Saturday, May 18, 2019

शेतक-यांना गटशेतीशिवाय पर्याय नाही....राज्‍याचे कृषी सचिव मा श्री एकनाथराव डवले

वनामकृवित आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन


मार्गदर्शन करतांना राज्‍याचे कृषी सचिव मा श्री एकनाथराव डवले

शेती व शेतक-यांपुढे अनेक समस्‍या आहेत, या समस्‍या सोडविण्‍याकरिता शेतक-यांना संघटीत होणे गरजेचे असुन गटशेती शिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे बाजारातील शेतक-यांची सौदाशक्‍ती वाढीस लागेल, असे प्रतिपादन राज्‍याचे कृषी सचिव मा श्री एकनाथराव डवले यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ४७ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ मे शनिवार रोजी आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर विशेष अतिथी म्‍हणुन माजी कृषि आयुक्‍त तथा महाराष्‍ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यकारी संचालक मा श्री उमाकांत दांगट हे उपस्थित होते. व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक महेश कुलकर्णी, लातुर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री एस बी आळसे, उपविभागीय कृषि अधिकारी श्री सागर खटकाळे आदींची प्रमु़ख उपस्थिती होती.
कृषी सचिव मा श्री एकनाथराव डवले पुढे म्‍हणाले की, आज पारंपारिक शेती किफायतशीर राहीली नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करूनच शेती करावी लागेल, अनेक तरूण आधुनिक शेतीकडे वळत आहेत, आजच्‍या शेतक-यांचा तंत्रज्ञानकडे ओढा वाढत आहे, ही चांगली बाब आहे. परभणी कृषि विद्यापीठातील तुर, ज्‍वार, सोयाबीन आदी पिकांची वाण शेतक-यांपर्यंत पोहचली आहेत. येणा-यां वर्षात हवामान अंदाजाकरिता महावेध योजना राज्‍यात कार्यान्‍वीत करण्‍यात येणार असुन त्‍यामुळे शेतक-यांना अचुक हवामान अंदाज व कृषि सल्‍ला मिळणार आहे. कीड व रोग प्रादुभार्वाचा अचुक अंदाजाने पिक संरक्षण करण्‍यास शेतक-यांना मदत होणार आहे. येणा-या खरिप हंगामात मक्यावरील लष्‍करी अळी, कापसावरील गुलाबी बोंडअळीहुमणी आदी कीडीच्‍या व्‍यवस्‍थापनावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.
मा श्री उमाकांत दांगट आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, देशाची अर्थव्‍यवस्‍था पुर्णपणे शेती अर्थव्‍यवस्थेवरच अवलंबुन आहे. जागतिकरणाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. सकल राष्‍ट्रीय उत्‍पादनात शेतीक्षेत्राचा वाटा कमी झाला आहे, परंतु आजही रोजगारासाठी 60 टक्के लोकसंख्‍या आजही शेतीवरच अवलंबुन आहे. बदलत्‍या हवामानात ज्ञान व तंत्रज्ञानाच्‍या आधारेच शेती करावी लागेल.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडयातील शेतीपुढे अनेक प्रश्‍न आहेत, येणा-या हंगामात विविध पिकांवरील कीडींच्‍या प्रादुभार्वाचे आव्‍हान शेतक-यांपुढे राहणार आहे, परंतु या किडींच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व कृषि विभाग शेतक-यांना तंत्रज्ञानात्‍मक पाठबळ देईल. दुष्‍काळ परिस्थितीत शेतक-यांच्‍या फळबागा अडचणीत आल्‍या, विशेषत: हलक्‍या जमीनीवरील मोसंबी बागाचे मोठे नुकसान झाले आहे. त्‍यामुळे हलक्‍या ते मध्‍यम जमीनीत डाळिंब, सिताफळ, अॅपल बोर आदी फळपिक शेतक-यांनी घ्‍यावीत. शेतक-यांमध्‍ये मोठी मागणी असलेला कापसाचा विद्यापीठ विकसित नांदेड-44 हा वाण बीटीमध्‍ये परावर्तीत करण्‍यात आला असुन येणा-या खरिप हंगामात या वाणाचे बियाणे मर्यादित प्रमाणात महाबिज उपलब्‍ध करणार आहे. या वाणाचे बियाणे पुढील वर्षी मोठया प्रमाणात उपलब्‍ध होईल, असे आश्‍वासनही त्‍यांनी दिले.  
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव व डॉ अरूण गुट्टे यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. मेळाव्‍यात शासन पुरस्‍कार प्राप्‍त प्रगतशील शेतक-यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला तसेच विद्यापीठ मासिक शेतीभाती, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्तिका, घडीपत्रिका आदींचे विमोचन करण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठ विकसित विविध तंत्रज्ञान आधारीत दालनाचा समावेश असलेल्‍या कृषि प्रदर्शनीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. 
तांत्रिक सत्रात हुमणी कीड, गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनावर डॉ पी आर झंवर यांनी मार्गदर्शन केले तर लष्‍करी अळी व्‍यवस्‍थापनावर डॉ बी व्‍ही भेदे, मोसंबी बागाचे कमी पाण्‍यात संरक्षण यावर डॉ एम बी पाटील, कापुस लागवडीवर डॉ अे जी पंडागळे, सोयाबीन लागवडीवर डॉ यु एन आळसे, तुर लागवडीवर डॉ एस बी पवार, हवामान अनुकूल शेतीवर डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ एम एस पेंडके, ज्‍वार लागवडीवर डॉ प्रितम भुतडा, रेशीम उद्योगावर डॉ सी बी लटपटे, फळबाग लागवडीवर डॉ शिवाजी शिंदे, कडधान्य पिक लागवडीवर डॉ पी ए पगार आदींनी मार्गदर्शन करून शेतक-यांच्‍या कृषि विषयक प्रश्‍न व शंकाचे शास्‍त्रज्ञानी निरासरन केले. विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटनही करण्‍यात आले. मेळाव्‍यास व कृषि प्रदर्शनीस शेतक-यांनी मोठा प्रतिसाद दिला.

