Friday, October 31, 2025

क्रीडा ही शारीरिकच नव्हे तर मानसिक सबलीकरणाचेही प्रभावी माध्यम – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे उत्साहात आयोजन

वसंतराव वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि अन्नतंत्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये बॅडमिंटन, व्हॉलीबॉल आणि टेबल टेनिस (मुली) या क्रीडा प्रकारांचा समावेश होता.

उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम उपस्थित होते. व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. प्रविण वैद्य, माजी विभागप्रमुख डॉ. विजया नलावडे आणि माजी क्रीडा शिक्षक डॉ. गुळभिले आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, क्रीडा म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नव्हे, तर ती मानसिक सबलीकरण आणि व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेऊन आत्मविश्वास, शिस्त आणि संघभावना वाढवावी.

उद्घाटक शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, बॅडमिंटनसारखा खेळ एकाग्रता आणि निर्णयक्षमता वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. क्रीडेमुळे विद्यार्थिनींमध्ये नेतृत्वगुण आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कैलास गाडे यांनी केले. या स्पर्धांमध्ये एकूण २० महाविद्यालयांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. दिवसभर परिसरात खेळाडूंच्या जयघोषाने आणि स्पर्धात्मक वातावरणाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड आगामी स्वारातीम विद्यापीठ, नांदेड येथे होणाऱ्या क्रीडा महोत्सवासाठी करण्यात येणार आहे.

यावेळी डॉ. गोदावरी पवार,  डॉ. भारत आगरकर यांच्यासह विविध महाविद्यालयांची प्रतिनिधी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. प्रीती ठाकूर यांनी केले.






शेतकऱ्यांनी वनामकृवि विकसित बैलचलित सुधारित अवजारांचा वापर सेंद्रिय शेतीमध्ये करून उत्पादन खर्च कमी करावा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण” या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना सुधारित बैलचलित व मनुष्यचलित शेती अवजारे तसेच यंत्रांचे वाटप व प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला.

हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य श्री. भागवत देवसरकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार तसेच निमंत्रित म्हणून सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य आणि शास्त्रज्ञ डॉ. हरीश उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, शेतकऱ्यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित अवजारांचा सेंद्रिय शेतीत व्यापक वापर करावा. या अवजारांमुळे श्रम व वेळ दोन्हीची मोठ्या प्रमाणावर बचत होईल, उत्पादन खर्च कमी होईल आणि शेती अधिक कार्यक्षम बनेल. त्यांनी पुढे सांगितले की, सेंद्रिय शेती ही केवळ पर्यावरणपूरक नव्हे, तर भविष्यातील टिकाऊ शेतीचा पाया आहे. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना  ‘सुपर मोती’ ज्वारी वाणाची लागवड या अवजारांच्या साहाय्याने करावी, ज्यामुळे उत्पादनात गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही वाढतील, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यकारी परिषदेचे सदस्य श्री. भागवत देवसरकर यांनी या अवजारे वाटप उपक्रमाचे कौतुक करून सांगितले की, विद्यापीठाच्या संशोधनातून तयार झालेल्या या नवकल्पनांचा शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतीत वापर केल्यास मराठवाडा प्रदेशातील कृषि उत्पादनात नक्कीच क्रांती घडेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले की, विद्यापीठाने विकसित केलेली अवजारे केवळ वापरणेच नव्हे, तर ती योग्य तांत्रिक पद्धतीने आणि काटेकोरपणे वापरणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर सर्व शेतीकामे पूर्ण करण्याचे आणि पिक व्यवस्थापनात शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी हेही सांगितले की, वेळेवर आणि योग्य पद्धतीने केलेले नियोजन हेच उत्पादनवाढीचे गमक आहे.

प्रस्ताविक योजनेचे संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांनी केले. त्यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे लिंगापूर येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील बारा शेतकरी कुटुंबांना ३६ प्रकारची एकूण १३३ सुधारित बैलचलित व मनुष्यचलित शेती अवजारे आणि यंत्रे वाटप करण्यात आली. तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या सुपर मोती’ या ज्वारी वाणाचे बीजही शेतकऱ्यांना देण्यात आले.

