Sunday, September 17, 2017

शेतक-यांनी सामुहिकरित्‍या गटशेतीच्‍या माध्‍यमातुन शेती करावी.......सहकार राज्‍यमंत्री तथा परभणी जिल्‍हयाचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील

वनामकृविच्‍या रब्‍बी पीक शेतकरी मेळाव्‍यास मोठा प्रतिसाद
मेळाव्‍याचे उद्घाटन दिपप्रज्‍वलनाने करतांना

विद्यापीठ बियाणे विक्रीचे उद्घाटन करतांना
विद्यापीठ प्रकाशित शेतीभाती मासिकांच्‍या रबी पीक विशेषांकाचे विमोचन करतांना

देशाची व राज्‍याची प्रगती ही शेती व शेतकरी यांच्‍यावर अवलंबुन आहे. मराठवाडयातील शेती मुख्‍यत: कोरडवाहु असुन शासनाच्‍या अनेक योजना शेवटच्‍या शेतक-यापर्यंत पोहचविण्‍याचा शासनाचा प्रयत्‍न आहे. शेतक-यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्‍यासाठी शेतीपुरक जोडधंदा करणे आवश्‍यक असुन मराठवाडयात शेतमाला प्रक्रिया उद्योग विकसित झाले पाहिजेत. शेतक-यांनी एकत्रित येऊन सा‍मुहिकरित्‍या गटशेतीच्‍या माध्‍यमातुन शेती करावी, असे प्रतिपादन सहकार राज्‍यमंत्री तथा परभणी जिल्‍हयाचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, परभणी (महाराष्‍ट्र शासन) यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक 17 सप्‍टेबर रोजी रबी पीक शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, मेळाव्‍याच्‍या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते, तर परभणी लोकसभा सदस्‍य मा. खा. श्री. संजय जाधव, परभणी विधानसभा सदस्‍य मा. आ. डॉ. राहुल पाटील, विद्यापीठ कार्यकारणी सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे, प्रगतशील शेतकरी श्री कांतराव देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील पुढे म्‍हणाले की, यावर्षी पडलेल्‍या पाऊसाचा जलयुक्‍त शिवार योजनेच्‍या कामामुळे रब्‍बी हंगामात निश्चितच उपयोग शेतक-यांना होणार आहे. पडलेल्‍या पाऊसाच्‍या पाण्‍याचा शेतीत चांगल्‍या प्रकारे उपयोग करण्‍यासाठी प्रत्‍येक शेतक-यांनी कुपनलिका व विहिर पुनर्भरण केलेच पाहिजे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ रा‍बवित असलेला शेतक-यांना दिलासा देणारा उमेद कार्यक्रम निश्चितच कौतुकास्‍पुद असुन विद्यापीठ विकसित विविध पिकांचे वाण निश्चितच ठरत उपयुक्‍त आहेत.  शेतक-यांच्‍या विकासासाठी शासन व विद्यापीठ सदैव पाठिशी आहेत, असे प्रतिपादन त्‍यांनी दिला.
अध्‍यक्षीय समारोपीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, विद्यापीठाकडे रब्‍बी पीकांचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्‍ध असुन शेतकरी गटांना बीजोत्‍पादनासाठी विद्यापीठ प्रो़त्‍साहित करित आहे. विद्यापीठाचे कापसाचे वाण नांदेड 44 यांचे बीटीमध्‍ये परावर्तन करण्‍यात येत असुन येणा-या खरिप हंगामात नांदेड 44 या वाणाचे बीटी बियाणे मर्यादित प्रमाणात शेतक-यांसाठी उपलब्‍ध होईल. उस्‍मानाबादी शेळीचे शुध्‍द वंश निर्मितीचे संशोधन कार्य विद्यापीठात प्रगतीपथावर असल्‍याचे प्रतिपादन त्‍यांनी केले.    
परभणी लोकसभा सदस्‍य मा. खा. श्री. संजय जाधव यांनी आपल्‍या भाषणात परभणी जिल्‍हयात शेतमाला प्रक्रिया उद्योगास चालना देण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले तर परभणी विधानसभा सदस्‍य मा. आ. डॉ. राहुल पाटील यांनी जलयुक्‍त शिवार कामामुळे पाऊसाच्‍या पाण्‍याचा रबी हंगामासाठी उपयोग होईल असे प्रतिपादन आपल्‍या भाषणात केले.
प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक डॉ विना भालेराव यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. विद्यापीठ विकसित रब्‍बी पीकांच्‍या वाणांचे बियाणे विक्रीचे उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तसेच विद्यापीठ कृषि तंत्रज्ञानावर आधारीत कृषि प्रदर्शनीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. विद्यापीठाचे शेतीभाती मासिकाचा रब्‍बी पीक विशेषांकाचे व शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्तिका, घडीपत्रिकांचे विमोचन करण्‍यात आले.
मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ यु एन आळसे, प्रा. बी व्‍ही भेदे, डॉ गोसावी, प्रा. एस एस सोळंके, डॉ एम बी पाटील, डॉ एस व्‍ही पवार, डॉ ए पी सुर्यवंशी, प्रा. डि डि टेकाळे, डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ एस जे शिंदे, प्रा. दिलीप मोरे, डॉ बी एम ठोंबरे, डॉ ए जी पंडागळे, डॉ एस बी पवार, प्रा ए व्‍ही गुट्टे, डॉ व्‍ही पी सुर्यवंशी, डॉ सी बी लटपटे, डॉ आनंद बडगुजर आदींनी रब्‍बी पीक लागवड तंत्रज्ञान, पीकांवरील कीड रोग व्‍यवस्‍थापन व इतर विविध विषयावर मार्गदर्शन करून शेतक-यांच्‍या शेती विषयक शंकाचे समाधान केले. मेळाव्‍यास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.



