Monday, May 26, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ५३ व्या संयुक्त कृषि संशोधन विकास समितीच्या बैठकीचे आयोजन

 राज्‍याचे मुख्यमंत्री माननीय ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

तीन दिवशीय बैठकीत तीनशे ते चारशे कृषि शास्‍त्रज्ञांचा सहभाग, ३६ नवीन वाणासह साधारणतः २४७ तंत्रज्ञान शिफारसी मांडल्या जाणार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीच्‍या ५३ व्‍या बैठकीनिमित्‍त दिनांक २६ मे रोजी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पत्रकार परिषद संपन्‍न झाली. या पत्रकार परिषदेत संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश आहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, प्रभारी नियंत्रक श्री. सुधाकर सोळंके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागरडॉ. राहुल रामटेके, डॉ विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रसिद्धी समितीचे सर्व सदस्य आणि बियाणे विभागाचे अधिकारी तसेच विविध प्रसार माध्‍यमांचे प्रतिनिधी मोठया संख्‍येने उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ शंकर पुरी यांनी केले तर आभार विभाग प्रमुख डॉ राजेश कदम यांनी मानले.


प्रेस नोट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व महाराष्ट्र कृषि शिक्षण संशोधन परिषद, पुणे यांचे संयुक्‍त विद्यमाने राज्यातील चारही कृषि विद्यापीठाची ५३ व्या संयुक्त कृषि संशोधन विकास समिती-२०२५ चे आयोजन २९ ते ३१ मे, २०२५ दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे करण्‍यात आले आहे. या बैठकीचे उद्घाटन २९ मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्‍हणुन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री  मा. ना. श्री. अजित पवार यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. अॅड. माणिकरावजी कोकाटे राहणार असून कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे स्वागताध्यक्ष आहेत.

कार्यक्रमास पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री मा. ना. श्रीमती पंकजाताई मुंडे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर, कृषि, वित्त, नियोजन, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री  मा.ना. अॅड. आशिष जयस्वाल, कृषि परीषदेचे उपाध्यक्ष मा. ना. मा. श्री तुषार पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे.  

यावेळी राज्यसभा सदस्य मा. खा. श्रीमती फौजिया खान, लोकसभा सदस्य मा. खा.  श्री. संजय जाधव, विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. सतीश चव्हाण, विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. विक्रम काळेविधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, विधानसभा सदस्य मा. आ. श्री रत्नाकर गुट्टे, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. रमेशराव कराड, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. अभिमन्यू पवार आणि विधानसभा सदस्य मा. आ. श्री राजेश विटेकर, विद्यापीठ कार्यकारी परिषद सन्मानीय सदस्य मा. श्री विठ्ठल सकपाळ, मा. श्री. सुरज जगताप, मा. श्री. प्रविण देशमुख, मा. श्री. दिलीप देशमुख, मा.डॉ. आदिती सारडा, मा. श्री. भागवत देवसरकर, मा. डॉ. कौशिक बॅनर्जी, मा. डॉ. व्ही. एम. मायंदे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा. श्री. विकासचंद्र रस्तोगी (भाप्रसे), पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक मा. श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे), कृषि आयुक्त मा. श्री. सुरज मांढरे (भाप्रसे), पिडीकेव्ही अकोला आणि एमपीकेव्ही राहुरीचे कुलगुरू मा. डॉ शरद गडाख, बीएसकेकेव्ही दापोलीचे  कुलगुरू मा. डॉ, संजय भावे हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत.

कृषि परिषदेचे सर्व संचालक, चारही कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक, शिक्षण संचालक, विस्तार शिक्षण संचालक यांच्यासह जवळपास तीनशे ते चारशे शास्त्रज्ञ उपस्थित रहाणार आहेत. यावेळी विद्यापीठ तंत्रज्ञान व उपक्रमावर आधारित प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे.

महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतकरी बांधवापर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा मानल्‍या जाणा-या बैठकीचे आयोजन दरवर्षी एका कृषी विद्यापीठात करण्‍यात येते. यावर्षी परभणी कृषी विद्यापीठास बैठक आयोजित करण्‍याचा  मान  प्राप्‍त झाला.

