Friday, November 8, 2013

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ के पी गोरे यांना निरोप




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ के पी गोरे यांनी वयाचे 65 वर्ष पुर्ण केल्‍यामुळे दि 07 नोब्‍हेंबर 2013 रोजी कुलगुरू पदावरून निवृत्‍त झाले. त्‍यानिमित्‍त विद्यापीठाच्‍या वतीने समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी परभणीचे जिल्‍हाधिकारी मा श्री एस पी सिंग हे होते तर शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागिरे, सौ कलावंतीताई गोरे, जेष्‍ट स्‍वातंत्रसेनानी श्री आर डी देशमुख, प्रगतशील शेतकरी श्री सोपानराव अवचार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मा डॉ के पी गोरे यांचा जिल्‍हाधिकारी मा श्री एस पी सिंग यांच्‍या हस्‍ते सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला.
सत्‍काराला उत्‍तर देतांना कुलगूरू मा डॉ के पी गोरे म्‍हणाले की, विद्यापीठ ही केवळ संस्‍था नसून आमचा सर्वांचा श्‍वास आहे, येथील सर्व अधिकारी, कर्मचारी व सर्व सहकारी यांच्‍या मोलाच्‍या सहकार्यामुळे आज विद्यापीठाचा नावलौकिक देशपातळी झाला आहे. आपल्‍या भूमीची व लोकांची सेवा करण्‍याची कुलगूरू या नात्‍याने संधी मिळाली, त्‍यासंधीचा विद्यापीठाचा विकास व प्रगतीसाठी उपयोग केला. ज्‍या विद्यापीठात शिक्षण घेतले त्‍याच विद्यापीठाचा कुलगुरू झालो हे माझे भाग्‍य समजतो असे भाग्‍य फार थोडया व्‍यक्‍तीना प्राप्‍त होते. याच भागातील असल्‍यामुळे सहाजिकच या विभागाची प्रगतीसाठी,शेतकरीवर्गाची उन्‍नतीसाठी विद्यापीठ परिवाराच्‍या सहकार्याने प्रयत्‍न केले. राष्‍ट्रीय पातळीवर जेआरएफ परिक्षेत विद्यापीठाच्‍या 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्‍यांचे यश, द्विपदवी सामंजस्‍य करार, दर्जेदार शिक्षण व संशोधनासाठी प्रयोगशाळांची निर्मिती व बळकटीकरण, ग्रंथालये व वर्ग खोल्‍यांचे अदयावतीकरण, विद्यापीठास्‍तरावर उत्‍कृष्‍ट शिक्षक पुरस्‍काऱांची सुरूवात, पिंगळगड सिंचन विकास प्रकल्‍प, शेती अवजारे निर्मिती, चाचणी व प्रशिक्षण केंद्र, विद्यापीठ आपल्‍या दारी तंत्रज्ञान शेतावरी हा विशेष विस्‍तार उपक्रम, सार्वजनिक खाजगी भागीदारीतील अन्‍न व फळ प्रक्रिया प्रकल्‍प, गोळेगांव येथे ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतक-यांच्‍या दृष्‍टीने कृषि महाविद्यालयाची स्‍थापना, चाकूर येथील कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन महाविद्यालयास शिक्षक व शिक्षकेत्‍तर पदांची मान्‍यता, नांदेड व चाकूर येथील अतिक्रमण काढण्‍याची मोहिम आदी उपक्रम कमी मनुष्‍यबळ असतांनाही यशस्‍वीरित्‍या राबवु शकलो. यासाठी कल्‍पना माझी होती परंतु ही कल्‍पना साकार करण्‍याचे कार्य सर्वानी केली हे निश्चित. विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक व कर्मचारी आदीनी शेतकरी व विद्यार्थी केंद्रबिंदु मानुन प्रामाणिकपणे कार्य करावे, असा सल्‍ला ही त्‍यांनी दिला.
अध्‍यक्षीय समारोपात जिल्‍हाधिकारी मा श्री एस पी सिंग म्‍हणाले की, मा डॉ के पी गोरे यांच्‍या नेतृत्‍वाखाली विद्यापीठाचे नावलौ‍किक देशापातळी झाले. त्‍यांच्‍या कमी कार्यकाळात विद्यापीठाचे कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार कार्य अधिक वेगाने व प्रभावीपणे झाले. त्‍यांचे हेच कार्य याच पध्‍दतीने पुढे नेण्‍याची जबाबदारी विद्यापीठाच्‍या कर्मचारांवर आहे. डॉ गोरे यांच्‍या कल्‍पनेने सुरू केलेला विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी यासारख्‍या उपक्रमाची व्‍याप्‍ती वाढविणे गरजेचे आहे. ज्‍याप्रमाणे आई आपल्‍या मुलावर प्रेम करते तसे प्रेम डॉ गोरे यांनी विद्यापीठावर केले, त्‍यामुळे आज विद्यापीठ गतीमान झालेले दिसत आहे. प्रत्‍येकाची भुमिका विद्यापीठ विकासासाठी महत्‍वाची आहेच, पंरतु डॉ गोरे यांच्‍या सारख्‍या नेतृत्‍वाची जोड पाहीजे हे निश्चित. हा वारसा पुढे नेण्‍याचे काम आता विद्यापीठाच्‍या कर्मचारांवर आहे, असे गौरोवदगार त्‍यांनी काढले.
यावेळी मान्‍यवरांसह परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी बी भोसले, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटणम, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ एच व्‍ही काळपांडे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. 
कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापकवृंद, कर्मचारीवृंद, विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी, प्रतिष्‍ठीत नागरीक मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ माधुरी कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्री उदय वाईकर यांच्‍या निरोपगीतानी झाली.