Monday, August 31, 2015

गुणवंत विद्यार्थ्‍यांचा कृषि शिक्षणाकडे वाढत ओढा.....माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्‍त मायी

परभणी येथील कृषि महाविद्यालयात पदवीच्‍या नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांचा स्‍वागत तथा समुपदेशन कार्यक्रम संपन्‍न

मार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्‍त मायी, व्‍यासपीठावर कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ एस बी वराडे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ विलास पाटील, डॉ डि बी देवसरकर आदी. 
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्‍त मायी, डॉ एस बी वराडे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ विलास पाटील, डॉ डि बी देवसरकर आदी. 
******************
देशात पहिली हरितक्रांतीही कृषि तंत्रज्ञानाच्‍या जोरावर झाली, आता कोरडवाहु शेती केंद्रबिंदु म्‍हणुन दुस-या हरितक्रांतीची गरज असुन त्‍यात कृषि शास्‍त्रज्ञांचे योगदान महत्‍वाचे राहणार आहे. कृषि शिक्षणाकडे आज विद्यार्थ्‍यांचा ओढा वाढत असुन गुणवंताचाही त्‍यात वाटा आहे, ही चांगली बाब आहे, असे प्रतिपादन कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष तथा माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्‍त मायी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयात पदवीच्‍या नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांचा स्‍वागत तथा समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन दि ३१ ऑगस्‍ट रोजी करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते व्‍यासपीठावर वाल्‍मीचे माजी संचालक डॉ एस बी वराडे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील, निम्‍नस्‍तर शिक्षणाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा डॉ चारूदत्‍त मायी पुढे म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्‍याना स्‍वताचा विकास साधावयाचा असेल तर स्‍वयं अध्‍यायन करावे लागेल. परभणी येथील महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी राज्‍याच नव्‍हे तर देश पातळीवर विविध पदावर कार्य करीत असुन नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यांना महाविद्यालयात प्रवेश म्‍हणजेच मोठी संधी असुन त्‍यांचे सोने करावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, कृषि क्षेत्राचा व शेतक-यांचा विकास हे ध्‍येय ठेवुन विद्यार्थ्‍यांनी कृषि महाविद्यालयात शिक्षण घ्‍यावे. जगातील मोठे ज्ञानभांडार हे इंग्रजी माध्‍यमात उपलब्‍ध असल्‍यामुळे मराठवाडयातील विद्यार्थींनी इंग्रजी भाषा चांगल्‍या प्रकारे अवगत करावी, असा सल्‍ला त्‍यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांना दिला.
विद्यार्थ्‍यांनी स्‍वत:च्‍या जीवनाचे स्‍वत:च शिल्‍पकार बनण्‍याचा सल्‍ला वाल्‍मीचे माजी संचालक डॉ एस बी वराडे आपल्‍या मार्गदर्शनात दिला तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी विद्यार्थ्‍यांनी महाविद्यालयीन शैक्षणिक कालावधीत जास्‍तीत जास्‍त ज्ञान प्राप्‍त करण्‍याचा प्रयत्‍न करावेत, असे सां‍गितले. याप्रसंगी कुलसचिव डॉ दिनकर जाधव व जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.   
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी महाविद्यालयाच्‍या जडणघडणीबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा रणजित चव्‍हाण व प्रा एस एल बडगुजर यांनी केले तर आभार प्रदर्शन जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील यांनी केले. कार्यक्रमात कृषि महाविद्यालयाच्‍या विविध विभाग व उपक्रमाची माहिती चत्रफितीव्‍दारे सादर करण्‍यात आली तसेच विविध शैक्षणिक उपक्रमाबाबत डॉ एन जे लाड, डॉ जे पी जगताप, डॉ जयेश देशमुख, प्रा अनिस कांबळे आदींनी विद्यार्थ्‍यांचे समुपदेशन केले तर नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांचे पुष्‍पगुच्‍छ देऊन स्‍वागत करण्‍यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयात नुतन विद्यार्थ्‍यी, त्‍यांचे पालक, विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