Saturday, September 16, 2017

वनामकृविला सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी राज्‍य शासनाकडुन पाच कोटी रूपयाचा निधी मंजुर

राज्यातील चारही कृषि विद्यापीठांमध्ये नुकतेच सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी राज्यशासनाने मान्यता दिली असुन यासाठी प्रत्येक विद्यापीठाला पाच कोटी प्रमाणे एकूण 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नुकतेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास याबाबत अध्‍यादेश प्राप्‍त झाला आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन व कार्यक्षम वापरातून गुणवत्तापूर्ण दर्जेदार विषमुक्त अन्नधान्य व भाजीपाला निर्मितीसाठी सेंद्रीय शेतीमध्ये सुधारीत तंत्रज्ञान विकसीत करणे आणि त्याचा विस्तार करणे यासाठी संशोधन व विस्तार कार्य करण्यासाठी चारही कृषि विद्यापीठांतर्गत स्वतंत्र सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र कार्यरत होणार आहेत. या केंद्रासाठी प्रयोगशाळा व प्रयोगशाळा उपकरणे, अवजारे, सिंचन सुविधा, पशुधन आदींसाठी एकूण 230.76 लक्ष रु. तर कंत्राटी मनुष्यबळासाठी 189.24 लक्ष रु. तर प्रशिक्षण व इतर कामासाठी 80.00 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आज हवामान बदल व शेतीमधील वाढता खर्च या पार्श्‍वभुमीवर सेंद्रीय शेतीत शाश्वत उत्पादन व गुणवत्तापुर्ण उत्पादने यासाठी मागणी वाढत आहे. आज अनेक शेतकरी व शेतकरीगट सेंद्रीय शेतीकरत असून आज अनेक प्रकारे पारंपारिक ज्ञानाचा वापर सेंद्रीय शेतीमध्ये करण्यात येत आहे. विविध भागात विविध पद्धतीने सेंद्रीय शेती करण्यात येते. यात वापरण्यात येणा­या निविष्ठा व त्यांचे प्रमाण यातही विविधता दिसून येते. या पार्श्‍वभुमीवर शास्त्रीय पद्धतीने पीक लागवडीपासून काढणीपर्यंत व बाजारपेठ तंत्र यासह सेंद्रीय शेतीमध्ये संशोधन होणे, ही काळाची गरज ओळखून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्वरलू व संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांचे मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक यांचे जयंती दिनी 1 जुलै 2015 रोजी सेंद्रीय शेती संशोधन प्रकल्प सुरुवात करण्यात आला. प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक म्हणून डॉ. आनंद गोरे हे काम पाहत आहेत. सन 2015-16 मध्ये या प्रकल्पांतर्गत सोयाबीन, तूर व कपाशी या पिकांत संशोधन प्रात्यक्षिक प्रयोग घेण्यात आले,  ते सन 2016-172017-18 मध्येही पुढे सुरु आहेत. सन 2017-18 मध्ये सोयाबीन पिकांत हे प्रयोग घेण्यात आले आहेत. याशिवाय इतर सेंद्रीय पद्धतींचा तुलनात्मक अभ्यासही करण्यात येत आहे. सन 2015-16 पासून एकात्मिक पीक व्यवस्थापन पद्धती, सेंद्रीय पध्‍दती व शेतकरी (प्रचलीत) पध्‍दती यांचा तुलनात्मक अभ्यास सोयाबीन पिकामध्ये करण्यात येत आहे. सन 2015 मध्ये सरासरीच्या जेमतेम 50 टक्के पाऊस होऊनही एकात्मिक पीक व्यवस्थापन पध्‍दती व सेंद्रीय पध्‍दतीमध्ये अनुक्रमे हेक्‍टरी 18.75 क्विंटल. व 16.00 