Thursday, September 11, 2025

वनामकृविच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ उपक्रमात ५५० हून अधिक शेतकऱ्यांना थेट शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रेरणा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नियमितपणे पार पडतो. त्याच अनुषंगाने दि. १० सप्टेंबर रोजी हा उपक्रम विविध गावांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्यात आला.

या उपक्रमात विद्यापीठातील ११ चमूमधील ४४ शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके आणि शेतकरी मेळाव्यांद्वारे थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. ५५० हून अधिक शेतकऱ्यांना पिकांच्या सद्य व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करताना शास्त्रज्ञांनी कीडनियंत्रण, सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे संरक्षण, मृदा आरोग्य संवर्धन, सुधारित वाणांचा वापर आणि पीक उत्पादन वाढीसाठी लागवड तंत्रज्ञान या विषयांवर सविस्तर माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्पक व त्वरित उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन मार्गदर्शन करत असल्याने शेतीत नवी उमेद निर्माण झाली आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

या उपक्रमात परभणी येथील विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र (छत्रपती संभाजीनगर), नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र, केळी संशोधन केंद्र, विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छ. संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर, परभणी), कृषि विज्ञान केंद्रे (छ. संभाजीनगर, खामगाव, तुळजापूर, बदनापूर) तसेच लातूरचे गळीत धान्य संशोधन केंद्र आदी संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सूर्यकांत पवार, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. वसंत सुर्यवंशी, डॉ. अरविंद पंडागळे, डॉ. दिलीप हिंगोले, डॉ. डी.डी. पटाईत, डॉ. पवन ढोके, डॉ. संजय देवकुळे, डॉ. डी.पी. देशपांडे, प्रा. अशोक घोटमुकळे, डॉ. संतोष वाघमारे, प्रा. कल्याण दहिफळे, डॉ. हनुमान गरुड, डॉ. एस.डी. सोमवंशी, डॉ. एस. आर. धांडगे, डॉ. अनिता जिंतूरकर, डॉ. संजूला भवर, डॉ. तुकेश सुरपाम, प्रा. किशोर जगताप, डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, डॉ. बी.के. आरबाड, डॉ. एस.एन. झगडे, श्री. मधुकर मांडगे तसेच कृषि विभागातील श्री. साळवे साहेब व डॉ. वसंत देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे शेतीतील संशोधन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविण्याचे काम गतीमान झाले असून, आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम एक प्रभावी दुवा ठरत आहे, असे समाधान शेतकऱ्यांनी व्यक्त केले.