Sunday, June 30, 2024

सोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) : असे करा एकात्मिक व्यवस्थापन

यावर्षी बऱ्याच ठिकाणी वेळेवर पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केलेली आहे. परंतु मोजकाच पाऊस पडून त्यानंतर पावसाची उघडीप झालेली असून त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीन सुरवातीलाच रोपअवस्थेतच पिवळे- पांढरे पडत आहे. लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये “क्लोरोसिस” लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे. क्लोरासीस हि जमिनीत लोहाची (फेरसची) कमतरतेमुळे होत नसून ती काही  कारणाने झाडांद्वारे लोह शोषण न केल्याने होते.

लक्षणे: लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरां फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे.  लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात. पाने पिवळी पडल्यामुळे हरीतद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्र्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.

कारणे: लोह ची कमतरता विशेषत: कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये हिरवे रंगद्रव्य-क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते. बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य असते. तथापि, बर्‍याचदा जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते. तसेच जमिनीत मुळांना ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने देखील मुळाद्वारे लोह कमी शोषला जाऊन क्लोरासीस होतो.

व्यवस्थापन: पाण्याचा ताण पडल्यास तुषारच्या साह्याने संरक्षित पाणी द्यावे. ज्या ठिकाणी पाऊस जास्त झालेला असेल अशा शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी. वापसा आल्यानंतर पीक ३०-३५ दिवसांचे होण्यापूर्वी एक कोळपणी करावी. ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ (II) ५० ग्रॅम किंवा ५० मिली अधिक १९:१९:१९ खत १०० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता वाटल्यास ८-१० दिवसांनी परत एकदा फवारणी करावी.

डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत आणि श्री.एम.बी. मांडगे, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी 

अधिक माहितीसाठी संपर्क करा - कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी ०२४५२-२२९०००


Tuesday, June 25, 2024

वनामकृविचे विद्यार्थी पदव्युत्तर कृषि व संलग्न अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षांमध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम

विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीचे यश…. माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

 निखिल निळकंठ पडोळे
 
 आनंद शंकरराव शिंदे
ऋतुजा विजयकुमार तापडिया 

पुणे येथील महाराष्ट्र कृषि  शिक्षण व संशोधन परिषदेच्या महाराष्ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाद्वारा कृषि, उद्यानविद्या, कृषि अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, सामुदायिक विज्ञान, वनशास्त्र, मत्स्यशास्त्र, जैवतंत्रज्ञान कृषि व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील २०२४ - २५ या शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर प्रवेशाकरिता सामाईक पात्रता परीक्षा (पीजी - सीईटी) घेण्यात आली होती.

या परीक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाचा निखिल निळकंठ पडोळे या विद्यार्थ्यास कृषि विषयात ८८.५० टक्के गुण मिळाले तसेच कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणीच्या आनंद शंकरराव शिंदे यास कृषि अभियांत्रिकी विषयात ६०.०० टक्के गुण मिळाले आणि सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणीच्या ऋतुजा विजयकुमार तापडिया या विद्यार्थीनीस सामुदायिक विज्ञान विषयात ७३.५० टक्के गुण मिळाले आणि या तिघांनीही त्यांच्या विषयात रँकींगमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला.

पदव्युत्तर कृषि अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्रातून ७५६० विद्यार्थी तर कृषि अभियांत्रिकी साठी १८६ विद्यार्थी आणि सामुदायिक विज्ञान साठी १७ विद्यार्थी सामाईक पात्रता परीक्षेसाठी बसले होते. या परीक्षेमध्ये मिळालेल्या यशानिमित्त विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इंद्र मणि  यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढे बोलताना म्हणाले की, या परीक्षेमध्ये मिळालेले यश हे विद्यार्थ्यांची जिद्द, चिकाटी, सातत्य आणि कठोर मेहनतीचे फलित असून त्यांनी ते कायम ठेवावे असे नमूद केले. तसेच विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले आणि बिजोत्पादन संचालक डॉ. देवराव देवसरकर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  

