प्रशिक्षण देण्यात आले. शेतक-यांनी चर्चेत विचारलेल्‍या प्रश्‍नांना विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन श्री.मधुकर मांडगे यांनी केले तर आभार किटकशास्‍त्रज्ञ डॉ.डी.डी.पटाईत यांनी मानले. डॉ.मधुमती कुलकर्णी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी हातभार लावला.


Tuesday, January 4, 2022

वनामकृविच्‍या वतीने मौजे पेठ बाभळगांव ता. पाथरी येथे शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी जागृती कार्यक्रम संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प, कापूस संशोधन योजना आणि ग्रामीण कृषि मौसम सेवा योजना यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 3 जानेवारी रोजी मौजे पेठ बाभळगाव (ता. पाथरी जि. परभणी) येथे एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण आणि शेतकरी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते तर संशोधन उपसंचालक डॉ. अशोक जाधव, ग्रामिण कृषि मौसम सेवा योजनेचे प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे, सहायक किटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. दत्‍तप्रसाद वासकर म्हणाले की,  शेतकऱ्यांनी विकेल ते पिकेल संकल्‍पने प्रमाणे बाजारात ज्याला भाव आहे व जास्त मागणी आहे अशा पिकांची लागवड करावी. पिकांचे नियोजन करतांना भाजीपाला, फळबाग, तसेच काढणीपश्चात प्रक्रिया करण्याचे नियोजन करावे. शेती विषयक तांत्रिक अडचण आल्यास शेतकरी बांधवानी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांशी संपर्क करावा. महिलांनीही शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे व आपल्या शेतीमध्ये बदल घडवून आणावा, असा सल्‍ला दिला.

डॉ. अशोक जाधव यांनी कापूस लागवडीचे कमी खर्चाचे तंत्रज्ञान वापरून कापूस उत्पादनात अधिक निव्वळ नफा कसा मिळवता येईल यावर मार्गदर्शन करून शेंडा खुडण्यामुळे होणारे फायदे याविषयी माहिती दिली. तर
डॉ.दिगंबर पटाईत यांनी कीटकनाशक प्रतिकारशक्‍ती व्यवस्थापन प्रकल्पा मार्फत गावात निवड केलेल्या दहा शेतकऱ्यांनी कापूस शेती मध्ये गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन कसे केले याविषयी सांगितले तसेच शेतकऱ्यांना वाटप केलेल्या निविष्ठा आणि शेतकऱ्यांनी केलेली फरदड मुक्ती याविषयी सर्वांना अवगत करून दिले.

प्रास्ताविकात डॉ. कैलास डाखोरे यांनी ग्रामिण कृषि मौसम सेवा मार्फत देण्यात येणाऱ्या संदेश व हवामान अंदाज विषयी शेतकऱ्यांना सखोल माहिती दिली. हवामान अंदाजानुसार आपल्या शेतीचे नियोजन करावे असे सांगितले तसेच वीज पडणे याविषयी पूर्वसूचना देणाऱ्या दामिनी व मेघदूत या मोबाईल ॲप बद्दल सविस्‍तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. दिगंबर पटाईत यांनी केले.

कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी श्री. बाबासाहेब रणेर यांनी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना झालेल्या फायदा याविषयी सांगितले तर महिला शेतकरी सौ. उज्वलाताई रणेर यांनी महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आव्हान केले की त्यांनी सुध्दा सावित्रीमाई प्रमाणे आपल्या कामात कुठेही मागे राहू नये व शेतीचा आणि आपल्या घराचा उध्दार करावा. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री.घुमरे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विद्यापीठाचे श्री.ह्रशिकेष औंढेकर, प्रगतशील शेतकरी श्री. मंचकराव रणेर, श्री. मुंजाजी धरमे, युवा उद्योजक श्री. दिपक गिराम आदीसह गावातील ५० शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या चिकू बागेस, कापूस फरदड मुक्त प्रक्षेत्र, दाळमिल व मिरची बीजोत्पादन प्रक्षेत्रास मान्यवरांमार्फत भेट देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. शेख, कु. प्रियंका वाघमारे, श्री.इरफान बेग, श्री. डी.आर. बोबडे आणि गावकऱ्यांनी प्रयत्न केले.

