Wednesday, August 17, 2022

वनामकृवित समुह राष्‍ट्रगीत गायन उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेले विविध कार्यालयात दिनांक १७ ऑगस्‍ट रोजी सकाळी ११.०० वाजता समुह राष्‍ट्रगीत गायन उपक्रम रा‍बविण्‍यात आला. विद्यापीठातील मुख्‍य प्रशासकीय इमारतीच्‍या प्रांगणात माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या प्रमुख उपस्थिती हा उपक्रम राबविण्‍यात आला. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने सहभागी झाले होते.

Tuesday, August 16, 2022

आझादी का अमृत महोत्‍सवान‍िमित्‍त भित्‍तीपत्रकाचे माननीय कुलगुरू यांच्‍या हस्‍ते विमोचन

वनामकृवितील कृषि विस्‍तार शिक्षण विभागातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांचा उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी तयार केलेल्‍या आझादी का अमृत महोत्‍सव भित्‍तीपत्रकाचे विमोचन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी करण्‍यात आले. कार्यक्रमास माननीय कुलगुरू यांच्‍या सुविद्य पत्‍नी मा श्रीमती जया इन्‍द्र मणि मिश्रा, श्री सौमित्र मिश्रा, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍न शिक्षण) डॉ गजेंद्र लोंढे, विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, विद्यापीठ उपअभियंता डॉ दयानंद टेकाळे आदीची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, विस्‍तार शिक्षण विभागातील विद्यार्थ्‍यांनी विद्यापीठाचे कृषि तंत्रज्ञान जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍यासाठी कार्य करावे. कृषि तंत्रज्ञान वापरात येणा-या शेतकरी बांधवाच्‍या समस्‍या समजुन घ्‍यावीत.

स्‍वांतत्र्य लढयात योगदान देणा-या महान व्‍यक्‍तीरेखा तसेच कृषि क्षेत्रात मागील ७५ वर्षात देशांने केलेला विकास यावर आधारित सदर भित्तिपत्रक पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी तयार केले होते. माननीय कुलगुरू यांनी विभाग राबविण्‍यात येत असलेल्‍या उपक्रमांबाबत समाधान व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात विभाग प्रमुख डॉ राजेश कदम यांनी विभागाच्‍या वतीने राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध उपक्रमाची माहिती दिली तर संगिता हुलमुखे हिने आपले मनोगत व्‍यक्‍त केले. सुत्रसंचालन डॉ प्रविण कापसे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ एस आर जक्‍कावाड, डॉ एम आय खळगे, डॉ आर सी सावंत, डॉ अनुराधा लाड, डॉ एम व्‍ही भिसे आदींच्‍या मार्गदर्शनाखाली श्रीमती सवंडकर, श्री मस्‍के, किरण बनसोडे, पांचाळ, विभागातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Monday, August 15, 2022

जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान ........ कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित ७६ वा स्‍वातंत्र्य दिन उत्‍साहात साजरा