याबरोबरच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि महाविद्यालयाचे २५ विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर कृषि अभ्यासक्रमाच्या यादीमध्ये पहिल्या ५६ विद्यार्थ्यांमध्ये क्रमांक मिळविलेला असून हे या वर्षाच्या निकालाचे आणखीन एक मोठे यश आहे. तसेच विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय लातूरच्या ५०, आंबेजोगाईच्या २७, धाराशिवच्या ३४ तर गोळेगावच्या १९ विद्यार्थांनी कृषि अभ्यासक्रमासाठी तसेच लातूर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांनी जैवतंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी आणि परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांनी अन्नतंत्र अभ्यासक्रमासाठी १०० व्या रँकींगच्या आत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यापीठ आणि विद्यापीठ परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यापीठातील सर्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी केले.

Friday, June 21, 2024

वनामकृवित जागतिक योग दिन उत्साहात साजरा

 मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी  योगाचे अनन्यसाधारण महत्व .... मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

योगाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी आणि योगाचे महत्व समजावे म्हणून जगभरात दरवर्षी २१ जून हा दिवस हा जागतिक योगदिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी योगादिनासाठी एक विशेष थीम ठरवली जाते आणि यावर्षीच्या जागतिक योग दिनाची थीम “स्वतःसाठी आणि समाजासाठी योग (Yoga for Self and Society)” ही आहे. यानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक २१ जुन रोजी जागतिक योग दिन उत्‍साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, विद्यापीठ अभियंता इंजि दीपक कशाळकर, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ. आर. बी. क्षीरसागर, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍न शिक्षण) डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ पी. आर. झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्‍हणाले की, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळे संपुर्ण जगात योग दिन साजरा करण्‍यात येत आहे. यावर्षीच्या थीम नुसार “स्वतःसाठी आणि समाजासाठी योग” आहे म्हणून आपण स्वतः योग करावा व आपले आरोग्य उत्कृष्ठ ठेवावे म्हणजेच यातून आपल्या परिवाराला आणि समाजासाठीही त्याचा लाभ मिळेल असे नमूद केले.
याप्रसंगी ऑर्ट ऑफ लिव्हिंगचे योगशिक्षक प्रा. दिवाकर जोशी व त्‍यांच्‍या पथकातील राजनंदिनी रेंगे, वैशाली पाटील, लक्ष्मण महाजन, आणि राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार विविध आसने, प्राणायाम आदींचे सामुदायिकरित्‍या प्रात्‍यक्षिके करण्‍यात आली. प्रास्‍ताविक डॉ पी. आर. झंवर यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. शाहु चव्हाण आणि आभार डॉ डी एफ राठोड यांनी मानले. कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि राष्‍ट्रीय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक आदींनी मोठया संख्‍येने सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयातील प्रा. शाहु चव्हाण, डॉ डी एफ राठोड व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.









Thursday, June 20, 2024

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून अंतीम वर्ष विद्यार्थ्यांना निरोप


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतीम वर्ष विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे या होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये झालेले सकारात्मक बदलाचे वर्णन करत सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याबरोबरच विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी अंगिकारावयाच्या महत्वाच्या बाबींची जाणिव करून दिली. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाची ज्योत महाविद्यालयातून प्रज्वलित करून घेऊन, ही ज्ञानाची ज्योत समाजोपयोगी कार्यासाठी आणि स्वतःचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी सतत तेवत ठेवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी जिमखाना उपाध्यक्षा डॉ. सुनिता काळे, यांनी विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण चार वर्षांमध्ये आलेले विविध अनुभव सांगून विद्यार्थांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तदनंतर निरोप देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाल्य प्राध्यापक डॉ. नीता गायकवाड या मागील चार वर्षात विद्यार्थ्यासमवेत आलेल्या आठवणीना उजाळा देताना भावूक झाल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांना आलेल्या समस्या सोडवताना त्यांना आलेले अनुभव सांगून ते करत असताना मनाला समाधान लाभले असे त्यांनी नमूद केले. तर सामुदायिक विस्तार व संदेशवहन व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शंकर पुरी, यांनी ही विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाचे कौतुक केले आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विद्यार्थीनी रश्मी पांडे आणि रुणाली धबाले तसेच पदवीपूर्व अंतिम वर्षातील विद्यार्थी सावित्रा तायनात, सेजल गुंडेवार, मयूर मांडूळकर, यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शिक्षक वृंदासह महाविद्यालयाप्रती ऋण व्यक्त केले. याबरोबरच विद्यार्थ्यांनी त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक क्षेत्रात येश संपादन करून आनंदी जीवन व्यतीत करण्यासाठी सदरील अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त असल्याचे नमूद केले.
कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुनिता काळे यांनी आयोजित केला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ. वीणा भालेराव, डॉ. विद्यानंद मनवर, यांच्यासह या महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत.