शेतकरी महिलांनी शेतीपूरक उद्योगाकडे लक्ष केंद्रीत करावे ....... विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर

तुळजापुर कृषि विज्ञान केंद्राच्‍या वतीने आयोजित ऑनलाईन महिला शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन

मराठवाडयात सोयाबीनचे भरपूर क्षेत्र असून सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण 42 टक्के असल्यामुळे त्यापासून विविध पोषणवर्धक उपपदार्थ बनविता येवु शकतात. शेतकरी महिलांनी शेळीपालन, कुक्कुटपालन, गायपालन, म्हैसपालन, मधुमक्षिका पालन, पोषणबाग निर्मिती आदि शेतीपूरक उद्योग धंद्याकडे लक्ष केंद्रीत करावे. आज विविध भरडधान्यंच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष करत आहोत, भरडधान्यांचे उत्पादन वाढवून त्यांचा वापर विविध लघुउद्योगांमध्ये करता येईल. महिलांनी शेती उत्पादन आधारित विविध पदार्थ तयार करून त्यांची विक्री करावी. शेतकरी महिलांनी जे विकेल तेच पिकविण्याकडे भर द्यावा, असा सल्‍ला विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांनी दिला.  

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय अंतर्गत असलेल्‍या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान (उमेद), उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त दिनांक 3 जानेवारी रोजी आयोजित ऑनलाईन महिला शेतकरी मेळाव्याच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून अटारी, पुणेचे संचालक डॉ लाखन सिंग हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अक्कलकोट (जि.सोलापूर) येथील प्रियदर्शनी महिला सहायता समुहाच्या संचालिका श्रीमती वनीता तंबाके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रांजल शिंदे, मसला खुर्दच्या सौ. शैलजा नरवडे, कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक प्रा.लालासाहेब देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

मार्गदर्शनात मा डॉ.लाखनसिंग म्हणाले की, स्‍त्री शिक्षणाकरिता सावित्रीबाई फुले यांनी अत्‍यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये महान कार्य केले आहे, त्‍याच्‍या कार्यापासुन प्रेरणा घेऊन आज शेतकरी महिलां कार्य करावे. बचत गटातील महिलांनी गुणवत्तापुर्ण निर्यातक्षम मालाचे उत्पादन करावे.

श्रीमती वनीता तंबाके आपल्‍या मनोगतात म्‍हणाल्‍या की, ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःला कमी न समजता बचत गटाच्या माध्यमातून विविध पदार्थांचे, वस्तूचे उत्पादन करून पुणे, मुंबईसारख्या मोठया शहरांतील बाजारपेठ काबीज करावी. श्रीमती तंबाके यांनी सुरू केलेल्‍या बचत गटाच्‍या चढणघडीनीबाबत सांगतांना म्हणाल्या की, त्यांनी बचत गटाची सुरूवात आजपासून 23 वर्षापूर्वी फक्त 100 रुपयांपासून केली आणि आज त्यांच्या विविध उत्पादनांची विक्री महाराष्ट्रासह भारतभर विविध प्रदर्शनांमधून केली जाते. सध्या शेतमाल प्रक्रिया उद्योगाला भरपूर वाव असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. श्रीमती प्रांजल शिंदे म्हणाल्या कीसावित्रीबाईने त्या काळात लढा दिल्यामुळे आज आपण हा दिवस बघू शकतोय. तसेच बालविवाह थांबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

प्रास्‍ताविक कार्यक्रम समन्वयक प्रा. लालासाहेब देशमुख यांनी केले. सुत्रसंचलन श्रीमती वर्षा मरवाळीकर यांनी केले तर आभार डॉ बलवीर मुंडे यांनी मानले. सदरील मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार जाधव, डॉ भगवान आरबाड, गणेश मंडलिक, अपेक्षा कसबे, डॉ श्रीकृष्ण झगडे, सखाराम मस्के, डॉ नकुल हरवाडीकर, शिवराज रूपनर, विजय माने आदींनी परिश्रम घेतले. ऑनलाईन मेळाव्यात  चारशे पेक्षा जास्‍त महिलांनी सहभाग नोंदविला.