Friday, February 25, 2022

मौजे करंजी येथे तुती रेशीम उद्योग प्रात्याक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

आत्मा, कृषि विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना यांच्या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २५ फेब्रुवारी रोजी मौजे करंजी (ता. जिंतूर, जि परभणी) येथे तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंचा सौ. सावित्राबाई नामदेव घोगरे या होत्‍या तर उपसरपंच सौ.शोभाबाई साहेबराव भवरे, जिंतूर तालूका कृषि अधिकारी श्री. शंकर काळे, मंडळ कृषि अधिकारी श्री. किशोर शेळके, मार्गदर्शक म्हणून रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात श्री. शंकर काळे यांनी रेशीम किटक संगोपन साहित्य, तुती लागवड व संगोपनगृह विषयी नानासाहेब कृषि संजिवनी योजना (पोक्रा) अंतर्गत पुर्व सहमती घेवून शेतक­यांना तुती लागवडीचे आवाहन केले तसेच पोक्रा योजने अंतर्गत विविध उपक्रमाची माहिती दिली. तर डॉ. सी. बी. लटपटे यांनी शेतक­यांनी आपल्या शेतात पटटा पध्दत तुती लागवड करण्यासाठी कमी खर्चात तुती रोपवाटीका तयार करण्याबददलचे मार्गदर्शन केले.

सुत्रसंचालन बीटीएम आत्मा श्री. सुनिल अंभुरे यांनी केले तर आभार कृषि सहाय्यक श्री. संतोष मावंदे (कृषि सहाय्यक) यांनी मानले. कार्यक्रमास पन्‍नास पेक्षा जास्‍त शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सी.बी.देशमुख, श्री धनंजय मोहोड, माजी सरपंच श्री. श्रीरंगराव लांडगे, श्री. प्रल्हाद घोगरे, श्री. देविदास लांडगे आदीसह गावातील शेतक­यांनी परीश्रम घेतले.

सेंद्रीय शेतीत जास्‍तीत जास्‍त जैविक घटकांना वापर करणे गरजेचे ..... कृषिविद्यावेत्ता डॉ. आनंद गोरे

वनामकृवित आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षणात दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सेंद्रीय शेतीमध्ये पीक लागवड तंत्रज्ञान’’ या विषयावर कृषिविद्यावेत्ता तथा प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठातील कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके हे होते मौजे कोगील (बु) (ता. करवीर जि. कोल्हापूर) येथील प्रगतशील शेतकरी श्री. दिनाथ किनीकर, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, डॉ. मिनाक्षी पाटील आदींचा प्रमुख सहभाग होतो. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. 

मार्गदर्शनांत प्रमुख वक्ते डॉ. आनंद गोरे म्हणाले की, सेंद्रीय शेती करतांना जमिनीची मशागत, लागवड, जमिनीचे आरोग्य व अन्नद्रव्य व्यवस्थापन, पीक संरक्षण, प्रमाणीकरण आदीं बाबतीत दिर्घकालीन नियोजन आवश्यक असुन या सर्व बाबींची नोंदी दररोज ठेवाव्यात, जेणे करून प्रमाणीकरण करतांना अडजणी येणार नाही. स्थानिक उत्पादने, पीजीएस प्रमाणीकरणा अंतर्गत विक्री करता येतील तर निर्यातीसाठी तृतीयपक्ष सेंद्रीय प्रमाणीकरणाची गरज आहे. सेंद्रीय शेतीत जास्‍तीत जास्‍त जैविक घटकांचा वापर करणे आवश्‍यक असुन सेंद्रीय शेती पशुधनासोबतच जमिनीतील जीवजंतूचे अस्तित्व असणे शेतीच्या परिस्थिकीसाठी अत्यंत आवश्यक आहे. पुर्णपणे सेंद्रीय खते, जैविक किटकनाशके व रोगनाशकांचा वापर करुन केलेली शेती म्हणजे सेंद्रीय शेती होय. बीज प्रक्रियेसाठी रायझोबीयम, अॅझॅटोबॅक्टर, स्फुरद विरघळवणारे जीवाणू दीचा वापर करावा. अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी जैविक खते, हिरवळीची खते, शेतातील पालापाचोळा व सेंद्रीय पदार्थ जमिनीतच गाडल्यास जमिनीचे आरोग्य अबाधित राहून उत्पादनात वाढ होते. मागील किटकनाशकांचा वापर मोठया प्रमाणावर होत असल्यामुळे भाजीपाला व फळपिकांमध्ये किटकनाशकांचे अंश मोठया प्रमाणावर आढळुन येत आहेत, याचा विपरीत परिणाम मानवी व प्राणी जीवनावर होत आहे. या वाढणा­या अवशेषामुळे पंजाब राज्यात कर्क रुग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे तेथे कॅन्सर ट्रेन सुरु करण्यात आली. भविष्‍यात मानवी आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने विषमुक्त अन्न उत्पादित करण्‍यासाठी सेंद्रीय शेतीकडे वळावे लागेल असे ते म्हणाले.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. आनंद सोळंके म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीवरील प्रशिक्षण हे आज शेतक­यांसाठी गरजेचे आहे. यामध्ये पीक संरक्षणप्रमाणीकरण या विषयात सोप्या पध्दतीने मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. राज्यातील चारही कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रे, शेतक­यांना प्रशिक्षण देण्यासाठी तत्पर आहेत. शेतक­यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे वाहन त्यांनी केले. तर प्रगतशील शेतकरी श्री. दिनाथ किनीकर त्यांचे अनुभव सांगताना म्हणाले की, सेंद्रीय शेतीमध्ये गांडुळ खताचा वापर केल्यास भाजीपाला व फळ पिकांचे चांगले उत्पादन घेता येते. सेंद्रीय शेती आंतर पिक व मिश्र पिक पध्दतीचा अवलंब करावा. अन्नधान्य पिकासोबतच शेतक­यांनी भाजीपाला व फळ पिके सेंद्रीय पध्दतीने पिकवावीत जेणेकरुन चांगला भाव मिळुन आर्थिक नफा होईल. 

