Tuesday, April 30, 2019

सर्वांच्‍या प्रयत्‍नांमुळे पिकांवरील कीड व्‍यवस्‍थापनाबाबतचा क्रॉपसॅप प्रकल्‍प यशस्‍वी.......कृ‍षी आयुक्‍त मा श्री सुहास दिवसे

वनामकृवित मराठवाडा विभागीय क्रॉपसॅप अंतर्गत खरीप हंगामपूर्व कार्यशाळा संपन्‍न

कृषी विभागातील कर्मचारी व कृषी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ यांच्‍या प्रयत्‍नांमुळे पिकांवरील कीड व्‍यवस्‍थापनाबाबतचे क्रॉपसॅप मॉडेल यशस्‍वी झाले आहे. या प्रकल्‍पात केलेल्‍या कामाच्‍या अनुभवामुळे अधिकारी-कर्मचा-यांचा आत्‍मविश्‍वास वाढीस लागला असुन शेतक-यांचा कृषी विभागाकडे बघण्‍याचा दृष्‍टीकोन बदलला आहे, असे प्रतिपादन कृषी आयुक्‍त मा श्री सुहास दिवसे यांनी केले. महाराष्‍ट्र शासनाचा कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठातील कृषी कीटकशास्‍त्र विभाग यांच्‍या वतीने कीड-रोग सर्वेक्षण प्रकल्‍प (क्रॉपसॅप) अंतर्गत दिनांक 30 एप्र‍िल रोजी परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात आयोजित खरिप हंगामपुर्व मराठवाडा विभागीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कृषी आयुक्‍तालयातील संचालक (विस्‍तार व प्रशिक्षण) श्री विजयकुमार घावटे, लातुरचे विभागीय कृषी सहसंचालक श्री तुकाराम जगताप, औरंगाबादचे श्री प्रतापसिंह कदम, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा श्री दिवसे पुढे म्‍हणाले की, देशाची अर्थव्‍यवस्‍था संपुर्णपणे कृषी क्षेत्रावरच अवलंबुन असुन तापमान वाढीचा सर्वाधिक परिणाम कृषी अर्थव्‍यवस्‍थेवर झाला. राज्‍याचा कृ‍षी विभाग ही महत्‍वाची विकास यंत्रणा असुन कृषी विभागाच्‍या अधिकारी व कर्मचा-यांनी समर्पित भावनेने शेतक-यांना सेवा द्यावी. कृषी तंत्रज्ञान नेहमीच अद्ययावत ठेवा, हंगामापुर्वीच कामाचे योग्‍य नियोजन करा, संवाद कौशल्‍य आत्‍मसात करा, माहिती तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांपर्यंत तंत्रज्ञान पोहचवा. क्रॉपसॅप प्रकल्‍पात कपाशीवरील गुलाबी बोंडअळी, मका व ज्‍वारी वरील लष्‍करी अळी, उसातील हुमणी आदी किडींचा समावेश करण्‍यात आल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.  
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, बदलत्‍या हवामान परिस्थितीत पिकांवरील कीड व रोगांचे स्‍वरूप बदलत आहे, पिकांवरील दुय्यम कीड आज मुख्‍य कीड होत आहे. त्‍याप्रमाणे क्रॉपसॅप प्रकल्‍पात वेळोवेळी बदल करण्‍यात आला. गतवर्षी क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत कृषि विभागातील कर्मचारी, कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व विद्यार्थ्‍यी यांच्‍या समन्‍वयाने राबविण्‍यात आलेल्‍या मोहीमेमुळे शेतकरी कापसावरील गुलाबी बोंडअळीचे व्‍यवस्‍थापन चांगल्‍या प्रकारे करू शकले, यामुळे शेतक-यांचे किडीं पासुन होणारे नुकसान बऱ्याच अंशी कमी झाले. याही वर्षी पिकांवरील कीड व्‍यवस्‍थापनाबाबत शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्‍यासाठी कृषि विभाग व विद्यापीठाच्‍या समन्‍वयाने कार्य करूया. याबाबत मनुष्‍यबळाच्‍या प्रशिक्षणाची संपुर्ण जबाबदारी परभणी कृषी विद्यापीठ घेईल, असे आश्‍वासन त्‍यांनी दिले.  
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक श्री तुकाराम जगताप यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ अनंत बडगुजर यांनी केले. तांत्रिक सत्रात कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनावर डॉ पी आर झंवर यांनी तर मका पिकावरील लष्‍करी अळीचे एकात्मिक व्‍यवस्‍थापन यावर डॉ बी व्‍ही भेदे यांनी व उसावरील हुमणीचे व्‍यवस्‍थापनावर डॉ अनंत बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत नांदेडचे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री रविशंकर चलवदे, परभणीचे श्री विजयकुमार पाटील, हिंगोलीचे श्री व्‍ही डी लोखंडे, लातुरचे श्री संतोष आळसे, उस्‍मानाबादचे श्री उमेश घाटगे, जालनाचे श्री बाळासाहेब शिंदे, औरंगाबाद डॉ तुकाराम मोटे आदींसह मराठवाडयातील आठही जिल्‍हयांतील कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठातील समन्‍वयक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