वनामकृवितील अन्नतंत्र महाविद्यालयाद्वारा पोलीस भरती करीता पोषणत्तम अन्नपदार्थ दालनाची उभारणी

दालनास  कुलगुरु मा.डॉ. इन्द्र मणि आणि  पोलीस अधीक्षक मा. श्री रवींद्रसिंह परदेशी यांची भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील क्रीडा संकुल आणि अश्वमेध मैदानातील दर्शनीय भागामध्ये पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून येणा-या उमेदवारांसाठी पोषणत्तम अन्नपदार्थाचे विद्यापीठाच्या अन्नतंत्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘कमवा व शिका’ या योजनेंतर्गत दि. २० जून रोजी दालन उभारले. या दालनात उच्च प्रतीचे व पोषणत्तम आणि कमी किमतीत विविध प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ तयार करुन उपलब्ध करुन दिले आहेत. यामध्ये त्वरीत पिण्यायोग्य पेय, उर्जा पेय, मिलेट बिस्कीटे, कप केक, मिश्र भाज्या पुलाव, खीर, शेंगदाणा चिक्की यांचा समावेश आहे. या दालनास विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि, पोलीस अधीक्षक मा. श्री रवींद्रसिंह परदेशी आणि इतर वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दालनातील पदार्थांचा मान्यवरांनी आस्वाद घेत अन्न पदार्थांची प्रशंसा केली आणि सदरील उपक्रम भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरु ठेवण्याबाबत सुचविले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. क्षीरसागर, विभाग प्रमुख डॉ. के. एस. गाढे, डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. पी. आर. झंवर, प्रा. शाहु चव्हाण आदींची उपस्थित होती. 
‘कमवा व शिका’ हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकास होण्याच्या दृष्टीने महाविद्यालयातर्फे कार्यान्वित केलेला असुन याद्वारे विद्यार्थ्यांना व्यवसायाभूमिक शिक्षण दिले जाते तसेच यासाठी विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केले जाते. या योजनेतून विद्यार्थ्यांनी विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करुन विकल्यानंतर मिळणा-या नफयाच्या ५० टक्के रक्कम महाविद्यालयास मुळ किंमती सहीत परत केली जाते. सदरील उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. क्षीरसागर, विभाग प्रमुख डॉ. के. एस. गाढे, प्रा. हेमंत देशपांडे, डॉ. गिरीष माचेवाड, डॉ. सुरेंद्र सदावर्ते, डॉ. प्रविण घाटगे, डॉ. अनुप्रिता जोशी, डॉ. अमोल खापरे व इतर सहयोगी अधिका-यांचे मार्गदर्शन लाभले.

Wednesday, June 19, 2024

पूर्व प्राथमिक शाळांच्या नवीन शैक्षणिक धोरणाबाबत पालकांनी सजग होणे आवश्यक - डॉ. जया बंगाळे


 