प्रशिक्षण कार्यक्रमास दोन हजार पेक्षा जास्‍त शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आदींनी सहभाग नोंदविला. प्रमुख वक्ते यांनी शेतक­यांनी विचालेल्या प्रश्नांचे उत्तरे देऊन व योग्य मार्गदर्शन करुन शेतक­यांच्या शंकांचे समाधान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. प्रितम भुतडा यांनी केले तर आभार श्रीमती सारीका नारळे यांनी मानले आणि श्री. ऋषीकेश औंढेकर यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी, डॉ. अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, डॉ. पपीता गौरखेडे, दिपक शिंदे, अभिजीत कदम, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.

Wednesday, February 23, 2022

शाश्वत सेंद्रीय शेतीसाठी एकात्मिक पध्दतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे ..... मृदाशास्त्रज्ञ डॉ. अमृत लाल मीना

वनामकृविच्‍या वतीने आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षणात दिनांक २२ फेबुवारी रोजी “शाश्वत सेंद्रीय शेतीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन’’ या विषयावरील व्याख्यानाने आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी दिर्घकालीन खत प्रयोग योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. रामप्रसाद खंदारे हे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून मोदीपुरम (उत्तर प्रदेश) येथील भाकृअप-भारतीय संशोधन संस्था एकात्मिक शेती पध्दतीचे मृदाशास्त्रज्ञ डॉ. अमृत लाल मीना, मौजे व्हान्नूर  (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील प्रगतशील शेतकरी श्री. तानाजी निकम, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. मिनाक्षी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरु मा.डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. 

प्रमुख वक्ते मृदाशास्त्रज्ञ डॉ. अमृत लाल मीना म्हणाले की, सेंद्रीय शेती भारतात प्राचीन काळापासुन केली जाते. हरित क्रांतीमुळे देश अन्नधान्य उत्पादना बाबत स्वयंपुर्ण झाला परंतु हरित क्रांती घडवुन आणन्यासाठी अधिक उत्पादन देणा­या व कीटकनाशके यांच्या गहू व भात पिकाच्या वाणांचा वापर झाला. अधिक उत्पादन देणा­या वाणांसाठी सिंचन, बेसुमार खते व किटकनाशके आदींचा अवाजवी वापरामुळे जमिनीतील पाणी प्रदुषीत झाले आहे. सेंद्रीय शेती पर्यावरणपुरक असुन जमीन, प्राणी व वनस्पती यासाठीचा शाश्वत मार्ग आहे. यात जमिनीचे आरोग्य दिर्घकालासाठी अबाधित राहते. सेंद्रीय शेतीत जमिनीमधील सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण वाढुन जमिनीतील जीवजंतूची संख्या वाढते, त्यामुळे जमिनीमध्ये वनस्पती वाढीसाठी आवश्यक असलेले विविध पोषणद्रव्य सहजपणे उपलब्ध होतात, पुढे ही साखळी निरंतर चालत राहते. अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये कोणत्याही एका स्त्रोतावर अवलंबुन न राहता उपलब्धतेनुसार विविध स्त्रोतांचा एकात्मिक पध्दतीने वापर करणे गरजेचे असल्‍याचे सांगुन सेंद्रीय शेतीत वापरण्यात येणारे विविध जैविक खताबद्दल व त्यांच्या गुणधर्माबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. रामप्रसाद खंदारे म्‍हणाले की, शेतामध्ये पीक काढणीनंतर उरलेला पालापाचोळा न जाळता तो जमिनीमध्ये गाडावा ज्यामुळे तो कुजल्यानंतर त्याचे सेंद्रीय खतामध्ये रुपांतर होईल. जर हा पालापाचोळा जाळुन नष्ट केला तर सेंद्रीय पदार्थाबरोबरच जमिनीतील सुक्ष्म जीवजंतुची हानी होईल. जैविक खत तयार करतांना पालापाचोळा व सेंद्रीय पदार्थाचे विघटन करण्यासाठी लागणारे विघटक जिवाणू कृषि विद्यापीठ तसेच बाजारात उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा जेणेकरुन चांगल्या दर्जाच्या शेणखत किंवा कंपोस्ट खताची निर्मिती करता येईल.