हवामान बदल, दुष्काळ, जमिनीच्या सुपीकतेचा ऱ्हास, व वाढती लोकसंख्या अशा अनेक आव्हानांमुळे राज्यातील कृषी उत्पादनावर मर्यादा येत असताना राज्यातील चारही कृषि विद्यापीठांनी संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वतता निर्माण करण्यासाठी विविध पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणाऱ्या ३६ नवीन वाणांसह साधारणतः २४७ तांत्रिक शिफारसी या बैठकीत मांडण्यात येणार आहेत. या शिफारसींमध्ये सुधारित व संकरीत वाण, पशुधनाच्या सुधारीत प्रजाती, आधुनिक पीक लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक अन्नद्रव्य व कीड-रोग व्यवस्थापन, तसेच मृद व जलसंधारणासंबंधी उपाययोजना यांचा समावेश आहे.

ही बैठक केवळ शिफारसी मांडण्यासाठीच नव्हे, तर कृषी क्षेत्रातल्या वास्तव परिस्थितीचा अभ्यास करून शाश्वत व दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणींवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजना सुचवण्यात येतात.

सदर बैठक ही तीन दिवसांकरिता आयोजित करण्यात येत असुन पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येतो. त्यानंतर तीन तांत्रिक सत्रांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये पहिल्या तांत्रिक सत्रात कृषि संलग्न विभागाच्या संचालकांमार्फत आणि राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या वतीने सादरीकरण केले जाते.

दुस­या दिवशी आयोजित केलेल्या दुस­या तांत्रिक सत्रात १२ गट तयार करुन विद्यापीठामार्फत संशोधीत केलेले विविध पिकांचे संकरित व सुधारित वाण, यंत्र व अवजारे आणि तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या जातात. यावर सखोल चर्चा होवुन अशा शिफारशींना समितीमार्फत मान्यता दिली जाते.

तिस­या दिवशीच्या समारोपीय तांत्रिक सत्रात दोन दिवसात झालेले सर्व सादरीकरण आणि निर्णय तसेच समितीने दिलेल्या सर्वसाधारण सुचना या संदर्भात सादरीकरण केले जाते आणि सर्व कार्यवृतांतास मान्यता दिली जाते आणि या बैठकीचा समारोप करण्यात येतो.

 चारही विद्यापीठांचे विविध पिकांचे संकरित व सुधारित वाण, यंत्र व अवजारे आणि तंत्रज्ञान शिफारशी मान्यतेनंतर महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागास सादर करुन विस्तार यंत्रणेमार्फत शेतक­यांच्या शेतावर प्रत्यक्ष राबविण्यात येतात.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ५८ शिफारशींचे सादरीकरण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांमार्फत संशोधनावर आधारीत एकुण ५८ शिफारशी बैठकीत सादर करण्यात येणार असुन यात चार (४) प्रसारीत वाणएक (१) कृषि औजारे यासह इतर ५३ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्‍या १०३ शिफारशींचे सादरीकरण

डॉ. पंजाबराव देश्‍मुख कृषि विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारित एकुण १०३ शिफारशी सादर करण्यात येणार असून यात १० प्रसारित वाण१२ कृषि अवजारांसह इतर ८१ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत.

राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्‍या ९४ शिफारशींचे सादरीकरण

महात्मा फुले कृषि विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारित एकुण ९४ शिफारशी सादर करण्यात येणार असून यात ९ प्रसारित वाण११ पूर्वप्रसारीत वाण, ३ कृषि अवजारे, १ जैविक ताण सहन करणारे स्त्रोतसह इतर ७० तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्‍या  ५० शिफारशींचे सादरीकरण

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारित एकुण ५० शिफारशी सादर करण्यात येणार असून यात २ प्रसारित वाण५ कृषि अवजारांसह ४३ सुधारीत तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत.

तांत्रिक चर्चासत्रात साधारणत: ३०० हून अधिक शास्‍त्रज्ञांचा सहभाग

तीन दिवस चालणा­या या बैठकीच्या तां‍त्रिक चर्चासत्रात चारही कृषि विद्यापीठातील साधारणत: ३०० हून अधिक कृषि शास्त्रज्ञ सहभाग नोंदविणार असुन वरील सर्व शिफारशींवर विचारमंथन होऊन शेतकऱ्यासाठी प्रसारीत करण्यासाठी त्यास अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. प्रथम सत्रामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत असलेल्या महाराष्ट्रातील नऊ संशोधन संस्थांचे संचालक तसेच शास्त्रज्ञराज्यशासनाच्या विविध विभागाचे आयुक्त पदाचे अधिकारीकृषि विषयक खात्‍याचे प्रमुखांचे व राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील संशोधन संचालक अहवालाचे सादरीकरण करणारआहेत.