शासकीय सेवेत काम करतांना अनुभवाची शिदोरी महत्वाची असते......शिक्षण संचालक डॉ विलास पाटील

शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषी) डॉ विलास पाटील सेवानिवृत्‍त

कोणत्‍याही संस्‍थेच्‍या प्रगतीसाठी सर्वाच्‍या सहकार्याची गरज असते, संस्‍थेसाठी संपुर्ण समर्पण भावनेने कार्य केले पाहिजे. शासकीय सेवेत काम करतांना अनुभवाची शिदोरी महत्वाची असते, असे प्रतिपादन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ विलास पाटील दिनांक 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्‍त झाले, त्‍यानिमित्‍त विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांच्‍या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर श्रीमती उषाताई अशोक ढवण, डॉ आशाताई विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव श्री रणजित पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ विलास पाटील पुढे म्‍हणाले की, प्रत्‍येकांनी आपल्‍या कामावर प्रेम केले पाहिजे, कामातच तुम्‍हाला आनंद व समाधान मिळेल. सर्वांच्‍या सहकार्यामुळे शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण क्षेत्रात एक चांगले योगदान देऊ शकल्‍याची भावना त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.
अध्‍यक्षीय समारोपात कुलगूरू मा डॉ अशोक ढवण यांनी डॉ विलास पाटील यांनी विद्यापीठातील शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण क्षेत्रात दिलेल्‍या योगदानाबाबत गौरव करून म्‍हणाले की, डॉ पाटील यांनी संशोधनात नवनवीन विषय हाताळले. विद्यापीठास अधिस्‍वीकृती मिळविण्‍यात डॉ पाटील यांचे मोठे योगदान असुन गोळेगांव कृषि महाविद्यालयाची पायाभरणीत त्‍यांचा मोठा हातभार आहे. विद्यापीठाच्‍या शिक्षण क्षेत्रास एक विशिष्‍ट दिशा त्‍यांच्‍या कार्यकाळात प्राप्‍त झाली, असे गौरवोदगार त्‍यांनी काढले.
कार्यक्रमात डॉ पाटील यांचा विद्यापीठाच्‍या वतीने सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी डॉ विलास पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली तयार करण्‍यात आलेल्‍या कृषि शिक्षणाची पुढील दिशा यावर आधारीत व्‍हीजन 2025 चा अहवाल माननीय कुलगूरूंना सुपूर्त करण्‍यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्‍यवरांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ रणजित चव्‍हाण यांनी मानले. कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी, विद्यार्थ्‍यी आदीच्‍या विविध संघटनेच्‍या वतीने डॉ विलास पाटील यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

Monday, April 29, 2019

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात सलग अठरा तास अभ्‍यास उपक्रमाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या संयुक्‍त जयंती निमित्‍त दिनांक 29 एप्रिल रोजी सलग अठरा तास अभ्‍यास उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या उपक्रमाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ डी एस पेरके, डॉ डब्‍ल्‍यु एन नारखेडे, डॉ आर पी कदम, डॉ आर व्‍ही चव्‍हाण, डॉ जे व्‍ही एकाळे, प्रा ए एम कांबळे, डॉ आर जी भाग्‍यवंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर आयुष्‍यभर विद्यार्थ्‍यी म्‍हणुनच राहीले. आयुष्‍यात यशस्‍वी होण्‍यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. सतत अठरा तास अभ्‍यास हा उपक्रम अत्‍यंत कौतुकास्‍पद आहे, परंतु हे केवळ उपक्रमापुरते न राहता, एक संस्‍कार झाला पाहिजे. शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविक डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आर जी भाग्‍यवंत यांनी केले तर आभार डॉ आर व्‍ही चव्‍हाण यांनी मानले. महाविद्यालयाच्‍या मुलींच्‍या वसतीगृहातही विद्यार्थ्‍यीनीनी सदर उपक्रम राबविला, याचे उदघाटन श्रीमती उषाताई अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. उपक्रमात कृषि महाविद्यालयाचे तीनशे विद्यार्थी विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषि महाविद्यालयातील प्राध्‍यापक व कर्मचा-यांसह विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.

