Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Friday, March 13, 2015
Wednesday, March 11, 2015
शास्त्रज्ञांचे संशोधन कार्यच छंद झाला पाहिजे......... मृदाशास्त्रज्ञ मा. डॉ. पी. के. छोंकर
वनामकृवित “कृषि व मृदा संशोधनातील नाविण्यपुर्ण क्षेत्र’’ विषयावरील व्याख्यानमालाचे उद्घाटन
वैज्ञानिक संशोधनात अतिउच्च
ध्येय साध्य करण्यासाठी स्वप्रेरणा व कामाप्रती आवड पाहिजे, शास्त्रज्ञांचे
संशोधन कार्यच छंद झाला पाहिजे, त्यातुन आनंद प्राप्त करता आला पाहिजे. कुटुंब, समाज, काम व छंद यात
संतुलन साधता आले पाहिजे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील
भारतीय कृषि अनुसंधान संस्थेचे मृदाशास्त्रज्ञ मा डॉ. पी. के. छोंकर यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग व भारतीय मृद विज्ञान
संस्था शाखा परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने “कृषि व
मृदा संशोधनातील नाविण्यपुर्ण क्षेत्र’’ या विषयावर दि. १०
ते १२ मार्च दरम्यान देशातील प्रमुख मृदाशास्त्राज्ञांच्या व्याख्यानमालेचे
आयोजन करण्यात आले असुन व्याख्यानमालेचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु होते तर संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ
डि एल जाधव, सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एन. गोखले, सहयोगी अधिष्ठाता डॉ विलास
पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा डॉ. पी. के. छोंकर पुढे म्हणाले की, आजच्या युवकांना भारतीय
पोलीस सेवा व भारतीय प्रशासकीय सेवेचे आकर्षण आहे, कारण तेथे प्रतिष्ठा व पैसा आहे.
पंरतु कोणत्याही क्षेत्रात ध्येय निश्चिती व इच्छाशक्तीच्या जोरावर आपण प्रतिष्ठा
व पैसा प्राप्त करू शकतो. संशोधनात यशस्वी होण्यासाठी आपले शारीरिक आरोग्य सुदृध
व तणावरहित असणे, निरीक्षण व चिकित्सक बुध्दी तल्लख असणे आवश्यक आहे. चिकित्सक
बुध्दीच्या जोरावर जगात अनेक शोध लागले आहेत. संशोधकास आपले विचार व भावना स्पष्टपणे
मांडता आल्या पाहिजे. अलौकिक कल्पना ही वैयक्तीक बुध्दीचे उत्पादन असु शकते
परंतु ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सामुदायीकरित्या प्रयत्न करावे लागतात.
सामुदायीकरित्या काम करण्याची मानसिकता संशोधकांनी विकसीत केली पाहिजे, असे
प्रतिपादन त्यांनी केले.
कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु यांनी ‘हवामान बदल व त्याचा शेतीवरील परिणाम’ यावर मार्गदर्शन
करतांना म्हणाले की, भारत हा क्षेत्रफळाने मोठा देश असुन हवामानात विविधता आहे. देशातील
६० टक्के शेती ही पर्जन्यमानावर अवलंबुन असुन शेती पध्दतीत विविधता आहे. हवामान
बदलास नैसर्गिक व मनुष्य निर्मित दोन्ही बाबीं कारणेभुत असुन कार्बन डॉय ऑक्साईड, मिथेन, नॉट्रोजन ऑक्साईड
इत्यादी हरितगृह वायुचा हवामानावर मोठा परिणाम होत आहे. हवामानात अचानक होणा-या
बदलास तोंड देण्यासाठी मानवास कृती करण्यास अत्यंत कमी वेळ मिळतो, हीच मोठी अडचण शेतीमध्ये
आहे.
जागतिक तापमानात वाढ होत असुन गेल्या शंभर
वर्षात ०.७४ डिग्रीसेंटीग्रेड सरासरी तापमान वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षात
तापमान वाढीचा दर वाढला आहे, याचे मुख्य कारण वातावरणातील प्रदुषण आहे.