वनामकृवि तर्फे शेतकरी दिनाचे धानोरा (काळे) येथे आयोजन


सहकारमुर्ती पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या जन्‍मदिवसाचे औचित्‍य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्रातर्फे पुर्णा तालुक्‍यातील मौजे धानोरा (काळे) येथे शेतकरी दिनाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी विद्यापीठाचे संचालक विस्‍तार शिक्षण डॉ. बी. बी. भोसले, विदयापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. रविंद्र पतंगे, कृषिविद्यावेत्‍ता डॉ. एस. एस. सोळंके, वनस्‍पती विकृतीशास्‍त्रज्ञ डॉ. डी. डी. निर्मळ, किटकशास्‍त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत, सरपंच गणेशराव काळे, तंटामुक्‍ती अध्‍यक्ष शिवाजीराव काळे, प्रतिष्‍ठीत नागरिक ज्ञानोबा काळे, राम काळे, प्रयोगशील शेतकरी प्रताप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, शेतक­यांनी कमी खर्चाचे तंत्रज्ञान अवगत करावे व दुष्‍काळी परिस्थितीत पिकांचे नियोजन करावे. कीड व्‍यवस्‍थापन करतांना शिफारस केलेल्‍या व योग्‍य मात्रेतच किटकनाशकचा वापर करण्‍याचा सल्‍ला देऊन त्‍यांनी कपाशी, सोयाबीन, तुरी पिकांवरील किड व्‍यवस्‍थापनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री. रविंद्र पतंगे यांनी शेतक­यांना विद्यापीठाच्‍या विविध तंत्रज्ञानाचा व सेवेचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले. कृषिविद्यावेत्‍ता डॉ. एस. एस. सोळंके यांनी रब्‍बी हंगामाचे व पाण्‍याचे नियोजन तर शास्‍त्रज्ञ डॉ. डि डि निर्मळ यांनी कपाशी व हळदी वरील रोग यांच्‍या व्‍यवस्‍थापनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शेतक­यांनी कपाशीचे, हळदीचे व मोसंबीचे किड व रोगग्रस्‍त नमुन्‍याचे पाहणी शास्‍त्रज्ञांनी करून मार्गदर्शन केले.
यावेळी दुष्‍काळी परिस्थितीत कमी पाण्‍यात भाजीपाला पिकांचे चांगले अधिक उत्‍पन्‍न मिळवल्‍याबद्दल प्रगतशील गोविंद काळे, परमेश्‍वर काळेकैलास काळे यांचा सत्‍कार करण्‍यात आला. सर्व शास्‍त्रज्ञांनी प्रताप काळे यांच्‍या एमएयुएस­162 या सोयाबीनच्‍या‍ बिजोत्‍पादन व मोसंबीच्‍या प्रक्षेत्रावर तसेच कैलास काळे यांच्‍या हळदीच्‍या तर शिवराम काळे यांच्‍या कपाशीच्‍या प्रक्षेत्रावर पाहणी केली.

कार्यक्रमास धानोरा काळे परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रताप काळे यांनी केले.कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. चव्‍हाण, डॉ. सांगळे, प्रा. बोकारे,‍ श्री.निकम श्री. मिसाव तर श्री. नृसिंह स्‍वंयसाहयत्‍ता गटाचे सर्व पदाधिकारी व ज्ञानोबा काळे, दशरथ काळे, जगन्‍नाथ्‍ कदम, दत्‍तराव काळे, भुजंग काळे, प्रकाश काळे, सग्रांम काळे आदींनी परीश्रम घेतले.

शिफारशीनुसारच किडकनाशकांचा वापर करा......विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले

अप्रमाणशीर किडकनाशकांमुळे वाढत आहे किडींचा प्रादुर्भाव

मराठवाडयातील ब-याच जिल्‍हयात पेरणीनंतर पावसाचा प्रदिर्घ खंड, त्‍यानंतर थोडासा पाऊस, अधिकचे तापमान, ढगाळ वातावरण यामुळे सोयाबीन व कपाशीवर फार मोठया प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन त्‍या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले व विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यू. एन. आळसे यांनी परभणी तालुक्‍यातील मौजे पांढरी येथे गुंडेराव देगांवकर व बालाजी धस यांचे शेतावर भेट देऊन सोयाबीन व बागायती कापुस पिकांची पाहणी केली. सोयाबीन पिकांवर हेलीकोव्‍हर्पा (हिरवी / घाटे अळी), तंबाखूवरील पाने खाणारी अळी, लाल कोळी आदी किडींचा प्रादुर्भाव दिसून आला. सोयाबीन पिकावरील पाने व शेंगा खाणा-या अळी प्रादुर्भाव नियंत्रानासाठी इमामेक्‍टीन बेन्‍झोएट ३ मिली किंवा क्‍लोरॅनट्रानीलिप्रोल (रायनाक्‍झीपार) २ मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे. शेंग करपा रोगासाठी कार्ब्‍न्‍डेझीम + डायथेन एम-४५ हे संयुक्‍त बुरशीनाशक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारण्‍याची शिफारस करण्‍यात आली. तसेच बागायती कपाशीवर फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी रसशोषण करणा-या किडी आढळुन आल्‍या. त्‍यांच्‍या बंदोबस्‍तासाठी फिप्रोनील २० मिली १० लिटर पाण्‍यात मिसळून स्‍वतंत्र फवारणी करावी. हया किटकनाशकाची संपूर्ण मात्रा घ्‍यावी. बरेचशे शेतकरी फिप्रोनील + इमिडाक्‍लोप्रीड असे मिश्रण वापरत आहेत ते चुकीचे असुन प्रमाणशीर औषधे नसल्‍यामुळे फुलकिडे व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्‍याचबरोबर पॉवर स्‍प्रे पंपासाठी सदरिल किटकनाशकांची मात्रा तीन पट करावी.
     सदरिल प्रक्षेत्र भेटी दरम्‍यान पांढरी, नांदगाव व परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी शेतक-यांना मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले म्‍हणाले की, बीटी कपाशीसोबत नॉन‍बीटी जरुर लावले पाहिजे कारण येणा-या काळात बोंडअळी मध्‍ये बीटीला प्रतिकार क्षमता निर्माण झाली तर शेतक-यांना बीटी कापुस लावणे सोडून द्यावे लागेल. विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. आळसे यांनी बागायती क्षेत्रात जमिनीचे आरोग्‍य टिकविण्‍यासाठी सेंद्रीय किंवा हिरवळीच्‍या खताचा वापर करण्‍याची शिफारस केली तसेच परिसरातील जमिनी भारी असल्‍यामुळे पाण्‍याचा काटेकोरपणे वापर करण्‍याचा सल्‍ला दिला.

Tuesday, August 25, 2015

मौजे झरी येथे एकात्मिक किड व रोग व्‍यवस्‍थापनावर शेतकरी मेळावा


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत दिनांक २० ऑगस्‍ट रोजी मौजे झरी येथे एकात्मिक किड व रोग व्‍यवस्‍थापनावर मेळावा आयोजीत करण्‍यात आला होता. मेळाव्‍यास प्रगतशील शेतकरी मा श्री कांतराव देशमुख, उपसंरपंच कैलास रगडे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ डि जी मोरे, वनस्‍पती विकृती तज्ञ प्रा पी एच घंटे, डॉ डि जी दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोयाबीन पिकावरील किडीविषयी डॉ. डी. जी. मोरे यांनी तर कापुस पिकावरील रोगाविषयी विद्यापीठातील प्रा पी. एच. घंटे यांनी माहिती दिली. कार्यक्रम यशस्‍वतीतेसाठी कृषिदुत नितीन ढोकर, जिवन धोतरे, सुभाष इरतकर, युवराज धावने, अमोल जोंधळे, मंगेश गोरे, विजय घाटुळ, वैजेनाथ कदम, गोपाळ डोंबे, अजित गावडे, द्रोपद घुगे, रामेश्‍वर कदम आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थितीत होते. 

Sunday, August 23, 2015

वनामकृविच्‍या कृषि सहाय्यक पदाची लेखी परिक्षा सुरळीत

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची जाहिरात क्र वनामकृवि-१/२०१४ दिनांक २५ नोंब्‍हेबर २०१४ अन्‍वये पदवीकाधारकाच्‍या कृषि सहाय्यक पदासाठी लेखी परिक्षा रविवार दिनांक २३ ऑगस्‍ट रोजी सकाळी ११ ते १ या दरम्‍यान पर‍भणी शहरातील एकुण १८ परिक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली. एकुण ३६ पदांकरिता ६४८२ उमेदवारांपैकी ४९३८ परिक्षार्थींनी (७६ टक्के परिक्षार्थींनी) परिक्षा दिली. सदरिल परिक्षेच्‍या प्रश्‍नांची उत्‍तरे विद्यापीठाची संकेतस्‍थळे www.mkv.ac.in वरील advertisement या लिंकवर तसेच mkv2.mah.nic.in वर प्रसिध्‍द करण्‍यात आली असल्‍याचे कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांनी कळविले आहे.