Saturday, April 27, 2019

वाचनामुळे पराभव पचविण्‍याचे सामर्थ्‍य प्राप्‍त होते....कुलगूरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर वसतीगृह अभ्‍यासिका केंद्राचे उदघाटन

संघर्षातुन यशस्‍वी झालेल्‍या व्‍यक्‍तीचे चरित्र वाचा, वाचनाने विचार प्रगल्‍भ होतात, वाचनामुळे पराभव पचविण्‍याचे सामर्थ्‍य आपणास प्राप्‍त होते. वाचनाची गोडी लावा, असा सल्‍ला कुलगूरू मा डॉ अशोक ढवण यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर वसतीगृहात अभ्‍यासिका केंद्राचे उदघाटन दिनांक 26 एप्रिल रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, त्‍या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर, मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ राजेश कदम, विद्यार्थ्‍यी प्रतिनिधी अभिनव काटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगूरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, आज महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांना नौकरीसाठी जीवघेणी स्‍पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. काही विद्यार्थ्‍यांमध्‍ये अपयशामुळे नैराश्‍य येते, परंतु अपयशाने खचुन जाऊ नका. स्‍वत:च्‍या कर्तुत्‍वावर विश्‍वास ठेवा, कोणताही शार्टकट शोधु नका. सेवाक्षेत्रात नौकरी व व्‍यवसायाच्‍या अनेक संधी आहेत. नियती कष्‍टाचे फळ नेहमीच भरभरून देते. जीवनात चढउतारात होत राहतात, पराभवातच उज्‍वल आयुष्‍याच्‍या संधी दडलेल्‍या असतात. वसतीगृह तेथे अभ्‍यासिका या उपक्रमामुळे वसतीगृहात अभ्‍यासासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होईल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.  
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, कृषि विद्यापीठातुन आज अनेक विद्यार्थ्‍यी स्‍पर्धा परिक्षेत उर्त्‍तीण होऊन विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, परंतु ज्‍या संस्‍थेमुळे आपण मोठे झालो, त्‍या संस्‍थेच्‍या हिताचे वेळोवेळी भान ठेवावे. विद्यापीठातील स्‍पर्धामंच व अभ्‍यासिका अधिकाधिक वृध्‍दींगत करण्‍यासाठी आपलाही वाटा देण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले.  
याप्रसंगी कृषी महाविद्यालयाच्‍या वतीने अभ्‍यासिकाकरिता स्‍पर्धापरिक्षेकरिता उपयुक्‍त अशी विकत घेण्‍यात आलेल्‍या दीड लाख रूपयांच्‍या पुस्‍तकांचा समावेश असलेल्‍या पुस्‍तक कक्षाचेही उदघाटन करण्‍यात आले. तसेच सन 2018-19 मध्‍ये स्‍पर्धपरिक्षेत यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार माननीय कुलगूरू यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.
प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी विद्यार्थ्‍यांना अभ्‍यासाकरिता विविध सुविधा पुरविण्‍याकरिता परभणी कृषि महाविद्यालय नेहमीच प्रयत्‍नशील असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाधान चोपडे यांनी केले तर आभार स्‍वप्‍नील भोसले यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Friday, April 26, 2019

डॉ बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधानामुळेच देश एकसंघ......डॉ बबन जोगदंड


भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वश्रेष्‍ठ संविधान दिले, 69 वर्षानंतरही देश एकसंघ असुन पुढे अनेक वर्ष अखंडच राहणार आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्‍हाण विकास प्रबोधीनीचे संशोधन अधिकारी (प्रकाशन) डॉ बबन जोगदंड यांनी केले­. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कास्‍ट्राईक कर्मचारी महासंघ वनामकृवि शाखेच्‍या वतीने महात्‍मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या संयुक्‍त जयंती महोत्‍सवानिमित्‍त दिनांक 25 एप्रिल रोजी आयोजित व्‍याख्‍यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते, तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, डॉ पंदेकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डि एम मानकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, महा‍संघाचे अध्‍यक्ष डॉ गजेंद्र लोंढे, महासचिव प्रा ए एम कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ बबन जोगदंड पुढे म्‍हणाले की, संविधानामुळेच देशातील प्रत्‍येक नागरिक समता, स्‍वातंत्र्य, धार्मिक स्‍वातंत्र्य, शैक्षणिक स्‍वातंत्र्य उपभोगत आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीसाठी कठोर मेहनत घेतले. डॉ आंबेडकर हे शिक्षण, शिस्‍त, कठोर परिश्रम, स्‍वावलंबन, स्‍वाभीमान आदींमुळेच एक महान कार्य करू शकले. डॉ आंबेडकरांना शेतक-यांसाठी काम करण्‍याची इच्‍छा होती. अनेक धरण निर्मितीत त्‍यांचे योगदान होते. त्‍यांनी जीवनात शिक्षणाला सर्वाच्‍च स्‍थान दिले, ते आयुष्‍यभर विद्यार्थ्‍यी म्‍हणुनच राहिले. प्रत्‍येक नागरिकाला मतदानाचा अधिकरी दिला, स्‍त्रीयांना पुरूषाबरोबर समान अधिकार दिले. बालमजुरी रोखण्‍यासाठी कायदयात तरतुद केली. समाजहितासाठीच अन्‍यायाविरूध्‍द लेखणीने प्रहार केले. आज विदेशातही डॉ आंबेडकरांची जयंती मोठया उत्‍साहाने साजरी केली जाते, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.  
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी देशातील अनेक महान व्‍यक्‍तीचे विचारधन आपल्‍याकडे आहे, त्‍यांच्‍या विचारांचे सातत्‍याने चिंतन केले पाहिजे अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.  
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ गजेंद्र लोंढे यांनी केले तर प्रमुख व्‍यक्‍तांचा परिचय डॉ व्‍ही के टाकणखार यांनी करून दिला. सुत्रसंचालन डॉ फरिया खान यांनी केले तर आभार प्रा ए एम कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास शहरातील नागरिक, विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

बदलत्‍या हवामानास अनुकूल कृषि विद्यापीठ शिफारसीत तंत्रज्ञान प्रसारावर भर देणार.......मा श्री विकासचंद्र रस्‍तोगी (आयएएस)

