क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन
क्रॉपसॅप प्रकल्पामाध्यमातुन मागील आठ वर्षात कीड व रोग प्रादुर्भाव
सर्वेक्षणामुळे शेतक-यांना योग्य सल्ला दिल्यामुळे निश्चितच शेतक-यांना लाभ
झाला आहे. या प्रकल्पात कीड – रोग प्रादुर्भावाबाबत मोठी आकडेवारी संकलीत करण्यात
आली आहे, स्वयंचलित हवामान यंत्रणे प्रमाणेच या संकलीत आकडेवारीचा उपयोग करून संशोधनाच्या माध्यमातुन कीड व रोग
प्रादुर्भावाचा अंदाज वर्तवण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा निर्माण करण्यात यावी.
जेणे करून कमी मनुष्यबळात व कमी वेळेत शेतक-यांपर्यंत कीड व रोग प्रादुर्भावाचा
पुर्वानुमान पोहचविता येईल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कीटकशास्त्र विभाग व
महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन, कापुस, तुर
व हरभरा पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला (क्रॉपसॅप) प्रकल्पांतर्गत दिनांक
22 व 23 जुन रोजी कृषि विभागातील व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांचे दोन
दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या प्रशिक्षणाच्या
उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य
डॉ डि एन गोखले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बी आर शिंदे, विभाग प्रमुख डॉ
पी आर झंवर आदीची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले की, प्रगत देशात
उपग्रहाच्या मदतीने कीड व रोग प्रादुर्भावाचा अंदाज बाधण्यात येतो. हवामानातील
तापमान, आर्द्रता व पर्जन्य आदीचा अंदाज घेऊन कीड – रोग प्रादुर्भावाचा अंदाज
वर्तवण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा विकसित करण्यासाठी संशोधनाची गरज आहे.
विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आपल्या भाषणात म्हणाले की,
आठ वर्षापुर्वी सोयाबीनवर पडलेल्या लष्करी अळीच्या उद्रेकामुळे शेतक-यांचे मोठे
नुकसान झाले होते, त्याच वेळी क्रॉपसॅप प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. प्रकल्पाच्या
उपयुक्तता पाहता, प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यात आली. सदरिल प्रकल्पामुळे गेली
आठ वर्ष कीड - रोग प्रादुर्भावाबाबत शेतक-यांमध्ये मोठी जागृती झाली आहे. जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे म्हणाले की, यावर्षी राज्यातील कापसाचा पेरा
वाढण्याची शक्यता असुन सदरिल प्रकल्पामाध्यमातुन योग्य सल्ला दिल्या गेल्यास
निश्चितच शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ पी आर झंवर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ
आनंद बडगुजर यांनी केले तर आभार डॉ डी पी कुळधर यांनी मानले. कार्यक्रमास कृषि
विभागातील व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. तांत्रिक
सत्रात डॉ बी बी भोसले, डॉ पी आर झंवर, डॉ बी व्ही आसेवार, डॉ ए पी सुर्यवंशी, प्रा
अरविंद पांडागळे, प्रा बी व्ही भेदे, डॉ डि जी मोरे, डॉ ए जी बडगुजर आदींनी विविध
विषयावर मार्गदर्शन केले.