Wednesday, November 21, 2018

कृषि विद्यापीठ व कृषि विभागांने समन्‍वयाने कार्य केल्‍यास दुष्‍काळाची दाहकता कमी करू शकु......... कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण

वनामकृवित क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत आयोजित कार्यशाळेत लातुर, उस्‍मानाबाद, परभणी, नांदेड व हिगोंली जिल्‍हयातील कृषि अधिकारी व कर्मचा-यांचा सहभाग     
 
मराठवाडयाच्‍या शेतीसमोरील प्रश्‍न संपत ना‍हीत तर प्रश्‍नांचे स्‍वरूप बदलत आहे. हवामान बदलामुळे नवनवीन समस्‍यांना तोंड द्यावे लागत आहे. विधायक दृष्‍टीकोन ठेऊन संकटांना सामोरे गेल्‍यास निश्चितच संकटांची तीव्रता कमी करू शकु. याची प्रचिती आपणास कापसावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी शेतकरी, कृषि विभाग व कृषि विद्यापीठाच्‍या समन्‍वयाने राबविलेल्‍या मोहिमेत आली असुन बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्‍यास आपण ब-यापैकी यश मिळविले. आपणास याच धर्तीवर दुष्‍काळाचा सामना करण्‍यासाठी कृषि तंत्रज्ञान विस्‍ताराचे कार्य करावे लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी केले.   
कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्‍त्र विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने विविध पिकांवरील कीड - रोग सर्वेक्षण व सल्‍ला प्रकल्‍प - क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत दिनांक 20 नोव्‍हेबर रोजी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व कृषि विद्यापीठातील जिल्‍हा समन्‍वयक यांच्‍या करिता हवामान बदलानुसार सद्य परिस्थितीत पिकांवरील किड व रोग व्‍यवस्‍थापन कार्यशाळा विद्यापीठात संपन्‍न झाली, कार्यशाळेच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, लातुर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री तुकाराम जगताप, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री डी जी मुळे, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी बी आर शिंदे, किटकशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, या वर्षी कापसाला भाव असल्‍यामुळे ज्‍या भागात पाण्‍याची उपलब्धता आहे, त्‍या भागातील शेतकरी पाणी देऊन कापसाचा फरदड घेत आहेत, यामुळे पुन्‍हा पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा उद्रेक होऊ शकतो. याकरिता शेतक-यांनी कापसाचा फरदड घेऊ नये. दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभुमीवर पशुधन वाचविण्‍यासाठी ज्‍या ठिकाणी पाणी उपलब्‍ध आहे, त्‍या भागात चारापिके लागवडीसाठी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. कृषि विद्यापीठांर्गत असलेले संशोधन केंद्रे तसेच 45 संलग्‍न व घटक महाविद्यालयांच्‍या प्रक्षेत्रावर चारापिक लागवडीचे उदिष्‍टे देण्‍यात येईल. विद्यापीठाकडे विविध चारापिकांचे बेणे (डोंबे) विक्रीसाठी उपलब्‍ध आहे. पाण्‍या अभावी फळबाग वाचविण्‍याचेही आव्‍हान आहे, यासाठी विद्यापीठाकडील कमी खर्चिक तंत्रज्ञान कृषि विभागाच्‍या माध्‍यमातुन फळबाग उत्‍पादकांपर्यंत पोहोचवावे. चारापिकाबरोबरच जी काही रबी पिकांची लागवड झाली आहे, त्‍यावरील विविध किड – रोग व्‍यवस्‍थापनावरही भर द्यावा लागेल, विशेषत: लष्‍करी अळीचा प्राद़ुर्भाव रोखण्‍यासाठी पावले उचलावी लागतील, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांनी आपल्‍या भाषणात ज्‍या भागात काही प्रमाणात पाणी उपलब्‍ध आहे, तेथे पाण्‍याचा कार्यक्षम वापर, चारा उत्‍पादन, अझोलो उत्‍पादन आदींवर लक्ष द्यावे लागणार असल्‍याचे सांगितले तर विभागीय कृषि सहसंचालक श्री तुकाराम जगताप यांनी विद्यापीठाकडील कृषि तंत्रज्ञान शेतक-यांपर्यत पोहोचविण्‍याची जबाबदारी कृषि विभागाची असुन गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी कृषि विद्यापीठ व कृषि विभागाच्‍या समन्‍वयाने राबविलेल्‍या मोहिमेस शेतक-यांनी दिलेल्‍या प्रतिसादामुळेच यश मिळाले असल्‍याचे प्रतिपादन केले.  
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ पी आर झंवर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ अनंत बडगुजर यांनी केले तर आभार श्री सागर खटकाळे यांनी मानले. कार्यशाळेत अमेरीकन लष्‍करी अळी, हुमणी अळीचे व्‍यवस्‍थापन, तुर व हरभरा पिकांवरील किड - रोगाचे व्‍यवस्‍थापन, सद्यस्थितीतील पिकांचे व्‍यवस्‍थापन आदींवर डॉ पी आर झंवर, डॉ बी व्‍ही भेदे, डॉ ए जी बडगुजर, डॉ एस डी बंटेवाड, डॉ के टी आपेट आदींनी सविस्‍तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेस लातुर, उस्‍मानाबाद, परभणी, नांदेड व हिगोंली जिल्‍हयातील कृषि अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍यने उपस्थित होते.

