Friday, May 10, 2024

वनामकृविचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या उपक्रमांतर्गत केहाळ येथील शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्फे विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून मागील वर्षापासून दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत' हा उपक्रम नियमित राबविण्यात येतो. यामध्ये विविध संशोधन केंद्र, महाविद्यालये व विस्तार केंद्र यांच्या शास्त्रज्ञांचे समूह त्यांच्या परिक्षेत्रातील गावामध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या सोबत एक दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या अंतर्गत प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रे, मेळावे, मार्गदर्शन कार्यक्रम असे उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुसार दि. ९ मे रोजी विस्तार शिक्षण संचालनालय, वनामकृवि, परभणी तर्फे या उपक्रमाअंतर्गत विद्यापीठाच्या विविध विषयातील शास्त्रज्ञांच्या १९ चमूने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये विविध गावांना जावून मार्गदर्शन केले. या मध्ये मौजे केहाळ ता.जिंतूर जि.परभणी येथील कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री.मधुकरराव घुगे यांच्या शेतात मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम संपन्न झाला. उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेतील परडू विद्यापीठातील कृषि शास्त्रज्ञ डॉ.धर्मेंद्र सारस्वत हे लाभले होते. याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ.धर्मराज गोखले, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.प्रशांत देशमुख, माजी विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.उध्दव आळसे, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.गजानन गडदे, सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रवीण कापसे, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ.दिगंबर पटाईत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री.मधुकर मांडगे, मंडळ कृषि अधिकारी श्री. किशोर शेळके यांची उपस्थित होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री मधुकर घुगे व त्यांचे बंधू श्री पद्माकर घुगे यांच्या शेतातील उन्हाळी भुईमूगाच्या विविध वाणांच्या बीजोत्पादन प्रक्षेत्रास भेट देऊन मा. कुलगुरू व इतर शास्त्रज्ञांनी पाहणी करून माहिती घेतली व पिकाच्या नियोजनाबाबत घुगे बंधूंचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या उपक्रमामुळे विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातील नाते अधिक घट्ट होत आहे असे नमूद करून शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणानुसार विविध पिकांचे नियोजन करावे आणि कृषि आधारित जोडधंद्यामध्ये दुग्ध व्यवसाय व रेशीम शेती वर अधिक भर देण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमाबद्दलही माहिती दिली आणि विद्यापीठातर्फे शेतकरी प्रथम हे ध्येय पुढे ठेवून, यापुढील काळात कमी वेळात जास्तीत जास्त संशोधन व इतर कार्यक्रम शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येतील असे सांगितले. तसेच येणाऱ्या १८ मे रोजी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त आयोजित खरीप शेतकरी मेळाव्यास शेतकऱ्यांना आवर्जून येण्याची विनंती केली.

प्रमुख पाहुणे डॉ.धर्मेंद्र सारस्वत यांनी त्यांचे अमेरिकेतील भुईमूग पिकांबाबतचे अनुभव, अमेरिका व भारतातील शेती, वातावरण, पिके यातील फरक व तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन केले. भारतीय वातावरणात वर्षभर विविध पिकांची लागवड करता येते, परंतु अमेरिकेमध्ये वर्षभरात फक्त एकच हंगाम पिकांच्या लागवडीकरिता मिळतो त्यामुळे तिथे पिकांची विविधता आढळून येत नाही, यामुळे भारतीय शेतकरी भाग्यवान असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रम प्रसंगी संचालक विस्तार शिक्षण डॉ.धर्मराज गोखले यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा उपक्रमाविषयी माहिती देऊन या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्यांची सोडवणूक विद्यापीठातील शास्त्रज्ञांमार्फत केल्या जाईल असे सांगितले आणि त्यांनी भुईमूग पिकाबद्दल तसेच विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीन, हरभरा, तूर व ज्वारी पिकाच्या नवीन विविध वाणांची तसेच विद्यापीठाच्या नवीन तंत्रज्ञानाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिगंबर पटाईत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.गजानन गडदे यांनी मानले. यावेळी शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या शेतीविषयक समस्या मांडल्या. यामध्ये सोयाबीन पिकातील चक्रीभुंगा व खोडमाशी, चारकोल रॉट रोग व्यवस्थापन, हुमणी कीड व्यवस्थापन, तुर पिकातील मर रोग व्यवस्थापन, हळद पिकातील रोग व्यवस्थापन, ऊस पिकातील आंतरपीक पद्धती याविषयी, खरीप पिकातील बीज प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यानुसार शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व शंकांचे निरसन केले. कार्यक्रमात ४८ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आणि मार्गदर्शनासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे आभार मानले. 







