Tuesday, August 1, 2017

मराठवाडयात कपाशीवर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव


शेंदरी बोंडअळी व्‍यवस्‍थापनासाठी वनामकृविच्‍या कीटकशास्‍त्रज्ञांचा सल्‍ला  

मराठवाडयातील परभणी, जालना, नांदेड, बीड आदी जिल्हया हंगामाच्या सुरुवातीपासूनच बी टी कपाशीवर शेंदरी बोडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील किटकशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञानी प्रादुर्भावग्रस्त प्रक्षेत्रास भेटी दिल्या असता, शेंदरी बोंडअळी प्रादुर्भाव दिसून आला. बी. टी. कपाशीमुळे या बोंडअळीचे यशस्वीरीत्या व्यवस्थापन होईल असा विश्वास होता. पंरतु गेल्‍या 4-5 वर्षाचा अनुभव लक्षात घेता शेंदरी बोंडअळीमध्ये बी टी कपाशी विरुध्द प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे दिसून येते. शेंदरी बोंडअळी ही कपाशीवरील अतिशय घातक कीड असुन कपाशी पिकावर या किडीचा प्रादुर्भाव साधारणता ऑक्टोबर नंतर आढळून येतो. परंतू सध्या शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव बी टी कपाशीवर जुलै महिन्यापासून आढळुन येत आहे. मागील वर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणावर कपाशीचे फरदड (पुर्नबहार) घेतल्याने चालु खरीप हंगामात या बोंडअळीचा प्रादुर्भाव लवकर मोठया प्रमाणात होण्याची शक्यता किटकशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञानी गोदरच व्यक्त केली होती तसे फरदड घेण्याबाबत आवाहन सुध्दा करण्यात आले होते.
प्रादुर्भावाची प्रमुख कारणे :
कपाशीच्या फरदडीखाली क्षेत्रात वाढ झाल्यामुळे किडीच्या जीवनक्रमात खंड पडत नाही. हंगाम संपल्यानंतर कपाशीच्या पऱ्हाटया अवशेष शेतात किंवा शेताजवळ तसेच रचून ठेवणे वेळेवर विल्हेवाट लावणे. बीटी जनुकास प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे बीटी कपाशीवर या बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. आश्रय पिकाच्या ओळी लावणे. योग्यवेळी शेंदरी बोंडअळीच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले आहे.

सदय स्थितीत करावयाच्‍या उपाय योजना  

प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाने बोंडे जमा करुन नष्ट करावे. डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट करावे. गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे वापरावे (हेक्‍टरी पाच सापळे) सरासरी 8 ते 10 पतंग प्रति सापळा सतत 2 ते 3 दिवस ही आर्थिक नुकसानीची पातळी समजावी. ट्रायकोग्रामाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीचे कार्ड (1.5 लाख अंडी/हे.) कपाशीत लावावेत.

आर्थिक नुकसानीची पातळी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी

दहा हिरवी बोंडांवर एक जीवंत अळी किंवा 8-10 पतंग प्रति सापळा सलग 3 रात्री आढळुन आल्‍यास पुढीलपैकी कोणत्‍याही एका रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. प्रती दहा लिटर पाण्‍यात 50 मिली अझाडिरॅक्टीन 0.15 टक्के किंवा 40 मिली अझाडिरॅक्टीन 0.30 टक्के किंवा 4 मिली थायामिथिक्झाम 12.6 टक्के + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी किंवा 20 मिली क्विनॉलफॉस 25 ईसी किंवा 20 मिली प्रोफेनोफॉस 50 ईसी किंवा 20 ग्रॅम थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी किंवा 10 मिली लॅमडा साहॅलोथ्रीन 5 ईसी. सदरिल कीटकनाशकांचे प्रमाण हे साध्या पंपासाठी असनु पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे.

शेंदरी बोंडअळीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन वरील प्रमाणे उपाययोजना कराव्यात, असे वाहकिटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर, डॉ. . जी. बडगुजर प्रा.बी. व्ही. भेदे यांनी केले आहे.

डोंम कळी
सध्या आढळून येत असलेली सुरुवातीच्या अवस्थेतील शेंदरी बोंडअळी