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले. यात अशा प्रकारे एकात्मिक पीक व्यवस्थापन पद्धतीत सेंद्रीय पध्‍दतीपेक्षा 14.60 टक्के तर प्रचलीत पध्‍दतीपेक्षा 38 टक्के अधिक उत्पादन मिळाले. सन 2016 मध्येही एकात्मिक पीक व्यवस्थापन पध्‍दतीत सेंद्रीय पध्‍दत व प्रचलीत पध्‍दतीपेक्षा अधिक उत्पादन मिळाले. सेंद्रीय पध्‍दतीत सेंद्रीय निविष्ठांमुळे सेंद्रीय कर्बाचे प्रमाण सर्वसाधारणपणे तीन वर्षात 0.3 टक्के पासून 0.45 टक्के पर्यंत वाढलेले आढळून आले. याच प्रमाणे सदरील सेंद्रीय शेती संशोधनाचे कार्य मराठवाडा विभागातील महत्वाची पिके कपाशी, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, तसेच भाजीपाला पिके वांगी, टोमॅटो, मिरची, भेंडी व फळपिके मोसंबी, पेरु, आंबा यामध्ये भविष्यात टप्याटप्याने हाती घेऊन यात लागवडी पासून काढणी पर्यंत संपूर्ण सेंद्रीय लागवडीचे पॅकेज शेतक­यांना देण्यात येईल असे नियोजन आहे. याचप्रमाणे सेंद्रीय शेतीत प्रशिक्षण व विस्तार कार्यातही विद्यापीठ कार्यरत असून भविष्यात यामध्ये अधिक विस्तार करण्यात येणार आहे. 
सन 2015-16 चे कार्य व भविष्यातील गरज लक्षात घेऊन सर्वप्रथम आत्मा - कृषिविभाग, परभणी यांना 35.00 लक्ष रुपयांसाठीचा तीन वर्षे कालावधीचा प्रस्ताव विद्यापीठातर्फे 2016 मध्ये सादर करण्यात आला होता. त्यानंतर राज्य शासनातर्फे मागील अर्थ संकल्पामध्ये (2015-16) चारही कृषिविद्यापीठांत सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापनेबाबत घोषणा करण्यात आली. त्यानुसार राज्य शासनाने राज्यातील चारही कृषि विद्यापीठांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. सर्वप्रथम कृषि विद्यापीठांनी स्वतंत्र व कायम अशा सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रासाठी 26.50 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनास सादर केला. पंरतू यात कायम मनुष्यबळ देण्याऐवजी कंत्राटी मनुष्यबळ देण्याचे ठरले. याकामी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्फे कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्वरलू आणि संचालक संशोधन डॉ. द-तप्रसाद वासकर यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. आनंद गोरे व डॉ. गणेश गायकवाड यांनी रु. 5.00 कोटीचा नविन प्रस्ताव शासनास सादर केला. वनामकृवि, परभणी येथे यापुर्वीच सुरु झालेले संशोधन कार्य व उपलब्ध जमीन व येथील परिस्थिती लक्षात घेऊन इतर सुविधा, कंत्राटी मनुष्यबळ, प्रयोगशाळा या बाबतची मागणी सादर करण्यात आली होती, त्याचा समावेश शासनाच्या मंजुर अध्यादेशात दिसून येत आहे. विशेष करुन मनुष्यबळासाठीची गरज संचालक संशोधन डॉ. द-तप्रसाद वासकर यांनी राज्य शासनाकडे आग्रहपूर्वक सादर केली होती. शासनस्तरावर चारही विद्यापीठाच्या संशोधन संचालक यांच्या अनेक बैठकी आयोजित करुन या आराखडयास अंतीम रुप देण्यात आले. शासनाने मंजुर केलेल्या या केंद्रामुळे सेंद्रीय शेती संशोधनास चालना मिळेल व शेतक­यांना अदययावत प्रशिक्षण मिळण्यास सुरुवात होईल.