Thursday, May 9, 2024

वनामकृविच्या सुरक्षा समितीची बैठक संपन्न

 विद्यापीठ प्रक्षेत्राच्या सुरक्षेची जबाबदारी सर्वांची....मा.कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत विविध महाविद्यालये, विभाग आणि संशोधन केद्रांच्या अंतर्गत व्यापक क्षेत्र आणि कार्यालये आहेत. यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विद्यापीठ सुरक्षा समितीची बैठक दिनांक 8 मे रोजी मा.कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, सुरक्षा अधिकारी श्री पुरुषोत्तम सुडके, डॉ. गजानन गडदे, डॉ. संदीप पायाळ, प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी यांची उपस्थिती होती.
विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर विद्यापीठ सातत्याने संशोधनाचे आणि बीजोत्पादनाचे प्रकल्प राबवित आहे. संशोधन आणि बीजेत्पादनासाठी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी अविरत कार्य करत आहेत. यातून राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले उत्कृष्ट वाण आणि लागवड पद्धती विकसित केल्या जात आहेत. तसेच बीजोत्पादन कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्राला पैदासकार आणि पायाभूत बियाणे पुरवण्याची विद्यापीठाचा  निर्धार आहे. परंतु या कार्यात काही प्रक्षेत्रावर प्रयोगाचे साहित्य चोरी करून काही समाजकंटक गैवर्तन करत आहेत. चोरी करणाऱ्यासाठी ती एक किरकोळ १००० ते २००० रुपयाची वस्तू असते, परंतु विद्यापीठासाठी ती लाख मोलाची असून, विद्यापीठाने त्या वस्तूचा उपयोग संशोधनासाठी केलेला असतो. त्या वस्तूची चोरीने विद्यापीठाची संपूर्ण मेहनत व्यर्थ जाऊन, लाखो रुपयांचे विद्यापीठाचे, पर्यायाने समाजाचे नुकसान होते. प्रक्षेत्रावर चोरीसारखे किंवा इतर संशोधनास बाधा पोहोचविणारे प्रकार न होऊ देण्याची जबाबदारी विद्यापीठ शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आणि समाजाची आहे असे मत या बैठकीत मा.कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केले. तसेच भविष्यात चोरी आणि विद्यापीठ प्रक्षेत्रास बाधा पोहोचू नये म्हणून संशोधन प्रक्षेत्र प्रतिबंधित करण्याचे ठरविण्यात आले. या प्रक्षेत्रावर जनतेने विनापरवानगी प्रवेश करू नये असे आदेशीत केले आहे. तसेच प्रक्षेत्रावर चोरी किंवा कोणतीही हानी पोहोचविणाऱ्या व्यक्तीवर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश विद्यापीठाच्या सुरक्षा समितीस दिले आहेत. यासाठी विद्यापीठाच्या सुरक्षा समिती मध्ये मनुष्यबळ आणि वाहनांची संख्या वाढवून बळकटीकरण करण्यात आलेले आहे. बैठकीसाठी प्रक्षेत्रावरील सर्व पहारेकऱ्यांना बोलावून मा.कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यांना चोरी रोखण्यासाठी तसेच सुरक्षा संबंधी सक्त सूचना देण्यात आल्या.

Saturday, May 4, 2024

वनामकृवि, सिंजेंटा फाउंडेशन आणि सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार

