मराठवाडा विभागातील कृषि क्षेत्राच्या विशेष गरजा व लोकभावना
लक्षात घेवून परभणी येथे १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषि विद्यापीठाची स्थापना
करण्यात आली. हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी
वर्षानिमित्य त्यांच्या राज्यातील कृषि क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल १
जुलै २०१३ रोजी विद्यापीठाच्या नामविस्तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
असा करण्यात आला आहे.
शिक्षण – १९५६ साली परभणी येथे कृषि महाविद्यालयाच्या स्थापनेने सुरवात होऊन आज विद्यापीठांतर्गत १६ घटक व ४३ संलग्न महाविद्यालये आहेत. तसेच ६ घटक व ५१ संलग्न कृषि तंत्र विद्यालये आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना कृषि विषयक शिक्षण देण्यात येते. विद्यापीठामध्ये कृषि, उद्यानविद्या, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, कृषि अभियांत्रीकी, गृहविज्ञान, अन्नतंत्रज्ञान यात दोन वर्षाचा पदव्युत्तर तर आचार्य पदवी कार्यक्रम कृषि शाखेच्या नऊ विषयात, अन्नतंत्रज्ञान शाखेत पाच विषय, कृषि अभियांत्रिकी शाखेतील चार विषयात व गृह विज्ञान शाखेत एका विषयात राबविण्यात येतो. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासुन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे.
संशोधन – विद्यापीठात राज्य शासन अनुदानीत १९ संशोधन
योजना, २३ अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प कार्यरत
असुन आजपर्यंत १६० विविध
पिकांचे वाण, ६० कृषि औजारे व
यंत्रे विकसीत करुन ११४४ तंत्रज्ञान शिफारसी
शेतक-यांसाठी प्रसारीत केल्या आहेत.
विस्तार शिक्षण - विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकयांपर्यंत पोहोचण्याचे कार्य विस्तार शिक्षण गट (१) , कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र (१), विभागीय कृषि विस्तार केंद्र (४) तसेच ४ घटक व ८ अशासकीय कृषि विज्ञान केंद्राद्वारे केल्या जाते. विविध शेतकरी मेळावे, कृषि प्रदर्शने, चर्चासत्रे, शेतकरी प्रशिक्षणे, गटचर्चा, प्रत्यक्ष भेटी, कार्यशाळा आदींचे आयोजन विद्यापीठाच्या वतीेने करण्यात येते. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांच्या शेतापर्यंत जलदगतीने व प्रभावीपणे पोहोचण्यासाठी तसेच शेतक-यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी ‘विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी’, 'उमेद', 'माझा दिवस माझ्या बळीराजासोबत ' नाविन्यपुर्ण विस्तार शिक्षण उपक्रम राबविण्यात येतात. नियमितपणे प्रसार माध्यमे, आकाशवाणी, ऑनलाईन माध्यमाव्दारे शेतकरी बांधवांच्या कृषि विषयक समस्यांचे शास्त्रज्ञांच्या वतीने समाधान केले जाते.