देशाचे अभेद्य सुरक्षा आमचे जवान यांच्‍या हाती असुन देशाची अन्न सुरक्षा शेतकरी बांधवाच्‍या हाती आहे. म्‍हणुनच देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान हा नारा दिला. स्वातंत्र्याच्या वेळी अन्नधान्य बाबतीत आयातदार असणारा देश, आज इतर देशांची भूक मिटवण्याचे काम करित आहे, हे सर्व शेतकरी बांधवांची मेहनत आणि समर्पण मुळेच शक्‍य झाले, त्‍यास विज्ञान आणि संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाची जोड लाभली. म्‍हणुन जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान हा नारा आपण पुढे घेऊन जाऊ, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात देशाच्‍या ७६ वा स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले, यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास कुलगुरू यांच्‍या सुविद्य पत्‍नी मा श्रीमती जया इन्‍द्र मणि, श्री सौमित्र मिश्रा, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ गजेंद्र लोंढे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्हणाले कीदेशात सर्वत्र अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या महोत्सवात सर्वजण उत्‍साहाने सहभागी झाले आहेत. असे दिसते की स्वातंत्र्यासाठीच्या असंख्य संघर्षांची, असंख्य बलिदानांची आणि असंख्य तपस्यांची उर्जा संपूर्ण भारतभर एकाच वेळी पुन्हा जागृत होत आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून देणाऱ्या, देशाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व महान व्यक्तींच्या स्‍मृतीचे स्‍फुरण आपण केले पाहिजे. आज आपला देश भक्कम पायावर उभा आहे. हे साध्य करण्यासाठी अनेकांनी झोकून दिले आहे. देशाच्या स्वातंत्र्यात महाराष्ट्राच्या पवित्र भूमीचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्रात अनेक चळवळी सुरू झाल्या ज्यामुळे राजकीय-धार्मिक-सामाजिक-आर्थिक सुधारणांना चालना मिळाली. स्वराज्य संस्‍थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात देशभक्तीची भावना दृढ करते. महाराष्ट्राने देशाला अनेक क्षेत्रात प्रेरणा दिली आहे. सामाजिक क्रांतीत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांपासून ते राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत समाजसुधारकांचा अतिशय समृद्ध वारसा आहे. अनेक व्यक्ती आणि समूहांनी महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक विकासाला गती दिली. देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासात आपल्या शेतकरी बांधवांचे मोठे योगदान असुन शेतकरी हे आपले दैवत आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण काम करतो याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा. सर्व कृषी शास्त्रज्ञ, शिक्षक, देशातील कृषी विद्यापीठांचे पदवीधर यांनी प्रत्येक वेळी शेतकऱ्याच्या हिताचा विचार केला पाहिजे. शेतकरी बांधवाच्‍या कल्‍याणाकरिता आणि विद्यापीठाचे नाव शिक्षण, संशोधन आणि कृषि विस्‍तार क्षेत्रात उंचाविण्‍याकरिता आपण सर्वजण ए‍कत्रितरित्‍या प्रयत्‍न करू या, ते म्‍हणाले.

यावेळी राष्‍ट्रीय छात्र सैनिकांनी प्रभारी छात्रसेना अधिकारी डॉ हिराकांत काळपांडे यांच्‍या नेतृत्‍वात माननीय कुलगुरू यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 



युवा शेतकऱ्यांनी कृषि उद्योगाकडे वळावे……. कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

मौजे पिंगळी येथे आयोजित शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन

आज शासकीय व इतर क्षेत्रात नौकरीच्‍या संधी मागणीच्‍या प्रमाणात अत्‍यंत कमी आहेत. ग्रामीण भागात कृषि पुरक उद्योगास मोठा वाव आहे. युवा शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीपूरक उद्योग निर्माण करावेत, यात इतरांनाही रोजगार देण्‍याची क्षमता आहे. शासनाद्वारे शेतकरी उत्पादक कंपनींना प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृषि उद्योगात युवा शेतक-यांना प्रशिक्षित करण्‍यावर विद्यापिठाचा  विशेष भर राहणार असुन सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्‍याचे मत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी व्‍यक्‍त केले.  

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमीत्ताने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने मौजे पिंगळी येथे दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, संशोधन संचालक डॉ. डी. पी. वासकर, संचालक शिक्षण डॉ. डी. एन. गोखले, कुलसचिव डॉ. डी. आर. कदम आदीची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन पिंगळी येथील शेतकरी श्री.रामकिशन पवार यांच्या शेतात करण्यात आले होते.

यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.डी.बी.देवसरकर यांनी शेतकरी बांधवांनी घरच्या घरी बीजोत्पादन करण्‍याचे आवाहन करून विद्यापीठ विकसित सोयाबीन, तूर पिकाच्या वाणांची शेतकरी बांधवांनी लागवड करावी व उत्पादन वाढीसाठी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याचा सल्‍ला दिला. तर संशोधन संचालक डॉ.डी.पी.वासकर यांनी विद्यापीठ विकसित विविध वाण व भविष्यात येणारे सोयाबीनचे वाण, चाऱ्याचे वाण याविषयी सविस्तर माहिती दिली.