अल्पभूधारक शेतकरी व कृषि पदविकाधारक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदलासाठी दिशादर्शक करार – मा. कुलगुरू डॉ. इन्द्र  मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, सिंजेंटा फाउंडेशन इंडिया पुणे आणि सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामार्फत संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, तर सिजेंटा फाउंडेशन इंडिया लिमिटेड पुणे यांच्यामार्फत संचालक श्री राजेंद्र जोग यांनी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली.
या सामंजस्य करारानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, सिंजेंटा फाउंडेशन पुणे व सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या तिन्ही संस्था सांघिकरित्या, सहकार्यातून सुसंवादांच्या मार्गाने ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व पदविका धारक विद्यार्थी यांचे जीवनमान उंचावण्याचा सर्वंकष प्रयत्न करतील, याकरिता शिक्षण, संशोधन यात परस्पर सहकार्य तसेच एकूणच मनुष्यबळाचे क्षमता विकास करणे हे प्राथमिक उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी आय राईज प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे.
याद्वारे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व कृषि पदविकाधारक विद्यार्थी यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडून येतील अशी आशा यावेळेस बोलत असताना मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केली, तसेच ते यापुढे बोलत असताना म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार मायबोलीतून शिक्षण अनिवार्य असल्याकारणाने सदर सामंजस्य करारा अन्वये राबवण्यात येणाऱ्या आय राईज प्रकल्पा मुळे पदविका विद्यार्थ्यांना एक नवी उमेद मिळेल. आय राईज प्रकल्पाद्वारे कृषि तंत्र पदविकेच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मायबोलीतून औद्योगिक क्षेत्रास आवश्यक असणाऱ्या अशा अनुरूप कृषि तंत्रज्ञानाचे शिक्षण हे एक महिन्याच्या प्रशिक्षणातून प्राप्त होणार आहे व प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून कार्यानुभवाची संधी मिळणार असून त्यानंतर इच्छुक उमेदवारांना औद्योगिक क्षेत्रात रोजगार प्राप्त करण्याकरिता तसेच स्वयंरोजगाराच्या संधीसाठी त्रिपक्षीय मदत मिळणार आहे. या सामंजस्य करारासाठी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे व सिंजेटा फाउंडेशन इंडियाचे श्री विक्रम बोराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक, डॉ. धर्मराज गोखले, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, एनबीएसएसएलयुपी, नवी दिल्लीचे विभाग प्रमुख डॉ. जे.पी. शर्मा, आयडीआयएआरआय, नवी दिल्लीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मान सिंग, महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, विभाग प्रमुख डॉ.डी.एस. पेरके व प्राचार्य डॉ. नरेशकुमार ई. जायेवार उपस्थिती होती.

Friday, May 3, 2024

वनामकृवितील नाहेप केंद्रात सुरू होतोय कृषि ड्रोन अभ्यासक्रम

 विद्यापीठ वर्धापन दिन १८ मे पासून अभ्यासक्रमास सुरुवात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील नाहेप केंद्राद्वारा सहा महिन्याचा कृषि ड्रोन तंत्रज्ञानावरील व्यावसायिक संशोध प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठ वर्धापन दिन 18 मे पासून सुरु होत असून या अभ्यासक्रमाकरिता सेरेब्रोस्पार्क इंनोवेशन्स पुणे व वनामकृवि परभणी यांच्या मध्ये करार झाला असून या अभ्यासक्रमाकरिता रिमोट पायलट लायसन्स धारक अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर उमेदवापात्र आहेत. या अभ्यासक्रमात ड्रोन तंत्रज्ञानावरील मूलभूत अभ्यासक्रम व कृषी उपयुक्तता ज्यामधे पिक निरिक्षण सेन्सर प्रणालीतून ड्रोन द्वारा विविध कार्य, पीक रोग तपासणी, फवारणी सारखी विविध कार्य करण्याकरिता संरचना व निर्मिती सारख्या शेतीविषयक नवीन ड्रोन तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे स्वतः या अभ्यासक्रमात एक विषय शिकविणार असून अभ्यासक्रमातील कृषी विषयक ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम तयार करताना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ यांची प्रमुख उपस्तिथी होती. या अभ्यासक्रमाची माहिती htttp://nahep.vnmkv.org.in या संकेतस्थळावर ऊपलब्ध असून सदरील अभ्यासक्रमाकरिता इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज गूगल फॉर्म द्वारे संकेत स्थळावर नोंदीत करावा. या अभ्यासक्रमानंतर विविध कृषी ड्रोन उत्पादक कंपनी, शासकीय कार्यालय, सुरक्षा मंत्रालय, ई. सारख्या क्षेत्रात नौकरी वा स्वत:चा व्यवसाय असा फायदा होऊ शकतो. मागील वर्षापासुन नाहेप केंद्राने कृषी ड्रोन क्षेत्रात भरपूर कार्य केलेले असून संशोधन विद्यार्थ्यांना तंतोतंत कृषी व्यवसायकता साधण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या आहेत व विविध १२ देशात ५५ संशोधन विद्यार्थ्यांना तसेच २५ प्राध्यापकांना एक ते तीन महिने प्रशिक्षणासाठी पाठविले व त्यावर संशोधन प्रकाशने झाली.