वाटप केलेल्या अवजारांमध्ये — हळदीस माती लावणारे अवजार, धसकटे गोळा करणारे अवजार, उसास माती लावण्यासाठी सरी यंत्र, हात कोळपे, सायकल कोळपे, टोकन यंत्र, कडबा कुट्टी, पीठ गिरणी, शेवया यंत्र, फळे काढणी अवजार, हस्तचलित कात्री, तुरीचे शेंडे खुडणी यंत्र इत्यादींचा समावेश आहे.
डॉ. टेकाळे यांनी अवजारांच्या तांत्रिक वापराबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, या सुधारित अवजारांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च २० ते २५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो तसेच उत्पादकता वाढविता येते.

या प्रसंगी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. रघुनाथ जायभाय व प्रा. दत्ता पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पशुशास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योजनेतील इंजी. अजय वाघमारे, इंजी. दीपक राऊत, इंजी. पूर्णिमा राठोड, प्रदीप मोकाशी, दीपक यंदे आणि मंगेश खाडे यांनी परिश्रम घेतले.







Wednesday, October 29, 2025

“कृषितरंग – २०२५” : युवक कलागुणांना व्यासपीठ देणारा वनामकृवित भव्य सोहळा संपन्न

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन उद्घाटन

माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. रवींद्रसिंह परदेशी व अभिनेता माननीय श्री. अनिल मोरे यांची प्रेरणादायी उपस्थिती



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथे आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव निवड चाचणी “कृषितरंग – २०२५या उपक्रमाचे भव्य आयोजन दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी कृषि महाविद्यालय सभागृहात करण्यात आले.

या सोहळ्यासाठी अध्यक्ष व उद्घाटक माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमास, जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री. रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी (भा.पो.से.), तसेच माजी सनदी अधिकारी व प्रसिद्ध सिनेअभिनेता माननीय श्री. अनिल मोरे, अस्थी रोग तज्ज्ञ डॉ केदार खटिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार (ऑनलाईन), तर व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत, शैक्षणिक प्रभारी डॉ. रणजित चव्हाण, सांस्कृतिक कार्यक्रम सचिव डॉ. नरेंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमात सहभागी होत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमधून आपली गुणवत्ता, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण अधिक प्रभावीपणे प्रदर्शित करावेत, असे आवाहन केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री. रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी (भा.पो.से.), यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, युवक महोत्सव हे प्रत्येक तरुणाच्या करिअरचे प्रवेशद्वार आहे.
माननीय राज्यपाल महोदयांच्या महत्त्वाकांक्षी “इंद्रधनुष्यया महाविद्यालयीन स्पर्धेसाठी आज या विद्यापीठातील विद्यार्थ्यांची निवड होणार असल्याने त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, युवक महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची ओळख व जाण निर्माण होते, तसेच तिच्या वृद्धीसही हातभार लागतो. दुर्गम भागातही समाज आपली परंपरा आणि संस्कृती जपत आहे, हे आपल्या अभिमानाचे लक्षण आहे. यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या मनात सकारात्मक विचार ठेवावेत, स्वतःतील गुण ओळखावेत व त्यांचा विकास करावा. अशा युवक महोत्सवातूनच भविष्यातील नामांकित कलाकार घडतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या व्यावसायिक जीवनाबद्दल निष्ठा बाळगावी, सातत्याने प्रयत्न करावेत, आणि आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडावी. विद्यार्थ्यांकडे उत्तम आचार-विचार, विविध कलांचा जोश व ऊर्जा असावी. तरुणाई जपावी, परंतु कोणत्याही गैरमार्गाला बळी पडू नये.

मोबाईलसह इतर गॅझेटचा सदुपयोग करून नाविन्यपूर्ण उपक्रम आत्मसात करावेत. स्वछंदी व्हावे, चांगल्या सवयी, वाचनाची आवड जोपासावी, आणि समाजाशी नाते घट्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच त्यांनी सांगितले की, निराश न होता सकारात्मक दृष्टीकोनातून जीवनाकडे पाहावे. सगळं काही संपलं आहे” असे न समजता, तेथूनच नवी सुरुवात करावी. आपल्या गरजा कमी ठेवाव्यात आणि उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर करावा, असा उपयुक्त सल्लाही त्यांनी दिला.

