मौजे साटला येथे पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा
संयुक्त
राष्ट्र संघाने २०२३ वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे
करण्याचे घोषित केले असुन यावर्षी पासून महाराष्ट्र शासनाने संक्रांत-भोगी हा दिवस
पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. त्याअनुषंगाने वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने दिनांक
१५ जानेवारी रोजी मौजे साटला (ता.
जि. परभणी) येथे पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी
माहिती केंद्राचे विस्तार कृषि विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक डॉ. जी. डी. गडदे, किटकशास्त्रज्ञ
डॉ डि डि पडाईत, रिलायन्स फाउंडेशनचे श्री. रामजी राऊत आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
यावेळी डॉ
जी डी गडदे यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व यावर मार्गदर्शन करतांना म्हणाले
कि, ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा यांसारख्या पौष्टिक तृणधान्याचा रोजच्या आहारात
सर्वांनी समावेश केला पाहिजे. ही पौष्टिक तृणधान्ये ग्लुटेन मुक्त असून ती कॅल्शियम, लोह, झिंक, आयोडीन
इत्यादी सारख्या सुक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध असतात. ही तृणधान्ये डायरिया, बद्धकोष्ठता, आतड्यांच्या
आजारास प्रतिबंध करतात, तसेच त्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, हृदय
विकार, ॲनिमिया, उच्च रक्तदाब रोधक आहे. सदर पीकाकरीता आपल्या भागातील
हवामान अनुकूल असल्यामुळे शेतकरी या पिकांची लागवड आपल्या भागात मोठ्या प्रमाणात
करू शकतात. ज्वारीची परभणी शक्ती व बाजरी मध्ये एएचबी-१२००, एएचबी-१२६९
हे परभणी विद्यापीठ विकसित जैवसंपृक्त वाणांमध्ये लोह आणि जस्ताचे प्रमाण इतर वाण
पेक्षा जास्त आहे, याची लागवड करावी. राजगिऱ्यासारखे पीक सुद्धा आपल्या
भागात लागवड करून त्यापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करून अधिक उत्पन्न मिळु शकते.
किटकशास्त्रज्ञ डॉ. डी. डी. पटाईत यांनी विद्यापीठाच्या कृषी माहिती वाहिनी, विविध सेवांचा तसेच समाज माध्यमांचा वापर करून विद्यापीठ तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीमध्ये कसा वापर करता येईल याविषयी विस्तृत माहिती दिली. विद्यापीठ तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाला यांनी सहभाग नोंदविला. सदरील कार्यक्रमास गावातील ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाद्वारे प्रकाशित कृषी दिनदर्शिका २०२३ चे वाटप करण्यात आले.