Sunday, August 25, 2024

तंत्रज्ञान प्रसारात शेतकरी - शास्त्रज्ञ संवादाची महत्त्वाची भूमिका ... माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

 ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा  आठवा भाग संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभाग व कृषि विभागाच्या क्रॉपसॅप  प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाची यशस्वी सुरुवात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या संकल्पनेतून झाली असून दिनांक २३ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचा आठवा भाग संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवात केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना.श्री. शिवराजसिंह चौहान आणि राज्‍याचे कृषि मंत्री मा. ना. श्री. धनंजय मुंडे यांनी शेती निविष्ठा आणि मजुरीवरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने ड्रोन तसेच नॅनो खतांचा वापरावर भर देण्याचे आवश्यक असल्याचे सुचित केले होते. या बाबीवर विद्यापीठ पूर्वीपासूनच कार्यरत असून या संदर्भात राष्ट्रीय पातळीवर ड्रोनच्या प्रभावी वापरासाठी आणि त्या संदर्भात प्रमाणित मार्गदर्शक तत्वे ठरविण्यासाठी मुख्य भूमिका बजावत आहे. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळणे आवश्यक असून शेतीतील नुकसानीसाठी शासनाची मदत मिळते परंतु यातून शासनास मिळणारे शेतीचे उत्पादन आणि शेतकऱ्यांनी वापरलेल्या निविष्ठा, त्यांनी घेतलेली मेहनत वाया जाते, असे दुहेरी नुकसान होते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रभावीपणे विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान पोहोचणे आवश्यक असून यासाठी हा शेतकरी - शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हा कार्यक्रम मागील दोन महिन्यापूर्वी सुरू झाला आणि त्यामध्ये नाविन्यता ठेवून विविध विषयावर मार्गदर्शन आयोजित करून वृद्धिगत करण्यात येऊन दर शुक्रवारी सातत्याने आयोजित करण्यात येत आहे. यात विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभागाचे मोठे योगदान आहे. भविष्यात विद्यापीठ राज्य शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे,  अशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांच्यात समन्वय ठेवून शेती विकासासाठी विस्तार यंत्रणेचे उत्कृष्ट मॉडेल बनविण्यात येईल असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवर यांनी केले. तांत्रिक सत्रात डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामानाचा सल्ला दिला तसेच कापूस पिकातील येणारी गुलाबी बोंड ळीची समस्या त्याचे व्यवस्थापन याविषयी कीटक शास्त्रज्ञ डॉ. बस्वराज भेदे यांनी तर कपाशीवरील मर आणि अकस्मित मर रोग यांच्यामधील फरक त्याचे व्यवस्थापन याबाबत वनस्पती रोशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये मराठवाड्यातील आठही जिल्यासह चंद्रपूर, वाशिम, जळगाव जिल्ह्यातून बहुसंख्येने शेतकरी आणि विस्तार कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि त्यांनी विविध शेती विषयक प्रश्न विचारले, त्यास विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवर, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेरकर, शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे. डॉ. गजानन गडदे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. अनंत लाड यांनी समाधानकारक उत्तरे दिली. तसेच पुढील कार्यक्रमांमध्ये आद्रक पिकांची कंदकुज. मोसंबी फळ, टरबूज लागवड, नैसर्गिक शेती या विषयावर मार्गदर्शन आयोजित करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून करून त्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Saturday, August 24, 2024

परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा समारोप उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दिनांक २५ ऑगस्ट ऐवजी २६ ऑगस्टला

महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठे आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा दृष्टीने दिनांक ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२४  या कालावधीत परळी वैद्यनाथ (बीड) येथे “परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सव – २०२४” आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन दिनांक २१ ऑगस्ट रोजी करण्यात आलेले आहे. या महोत्सवामध्ये कृषी निविष्ठा, कृषी अवजारे, सिंचन साधने, संरक्षित शेती साधने, महिला गट, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, इत्यादींची उत्पादित वस्तू , खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्व. पंडीतअण्णा मुंडे सभामंडपातील कृषि प्रदर्शनीतील ४०० हून अधिक दालनात करण्यात आलेले आहे. याशिवाय कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कृषी विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम झालेले संशोधन यांची देखील माहिती महोत्सवात शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. या महोत्सवात दररोज शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रांचे आयोजन केलेले आहे. यामध्ये शास्त्रज्ञ व तज्ञ व्यक्ती शेतकऱ्यांशी सुसंवाद साधत आहेत तसेच रानभाजी महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. या कृषी महोत्सवास राज्यातील शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या प्रदर्शनाचा कालावधी एक दिवस वाढवण्यात येत आहे. त्यामुळे कृषी महोत्सवाचा समारोप दिनांक २५ ऑगस्ट ऐवजी २६ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.