सेरेब्रोस्पार्क इंनोवेशन्स, पुणे ड्रोन संरचना, उत्पादन व कृषि संबंधित सेवा कार्य करीत असून पाच वर्षाचा करार कालावधी दरम्यान कृषी ड्रोन संशोधन, चालक, चाचणी व दुरुस्ती सारख्या कार्याकरिता वनामकृवि सोबत कार्य करणार असून या करारातून दोन्ही संस्थांना निश्चित कार्य प्रणाली करण्यास आश्वासित केले.

नाहेप चे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी प्रास्ताविक व संशोधन करण्यासंबंधी करारा बाबत माहिती दिली. याप्रसंगी उप अन्वेषण डॉ. डी. डी. टेकाळे, डॉ. गोदावरी पवार, डॉ. प्रवीण कापसे, डॉ. विशाल इंगळे, डी. व्ही. पाटील यांची उपस्थिती होती. या अभ्यासक्रम व करार कार्यात इंजी. श्रद्धा मुळे, संशोधन सहाय्यक व इंजी. विशाल काळबांडे यांनी सहभाग नोंदविला.

कानसूर येथे वनामकृविद्वारा किसान गोष्टीचे आयोजन

 मेहनती शेतकरी विद्यापीठाचे राजदूत ....मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि कानसूर येथील प्रगतशील शेतकरी ह.भ.प. श्री.अच्युत महाराज शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे कानसूर, तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथे “किसान गोष्टी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रगतशील शेतकरी श्री नागोरावजी आरबाड हे होते. कार्यक्रमास संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, प्राचार्य डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. पी.एच. वैद्य, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. कलालबंडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी, ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून तसेच योग्य आच्छादन आणि ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन अशा अचूक शेती व्यवस्थापनाद्वारे मिरचीचे विक्रमी उत्पादन घेणारे प्रगतशील शेतकरी ह.भ.प. श्री. अच्युत महाराज शिंदे यांच्या कार्याचा गुणगौरव केला. वयाच्या ७८ व्या वर्षी सुद्धा साधारणपणे एकरी अंदाजे रुपये पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळवणारे शेतकरी यांची चिकाटी, मेहनत आणि जिद्द याबद्दल माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी प्रशंसा केली आणि असे मेहनती शेतकरी हे विद्यापीठाचे राजदूत असल्याचे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्रगतशील शेतकरी श्री नागोरावजी आरबाड यांनी शाश्वत शेती व्यवसायासाठी आधुनिक शेती व्यवस्थापनाचे महत्व यावेळी नमूद केले. तद्नंतर संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके आणि संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच डॉ. लक्ष्मणराव खरवडे, प्राचार्य श्री के. पी. कनके, प्रगतशील शेतकरी श्री रामभाऊ शिंदे, श्री मदन महाराज शिंदे, श्री प्रल्हाद महाराज शिंदे यांनी आपल्या शेती विषयक समस्या उपस्थित केल्या, त्यावर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी समस्यांना समर्पक असे उत्तर देऊन शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील प्रगतशील शेतकरी शास्त्रज्ञ व कृषी सेवा केंद्रांचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.





Thursday, May 2, 2024

वनामकृविचा एमजीएम विद्यापीठासोबत सामंजस्य करार

विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी महत्वपूर्ण करार.... मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठ, यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी द्वारा माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी तर एमजीएम विद्यापीठ, यांच्यामार्फत माननीय कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या सामंजस्य करारानुसार दोन्ही विद्यापीठात सांघिकरीत्या, सहकार्यातून आणि सुसंवादातून अद्ययावत ज्ञान आणि विविध शैक्षणिक, संशोधनात्मक पद्धतींची देवाण-घेवाण साधण्यात येणार आहे. तसेच समान ध्येय-धोरणाद्वारे संवादाचे माध्यम स्थापित करून त्याद्वारे दोन्ही विद्यापीठाच्या विद्यार्थ्याना कौशल्य विकासाचे महत्वपूर्ण कार्य केले जाईल असे मत वनामकृविचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केले. यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगार आणि व्यवसायाच्या संधी मिळण्यासाठी लाभ मिळणार आह. याशिवाय पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक सुधारणा नाविन्याची ओढ निर्माण करणे तसेच स्पर्धेमध्ये सहभागी होवून यश मिळविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबरोबरच भविष्यात नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार दोन्ही विद्यापीठाद्वारे शैक्षणिक आणि संशोधनात्मक संयुक्त प्रकल्प राबविण्यात येतील.        

