वनामकृवि अंतर्गत असलेल्या सत्ताविस कृषि
महाविद्यालयाच्या २६४६ विद्यार्थ्यांचा उपक्रमात सहभाग
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत एकुण
सत्ताविस (२७)
घटक व संलग्न कृषी महाविद्यालय असुन कृषि पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) राबविण्यात येतो. या सत्रातील विद्यार्थांना कृषिदुत व कृषिकन्या असे संबोधन्यात येते, हे विद्यार्थ्यी प्रत्यक्ष शेतक-यांच्या शेती कसण्याचे तंत्र व ग्रामीण जीवन पध्दतीचा अभ्यास
करतात, तसेच विद्यापीठ शिफारसीत कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्यक्षिके
व कार्यक्रम आयोजित करून कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्यासाठी विस्ताराचे
कार्य करतात, हे विद्यार्थ्यी साधारणत: पंधरा आठवडे दत्तक गांवात कार्यरत असतात. यावर्षी एकुण सत्ताविस
(२७) घटक व संलग्न कृषि महाविद्यालयातील २६४६ विद्यार्थ्यींनी सातव्या
सत्रात नोंदणी केलेली असुन मराठवाडयातील आठ जिल्हयातील चारशे गावांची निवड हा कार्यक्रम
राबविण्यासाठी करण्यात आली आहे.
गतवर्षी माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांच्या
सुचनेनुसार कृषीदुत व कृषीकन्याच्या माध्यमातुन संपुर्ण मराठवाडयात कापसावरील
गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात आला होता, त्याची दखल
कृषि आयुक्तालयानेही घेतली. यावर्षीही मका पिकावरील लष्करी अळी, कापसावरील
गुलाबी बोंडअळी, हुमणी कीड आदींचा प्रा़दुर्भाव बघता, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू
मा डॉ अशोक ढवण, कृषि आयुक्त मा श्री सुहास दिवसे व शिक्षण संचालक डॉ प्रदीप
इंगोले यांच्या सुचनेनुसार कीड व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार मोहिम कृषि विभाग
व कृषि विज्ञान केंद्र, संशोधन केंद्राच्या सहकार्याने संपुर्ण मराठवाडयात राबविण्यात
येत आहे. तसेच ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कृषीदुत व कृषीकन्या कृषी
तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्यक्षिके, चर्चासत्र, शेतकरी मेळावे, जनावरांचे
लसीकरण, वृक्षलागवड, माती परिक्षण, बोर्डो मिश्रण व कंपोस्ट खत तयार करणे, जैविक
खतांची बीजप्रक्रिया आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या वतीने
परिस्थितीनुसार देण्यात येणारे कृषि सल्ले घडीपत्रिका, भितीपत्रिका आदीच्या
माध्यमातुन शेतकरी बांधवापर्यंत पोहोविण्याचे कार्य करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे महत्वाचे असुन
सदरिल दत्तक गांवात कामगंध सापळे निवडक शेतक-यांच्या शेतीत लावण्यात येऊन त्याबाबत
कृषी किटकशास्त्रज्ञ मार्गदर्शन करित आहेत. याबाबत जालना, औरंगाबाद व परभणी येथे
कार्यशाळेत कृषि महाविद्यालयातील तज्ञांना मार्गदर्शन करण्यात आले. नुकतेच जालना
जिल्हयातील खरपुडी कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभागाच्या वतीने राबविण्यात येत
असलेल्या गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन मोहिमे अंतर्गत खरपुडी येथील कृषि
महाविद्यालयाच्या कृषिदुतांनी मौजे वानडगांव येथील शेतक-यांच्या कपाशीच्या शेतावर
७५० कामगंध सापळे लावण्याकरिता मदत केली. निवडलेल्या चारशे गावां व्यतिेरिक्त आजूबाजूच्या
गावांसह एक हजारपेक्षा जास्त गावांत कृषीदुत व कृषीकन्यांनी कामगंध सापळाच्या
प्रात्यक्षिके देऊन मार्गदर्शन केल आहे. जुन व जुलै महीण्यात ही विविध उपक्रम
राबविण्यात आले असुन पुढील ऑगस्ट व सप्टेबर महिण्यापर्यंत कृषिदुत व कृषिकन्या
सदरिल गावांत कार्यरत राहणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातुन कृषी पदवीचे
विद्यार्थ्यींना प्रत्यक्ष कृषी विस्तार कार्याचा अनुभव मिळत असल्याची माहिती रावे
विद्यापीठ समन्वयक डॉ राकेश आहिरे यांनी दिली.