शिक्षण संचालक डॉ.डी.एन.गोखले यांनी एकच एक पीक पद्धती न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून शाश्वत उत्पादन मिळेल असे सांगितले तर डॉ.डी.आर.कदम यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करून विविध उपक्रम राबवावेत जेणेकरून शेतकऱ्यांचा व गावाचा विकास होईल, असे सांगि‍तले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत श्री.रामकिशन पवार यांनी विद्यापीठाद्वारे विविध कृषि तंत्रज्ञान व वाण शेतक-यांना उपलब्ध व्‍हावीत अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.एस.खताळ यांनी केले. यावेळी श्री.रामकिशन पवार यांनी विकसित केलेले आंतरमशागत यंत्राचे अनावरण माननीय कुलगुरू यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्री रामकिशन पवार यांच्या विद्यापीठ विकसित सोयाबीन वाण एमएयुएस-७१ या प्रक्षेत्रास मान्यवरांनी भेट दिली. माननीय कुलगुरू यांच्या हस्ते काही उपस्थित यशस्‍वी युवा शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. 

तांत्रिक सत्रात विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. जी. डी. गडदे, कृषी विद्यावेत्ता डॉ. ए. के. गोरे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. डी. डी. पटाईत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. एम. बी. मांडगे आदींनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. मेळाव्‍यास पावसाचे वातावरण असतांनाही मौजे पिंगळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात स्वराज्य महोत्सव साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दिनांक १ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला. या कालावधी दरम्यान महाविद्यालयाच्या परिसरात अधिकारी-कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविले. शासनाच्या निर्देशानुसार ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनांक ११ ऑगस्ट रोजी ‘तिरंगा रॕली’ आयोजित करण्यात आली. तिरंगा रॕली दरम्यान देशभक्तीपर दमदार घोषणा देवून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला. तसेच या रॕलीद्वारे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आपल्या घरी ध्वज उभारणी करावी तसेच इतर नागरिकांना ध्वज उभारणीसाठी प्रेरित करून या अभियानाबद्दल बद्दल जनजागृती  व  भारतीय ध्वज संहितेचे पालन करण्याबाबत दक्षता घेण्यासाठी नागरिकांमध्ये जाणीव जागृती करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्ताने महाविद्यालयात दिनांक १२ ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रांगोळी, वक्तृत्व, देशभक्तीपर गीत, समूहगीत, एकल नृत्य, समूह नृत्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला फाळणीच्या भीषण आठवणीच्या दिनानिमित्त प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. सदर प्रदर्शनीचे औपचारिक उद्घाटन प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांनी केले. या वेळी मनोगतात भारताची  फाळणी हा देशासाठी अतिशय क्लेशदायी प्रसंग असल्याने त्यातून आपण धडे घेत देशवासियांप्रती सद्भावना, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक स्वाथ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणे नितांत गरजेचे असल्याचे विशद केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी व युवकांमध्ये जाज्वल्य देशभक्ती व लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांच्या संकल्पनेनुसार व संचालक शिक्षण डॉ. धर्मराज  गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रमाची व कार्यक्रम नियोजनाची जबाबदारी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विद्यानंद मनवर तसेच डॉ. शंकर पुरी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. याप्रसंगी सेल्फी पॉईंट, महाविद्यालय तथा वर्षा वसतिगृहावर रोषणाई, देशभक्तीपर गिताच्या धुन आदींमुळे परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. यावेळी विभाग प्रमुख डॉ.नाहिद तस्नीम खान. डॉ.माधुरी कुलकर्णी, डॉ.सुनिता काळे, डॉ.शंकर पुरी, प्रा.नीता गायकवाड,  डॉ.जयश्री रोडगे, डॉ.इरफाना सिद्धिकी  यांच्यासह  महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी   व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.आर.डी.चंदाले, श्री.रमेश शिंदे, माणिक गिरी , शाम गायकवाड,  गौस शेख, राम शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

Sunday, August 14, 2022

विद्यार्थ्‍यांनी सर्वागिंन व्‍यक्‍तीमत्‍व विकासाकरीता जाणीव पुर्वक प्रयत्‍न करावा ... बालक आणि प्रौढ विकास तज्ञा डॉ विशाला पटणम