राष्‍ट्रीय पातळीवरील शास्‍त्रज्ञांचे विशेष सादरीकरण

अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे संचालक श्री योगेश कुंभेजकर, नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. व्ही एन वाघमारे, राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. दिलीप घोष तर मुंबई येथील केंद्रीय कापुस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. के. शुक्ला यांचे सादरीकरण होणार आहे. मुंबई येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. एन पी साहू तसेच बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. के. सामी रेड्डीसोलापुर येथील राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर ए मराठेपुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जीनागपुर येथील राष्ट्रीय मृद सर्वेक्षण व जमीन वापर योजना केंद्राचे संचालक डॉ. एन. जी. पाटीलपुणे येथील कांदा व लसुण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. विजय महाजन आणि फुलशेती संशोधन संचालनालयकृषि महाविद्यालय पुणे येथील संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांचे त्यांच्या क्षेत्रातील विविध विषयावर संशोधनात्मक सादरीकरण राहणार आहे. याप्रकारच्या वैविध्यपुर्ण संशोधनात्मक सादरीकरणातून राज्यातील कृषि संशोधनकांना मार्गदर्शक ठरणार आहेत.

तांत्रिक सत्राच्या एकुण १२ गटांमार्फत विविध शिफारशीवर विचारमंथन होणार आहे. तांत्रिक सत्राच्या पहिल्या गटात शेत पीके (पीक सुधारणा व तंत्रज्ञान सुधारात्मक व्युहरचना) यावर शिफारशी प्रसारीत होणार आहेत. नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनउद्यानविद्या आणि पशु व मत्स्य विज्ञान या वरील शिफारशी अनुक्रमे गट क्र. २३ व ४ मध्ये मांडण्यात येणार आहेत. गट क्र. ५ मध्ये मुलभुत शास्त्रेअन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयावरील शिफारशी मांडण्यात येणार आहेत तर गट क्रमांक ६७ व ८ मध्ये पीक संरक्षणकृषि अभियांत्रिकी व सामाजीक शास्त्र या विषयावरील शिफारशी मांडण्यात येणार आहेत. शेती पीके आणि उद्यानविद्या वाण प्रसारण तसेच कृषि यंत्रे व अवजारे प्रसारणावर चर्चा गट क्र. ९१० व ११ मध्ये होणार आहे. जैविक ताण सहन करणारे स्त्रोत नोंदणी प्रस्ताव गट क्र. १२ मध्ये मांडण्यात येणार आहे.

राष्‍ट्रव्‍यापी विकसित कृषि संकल्प अभियानाचे माननीय मुख्‍यमंत्री यांच्‍या हस्‍ते उदघाटन

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी आधुनिक कृषी पद्धती, समृद्ध शेतकरी आणि विज्ञानाधिष्ठित शेती आवश्यक आहे. कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून अन्नसुरक्षेसोबतच देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला रोजगार पुरवते. याकरिता केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने दि. २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान देशभरात “विकसित कृषि संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ दिनांक २९ मे २०२५ रोजी होणार आहे. या अभियानामध्ये देशातील ७२३ जिल्ह्यांमधील ६५,००० पेक्षा जास्त गावांना भेट देणाऱ्या २,१७० तज्ज्ञ पथका सहभागी होणार आहेत. प्रत्येक पथकात किमान चार वैज्ञानिक असतील. या पथकांमध्ये कृषी विद्यापीठांचे वैज्ञानिक, संशोधन संस्थांचे तज्ज्ञ, शासकीय विभागांचे अधिकारी, नाविन्यपूर्ण कार्य करणारे शेतकरी आणि एफपीओचे (FPO) कर्मचारी यांचा समावेश असेल. या अभियानाद्वारे देशातील १.३ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात या अभियानाचे उद्घाटन परभणी कृषी विद्यापीठात माननीय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्यात हे अभियान कृषी विभाग आणि ५० कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून ४५०० गावांत राबवले जाणार आहे. मराठवाडा विभागातील विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या आठ जिल्ह्यांतील १२ कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून १,०८० गावांमध्‍ये राबविण्‍यात येणार आहे.