Saturday, August 22, 2015

वनामकृविच्‍या कृषि सहाय्यक पदाची रविवारी लेखी परिक्षा

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची जाहिरात क्र वनामकृवि-१/२०१४ दिनांक २५ नोंब्‍हेबर २०१४ अन्‍वये पदवीकाधारकाच्‍या कृषि सहाय्यक पदासाठी दिनांक २३ ऑगस्‍ट रविवार रोजी लेखी परिक्षा होणार असुन ३६ पदांकरिता एकुण ६४७५ उमेदवार पात्र ठरले आहे. रविवारी सकाळी ११ ते १ या दरम्‍यान पर‍भणी शहरातील एकुण १८ परिक्षा केंद्रावर ही परिक्षा होणार असुन यात विद्यापीठ परिसरातील कृषि महाविद्यालय, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय व पशुवैद्यकीय महाविद्यालय तसेच वसमत रोड वरील श्री शिवाजी महाविद्यालय, श्री शिवाजी विधी महाविद्यालय, श्री शिवाजी तंत्रनिकेतन महाविद्यालय, श्री शिवाजी अभियांत्रिकी व्‍यवस्‍थापन महाविद्यालय, सारंग स्‍वामी विद्यालय, संत तुकाराम महाविद्यालय तसेच बालविद्यामंदिर, नानलपेठ, बालविद्यामंदिर, वैभव नगर, भारतीय बालविद्यामंदिर ममता नगर, जिंतुर रोड वरिल कै रावसाहेब जामकर महाविद्यालय, कै कमलाताई जामकर महाविद्यालय, ज्ञानोपासक महाविद्यालय, ईदगा मैदानाजवळील शारदा विद्यालय व शारदा महाविद्यालय या परिक्षा केंद्राचा समावेश आहे. विद्यापीठा मार्फत परिक्षा प्रवेश पत्रे उमेदवारांच्‍या मुळ पत्‍यावर पाठविले असुन ज्‍यांना ते प्राप्‍त न झाल्‍यास दिनांक २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत प्रवेशपत्राची दुय्यम प्रत कुलसचिव कार्यालयातुन उमेदवार प्राप्‍त करू शकतील. सदरिल परिक्षेच्‍या प्रश्‍नाची उत्‍तरे विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात येणार असल्‍याचे कुलसचिव कार्यालयाच्‍या वतीने कळविण्‍यात आले आहे.

विद्यापीठाची प्रतिष्‍ठा जपण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी सदैव दक्ष राहावे........कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

कृषि महाविद्यालयात रॅगींग प्रतिबंध जागरूकता कार्यक्रम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने नागनाथ वसतीगृहात दि २० ऑगस्‍ट रोजी रॅगींग प्रतिबंध जागरूकता कार्यक्रम घेण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, नवीन प्रवेशित महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांचे जीवनाच्‍या दुस-या टप्‍पाची सुरवात झाली असुन जेष्‍ट विद्यार्थ्‍यांनी त्‍यांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यांत सौदाहर्याचे वातावरण निर्माण झाले पाहिजे. राष्‍ट्रीय पातळीवर विद्यापीठाचे मानांकन ठरवितांना महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांच्‍या रॅगींग प्रतिबंध बाबत विचार केला जातो. विद्यापीठाची प्रतिष्‍ठा जपण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी सदैव दक्ष राहावे, असा सल्‍ला त्‍यांनी यावेळी दिला.
महाविद्यालयीन जीवनात चांगले ते घेण्‍याचा प्रयत्‍न विद्यार्थ्‍यांनी करावा. महाविद्यालयीन वातावरण सुदृध्‍ढ व निकोप राहण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी प्रत्‍यनशील असावे, असे मत शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले तर कुलसचिव डॉ दिनकर जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, कृषि महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थ्‍यी हे प्रामुख्‍याने ग्रामीण व शेतकरी कुटूंबातील असुन आपण आपल्‍या पालकाशी विश्‍वासपात्र असे  वर्तन करून ध्‍येयपुर्ती साधावी. प्राचार्य डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, महाविद्यालयातील विविध सामाजिक कार्य जसे व्‍यसनमुक्‍ती, वृक्षसंवर्धन, स्‍वच्‍छता मोहिम यात विद्यार्थ्‍यांचा हिरारीने सहभाग असतो तसेच महाविद्यालयातील नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांचा आत्‍मविश्‍वास वाढविण्‍यासाठी विद्यार्थ्‍यानी सजग असावे.  
याप्रसंगी सदभावना दिनानिमित्‍त सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेण्‍यात आली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मुख्‍य वसतीगृह अधिक्षक तथा विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विशाल अवसरमल यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ शिवाजी यदलोड यांनी केले. कार्यक्रमास डॉ जी एम वाघमारे, डॉ बी आर पवार, डॉ के टि आपेट, डॉ के डि नवगिरे, डॉ व्‍ही एस खंदारे, डॉ एच के कौसडीकर, प्रा एस एल बडगुजर आदीसह महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी के बी चौधरी, पी एस चव्‍हाण, जी एन भारती आदींनी परिश्रम घेतले. 