प्रगतशील शेतकरी श्री. तानाजी निकम यांनी त्यांचे अनुभव सांगताना म्हणाले की, सेंद्रीय शेतीमध्ये जिवामृत, गौकृपाआमृत व नत्राचे विविध प्रकार आम्ही स्वत: शेतावर तयार केले आहेत. सेंद्रीय निविष्ठांचा वापर करुन ऊसाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. सेंद्रीय शेतीत कर्बाचे प्रमाण वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रीय निविष्ठांचा वापर करुन व जैविक कीड व रोग नियंत्रण केल्यास सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढु शकेल. शासनाने गट शेतीची योजना राबवल्यामुळे सेंद्रीय शेती करण्यासाठी शेतकरी पुढे सरसावत आहेत. शेतक­यांनी अन्नधान्य पिकांसोबतच फळे व भाजीपाला नियोजनबध्द सेंद्रीय पध्दतीने घ्यावा जेणे करुन ग्राहकास सर्व प्रकारचे सेंद्रीय अन्न स्थानिक बाजारपेठेमध्ये मिळेल व शेतक­यांना आर्थिक नफा मिळेल.

प्रशिक्षण कार्यक्रमाचा दोन हजार पेक्षा अधिक शेतकरी बंधू भगिनी तसेच विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ सहभागी झाले होतेकार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. प्रितम भुतडा यांनी केले तर आभार डॉ. पपीता गौरखेडे यांनी मानले तसेच डॉ. सुदाम शिराळे यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, अभिजीत कदम, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.

Tuesday, February 22, 2022

सेंद्रीय शेतीत कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसीत करणे आवश्यक ..... शास्‍त्रज्ञ डॉ. आनंद कसवाल (गुजरात)

वनामकृविच्‍या वतीने आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षणात दिनांक २१ फेबुवारी रोजी गुजरात मधील नवसारी कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधनाचे निष्कर्ष या विषयावर नैसर्गिक साधन सामग्री व सेंद्रीय शेती विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आनंद कसवाला यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी वनामकृवितील मृदा विज्ञान व कृषि रसायन शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य, मौजे आमशेत (ता. महाड जि. रायगड) येथील प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती वैशाली संतोष सावंत, आयोजक प्रमुख अन्‍वेषक डॉ. आनंद गोरे, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. प्रविण वैद्य म्‍हणाले की, सेंद्रीय शेती ही शाश्वत करण्यासाठी ती नियानबध्द पध्दतीने करणे गरजेचे असून त्यात सातत्य पाहिजे. सेंद्रीय शेतीत अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक विविध स्त्रोतांचा वापर करणे गरजेचे आहे. यात  गिरिपुष्पाची झाडे बांधावर लावणे, विविध प्रकारच्या कंपोस्टची निर्मिती आणि विशेष म्हणजे सेंद्रीय शेतीला चार ते पाच जनावरांची जोपासना करुन आधार देण्याची गरज आहे, जेणेकरुन सेंद्रीय निविष्ठा शेतातच तयार होईल व निविष्ठांवर होणारा खर्च कमी होईल.