बाल विकासाच्या दृष्टीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाला प्रथमच मुख्य शैक्षणिक प्रवाहात जोडले गेल्याने यास अधिक महत्त्व प्राप्त झाले असून याबाबत पालकांनी सजग होणे आवश्यक असल्याचे मत प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाअंतर्गत असलेल्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेतर्फे आयोजित पालक कार्यशाळेत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपरोक्त विचार मांडले. बालकांसाठी घर हीच त्यांची प्रथम शाळा असल्याने, त्यांची पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान विकसित होण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची असून त्याकरिता घ्यावयाच्या विविध कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. बालकांच्या सृजनतेस प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये सहानुभूती, आदर, स्वच्छता, सेवाभाव, सार्वजनिक मालमत्तेची काळजी, जबाबदारी पेलण्याची क्षमता, नैतिक मूल्य याबरोबरच जीवन कौशल्ये आदी बाबी विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. तद़पश्चात विभागातील डॉ. नीता गायकवाड यांनी पूर्व प्राथमिक शाळेत येण्यापूर्वी बालकांच्या मानसिकतेची तयारी कोणत्या पद्धतीने करावी जेणेकरून बालक सहजपणे शालेय वातावरणात समायोजित होईल याविषयी पालकांना मार्गदर्शन केले. डॉ. वीणा भालेराव यांनी प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेची वैशिष्ट्ये आणि नियमावली याविषयी पालकांना  जागरूक  केले. या कार्यशाळेसाठी प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्ये आत्मसात करण्यासाठी उपयुक्त व आनंददायी वातावरण निर्मिती करण्यासाठी कटीबदध राहण्याच्या हेतूने नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार उपस्थित शिक्षक व पालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणासंबंधीची  "निपुण प्रतिज्ञा" घेण्यास प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन शिक्षिका श्रुती औढेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा. प्रियंका स्वामी, सर्व शिक्षिका मदतनीस कार्यालयीन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले सदरील कार्यशाळेसाठी पालक बहुसंख्येने उपस्थित होते. 

Monday, June 17, 2024

कठोर मेहनत आणि शिस्‍त हेच जीवनातील यशाचे गमक ..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवितील स्‍पर्धा मंचाचा २३ वा वर्धापन दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या स्‍पर्धा मंचाचा २३ वा वर्धापन दिन दिनांक १६ जुन रोजी साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर अप्‍पर पोलीस अधिक्षक मा श्री यशवंत काळे, सहाय्यक आयुक्‍त (जीएसटी) मा श्री धनंजय देशमुख, शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, डॉ पी आर झंवर, डॉ संतोष कदम, डॉ सुरेश वाईकर, डॉ अमोल भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्हणाले की, परभणी कृषी विद्यापीठातुन अनेक पदवीधर देशात व राज्‍यात विविध पदावर कार्य करीत आहेत. यात वैद्यनाथ वसतीगृहातील स्‍पर्धा मंचाची भुमिका महत्‍वाची आहे. स्‍पर्धा मंचात ग्रामीण भागातुन येणा-या विद्यार्थ्‍यांना अभ्‍यासाकरिता सोयी सुविधा पुरविण्‍यात आल्‍या आहेत, येथे आपणास चोवीस तास अभ्‍यास करता येतो, वेळोवेळी तज्ञांचे मार्गदर्शन केले जाते, याचा निश्चितच लाभ होतो. कठोर मेहनत व शिस्‍त हेच जीवनात कोणत्‍याही क्षेत्रात आपणास यश प्राप्‍त करून देते. कोणत्‍याही क्षेत्रात कार्य करतांना शेती आणि शेतकरी विकासात आपले योगदान दयावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.  

कार्यक्रमात अप्‍पर पोलीस अधिक्षक मा श्री यशवंत काळे, सहाय्यक आयुक्‍त वस्‍तु सेवा व कर मा श्री धनंजय देशमुख, शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, डॉ पी आर झंवर आदींनीही मार्गदर्शन केले. यशस्‍वी विद्यार्थ्‍यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. यावेळी स्‍पर्धांमंचाने वृक्ष लागवड मोहिम हाती घेतल्‍याचे स्‍पर्धामंचाचे अध्‍यक्ष श्री सदानंद शिराळे यांनी सांगितले. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते कृषी महाविद्यालयाचे विविध पदावर निवड झालेल्‍या ७० पेक्षा जास्‍त पदवीधरांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिकेत बिरादार यांनी केले तर आभार पृथ्‍वीराज साबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन स्‍पर्ध मंचाच्‍या सदस्‍य विद्यार्थ्‍यांनी केले होते.


















