Tuesday, April 13, 2021

विद्यापीठ निर्मित जैविक उत्‍पादने जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याचा प्रयत्‍न ..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

ज्‍वार संशोधन केंद्रात ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक उत्‍पादन विभागाचे उदघाटन

जमिनीत अनेक प्रकारच्‍या बुरशी असतात, त्‍यातील काही बुरशी पिकांसाठी रोगकारक असतात तर काही बुरशी पिकांचे रोगांपासुन संरक्षण करतात. ट्रायकोडर्मा ही बुरशी ही एक उपयुक्‍त बुरशी असुन ही रोगजनक बुरशीचा प्रतिबंध करून पिकांचे रोगापासुन बचाव करते. विद्यापीठ निर्मित ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता परभणी येथील ज्‍वार संशोधन केंद्रात याची निर्मिती करण्‍यात येणार असुन येणा-या खरिप हंगामात शेतक-यांना यांचा लाभ होणार असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्रात ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक उत्‍पादन विभागाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर संशोधन केंद्राचे डॉ एल एन जावळे, डॉ विक्रम घोळवे, विभाग प्रमुख डॉ कल्‍याण आपेट, डॉ एस पी मेहत्रे, डॉ एस एम उमाटे, डॉ एस बी घुगे, डॉ महमद इलियास, डॉ जी एम कोटे आदींची उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतकरी बांधवासाठी समर्पित भावनेने कार्य करावे. शेतकरी बांधवाची विद्यापीठ निर्मित कमी खर्चिक विविध निविष्‍ठांची मागणी पाहता मराठवाडयातील प्रत्‍येक जिल्‍हयात या निविष्‍ठा उपलब्‍ध करण्‍याचा विद्यापीठाचा मानसही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, विद्यापीठात मनुष्‍यबळाची कमतरता आहे, असे असतांनाही विद्यापीठ निविष्‍ठा निर्मितीत वाढ करण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न आहे.  विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी प्रामाणिकपणे शेतक-यांची सेवा करावी, यातच खरे समाधान असल्‍याचे ते म्‍हणाले.  

ज्‍वार रोगशास्‍त्रज्ञ डॉ विक्रम घोळवे यांनी ट्रायकोडर्मा उत्‍पादन विभागाबाबत माहिती देतांना सांगितले, द्रवरूप व पावडर स्‍वरूपात ट्रायकोडर्मा उपलब्‍ध होणार असुन ट्रायकोडर्मा हर्झियानम व ट्रायकोडर्मा अस्‍पेरेलम विरिडी यांचे मिश्रण ट्रायकोबुस्‍ट या नावाने विक्री करण्‍यात येणार आहे.

मान्‍यवरांच्‍या हस्‍ते  ट्रायकोडर्मा शेतक-यांसाठी एक वरदान या घडीपत्रिकेचे विमोचन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ एल एन जावळे यांनी केले तर सुत्रसंचालन श्रीमती प्रितम भुतडा यांनी केले. कार्यक्रमास डॉ चंद्रशेखर अबांडकर, डॉ मिनाक्षी पाटील आदीसह संशोधन केंद्रातील शास्‍त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.


Thursday, April 8, 2021

वनामकृवित तुतीवर आधारीत पुरक रेशीम उद्योगावर प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना व राष्ट्रिय कृषि विकास योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 मार्च  रोजी तुतीवर अधारीत पुरक रेशीम उद्योगयावर एक दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न झाले. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, उदघाटक म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.संतोष आळसे, किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजिव बंटेवाड, कोरडवाहू संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ.वामन नारखेडे, डॉ मदन पेंडके, संशोधन विस्तार केंद्राचे शास्‍त्रज्ञ श्री.ए.जे.कारंडे, आयोजक डॉ.चंद्रकांत लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, मराठवाडयात रेशीम उद्योगास मोठा वाव असुन शेतकरी बांधवांनी आर्थिक स्‍थैर्य प्राप्‍त करून देणारा उद्योग आहे. कोष उत्पादनानंतर तुती फळांपासुन फ्रुट जाम, रंग, शीतपेय, ग्रीन टी, वाइन, साबन व हॅन्ड वॉश इत्यादी विविध उपपदार्थ तयार करता येतात, याचाही आर्थिक लाभ शेतकरी बांधवाना होऊ शकतो.   

भाषणात श्री. संतोष आळसे यांनी पोक्रा योजने अंतर्गत महाडिबीटी पोर्टलवर रजिस्टेशन करून लहान शेतक­यांनी एक ते दोन एकर क्षेत्रावर गटामध्ये तुती लागवड करण्याचे आवाहन केले. तसेच कोष उत्पादन कोषापासुन धागा निर्मीती करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा सल्‍ला दिला.

प्रशिक्षणात रेशीम संशोधन योजनेने तयार केलेले उपपदार्थ प्रशिक्षणार्थीना दाखविण्‍यात आले. तुती पासुन कंम्पोस्ट खत, गांडूळ खत, इंधन ब्रिाकेट, (जाळनासाठी), पशुखाद्य निर्मीती उद्योग सुरू करण्याच्या संधी असून टॅक्टर चलीत श्रेडर मशीन मध्ये तुतीची बारीक तुकडे करण्याच्या मशीनचे व फवारणी यंत्राचे सर्वांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तांत्रिक सत्रात डॉ चंद्रकांत लटपटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजिव बंटेवाड यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ.चंद्रकांत लटपटे यांनी केले.

प्रशिक्षणास मौजे कोल्हा (ता.मानवत) येथील लक्ष्मन तारे, हनुमान तारे, वैभव खुडे तसेच मौजे बोरगव्हान (ता. पाथरी) येथील शेतकरीसह कृषि महाविद्यालय परभणीच्या अंतिम सत्रातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी अरूण काकडे, हारीश्चंद्र ढगे, गुलाब पठाण, बापुराव मुलगीर आदींनी सहकार्य केले.

Tuesday, April 6, 2021

वनामकृवितील पीक संरक्षण व कृषी निविष्‍ठा व्‍यवस्‍‍थापन पदविका अभ्‍यासक्रम प्रवेश प्रक्रियेस सुरूवात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी किटकशास्‍त्र विभागात शैक्षणिक वर्ष २०२० – २१ करिता परवानाधारक कृषी निविष्‍ठा विक्रेत्‍यांकरिता परवाना नुतनीकरणसंबंधी आवश्‍यक असलेला पीक संरक्षण व निविष्‍ठा व्‍यवस्‍थापन या एक वर्षीय पदविका अभ्‍यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया कृषी किटकशास्‍त्र विभाग, परभणी येथे राबविली जात असुन प्रवेश अर्जांचे प्रारूप व माहितीपुस्तिका विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळ http://www.vnmkv.ac.in वर दिनांक १ एप्रिल पासुन उपलब्‍ध करण्‍यात आले आहे. प्रवेश पात्रता दहावी उत्‍तीर्ण असुन अभ्‍यासकेंद्राची प्रवेश क्षमता ६० इतकी आहे. अर्ज स्‍वीकारण्‍याची अंतिम तारीख १५ एप्रिल असुन प्रवेशुच्‍छक उमेदवारांनी पुर्णपणे भरलेले अर्ज कागदपत्रांसह कृषी किटकशास्‍त्र विभागामध्‍ये कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन विद्यापीठाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.