Friday, August 21, 2015

कपाशीवरील फुलकिडयांचे वेळीच करा व्‍यवस्‍थापन..... वनामकृविचे आवाहन




कृषि अभियंत्‍यानी कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा प्रसार करावा.......कुलगुरू मा डॉ बी. व्‍यंकटेश्वरलू

वनामकृवित कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या आजी व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहदीप मेळावा उत्‍साहात संपन्‍न

सद्य परिस्थितीत कृषिक्षेत्राच्‍या विकासासाठी कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया, मृद व जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आदीं कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची सर्वसामान्य शेतकऱ्याना अत्‍यंत आवश्‍यकता असुन कृषी अभियंतांनी याचा प्रसार करावा, असे आवाहन कुलगुरू मा डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि वनामकृवि कृषी अभियांत्रिकी माजी विद्यार्थी संघटना यांच्‍या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ ऑगस्‍ट रोजी आयोजीत कृषी अभियांत्रिकी आजी व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहदीप मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी कुलगुरू मा डॉ. के. पी. गोरे हे उपस्थित होते तर व्यासपीठावर विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. श्री.  अनंतराव चोंदे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालाक डॉ. बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, कृषी अभियांत्रिकी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. दयानंद टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी माजी कुलगुरू डॉ के. पी. गोरे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव आदींनी मार्गदर्शन केले.
मेळाव्‍यात माजी विद्यार्थी प्रभाकर भालेराव, यशवंत गोस्वामी, रविंद्र गुरव, राजेंद्र कदम, पंडित वासरे, भालचंद्र पेडगावकर, माणिक जाधव, योगेश मुळजे, अमिता तागडे, रमाकांत चापके, दीपक भापकर, विकास पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. तसेच महेश हावळ, मनोज लटपटे, दत्तात्रय मोरे, विकास पाटील, विजय आग्रे, राहुल वळसे या माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करून आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मेळाव्यास परभणी येथील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातुन पदवी संपादन करून शासकीय सेवा, नामांकित कंपन्या, उद्योग, स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीयकृत बँका, संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सुमारे १५० कृषि अभियंते सहभागी झाले होते. तसेच माजी प्राचार्य आणि प्राध्यापक प्रा व्ही. जी. वैष्णव, प्रा. एल. एन. डीग्रसे, प्रा. बापू अडकीने, डॉ. आर. जी. नादरे, डॉ. एस. बी. सोनी, प्रा. बी. बी. सूर्यवंशी, प्रा. आर. आर. लोहेकर, प्रा.पी. बी. कदम, प्रा. व्ही. बी. बोथरा आदीं मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात प्राचार्य डॉ उद्य खोडके यांनी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदायालायाच्या वाटचालीचा आढावा घेतला तर प्रास्ताविक प्रा डी डी टेकाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे व राजेंद्र पवार यांनी तर राजेश पांगरकर यांनी आभार मानले. विविध सत्रासाठी संकलक म्हणून प्रा. लक्ष्‍मीकांत राउतमारे यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


Wednesday, August 19, 2015

स्‍वरक्षनार्थ वनामकृविच्‍या विद्यार्थीनीनी घेतले कराटेचे प्रशिक्षण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालय व परभणी पोलिसचे रणरागीनी पथक यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने विद्यापीठातील विद्यार्थींनीसाठी वीस दिवसीय कराटे प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्‍यात आले होते, या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप दि 15 ऑगस्‍ट रोजी झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, पोलीस अधिक्षीका मा. नियती ठक्‍कर, प्राचार्या प्रा विशाला पटणम, रणरागीनी पथक प्रमुख पोलीस अधिकारी डॉ अंजली जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यीनीना स्‍व:रक्षणार्थ या प्रशिक्षणाचा निश्चितच लाभ होणार असुन विद्यार्थ्‍यींनीनी समाजातील महिलांच्‍याही संरक्षणासाठी कार्य करावे. प्रमुख पाहुणे पोलीस अधिक्षक मा. नियती ठक्‍कर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांनीनी समाज सेवेसाठी प्रशासनात यावे, यासाठी विविध स्‍पर्धापरिक्षेत यशस्‍वीतेसाठी कठोर परिश्रम घ्‍यावे.

या प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षणार्थींना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. यावेळी प्रशिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थींनीनी कराटेचे प्रात्‍यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बदाम पवार हीने केले तर आभार प्रदर्शन प्रा मेधा उमरीकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थींनी मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या. 