Wednesday, September 13, 2017

वनामकृविच्या. विदयापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी कार्यक्रमास मोठा प्रतिसाद

पंधरवाडयात परभणी व हिंगोली जिल्‍हयातील 52 गावांत विद्यापीठ शास्‍त्रज्ञाचे मार्गदर्शन व प्रक्षेत्र भेटी


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्राच्‍या वतीने राष्‍ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्‍हयातील विविध गांवामध्‍ये खरिप पिक संरक्षण आणि रब्‍बी पिक नियोजनासाठी विदयापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी हा विशेष विस्‍तार कार्यक्रम कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यकटेश्‍वरलू यांच्‍या निर्देशानुसार आणि संचालक विस्‍तार शिक्षण डॉ. पी. जी. इंगोले यांच्‍या मार्गदर्शनाखाली दिनांक २३ ऑगस्‍ट ते ०७ सप्‍टेंबर दरम्‍यान राबविण्‍यात आला, यास शेतक-यांनी मोठा प्रतिसाद दिला. या विस्‍तार कार्यक्रमासाठी विदयापीठातील विविध विषयाच्‍या शास्‍त्रज्ञांचे चार चमू करण्‍यात आले होते, प्रत्‍येक चमू मध्‍ये विविध विषयातील पाच ते सहा विद्यापीठ शास्‍त्रज्ञ सहभागी झाले होते. शास्‍त्रज्ञांच्‍या चमुने दोन्‍ही जिल्‍हयातील एकूण ५२ गावांना भेटी दिल्‍या, या भेटीमध्‍ये शेतक-यांनी विचारलेल्‍या विविध प्रश्‍नांची आणि अडचणीची सोडवणूक चर्चासत्राद्वारे व छोटया मेळाव्‍याद्वारे केली तसेच काही गावांमध्‍ये प्रत्‍येक्ष शेतक-यांच्‍या शेतावर जाऊन पाहणी केली. पाहणी दरम्‍यान शेतक-यांच्‍या शेतावर कापुस या पिकांवर फुलकिडे, लाल्‍या, पांढरीमाशी तर सोयाबीन या पिकावर शेंग करपा, पाने खाणारी अळी, उंदीर, खोडमाशी व चक्रीभुंगा तसेच पाणथळ जमिनीत सोयाबीन मर याच बरोबर तुर या पिकामध्‍ये मर, पाने गुंडाळणारी अळी, हळदीवर कंदमाशी, कंदसड, पानावरील करपा आदीं प्रमुख समस्‍या आढळून आल्‍या, या समस्‍यांचे विदयापीठातील शास्‍त्रज्ञाच्‍या चमूने शेतक-यांचे समाधानकारक निरसण केले, त्‍याचबरोबर रब्‍बी हंगामाच्‍या नियोजनाबद्दल मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाचे नियोजन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांच्‍या मार्गदर्शनाखाली विस्‍तार कृषि विदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, किटकशास्‍त्रज्ञ प्रा. डि. डी. पटाईत, डॉ. एस.जी. पुरी, श्री. के. डी. कौसडीकर यांनी केले. शास्‍त्रज्ञांच्‍या चमूमध्‍ये विदयापीठ शास्‍त्रज्ञ, डॉ. यु. एन. आळसे, डॉ. सि. बी. लटपटे, प्रा. अे. टी. दौंडे, प्रा. डि. डी. पटाईत, डॉ. एस. जी. पुरी, डॉ. सी. व्‍ही. अंबाडकर, डॉ. व्हि. एम. घोळवे, डॉ. एस. पी. चव्‍हाण, प्रा. बी. एस. कलालबंडी, प्रा. पी. के. वाघमारे, प्रा. बि. व्‍ही. भेदे, डॉ. ए. जी. बडगुजर, प्रा. एन. इ. जायेवार, डॉ. जी. पी. जगताप, प्रा. जी. डी. गडदे, डॉ. डी. जी. मोरे आदींनी सहभाग नोंदवून शेतक-यांना मार्गदर्शन केले तसेच शेतक-यांच्‍या समस्‍या सोडविल्‍या. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषि  विभागातील अधिकारी-कर्मचारी व संबधीत गावातील शेतक-यांनी विशेष सहकार्य केले. सदरिल कार्यक्रमाचा शेतक-यांना फायदा होत असल्‍याचे मत प्रत्‍येक गावातील शेतकरी व्‍यक्‍त करीत होते.