Sunday, November 18, 2018

भारतीय लोकसेवेतील परिविक्षाधिन अधिका-यांची वनामकृविस भेट


 
भारतीय पोलीस सेवा, भारतीय लेखा सेवा, भारतीय वन सेवा, भारतीय महसुल सेवा, भारतीय सेना मालमत्‍ता सेवा अशा विविध भारतीय सेवेतील आंध्र प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, केरळ आदी राज्‍यातील परिविक्षाधिन अधिका-यांनी दिनांक 16 नोव्‍हेबर रोजी परभणी जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या मार्फत विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय, उती संवर्धन, कोरडवाहु संशोधन केंद्र आदी ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतले. यात नवीनकुमार एस, जी जवाहर, मोनिका देवागुड्डी, गुणांका डी बी, डी एन हरीकिरण, सिमी मरियन जॉर्ज, एस जोन्‍स जस्‍टीन, संतोषकुमार जी, अफजल हमीद आदी अधिका-यांचा समावेश होता.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांनी विद्यापीठाच्‍या कृषि विस्‍तार, संशोधन व शिक्षण कार्याबाबत माहिती दिली. सौर उर्जा प्रकल्‍प व बैलचलित यंत्र यांची माहिती डॉ रामटेके व डॉ स्मिता सोळंकी यांनी दिली तर अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबत प्रा़चार्य डॉ यु एम खोडके व डॉ डी डी टेकाळे यांनी माहिती दिली. विविध कृषि प्रक्रिया उद्योगाबाबत प्रा दिलीप मोरे यांनी, पॉली हाऊस, शेडनेट, उती संवर्धनाबाबत डॉ के एम शर्मा यांनी तर कोरडवाहु शेती संशोधनाबाबत डॉ मदन पेंडके यांनी माहिती दिली. कृषि हवामानशास्‍त्राबाबत प्रा वाय ई कदम यांनी तर परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे यांनी कृषि विभागाबाबत माहिती दिली. सदरिल भेटाचा कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ पी आर देशमुख, कृषि विद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे, प्रा. पी एस चव्‍हाण, कौसडीकर आदींनी परिश्रम घेतले.