वनामकृवित पोक्रा प्रकल्‍पांतर्गत कार्यशाळा संपन्‍न
हवामानात बदलाच्‍या परिस्थितीत मृद व जल संवर्धन यावर विशेष लक्ष दयावे लागेल. पोक्रा प्रकल्‍पांतर्गत मराठवाडा व विदर्भातील दुष्‍काळग्रस्‍त गावांत बदलत्‍या हवामानास अनुकूल कृषि विद्यापीठाने संशोधित केलेले विविध पिकांचे प्रसारित वाण व शिफारसीत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न करण्‍यात येणार आहेत, असे प्रतिपादन हवामान अनुकूल कृषि प्रकल्‍पांचे प्रकल्‍प संचालक मा श्री विकासचंद्र रस्‍तोगी (आयएएस) यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात हवामान अनुकूल कृषि प्रकल्‍पांतर्गत (पोक्रा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्‍प) एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजन दिनांक 26 एप्रिल रोजी करण्‍यात आले होते, कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले, हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ रविंद्र चारी, बारामती येथील राष्‍ट्रीय अजैविक ताण व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे संचालक डॉ एन पी सिंग, वनामकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, डॉ पदेकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डी एम मानकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा श्री विकासचंद्र रस्‍तोगी पुढे म्‍हणाले की, कमी पर्जन्‍यमानात रूंद वरंबा व सरी पध्‍दतीने पिकांची लागवड केल्‍यास मृद व जल संवर्धन होऊन चांगले उत्‍पादन घेता येते, त्‍यामुळे या तंत्रज्ञानाबाबत विस्‍तार कार्यकर्ते व शेतक-यांना प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. कमी पाण्‍यात फळबाग व्‍यवस्‍थापनाचे कमी खर्चिक तंत्रज्ञान कृषि विद्यापीठाकडे उपलब्‍ध असुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. मराठवाडयात व विदर्भात खरिपातील ज्‍वार लागवडीचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन खालील क्षेत्र वाढले आहे. परंतु ज्‍वारी हे पिक पाण्‍याचा ताणसहन करणारे असुन मानवास अन्‍न तर जनावरास चारा पुरवणारे असल्‍यामुळे पुन्‍हा खरिप ज्‍वारी खालील क्षेत्र वाढण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न करावे लागतील. बीटी कपाशी एैवजी कपाशीचे सरळ व देशी वाणाची लागवड तज्ञांच्‍या निरिक्षणाखाली केल्‍यास निश्चितच कमी खर्चात शाश्‍वत उत्‍पादन घेता येईल. तंत्रज्ञानाच्‍या आधारे शेतमालाचे उत्‍पादन वाढविण्‍यात येऊ शकेल परंतु शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढीसाठी योग्‍य बाजारभाव, काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, साठवणुक व विपणन व्‍यवस्‍था आदींचे बळकटीकरण करण्‍याची आवश्‍यकता आहे. पोक्रा अंतर्गत गावांत कृषि तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्‍यासाठी शेतीशाळेचेही आयोजन करण्‍यात येणार आहे. प्रकल्‍पांतर्गत निवडलेल्‍या गाव समुहातील प्रत्‍येक गावांचे सुक्ष्‍म नियोजन आराखडे तयार करून ग्रामसभेच्‍या मान्‍यतेने व ग्राम कृषि संजीवनी समितीव्‍दारे गावामध्‍ये हाती घ्‍यावयाच्‍या उपाययोजनांचा प्राधान्‍यक्रम निश्चित करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  
कुलगूरू मा डॉ अशोक ढवण आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञान विद्यापीठाकडे उपलब्‍ध असुन हे तंत्रज्ञान पोक्रा प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी विद्यापीठ संपुर्णपणे सहकार्य करेल.     
कुलगूरू मा डॉ विलास भाले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, पोक्रा प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन खरिप हंगामात पावसाच्‍या खंडात एका संरक्षित पाण्‍याची सुविधा उपलब्‍ध झाली तरी पिकांचे उत्‍पादन वाढु शकते. मराठवाडा व विदर्भ विभागातील कापुस व सोयाबीन पिकांची लागवड मोठया प्रमाणात होत असुन पिक पध्‍दतीत बदल करावा लागेल. ऊस लागवडीसाठी मोठया प्रमाणात पाण्याची गरज लागते त्‍याऐवजी कमी कालावधीत व कमी पाण्‍यावर येणारे शुगरबीटची लागवड करता येऊ शकते. ठिंबक सिंचन पध्‍दतीवरच संपुर्ण फळबाग लागवड करावी लागेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. 
कार्यशाळेत डॉ रविंद्र चारी, डॉ एन पी सिंग व विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आर एन खंदारे यांनी केले तर आभार पोक्रा प्रकल्‍प उपसंचालक डॉ विजय कोळेकर यांनी मानले. कार्यशाळेत परभणी, अकोल व राहुरी येथील कृषि विद्यापीठातील तसेच राष्‍ट्रीय व राज्‍यस्‍तरीय विविध कृषि संशोधन केंद्रे, कृषि विज्ञान केंद्रे, मुंबई येथील आयआयटी, कृषि विभागातील तज्ञ, शास्‍त्रज्ञ व अधिकारी मोठया संख्‍येने सहभागी झाले होते.
हवामान अनुकूल कृषि प्रकल्‍पांतर्गत (पोक्रा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्‍प) विदर्भ व मराठवाडयातील दुष्‍काळग्रस्‍त गावांमध्‍ये जागतिक बॅकेच्‍या अर्थसहाय्याने राज्‍यात सद्या 5142 गावांत राबविण्‍यात येत आहे. या प्रकल्‍पांतर्गत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ व राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित व शिफारसीत हवामान अनुकुल कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार राज्‍याच्‍या कृषि विभागाच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात येणार आहे.
मा श्री विकासचंद्र रस्‍तोगी मार्गदर्शन करतांना 
मार्गदर्शन करतांना कुलगूरू मा डॉ अशोक ढवण
मार्गदर्शन करतांना कुलगूरू मा डॉ विलास भाले