वनामकृवित रब्‍बी पीक शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

सहकार राज्‍यमंत्री तथा परभणी जिल्‍हयाचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्‍या हस्‍ते मेळाव्‍याचे उद्घाटन 
वि़द्यापीठ संशोधित रब्‍बी पिकांच्‍या विविध वाणाचे साधारणत: 450 क्विंटल सत्‍यतादर्शक बियाणे विक्रीस होणार उपलब्‍ध


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, परभणी (महाराष्‍ट्र शासन) यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक 17 सष्‍टेंबर रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता रबी पीक शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले आहे. मेळाव्‍याचे उद्घाटन सहकार राज्‍यमंत्री तथा परभणी जिल्‍हाचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्‍या हस्‍ते होणार असुन विशेष अतिथी म्‍हणुन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक मा. डॉ. नरेन्द्र सिंह राठौड हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु राहणार असुन परभणी जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मा. श्रीमती उज्‍वलाताई राठोड, परभणी लोकसभा सदस्‍य मा. खा. श्री. संजय ऊर्फ बंडु जाधव, विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. सतीश चव्‍हाण, विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. विक्रम काळे, विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. अब्‍दुल्‍ला खान दुर्राणी (बाबाजानी), विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. रामराव वडकुते, परभणी विधानसभा सदस्‍य मा. आ. डॉ. राहुल पाटील, जिंतूर विधानसभा सदस्‍य मा. आ. श्री. विजय भांबळे, गंगाखेड विधानसभा सदस्‍य मा. आ. डॉ. मधुसुदन केंद्रे, पाथरी विधानसभा सदस्‍य मा. आ. श्री. मोहन फड, परभणी महापौर मा. श्रीमती मिनाताई वरपुडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ विविध रब्‍बी पीक लागवड तंत्रज्ञान, पीकांवरील कीड-रोग व्‍यवस्‍थापन आदी विषयावर मार्गदर्शन करणार असुन विद्यापीठ कृषि तंत्रज्ञानावर आधारी कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे. 
याप्रसंगी वि़द्यापीठ संशोधित रब्‍बी पिकांच्‍या विविध वाणाचे साधारणत: 450 क्विंटल सत्‍यतादर्शक बियाणे विक्रीस उपलब्‍ध करण्‍यात येणार असुन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते बियाणे विक्रीचे उद्घाटन होणार आहे. यात रबी ज्‍वारीचे परभणी मोती वाण 105 क्विंटल (2600 बॅग), हरभ-याचे आकाश वाण 250 क्विंटल (2500 बॅग), करडईचा परभणी-12 वाण 50 क्विंटल (1000 बॅग), जवस वाण एलएसएल-93 दोन क्विंटल (200 बॅग) व गहु त्र्यंबक वाण 43 क्विंटल (107 बॅग) विक्रीसाठी उपलब्‍ध आहेत. बियाणे खरेदी करतांना शेतक-यांना स्‍वत:च्‍या एटीएम कार्डव्‍दारे स्‍वाईप मशीनच्‍या माध्‍यमातुन कॅशलेस सुविधा उपलब्‍ध करण्‍यात येणार आहे.  
तरी सदरिल मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले, मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ पी आर देशमुख व जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे यांनी केले आहे.