मौजे वाई (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथे पौष्टिक तृणधान्य दिन साजरा

केंद्र शासनाने सन 2018 - 19 हे वर्ष राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्‍हणुन घोषित केले असुन त्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्र व तोंडापुर (जि. हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कळमनुरी तालुकयातील आदिवासी गाव मौजे वाई येथे दि. 16 नोव्हेबर रोजी पौष्टिक तृणधान्य दिनसाजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. शिवाजी म्हेञे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन वाईचे सरपंच श्री. सखुराव मुकाडे हे उपस्थित होते. तोंडापुर कृषि विज्ञान केंद्राचे कृषिविद्या विषय विशेषतज्ञ प्रा. राजेश भालेराव, गृहविज्ञान विषय विशेषतज्ञ प्रा. श्रीमती आर. बी. शिंदे, ज्वार किटकशास्ञज्ञ डॉ मो. ईलियास, ज्वार पैदासकार डॉ. एल. एन. जावळे, ज्वार कृषिविद्यावेत्ता डॉ. दीपक लोखंडे, ज्वार विकृतीशास्ञज्ञ डॉ. विक्रम घोळवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात डॉ. शिवाजी म्हेञे मानवाच्या आहारातील ज्वारीचे महत्व सांगितले तर प्रा. श्रीमती आर. बी. शिंदे यांनी उपस्थित महिला वर्गास ज्वारीतील पौष्टिक घटकाचे महिलांच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणामाचे महत्व सांगितले. प्रा. राजेश भालेराव यांनी शेतकरी बंधुनी सुधारित ज्वारी लागवड व्‍यवस्‍थापनावर तर डॉ मो. ईलियास यांनी ज्वारी पिकावरील अमेरिकन लष्कर अळी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ज्वार संशोधन केंद्रातील शास्‍त्रज्ञ लिखित आरोग्यवर्धक ज्वारीचे आहारातील पोष्टिक महत्व व मुल्यवर्धीत पदार्थया घडीपञिकेचे विमोचन करुन उपस्थित शेतकरी बंधुना वाटप केले. तसेच ज्वारीपासुन विविध तयार केलेले बिस्कीट, पापड, मैदा, शेवया, लाहया आदी पदार्थ दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. एल. एन. जावळे यांनी केली. सुञसंचालन डॉ. दीपक लोखंडे यांनी तर आभार डॉ. विक्रम घोळवे यांनी मानले. कार्यक्रमास आदिवासी शेतकरी व महिला मोठया संख्‍येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांच्या प्रेरणेने व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

Saturday, November 17, 2018

स्‍वत:तील आत्‍मविश्‍वासच जीवनात संघर्ष करण्‍याची प्रेरणा देतो ..... विशेष सरकारी अभियोक्‍ता पदमश्री मा. अॅड उज्‍वलजी निकम