शेवटी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ‘सुगरणीचा खोपा’ या कवितेचा उल्लेख करून, कोणत्याही लोभाला बळी न पडण्याचा संदेश दिला आणि “इंद्रधनुष्यस्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी होऊन मोठे कलाकार बनावेत, अशा शुभेच्छा दिल्या.

माननीय श्री. अनिल मोरे यांनी प्रत्येकाने स्वतःची शक्ती आणि गुण ओळखून आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्वतःच्या जीवनातील उदाहरण देऊन स्पष्ट केले. पुढे त्यांनी या विद्यापीठाच्या विशालतेचे वर्णन करताना त्यांनी नमूद केले की, या विद्यापीठाशी घटक आणि संलग्न ५९ महाविद्यालयांमध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये मुलींची वाढती संख्या पाहून त्यांच्या कृषि शिक्षणातील रुची आणि प्रगतीचे विशेष कौतुक केले.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, आपली संस्कृती जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. माणसे जोडण्याची आणि नाती जोपासण्याची आवड प्रत्येकामध्ये असावी. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देताना त्यांनी म्हटले की, जीवन हा एक उत्सव आहे, आणि ज्याला याची जाणीव झाली तोच खरा कलाकार ठरतो. तोच आपल्या व्यवसायात आणि जीवनात यशस्वी होतो. तसेच जे काही करायचे आहे ते शंभर टक्के समर्पणाने, झोकून देऊन आणि सर्वोच्च दर्जाने करावे. साक्षरता आपण सर्व मिळवतो, परंतु जीवन साक्षरता प्रत्येकाने विकसित करणे गरजेचे आहे. शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व देण्याचे त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले. शेवटी त्यांनी आवाहन केले की, स्वतःच्या मनासारखे जगायचे असेल तर स्वकर्तृत्वावरच जगता येते. त्यासाठी शिक्षण हाच सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणूनच आपल्या ज्ञानाची आणि शिक्षणाची भूक सतत वाढवत राहा.

याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनीही कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण डॉ. प्रविण वैद्य यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यांना आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख होते आणि त्यातून ते भविष्यात उत्कृष्ट नागरिक बनतात, असे सांगून त्यांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले.

प्रस्ताविकात डॉ. राजेश कदम यांनी भारत हा युवकांचा देश असून, त्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी युवक महोत्सवाचे विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे दिनांक ५ ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित “इंद्रधनुष्य – २०२५-२६” या २१ व्या महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवक महोत्सवासाठी विविध कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांची निवड होणार असून, त्यातून विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सूत्रसंचालन डॉ. धीरज पाथ्रीकर आणि डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले, तर आभार डॉ. रणजीत चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमात १७ महाविद्यालयांतील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध कलागुण सादर केले. परीक्षकांनी या सादरीकरणांचे परीक्षण करून “इंद्रधनुष्य” स्पर्धेसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड सुचवली.








Tuesday, October 28, 2025

“कृषितरंग – २०२५” : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात युवक प्रतिभांचा उत्सव

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथे आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव निवड चाचणी “कृषितरंग – २०२५या उपक्रमाचे भव्य आयोजन दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता कृषि महाविद्यालय सभागृहात करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून, कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्रीमती  नतिशा माथूर (भा.प्र.से.), जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री. रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी (भा.पो.से.), तसेच माजी सनदी अधिकारी व प्रसिद्ध सिनेअभिनेता माननीय श्री. अनिल मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांची मान्यवर उपस्थिती लाभणार आहे.

कृषितरंगया युवक महोत्सवाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे हा असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सांस्कृतिक, कलात्मक आणि सर्जनशील कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.