यावेळी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, संचालक शिक्षण डॉ.उदय खोडके, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, उपसंचालक डॉ. दिगंबर पेरके, तांत्रिक अधिकारी डॉ. सचिन मोरे, डॉ. प्रवीण कापसे आणि एमजीएम विद्यापीठाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.





Wednesday, May 1, 2024

वनामकृवित महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन साजरा

 महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा प्रेरणादायी....कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य क्रीडा प्रांगणात कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि यांनी शुभेच्छा दिल्या.

या वेळी मार्गदर्शनात मा. कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले कीमहाराष्ट्राचा ऐतिहासिकसांस्कृतिक आणि सामाजिक वारसा अतुलनिय आणि प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र ही संतमहंतऋषी तसेच वीरांची भूमी आहे. संताच्या प्रेरणेतून नीती, जीवन मुल्ये, नैतिकता, चारित्र्य, बंधुभाव आणि धर्मभावाची जपणूक केली जात आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेवून महाराष्ट्रातून अनेक देशभक्त निर्माण झाले आणि त्यांनी इंग्रजाविरुद्ध लढून देशाच्या स्वातंत्रासाठी योगदान दिले. तसेच महात्मा फुले, राजश्री शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या महान समाजसुधारकांनी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी अतिउच्च प्रयत्न केले. महाराष्ट्रास मिळालेल्या अशा मोठ्या वारस्यामुळे येथील नागरिकांच्या जीम्मेदारीमध्येही वाढ झाली. कोणत्याही प्रदेशाची ओळख त्याच्या भौगोलिक सीमेवरून नसून तेथील नागरिकांच्या विकासात्मक कार्यावरून केली जाते. तसेच आपल्या परिसराचा, प्रदेशाचा आणि राष्ट्राचा विकास साधायचा असेल तर स्वतः मध्ये सकारात्मक बदल करून स्वतःच्या कार्याचा गौरव करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्राची प्रेरणादायी परंपरेचा  लाभदायी ठरते आणि यातूनच महाराष्ट्राने साहित्य, कला, शिक्षण, खेळ, संस्कृती, चित्रपट, संगीत, कृषि, अभियांत्रिक, वैद्यकिय, संगणक, औद्योगिक, दळणवळण या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे असे प्रतिपादन केले. तसेच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचा मुख्य व्यवसाय शेती असून शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वसंतराव नाईक मराठावाडा कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून कार्य करत आहोत हे एक सौभाग्य असून या विद्यापीठातून मराठवाडा विभागातील कृषि क्षेत्रासाठी शैक्षणिक, संशोधनात्मक आणि विस्तार कार्याद्वारे मोठे योगदान दिलेले आहे. विद्यापीठाने संशोधित विविध पिकांचे वाण आणि २५ वा दीक्षांत समारोह, पश्चिम विभागीय कृषी मेळावा, १२ वी राष्ट्रीय बियाणे परिषद यासारख्या उल्लेखनीय कार्यामुळे विद्यापीठाचे नाव राष्ट्रीय पातळीवर वरच्या श्रेणीमध्ये घेतले जात आहे. विद्यापीठाने मनुष्यबळ विकासासाठी नाहेप प्रकल्पांतर्गत शास्त्रज्ञांना बाहेरदेशात पाठवून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण दिले याचा फायदा विद्यापीठाच्या कार्यास मिळण्यास सुरुवात झालेली आहे. याबरोबरच विद्यापीठाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संस्थेसोबत सामंजस्य करार केलेले आहेत. याशिवाय खाजगी संस्थेद्वारे ६५ कोटींचा सीएसआर निधी विद्यापीठास  मिळालेला आहे, यातून विद्यापीठाच्या कार्यास अतिरिक्त लाभ मिळाला आहे. भविष्यात शैक्षणिक विकासासाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करणार असून, याद्वारे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासास प्राधान्य देण्यात येणार. विद्यापीठ शेतकरी केंद्रीत विस्तार कार्य, विद्यार्थी केंद्रीत शिक्षण, नवाचार केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी केंद्रीत प्रशासन हा दृष्टीकोन ठेऊन कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागरप्राचार्या डॉ जया बंगाळेप्राचार्य डॉ विश्वनाथ खंदारे ,विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर  आदींसह विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, आणि विद्यार्थी यांची बहुसंखेने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्री उदय वाईकर यांनी केले.