देशाची प्रगती शेती व शेतक-यांच्‍या परिस्थितीवर असुन शेतक-यांनी पिकविलेल्‍या मालास बाजारभाव पाहिजे. कृषि संशोधन महत्‍वाचे असुन कृषि क्षेत्राच्‍या प्रगतीची मदार ही कृषिच्‍या विद्या‍र्थ्‍यावर आहे. कृषिचा विद्यार्थ्‍यी स्‍वत: एक विद्यापीठ झाले पाहिजे. कृषि शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत आहे, ही चांगली बाब आहे. जीवनात चांगले-वाईट करण्‍याची ताकद प्रत्‍येकात असते, आत्‍मचिंतन केले तर तुम्‍ही चांगलाच मार्ग निवडाल. संघर्ष व समस्‍यांशी दोन हात करतांनाच यशाचा मार्ग सापडतो. स्‍वत:तील आत्‍मविश्‍वासच जीवनात संघर्ष करण्‍याची प्रेरणा देतो, असे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍याचे विशेष सरकारी अभियोक्‍ता पदमश्री मा. अॅड उज्‍वलजी निकम यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने युवकांची सामाजिक जबाबदारी व भविष्‍यातील आव्‍हाने या विषयावर दिनांक 17 नोव्‍हेबर रोजी आयोजित विद्यार्थ्‍यी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर जेष्‍ठ पत्रकार श्री जयप्रकाशजी दगडे, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजीत पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा. अॅड उज्‍वलजी निकम पुढे म्‍हणाले की, जीवनात ज्ञानाची भुक पाहिजे. तपश्‍चर्याने ज्ञान संपादन होते. विद्यार्थ्‍यांनी बुध्‍दीचे सामर्थ्‍य ओळखले पाहिजे. आपल्‍यात सकारात्‍मकता असली पाहिजे, नकारात्‍मकता आपोआप नष्‍ट होते. आपल्‍याकडे प्रामाणिकपणा असल्‍यास गुन्‍हेगाराच्‍याही मनात दबदबा निर्माण करू शकतो. भविष्‍यात विविध क्षेत्रात तुम्‍ही यशस्‍वी व्‍हाल, परंतु विद्यार्थ्‍यी दशेतच देशासाठी, समाजासाठी व कुटूंबासाठी काम करण्‍याची भावना मनात सतत ज्‍वलंत ठेवा. प्रत्‍येक क्षणी मन विचारी ठेवा, समस्‍येत मार्ग सापडतोच. महाविद्यालयातील रॅगींगच्‍या प्रकारामुळे अनेक ग्रामीण विद्या‍र्थ्‍यामध्‍ये मानसिकरित्‍या नैराश्‍य येते, त्‍यामुळे महाविद्यालयातील नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांना एक सुर‍क्षतेचे वातावरण आपण निर्माण करावे. भारतात सर्व धर्म व जातीचे लोक गुण्‍यगोविंदात राहतात, त्‍यामुळेच देशाची प्रगती होत आहे, देश समृध्‍दीकडे जात आहे. युवकांनी अविवेकी मानसिकता बाळगु नका, असा सल्‍ला देऊन मा. अॅड उज्‍वलजी निकम यांनी न्‍यायालयात गुन्‍हेगारी दावे लढतांना आलेल्‍या विविध अनुभव खुमासदार शैलीत कथन केले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी महाविद्यालयीन युवकांत समाजभान निर्माण करण्‍याकरिता विविध क्षेत्रातील यशस्‍वी व्‍यक्‍तीचे विचार त्‍यांच्‍या पर्यत पोहोचविण्‍यासाठी विद्यापीठ नेहमीच प्रयत्‍नशील असल्‍याचे सांगुन मा अॅड उज्‍वल निकम यांना प्रत्‍यक्ष ऐकण्‍याची संधी म्‍हणजे सर्वासाठी पर्वणीच ठरली असे मत व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमात विद्यापीठाच्‍या वतीने कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते मानपत्र व शाल-श्रीफळ देऊन मा अॅड उज्‍वल निकम यांचा सत्‍कार करण्‍यात आला. विद्यापीठातील विविध क्षेत्रात यशस्‍वी विद्यार्थ्‍यी रूपेश बोबडे, रंगोली पडघन, प्रतिक्षा पवार, शैलेंद्र कटके, देवयानी शिंदे, मंजुषा कातकडे, शुभम राय आदींची सत्‍कार मा. अॅड उज्‍वल निकम यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालक डॉ मृण्‍मयी भजक यांनी केले तर आभार डॉ विलास पाटील यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, विद्यार्थ्‍यी तसेच शहरातील प्रतिष्‍ठीत नागरीक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

महाविद्यालयीन युवकांना पाहुण कार्यक्रमात मा. अॅड उज्‍वलजी निकम यांनी आपल्‍या खुमासदार शैलीत सादर केलेली कविता

तुम्‍हा पाहुणी मला आठवे, तारूण्‍याचे दिवस आगळे वेगळे ।।
कधी प्रियेला शीळ मारणे जमले नाही मला ।
कधी प्रियेच्‍या मागे धावणे जमले नाही मला ।
कधी प्रियेला कागदी बाण मारणे जमले नाही मला ।
तरी हे कसे घट्ट धागे जुळले, तिला न कळले मला न कळले ।।

तुम्‍हा पाहुणी मला आठवे, तारूण्‍याचे दिवस आगळे वेगळे ।।
दिवस जरी निघुन गेला तरी ऊर्मी तशी अजुनी ।
केस पांढरे झाले तरी गर्मी आहे तशी अजुनी ।
बाप मुलांचा झालो तरी बेशर्मी आहे तशी अजुनी ।।