कृपया सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी व या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री माननीय ना. श्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना केलेले आहे.

परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्वात विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रदर्शनासाठी वाढीव एक दिवस मिळाल्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ इन्द्र मणि यांनी या संधीचा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी लाभ घेवून प्रदर्शनातून शेतकऱ्यांना अधिकाधिक मार्गदर्शन करावे अशा सूचना दिल्या

Friday, August 23, 2024

परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवात शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

 कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखालील वनामकृविचे ड्रोन प्रात्यक्षिक मुख्य आकर्षण



महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठे आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा दृष्टीने दिनांक ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२४  या कालावधीत परळी वैद्यनाथ (बीड) येथे “परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सव – २०२४” आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन दिनांक २१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्‍यमंत्री मा. ना. श्री.एकनाथ शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते आणि केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना.श्री. शिवराजसिंह चौहान यांच्या विशेष उपस्थितीत तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्‍याचे कृषि मंत्री मा. ना. श्री. धनंजय मुंडे हे होते. सदर महोत्‍सवानिमित्‍त आयोजित स्व. पंडीतअण्णा मुंडे सभामंडपातील कृषि प्रदर्शनीत राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठे आणि खासगी कंपन्‍या यांच्‍या कृषि तंत्रज्ञान आधारीत ४०० पेक्षा जास्‍त दालनाचा समावेश आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने या महोत्सवातील प्रदर्शनामध्ये कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी तेरा दालने उभारली आहेत. या दालनांना शेतकरी उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून यामध्ये कृषी यंत्र व शक्ती विभागाच्या डॉ. स्मिता सोलंकी यांनी कृषी यंत्र व शक्ती यांचे भव्य असे यंत्राचे दालन उभारले आहे. या दलानामध्ये ड्रोनद्वारे फवारणी  प्रात्यक्षिक ड्रोन पायलट सातत्याने दाखवीत असून परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्वातील हे एक मुख्य आकर्षण ठरले आहे. या  प्रात्यक्षिकाला शेतकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी द्वारे कृषि क्षेत्रात शेतकऱ्यांना फवारणी वरील खर्च व वेळ वाचवावा याकरीता ड्रोनचा वापर करून विविध पिकातील किडव्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन यासाठी भाडेतत्वावर ड्रोन उपलब्ध व्हावेत व त्याची निगरणी व दुरूस्त तसेच शेतकरी युवा पिढीस स्मार्ट व प्रगतशील तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील कामे व स्वयंरोजगार निर्मीती करता यावी या दृष्टीकोनातुन कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली वॉव गो ग्रीन कृषि विमान (ड्रोन) संस्थाचे संचालक श्री. शंकर गोयंका यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे आणि या करारामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व  वॉव गो ग्रीन कृषि विमान (ड्रोन) यांचे संयुक्त विदयमाने कृषी क्षेत्रात भाडेतत्वावर फवारणी करीता ड्रोनची उपलब्धतता माफक दारात करून देण्यात आली आहे. त्याबाबतीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती व्हावी म्हणून महोत्सवात सतत प्रात्यक्षिके सुरु असून त्याबाबतीत सविस्तर माहिती देण्यात येत आहे.

याबरोबरच महोत्सवात विद्यापीठाने मराठवाड्यातील यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि शास्त्रज्ञांचे मार्गदर्शने आयोजित केले आहेत. यात दिनांक २२ ऑगस्ट रोजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे. डॉ. कैलास डाखोरे, डॉ. स्मिता सोलंकी यांनी केलेल्या मार्गदर्शनास तसेच प्रदर्शन दालनास भेटी देवून राज्‍यातील शेतकरी बांधव व कृषिचे विद्यार्थीकृषि विस्‍तारक यांनी मोठया संख्येने सहभागी  प्रमाणात भेट देवून उत्‍स्फुर्त प्रतिसाद देत आहेत.