Saturday, April 20, 2019

वनामकृवित महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त डॉ बबन जोगदंड यांचे व्या‍ख्यान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कास्‍ट्राईक कर्मचारी महासंघ वनामकृवि शाखेच्‍या वतीने महात्‍मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या संयुक्‍त जयंती महोत्‍सवानिमित्‍त दिनांक 25 एप्रिल रोजी सायंकाळी 5.00 वाजता परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात पुणे येथील यशवंतराव चव्‍हाण विकास प्रबोधीनीचे संशोधन अधिकारी (प्रकाशन) डॉ बबन जोगदंड यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे लाभणार आहेत, तरी व्‍याख्‍यानास जास्‍तीत जास्‍त संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन महा‍संघाचे अध्‍यक्ष डॉ गजेंद्र लोंढे, महासचिव प्रा ए एम कांबळे आदींनी केले आहे.

Tuesday, April 16, 2019

मौजे बाभुळगांव येथील श्री बाबासाहेब पारधे यांना क्रीडा संस्‍थेचा उत्‍कृष्‍ट शेतकरी पुरस्‍कार

परभणी तालुक्‍यातील मौजे बाभुळगांव येथील प्रगतशील शेतकरी श्री. बाबासाहेब पारधे यांना भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत असलेल्‍या हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्‍थेच्‍या (क्रीडा) वतीने 2019 वर्षाचा कोरडवाहु शेतीतील उत्‍कृष्‍ट शेतकरी पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आला. केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्‍थेच्‍या स्‍थापना दिनीनिमित्‍त हैद्राबाद येथे सदरिल पुरस्‍कार  संस्‍थेचे संचालक मा. डॉ. जी. रविंद्र चारी व प्रो. जयशंकर तेलंगणा कृषि विदयापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रवीण राव यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. यावेळी वरीष्‍ठ संशोधन सहयोगी डॉ. हनुमान गरूड हे उपस्थित होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍पाच्‍या कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्‍या वतीने परभणी तालुक्‍यातील मौजे बाभुळगांव येथे हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रम राबविण्‍यात येत असुन श्री बाबासाहेब पारधे यांनी हवामान बदलानुरूप परिस्थितीत अनुकूल कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीत शाश्‍वत उत्‍पादन मिळवित आहेत. कोरडवाहू शेतीतील विविध तंत्रज्ञानाबाबत श्री बाबासाहेब पारधे यांना कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार व वरीष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. मदन पेंडके यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

Sunday, April 14, 2019

वनामकृवित भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती उत्‍साहात साजरी

लोकशाही अधिक भक्कम करण्‍यासाठी मतदानाचा हक्‍क बजावा.....कुलगुरू मा डॉ अशोक ढवण 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती दिनांक 14 एप्रिल रोजी उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ उद्य खोडके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, विभाग प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे, डॉ डब्‍लु एन नारखेडे, विद्यार्थ्‍यी प्रतिनिधी राहुल आरकडे, गुलाब इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील अनेक देशांच्‍या संविधानाचा बारकाईने अभ्‍यास करून भारतीय परिस्थितीस अनूकुल अशी जगातील सर्वश्रेष्‍ठ संविधानाची निर्मिती केली. ताठरता व ठिसुळता असे दोन्‍ही गुण या संविधानात आहेत. याच संविधानाच्‍या आधारे जगातील सर्वात मोठया लोकशाही देशातील कारभार चालतो. आपल्‍या देशाची लोकशाही अधिक भक्कम करण्‍यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्‍क बजावला पाहिजे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे ढोलताशाच्‍या गजरात विद्यापीठ परिसरात मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रज्ञशिल वाघमारे यांनी केले तर आभार राहुल कन्‍हेरकर यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Saturday, April 13, 2019

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समानतेचा हक्‍क मिळवुन दिला......डॉ प्रकाश हसनाळकर