तुम्‍हा पाहुणी मला आठवे, तारूण्‍याचे दिवस आगळे वेगळे ।।
त्‍या आगळया दिनाची भलतीच बात होती ।
सोन्‍याचे दिवस होते, चांदीची रात होती ।
जगाची तिन्‍ही सौख्‍य माझ्या खिशात होती ।
कारण तीही वयात होती आणि मीही वयात होतो ।

तुम्‍हा पाहुणी मला आठवे, तारूण्‍याचे दिवस आगळे वेगळे ।।

Friday, November 16, 2018

वनामकृवित व महा अॅग्रो, औरंगाबाद यांच्या सामंजस्य करार

कृषि विद्यापीठाचा कृषि विस्तार कार्याचा भाग म्हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि महा अॅग्रो, औरंगाबाद यांच्या दिनांक 15 नोव्हेबर रोजी सार्वजनिक - खाजगी भागीदारी तत्वावर सामंजस्य करार करण्यात आला, यावेळी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्या प्रमुख उपस्थिती होती. करारावर विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले व महा अॅग्रोचे मुख्‍य समन्वयक अॅड वसंत देशमुख यांनी स्‍वाक्षरी केल्‍या तर यावेळी महाअॅग्रोचे समन्‍वयक श्री टी टी पाथरीकर, श्री प्रकाश उगले, विभाग प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे, उपकुलसचिव श्री रविंद्र जुक्टे, डॉ एस बी पवार, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, डॉ के टि जाधव, डॉ दिप्ती पाटगांवकर आदींची उपस्थिती होती. करारानुसार विद्यापीठ विकसित व शिफारसीत कृषि तंत्रज्ञान तसेच विविध खाजगी कंपन्‍याच्‍या पिकांचे जातीचा समावेश असलेले कृषि प्रदर्शनी विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र व कृषी विद्यालय परिसरातील पाच एकर प्रक्षेत्रावर विकसित करण्‍यात येऊन पाहण्‍यासाठी शेतक-यांना उपलब्‍ध होणार आहे. सदरिल प्रात्‍यक्षिके विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या सल्‍ल्‍यानुसार विकसित करण्‍यात येणार आहे.

Thursday, November 15, 2018

माननीय पद्मश्री अॅड उज्‍वलजी निकम साधणार कृषीच्‍या विद्यार्थ्‍यांशी संवाद



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषिच्‍या विद्यार्थ्‍यीशी दिनांक 17 नोव्‍हेबर रोजी दुपारी 3.00 वाजता महाराष्‍ट्र राज्‍याचे विशेष सरकारी अभियोक्‍ता पदमश्री अॅड उज्‍वलजी निकम हे युवकांची सामाजिक जबाबदारी व भविष्‍यातील आव्‍हाने या विषयावर कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात संवाद साधणार असुन संवाद कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे राहणार आहे. तसेच शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजीत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरिल संवाद कार्यक्रमाचा लाभ विद्यापीठातील विद्यार्थ्‍यीनी घ्‍यावा असे आवाहन आयोजक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले आहे.

मराठी विश्‍वकोश निर्मितीसाठी नोंद लेखन ही कृषि शास्‍त्रज्ञांची ऐतिहासिक जबाबदारी.....कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण

वनामकृवित मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाच्‍या कृषिविज्ञान ज्ञानमंडळाची नोंद लेखन कार्यशाळा संपन्‍न
राज्‍यातील शेतीच्‍या विकासात कृषिशास्‍त्रांचे मोठे योगदान असुन मराठी विश्‍वकोशात कृषिशास्‍त्रांशी निगडीत अनेक माहितीचा अभाव आहे. यासाठी कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांनी आपआपल्‍या विषयातील मा‍हितीचे नोंद लेखन करून मराठी विश्‍वकोश अद्ययावत करावा, ही एक कृषी शास्‍त्रज्ञांची ऐतिहासिक जबाबदारीच आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्‍ट्र राज्‍य मराठी विश्‍वकोशाच्‍या कृषिविज्ञान ज्ञान मंडळाच्‍या वतीने दिनांक 14 नोव्‍हेंबर रोजी लेखकांच्‍या कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, या कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, मंडळाचे सचिव श्री श्‍यामकांत देवरे, कृषिविज्ञान ज्ञान मंडळाचे समन्‍वयक प्राचार्य डॉ प्रमोद रसाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, मराठी विश्‍वकोशातील कृषिशास्‍त्राच्‍या माहितीचा शेतकरी, विद्यार्थ्‍यी, शास्‍त्रज्ञ, सामान्‍य नागरीक यांना मोठा उपयोग होणार आहे. त्‍याकरिता बिनचुक, अद्ययावत, नेमकी माहितीची नोंद लेखकांनी करावी, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, मराठी भाषेत कृषिशी निगडीत शास्‍त्रशुध्‍द, नेमकी व सोपी माहिती इंटरनेटवर मर्यादीतच उपलब्‍ध असुन मराठी विश्‍वकोशाच्‍या माध्‍यमातुन कृषि तंत्रज्ञानाबाबत अधिकृत व योग्‍य मराठी ज्ञान उपलब्‍ध होणार आहे. समन्‍वयक डॉ प्रमोद रसाळ आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषी तंत्रज्ञानाबाबत शास्‍त्रशुध्‍द माहिती इंग्रजी माध्‍यमात मोठया प्रमाणात असुन त्‍या तुलनेत मराठीत फारच कमी आहे. हे ज्ञान पुर्णपणे मराठीत उपलब्‍ध झाले तर या माहितीच्‍या आधारे शेतीत क्रांती होईल.
कार्यशाळेत श्री श्‍यामकांत देवरे, डॉ प्रमोद रसाळ, डॉ रविंद्र गोडराज आदींनी मराठी विश्‍वकोशामध्‍ये नोंद लेखन करतांना लेखकांना आवश्‍यक मुद्दयांबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ सुभाष शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ संतोष कदम यांनी केले तर आभार डॉ सचिन मोरे यांनी मानले. कार्यशाळेत विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक व कर्मचारी मोठया संख्‍येने सहभाग नोंदविला होता.
महाराष्‍ट्र राज्‍य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाच्‍या वतीने मराठी विश्‍वकोशाचे वीस संहिता खंड मुद्रित स्‍वरूपात प्रकाशित करण्‍यात आले असुन हे सर्व खंड मराठी विश्‍वकोशाच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहेत. तसेच खंडातील माहिती कार्ड पेनड्राईव्‍ह व मोबाईल अॅपच्‍या स्‍वरूपात देखिल आहे. कृषिशी निगडीत माहितीच्‍या अद्ययावतीकरण राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठाच्‍या मदतीने कृषिविज्ञान ज्ञान मंडळाच्‍या माध्‍यमातुन सुरू आहे.

दुष्‍काळात पशुधन व फळबाग वाचविण्‍यासाठीचे कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचवा ..... कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण

वनामकृवित दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभुमीवर कृषी विस्‍तार कार्यक्रमांचा कृ‍ती आराखडा बैठक संपन्‍न
मराठवाडयातील आठही जिल्‍हयात कमी पर्जन्‍यामुळे दुष्‍काळाची परिस्थिती निर्माण झाली असुन पाण्या अभावी कमी क्षेत्रावर रबी पिकांची लागवड झालेली आहे. परंतु ज्‍या शेतक-यांकडे फळबागा आहेत, ते वाचविण्‍यासाठी विद्यापीठाकडील उपयुक्‍त कृषी तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहचविण्‍यासाठी कृषि विभागाच्‍या सहकार्याने फळबाग वाचविण्‍याचे अभियान हाती घ्‍यावे लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. मराठवाडयातील दुष्‍काळ परिस्थितीत शेतीत करावयाच्‍या प्रतिबंधात्‍मक उपाय योजना व उपयुक्‍त कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा कृषि विस्‍तार कार्यक्रमाचा कृ‍ती आराखडा निश्चित करण्‍यासाठी दिनांक 14 नोव्‍हेंबर रोजी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांच्‍या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते, या बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. बैठकीस शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, खरिप हंगामात कापसावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी कृषी विभाग व विद्यापीठाच्‍या वतीने राबविण्‍यात आलेला विस्‍तार कार्यक्रमामुळे ब-याच अंशी गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण मिळविण्‍यात यश आले. याच प्रकारे दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभुमीवर पुढील काळात पशुधन वाचविणे व चारा व्‍यवस्‍थापन यावर देखिल तंत्रज्ञान विस्‍ताराची मोहिम विद्यापीठ हाती घेणार आहे. या परिस्थितीत फळबागा वाचविण्‍यासाठी विद्यापीठाकडे कमी खर्चिक तंत्रज्ञान उपलब्‍ध आहे. तसेच उपलब्‍ध सोयाबीन किंवा इतर पिकांच्‍या अवशेषांपासुन पोषक चारा निर्मितीचे तंत्रज्ञान, हायड्रोपोनिक्‍स, अझोला निर्मिती तंत्रज्ञानाचा प्रसार शेतक-यांमध्‍ये विविध माध्‍यमामार्फत शास्‍त्रज्ञांनी करावा, असा सल्‍ला देऊन विद्यापीठातील शंभर हेक्‍टर प्रक्षेत्रावर चारापिकांची लागवड करण्‍याचे निर्देशही त्‍यांनी अधिका-यांना दिले.
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या विविध घटक व संलग्‍न महाविद्यालयात जेथे पाणी उपलब्‍ध आहे तेथील प्रक्षेत्रावर चारापिकांची लागवडीसाठी निश्चित असे उदिदष्‍ट देण्‍यात येईल असे सांगितले. तसेच विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले म्‍हणाले की, दुष्‍काळ परिस्थितीत शेतीतील प्रतिबंधात्‍मक उपायाबाबत आकाशवाणी, दुरदर्शन, इलेक्‍ट्रॉनीक व छापील माध्‍यमे, समाज माध्‍यमांचा वापर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शनाकरिता वापर करण्‍याचा सल्‍ला दिला.  
सदरिल बैठकीस विद्यापीठांतर्गत असलेले मराठवाडातील विविध संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, विभागीय कृषिविद्यावेत्‍ता, विविध महाविद्यालये येथील शास्त्रज्ञ, विषय तज्ञ, कृषि विस्‍तारक, अधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. बैठकीत करण्‍यात आलेल्‍या चर्चाच्‍या आधारे दुष्‍काळ परिस्थिती उपयुक्‍त कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी विद्यापीठ लवकरच धडक कृती कार्यक्रम राबविणार असल्‍याचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी सांगितले.

Friday, November 2, 2018

मौजे रायपुर येथे कृषि संवाद कार्यक्रम संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय व अखिल भारतीय समन्‍वयीत सिंचन पाणी व्‍यवस्‍थापन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे रायपुर येथे दिनांक 1 नोंव्‍हेंबर रोजी कृषि संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यु एम खोडके, सरपंच दत्‍ताबुवा गिरी महाराज, प्रगतशील शेतकरी बी एन मस्‍के, डॉ ए टी शिंदे, डॉ ए जी बडगुजर, डॉ आर जी भाग्‍यवंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ यु एम खोडके यांनी उपलब्‍ध पाण्‍याचे कार्यक्षम व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन केले. तसेच पशुसंवर्धनावर डॉ ए टी शिंदे व किड व्‍यवस्‍थापनावर डॉ ए जी बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. सरपंच दत्‍ताबुवा गिरी महाराज यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ आर जी भाग्‍यवंत यांनी केले. सुत्रसंचालन विनोद ओसावार यानी केले तर आभार राहुल कन्‍हेरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषीदुत व गांवक-यांनी परिश्रम घेतले.