विद्यापीठ संशोधित सत्‍सतादर्शक बियाण्‍याच्‍या विक्रीचे दर व पॅकींग पुढील प्रमाणे 
पिक
वाण
पॅकिंग
किंमत प्रती बॅग (रू)
करडई   
परभणी-12
05 किलो
425 /-
हरभरा
आकाश   
10 किलो
800 /-
रब्‍बी ज्‍वार
परभणी मोती
04 किलो
260 /-
गहु
त्र्यंबक
40 किलो
2000 /-
जवस
एलएसएल-93
01 किलो
60 /-


Sunday, September 10, 2017

अध्‍यापनात विद्यार्थी – प्राध्‍यापक यांच्यात दुहेरी संवाद झाला पाहिजे....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित पाच दिवसीय प्रशिक्षण कार्याक्रमाचा समारोप
अध्‍यायन हि एकेरी संवादाची प्रक्रिया न राहता, विद्यार्थ्‍यी व प्राध्‍यापक यांच्‍यात दुहेरी संवाद झाला पाहिजे, तरच चांगले विद्यार्थ्‍यी घडतील. शिकणे ही अविरत प्रक्रिया असुन प्राध्‍यापकांनी अध्‍यायनासाठी नवनवीन पध्‍दतीचा अवलंब केला पाहिजे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरुल यांनी केले. हैद्राबाद येथील नॅशनल अॅकाडमी ऑफ अॅग्रीकल्‍चर रिसर्च मॅनेजमेंट (नार्म) व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने नवनियुक्‍त प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञासाठी अध्‍यापन कार्यक्षमता व परिणामकारता वृध्‍दीसाठी पाच दिवसीय प्रशिक्षणाच्‍या समारोपीय कार्यक्रमात (दिनांक 8 सप्‍टेबर रोजी) ते बोलत होते. यावेळी नार्मचे उपसंचालिका डॉ. कल्‍पना सास्‍त्री, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ डि थामी राजु, डॉ सोम, डॉ सोनटक्की, प्रशिक्षण समन्‍वयक डॉ आर डि आहिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, राज्‍यातील कृषी विद्यापीठात यावर्षी पासुन नवीन अभ्‍यासक्रमास सुरूवात होत असुन यात विद्यार्थ्‍यीच्‍या उद्योजकता कौशल्‍या विकासावर भर देण्‍यात आला आहे. यासाठी प्राध्‍यापकांना अधिकाधिक प्रात्‍याक्षिक व अनुभव आधारित शिक्षण पध्‍दतीवर भर द्यावा लागेल.
सदरिल प्रशिक्षणाचा प्रशिक्षणार्थी प्राध्‍यापकांना अध्‍यापन कौशल्‍य वाढण्‍यास निश्चितच मदत होईल, असे मत नार्मच्‍या उपसंचालिका डॉ. कल्‍पना सास्‍त्री यांनी व्‍यक्‍त केले. कार्याक्रमात डॉ फरिया खान व डॉ कैलास डाखोरे यांनी ही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. सदरिल प्रशिक्षणात विद्यापीठातंर्गत असलेल्‍या विविध महाविद्यालयातील नवनियुक्‍त 35 सहाय्यक प्राध्‍यापकांचा प्रशिक्षणार्थी म्‍हणुन समावेश होता
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ डि थामी राजु यांनी प्रशिक्षणाचा अहवाल सादर केला. सुत्रसंचालन डॉ एस एस मोरे यांनी केले तर आभार डॉ पी एस कापसे यांनी मानले. कार्यक्रमास सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटणम, डॉ बी एम ठोंबरे, डॉ व्‍ही एन नारखेडे, डॉ डि एस पेरके आदीसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व‍ विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी श्री सी एस नखाते, श्री. लोंढे, श्री खताळ, श्री प्रविण चव्‍हाण आदीसह विस्‍तार शिक्षण विभागातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. 

