Thursday, December 5, 2019

वनामकृवित जागतिक मृदा दिन साजरा


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणी च्‍या वतीने दिनांक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ सय्यद इस्माइल, डॉ प्रवीण वैद्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, एक इंच माती तयार होण्‍यासाठी हजारो वर्ष लागतात, परंतु त्‍याच मातीची धुप फार अल्‍पावधीत होते. आज रस्‍ते बांधकाम व शहरीकरणामुळे मोठया प्रमाणात उपजाऊ जमिनीचा –हास होत असुन मृदा, जल व पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. मानवाचे आरोग्‍य हे मातीच्‍या आरोग्‍यावर अवलंबुन असुन मानवाच्‍या चांगल्‍या भवितव्‍यकरिता मातीची धुप थांबवली पाहिजे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, शेतीत शिफारसी पेक्षा जास्‍त रासायनिक खतांचा वापर होत असुन सेंद्रिय खतांचा वापर कमी होत आहे. त्‍यामुळे जमिनीचे आरोग्‍य बिघडत असुन जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी प्रयत्‍न करावा लागेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.   
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ सय्यद इस्‍माईल यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ स्‍वाती झाडे यांनी केले तर आभार डॉ प्रविण वैद्य यांनी मानले. कार्यक्रमास मृद विज्ञान व रसायनशास्‍त्र विभागातील शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
जा‍गतिक मृदा दिनानिमित्‍त पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांकरिता प्रश्नमंजूषा आणि भित्‍तीपत्रिक सादरिकरण स्पर्धाचे आयोजन करण्‍यात आले होते. या स्‍पर्धेतील विजेते विद्यार्थ्‍यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र देऊन सत्‍कार करण्‍यात आला. प्रश्‍नमंजुषा स्‍पर्धेत प्रथमस्‍थान मेघराज नाटेकर व दिग्विजय दामा यांनी संयुक्‍त पटकावले तर भाग्‍यलक्ष्‍मी व अंशुमाला हिने व्दितीय व तृतीय स्‍थान पटकावले तसेच भित्‍तीपत्रिका सादरिकरणात प्रथम स्‍थान आकाश गरड यांनी पटकावले तर शितल तीरके व शिवानी एंगडे हिने व्दितीय व तृतीय स्‍थान पटकावले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ अनिल धमक, डॉ महेश देशमुख, डॉ एस टि शिराले, डॉ सुरेश वाईकर, डॉ पपिता गौरखेड़े, डॉ चिक्षे, डॉ अडकिने, शिलवंत आदीसह पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.

Wednesday, December 4, 2019

वनामकृवितील महेबुब बाग फार्म, परभणी येथील कापुस संशोधन केंद्रास शंभर वर्ष पुर्ण

दि. ७ डिसेंबर रोजी शताब्‍दी सोहळाचे आयोजन
वसंतराव नाईक कृषि विद्यापीठपरभणी अंतर्गत असलेल्या कापूस संशोधन केंद्रमहेबुब बाग फार्मपरभणीच्या स्थापनेस सन २०१८ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली असुन शताब्दी पूर्ण करणारे हे विद्यापीठातील पहिलेच संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राच्या स्थापनेस १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शताब्दी सोहळा दि. ७ डिसेंबर रोजी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांच्या अध्यक्षतेखाली कापूस संशोधन केंद्र, महेबुब बाग फार्म, परभणी येथे संपन्न होणार असुन प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच माजी संचालक डॉ. बसवराज खादी, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील माजी संचालक संशोधन डॉ. दत्तात्रय बापट, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे कार्यकारी परिषद सदस्‍य डॉ. सुभाष बोरीकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून कार्यक्रमात कृषी शास्त्रज्ञचे देशी कापूसाबाबत मार्गदर्शन करणार असून प्रक्षेञ भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रक्षेञ भेटीमध्ये केंद्राच्या प्रक्षेञावर कृषी विद्यापीठ विकसीत व प्रसारीत वाण, देशी कापसाचे विविध प्रयोग, विविध वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम इत्यादी पाहता येणार आहे. कार्यक्रमास शेतकरी, शास्ञज्ञ, कृषि उद्योजक आदींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केंद्राचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. विजयकुमार चिंचाणे व कापुस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग यांनी केले आहे.