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंती महोत्‍सवानिमित्‍त आयोजीत व्‍याख्‍यानात प्रतिपादन
इतिहासापासुन आपण धडा घेतला पाहिजे महापुरूषाच्‍या केवळ जयंती महोत्‍सव साजरी करून न थांबता, त्‍यांच्‍या विचारांचा आपल्‍या जीवनात अवलंब केला पाहिजे. भारतीय संविधानाची निर्मिती करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण, स्‍वांतत्र्याचा सर्वांना समान हक्‍क प्राप्‍त करून दिला, असे प्रतिपादन पुणे येथील पशुसंवर्धन विभागाचे विभागीय उपायुक्‍त डॉ प्रकाश हसनाळकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 128 व्‍या जयंती निमित्‍त दिनांक 13 एप्रिल रोजी आयोजित व्‍याख्‍यानाच्‍या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे, डॉ डब्‍लु एन नारखेडे, विद्यार्थ्‍यी प्रतिनिधी राहुल आरकडे, गुलाब इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ प्रकाश हसनाळकर पुढे म्‍हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजास मुख्‍य प्रवाहात आणले, लेखणीने क्रांती घडवुन आणली. आज समाजात मोठे मतपरिवर्तन दिसते ते समाज सुधारकांच्‍या कार्यामुळे, सामाजिक कार्यामुळे अनेक समाज सुधारकांना समाजात गुरूतत्‍व प्राप्‍त झाले, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी जयंती महोत्‍सवानिमित्‍त थोर महापुरूषांनी केलेल्‍या कार्याच्‍या विविध पैलुचा अभ्‍यास विद्यार्थ्‍यीं करावा असा सल्‍ला त्‍यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा संदिप बडगुजर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Thursday, April 11, 2019

अपयशातुन धडा घेत यशाचा निर्धार केला पाहिजे.....कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

कृषि पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाच्‍या सामाईक प्र‍वेश परिक्षेत परभणी कृषि महाविद्यालयाचा सुशांत धनवडे राज्‍यात प्रथम
महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषि पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 2019 सामाईक प्र‍वेश परिक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्या‍र्थ्‍यी सुशांत धनवडे राज्‍यात प्रथम आला असुन महाविद्यालयाचे 17 विद्यार्थ्‍यांचा पहिल्‍या शंभर मध्‍ये समावेश आहे. या यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार व अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांचा निरोप समारोपाचा कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 9 एप्रिल रोजी महाविद्यालयात करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ डी एन धुतराज, डॉ राकेश आहिरे, डॉ डब्‍लु एन नारखेडे, प्रा संदीप बडगुजर आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कृषि पदवीधरांना सरकारी नौक-यात कमी संधी असल्‍या तरी कॉर्पोरेट क्षेत्र व कृ‍षी प्रक्रिया उद्योगात मोठया संधी असुन त्‍यांचा शोध घ्‍यावा. एखाद्या परीक्षेत आलेल्‍या अपयशाने नाउमेद न होता, प्रत्‍येक अपयशातुन धडा घेत यशाचा निर्धार केला पाहिजे, असे मत व्‍यक्‍त करून या परिक्षेतील विद्यार्थ्‍यांचे यश हे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्‍यापकवृंदाच्‍या परिश्रमामुळे हे शक्‍य झाले, असे गौरवोद्गारही त्‍यांनी काढले.
कार्यक्रमात यशस्‍वी विद्यार्थ्‍यांना कुलगुरूच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी गेल्‍या वर्षीही या परिक्षेत परभणी महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी राज्‍यात प्रथम होता, यावर्षी ही परंपरा राखली असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा विजयकुमार जाधव, सपना डोडे, अच्‍युत पिल्‍लेवाड यांनी केले तर आभार केशव सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषि पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 2019 सामाईक प्र‍वेश परिक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्या‍र्थ्‍यी सुशांत धनवडे राज्‍यात प्रथम आला असुन ऋषिकेश बोधवड हा पाचव्‍या क्रमांकाने उत्‍तीर्ण झाला आहे. तसेच विनोद ओसावर, कृ‍ष्‍णा हरकळ, प्रिया मगर, स्‍वप्‍नाली भापकर, मोहीनी थिटे, शितल नावडे, शुभांगी कदम, सी अनंथु, लक्ष्‍मण कदम, रवि जाधवआरती शिकारी, कल्‍पना देशमुख, कार्तिक जाधव, स्‍नेहल इंगले आदी 17 विद्यार्थ्‍यांचा पहिल्‍या शंभर मध्‍ये समावेश आहे.