Monday, August 17, 2015

पालकमंत्री मा. ना. श्री. दिवाकररावजी रावते यांच्‍या हस्‍ते वैरण विकास कार्यक्रमातंर्गत चारापिके पेरणीचा शुभारंभ

वनामकृविच्‍या संकरीत गो पैदास प्रकल्‍पाचा उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत संकरीत गो पैदास प्रकल्‍पाच्‍या वतीने वैरण विकास कार्यक्रमातंर्गत चारा पिके पेरणी कार्यक्रमाचा शुभारंभ दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी परिवहन मंत्री तथा परभणी जिल्‍ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. दिवाकररावजी रावते यांचे हस्‍ते करण्‍यात आला. याप्रसंगी संसद सदस्‍य मा. श्री संजय जाधव, विधानसभा सदस्‍य मा. डॉ. राहुल पाटील, जिल्‍हाधिकारी मा. राहुल रंजन महिवाल, कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री रविंद्र पतंगे, मा श्री नंतराव चोंडे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव डॉ. दिनकर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री मा. ना. श्री. दिवाकररावजी रावते मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, दुष्‍काळसदृष्‍य परिस्थितीत मराठवाडयात जनावरांसाठी चा-याचा प्रश्‍न मोठया प्रमाणावर भेडसवणार असुन विद्यापीठांनी हाती घेतलेल्‍या चारा पिके उत्‍पादनाचा प्रकल्‍प निश्चितच स्‍त्‍युत्‍य प्रकल्‍प आहे. विद्यापीठाच्‍या चारा पिके उत्‍पादन प्रकल्‍पासाठी सर्वातोपरी सहाय्य करण्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या विविध संशोधन केंद्रावर वैरण विकास कार्यक्रमातंर्गत चारा पिकांचे उत्‍पादन, संवर्धन व दुष्‍काळ परिस्‍थतीत शेतक-यांना प्रबोधन होईल असा प्रकल्‍पाचा प्रस्‍ताव कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचे हस्‍ते मा. ना. श्री दिवाकररावजी रावते यांना सादर करण्‍यात आला.
   अत्‍यल्‍प पर्जन्‍यमानात पाऊसाचे पाणी आडवुन कमी पाण्‍यावर येणारी चारा पिकांची लागवड करुन पशुधनासाठी चारा उपलब्‍ध करणे अत्‍यंत गरजेचे सांगुन प्रकल्‍पाची माहिती प्रास्‍ताविकात संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी दिली. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन उपसंचालक डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. दिगांबर पेरके, डॉ. अशोक जाधव आदींसह विद्यापीठातील विविध योजनेचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली योजनेचे वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. दिनेश सिंग चव्‍हाण, डॉ. संदेश देशमुख, डॉ. सतिश खिल्‍लारे, श्री दिनकर घुसे, श्री दादाराव शेळके, श्री बालाजी कोकणे, श्री व्‍यंकटेश मगर, श्री सुभाष शिंदे, श्री दुधाटे व इतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. 

कमी पर्जन्यमानात संरक्षीत सिंचनावरील कृषिविद्या विभागाच्या संशोधन प्रक्षेत्रावरील बहरली पिके

वनामकृविच्‍या कृषिविद्या विभागाच्‍या प्रक्षेत्रास मान्‍यवरांची भेट
वनामकृविच्‍या कृषिविद्या विभागाच्‍या संशोधन प्रक्षेत्रास कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री अनंतराव चोंडे, मा श्री रविंद्र देशमुख आदीसह शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदी
वनामकृविच्‍या कृषिविद्या विभागाच्‍या संशोधन प्रक्षेत्रास कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री अनंतराव चोंडे, मा श्री रविंद्र देशमुख आदीसह शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदी
**************

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषिविद्या विभागाच्‍या प्रक्षेत्रास दि १५ ऑगस्‍ट रोजी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री रविंद्र पतंगे, मा श्री नंतराव चोंडे यांच्‍यासह शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदींनी भेट दिली. मान्‍यवरांनी प्रक्षेत्रावरील विभागातील पदव्‍युत्‍तर पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या संशोधन प्‍लॉटची व पिक प्रात्‍यक्षिकांची पाहणी केली. पिक प्रात्‍यक्षिकांबाबत प्राचार्य डॉ डि एन गोखले व डॉ ए एस कार्ले यांनी माहिती दिली तर पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी महमद काजी, कृष्‍णा वारकड, शिला शिंदे, आर व्‍ही गिते, डि व्‍ही पवार, यु एस खेत्रे आदींनी आपआपल्‍या संशोधनाबाबत माहिती दिली. याप्रसंगी कमी पर्जन्‍यमानात संरक्षीत सिंचन व्‍यवस्‍थापनाच्‍या आधारे कृषिविद्या विभागाच्‍या प्रक्षेत्रावरील बहरलेल्‍या पिक प्रात्‍याक्षिकाबाबत व संशोधनाबाबत मान्‍यवरांनी समाधान व्‍यक्‍त करून शेतक-यांच्‍या व हवामान बदलाच्‍या दृष्‍टीने संशोधनाच्‍या अधिक उपयुक्‍ततेबाबत मान्‍यवरांनी सुचना केल्‍या. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्राचार्य डॉ डि एन गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ ए एस कार्ले, डॉ पी के वाघमारे, डॉ विशाल अवसरमल, प्रा सुनिता पवार, डॉ एन जी कु-हाडे व विभागातील कर्मचारी व विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. 
वनामकृविच्‍या कृषिविद्या विभागाच्‍या पदव्‍युत्‍तर पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या संशोधन प्रक्षेत्रास कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री अनंतराव चोंडे, मा श्री रविंद्र देशमुख आदीसह शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदी

Sunday, August 16, 2015

वनामकृवित स्‍वातंत्र्यदिन उत्‍साहात साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात 69 व्‍या स्‍वातंत्र्यदिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री रविंद्र पतंगे, मा श्री नंतराव चोंडे यांच्‍यासह शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, तसेच विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या छात्रसैनिकांनी कुलगुरूंना सलामी दिली. कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी सर्वांना स्‍वातंत्र्यदिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.
 

Friday, August 14, 2015

वनामकृवित ऊती संवर्धित केळी रोपांची (टीश्यु कल्चर) उपलब्‍धता

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या ऊती संवर्धन प्रकल्प, परभणी येथे ऊती संवर्धित केळी रोपांची (टीश्यु कल्चर) निर्मिती केली जाते. सदरील प्रकल्पात अर्धापुरी व ग्रँडनाईन जातीची ऊती संवर्धित रोपांची विक्री केली जाते. या ऊती संवर्धित रोपांची प्रत उच्च दर्जाची असुन दरवर्षी शेतकरी वर्गाकडुन दोन्हीही जातीची भरपुर मागणी असते व प्रकल्पाकडुन शेतकर्‍यांना पूर्वनोंदणी करूनच पुरवठा / विक्री केली जाते. सध्या या प्रकल्पात चाळीस हजार अर्धापुरी व दहा हजार ग्रँडनाईन जातीची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अर्धापुरी जातीच्या रोपांची वैशिष्टय म्हणजे सदरील रोपे कमी उंचीची, मजबूत खोडाची व वादळवार्‍याला प्रतिरोधक आहेत. शेतकरी बंधुनी रोपे उपलब्धतेसाठी प्रभारी अधिकारी, ऊती संवर्धन प्रकल्प, परभणी दुरध्वनी (०२४५२) २२८९३३ मोबाईल क्रमांक  ९८५००९०३१० यांच्‍याशी संपर्क साधवा.

Thursday, August 13, 2015

कीड-रोग व्‍यवस्‍थापन सल्‍ला जास्‍तीस जास्‍त बागायतदारांपर्यंत पोहचला पाहिजे....कुलसचिव डॉ दिनकर जाधव