देशील कापूस पिकावरील संशोधन व विस्तारीकरणे या उददेशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील महेबुब बाग फार्म येथे कापूस संशोधन केंद्राची सन १९१८ मध्ये निजाम राजवटीत स्थापना करण्यात आली. मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी स्थापनेनंतर सन १९७२ मध्ये हे संशोधन केंद्र कृषि विद्यापीठाच्या प्रशासकीय नियञंणाखाली आले. या संशोधन केंद्रामार्फत विद्यापीठ स्थापनेपूर्वीच देशी कापसाचे गावरानी १२, गावरानी २२ व गावरानी ४६ हे वाण विकसीत करण्यात आले. विद्यापीठ स्थापनेनंतर संशोधन केंद्रामार्फत देशी कापसाचे १० वाण जसे की पीए २५५, पीए ४०२, पीए ०८, पीए ५२८, पीए ७४० आणि पीए ८१२ आदी विकसीत व प्रसारीत करण्यात आले आहेत. देशी व अमेरिकन कापसाच्या आंतरजातीय संकरातून देशी कापसाच्या बोंडाचा आकार व धाग्याची लांबी वाढविण्यात या संशोधन केंद्रानी यश संपादीत केले आहे. अशा प्रकारे आंतरजातीय संकरातून निर्मीत देशी कापूस सरळ वाण पीए ४०२ विकसीत करणारे देश पातळीवरील हे पहिलेच संशोधन केंद्र आहे. अमेरिकन कापसाप्रमाणे धाग्यांचे गुणधर्म असलेले वैविध्यपूर्ण लांब धाग्याचे देशी कापूस वाण या संशोधन केंद्रामार्फत विकसीत करण्यात आले आहे. याबरोबरच देशी कापूस पिकाचे सुधारीत लागवड तंञज्ञान विकसीत करण्यात आले आहे.

Tuesday, December 3, 2019

योग्य बाजारभावासाठी शेतक-यांनी सेंद्रीय शेती प्रमाणीकरणावर भर दयावा......संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर

हिगोंली जिल्‍हयातील शेतक-यांकरिता वनामकृवित आयोजित सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा विभागातील प्रत्‍येक जिल्‍हयातील शेतक-यांसाठी तीन दिवसीय सेंद्रीय शेती - प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन हिंगोली जिल्हयासाठी दिनांक 2 ते 4 डिसेंबर दरम्यान तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदरील प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक 3 डिसेंबर रोजी झाले, कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील माजी सहयोगी अधिष्ठाता तथा जेष्ठ मृदाशास्त्रज्ञ डॉ. अजितकुमार देशपांडे, पुणे येथील जेष्ठ कृषि तज्ञ डॉ. गोविंद हांडे, मुंबई येथील श्री. रोणक ठक्कर, केंद्राचे प्रमुख अन्‍वेषक डॉ. आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाष्‍णात संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर म्‍हणाले की, सेंद्रीय शेती करतांना शेतक-यांपुढे अनेक आव्हाने आहेत. वाढत्या लोकसंख्येसाठी पुरेसे अन्नधान्य उत्पादन आणि शाश्‍वत उत्पादन यांचा मेळ घालण्यासाठी एकात्मिक शेती पध्दतीच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीवर भर देण्याची गरज आहे. भाजीपाला पिकांत अनियंत्रित रासायनिक किटकनाशकांच्या वापरामुळे एकिकडे खर्च वाढतो तर दुसरीकडे रासायनिक अवशेष त्यात दिसून येतात. रसायनांच्या अमार्यादीत वापरामुळे जमिनीच्या आरोग्याबरोबरच मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे. योग्य मशागत, सेंद्रीय खतांचा वापर, आंतरपीक पध्दतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश, जैविक खते व बुरशीनाशकांचा वापर करुन परिपुर्ण सेंद्रीय लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करता येईल. विद्यापीठाने लागवड तंत्रज्ञानाबरोबरच जैविक किड व रोग व्यवस्थापन तसेच सेंद्रीय प्रमाणीकरण व बाजारपेठ व्यवस्थापन या विषयावरही विविध क्षेत्रामधील तज्ञांना प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले आहे, याचा शेतक­यांना निश्चितच लाभ होईल. पशुधन हा सेंद्रीय शेतीतील महत्वाचा घटक असुन पशुधन व्यवस्थापन व महत्वाचे चारापीक व्यवस्थापनावर लक्ष देण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
जेष्ठ कृषि तज्ञ डॉ. गोविंद हांडे यांनी रासायनिक अवशेषमुक्त उत्पादनाची मागणी दिवसेंदिवस वाढत असुन मोठया शहरासोबतच स्थानिक पातळीवरही यास मागणी वाढत आहे. चांगला बाजारभाव मिळविण्यासाठी शेतक-यांना स्पर्धेच्या बाजारपेठेत आपल्या मालाची विशिष्ठ ओळख निर्माण करता आली पाहीजे, असे ते म्‍हणाले तर जेष्ठ मृदाशास्‍त्रज्ञ डॉ. अजितकुमार देशपांडे यांनी सेंद्रीय शेती करण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुधारणे आवश्‍यक असुन माती परिक्षण करणे आवश्‍यक असल्‍याचे सांगुन सेंद्रीय कर्ब वाढवण्यासाठी शेतक-यांनी सेंद्रीय खतांचा वापर करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.   
कार्यक्रमास हिंगोली जिल्हयातील सहभागी शेतकरी प्रशिक्षार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचालन कृषि किटकशास्त्रज्ञ डॉ. आर. एस. जाधव यांनी केले तर आभार श्री. अे. के. कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. आर. एस. जाधव, डॉ. आनंद दौडे, डॉ. सौ. पी. एच. गौरखेडे, श्री. प्रल्हाद गायकवाड, श्री. बी. बी. धारबळे, डॉ. सुनिल जावळे, श्री. एस. बी. पतंगे, श्री. एस. बी. कटारे, श्री. सचिन रनेर, श्री. डी. बी. गरुड, श्री. बी. एस. वाघ आदींनी परिश्रम घेतले.
तांत्रिक सत्रात सिक्कीम येथील सेंद्रीय शेतीचे अनुभव यावर श्री. बी. एस. कच्छवे यांनी मार्गदर्शन केले तर सेंद्रीय शेतीत पीक अवशेषांचा वापरावर डॉ. अजितकुमार देशपांडे व डॉ. गोविंद हंडे, सेंद्रीय बाजारपेठ व्यवस्थापनावर श्री. रोनक ठक्कर यांनी तर सेंद्रीय पीक उत्पादन यावर कृषि यांत्रिकीकरण तज्ञ डॉ. एस. एन. सोळंकी व डॉ. आनंद गोरे शेतक-यांना मार्गदर्शन केले.