Friday, September 8, 2017

विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या ध्‍येयासोबत आवडही जोपासावी.....जिल्‍हा पोलिस अधिक्षक मा. डॉ दिलीप झळके

वनामकृवितील परभणी कृषी महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांच्‍या उद्बोधन कार्यक्रमात प्रतिपादन
प्रगत देशात विद्यार्थ्‍यी करिअर मध्‍ये जे आवडते ते करतात तर भारतात जे आवडते ते करण्‍याची संधी फार कमी विद्यार्थ्‍यांना प्राप्‍त होत. आवडीच्‍या क्षेत्रात आपण आपल्‍या पुर्ण कार्यक्षमतेचा उपयोग करतो. विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या ध्‍येयासोबत आवड जोपासावी, असा सल्‍ला परभणी जिल्‍हा पोलिस अधिक्षक मा. डॉ दिलीप झळके यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयात कृषी पदवीच्‍या प्रथम वर्षात नवप्र‍वेशित विद्यार्थ्‍याच्‍या उद्बोधन कार्यक्रमाच्‍या प्रसंगी (दिनांक 7 सप्‍टेबर रोजी) ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ सय्यद ईस्‍माइल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ दिलीप झळके पुढे म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यांनी रॅगिंग पासुन दुर रहावे, रॅगिंग म्‍हणजे मानसिक विकृती असुन अनेकांची आयुष्‍य उद्ध्‍वस्‍त झाले आहे.
अध्‍यक्षीय समारोपीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, अनेक क्षेत्रात कृषि पदवीधरांना संधी असुन महाविद्यालयीन जीवनात शिस्‍तीचे पालन करावे, रॅगींग पासुन लांब राहण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी यावेळी दिला. विद्यार्थ्‍यांच्‍या पालकांनी नियमितपणे आपल्‍या पाल्‍याशी संपर्कात राहण्‍याचा सल्‍ला शिक्षण संचालक डॉ विलास पाटील आपल्‍या भाषणात दिला.
कार्यक्रमात महाविद्यालयातील शैक्षणिक क्षेत्रात उल्‍लेखनिय कामगिरी करणा-या विद्यार्थ्‍यांचा मानवरांच्‍या हस्‍ते गौरव करण्‍यात आला. विविध शै‍क्षणिक नियम व शिस्‍त याबाबत नवप्र‍वेशित विद्यार्थ्‍यांना महाविद्यालयातील प्राध्‍यापकांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी कृषी महाविद्यालयाच्‍या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक प्रा. रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ सय्यद ईस्‍माइल यांनी मानले. कार्यक्रमास नवप्रवेशित विद्यार्थ्‍यी, त्‍यांचे पालकवर्ग, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.