Monday, April 22, 2024

वनामकृविचा अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील आचार्य नरेंद्र देव कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठासोबत सामंजस्य करार

कृषि, वन, पशुपालन आणि हवामान शास्त्र या विषयांमध्ये संयुक्त कार्य करण्यावर भर.... कुलगुरू डॉ. इन्द्र मणि 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि आचार्य नरेंद्र देव कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, कुमारगंज, अयोध्या, उत्तर प्रदेश यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी द्वारा माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी तर आचार्य नरेंद्र देव कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, कुमारगंज, अयोध्या, उत्तर प्रदेश यांच्यामार्फत माननीय कुलगुरू डॉ. बिजेंद्र सिंह यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
दोन्ही विद्यापीठांमधील सामंजस्य करारानुसार कृषि, वन, पशुपालन आणि हवामान शास्त्र या क्षेत्रामध्ये संयुक्तपद्धतीने कार्य करण्यासाठी सहमती दर्शवली असून या कार्याच्या अंमलबजावणीचे धोरणावरही सखोल चर्चा करून निर्णय घेण्यात आले.  या सामंजस्य करारानुसार होणाऱ्या शैक्षणिक आणि संशोधनात्मक कार्याचा लाभ दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थ्यांसहित विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना होईल, याबरोबरच नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले व्यावसायिक शिक्षण तसेच कौशल्य प्रशिक्षण मिळण्याची संधी प्राप्त होवून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये विकास होणार आहे.
सदरील करार वनामकृविसोबत करण्यासाठी आचार्य नरेंद्र देव कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने पुढाकार घेतला आणि माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या आचार्य नरेंद्र देव कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भेटीदरम्यान करण्यात आला. यावेळी त्या विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. ए के गंगवार, उपसंचालक संशोधन डॉ. शंभूप्रसाद, कुलसचिव डॉ. पी एस प्रामाणिक, विविध शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रतिमा सिंह, डॉ. संजय पाठक, डॉ. सी पी सिंह, हवामान शास्त्रज्ञ डॉ. सीताराम मिश्रा आणि कुलगुरू यांचे स्वीय सचिव डॉ. जसवंत सिंह यांची उपस्थिती होती.


Sunday, April 14, 2024

वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती दिनांक १४ एप्रिल रोजी साजरी करण्‍यात आली. यावेळी भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे माननीय कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले आणि भन्ते संघरत्न यांच्याद्वारे वंदना घेण्यात आली. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ उदय खोडके,  विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखलेसंशोधन संचालक डॉ खिजर बेग, संशोधन संचालक (बियाणे) डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव श्री. पुरभा काळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईलडॉ. जया बंगाळेडॉ. राजेश क्षीरसागरडॉ. गजेंद्र लोंढेडॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माननीय कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि यांनी अध्यक्षीय भाषणात भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्‍त शुभेच्‍छा दिल्या आणि पुढे म्हणाले की, महाराष्ट्र ही राष्ट्रपुरुषांची भूमी असून भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातून देशाला मिळालेले महान राष्ट्रपुरुष आहेत. भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जेचे उच्चविद्याविभूषित होते. त्यांनी शंभर वर्षापूर्वी द प्रोब्लेम ऑफ रुपी या विषयावर आपला प्रबंध सादर केला आणि त्यातील शिफारशी तत्कालीन सरकारने विचारात घेवून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. त्यांनी अपार संघर्ष आणि कठोर परिश्रम आपल्या जीवनामध्ये घेतले आणि हीच समानता सर्व महापुरुषांमध्ये होती. त्यांचे व्यक्तिमत्व उच्चविचारी, प्रतिभावंत, प्रभावशाली, कल्याणकारी, अन्याय दूर करणारे अश्या व्यापक विचारधारेचे होते. त्‍यांचे विचार आजही जीवंत आहेत. त्‍यांचा आदर्श आणि त्यांनी दाखविलेल्‍या मार्गाचा आपण सर्वांनी अवलंब केल्‍यास भविष्यातील विकसित भारत २०४७ ची संकल्पना उत्कृष्ठरीतीने साध्य होईल असे नमूद केले आणि विद्यापीठ मुख्यालय तसेच मुख्यालयाबाहेरील महाविद्यालयात जयंती निमित्‍त विद्यार्थ्‍यांनी राबविलेल्‍या सलग अठरा तास अभ्‍यास उपक्रम तसेच इतर विविध उपक्रमाचे कौतुक केले. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थी ज्ञानेश्वर खटिंग यांनी केले तर आभार डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारीकर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.