सदर बैठकीत नैसर्गिक शेतीस चालना देण्यासाठी “पीएम प्रणाम” योजनेवर विचार मंथन करण्‍यात येणार आहे तसेच हवामान अनुकूल तंत्रज्ञान, पिकांच्या बाजारभाव आणि मागणीनुसार अंदाज बाधण्‍यासाठी राज्‍यापातळीवर सर्वांच्‍या सहभागातुन विकास यंत्रणा निर्माण करण्‍यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्वाचा असलेला शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र : ‘महाविस्तार एआय’ ॲपचा प्रभावी वापर होण्याच्या दृष्‍टीने सदरिल बैठकित विचार मंथन करण्‍यात येणार असल्‍याची माहिती माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिली.

सदरील बैठकीचा समारोप ३१ मे रोजी होणार आहे. या बैठकीसाठी राज्याचे माननीय राज्यपाल  तथा विद्यापीठाचे  माननीय कुलपती श्री सी. पी. राधाकृष्णनजी, मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस आदींसह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आल्याची माहिती संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी दिली.




Sunday, May 25, 2025

मराठवाड्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू — शेतकऱ्यांनी पेरणीस घाई करू नये

 वनामकृविच्या हवामान विभागाचा सल्ला

सध्या मराठवाड्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. मात्र, भारतीय हवामान विभागानुसार अजून मान्सूनचे अधिकृत आगमन झालेले नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सद्यस्थितीत पेरणी करण्याची घाई टाळावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कैलास कामाजी डाखोरे यांनी केले आहे.

मान्सूनपूर्व पाऊस ही नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी या पावसावर पेरणी केल्यास पुढील टप्प्यावर पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत कीड-रोगांचा प्रादुर्भाव, उशिरा होणारा पाऊस किंवा अचानक कोरडा पडल्यास पीक नुकसान होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या वातावरणात फक्त मशागत पूर्ण करून ठेवणे योग्य ठरेल.

भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत अजून काही ठिकाणी पावसाच्या सरी कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र हा पाऊस अपुरा व अनियमित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीच्या दीर्घकालीन यशासाठी, खरीप हंगामातील पेरणीसाठी मान्सूनच्या स्थिर व सातत्यपूर्ण पावसाची वाट पाहणे गरजेचे आहे.

शेतकरी बांधवांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन, शेतातील "वापसा" स्थिती योग्य प्रकारे तयार करून मशागतीची कामे उरकावीत. यामुळे पावसाळा सुरू झाल्यावर वेळेवर पेरणी करता येईल.

मान्सूनचे अधिकृत आगमन जाहीर झाल्यावरच पेरणीसाठी मार्गदर्शन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Friday, May 23, 2025

"ऑपरेशन सिंदूर " साठी वनामकृवित विशेष कार्यक्रम आणि तिरंगा रॅली – विद्यार्थ्यांत राष्ट्रभक्ती आणि मानवी मूल्यांची रुजवणूक

 ऑपरेशन सिंदूरचा गौरवशाली विजय – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रतिपादन



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भारतीय सैन्याच्या शौर्यगाथेचे प्रतीक ठरलेले "ऑपरेशन सिंदूर " या ऐतिहासिक शौर्याच्या यशोगाथावर आधारित “विशेष कार्यक्रम आणि तिरंगा रॅलीचे” माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी आयोजन दिनांक २३  मे  रोजी  केले. राष्ट्रीय एकात्मता आणि मानवी मूल्यांचे संवर्धन हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून हा कार्यक्रम राबविण्यात आला. या शौर्याच्या यशोगाथेचा विद्यार्थ्यांपर्यंत प्रचार व प्रसार करणे तसेच त्यातून भारतीय सैन्याच्या योगदानाची जाणीव करून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.

या विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना देशभक्तीची भावना जागृत करणारे मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी अलीकडेच काश्मीरमध्ये घडलेल्या निंदनीय आणि वेदनादायी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. ही घटना विकृतीच्या सीमेला गेलेल्या प्रवृत्तींनी घडवलेली असून, संपूर्ण भारताचे रक्त उसळले होते, असे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या विशेष लष्करी कारवाईचा गौरव करत त्यांनी भारतीय लष्कराच्या धाडसाचे कौतुक केले. या मोहिमेद्वारे जे विकृत कृत्य करणारे होते, त्यांच्यावर कठोर कारवाई करून भारतीय लष्कराने त्यांचा नायनाट केला. हा विजय फक्त लष्कराचा नसून संपूर्ण देशासाठी गौरवाचा क्षण आहे, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या मोहिमेचे नेतृत्व महिलांनी केले असल्याने भारतीय महिला शक्तीचे अधोरेखनही या प्रसंगी झाले. या कार्यवाहीमुळे भारताची लष्करी ताकद आणि महिला सामर्थ्य दोन्हींचा जागतिक स्तरावर सन्मान वाढला आहे, असे ते म्हणाले. आपला देश शांतताप्रिय असूनही जर कोणी डिवचले, तर त्याला सडेतोड उत्तर देण्याची क्षमता भारताकडे आहे, हे या मोहिमेने पुन्हा सिद्ध केले आहे. आपण सर्वांनी देशप्रथम ही भावना ठेवून कार्य करणे आवश्यक आहे. दुसऱ्यांमध्येही ही भावना रुजवणे ही आपली जबाबदारी आहे. राष्ट्र सुरक्षा आणि अन्न सुरक्षा या दोन्ही बाबतीत भारत सक्षम आहे आणि हीच ताकद संपूर्ण जगासमोर उभी राहत आहे, असे प्रतिपादन त्यांनी शेवटी केले.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारतीय लष्कराच्या शौर्यगाथेचा सन्मान करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवण्यासाठी विद्यापीठात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यापीठातील १२०० विद्यार्थ्यांनी "योद्धा" म्हणून नोंदणी केली आहे, ही बाब विद्यार्थ्यांमधील देशसेवेच्या भावना अधोरेखित करते.

विद्यापीठाच्या परिसरात या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद ईस्‍माईलडॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. जया बंगाळेडॉ. राहुल रामटेके, डॉ विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदींसह विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, आणि राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेचे तसेच विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांची बहुसंखेने उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीच्या घोषणां देवून परिसर दणाणला आणि एक स्फूर्तीदायी वातावरण विद्यापीठात परिसरात निर्माण केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागवणारा व भारतीय सैन्याच्या अभिमानास वंदन करणारा ठरला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट डॉ जयकुमार देशमुख यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. रणजीत चव्हाण यांनी मानले.











Tuesday, May 20, 2025

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न

 पदवीपूर्व शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न आवश्यक... शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथे दिनांक १६ मे रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये सशक्त समन्वय असावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार हे होते. त्यांनी आपल्या भाषणात पदवीपूर्व शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पाया असल्याचे सांगत, हा पाया भक्कम करण्यासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल रामटेके यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्तरावर राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले,  कृषि अभियांत्रिकी शाखा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेसोबतच त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देणारी शिक्षणपद्धती आहे. विद्यार्थ्यांनी कृषि क्षेत्रात उद्योजक होण्याची संधी घेतली पाहिजे.

शिक्षण प्रभारी प्रा. विवेकानंद भोसले यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख, दर्जेदार आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देणे हे महाविद्यालयाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

डॉ. मधुकर मोरे यांनी पालकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले संस्कार, वाचन, खेळ आणि व्यायाम यांचे महत्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. गोपाळ शिंदे यांनी कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी ड्रोन, रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता या नव्या क्षेत्रांमध्ये पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. पालक प्रतिनिधी श्री. ढाकणे यांनी महाविद्यालयातील शिस्तबद्ध वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामकिशन खटिंग यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. रवींद्र शिंदे यांनी केले.

कार्यक्रमास डॉ. सुमंत जाधव, डॉ. सुभाष विखे, डॉ. प्रमोदिनी मोरे, डॉ. विशाल इंगळे, प्रा. दत्ता पाटील, डॉ. गजानन वासू, डॉ. आश्विनी गावंडे, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. शैलजा देशवेना, डॉ. ओंकार गुप्ता, लक्ष्मीकांत राऊतमारे आणि मंचक डोंबे यांची उपस्थिती होती.