प्रमुख वक्ते डॉ. आनंद कसवाला आपल्‍या मार्गदर्शनात म्हणाले की, सेंद्रीय शेती करणे म्हणजे समाजसेवा करण्‍यासारखेच आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये कीडनाशक व रोगनाशक यांचा अपरिमीत वापर होत आहे. ज्यामुळे कीटकनाशकांचा फळ व भाजीपाल्यामध्ये अंश आढळुन येत आहे. फळे पिकवण्यासाठी व आकर्षक रंग आणन्यासाठी रसायनांचा मोठया प्रमाणात वापर होत आहे. याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत आहेत. नियोजनबध्द पध्दतीने सेंद्रीय शेतीची टप्याटप्याने सुरुवात करावी. यात सेंद्रीय शेती प्रक्षेत्र विकसीत करण्यासाठी मुलभुत आवश्यक बाबी जसे सेंद्रीय प्रक्षेत्र इतर प्रक्षेत्रापासुन वेगळे ठेवण्यासाठी चर किंवा बांध किंवा जैविक कुंपणाचा वापर करावा, पिकांची फेरपालट, आंतरपिक पध्दतीचा वापर, आच्छादनाचा वापर, हिरवळीचे खते, जैविक खते इत्यांदीचा वापर करावा. त्यामुळे जमिनीचे आरोग्य अबाधीत राहिल, खर्च कमी होईल, उत्पादनाची गुणवत्ता सुधारेल व पर्यावरणाचा ­हास होणार नाही. नवसारी कृषि विद्यापीठाने पपई, केळी, हळद ऊस, अशा विविध पिकांमध्ये सेंद्रीय लागवड तंत्रज्ञान विशेषकरुन कमी खर्चाचे अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे पॅकेज विकसीत केले आहे व सदरील उत्पादनाचे बाजारपेठ व्यवस्थापनही केले आहे. शेतक­यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी खर्चात कपात करुन त्याला भाव जास्त मिळेल असे उत्पादन घ्यावे व विक्रीसाठी गटाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

प्रशिक्षण कार्यक्रमात दोन हजार पेक्षा अधिक शेतकरी बंधू भगिनी तसेच विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आदींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ. प्रितम भुतडा यांनी केले आणि डॉ. सुदाम शिराळे यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता डॉ. अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. सुनिल जावळे, अभिजीत कदम, दिपक शिंदे, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.

Sunday, February 20, 2022

शिवरायांच्या युद्धनितीतील गनिमी काव्याचे महत्व अनन्यसाधारण…….कुलगुरु डॉ.अशोक ढवण

कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित शिवजयंती कार्यक्रमात प्रतिपादन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत गनिमी कावा या युद्धनीतीचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. यालाच ईंग्रजीत गोरिला वार असे म्हणतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या युध्दनीतीचा अभ्यास करण्यात येतो. यात सैनिकांचे कमी संख्याबळ असले तरी बलाढ्य शत्रूला जेरीस आणता येते. शिवरायांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात या युद्धतंत्राचा वापर करून शत्रूंचे मनसुबे उधळून लावले. स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी अवलंबिलेले तंत्र तसेच त्यांनी कुशल राज्यकर्ता म्हणून राबविलेली अनेक धोरणे यांचे खूप महत्व आहे. विद्यार्थांनी शिवचरित्राचे वाचन करून त्यांचे गुणांचा अवलंब करावा, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दिनांक १९  फेब्रुवारी रोजी आयोजित शिवजयंती कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.  व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. राहुल रामटेके आदि मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शनात शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी शिवरायांच्या शेती विषयक धोरणावर प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले कि रयत हाच खरा शिवकालीन शेतीचा आधार होता आणि त्यांचे उत्पन्न हेच राज्याचे उत्पन्न होते. छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात आखलेल्या अनेक प्रकारच्या योजना व त्यांना दिलेल्या सवलती यांचाही उल्लेख त्यांनी केला. प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी छत्रपती शिवराय हे नीतिमंत व लोक कल्याणकारी राजे होते. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांचेवर खूप मोठी संकटे आली परंतु त्त्यांनी सर्व संकटे मोठ्या चातुर्याने व शौर्याने सामना केला असे प्रतिपादन केले.

मान्यवरांचे हस्ते शिवप्रतिमेचे पूजन आणि द्वीप प्रज्वलन करण्यात आले. रणजीत पाटील या विद्यार्थ्याने शिवगर्जना सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राहुल रामटेके यांनी केले. सूत्रसंचालन कु. राजश्री पाटील व श्री साबळे या विद्यार्थांनी केले तर प्रा. मधुकर मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. श्याम गरुड आणि सहाव्या सत्राचे सर्व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. हरीश आवारी, प्रा. विवेकानंद भोसले, सर्व प्राध्यापक,  कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.