Monday, April 8, 2019

वनामकृविच्‍या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्‍यांकरिता दोन दिवसीय कार्यशाळाचे नुकतेच आयोजन करण्‍यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. महाविद्यालयात आयोजित विविध व्‍यक्तिमत्‍व विकासा कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थ्‍यांनी घेऊन स्वत:चे व्यक्तिमत्व फूलवावे, याचा उपयोग भविष्यात चांगल्या प्रकारच्या उद्योग व्यवसाय किंवा नोकरीमध्ये निश्चितच होईल असे मत व्‍यक्‍त केले. कार्यशाळेत संवाद कौशल्ये, निर्णय क्षमता, सकारात्मकता, ध्येयनिश्चिती, वेळेचे व ताणतणाव व्यवस्थापन, मुलाखत कौशल्य, व्यक्तीपरस्पर सबंध आदी विषयांवर पुणे येथील कम्युनिकेअर संस्‍थेचे प्रा. कुशल राऊत आणि प्रा. संजीव राणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्‍या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्‍यांनी कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा वैयक्तिक व प्रोफेशनल जीवनात यशाकरिता निश्चित होणार असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यशाळा आयोजनाकरीता डॉ. वीणा भालेराव, जिमखाना उपाध्यक्षा डॉ. सुनिता काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Friday, April 5, 2019

वनामकृविच्या औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पास समृध्दी अवार्ड

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पास बाजरी व मका पिकांतील संशोधनाबाबत महिंद्रा आणि महिंद्रा समृध्दी अवार्ड 2019 चा कृषि संस्थान सन्मानाने दिनांक 18 मार्च रोजी नवी दिल्ली येथे निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अमिताभ कांत, महिंद्रा आणि महिंद्राचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री पवन कुमार यांचे हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणुन भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा, राष्ट्रीय कृषि कोरडवाहू प्राधिकरणाचे श्री अशोक दलवाई आदीसह कृषि क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सद्यपरिस्थीतीत पिक पध्दतीत बदलाने खाद्य संस्कृती ही बदलत आहे. मागील काही वर्षामध्ये राज्यात ज्वारी आणि बाजरी या अन्नधान्य पिकाखालील क्षेत्र कमी झाले आहे. या बदलामुळे आपले मुख्य अन्नात  ग्लुटेनयुक्त गव्हाच्या चपतीचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे. ज्वारी, बाजरी नाही तर चारा नाही, चारा नाही तर जनावरे नाहीत आणि जनावरे नाहीत तर शेतीला शेणखत नाही. अर्थात पिक पध्दतीतील बदलाच्या या फे-यात मानवी आणि मातीचे आरोग्यही बिघडत चालले आहे. अशा परिस्थतीतीमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, इक्रीसॅट संस्था हैदराबाद व अखिल भारतीय समन्वयीत बाजरी सुधार प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने बाजरी पिकामध्ये अधिकतम लोह व जस्त युक्त एएचबी-1200 (AHB 1200Fe) आणि एएचबी-1269 (AHB 1269) संकरीत वाण राष्ट्रीय स्तरावर  प्रसारीत करण्यात आले आहेत. या वाणा मुळे खाण्यास पौष्टीक आणि आरोग्यदायक बाजरीची भर पडली असल्याने राज्यात बाजरीचे क्षेत्र वाढण्यास हातभार लागेल. या संशोधनामुळे आदिवासी भागातील कुपोषीत लहान मुले आणि महिलांच्या खाद्यामध्ये लोह आणि जस्तयुक्त बाजरीचा समावेश केल्यास कुपोषण कमी करण्यास व महिलांची कार्यक्षमता  वाढण्यास मदत होणार आहे. संशोधन केंद्राने विविध पिकांच्या संशोधन शिफारशी (बाजरा व मका) दिलेल्या असुन विस्तार कार्याद्वारे हे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविले आहे.
राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सुर्यंकांत पवार तसेच पदासकार डॉ. दिपक पाटील, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. गजेंद्र जगताप, प्रा. दिनेश लोमटे, डॉ. एस आर जक्कावाड, डॉ. नितीन पतंगे, प्रा. सुरेखा कदम, श्री. राजेंद्र सावंत आदीसह सेवानिवृत्त पैदासकार डॉ. नंदकुमार सातपुते, डॉ. घुगे, श्री. ठोंबरे, श्री. कनिमर, श्री. चक्रे, श्री. दहिफळे, श्री. लघाने, श्री. माने, श्री. वाघमारे आदींचे संशोधनात योगदान आहे. या सन्‍मानाबाबत विद्यापीठाचे कुलगुरु मा डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले यांनी राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पातील सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले व भविष्यात देखील चांगले कार्य चालु ठेवावे अश्या शुभेच्छा दिल्या.