मौजे असोला येथे कृषि संवाद कार्यक्रम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय व अखिल भारतीय समन्‍वयीत सोयाबीन संशोधन केंद्र याच्‍या सयुक्‍त विद्यमाने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे असोला येथे दुष्‍काळी परिस्थितीत चा-याचे व पाण्‍याचे व्‍यवस्‍थापन यावर दिनांक 31 ऑक्‍टोबर रोजी कृषि संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी दत्‍ताराव जावळे, कृषि विभागाचे माजी संचालक अनंतराव जावळे, विभाग प्रमुख डॉ आर डी आहिरे, डॉ बी एम ठोंबरे, डॉ यु एम खोडके, डॉ एस पी म्‍हेत्रे, डॉ ए जी बडगुजर, डॉ ए टी शिंदे, लक्ष्‍मणराव जावळे, व्‍यंकटी जावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ बी एम ठोंबरे यांनी दुष्‍काळ परिस्थितीत पशुसंवर्धन व पशुखाद्य व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ आर डी आहिरे यांनी शेतीपुरक जोड व्‍यवसयावर तर उपलब्‍ध पाण्‍याचे कार्यक्षम व्‍यवस्‍थापन यावर डॉ यु एम खोडके, किड व्‍यवस्‍थापनावर डॉ ए जी बडगुजर यांनी तर रबी पिक व्‍यवस्‍थापनावर डॉ एस पी म्‍हेत्रे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ ए टी शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन पल्‍लवी कांबळे व मोहिनी तिथे हिने केले तर आभार पुजा काळबांडे हिने मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषीकन्‍या व गांवक-यांनी परिश्रम घेतले.

Thursday, November 1, 2018

हवामान बदल व पावसावर आधारित शेती विषयावरील राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने हवामान बदल व पावसावर आधारीत शेती या विषयावरील राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 23 ते 30 ऑक्टोंबर दरम्यान करण्‍यात आले होते, या प्रशिक्षणाच्‍या समारोप कार्यक्रम दिनांक 30 ऑक्‍टोबर रोजी संपन्‍न झाला. या कार्यक्रमास व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, हैद्राबाद येथील केद्रीय कोरडवाहू संस्थेचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ के अे गोपीनाथ, प्रशिक्षण संयोजक मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ भगवान आसेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संचालक संशोधन डॉ दत्तप्रसाद वासकर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, दरवर्षी पडणा-या पावसाच्या विषमतेमुळे कोरडवाहू शेतीवर पावसाच्या पाण्याचा ताण पडत आहे. परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले कृषि तंत्रज्ञान कोरडवाहु शेतीच्‍या दृष्टीने उपयुक्त आहे, त्याचा अवलंब केल्यास ब-याच अंशी दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर मात करता येईल.  तर प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ के अे गोपीनाथ आपल्‍या मनोगतात म्हणाले की, कोरडवाहू तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत कृषी अधिका-यांच्या मार्फत गेले पाहिजे, या तंत्रज्ञानांचा वापर करतांना शेतक-यांना येणा-या अडचणींचा अभ्‍यास करून तंत्रज्ञानात सुधारणा करता येईल. अनियमित पाऊसाच्‍या परिस्थितीत रूंद वरंबा व सरी पध्‍दती तंत्रज्ञान सोयाबीन उत्‍पादकांसाठी उपयुक्त आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रत्येक शेतक-यांनी शेततळे, तसेच विहीर व कुपनलिका पुनर्भरण करण्याची गरज आहे. तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी शेतक-यांनी सुधारित पाणी साठवण तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास कोरडवाहू उत्पादनात स्थिरता आणणे शक्य होईल असे सांगितले.
कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. प्रास्ताविक मुख्यशास्त्रज्ञ डॉ भगवान आसेवार यांनी केले. सुत्रसंचालन डॉ मदन पेंडके यांनी तर आभार डॉ हनवते यांनी मानले. प्रशिक्षण कार्यक्रमास तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्रातील एकूण 20 कृषी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ ए. एस. जाधव, डॉ लोखंडे, परिहार, तुरे, श्रीमती सारीका नारळे, गणेश भोसले, सयद महेबूब, दिपक भूमरे आदींनी पुढाकार घेतला.