तापमान वाढीचा नकारत्मक परिणाम उष्ण कटिबंधातील शेतीवर जास्त होत आहे. भारतात
हवामान बदलावर दृष्टीक्षेप टाकला तर हे लक्षात येते की, पावसाचे दिवस कमी
झाले आहेत, गेल्या शंभर वर्षात उन्हाळयातील सरासरी तापमानात ०.६ डिग्री
सेंटीग्रेडने वाढ झाली असुन सन २१०० पर्यंत हे तापमान ३.५ ते ५ डिग्री
सेंटीग्रेडने वाढ होऊ शकते. तापमान वाढीमुळे भारतात पर्जन्यात तफावत येत असुन त्याचा
परिणाम खरिप पीकावर होत असुन रब्बी हंगामात तापमानात वाढ होत आहे. एक
डिग्रीसेंटीग्रेडने सरासरी तापमान वाढले तर देशातील गहु उत्पादनावर मोठा परिणाम
होणार आहे. तसेच सोयाबीन मध्ये तापमान वाढीमुळे शेंगा भरण्यावर परिणाम होत आहे. हवामान
बदलामुळे फलोत्पादनात किड व रोगाचा प्रार्दुभाव वाढला असुन किड व रोगाचा
पुर्वानुमान शेतक-यांना देणे आवश्यक आहे. तापमान वाढीचा परिणाम दुग्ध उत्पादनावर
ही होत असुन तापमान वाढीस प्रतिकारक जातीची निर्मितीवर भर दयावा लागेल.
तापमान वाढीचा परिणाम देशाच्या अन्नसुरक्षततेवर
ही होणार असुन ही बाब तात्काळ गांभीर्याने घेण्यासारखी आहे. अन्नसुरक्षतेसाठी मानवास
हवामान बदलावर दोन बाजुने लढावे लागेल, एकतर हवामान बदलाला कारणेभुत असणा-या बाबी कमी
कराव्या लागतील, यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे तर बदलत असलेल्या हवामानास
अनुकुल शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. धोरणात्मक निर्णयात हवामानावर
आधारित पीक विमा योजना राबवाव्या लागतील, राज्यस्तरीय हवामान बदल संशोधन केंद्र
सुरू करावे लागेल, मातीतील कार्बनचे प्रमाण वाढीवर भर दयावा लागेल, नैसर्गिक आपत्ती
व्यवस्थापन व हवामान बदल याचा अभ्यासक्रमात समावेश करावा लागेल. शेतक-यांची खरी
समस्या ओळखण्यासाठी शेतक-यांशी शास्त्रज्ञांना अधिकाधिक संवाद साधवा लागेल, तरच संशोधकाची बुध्दी
अधिक प्रगल्भ होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमात मान्यवर वक्त्यांचा परिचय संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर व विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी करून
दिला तर प्रास्ताविक संयोजक तथा विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील
यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ हरिहर कौसडीकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ
सय्यद ईस्माईल यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक,
अधिकारी, शास्त्रज्ञ, पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ महेश देशमुख, डॉ. अनिल धमक, डॉ गौतम हानवते, डॉ सुरेश
वाईकर, डॉ सुदाम शिराळे, त्रिवेणी सांगळे, श्री अडकिणे व विद्यार्थ्यांनी परिश्रम
घेतले.
Monday, March 9, 2015
वनामकृवित मृदविज्ञान विषयावर विविध मान्यवर शास्त्रज्ञांच्या व्याख्यानमालाचे आयोजन
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मृदविज्ञान
व कृषि रसायनशास्त्र विभाग व भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणी यांच्या संयुक्त
विद्यमाने “कृषि व मृदा संशोधनातील
नाविण्यपुर्ण क्षेत्र’’ या विषयावर दि. १० ते १२ मार्च दरम्यान
देशातील प्रमुख मृदाशास्त्राज्ञांच्या व्याख्यानमालेचे आयोजन कृषि महाविद्यालयाच्या
सभागृहात करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन दि. १० मार्च रोजी नवी दिल्ली
येथील भारतीय कृषि अनुसंधान संस्थेचे मृदाशास्त्रज्ञ डॉ. पी. के. छोंकर यांच्या
हस्ते होणार असुन अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु तर प्रमुख
पाहूणे म्हणुन शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण व सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एन. गोखले
यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.
व्याख्यानमालेत ‘उच्च ध्येय
साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाचा विकास’ आणि ‘कृषि व मृदविज्ञानातील एकविसाव्या शतकातील आव्हाणे व संशोधन संधी’ यावर मृदाशास्त्रज्ञ डॉ. पी. के. छोंकर तर ‘जमिनीच्या
आरोग्यासाठी जैविक कच-याचे व्यवस्थापन’ यावर भोपाळ येथील भारतीय
मृदविज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ एम. सी. मन्ना मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय
मृदविज्ञान संस्थेचे डॉ. तपण अधिकारी हे ‘पीक पोषणासाठी नॅनो
तंत्रज्ञान’ यावर तर औरंगाबाद येथील वाल्मीचे माजी उपसंचालक
डॉ. एस. बी. वराडे हे ‘सद्याच्या कृषि विकासात मातीचे
भविष्य’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ‘फलोत्पादनात पीक पोषणाचे महत्व’ या विषयावर नागपुर
येथील राष्ट्रीय मोसंबी संशोधन संस्थेचे डॉ. ए. के. श्रीवास्तव यांचे व्याख्यान
होणार आहे. व्याख्यानमालेचा समग्र आढावा शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण व विभाग
प्रमुख डॉ. विलास पाटील हे घेणार आहेत.