वनामकृवित पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठीचे ट्रायकोकार्ड विक्रीसाठी उपलब्ध

ट्रायकोग्रामा हे परजीवी कीटक असून ते पतंग वर्गीय किडींची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात. त्यामुळे किडीचा अंडी अवस्थेमध्येच नाश होतो. ट्रायकोग्रामा वापराने त्याचा वातावरणात व इतर मित्र कीटकांवर विपरीत परिणाम होत नाही. ट्रायकोग्रामा प्रौढ स्वतः हानिकारक किडींची अंडी शोधून नष्ट करतो. त्याचबरोबर स्वतःची पुढची पिढी त्या जागेवर वाढवितो त्यामुळे ही पद्धत स्वयंप्रसारित व स्वयंउत्पादीत आहे. ट्रायकोग्रामाच्या वापराने कीटकनाशकाच्या तुलनेत पीक संरक्षणावर कमी खर्च होतो. हानीकारक किडींचे प्रभावी नियंत्रण होते. ट्रायकोकार्डचा वापर ऊस, कापूस, मका, सूर्यफूल, भात, टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी व इतर भाजीपाला पिकांमध्ये करता येतो. सद्या काही प्रमाणात सदरील ट्रायकोकार्ड हे परोपजिवी कीटक संशोधन योजना, कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे प्रती कार्ड रु. १००/- प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कार्डचा वापर प्रती एकरी पिकानुसार २ ते ३ या प्रमाणात लावावेत. 



अधिक माहितीसाठी संपर्क करा
परोपजिवी कीटक संशोधन योजना, कीटकशास्त्र विभाग,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
डॉ.सौ.एस.एस.धुरगुडे *८८३०७७६०७४*
श्री.जी.एस.खरात *७४९८७२९८५९*

Saturday, November 30, 2019

मराठवाडयात बहुतांश ठिकाणी रब्बी ज्वारीवर मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव

एकात्मीक कीड व्यवस्थापन करण्‍याचे वनामकृवि शास्‍त्रज्ञांचे आवाहन 

सध्या रब्बी हंगामातील ज्वारी व मका पिकाची पेरणी झाली असून पिक वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु मराठवाडयात बहुतांश ठिकाणी रब्बी ज्वारीवर मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसुन येत असुन त्यासाठी पुढील प्रमाणे एकात्मीक व्यवस्थापन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्त्र विभागाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.
लष्करी अळीचे व्यवस्थापन
§    मका पिकाभोवती नेपियर गवताच्या ते ओळी लावावे. हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ५% निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी रावी.
§       वेळेवर कोळपणी व खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.
§  अंडीपुंज, समुहातील लहान अळया आणि मोठ्या अळ्या हाताने वेचून राॅकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
§  मक्यावरील लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळ्याचा वापर आणि प्रत्यक्ष शेताचे निरिक्षण करावे.
§  सामुहिकरित्या मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करून मारावेत. यासाठी एकरी १५ कामगंध सापळे लावावेत तसेच प्रकाश सापळे लावावेत.
§  किडींचे नैसर्गिक शत्रू जसे परभक्षी (ढालकिडा, मोठ्या डोळ्याचा ढेकूण इत्यादी) व परोपजीवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलोनेमस, कॅम्पोलेटीस इत्यादी) यांचे संवर्धन करावे. यासाठी आंतरपिके शोभिवंत फुलांची झाडे लावावी.
§  ट्रायकोग्रामा किंवा टीलेनोमस रेमस यांनी परोपजीवीग्रस्त ५०,००० अंडी प्रति एकर एक आठवड्याच्या अंतराने ३ वेळा किंवा कामगंध सापळ्यामध्ये पतंग / सापळा आढळून आल्यास शेतात सोडावे.
§  रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था या कालावधीत ५% प्रादुर्भावग्रस्त झाडे आणि शेवटी १०% प्रादुर्भावग्रस्त कणसे आढळून आल्यास उपयुक्त बुरशी व जिवाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी.

अ.क्र.
जैविक कीटकनाशक
मात्रा / १० लि. पाणी
मेटाहायजियम अॅनिसोप्ली 
(१x१०सीएफ़यु/ग्रॅम)
५० ग्रॅम
नोमुरिया रिलाई 
(१ x १० सीएफ़यु/ग्रॅम)
५० ग्रॅम
बॅसिलस थुरिन्जिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती
२० ग्रॅम

§  वरील जैविक कीटकनाशके पीक १५ ते २५ दिवसाचे झाल्यास पोंग्यामध्ये द्रावण जाईल अशाप्रकारे फ़वारणी करावी. त्यानंतर १० दिवसाच्या अंतराने ते फवारणी करावी. सध्याचे ढगाळ वातावरणात जैविक कीटकनाशकांच्या वापरासाठी पोषक आहे.

वारणीसाठी कीटकनाशके 
कालावधी
प्रादुर्भाची पातळी
कीटकनाशक
मात्रा / १० लि पाणी
रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था
(अंडी अवस्था)
५% प्रादुर्भावग्रस्त झाडे
निंबोळी अर्क किंवा
५%
अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम
५० मिली
मध्यम ते शेवटची पोंग्याची अवस्था
(दुस–या व तिस–या अवस्थेतील अळ्या)
१०-२०% प्रादुर्भावग्रस्त झाडे
इमामेक्टीन बेंझोएट ५ % डब्ल्युअजी किंवा
४ ग्रॅम
स्पिनोसॅड ४५ % एससी किंवा
३ मिली
थायामिथॉक्झाम १२.६ % + लॅमडा साहॅलोथ्रिन ९.५ % झेडसी किंवा
५ मिली
क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ % एससी
४ मिली
शेवटच्या अवस्थेतील अळ्या

विषारी आमिषाचा वापर करावा. यासाठी १० किलो साळीचा भुसा व २ किलो गुळ २-३ लिटर पाण्यात मिसळून २४ तास सडण्यासाठी ठेवावे. वापर करण्याच्या अर्धा तास अगोदर यामध्ये १०० ग्रॅम थायोडीकार्ब ७५ डब्ल्युजी मिसळावे. हे विषारी आमिष पोंग्यामध्ये टाकावे.

विशेष सूचना
§  रासायनिक किटकनाशकाची फ़वारणी चारा पिकावर करु नये.
§ एकाच रासायनिक किटकनाशकाची फ़वारणी हंगामात दोन पेक्षा जास्त वेळा करु नये.
§  तु–याची अवस्था व त्यानंतर फ़वारणी टाळावी.
§  फ़वारणी करताना मजुराने सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी.
§  एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे.

लष्करी अळीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन वरील प्रमाणे उपाययोजना कराव्यात असे वाहान किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजिव बंटेवाड, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. अनंत बडगुजर यांनी केले आहे.