Saturday, June 15, 2024

वनामकृविच्या कृषि महाविद्यालय परभणीचे कृषिदुत व कृषिकन्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी सज्ज

 शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषिदुत व कृषिकन्या यांनी कार्य करावे.... मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय, परभणीच्या  बी.एस्सी.(ऑनर्स) कृषि अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या सातव्या सत्रातील ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम-२०२४ च्या विद्यार्थ्यांचा उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन कृषि विस्तार शिक्षण विभागाद्वारे दिनांक १३ जून रोजी आयोजित करण्यात आले होता. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते.  ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमाच्या विद्यार्थ्यांना कृषिदुत व कृषिकन्या असे संभोधण्यात येते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, कृषिदुत व कृषिकन्या यांनी स्वावलंबी व निडर होऊन शेतक­यांच्या बरोबरीने या कार्यक्रमांतर्गत काम करावे आणि विद्यापीठाचे संशोधन शेतक­यांच्या शेतापर्यंत पोहचवुन त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी दुत म्हणुन कार्य करावे. शेतकरी आपल्यासाठी सर्वस्व आहेत असे समजुन त्यांच्या कल्याणासाठी आत्मयतीने काम करणे गरजेचे आहे.

या कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद ईस्माइल यांनी माती परीक्षण करण्याबाबत मार्गदर्शन करुन सर्व शेतक­यांची माती परीक्षण करुन त्यांनी माती परीक्षणाच्या अहवालानुसार पिकांची लागवड करावी असे आवाहन केले. विद्यापीठाचे  रावे समन्वयक तथा विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम यांनी बी.एस्सी. (ऑनर्स) कृषि पदवी अभ्यासक्रमामध्ये सहाव्या सत्रापर्यंत विद्यार्थ्यांनी विविध कृषि विषयांचे ज्ञान प्राप्त केले त्याच ज्ञानाचा शेतक­यांच्या शेतावर प्रात्यक्षित स्वरुपात अवलंब करण्याची वेळ आली असून शेतावर विविध पिक लागवडीसाठी करावा. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञानाबरोबर शेतक­यांच्या समस्यांचा जवळून अभ्यास करण्याची याद्वारे संधी उपलब्ध होत आहे. कृषि पदवीच्या विद्यार्थ्यांनी स्वत:चे कृषि संलग्न व्यवसाय सुरु करुन इतर युवकांना काम देण्याचे कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कृषि अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख, डॉ. आर. जी. भाग्यवंत यांनी विद्यार्थ्यांना विविध कृषि व्यवसायिक संस्थामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होत असुन त्या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन स्वत: सुधा कृषि व्यवसायिक संस्था स्थापन करावी असे नमुद केले. कृषि अर्थशास्त्रचे विभाग प्रमुख, डॉ. डी. एस. पेरके यांनी विविध पिकांच्या विक्री व्यवस्थापनासंबंधीत मार्गदर्शन करुन विद्यापीठातील विविध युनिटला भेट देऊन विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती करुन घ्यावी, अशी सुचना केली. किटकशास्त्रचे विभाग प्रमुख, डॉ. पी. एस. नेहरकर यांनी मराठवाडयातील विविध किड व रोगाविषयी मार्गदर्शन करुन मित्रकीडी व शत्रुकीडी कश्या ओळखाव्यात याबाबचे प्रात्यक्षिक करुन दाखविले व शेतक­यांच्या शेतावर संभाव्य कीड व रोगाबद्दल शेतक­यांना मार्गदर्शन करावे, असे सुचित केले.