Monday, May 19, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बियाणे विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनाचे आयोजन दिनांक १८ मे रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या माननीय राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाच्या बिज प्रक्रीया केंद्रावर खरीप हंगामासाठी बियाणे विक्रीचा शुभारंभ विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, माजी कृषि आयुक्त मा. श्री. उमाकांत दांगट, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य मा. श्री. दिलीप देशमुख व मा. श्री. भागवत देवसरकर, तसेच विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रगतिशील शेतकरी श्री. सुधीर अग्रवाल, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, व बिज प्रक्रिया केंद्र प्रभारी अधिकारी डॉ. संतोष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

बियाणे विक्री मध्ये मुख्यत्वे खरीप ज्वारी जैव संपृक्त वाण (परभणी क्ती), मुग (बीएम 2003-2), तुरीच्या लाल वाणामध्ये (बीडीएन 716, बीएसएमआर-736) तुरीच्या पांढ-या वाणांमध्ये (बीडीएन 711, बीएसएमआर 853, व गोदावरी), सोयाबीन (एमएयुएस 162,एमएयुएस 158 व एमएयुएस 612), भरड धान्य राळा व नाचणी, कापुस सरळ वाण (एन एच 1901 बीटी, एन एच 1902 बीटी), कापुस देशी वाण (पीए 810) या वाणाच्या बियाण्याची विक्री करण्यात आली. विद्यापीठ संशोधन वाणांच्या बियाणे खरेदीसाठी मराठवाडा विभागातुन 2000 पेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी पहिल्याच दिवशी लाभ घेतला. यामध्ये सोयाबीन (300 क्विटल), तुर (90 क्विंटल) मुग (10 क्विंटल), ज्वार (01 क्विटल) व कापसाचे (1.50 क्विटल) असे एकूण 400.02 क्विंटल बियाणाची विक्री करण्यात आली. विद्यापीठाच्या परभणी येथील बिज पक्रिया केंद्रावर कार्यालयीन वेळेत बियाणे विक्री सुरु आहे. विद्यापीठ आंतर्गत, कापुस संशोधन केंद्र नांदेड, कृषि विज्ञान केंद्र छ. संभाजीनगर, कृषि विज्ञान केंद्र खांमगाव, कृषि विज्ञान केंद्र तुळजापूर, कृषि विज्ञान केंद्र बदनापूर, गळीत धान्य संशोधन केंद्र लातूर, कृषि महाविद्यालय गोळेगाव व कृषि महाविद्यालय आंबेजोगाई, आदी ठिकाणी लवकरच बियाणे विक्रीस उपलब्ध होईल, असे सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे यांनी कळविले आहे.




विकसित कृषि संकल्प अभियानांतर्गत नागपूर येथे किसान संमेलन; वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या दालनाला मान्यवरांची भेट

 

नागपूर येथे विकसित कृषि संकल्प अभियानाच्या अंतर्गत आयोजित भव्य ‘किसान संमेलन’ कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या प्रदर्शन दालनास मोठा प्रतिसाद लाभला.

या विशेष प्रसंगी केंद्रीय कृषि मंत्री मा. ना. श्री. शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषिमंत्री  मा. ना. ॲड. माणिकराव कोकाटे, आयसीएआरचे महासंचालक डॉ एम. एल. जाट तसेच शेतकरी बांधव यांनी विद्यापीठाच्या दालनास भेट देऊन तेथील शेतकरी अनुकूल नवतंत्रज्ञानाची माहिती घेतली.

या प्रदर्शन दालनाचे नियोजन माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.डी.डी.पटाईत आणि श्री.एम.बी.मांडगे यांनी मान्यवरांना विद्यापीठातील विविध नाविन्यपूर्ण संशोधन, तांत्रिक प्रगती आणि शाश्वत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाचे सविस्तर सादरीकरण केले. उपस्थित शेतकरी बांधवांनीही या दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विद्यापीठाचे अधिकारी श्री.जी.बी.भराड, श्री.एम.ए.साखरे, श्री.एन.ए. मोहिते उपस्थित होते.

विद्यापीठाने विकसित केलेली प्रगत वाण, हवामान सुसंगत शेती पद्धती, तंत्रज्ञान आधारित उपाययोजना आणि कृषि प्रक्रिया उद्योगातील संधी यामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे या प्रसंगी दिसून आले.

नागपूर येथे 'विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत आयोजित 'किसान संमेलन' कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी च्या प्रदर्शन दालनास माननीय कृषि मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस तसेच शेतकरी बांधव यांनी भेट दिली. यावेळी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी त्यांना विद्यापीठातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती दिली.