या कार्यक्रमात संगीत, नृत्य, नाटक, वाद्य वादन, एकांकिका, चित्रकला, वक्तृत्व, वादविवाद, काव्यपठण आदी विविध सांस्कृतिक आणि कलात्मक स्पर्धांमध्ये या विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी उत्साहाने सहभाग घेणार आहेत. या स्पर्धांमधून निवड झालेल्या विजेत्या स्पर्धकांना जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दिनांक ५ ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित “इंद्रधनुष्य – २०२५-२६” या २१ व्या महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवक महोत्सवात विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत, शैक्षणिक प्रभारी डॉ. रणजित चव्हाण, आणि सांस्कृतिक कार्यक्रम सचिव डॉ. नरेंद्र कांबळे यांनी नियोजन आणि अंमलबजावणीचे कार्य प्रभावीपणे पार पाडले आहे.

कृषितरंग – २०२५या महोत्सवातून विद्यापीठातील युवा प्रतिभांना नवसंजीवनी मिळून, त्यांच्या कलात्मकता, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुणांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास आयोजक मंडळाने व्यक्त केला आहे.






“वॉक फॉर युनिटी” उपक्रमाचे आयोजन — सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वनामकृवि व परभणी पोलिस दल यांचे संयुक्त आयोजन

 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि परभणी पोलिस दल यांच्या संयुक्त विद्यमाने “वॉक फॉर युनिटी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा उपक्रमास दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता विद्यापीठाच्या शेतकरी भवन येथून प्रारंभ झाला. या प्रसंगी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शुभेच्छा देत या उपक्रमाचे स्वागत केले. परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री रवींद्रसिंह परदेशी यांनी हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला सुरुवात केली.

या वेळी कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुरज गुंजाळ तसेच विद्यापीठाचे आणि पोलीस दलाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

आपल्या मनोगतात पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी म्हणाले की, आपला भारत देश सुदृढ आणि फिट राहावा, तसेच कृषि आणि पोलीस दलातही फिटनेस टिकवून समाजसेवेचे कार्य अधिक परिणामकारकपणे पार पाडावे, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वाचे आहे.

या उपक्रमात पोलीस विभागाचे अधिकारी, प्राध्यापक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्व सहभागीनी राष्ट्रीय एकात्मता, बंधुत्व आणि देशभक्तीचा संदेश देत विद्यापीठाच्या परिसरातून पदभ्रमण केले.

या कार्यक्रमाचा उद्देश देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा होता. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेला चालना देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय व परभणी पोलिस विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.






Monday, October 27, 2025

राष्ट्रीय कृषि विद्यार्थी संमेलनात देशभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग — माननीय केंद्रीय कृषि मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

 वनामकृविच्या विद्यार्थ्यांचा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली सहभाग


नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR) व भारतीय कृषि संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय कृषि विद्यार्थी संमेलन” (National Agricultural Students' Sammelan) चे आयोजन दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम सी. सुब्रमण्यम सभागृह, एनएएससी संकुल, नवी दिल्ली येथे हायब्रीड मोड मध्ये पार पडला.

या संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारचे केंद्रीय कृषि व किसान कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री माननीय नामदार श्री शिवराज सिंह चौहान आणि विशेष अतिथी म्हणून भारत सरकारचे कृषि व किसान कल्याण राज्य मंत्री माननीय नामदार  श्री. भागीरथ चौधरी, भारतीय कृषि संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक तथा कृषि संशोधन आणि शिक्षण विभागाचे (DARE) सचिव माननीय डॉ. मांगी लाल जाट आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात माननीय ना. श्री शिवराज सिंह चौहान, माननीय ना. श्री भागीरथ चौधरी तसेच माननीय डॉ. मांगी लाल जाट यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या प्रसंगी देशभरातील कृषि विद्यापीठांमधील विद्यार्थी, संशोधक, वैज्ञानिक आणि कृषि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन उपस्थित होते

यावेळी माननीय ना. श्री शिवराज सिंह चौहान यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे स्वागत करत देशभरातील हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी देशभरातील कृषि विद्यापीठांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचे कौतुक केले. तसेच, शेती क्षेत्रात अजूनही अनेक आव्हाने असल्याचे नमूद करत शेती ही अन्नसुरक्षा आणि आर्थिक विकासाचा पाया असल्यामुळे तिचे महत्त्व अधोरेखित केले. या संदर्भात विद्यार्थ्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे सांगून, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध उपाय सुचविले. त्यांनी प्रत्येक विद्यापीठाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची गरज व्यक्त केली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सुलभता निर्माण होईल. तसेच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी कौशल्यविकासावर भर देण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन सहभागाचे नियोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ सचिन मोरे यांनी केले.

यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा आचार्य पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थी श्री. राहुल अशोक ठोंबरे यांना माननीय महोदयांशी ऑनलाईन संवाद साधण्याची संधी मिळाली. ठोंबरे यांनी विद्यापीठाच्या यशोगाथेची माहिती देत विद्यापीठातील पदभरती करण्याची विनंती केली. तसेच विद्यार्थ्यांसाठी योगा पार्क, खेळाचे मैदान, वसतिगृहाच्या सुविधा अशा आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. यासोबतच एस.आर.एफ. (SRF) व जे.आर.एफ. (JRF) या संशोधन फेलोशिपच्या जागा वाढवाव्यात, अशीही त्यांनी विनंती केली. तसेच नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी झालेल्या चार विद्यार्थ्यांसह विद्यापीठाचे विद्यार्थी श्री. राहुल अशोक ठोंबरे यांनी अशा एकूण पाच विद्यार्थ्यांच्या वतीने माननीय महोदयांशी संवाद साधत विविध विद्यार्थी हिताच्या मागण्या मांडल्या.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या माननीय कुलगुरूंच्या मीटिंग हॉलमध्ये तसेच विद्यापीठाच्या लातूर, बदनापूर, आणि अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयामध्ये सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विविध विभागाचे प्रमुख तसेच आचार्य व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे जवळपास २४० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


Friday, October 17, 2025

वनामकृविच्या नव्याने विकसित रब्बी ज्वारी वाण ‘परभणी सुपरदगडी (SPV 2735)’चे वितरण — उत्पादनक्षमतेकडे विद्यापीठाचा अभिनव टप्पा

 ‘प्रयोगशाळेतून शेतापर्यंत’ ध्येयाची ठोस अंमलबजावणी .... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या ज्वारी संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेल्या नव्या रब्बी ज्वारी वाण ‘परभणी सुपरदगडी (SPV 2735)’ या वाणाचे २३० अद्यरेखा प्रात्यक्षिक संच (FLD) दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाडा विभागातील १२ कृषी विज्ञान केंद्रांना (KVKs) शेतकऱ्यांमध्ये वितरणासाठी देण्यात आले.

हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. लक्ष्मण जावळे, तसेच प्रगतशील शेतकरी व विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषदेचे सदस्य श्री. जनार्दन आवरगंड आणि श्री. भीमराव डोंणगापुरे यांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी माननीय कुलगुरूंनी आपल्या मनोगतात म्हटले की, परभणी सुपरदगडी या नवीन वाणामध्ये उच्च उत्पादनक्षमता, गुणवत्तापूर्ण धान्यनिर्मिती व रब्बी हंगामातील अनुकूलता या तीनही गुणांचा समन्वय साधला आहे. या वाणाचा प्रसार मराठवाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे करून त्यांचे उत्पन्न वाढविणे, हा विद्यापीठाचा प्रमुख उद्देश आहे. संशोधनातून तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचविण्याचे हे पाऊल म्हणजे विद्यापीठाच्या ‘प्रयोगशाळेतून शेतापर्यंत’ या ध्येयाची ठोस अंमलबजावणी आहे.

सदर प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील २३० शेतकऱ्यांपर्यंत या वाणाचे बीज संच कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहेत. यामुळे रब्बी हंगामात उत्पादनात वाढ, दुष्काळसहिष्णुता, तसेच शेतकऱ्यांचा विश्वासार्ह उत्पन्नाचा पाया अधिक भक्कम होईल. ज्वारी संशोधन केंद्र, परभणीचे हे पुढाकार शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने एक नाविन्यपूर्ण आणि मार्गदर्शक पाऊल ठरले आहे.