या व्याख्यानमालेचा लाभ कृषि
विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, शास्त्रज्ञ, पदव्युत्तर विद्यार्थी घ्यावा,
असे आवाहन व्याख्यानमालेचे संयोजक तथा
विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील व सहसंयोजक डॉ. अनिल धमक यांनी केले.

Saturday, March 7, 2015
Thursday, March 5, 2015
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ उत्साहात
दिक्षांत भाषण करतांना भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष मा. डॉ अनिल काकोडकर
|
दिक्षांत भाषण करतांना भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष मा. डॉ अनिल काकोडकर |
मा विजयअण्णा बोराडे यांना कृषिरत्न या मानद उपाधीने सन्मानित करतांना |
मा कुलगुरू डॉ बी व्यंकटेश्वरलु प्रास्ताविक करतांना |
कृषि संशोधनातील अतुलनीय योगदानाबाबत डॉ विलास पाटील व डॉ सय्यद ईस्माईल यांना राधाकिशन शांती मल्होत्रा पारितोषिकाना सन्मानित करतांना
|
डॉ एस पी मेहत्रे यांना उत्कृष्ट शिक्षक पारितोषिकांनी मान्यवरांच्या हस्ते सन्माननीत करतांना |
डॉ सुमंत जाधव यांना उत्कृष्ट शिक्षक पारितोषिकांनी मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करतांना |
कृषी विद्यापीठे सर्वांगीण ग्रामीण विकासाची केंद्रे बनू शकतात...भारतीय अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष मा. डॉ. अनिल काकोडकर
परभणी : वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठाचा विसावा दीक्षान्त समारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल
तथा विद्यापीठाचे कुलपती महामहिम श्री. चे. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली
दि. ५ मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला. महसुल व कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे
प्रति कुलपती मा. ना. श्री. एकनाथराव खडसे व परिवहनमंत्री तथा परभणीचे पालकमंत्री
मा. ना. श्री. दिवाकरराव रावते हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती होते तर भारतीय अणुउर्जा
आयोगाचे माजी अध्यक्ष मा. डॉ. अनिल काकोडकर यांनी दीक्षान्त भाषण केले. याप्रसंगी
व्यासपीठावर कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु, अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ रवीप्रकाश दाणी, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे
सदस्य मा श्री केदार साळुंके, मा श्री रविंद्र देशमुख, मा श्री अनंतराव
चोंडे, मा सौ सुस्मिता पवार, मा श्री गोविंदराव देशमुख, मा श्री राहुल
सोनवणे, शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर
जाधव यांची उपस्थिती होती.
जलसंधारण व कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल
मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त मा. श्री. विजयअण्णा बोराडे यांना ‘कृषिरत्न’ या मानद उपाधीने माननीय राज्यपाल यांच्या हस्ते
सन्मानित करण्यात आले तर विद्यापीठांतर्गत विविध विद्याशाखेतील एकूण ३८१७ स्नातकांना
विविध पदवी (३२१३), पदव्युत्तर (५७६) व आचार्य (२८) पदवीने माननीय
कुलपती महोदयांव्दारे अनुग्रहीत करण्यात आले. याप्रसंगी माननीय कुलपती महोदयांनी
स्नातकांना सत्याच्या मार्गावर राहुन देशासाठी व समाजासाठी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे
पार पाडण्याची शपथ दिली.
दीक्षान्त भाषणात स्नातकांना मार्गदर्शन
करतांना भारतीय अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष मा. डॉ. अनिल काकोडकर म्हणाले की, सुशिक्षित व्यक्ती म्हणून
राष्ट्र निर्मितीच्या कामात क्षमतेनुसार आपणास महत्वपूर्ण भूमिका निभावयाची असुन
नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाला व उद्योजकतेला आजच्या युगात भरपूर वाव आहे. देशाची
प्रगती पाहता, सक्षम व्यक्तींना अधिकाधिक संधी मिळत जाणार आहेत. संपुर्ण आयुष्यात सतत
अध्यापनाची प्रवृत्ती बाळगून आपली ज्ञान केंद्रे, उद्योग व समाज
एकमेकांशी निगडीत ठेवून आपण देशासाठी भरीव योगदान देवू शकतो.