हॉर्टसॅप प्रकल्‍पांतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
मार्गदर्शन करतांना कुलसचिव डॉ दिनकर जाधव
मोसंबी कीड व रोग व्‍यवस्‍थापन या पुस्तिकेचे विमोचन करतांना कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले व विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदी
*******************************************
मराठवाडयातील यावर्षीची खरीप हंगामातील पिक परिस्थिती अत्‍यंत बिकट असुन फळबाग व्‍यवस्‍थापनाचेही मोठे आव्‍हान बागायतदार शेतक-यांपुढे आहे. हॉर्टसॅप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन बागायतदार शेतक-यांना बागा वाचविण्‍यासाठी मार्गदर्शन अत्‍यंत आवश्‍यक असुन कीड-रोग व्‍यवस्‍थापनाबाबतचा सल्‍ला जास्‍तीस जास्‍त बागायतदारापर्यंत विविध माध्‍यमातुन पोहचला पाहिजे, असे प्रतिपादन कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व‍ महा‍राष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने फलोत्‍पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्‍ला व व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प (हॉर्टसॅप) अंतर्गत दिनांक १३ व १४ ऑगस्‍ट रोजी कीड सर्वेक्षक, कृषि पर्यवेक्षक, कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्‍या साठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले असुन दि १३ ऑगस्‍ट रोजी कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांच्‍या हस्‍ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्‍यात आले, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले व विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलसचिव डॉ दिनकर जाधव पुढे म्‍हणाले की, हॉर्टसॅप प्रकल्‍पातील प्रत्‍यक्ष प्रक्षेत्रावर कार्य करणारे सर्वेक्षक यांची भुमिका महत्‍वाची असुन त्‍यांना फळबागेतील कीड-रोगाची चांगल्‍या प्रकारे ज्ञान अवगत असणे गरजेच आहे. यावरच प्रकल्‍पाचे यश अवलंबुन आहे, त्‍यामुळे वेळोवेळी त्‍यांना प्रशिक्षित करावे लागेल.
सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, मराठवाडयातील हवामान परिस्थितीत आबा व मोसंबी फळबागेवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव होण्‍याची शक्‍यता असुन हॉर्टसॅप प्रकल्‍पांतर्गत योग्‍य सल्‍ला बागायतदार शेतक-यापर्यंत पोहचविला पाहिजे. प्रास्‍ताविकात विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांनी हॉर्टसॅप प्रकल्‍पाबाबत माहिती देतांना सांगितले की, प्रकल्‍पातर्गंत मराठवाडातील मोसंबीवरील कीड-रोगाचे सर्वेक्षण औरंगाबाद, जालना, नांदेड व बीड या जिल्‍हयात होणार असुन त्‍यावर आधारीत सल्‍ला बागायतदारांना देण्‍यात येणार आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ एम बी पाटील यांनी मोसंबी बागेची लागवड, मोसंबीवरील किडीची ओळख व व्‍यवस्‍थापन यावर प्रा बी व्‍ही भेदे, मोसबी बागेसाठी अन्‍नद्रव्‍ये व्‍यवस्‍थापन यावर डॉ एच के कौसडीकर, मोसंबी रोग व्‍यवस्‍थापन यावर डॉ डी डी निर्मल यांनी, कीड सर्वेक्षक व पर्यवेक्षण यावर डॉ ए जी बडगुजर, नमुना तक्‍त्‍यातील नोंदणी प्रात्‍यक्षिक यावर डॉ डी पी कुळधर तर ऑनलाईन प्रपत्राच्‍या नोंद यावर नवी दिल्‍ली येथील एनसीआयपीएम चे संशोधन सहयोगी श्री निलेश पटेल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यापीठ कीटकशास्‍त्रज्ञ लिखित मोसंबी कीड व रोग व्‍यवस्‍थापनया पुस्तिकेचे विमोजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ ए जी बडगुजर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा बी व्‍ही भेदे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमास कृषि विभागातील व कृषि विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ डि एन गोखले

Monday, August 10, 2015

ग्रामिण कृषि कार्यानुभवातंर्गत मौजे मांडाखळी येथे जनावरांचे लसीकरण

********************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाचे ज्‍वार संशोधन केंद्र येथे कार्यरत असलेल्‍या कृषिदुतांच्‍या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभवातंर्गत मौजे मांडाखळी (ता. जि. परभणी) येथे दिनांक १० ऑगस्‍ट रोजी पशुपालक मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्‍याचे उद्घाटन जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ एस बी सोनटक्‍के यांच्‍या हस्‍ते झाले तर पशुधन विकास अधिकारी डॉ ओ डि भंडारे, ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एच व्‍ही काळपांडे, पशुधन पर्यवेक्षीका सौ व्हि यु कावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
मेळाव्‍यात उद्घाटनपर भाषणात जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ एस बी सोनटक्‍के यांनी लसीकरणाचे महत्‍व सांगुन शासनाच्‍या पशुसंवर्धन विभागातील विविध योजनेचा पशुपालकांनी लाभ घेण्‍याचे आवाहन केले तर पशुधन विकास अधिकारी डॉ ओ डि भंडारे यांनी शेळीपालनासाठी मिळणा-या अनुदानाबाबत माहिती दिली. प्रभारी अधिकारी डॉ एच व्हि काळपांडे यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभवाची पार्श्‍वभूमी विषद केली तर पशुधन पर्यवेक्षिका सौ व्हि यु कावळे यांनी घटसर्प व फ-या रोगाची माहिती दिली.
मेळाव्‍यात गावातील साधारणत: शंभर जनावरांचे घटसर्प व फ-या रोग नियंत्रण लसीकरण करण्‍यात आले. कार्यक्रमास गांवातील पशुपालक मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषिदुत एन एस थोरात यांनी तर आभार प्रदर्शन योगेंद्र बनसोड यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ व्हि एम घोळवे यांच्‍या मार्गदर्शनाखाली कृषिदुत पी आकाश, सुर्यवंशी अनील ए एस, जॉन के पी, ढगे, साईचरण, तुम्‍मोड, मीना आदींनी परिश्रम घेतले.