कार्यक्रमास विषय विशेषज्ञ संघ प्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. ए. एस. लाड यांनी कृषि विस्तार शिक्षण, डॉ. एस. एन. पवार यांनी कृषि अभियांत्रिकी, डॉ. डी. टी. पाथ्रीकर, कृषि अर्थशास्त्र, डॉ. आर. ए. पाटील यांनी पशुसंवर्धन दुग्धशास्त्र, डॉ. एस. पी. झाडे यांनी मृदशास्त्र व कृषि रसायनशास्त्र, डॉ. एस. जी. शिंदे यांनी कृषि वनस्पतीशास्त्र, डॉ. व्हि. एम. घोळवे यांनी वनस्पती रोगशास्त्र, डॉ. आय.ए.बी. मिर्झा यांनी कृषिशास्त्र व डॉ. ए. एम. भोसले यांनी उद्यानविद्या या विषयांबाबत मार्गदर्शन केले. सदरील विद्यार्थ्यांना ऊती संवर्धन संशोधन केंद्र, सोयाबीन संशोधन केंद्र, ज्वार संशोधन केंद्र, गहु संशोधन केंद्र, मध्यवर्ती रोपवाटीका, तुती संशोधन केंद्र व कोरडवाहु शेती संशोधन केंद्र या विद्यापीठातील सात संशोधन केंद्रावर आवंटित करण्यात आले. कार्यक्रमास या संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संतोष बरकुले, मध्यवर्ती रोपवाटीका, डॉ. सी. बी. लटपटे, तुती संशोधन केंद्र आदि उपस्थित होते. कार्यक्रमास सातव्या सत्रातील २४३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

Friday, June 14, 2024

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वांनी कटिबद्ध असावे- माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

७५ वी विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठक संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाद्वारे आयोजित मध्य महाराष्ट्र पठारी विभागासाठीची ७५ वी विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठक दिनांक १४ जून रोजी राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले, पुणे येथील कृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ.हरिहर कौसडीकर, यांची उपस्थिती होती

कार्यक्रमात बोलताना मा कुलगुरू डॉ इन्द्र मणि म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतावरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठ, कृषि विभाग व इतर विस्तार यंत्रणांद्वारे प्राप्त शेतकऱ्यांचे प्रात्याभरणे हे संशोधन आणि विस्तार कार्याची दिशा ठरवण्यात अत्यंत महत्वपूर्ण ठरतात. प्रात्याभरणावर आधारित आणि मराठवाड्यातील हवामानाशी पूरक संशोधन विद्यापीठामार्फत करण्यात येते. हे संशोधन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचवण्याचे काम विद्यापीठ, कृषि विभाग व इतर विस्तार यंत्रणेतील सर्वांचे असून यासाठी सर्वांनी कटिबध्द असणे आवश्यक आहे. कृषि विभाग व विद्यापीठ यांच्यामध्ये नियमितपणे अशा बैठका होण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना शेतकऱ्यांना देणे प्रभावीपणे होईल. येणाऱ्या काळात देखील परभणी विद्यापीठामार्फत विविध वाण, शिफारशी व सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भविष्यात सर्वच विभागांनी एकत्र येऊन सतत व सामूहिक प्रयत्न केले तर आपल्याला आवश्यक असणारा बदल घडवून आणणे शक्य होणार आहे. त्यामुळे सर्वांनी "शेतकरी देवो भव:" हे ब्रीदवाक्य नेहमी लक्षात ठेवून अत्यंत प्रभावीपणे कार्य करावे असे नमूद केले.

यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी, विद्यापीठामार्फत संशोधनाचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तसेच सर्वच पिकांबद्दल संशोधन करून वाण व पिकांच्या सुधारित लागवड तंत्रज्ञाच्या शिफारशी देण्यात आलेल्या आहेत. या सर्वांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे आवश्यक असुन शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले.

तदनंतर विस्तार शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले म्हणाले की, विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिके वाढवावे. तसेच सर्वच यंत्रणांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम शेतकरी स्थरावर राबवावेत. तसेच विद्यापीठाच्या ज्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अवलंब केलेला आहे त्याच्या संबंधित माहितीचे देखील संकलन करून त्याचाही प्रसार व सादरीकरण करणे आवश्यक आहे.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना कृषि परिषदेचे डॉ.हरिहर कौसडीकर यांनी, कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरु असुन विद्यापीठातील संशोधन हे शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रातून झाले पाहिजे म्हणजे ते आणखी प्रभावीपणे होईल. शेतकऱ्यांच्या स्थरावर ज्या प्रमुख अडचणी येतात अशा ठिकाणांचे समूह ओळखून त्यांना त्यांच्याच शेतावर जाऊन विद्यापीठाने मार्गदर्शन व संशोधन करावे, असे नमूद केले.

कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी छत्रपती संभाजीनगर विभागाचे खरीप हंगाम नियोजनाचे सादरीकरण केले. याबरोबरच शंखी गोगलगाय, सतत पावसामुळे मल्चिंग वरील मिरची मधील मर रोगाचे जास्त प्रमाण, नाविन्यपूर्ण फळपिकांची लागवड मार्गदर्शन, आंबा व मोसंबी अति घन लागवड, सुरती हुरडा साठवणूक पद्धत, सोयाबीन व मका पिकांमध्ये जोड ओळ पद्धत आणि एस आर टी तंत्रज्ञान इत्यादी बाबींवर विद्यापीठाने संशोधन व विस्तार कार्य मोठ्या प्रमाणावर करावे असेही सांगितले.

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ.सूर्यकांत पवार यांनी केली तसेच बैठकीत सादर करण्यात आलेले विविध उपाय व सूचनाची अंमलबजावणी तसेच विस्तार सर्व विभागांनी करावा, असे आवाहन केले. यावेळी कृषी विभाग व विद्यापीठाच्या विविध विभागाद्वारे आपापल्या विभागांचे सादरीकरण करण्यात आले आणि आलेल्या प्रात्याभरणावर चर्चा करून त्यावर उपाययोजना देण्यात आल्या. बैठकीस विद्यापीठातील विविध विभागाचे प्रमुख, शास्त्रज्ञ, लातूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी, विभागातील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व मान्यवर यांची उपस्थिती होती.

Thursday, June 13, 2024

वनामकृविचा माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या अभिनव उपक्रमाद्वारे शास्त्रज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 सेंद्रिय शेतीमधील संधीचा लाभ घ्यावा ..... माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यलयाद्वारे माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा अभिनव उपक्रम दिनांक १२ जून संपूर्ण मराठवाड्यात राबविण्यात आला. यामध्ये प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके, शेतकरी मेळाव्याद्वारे विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांच्या एकूण १६ चमूमधिल ४७ शास्त्रज्ञांनी आणि सातव्या सत्रातील ग्रामीण जागुरुकता कार्यानुभव कार्यक्रमामध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ५६३ शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या शेतीविषयक समस्यांचे निराकरण केले.
या उपक्रमांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि कै. संभाजीराव पवार शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती व सेंद्रिय आंबा लागवड यातील संधी व आव्हाने या विषयावर मौजे मुगाव, ता. नायगाव, जिल्हा नांदेड येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब बऱ्हाटे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.पुनमताई पवार, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी.आर. देशमुख आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की शाश्वत शेती उद्योगासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असून यामध्ये ड्रोन-तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने सामावेश करावा लागेल तसेच रासायनिक खते व औषधीचा अतिरिक्त वापर टाळावा. याबरोबरच सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा व खर्चामध्ये बचत करावी आणि सेंद्रिय शेती द्वारे उत्पादित फळे, भाजीपाला व अन्नधान्य यांना बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे यामुळे या संधीचा लाभ मिळवून आर्थिक उन्नती साधावी असे नमूद केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ पुनमताई राजेशजी पवार यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व विशद करून रासायनिक निविष्ठा यांचा मर्यादित वापर करून जमीन सदृढ ठेवण्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यापीठातील चमूने श्री.राजेश फत्ते यांच्या शेतात प्रक्षेत्र भेट दिली. भेटी दरम्यान विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी खरीप पिक लागवडीचे योग्य नियोजन आणि अवलंबनाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी शासनाच्या विविध योजनेची माहिती दिली. याबरोबरच सेंद्रिय शेती प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रिय शेतीमधील विविध संधी आणि आव्हाने व त्यावरील उपाय सांगितले तर उद्यानविद्या तज्ञ डॉ. बी एम कलालबंडी यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून फळबागेचे नियोजन व फळबागेसाठी जमिनीची निवड याबाबत माहिती दिली आणि मृदशास्त्र विभागाचे डॉ. सुदाम शिराळे यांनी जमिनीचे आरोग्य सांभाळण्यासाठी आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. याबरोबरच डॉ. अरविंद पंडागळे यांनी कापूस लागवड तंत्रज्ञानाविषयी आणि प्रा. अरुण गुट्टे सोयाबीन लागवडीबाबत प्रक्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच परभणी जिल्यातील असोला येथे विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विद्यापीठाचे मुख्य रावे समन्वयक तथा विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, प्रभारी अधिकारी डॉ. लक्ष्मण जावळे, डॉ. गणपत कोटे, डॉ. प्रवीण कापसे आणि डॉ. अनुराधा लाड यांनी सातव्या सत्रातील ग्रामीण जागुरुकता कार्यानुभव कार्यक्रमामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसमवेत माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा उपक्रम राबविला आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पुढेही सहा महिने विद्यापीठाच्या सर्व कृषि महाविद्यालयातील सातव्या सत्रातील ग्रामीण जागुरुकता कार्यानुभव कार्यक्रमाचे विद्यार्थी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात त्यांना दिलेल्या गावात राहून त्यांच्या संपर्क शेतकऱ्याना आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करणार असुन ग्रामीण भागाचा आणि शेती कार्याचा अनुभव घेणार आहेत.