कृषि महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्‍सव आणि आंतरराष्‍ट्रीय युवा दिना आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने दिनांक १२ ऑगस्‍ट रोजी आंतरराष्‍ट्रीय युवा दिन आणि आझादी का अमृत महोत्‍सवाचे औजित्‍य साधुन महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांच्‍या सर्वांगिन विकास वाढीकरिता पाच तत्‍व यावर बालक आणि प्रौढ विकास तज्ञा निवृत्‍त प्राध्‍यापिका डॉ विशाला पटणम यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल हे होते तर विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, डॉ हिराकांत काळपांडे, शिक्षण प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ विशाला पटणम म्‍हणाल्‍या की, आजचे युवक हे देशाचे भविष्‍य असुन प्रत्‍येकात राष्‍ट्रा प्रती प्रेम पाहिजे, युवकांत सकारत्‍मक काम करण्‍याची उर्मी पाहिजे तसेच उत्‍तम कामगिरी करण्‍याची इच्‍छा, कामात सातत्‍य व चिकाटी पाहिजे, तरच देशाची प्रगती निश्चित आहे. युवकांनी जाणीवपुर्वक हे गुण आत्‍मसात केली पाहिजेत असा सल्‍ला त्यांनी दिला, तसेच त्‍यांनी देशाच्‍या तिरंगा ध्‍वजाचा इतिहास सांगितला.

अध्‍यक्षीय समारोप प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ अनुराधा लाड यांनी केले. सुत्रसंचालन रासेयो स्‍वयंसेविका कृतिका सुरजुसे हिने केले तर आभार श्रुती सतले हिने मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ अनुराधा लाड आणि डॉ मधुकर खळगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Saturday, August 13, 2022

महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. भगतसिंह कोश्‍यारी यांची कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी घेतली सदिच्‍छा भेट

वनामकृविचे मानांकन उंचावण्‍याकरिता करण्‍यात येणा-या प्रयत्‍नाबाबत कुलगुरू यांनी दिली माहिती.   

महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. भगतसिंह कोश्‍यारी यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी दिनांक १२ ऑगस्‍ट रोजी पुणे येथील राजभवन मुख्‍यालयी सदिच्‍छा भेट घेतली. यावेळी परभणी कृषि विद्यापीठाच्‍या कार्याची भविष्‍यातील दिशा यावर सविस्‍तर चर्चा झाली. विशेषत: विद्यापीठाचा शैक्षणिक आणि संशोधनात्‍मक दर्जा वाढी करिता करण्‍यात येणा-या प्रयत्‍नाची माहिती कुलगुरू यांनी दिली. यावेळी कुलगुरू यांनी परभणी कृषि विद्यापीठ लवकरच आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय पातळीवरील विविध नामांकित शैक्षणिक व संशोधन संस्‍थे सोबत सामंजस्‍य करार करून विद्यापीठांच्‍या कार्याची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात येणार आहे. शेतकरी बांधवा पर्यंत कृषि तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहविण्‍याकरिता नाविण्‍यपुर्ण कृषि तंत्रज्ञान विस्‍तार उपक्रम राबविण्‍यात येणार असुन सार्वजनिक खासगी भागादारी तत्‍वावर बीजोत्‍पादन आणि संरक्षित पिक लागवडी सारखे उपक्रम राबविण्‍यात येणार आहेत. विद्यापीठातील दर्जात्‍मक शैक्षणिक वातावरणाकरिता विद्यार्थ्‍यांचे वसतीगृह, अत्‍याधुनिक सुविधा असलेल्‍या  वर्गखोल्‍या, विद्यार्थ्‍यांकरिता विशेष पायाभुत सुविधांचे बळकटीकरण करण्‍यात येईल. केंद्र सरकार, राज्‍य सरकार आणि नामांकित संस्‍थे कडुन नाविण्‍यपुर्ण शेतकरी गरजांवर आधारित संशोधन प्रकल्‍पा करिता निधी प्राप्‍त करून विद्यापीठाच्‍या संशोधन व शैक्षणिक दर्जा वाढीवर विशेष भर देण्‍यात येऊन विद्यापीठाचे मानांकन उंचावण्‍याचा मानस असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. यावेळी माननीय राज्‍यपाल महोदयांनी विद्यापीठाच्‍या कार्यास शुभेच्‍छा दिल्‍या.