मेळाव्‍यात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आलेले शासन पुरस्‍कार प्राप्‍त प्रगतशील शेतकरी
जालना जिल्‍हयातील उध्‍दवराव खेडेकर (मु शिवनी पो नेर), जयकिशन शिंदे (मु वरूडी पो गेवराई बाजार ता बदनापुर), पुंजाराम भुतेकर (मु हिवरडी, पो पिंपळगाव), औरंगाबाद जिल्‍हयातील भरत आहेर (मु टोणगांव पो कुंभेफळ), विजय चौधरी (खुल्‍ताबाद), संतोष देशमुख (औरंगाबाद), उस्‍मानाबाद जिल्‍हयातील त्र्यंबक फंड (मु जळकोटवाडी पो वडगांव काटी, ता तुळजापुर), विकास थिटे (मु बावची ता परांडा), बीड जिल्‍हयातील बालाजी तट (मु पो आपेगांव ता अंबेजोगाई), रमेश सिरसाट (मु पो आरणगांव ता केज), संतोष राठोड (मु वसंतनगर तांडा, ता परळी), लातुर जिल्‍हयातील बाबासाहेब पाटील (मु पो हेर ता उदगीर), अनिल चेळकर (मु पो किल्‍लारी ता औसा), परभणी जिल्‍हयातील सदाशिव थोरात (मु सारोळा खुर्द ता पाथरी) आदी शेतक-यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
मार्गदर्शन करतांना मा श्री उमाकांतजी दांगट
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटन करतांना

मेळाव्‍या निमित्‍त आयोजित कृषि प्रदर्शनीचे उदघाटन करतांना


कापुस संशोधन केंद्राच्‍या प्रदर्शनी दालनास मान्‍यवरांची भेट 
उस्‍मानाबाद जिल्‍हयातील मौजे बावची येथील उद्यान पंडित पुरस्‍कार प्राप्‍त प्रगतशील शेतकरी विकास थिटे यांचा सत्‍कार करतांना