Wednesday, June 12, 2024

संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती बैठकीत वनामकृविच्या दोन नवीन वाण आणि ४८ तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता

 मराठवाडाच्या कृषि विकासासाठी शिफारशी उपयुक्त .... माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची ५२ वी बैठक दिनांक ७ ते ९ जून दरम्यान अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात संपन्न झाली. या बैठकीमध्ये परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या भाजीपाला पिकांमध्ये भेंडीचा परभणी सुपर क्रांती (पीबीएन ओकरा -१) आणि फळ पिकामध्ये केळीचा वनामकृवि - एम ३ या नवीन वाणाची आणि पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित तसेच पोषण आहार, पशुविज्ञान आणि कृषि संलग्न इतर शाखेतील तंत्रज्ञानाच्या ४८ शिफारशींना मान्यता देण्यात आली.
मराठवाड्यातील वातावरण आणि सामाजिक परिस्थिती विचारात घेवून शिफारशी विकसित केल्या जातात म्हणून या शिफाराशीद्वारे मराठवाड्यांच्या कृषि विकासास चालना मिळणार असून शेती उत्पादने मूल्यवर्धित करून पोषण आहार निर्मिती करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आहेत असे प्रतिपादन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले.
वाणाप्रसारामधील भेंडीचा परभणी सुपर क्रांती (पीबीएन ओकरा -१) हा वाण अधिक उत्पादन देणारा असून खरीप हंगामात लागवडीसाठी मराठवाडा विभागात प्रसारित करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. तसेच केळीच्या उत्परिवर्तीत पैदास पद्धतीने विकसित केलेला कमी कालावधी, मध्यम उंची, चांगले उत्पादन आणि तसेच उभे पाने असलेला वनामकृवि - एम ३ या केळीच्या वाणाची मराठवाडा विभागात लागवड करण्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. 
याबरोबरच शिफारशी मध्ये कृषि विद्या विभागाच्या ८, उद्यानविद्या विभागाची १, पीक संरक्षणच्या ७, पशुविज्ञानची १, कृषि अभियांत्रिकीच्या ७, अन्न तंत्रज्ञानाच्या ११, सामुदायिक विज्ञानच्या ४, मृद विज्ञानच्या २, कृषि विस्तार शिक्षणच्या -३, कृषि अर्थशास्त्राच्या ४ अशा एकूण ४८ शिफारशीना मान्यता मिळालेली आहे. यासाठी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली संशोधक संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, बिजोत्पादन संचालक, डॉ देवराव देवसरकर, यांनी विद्यापीठातील शास्त्रज्ञाना मार्गदर्शन केले.