कृषी विद्यापीठांमुळे देशात हरितक्रांती
होऊन अन्नधान्यात देश स्वयंपुर्ण झाला, परंतु सतत वाढत चाललेल्या गरजा लक्षात घेता
अजूनही फार मोठा पल्ला गाठायचा आहे. देशात लोकसंख्येचा
मोठा हिस्सा ग्रामीण भागात वसतो असुन शेती हेच उपजीविकेचे प्रमुख साधन आहे.
ग्रामीण भागातील सरासरी उत्पन्न शहरी भागापेक्षा कितीतरी कमी असुन ही विषमता कमी
करणे, शहरीकरणावरील ताण कमी करणे, शेती व शेती पुरक उद्योगाने व इतर मुल्यवर्धनातून
आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणणे, हि आपल्या पुढील प्रमुख आव्हाने होत. यासाठी नवीन
तंत्रज्ञानाचा विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. कृषी विद्यापीठांनी आपल्या कार्याची
व्याप्ती वाढविल्यास सर्वांगीण ग्रामीण विकासाची केंद्रे बनू शकतात. जनुकीयदृष्टया
सुधारित (बीटी) कपाशीमुळे कापसाचे
एकूण उत्पादन वाढले हे एक निर्विवाद सत्य असुन या तंत्रज्ञानामुळे भारतासारख्या
प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाच्या भविष्यकालीन अन्नसूरक्षीततेस चांगला हातभार
लागू शकतो. यासाठी सुरक्षित व योग्य संशोधन व्यापक प्रमाणात होणे अत्यंत आवश्यक
आहे.
प्रास्ताविकात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
यांनी विद्यापीठाच्या कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण क्षेत्रातील कार्याचा माहिती
देतांना सांगितले की, विद्यापीठाने पाण्याचा ताण सहन करणा-या विविध पीकांची विकसित
केले असुन शेतकरी मोठया प्रमाणावर त्याचा अवलंब करित आहेत. मराठवाडयातील सद्य
दुष्काळस्थितीस धैर्याने तोंड देण्यासाठी आठही जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या
उमेद उपक्रमास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठवाडा विभागासाठीचा कृषी
शिक्षणाचा २०३० पर्यंतचा आराखडा विद्यापीठाने तयार केला असुन यामुळे या भागातील कृषी
शिक्षणाच्या प्रगतीस सहाय्यभुत ठरेल.
कृषि संशोधनातील अतुलनीय योगदानाबाबत डॉ विलास
पाटील व डॉ सय्यद ईस्माईल यांना राधाकिशन शांती मल्होत्रा पारितोषिकाने तर डॉ एस
पी मेहत्रे, डॉ सय्यद ईस्माईल व डॉ सुमंत जाधव यांना उत्कृष्ट शिक्षक
पारितोषिकांनी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी शितल केंद्रे, प्रियंका शेळके, प्रियंका पाटील, मक्का अनुशा यांना
पदव्युत्तर पदवीत विशेष प्राविण्यासह ऊर्त्तीण झाल्याबद्दल सुवर्ण पदकाने
गौरविण्यात आले. तसेच निरजकुमार तिवारी, कादरी सयदा अमरिन, राधेशाम होंडे, प्रीती रूपनार, मनिषा झा, पल्लवी हींगे, पांडुरंग बेळगे, अवस्थी के, रेश्मी भगत, निलेश कानवडे, स्नेहल कार्ले, सावन जैस्वाल, कृष्णा भोकरे, महेश चौधरी यांना
पदवीत विशेष प्राविण्यासह उर्त्तीण झाल्याबद्दल सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले.
प्रसांथ एैला, आरती भोसले, सुनिल पाटील, अनुराग श्रीवास्तव, अजीतप्रकाश शर्मा
यांना रोख पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमास खासदार मा श्री संजय जाधव, आमदार मा श्री राहुल पाटील,
जिल्हाधिकारी मा श्री एस पी सिंग, महापौर मा सौ संगिताताई वडकर, माजी कुलगुरू मा
डॉ के पी गोरे, मा डॉ व्ही के पाटील, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण
संचालक डॉ बी बी भोसले, विद्यापीठ नियंत्रक श्री अप्पासाहेब चाटे यांच्यासह
प्रतिष्ठीत नागरिक, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित
होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आशा आर्या व डॉ दयानंद मोरे यांनी केले.
Subscribe to:
Posts (Atom)